पुणे-आम्ही मुंबई महापालिकेची सत्ता हाती घेतली तेंव्हा पालिकेकडे ६ हजार कोटी रुपये होते,२५ वर्षांच्या सत्तेत कुठलिही करवाढ न करता ९० हजार कोटींवर पोहोचले आहेत. आमच्या कामावर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. त्याच महापालिकेची चौकशी केली जात आहे. मुंबई महापालिकेची बिनधास्त चौकशी करा पण त्याचवेळी पुणे, नागपूर, नाशिक, मीरा भाईंदर महापालिकेचीही चौकशी करा. आम्ही ५०० चौ. फुटांच्या घरात राहाणार्या मुंबईकरांचा कर माफ केला, पुणेकरांची मात्र मिळकत करातील ४० टक्के सवलत काढून घेतली. केवळ जाती- धर्मात तेढ वाढवून बेरोजगारी व अन्य प्रश्नांकडे लक्ष वेधून दिशाभूल करणार्या भाजप युतीचा पराभव नागरिकच करतील, असा विश्वास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी आज येथे केला.महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा समारोप नाना पेठेतील साखळीपीर तालीम येथे झाल्यानंतर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस , शिवसेना आणि मित्र पक्षाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
आदीत्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या काळात कोरोना असतानाही राज्यात अनेक उद्योग आणले. या उद्योगांची उभारणी अंतिम टप्प्यात असून यातून मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. याउलट राज्यातील गद्दार सरकारने येथील उद्योग गुजरातला हलविण्याचा सपाटा लावला आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी संकटात सापडला आहे. शिवसेनेशी गद्दारी करणारे खोके घेउन दिल्लीकरांच्या मांडीवर बसले आहेत. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी केलेली गद्दारी जनतेला रुचलेली नाही. यामुळे घाबरलेले भाजप शिंदे सरकार निवडणुका घेण्यास घाबरत आहे. जनतेचे प्रश्न बाजूला ठेउन केवळ जातीपाती आणि धर्मामध्ये कलह लावून सत्ता ओरबड्याचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे. कसब्याची निवडणूकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे.
आदीलशाही, मुघलशाही आणि इंग्रजांविरोधात या पुण्यातूनच सर्वात प्रथम बंड झाले आहे.
त्यामुळे ही निवडणूकही देशाला दिशा ठरणारी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या स्वराज्यासाठी,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी, महात्मा फुलेंच्या सर्वधर्मसमभाव चळवळीसाठी जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे.
परंतू कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी रविंद्र धंगेंकरांसारखा जनतेतील कार्यकर्ता विधानसभेत पाठवा असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले