Home Blog Page 1399

ससून रुग्णालयातर्फे रक्तदान अभियानाचे आयोजन

पुणे दि. २१: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यात रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

मोहिमेअंतर्गत बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने शहरातील तीन ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात ३७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. शहरातील ससून रुग्णालय, टिळक रोड येथील सचिन ढवळे अकॅडमी आणि निकमार विद्यापीठ बाणेर येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान मोहिमेचे उद्घाटन ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी केले. यावेळी उपअधिष्ठाता मुरलीधर तांबे, डॉ.अजय तावरे, डॉ.भारत दासवानी, डॉ.निला नकाते, डॉ.सोमनाथ खेडकर, डॉ.मानसिंग साबळे, डॉ.संजय तांबे आदी उपस्थित होते.

५ रुपयांत ५ किलोमीटर प्रवास योजना बंद;पुण्यदशम तोट्यातच बंद करावी :पीएमपीएलचा निर्णय

पुणे – शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या डेपोपासून पाच किलोमीटरच्या अंतरासाठी ५ रुपये तिकिट आकारणी बंद झाली असून, त्या मार्गांवर नेहमीप्रमाणे तिकिट आकारणी होणार आहे. त्यामुळे टप्प्यानुसार प्रवाशांकडून पाच ते दहा रुपये तिकिट आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा बदल २८ मार्गांवर होणार आहे.दरम्यान पुणे शहरात १० रुपयात सुरु करण्यात आलेली पुण्यदशम मुळे येणारा तोटा महापालिकेकडून वेळेत मिळत नसल्याने तीही बंद करण्याचा विचार पीएमपीएमएल करत आहे.

पीएमपीने २५ ऑक्टोबर २०२० पासून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकिट आकारणी सुरू केली होती. त्यासाठी ५६ मार्ग निश्चित करण्यात आले होते. परंतु, काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे ते बंद करून २८ मार्गांवर ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती. परंतु, बस वाहतुकीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता ५ किलोमीटर अंतरासाठी ५ रुपये तिकिट आकारणीमुळे पीएमपीने आर्थिक नुकसान होत होते. त्यातून संचलनातील तूटही वाढत होती. त्यामुळे या २८ मार्गांवर १९ फेब्रुवारीपासून नेहमीच्या दराने तिकिट आकारणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

या मार्गांवर होणार नेहमीच्या दराने तिकिट आकारणी (डेपो आणि त्यातंर्गत मार्ग)

  • स्वारगेट – पुणे स्टेशन- ताडीवाला रस्ता, पुलगेट ते शीतल पेट्रोल पंप
  • नरवीर तानाजी वाडी – डेक्कन – गोखलेनगर, डेक्कन- नीलज्योती
  • कोथरूड – कोथरूड स्टॅंड ते कोथरूड स्टॅंड (वर्तुळाकृती मार्ग), गालिंदे पथ ते दांगट वस्ती, कर्वेनगर (गार्डन सिटी) ते कर्वेनगर (वर्तुळ)
  • कात्रज – जांभुळवाडी, नह्रेगाव, गुजरवाडी, येवलेवाडी, वाघजाईनगर
  • हडपसर – सासवड रोड रेल्वे स्टेशन, महंमदवाडी, फुरसुंगी, मांजरी, संकेतविहार, मांजरी बुद्रुक
  • अप्पर डेपो – मार्केटयार्ड- शत्रुंजय मंदिर (वर्तुळ), कात्रज- कोंढवा रोड- अप्पर डेपो
  • निगडी – निगडी- रूपीनगर, खंडोबामाळ ते चिखली
  • भोसरी – भोसरी- दिघी, चऱ्होलीगाव- आळंदी
  • पिंपरी – चिंचवडगाव – वाल्हेकरवाडी
  • बालेवाडी – चिंचवडगाव – आकुर्डी रेल्वे स्टेशन

५० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांना आता स्वखर्चाने जाड अंथरूण आणण्याची अनुमती

