भोसले यांना ताबडतोब पोलीस संरक्षण देण्याची डॉ.गोऱ्हे यांची पोलीस महासंचालक यांना सूचना..
पुणे दि.२३: चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख श्री. सचिन भोसले यांच्यावर चार ते पाच जणांनी दि.२२ फेब्रुवारी, २०२३ रोजी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात वाकड पोलीस ठाणे येथे एफआयआर क्रमांक १७४/२०२३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्ल्यात श्री.भोसले यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी स्वीकृत प्रभाग सदस्य गोरक्षनाथ पाषाणकर आणि वाहनचालक देखील जखमी झाले आहेत. सदर प्रकारणाबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्री भोसले यांच्याशी संपर्क करून विचारपूस केलं आहे. यासंदर्भात त्यांनी अत्यंत खेद व्यक्त केला असून या प्रकरणाबाबत त्यांनी पुढील सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केल्या आहेत. यात
◆ श्री भोसले यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.
◆ घडलेल्या घटनेची कसून चौकशी करण्याच्या सूचना संबंधित पोलिस आयुक्त यांना द्याव्यात.
◆ यामधील हल्लेखोरावर तात्काळ गुन्हा दाखल करावा.
◆ या हल्लेखोरांना अटक करावी.
◆ पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये संघटित गुन्हेगारी वाढीस लागली आहे त्याला आवर घालणे अत्यंत आवश्यक आहे.
◆ महानगरपालिका निवडणूका ही जवळ आल्या आहेत. त्यामुळे असे हल्ले तात्काळ थांबविण्यासाठी कडक कारवाई करावी लागेल. त्यासाठी पोलीस यंत्रणेला सक्त सूचना द्याव्यात. सदरील सूचना पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना देणेबाबत डॉ.गोऱ्हे यांनी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पत्र दिले आहे.