Home Blog Page 1395

राणे यांना बाईनं पाडलं… बाईनं:अजित पवारांच्या कोपरखळीवर संजय राऊत खूश, म्हणाले- दादा म्हणजे कमाल की चीज!

मुंबई-‘नारायण राणे यांना बाईन पाडलं… बाईनं’ या शब्दांमध्ये कोटी करत अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी शेलक्या भाषेत केलेल्या या टीकेवर भलतेच खूश झालेल्या संजय राऊत यांनी अजित दादांचे तोंडभरून कौतुक केले आहे. दादा म्हणजे कमाल की चीज आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी आपला आनंद व्यक्त केला.

अजित पवार म्हणाले, आत्तापर्यंत शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना जनतेने जागा दाखवलेली आहे. भुजबळांसहीत सगळ्यांना पाडण्याचे काम केले. नारायण राणेंना तर दोनदा पाडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा मुंबईत वांद्रत एका महिलेने पाडले. बाईने पाडले बाईने, असे म्हणत अजित पवार यांनी राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र’ असे ट्विट करत संजय राऊत यांनी अजित पवार यांची तोंडभरून स्तुती केली आहे.

नारायण राणे यांनी आत्तापर्यंत अनेकदा संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत राणेंचा समाचार घेतल्याने संजय राऊत यांच्याकडून अजित पवारांचे कौतुक करण्यात आले.

निवडणूक प्रशासन आणि तरुणांकडून मतदानाचे आवाहन

पुणे, दि. २४: कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. मतदारसंघातील विविध भागात भेट देऊन मतदार राजाला मतदानाचे आवाहन करण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक निरज सेमवाल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी अजय पवार, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक पराग मते, मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी उपस्थित होते.

लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक मतदानावर भर दिला आहे. २६ फेब्रुवारी रोजी मतदारांनी मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला सहभाग द्यावा आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले.

लोकशाहीच्या उत्सवात तरुणाईचा सहभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने आणि स.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती उपक्रमात सहभाग घेतला ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’,‘माझे मत माझा अधिकार’, ‘आमिषाला बळी पडणार नाही, मतदानापासून वंचित राहणार नाही’, ‘ लोकशाहीची शान- मतदान’, ‘आहे हे पुणे, मतदानाला पडू नका उणे’ अशा घोषणा देत नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातूनही निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांना सहभागी करून घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.

दिव्यांग मतदारांशी संवाद आश्वासक
मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी यावेळी रॅलीत सहभागी दिव्यांग मतदारांशीदेखील संवाद साधला. आपण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा हा निर्धार आश्वासक आणि इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे श्री.देशपांडे म्हणाले. दिव्यांग विद्यार्थींनींनी गायिलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. चार्ली चॅप्लिनच्या वेषातील वरप्रभ शिरगावकर हेदेखील मतदारांची भेट घेऊन मतदानासाठी आवाहन करीत होते.

जुन्या वाड्यातील मतदारांशी संवाद
मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे आणि जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांना भेट देऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. प्रशासनाने मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा केली असून नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा. मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदारांना मतदार मार्गदर्शिकेचे वाटपही करण्यात आले.
000

आम्ही मुंबईकरांच्या ५०० चौ.फुट घरांचा कर माफ केला तर भाजपने पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत काढून घेतली – आदित्य ठाकरे