पुणे दि. २१: अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थितीत कारागृह विभागातील अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्याच्या उपाययोजनांबाबत कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व सर्व कारागृहांचे अधीक्षक यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये ५० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांच्या वयाचा विचार करून जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणतः जाड अंथरूण तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्याबाबत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यानुसार या बाबतचे परिपत्रक सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख व सर्व कारागृह अधीक्षक यांना परिपत्रक निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कारागृह विभागाचे जनसंपर्क अधिकारी एस.बी.दराडे यांनी दिली आहे.
000

पिस्तुलासह काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे-देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे असा एकूण 40 हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.गणेश नंदकुमार महामुनी (वय-28 रा. दांडेकर पुल, सिंहगड रोड, सध्या रा. जनता वसाहत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्यापार्श्वभूमीवर हद्दीमध्ये पेट्रोलींग करत होते. त्यावेळी दत्तवाडी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार दांडेकर पुलपरिसरात थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार 500 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.

अटक करण्यात आलेला आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बलात्कार , घरफोडी ,विना परवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने देशी पिस्टल घातपात करण्यासाठी किंवा कोणत्या उद्देशाने बाळगले. तसेच हे पिस्टल त्याने कोठून आणले याचा तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे ,पोलीस उपायुक्त सहेल शर्मा ,सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे,यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन ,पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे,, तपास पथकाचेपोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे ,पोलीस अंमलदार कुंदन शिंदे,नवनाथ भोसले, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, किशोर वळे, अमोल दबडे, अमित चिव्हे,सद्दाम शेख, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, अनिस तांबोळी, ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली.

मालवाहतूक, टुरीस्ट टॅक्सी आदींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

पुणे दि २१: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस व ॲम्ब्युलन्स या वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस व ॲम्ब्युलन्स मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अर्जांसाठी त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता परिवहन विभागात लिलाव करण्यात येईल.

मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस व ॲम्ब्युलन्स वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत परिवहन विभागात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अर्जांसाठी त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता परिवहन विभागात लिलाव करण्यात येईल.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात सुनावले :म्हणाले-मुंबई हल्ल्याचे आरोपी तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत

0

बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, मुंबई हल्ल्याचे सूत्रधार येथे खुलेआम फिरत आहेत. उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अख्तर लाहोरला पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्यांना विचारले की, तुम्ही अनेकदा पाकिस्तानात आला आहात. तुम्ही परत जाल तेव्हा तुमच्या लोकांना सांगाल की, पाकिस्तानी चांगले लोक आहेत? या प्रश्नाच्या उत्तरात अख्तर म्हणाले – आपण एकमेकांवर आरोप करू नये. यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही. मुंबईवर कसा हल्ला झाला ते आपण पाहिले आहे. ते दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ते दहशतवादी तुमच्याच देशात मोकळेपणाने फिरत आहेत. त्याविरोधात भारतीयांनी तक्रार केली आहे. त्यांना याचा त्रास आहे.

लता मंगेशकर यांच्या पाकिस्तानातील परफॉर्मन्सच्या मुद्द्यावरही जावेद अख्तर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही भारतात नुसरत फतेह अली खान आणि मेहदी हसन यांचे मोठे कार्यक्रम केले आहेत. दुसरीकडे लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम तुमच्या देशात झालेला नाही.आपण एकमेकांवर आरोप करून काही साधणार नाही

संजय राऊत बिनडोकपणाचे आरोप करतात -देवेंद्र फडणवीस

0

मुंबई-संजय राऊत यांना विनाकारण प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण कुठला तरी आरोप करायचा आणि प्रसिद्धीत राहायचं. २ हजार कोटींचा आरोप केला. एक पुरावा त्यांच्याजवळ नाही. अलिकडे संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करतात की काय उत्तर द्यायचं? रोज खोटं बोलल्याने सहानुभूती मिळत नाही. चुकीचे आरोप लावल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल असं मला वाटतं आहे असं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

