पुणे- कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत काल खासदार बापटांच्या एन्ट्री ने रंगत आणल्या नंतर आता आज पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी कॉंग्रेसचे माघार घेतलेले बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली . माजी खासदार संजय काकडे, संदीप खर्डेकर यावेळी त्यांच्या सोबतीला होते. या शिवाय राजेश शहा आणि त्यांच्या कसब्यातील सहकारी व्यापाऱ्यांशी पाटलांनी थेट चर्चा केली ,तर अनेक शिक्षक शिक्षिकांशी देखील संवाद साधला .भाजपचे उमेदवार हेमंत रासने या रणनीतीने फुललेल्या चेहऱ्याने वावरत असल्याचे दिसत होते .
कसबा मतदार संघात कॉंग्रेसच्या धंगेकर यांनी प्रचारात पहिल्याच टप्प्यात आघाडी घेतली होती , अजित पवार , नाना पटोले , अशोक चव्हाण यांच्या सभेने आणि धंगेकर यांच्या पदयात्रेने वातावरण ढवळून निघालेले असताना गेली ३ दिवसांपासून भाजपने आपल्या वेगळ्या व्यूहनीतीला प्रारंभ केल्याचे दिसले आहे .
प्रथमतः गिरीश महाजन यांच्या मार्फत या व्यूहनिती ला प्रारंभ केला त्यांनी काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणविसांनी पुण्यात येऊन काही भेटीगाठी घेतल्या आणि त्याच बरोबर आजारी असलेल्या खासदार गिरीश बापटांच्या भेटीला जाऊन चर्चा केली . त्यानंतर काल खुद्द बापट केसरीवाड्यात आजारी असूनही कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मोहिमेला प्रारंभ केला तेही माजी खासदार संजय काकडे यांना बरोबर घेऊनच .
भाजपच्या या रणनीतीने आता कसब्यात वर्चस्व निर्माण केलेल्या धंगेकर यांच्या माताधीक्याला भेदून जाऊ शकेल काय ? भाजपचा बालेकिल्ला या रणनीतीने अभेद्द राहू शकेल काय ? या प्रश्नांची उत्तरे अर्थात मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.