पुणे-आम्ही मुंबई महापालिकेची सत्ता हाती घेतली तेंव्हा पालिकेकडे ६ हजार कोटी रुपये होते,२५ वर्षांच्या सत्तेत कुठलिही करवाढ न करता ९० हजार कोटींवर पोहोचले आहेत. आमच्या कामावर मुंबईकरांनी विश्‍वास ठेवला. त्याच महापालिकेची चौकशी केली जात आहे. मुंबई महापालिकेची बिनधास्त चौकशी करा पण त्याचवेळी पुणे, नागपूर, नाशिक, मीरा भाईंदर महापालिकेचीही चौकशी करा. आम्ही ५०० चौ. फुटांच्या घरात राहाणार्‍या मुंबईकरांचा कर माफ केला, पुणेकरांची मात्र मिळकत करातील ४० टक्के सवलत काढून घेतली. केवळ जाती- धर्मात तेढ वाढवून बेरोजगारी व अन्य प्रश्‍नांकडे लक्ष वेधून दिशाभूल करणार्‍या भाजप युतीचा पराभव नागरिकच करतील, असा विश्‍वास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी आज येथे केला.महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा समारोप नाना पेठेतील साखळीपीर तालीम येथे झाल्यानंतर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस , शिवसेना आणि मित्र पक्षाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

आदीत्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या काळात कोरोना असतानाही राज्यात अनेक उद्योग आणले. या उद्योगांची उभारणी अंतिम टप्प्यात असून यातून मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. याउलट राज्यातील गद्दार सरकारने येथील उद्योग गुजरातला हलविण्याचा सपाटा लावला आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी संकटात सापडला आहे. शिवसेनेशी गद्दारी करणारे खोके घेउन दिल्लीकरांच्या मांडीवर बसले आहेत. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी केलेली गद्दारी जनतेला रुचलेली नाही. यामुळे घाबरलेले भाजप शिंदे सरकार निवडणुका घेण्यास घाबरत आहे. जनतेचे प्रश्‍न बाजूला ठेउन केवळ जातीपाती आणि धर्मामध्ये कलह लावून सत्ता ओरबड्याचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे. कसब्याची निवडणूकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे.

आदीलशाही, मुघलशाही आणि इंग्रजांविरोधात या पुण्यातूनच सर्वात प्रथम बंड झाले आहे.
त्यामुळे ही निवडणूकही देशाला दिशा ठरणारी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या स्वराज्यासाठी,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी, महात्मा फुलेंच्या सर्वधर्मसमभाव चळवळीसाठी जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे.
परंतू कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. पुणेकरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी रविंद्र धंगेंकरांसारखा जनतेतील कार्यकर्ता विधानसभेत पाठवा असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले

राज्यातील ५० अनाथ मुलांचे स्वनाथ फाउंडेशन घेणार प्रतिपालकत्व – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0

मुंबई, दि. 23 : काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या राज्यातील बालकांना त्यांचे हक्काचे क्षण, प्रेम, काळजी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन, मुंबई यांच्यातर्फे राज्यातील ५० बालकांचे प्रतिपालकत्व  घेणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात  महिला व बालविकास विभाग आणि स्वनाथ फाउंडेशन यांच्यात ५० बालकांचे प्रतिपालकत्व घेण्याबाबत सामंजस्य करार झाला त्यावेळी महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, महिला व बालविकास कोकण विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, मुंबई येथील स्वनाथ फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तथा संस्थापक श्रेया भारतीय उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, बालसुधारगृह अथवा महिलासुधारगृहामध्ये  जी मुले – मुली राहतात ती  १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या राहण्याचा प्रश्न उभा राहतो. यासाठी प्रतिपालकत्व घेण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन ने शासनासोबत येवून ५० मुलांचे प्रतिपालकत्व घेण्याचा निर्णय स्तुत्य आहे. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले.

प्रतिपालकत्व  घेण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे – महिला व बालविकास आयुक्त आर.विमला

महिला व बालविकास आयुक्त आर.विमला म्हणाल्या की, राज्यातील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या  बालकांना दत्तक दिले जाते तसेच प्रतिपालकत्व देखील दिले जाते. यामध्ये या बालकांना  घरी आणून त्यांना घरचे सुरक्षित वातावरण मिळावे व प्रेम मिळावे त्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्ययुक्त गरजा पूर्ण करून सक्षम बनविण्यासाठी मदत मिळू शकते.                               

