Home Blog Page 1354

शरद पवारांनीच सत्तेत जाण्यास सांगितले:त्यांचे राजीनामा देणेही एक नाटकच होते, अजितदादांचा शरद पवारांवर तिखट हल्ला

कर्जत-सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या धरसोड वृत्तीवर जोरदार टीका केली आहेया अधिवेशनात पुढे बोलताना अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला. आम्हाला सातत्याने गाफिल ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आम्ही 10-12 जण होतो. देवगिरीला बसलो होतो. आम्ही काय करायचा विचार सुरू होता. थेट साहेबांना सांगितले तर काय वाटेल असं वाटल्याने आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलावले, असे अजितदादा म्हणाले.

आम्ही सुप्रियाला चर्चेसाठी बोलावले आणि सांगितले लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो. तरच संघटना पुढे जाते. ती म्हणाली, ”मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना कन्व्हिन्स करते. काय करायचं ते माझ्यावर सोपवा”. त्यानंतर आम्ही सात-आठ दिवस थांबलो. पुन्हा आम्ही एकत्र बसलो. सरकारमध्ये गेलं पाहिजे. आमदारांच्या कामाला स्थगिती मिळाली आहे. अनेक प्रश्न आहे. बहुजन समाज आणि अल्पसंख्यांकाचा विचार झाला पाहिजे. याचा विचार यावेळी आम्ही केला, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. दिली.त्यानंतर आम्ही थेट साहेबांकडे गेलो. त्यांना आमचा निर्णय सांगितला. यावर ते म्हणाले ठीक आहे. बघू काय करायचे ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणला गेलो. आम्ही म्हटलं वेळ जातोय निर्णय घ्या. तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून सांगितलं की, सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. 1 मे रोजी आम्ही झेंडा वंदनाच्या कार्यक्रमात होतो. नंतर 2 तारखेला पुस्तक प्रकाशन होणार होते अशी माहिती अजित पवारांनी दिली.

शरद पवार यांना आम्ही आमचा निर्णय सांगितला. त्यानंतर शरद पवार म्हणाले मी राजीनामा देतो, सुप्रियाला अध्यक्ष करा. त्यानंतर त्यांनी परत राजीनामा मागे घेतला. धरसोड सुरू होतं. राजीनामा मागेच घ्यायचा होता तर दिला कशाला? असे सांगतानाच जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना बोलावून राजीनामा मागे घेण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करायला शरद पवार यांनीच सांगितले, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. अजितदादा यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.

12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी

भाजपसोबत जाण्याचा 2 जुलैला आम्ही घेतलेला निर्णय मान्य नव्हता तर मग आम्हाला 17 जुलैला बोलावलं कशाला? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. त्यानंतर आम्हाला 12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी बोलावलं. मला बोलवले म्हणून मी गेलो. मग सातत्यानं असे का करत आहात? असा सवाल देखील अजित पवरांनी केला आहे.

जो बोलतो तो चुकतो, जो तोंडच उघडतंच नाही तो काय बोलणार

आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच काम करत आहे. जागा वाटपासंदर्भात तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांना न्याय मिळेल. माझ्यासकट नऊ मंत्र्यांनी चार-चार जिल्हे वाटून जबाबदारी घेतली पाहिजे जो बोलतो तो चुकतो, जो तोंडच उघडतंच नाही तो काय बोलणार. मी हे बोललोच नाही, मी हे ऐकलंच नाही असे मी बोलत नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला दिला आहे.

विविध मुदतीसाठी मुदत ठेव दरात दर बँक ऑफ इंडियाकडून वाढ

मुंबई, 1 डिसेंबर, 2023: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी (रु. 2 कोटी आणि त्याहून अधिक ते १० कोटींपेक्षा कमी) त्यांच्या मुदत ठेवींचे व्याज दर वाढवले आहेत. यासाठी “46 दिवस ते 1 वर्षापर्यंत”चा कालावधी आहे. 1 डिसेंबर 2023 पासून हे दर लागू होतील.

बँकेने कमी कालावधीसाठी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत, म्हणजे 46 दिवस ते 90 दिवस कालावधीसाठी 5.25%, 91 दिवस ते 179 दिवस कालावधीसाठी 6.00%, 180 दिवस ते 210 दिवस कालावधीसाठी 6.25%, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.50% आणि 1 वर्षासाठी 7.25%. बँकेने दिलेला सध्याचा व्याजदर स्पर्धात्मक आहे, HNIs, लघु आणि मध्यम कॉर्पोरेट्स, NRIs आणि व्यावसायिक स्वयंरोजगार इत्यादींकडून गुंतवणूकीसाठी अतिशय आकर्षक परतावा देत आहेत.

1 नोव्हेंबर 23 पासून बँकेने 2 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या सर्व ठेवींचे दर आधीच वाढवले आहेत. सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक 7.90%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75% आणि इतरांसाठी 2 वर्षांच्या मुदतीसाठी 7.25% पर्यंतचा सर्वोच्च व्याज दर देत आहे. सुधारित व्याजदर देशांतर्गत, NRO आणि NRE रुपया मुदत ठेवींसाठी लागू आहेत.