खासदार संजय राऊत यांचं पत्र सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का? असा माझा प्रश्न आहे. सुरक्षेचे विषय हे राजकारणाशी जोडणं अतिशय चूक आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे त्यापेक्षाही चूक आहे. संजय राऊत असोत की कुणी असो कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता नक्की आहे का? त्यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे का? यासंदर्भातली सगळी कारवाई ही आपल्याकडे गुप्तचर विभागातर्फे केली जाईल. कुणालाही सुरक्षा देण्याचं काम एक समिती करते. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती काम करते. आम्ही त्यांचं पत्र कमिटीकडे पाठवत आहोत. या संदर्भात आपण कधीही महाराष्ट्रात राजकारण करत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आवश्यक असेल तर त्यांना सुरक्षा पुरवली जाईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे

भीमाशंकर जे लोकं बोलत आहेत ते महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. कुणाच्याही मनात याबद्दल वाद नाही. ज्या लोकांकडे विषय नाहीत ते असले विषय उभे करत आहेत. भीमाशंकर हे महाराष्ट्रात आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. कुणी काय जाहिरात दिली कुणी काय म्हटलं यामुळे त्यात बदल होणार नाही. उद्या मी जर म्हटलं की कामाख्या मंदिर हे गुवाहाटीला नाही तर महाराष्ट्रात आहे तर असं म्हटल्याने ते मंदिर महाराष्ट्रात येणार आहे का? जे लोक बोलत आहेत त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही. कुणाच्याही मनात भीमाशंकरचा वाद नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा ‘सर्वोच्च’ सुनावणी:आज सिब्बल यांचाच युक्तिवाद, म्हणाले – निवडणूक आयोगाने दुसरी बाजू गृहीत न धरता निर्णय दिला

0

विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष म्हणजे पक्षाचे विधिमंडळातील लोकप्रतिनिधी वाटू लागलं आहे

विधिमंडळ पक्ष महत्त्वाचा की राजकीय पक्ष?

नवी दिल्ली-

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींसमोर आजपासून पुन्हा सलग 3 दिवस सुनावणी सुरू झाली. आज ठाकरे गटाचे वकिल अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आता या प्रकरणात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. आज पूर्णवेळ कपिल सिब्बल यांनीच युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने दुसरी बाजू गृहीत न धरता पक्ष आणि चिन्हावर निर्णय दिला असे ठाकरे गटातर्फे त्यांनी म्हणणे मांडले.

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, पक्षांतर बंदी कायदा या प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही गटांकडून पुन्हा युक्तिवाद करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणात अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा संदर्भ लागू होतो की नाही, यावरही ठाकरे व शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.

आज सुनावणीच्या पहिल्या दिवशी कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून अनेक वैधानिक मुद्द्यांची मांडणी करण्यात आली. यामध्ये विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, पक्ष म्हणून शिवसेनेचे अधिकार, पक्षाध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंचं अधिकार, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमवेत शिंदे गटातील आमदारांची बंडखोरी, त्याची वैधता अशा अनेक मुद्द्यांवर ऊहापोह करण्यात आला. यावेळी कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंनी आपणहून घेतलेल्या पक्षनेतेपदावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला.

एकनाथ शिंदेंची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याची प्रक्रिया पक्षाच्या नियमानुसार झाली नसल्याचा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला. “विधिमंडळ पक्षनेता हा एखाद्या पक्षातून निवडला जायला हवा. त्यासाठी पक्षाध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे पत्र द्यायला हवं. उदा. जेव्हा खर्गे काँग्रेसचे विधिमंडळ नेते झाले, तेव्हा सोनिया गांधींनी पत्र लिहिलं होतं. मग इथे कशाच्या आधारावर एकनाथ शिंदेंची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली?” असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

“निवडणूक आयोगासमोरची याचिका जर आपण पाहिली, तर त्यानुसार १८ जुलैपर्यंत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही बैठकीसंदर्भात कसलाच उल्लेख नाही. याचा अर्थ हे सगळे निर्णय पक्षाबाहेर घेतले जात होते”, असा युक्तिवाद सिब्बल यांनी यावेळी केला