दत्तक न घेतलेल्या मुलांचे प्रतिपालकत्व संस्था घेणार : श्रेया भारतीय

स्वनाथ फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तथा संस्थापक श्रेया भारतीय म्हणाल्या, जी मुले ६ ते १८ वर्षांची आहेत आणि काही कारणास्तव दत्तक नाहीत, अशी बालसुधारगृह अथवा महिला सुधारगृहामधील मुलांचे संस्था प्रतिपालकत्व घेणार आहे. या मुलांचे बालपण सुखकर जावे, अनाथमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आमची संस्था काम करत आहे. महिला व बालविकास विभागाच्या मदतीने आम्हाला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

पुणे,दि.२३:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या कालावधीनंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी कळविले आहे.

मतदान बंद होण्याच्या ४८ तास अगोदर सुरु असलेला प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये. अशा नेत्यांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदार संघ सोडावा. उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही. केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही. असा पदाधिकारी राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण घोषित करील आणि प्रस्तुत कालावधीतील त्याची ये-जा ही सामान्यपणे त्याचे पक्ष कार्यालय आणि त्याचे राहण्याचे ठिकाण यापुरतीच मर्यादित राहील.

उमेदवारास उद्या सायंकाळनंतर ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही जाहीर सभा आणि मिरवणुका आयोजित करता येणार नाही. तसेच मतदान संपेपर्यंत प्रसारमाध्यमांना जनमत चाचणी प्रसारित करण्यास प्रतिबंध असेल. कोणत्याही जाहिराती किंवा प्रायोजित कार्यक्रम किंवा एखाद्या इराद्याने उमेदवाराला पाठिंबा देणारे किंवा टीका करणारे कोणतेही अहवाल निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारे किंवा प्रभावित करणारे कोणतेही अहवाल प्रतिबंधित असतील, निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या सूचनांप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक विभाग कटिबद्ध आहे, असे श्री. ढोले यांनी सांगितले.

प्रचारासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, झेंडे, जाहिराती संबंधित उमेदवाराने काढून घ्यावे, तसेच कोणत्याही प्रकारे वाहनांद्वारे प्रचार करण्यास प्रतिबंध असेल, याबाबत पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना आचारसंहिता कक्षाला देण्यात आल्या आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. ढोले यांनी दिले आहे.
०००

टिळकांच्या घराण्याला वापरून सोडले:गिरीश बापटांना ऑक्सिजन नळ्या नाकात लावून प्रचारात उतरवले हा क्रुरतेचा कळस – उद्धव ठाकरे

बापटांविषयी जीव तळमळला,वापरा नंतर सोडून द्या ही भाजपची नीती,पिंपरी – चिंचवड मनपातील घोटाळ्याची चौकशी करा,

पुणे -टिळकांच्या घराण्याला वापरून सोडले, गिरीश बापटांना ऑक्सिजन नळ्या नाकात लावून प्रचारात उतरवले हा क्रुरतेचा कळस असे वक्तव्य करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज आयोजित प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन आज सायंकाळी भाषण केले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी घणाघात केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्या काळात मी या सर्वांचा उल्लेख मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनो असा उल्लेख करायचो. त्यानंतर जे काही घडतेय आणि घडले ते मी पाहत आहे. शिवसेनेची लढाई सुरू आहे. त्यात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कठिण काळात सहकार्य करीत आहेत. राजकारणात निवडणुका जिंकणे व त्याची इर्षा बाळगावी लागते.उद्धव ठाकरे म्हणाले, पोटनिवडणूक बिनविरोध करताना लोकशाहीतील मोकळेपणा शिल्लक राहीला नाही. दोन निवडणुका आल्या. ज्यांना वाटते की, निवडणूक बिनविरोध व्हायला हवे होते. लोकमान्यांच्या घराण्यातील व्यक्तीला दुर्लक्ष करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली गेली. तिथे सहानुभुती कुठे गेली. टिळकांच्या घराण्याचा वापरून सोडून दिले.उद्धव ठाकरे म्हणाले, उमेदवारी दुसऱ्याला दिल्यानंतर वाईट वाटले व जीव तळमळला. भाजपमध्ये असले तरीही गिरीश बापटांविषयी जीव तळमळला. वयोमान थकवून टाकणारे असते पण काहीवेळा आजारपणा असतो. टिळकांच्या घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. क्रुरतेचा कळस म्हणजे गिरीश बापट आजारी असताना त्यांना ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घालून त्यांना प्रचारात उतरवले.

उद्धव ठाकरे म्हणाले, अशा पद्धतीने लोक वापरायची आणि नंतर सोडून द्यायचे असे ते करतात. शिवसैनिक काॅंग्रेस, राष्ट्रवादीला मतदान का करणार नाही. करणार, कारण शिवसैनिकांची मते भाजपलाही मिळाली होती. शिवसेनेला मुळासकट उखडायला निघाले अशा भाजपला मदत होता कामा नये. ती केली गेली तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. महाविकास आघाडी आपली आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यात भाजपने फूट पाडली. शिवसेना मुळासकट संपवायला निघाले. चिन्हही त्यांनी चोरले. शिवसेना मुळासकट संपवायला निघाले हे राजकारण आणि लोकशाही मी मानायला तयार नाही. जगताप वहिनींना मी सांगतो की, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाबद्दल आदर आणि प्रेम शिवसैनिकांच्या मनात राहील पण सहानुभूती भाजपला दाखवण्याची परिस्थिती राहीली नाही. तुमचा वापर करून भाजप पकड घट्ट करीत असेल तर नाईलाजास्तव आम्हाला ही निवडणूक जिंकावली लागेल.उद्धव ठाकरे म्हणाले, हिमंत असेल तर पाच वर्षांतील पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी लावा. सर्वांचीच चौकशी होऊ द्या. प्रत्येकवेळी गृहीत धरून राजकारण त्यांनी केले. लक्ष्मणराव जगतापांचे आणि माझे नाते वेगळे पण राजकारण वेगळे. टीळक घराण्यांचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडले. डबल इंजिन फक्त धूर सोडत आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, गिरीश बापट यांना आजारी असताना प्रचारात उतरवणे हा अमानुषपणा. आमच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला केला. गृहीत धरून राजकारण करणाऱ्यांना गाडा. ती आता वेळ आली. विरोधक असावेत, त्यांनी मत मांडावे पण माझ्यासोबत आले नाही तर संपवून टाकू. चौकशी लावू ही हुकुमशाही चालणार नाही. आमच्यातील शिवसेनेतील गद्दार भाजपकडे गेले पण नंतर त्यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी बंद झाली.उद्धव ठाकरे म्हणाले, स्पर्धा नको म्हणून त्यांनी पक्षातील लोकांची गच्छंती केली तर विरोधकांतील लोकांना हेरले. त्यांच्यासोबत गेले तर धुतले तांदूळ आमच्यासोबत राहीले तर तांदळाचे खडे. त्यांच्या चौकशा लावा. धनुष्यबाण मिंध्यांना दिला हे निवडणूक आयोगाचे अतीच झाले. मिध्यांना माझे पुन्हा आव्हान देतो. काळाची पाऊले ओळखून ती वेळीच रोखा.

पवन खेरांना विमानातून उतरवून जबरदस्तीने अटक ही अघोषीत आणीबाणी नाही तर काय?

