पुणे-कसबा मतदार संघ ही माझी कर्मभूमी आहे. इथेच मी नगरसेवक म्हणून काम केले आहे. येथील प्रश्नांची मला चांगली जाण आहे आणि ते सोडविण्यासाठी सतत कष्ट करण्याची माझी वृत्ती आहे. आताच्या पोटनिवडणुकीत आमदारकीचा कालावधी दिड वर्षांचा असला तरी या काळात पाच वर्षांचे काम करण्याची जिद्द माझ्यात आहे, असा विश्वास कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आज व्यक्त केला. पदयात्रा संपल्यानंतर झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, २६ फेब्रुवारी हा कसबा मतदार संघाच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉईंट’ आहे. एवढेच नव्हे, तर कसब्याच्या दृष्टीने हा परिवर्तनाचा दिवस आहे. कसब्याच्या विकासाबाबत भाजपच्या निष्क्रियतेला मतदार कंटाळले असून त्यांना आता खराखुरा नियोजनबद्ध विकास हवा आहे. हा विकास करण्याची जिद्द व दृष्टी माझ्यात असून मतदार यावेळेस परिवर्तन निश्चित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्र. २९, नवी पेठ-पर्वती मध्ये ना.सी.फडके चौकात दुपारी ४:३० वाजता पदयात्रेला प्रारंभ झाला. या पदयात्रेत कॉंग्रेसचे माजी आमदार अनंतराव गाडगीळ, सचिन आडेकर, सुधीर काळे, किरण गायकवाड, नंदू वीर, विजय घोलप, आनंदराव गांजवे, राजू नाणेकर, कुणाल काळे, शंकर थोरवे, बाळासाहेब साठें, संदीप चौधरी, महेश शहाणे, किरण गंजकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, गणेश नलावडे, संतोष बेंद्रे, गजानन लोंढे, अभिजित बारवकर, मदन कोठुळे, मच्छिंद्र उत्तेकर, दीपक पोकळे, शाम ढावरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल धनवडे, प्रसाद काकडे, उमेश गालिंदे, देवेंद्र शेळके, वरद बांदल, गौरव सिन्नरकर, चंदन साळुंके हे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्रपक्ष यांचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.
तिन्ही पक्षांचे झेंडे, धंगेकरांचे पोस्टर्स असलेल्या या पदयात्रेत महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय दिसून येत होता. पुढे ना.सी. फडके चौकातून साने गुरुजी नगर- लोकमान्य नगर- न्यू इंग्लिश स्कूल मागील रस्ता- अशोक विद्यालय- अलका चौक- सेनादत्त पेठ परिसर- राजेंद्र नगर- दत्तवाडी चौक यामार्गे शास्त्री पुतळा येथपर्यंत जाऊन या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
या पदयात्रेत अनेक ठिकाणी धंगेकर यांना ओवाळले गेले. मार्गातील गणेशमंडळानी धंगेकरांचे सत्कार केले तसेच प्रत्येक ठिकाणी धंगेकर यांनी श्री गणेशाची आरती केली. चौकाचौकात पुष्पगुच्छ व फुलांचा हार देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. अनेक ठिकाणी पाणी व सरबत दिले जात होते. नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या निवडणुकीत परिवर्तन निश्चित होईल हा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत होता.