“विधिमंडळात बहुमत असणारा एक गट स्वत:ला पक्ष म्हणवत आहे. स्वत:च्या फायद्यासाठी निर्णय घेत आहे. तुम्हाला याच घटनात्मक पेचावर निर्णय घ्यावा लागणार आहे”, असं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणाले.“या प्रकाराचा देशाच्या राजकीय स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो. कारण आता विधिमंडळ पक्षाला पक्ष म्हणजे पक्षाचे विधिमंडळातील लोकप्रतिनिधी वाटू लागलं आहे की तो राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपण काढून टाकू शकतो. उद्या खर्गे असं म्हणू शकतात का की ‘मी आता नेता आहे. माझ्याकडे अमुक खासदार आहेत?” असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. “राजकीय पक्षानं दिलेल्या आदेशांच्या विरोधात जाऊन विधिमंडळ पक्षनेता मत देऊ शकत नाही. भारतातील राजकीय प्रणालीमध्ये विधिमंडळ पक्ष आदेश देत नसून राजकीय पक्ष आदेश देत असतो”, असं सिब्बल म्हणाले.

.

टू व्हीलर बाईक टॅक्सीला कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी नको :-, बाबा कांबळे,

पुणे-टू व्हीलर बाईक टॅक्सीला कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी देऊ नये अशी मागणी बाबा कांबळे यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नियुक्त करण्यात आलेल्या समितीने घेतलेल्या सुनावणी दरम्यान केली .

टू व्हीलर बाईक टॅक्सी ओला, उबर , रॅपिडो, बाबत धोरण ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कमिटी स्थापन करण्यात आली आहे,(सेवानिवृत्त सांडी अधिकारी .) रमानाथ झा, यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या कमिटीसमोर ही सुनावणी झाली

यावेळी उप परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्षव ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष एकनाथ ढोले उपस्थित होते,

यावेळी ओला, उबेर, रॅपिडो ,मेरू कंपनीचे CEO सीईओ उपस्थित होते,

यावेळी रमानाथ झा यांनी रिक्षा संघटनेचे तसेच सदर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे देखील ऐकून घेतले,

यावेळी रिक्षा चालकांच्या वतीने बाबा कांबळे यांनी भूमिका मांडताना सांगितले, आम्हाला सरकारने लायसन, बॅच ,परमिट दिले आहे, आम्ही दरवर्षी इन्शुरन्स काढतो, रिक्षा पासिंग करतो पी यू सी काढतो सर्व प्रकारचे नियम आम्ही पाळतो, परंतु टू व्हीलर रॅपिडोला मात्र कुठल्याही प्रकारे बंधन नाही ,कोणीही टू व्हीलर घेऊन व्यवसाय करू शकतो यामुळे शासनाच्या नियमाचा भंग होत असून रीक्षा व्यवसायावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे,
कोणत्याही परिस्थितीमध्ये टू व्हीलर ला परवानगी देऊ नये, याबद्दल आम्ही ठाम असून टु व्हिलर टॅक्सीला परवानगी दिल्यास महाराष्ट्रासह देशभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल,

आनंद तांबे म्हणाले की आम्ही पुण्यामध्ये रस्त्यावरची लढाई जिंकलो यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये इंटरवेशन याचिका दाखल केली तिथे आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात देखील आम्ही इंटरवेशन याचिका दाखल केली त्या ठिकाणी आमचा विजय झाला ,आता पुन्हा कायदेशीर कचाट्या मध्ये हा लढा अडकला असून कुठल्याही परिस्थितीमध्ये टू व्हीलरला परवानगी नको, केंद्र सरकारच्या अग्रिगेटर पॉलिसीमध्ये टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिल्याचं संबंधित कंपन्यांनी यावेळी सांगितलं, मुळात केंद्र सरकारने एग्रीगेटर पॉलिसी तयार केल्यास त्याला आम्ही तीव्र विरोध करू, यासाठी 6 मार्च 2023 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आम्ही भव्य धरणे आंदोलन करणार आहोत असे सांगितले.