0

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी
भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली असून काँग्रेसला देशभरातून जनतेचा मोठा पठिंबा मिळत असल्यानेच मोदी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छत्तिसगडच्या रायपूर येथे काँग्रेसचे महाअधिवेशन होत असून या अधिवेशनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना रायपूरला जात असताना विमानातून खाली उतरवून अटक करण्यात आली हे केवळ घाबरलेला हुकूमशाहच करु शकतो, पण कितीही अडथळे आणले तरी महाअधिवेशन होणारच असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना रायपूरला जाण्यापासून रोखत अटक केली याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध व्यक्त करत केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. नरेंद्र मोदी सरकारने देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवले असून हुकूमशाही कारभार सुरु आहे. काँग्रेसच्या रायपूर येथे होत असलेले महाअधिवेशन सुरुळीत पार पडू द्यायचे नाही असा चंग बांधूनच सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नाहक त्रास दिला जात आहे. रायपूरमधील काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले, त्यात त्यांना काहीच मिळाले नाही. आज दिल्लीहून काँग्रेसचे अनेक नेते रायपूरला अधिवेशनासाठी जात असताना राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर विमानातून खाली उतवले, तिथेच काँग्रेस नेत्यांनी विरोध करत घोषणाबाजी केली त्यानंतर आसाम पोलीसांची तक्रार असल्याचे सांगत पवन खेडा यांना अटक केली. मोदी सरकारची ही कृती अत्यंत निषेधार्ह व लोकशाही मुल्ये पायदळी तुडवणारी आहे.
मोदी सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून विरोधी पक्षांना दडपशाहीच्या मार्गाने संपवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अशा कारवायांना भीक घालत नाही. एकेकाळी जगातील बलाढ्य शक्ती असलेल्या जुलमी ब्रिटिशांना काँग्रेसने देश सोडण्यास भाग पाडले हे मोदी सरकारने लक्षात ठेवावे. मोदी सरकारची कृती हूकूमशाही प्रवृत्तीचीच असून या प्रवृत्तीचा मुकाबला काँग्रेस पक्ष करेल, असेही नाना पटोले.

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्याचे आवाहन

पुणे, दि. २३: सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये (आरसीएमएस) लाभार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक फेब्रुवारी व मार्च २०२३ चे धान्य घेताना समाविष्ट करुन घ्यावेत.

लाभार्थ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यास त्यांनी धान्य घेतल्यानंतर प्राप्त होणारे संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आपले धान्य घेतावेळी दुकानदारांकडे ई-पॉस मशिनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करता येतील. तसेच यापूर्वी समाविष्ट भ्रमणध्वनी क्रमांक चुकीचा असल्यास सुधारित भ्रमणध्वनी क्रमांक तालुका पुरवठा कार्यालयात देऊन प्रणालीमध्ये समाविष्ट करता येणार येणार आहे.

तरी सर्व लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्यासाठी तालुका पुरवठा कार्यालय, परिमंडळ कार्यालय तसेच रास्तभाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.
000

महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटींची रोखे विक्रीस

0

मुंबई, : दहा वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटींच्या रोख्यांची विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग सरकारच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्ज रोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                      

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 28 फेब्रुवारी, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बीडस् दिनांक 28 फेब्रुवारी, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 1 मार्च, 2023 रोजी करण्यात येईल.           

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून दिनांक 1 मार्च, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 1 मार्च, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 25 जानेवारी, 2031 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 1 सप्टेंबर व 1 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 23 फेब्रुवारी, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली.

मुंबई-पुण्यात एकूण तीन ठिकाणी सीबीआयचे छापे

0

मुंबई-पुण्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी झाल्याचं वृत्त आहे. पुण्यात GST अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही छापेमारी टाकल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. या छाप्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मोठा ऐवजही जप्त केला आहे. 

मुंबई-पुण्यात मिळून एकूण तीन ठिकाणी सीबीआयनं हे छापे टाकले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचं हे प्रकरणं असल्याचीही माहिती मिळते आहे. जीएसटी विभागानं दाखल केलेली केस बंद करण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितल्याची माहिती समोर येत आहे.

मौलाना आझाद महामंडळामार्फत २३८ लाभार्थींना व्यवसायासाठी कर्ज मंजूर – व्यवस्थापकीय संचालक डॉ.लालमिया शेख

0

मुंबई, दि. २३ :– मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत पहिल्या टप्प्यात २३८ लाभार्थ्यांना छोट्या व्यवसायांसाठी प्रत्येकी ३ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र निर्गमित करण्यात आले आहेत. कर्जाची रक्कम लवकरच थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली. मोठ्या व्यवसायाकरिता कर्ज मंजुरीसाठी पात्रतेच्या अटी व शर्तीप्रमाणे छाननी सुरु आहे. लवकरच मोठ्या व्यवसायांसाठीही कर्ज मंजूर करण्यात येईल, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

