मुंबई-शिंदे आणि ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले असून, शिवसेना हे नाव देखील शिंदे गटालाच दिले आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
काय म्हणाले निवडणूक आयोग
- 21 जूनला 55 पैकी 24 आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.
- त्याच दिवशी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली गेली.
- परंतु 21 जूनलाच एकनाथ शिंदे यांच्यासोबत 34 आमदार होते.
- त्यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडले. त्यामुळे अजय चौधरींची झालेली निवड बेकायदेशीर
- शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे.
शिवसेना हे पक्षनाव शिंदे गटालाच
शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. यानंतर आता याबाबत मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानुसार पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
ठाकरे यांना मोठा धक्का
ठाकरे गट आणि शिंदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. परंतु, आता ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसला असे मानले जात आहे.
पक्षचिन्हाच्या हक्काबाबत 12 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली होती. त्याला ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रतिनिधी हजर होते. सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज हजर होती.
हा खोक्यांचा विजय आहे-खासदार संजय राऊत
ज्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाप वापर झाला. तोच खोक्यांचा वापर लक्षात घेता हा तोच विजय आहे. खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला हे आता स्पष्ट झालं आहे. हा खोक्यांचा विजय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक : सुप्रिया सुळे
कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये. निवडणूक आयोग हे खूप पारदर्शक आहे. हा निर्णय मला कळतच नाहीये. हा निर्णय कसा झाला. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. बाळासाहेब हयात असताना त्यांनी ठरवलं होतं की, बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरे बघतील, पण हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.