यावेळी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने एकनाथ ढोले यांनी, टू व्हीलर टॅक्सी पॉलिसीला तीव्र विरोध करत, महाराष्ट्र मधल्या सर्व मेट्रो सिटी तसेच महाराष्ट्र मध्ये कोणत्याही शहरांमध्ये टु व्हिलर टॅक्सीला परवानगी देऊ नये असे झाल्यास ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल आम्ही पुण्यामध्ये तीव्र आंदोलन केल्यामुळेच टू व्हीलर टॅक्सी बंद झाली आहे असे सांगितले

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांनी सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

0

मुंबई, दि. 21 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत योजनेंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या महसूल विभागातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज आणि नियम www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. संस्थांनी अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- 400032 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2023 असून त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नसल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.

महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

महाराष्ट्रात दीड वर्षांत सुरू होणार रो-रो सेवेचे चार प्रकल्प

मुंबई, दि. २१ : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, मुंबई मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत सैनी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लोथल येथे साकारत असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे दालन असावे आणि त्याठिकाणी शिवकालीन आरमार विषयी चित्रमय प्रदर्शनासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सागरमाला अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करतानाच नविन प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून मागणी करण्यात येईल. महाराष्ट्रात पुढील दीड वर्षांत रोरो सेवेचे चार प्रकल्प सुरू करण्यात येतील त्यामध्ये मुंबई ते मोरा, मुंबई ते काशीद, मुंबई ते दिघी, मुंबई ते रेवस कारंजा यांचा समावेश आहे.

रोरो सेवेसाठी बंकर फ्युलला लावला जाणारा वॅट कमी करण्यात यावा तसेच जुन्या प्रवाशी बोटींचे अद्ययावतीकरण करण्यात यावे, पर्यावरणपूरक बोटींची समावेश याविषयी देखील चर्चा करण्यात आली.

श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली:संजय राऊत यांचा लेखी गंभीर आरोप; गृहमंत्री फडणवीस, मुंबई अन् ठाणे पोलिस आयुक्तांना पत्र

0

मुंबई-खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.खासदार संजय राऊत यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करणारे लेखी पत्र दिल्याने खळबळ उडाली आहे. . तसं पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. तुरुंगातून गुंडांना सोडवून त्यांना टास्क दिला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 
महाराष्ट्राचे अति बुध्दीमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, देशाचे अत्यंत कार्यक्षम गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. आज सकाळपासून माझ्याकडे माहिती येत होती, पक्षप्रमुखांना देखील ही माहिती मिळाली आहे, माझ्यावर लवकरच हल्ला करण्याचा प्रयत्न आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ठाण्यातील जामीनावर सुटलेल्या राजा ठाकूरला खासदार श्रीकांत शिंदेंकडून सुपारी देण्यात आली आहे, विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.  राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सध्या निवडणुका, पक्ष फोडणं यात अडकले आहेत, त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबद्दल किती माहिती आहे हा प्रश्नच आहे. सर्व विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

राऊतांच्या पत्रात काय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे आणि गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.

पणन विभागातर्फे २२ पासून मुंबईत मिलेट महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. २१ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे.  या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचाच  एक भाग म्हणून  पणन विभागामार्फत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे “मिलेट महोत्सव” आयोजित  करण्यात आला आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मिलेटविषयी सर्वंकष माहिती असणारे ‘पुस्तक’ देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे ‘मिलेट’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

पणन विभागातर्फे मिलेट विपणन व मूल्य साखळीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मिलेट धान्याचे आरोग्यविषयी फायद्याबाबत प्रचार, प्रसिध्दी व जाणीव निर्माण करणे, आहार साखळीमध्ये मिलेटचे हरविलेले स्थान परत मिळविणे व खप वाढविण्याकरीता नवीन ग्राहक वर्ग तयार करणे, उत्पादन ते ग्राहकांपर्यंत संघटित मूल्यसाखळी तयार करून उत्पादकांना अधिक मूल्य व ग्राहकांना माफक दरात मिलेट उपलब्ध करणे हे मिलेट विपणन व मूल्यसाखळी मिशनचे उद्दिष्टे आहेत.

