मुंबई-खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.खासदार संजय राऊत यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करणारे लेखी पत्र दिल्याने खळबळ उडाली आहे. . तसं पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. तुरुंगातून गुंडांना सोडवून त्यांना टास्क दिला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे अति बुध्दीमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, देशाचे अत्यंत कार्यक्षम गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. आज सकाळपासून माझ्याकडे माहिती येत होती, पक्षप्रमुखांना देखील ही माहिती मिळाली आहे, माझ्यावर लवकरच हल्ला करण्याचा प्रयत्न आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ठाण्यातील जामीनावर सुटलेल्या राजा ठाकूरला खासदार श्रीकांत शिंदेंकडून सुपारी देण्यात आली आहे, विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सध्या निवडणुका, पक्ष फोडणं यात अडकले आहेत, त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबद्दल किती माहिती आहे हा प्रश्नच आहे. सर्व विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
राऊतांच्या पत्रात काय?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे आणि गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.