कर्ज मंजुरी पत्र प्राप्त झालेल्या लाभार्थींनी वैधानिक दस्ताऐवज व इतर कागदपत्रांची पूर्तता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामध्ये करावी. कर्जाची रक्कम संबंधित अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. कर्ज मंजुरीसाठी व कर्जाची रक्कम प्राप्त किंवा वितरित करण्यासाठी महामंडळामार्फत कोणत्याही प्रकारचे शुल्क, फी आकारण्यात येत नाही. लाभार्थींनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या किंवा दलाल यांच्या प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन डॉ. शेख यांनी केले आहे.

केंद्र शासनामार्फत (NMDFC) कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेअंतर्गत भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीपासून म्हणजेच ११ नोव्हेंबर, २०२२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. क्रेडीट लाईन १ अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत तर क्रेडीट लाईन २ अंतर्गत ३० लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. मुदत कर्ज योजनेअंतर्गत मोठ्या व्यवसायासाठी कर्ज मंजुरीसाठी पात्रतेच्या अटी व शर्तीप्रमाणे छाननी सुरु आहे. लवकरच मोठ्या व्यवसायांसाठीही कर्ज मंजूर करण्यात येईल. मोठ्या व्यवसायांसाठी साधन सामग्रीसाठी आवश्यक असलेली रक्कम पुरवठादाराच्या खात्यामध्ये वितरित करणे प्रस्तावित आहे. खेळत्या भांडवलासाठी आवश्यक असलेली रक्कम लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यात छोट्या व्यवसायांसाठी कर्ज मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती डॉ. शेख यांनी दिली.

या योजनेसाठी आताही अर्ज स्वीकारण्यात येत असून इच्छुकांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील मुख्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. शेख यांनी केले आहे. महामंडळाच्या कार्यालयांची यादी, पत्ते, संपर्क क्रमांक महामंडळाच्या https://www.mamfdc.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

पुणे-

राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.

‘या आंदोलनावर या उमेदवारांशी आम्ही संवाद साधला होता. त्यांच्याशी वारंवार बोलत होतो. उपमुख्यमंत्र्यानीही या तरुणांशी चर्चा केली होती. मंत्रीमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करून शासन या उमेदवारांच्या भावनांशी सहमत असल्याचे आयोगाला कळवण्यात आले होते. उमेदवारांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन आपण आयोगाकडे या नव्या परीक्षा पद्धतीसाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. आयोगानेही या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आयोगाला धन्यवाद देतो.’ असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या रात्रीच्या फेऱ्या,भेटीगाठीचे काहींना कुतूहल तर काही परेशान

पुणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात भाजपाचा उमेदवार निवडून यायला हवा म्हणून कि आपले सेना संघटन बळकट व्हावे म्हणून पुण्याच्या दौऱ्यात वाढ केलीय हे त्यांनाच ठाऊक असले तरी त्यांच्या रात्रीच्या पुण्यात विविध ठिकाणी होणाऱ्या खाजगी फेऱ्या आणि भेटीगाठी यामुळे काहीना कुतूहल वाटते आहे तर काहीजण परेशान झालेअस्ल्याचे दिसते आहे. काल रात्री मित्रमंडळ चौकानजीकच्या आपल्या सेना कार्यालयात रात्री २ वाजता त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली , काही कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या तर आज त्यांनी पुन्हा केसरीवाडा येथे जाऊन मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक मुलगा कुणाल टिळक यांची भेट घेतली आहे.यावेळी कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपती मंडळाचे काही पदाधिकारी येथे सीएम यांना भेटल्याचे दिसले.मतदानापूर्वी शिंदे आणि टिळक यांच्यात भेट झाल्याने कसब्यात काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असून, प्रचाराचे ४८ तास उरलेले असताना शिंदेंनी टिळक कुटुंबियांची भेट घेतल्याने ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती या चर्चाना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरेंचे आणि माझे शत्रुत्व बिलकूल नाही:असले तरीही ते आपल्याला संपवावे लागेल; देवेंद्र फडणवीसांनी घातली साद

फडणवीसांची गुगली कि आणखी कांही …?