तीन दिवसीय महोत्सवाची रूपरेषा

दि. २२ फेब्रुवारी, २०२३  रोजी मिलेट विपणन आणि मूल्यसाखळी एक दिवसीय परिषद होईल.

दि.२३ फेब्रुवारी, २०२३, रोजी  मिलेट खरेदीदार-विक्रेता संमेलन व खरेदी करारावर स्वाक्षरी होईल.

दि. २२ ते २४ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत मिलेट व मिलेट पदार्थ राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री होईल.

महाराष्ट्रात मिलेट मिशन मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.  मिलेट धान्य, पीठ व विविध मूल्यवर्धित मिलेटचे खाद्य उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याकरीता मिलेट उत्पादक, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रक्रिया करणाऱ्या संस्था व उद्योजक तसेच पणनमध्ये असलेल्या विविध सहकारी संस्थांच्या मूल्यसाखळी निर्माण करणे तेवढेच महत्वाचे आहे. मिलेट खरेदीदार-विक्रेता संमेलन व खरेदी करारामुळे तसेच राज्यस्तरीय तीन दिवसीय प्रर्दशनामार्फत मिलेट विक्रीमुळे सर्वसाधारण लोकांना माफक दरामध्ये उपलब्ध होण्यास मदत होईल.

या मिलेट महोत्सवाला राज्यातील मिलेटविषयी उत्सुक  जनतेने तसेच मिलेट उत्पादक शेतकरी, मूल्य साखळीतील घटक, शेतकरी उत्पादक कंपन्या, व्यापारी यांनी  भेट द्यावी, असे आवाहन पणन विभागाद्वारे करण्यात आले आहे. मिलेट महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

शिवसेना भवन ताब्यात घेणार काय ? यावर मुख्यमंत्री म्हणाले….

0

आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही.
बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती

पुणे – शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाने गुणवत्तेच्या आधारावर दिला आहे.आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही. ज्यांना मोह झाला त्यांनी २०१९ ला चुकीचे पाऊल उचललं. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्याचा वारसा पुढे नेणार आहोत. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.आज विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाच्या शिवसेनेने घेतल्यानंतर शिवसेना भवन देखील घेणार असल्याच्या चर्चांना उत्तर देतांना ते म्हणाले, आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा नाही.

आम्हाला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यामुळे आम्हाला काहीही नको, तुम्हाला कोणीही काहीही सांगितल तरी विश्वास ठेवू नका.

मी अधिकृत पणे सांगतो कोणत्याही संपत्तीवर आमचा दावा नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे

शिंदे म्हणाले, ‘लोकशाहीत निवडणूक आयोग, न्यायालय स्वायत्त आहेत, त्यांना घटना, कायदा आहे. जर निर्णय आपल्या बाजूने लागला तर न्यायव्यवस्था, आयोग चांगला आहे आणि निकाल विरोधात गेल्यावर त्यावर आरोप करायचे हे योग्य नाही. हा निर्णय गुणवत्तेवर दिला आहे. लोकसभा व विधानसभेत आमच्याकडे ७३ टक्के बहुमत आहे. अनेक प्रतिज्ञापत्रही दाखल झाले.नियमानुसार निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे विधीमंडळातील हे कार्यालय ते शिवसेनेचे आहे. आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही. ज्यांना मोह झाला त्यांनी २०१९ला चुकीचे पाऊल उचललं. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्याचा वारसा पुढे नेणार आहोत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराने २०१९ ला सत्ता स्थापन केली असती तर आमच्यावर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणतीही संपत्ती नको. बाळासाहेबांचा विचार हीच आमच्यासाठी मोठी संपत्ती आहे.