अहमदनगर -उद्धव ठाकरे असो की, आदित्य ठाकरे आम्ही वैचारीक विरोधक आहोत पण शत्रू बिलकूल नाही. अलीकडे शत्रूत्व पाहायला मिळते ते संपवावे लागेल असे सूचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. आदित्य ठाकरेंनी हेच वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही.त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी माझ्या अनुभवातून शिकलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कुणाला वाटले होते का? ते बनले. त्यामुळे ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा देतो.

देवेंद्र फडवीस मी जे बोललो ते कसे खरे होते हे तुम्हाला समजत आहे. मी जे बोललो त्यात अर्धेच खरे समजले पुढे आणखी अर्धे कळते. मी काहीही बोललो की, समोरून दुसरी गोष्ट बाहेर येते. मी हळूहळू बोललो की, सर्व गोष्टी समोरून येतील.

देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही, त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, की, हे खरे आहे, मी पण हेच वारंवार सांगितले. आम्ही वैचारीक विरोधक आहोत. शत्रू बिलकूल नाही. महाराष्ट्रात एक कल्चर आहे मी असे म्हणेल की, या कल्चरमध्ये आपण वैचारीक विरोधक असतो.देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही. त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे.

संजय राऊत यांना माझी क्षमता अधिक आहे असे वाटते त्यांना माझ्या क्षमतांवर विश्वास वाटतो याबद्दल आभार मानुया. पण अलीकडे संजय राऊत जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्यासारख्या नेत्यांनी बोलताना वस्तूस्थिती पाहून, काही संयम पाळून बोलावे, लोकांना खरे वाटेल असे तरी बोलायला हवे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले, की ‘देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे. आमच्यावर अनेक जणांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, मात्र आम्ही तशा प्रकारची टीका कधीच केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही’

शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्रचारादरम्यान प्राणघातक हल्ला:आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करा… डॉ.नीलम गोऱ्हे

भोसले यांना ताबडतोब पोलीस संरक्षण देण्याची डॉ.गोऱ्हे यांची पोलीस महासंचालक यांना सूचना..

पुणे दि.२३: चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख श्री. सचिन भोसले यांच्यावर चार ते पाच जणांनी दि.२२ फेब्रुवारी, २०२३ रोजी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात वाकड पोलीस ठाणे येथे एफआयआर क्रमांक १७४/२०२३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्ल्यात श्री.भोसले यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी स्वीकृत प्रभाग सदस्य गोरक्षनाथ पाषाणकर आणि वाहनचालक देखील जखमी झाले आहेत. सदर प्रकारणाबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्री भोसले यांच्याशी संपर्क करून विचारपूस केलं आहे. यासंदर्भात त्यांनी अत्यंत खेद व्यक्त केला असून या प्रकरणाबाबत त्यांनी पुढील सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केल्या आहेत. यात
◆ श्री भोसले यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.
◆ घडलेल्या घटनेची कसून चौकशी करण्याच्या सूचना संबंधित पोलिस आयुक्त यांना द्याव्यात.
◆ यामधील हल्लेखोरावर तात्काळ गुन्हा दाखल करावा.
◆ या हल्लेखोरांना अटक करावी.
◆ पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये संघटित गुन्हेगारी वाढीस लागली आहे त्याला आवर घालणे अत्यंत आवश्यक आहे.
◆ महानगरपालिका निवडणूका ही जवळ आल्या आहेत. त्यामुळे असे हल्ले तात्काळ थांबविण्यासाठी कडक कारवाई करावी लागेल. त्यासाठी पोलीस यंत्रणेला सक्त सूचना द्याव्यात. सदरील सूचना पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना देणेबाबत डॉ.गोऱ्हे यांनी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पत्र दिले आहे.