एमपीएससीच्या अध्यक्षांना पत्र देऊन २०२५ नंतर नवीन पॅटर्न लागू करण्याचे सांगितले आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्यासोबत जी घटना घडली त्याचे सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत, चव्हाण यांना सुरक्षा पुरविली जाईल.कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेली, मराठा, सोनार, ब्राह्मण, ख्रिश्‍चन, पंजाबी, शिंपी यासह इतर समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. कसब्यातील जुने वाडे, वाहतूक, पार्किंग, भिडे वाडा या प्रश्‍नांवर चर्चा झाली. या निवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज नाही, तो महायुतीला मतदान करेल. हा समाज नाराज असल्याचे विरोधकांकडून पसरवले जात आहे. हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ल्या आहे. युती सरकार ज्या धडाडीने निर्णय घेत असल्याने विश्‍वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. विधान परिषदेपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. त्यात साडेचार हजार पेक्षा जास्त थेट ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत. ट्रेंड बघायचा असेल तर ग्रामपंचायतीचा बघा, कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही जिंकू, असे शिंदे यांनी सांगितले.

सत्तापिसाट आणि धर्मपिसाट झालेल्या भाजपचा पराभव होणे गरजेचे-कॉ. अजीत अभ्यंकर

पुणे-कसबापेठ विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मागील अनेक वर्षे भाजपला‌ साथ‌ दिली. मात्र, भाजपने या मतदार संघातील मतदारांचा परिवारातील म्हणून केवळ वापर केला, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजीत अभ्यंकर यांनी केला. सत्तापिसाट आणि धर्मपिसाट झालेल्या भाजपचा पराभव होणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

      कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कॉ. अभ्यंकर बोलत होते. यावेळी आरोग्य सेना व सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. अभिजीत वैद्य, घरकामगार संघटनेच्या सचिव सरस्वती भांदिर्गे उपस्थित होते.

      कॉ. अभ्यंकर म्हणाले, राज्यपाल, पोलीसांपासून ते निवडणूक आयोगापर्यंत सर्वच घटनात्मक यंत्रणा या सत्तेच्या आधीन झालेल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेले सत्तांतर हे सूडाच्या राजकारणाचे एक उदाहरण आहे. या सर्वांमधून महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला जात आहेच.  महाराष्ट्राच्या विकासाला आणि जनतेलाच ओलीस धरण्यात येत आहे.

      या पार्श्वभूमीवर पुण्यात कसबा मतदारसंघात होत असणाऱ्या निवडणूकीत देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते राज्याचे सर्व मंत्रिमंडळ आपल्या जबाबदाऱ्या आणि कामे सोडून उतरले आहेत. त्यातून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.

      डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, न्यायव्यवस्था झाली रखेल, हे अण्णाभाऊंनी पूर्वी म्हंटले आहे. त्याची प्रचिती आज‌ देशात व राज्यातील जनतेला येत आहे. लाचार तो वजीर अशी परिस्थिती आज आहे. लोकशाही, संविधान व प्रशासन या संकल्पना उध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कसबा मतदार संघाला मोठा इतिहास आहे. अनेक थोर समाजवादी नेते घडले. अनेक समाजिक संस्था व संघटनांचा उदय झाला, या सर्वांनी सुरूंग लावण्याचे काम सध्या सुरू आहे. या मतदार संघात सातत्याने भाजपचा विजय होतो, हा भ्रम दूर झाला पाहिजे. ही पोटनिवडणुक हा भ्रम दूर करणारी आणि २०२४ च्या परिवर्तनाची सुरूवात असेल.

      सरस्वती भांदिर्गे म्हणाल्या, मोदींचे सरकार आल्यापासून आमच्या घरेलू कामगारांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आम्हाला महागाईचे‌ चटके बसलेले आहेत. त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधात प्रचारात उतरत आहोत. पाच हजार घर कामगार महिला घरोघरी पत्रके वाटप करत आहेत.