एअर मार्शल मकरंद रानडे यांनी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण तसेच सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला

नवी दिल्ली-एअर मार्शल मकरंद रानडे यांची दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण तसेच सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी [डीजी(आय अँड एस)] नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय तसेच फ्रान्सचे कॉलेज इंटरआर्मी द डिफेन्स या शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या एअर मार्शल मकरंद रानडे यांनी 6 डिसेंबर 1986 पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागातून सेवेला सुरुवात केली. एकूण 36 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत एअर मार्शल मकरंद रानडे यांनी अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये तसेच पदांवर काम केले. लढाऊ विमानांच्या तुकडीचे तसेच दोन हवाई स्थानकांचे कमांड म्हणून केलेल्या कार्याचा समावेश आहे. रणनीती तसेच हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. काबुल तसेच अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी एअर अट्टॅचे म्हणून कर्तव्य निभावले आहे. हवाई दलाच्या मुख्यालयात नेमणूक झालेली असताना त्यांनी  संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे सहाय्यक प्रमुख या पदांवर काम केले आहे. आत्ताच्या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारीपदावर कार्यरत होते.

एअर मार्शल मकरंद रानडे यांना वर्ष 2006 मध्ये वायू सेना (शौर्य) पदक तसेच वर्ष 2020 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते.

एअर मार्शल संजीव कपूर हे हवाई दलात 38 वर्षांचा प्रतिष्ठित सेवेचा कार्यकाळ पुर्ण करून 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंट्स कलर सन्मान प्रदान

पुणे;राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, 1 डिसेंबर 2023 रोजी, पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला प्रेसिडेंट्स कलर हा सन्मान देऊन गौरवले. यावेळी त्यांनी आभासी पद्धतीने ‘प्रज्ञा’ या सशस्त्र दलांच्या संगणकीय औषध उपचार केंद्राचे उद्घाटन देखील केले.

या प्रसंगी बोलताना, राष्ट्रपती म्हणाल्या की एएफएमसी अर्थात सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने, वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च गुणवत्ता असलेली शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या संस्थेतून पदवीधर झालेल्यांनी  युद्धाचा काळ, बंडविरोधी कारवाया, नैसर्गिक आपत्ती तसेच महामारीच्या काळात, देशांतर्गत तसेच सीमापार भागात समर्पितपणे सेवा देऊन देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
एएफएमसी मधून पदवी मिळवलेल्या अनेक महिला सैनिकांनी सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे तसेच अत्यंत उच्च पदांवर काम केले आहे याची दखल घेत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. या महिलांकडून प्रेरणा घेऊन, अधिकाधिक महिला सशस्त्र दलांमधील कारकीर्द  निवडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, आज आपण वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता, प्रिसिजन मेडिसिन, त्रिमितीय छपाई, टेलीमेडिसिन आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर होताना पाहतो आहोत. सैनिकांना तंदुरुस्त तसेच युद्धासाठी सदैव सज्ज ठेवण्यात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवा विभागाने महत्त्वाचे योगदान दिले आहे असे त्यांनी सांगितले. आणि म्हणूनच त्यांना, आपल्या तिन्ही सेनादलांतील कर्मचाऱ्यांना सर्वोच्च दर्जाच्या वैदयकीय सेवा मिळेल याची सुनिश्चिती करून घ्यावी लागते असे त्या म्हणाल्या.  एएफएमसीच्या पथकाने, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर अधिक भर द्यावा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना राष्ट्रपतींनी दिल्या. एएफएमसीमधील कर्मचारी त्यांच्या कार्यात उत्कृष्टता आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

ठाणे, :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आपल्याला मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार, यामध्ये कुठलीही शंका नाही. या देशातील युवकांनासुध्दा हे मान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज कल्याण येथे केले.

“विकसित भारत संकल्प यात्रा” या उपक्रमाच्या पार्शवभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कोलम बस स्टॉप शेजारी, कल्याण- मुरबाड रोड, गोवेली, या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, अपर जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदिया, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, रामदास दौंड, जिल्हा कृषी अधीक्षक दिपक कुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, कल्याण तहसिलदार जयराज देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ, कोलमचे सरपंच राजेश भोईर, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, इतर विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, बचतगटाच्या महिला, शालेय विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये देशाची तसबीर व तकदीर बदलली आहे. हा देश एक विकसित देश, विकसित राष्ट्र म्हणून पुढे येतोय.  देशाचा सन्मान संपूर्ण जगभरामध्ये उंचावलेला आहे आणि आज श्री. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेत जवळजवळ 3 हजार खेड्यांमध्ये श्री. मोदी यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. भारत देशाची 140 कोटी जनता हा माझा परिवार आहे आणि मला कोणतीही जात नाही, जात जर म्हणत असाल तर माझी जात युवा, माझी जात महिला, माझी जात किसान, माझी जात गरिबी आहे, हे सांगितल्यामुळे संपूर्ण देशातील गरिबी हटवणार, जोपर्यंत या देशातील नागरिक सुखी, समृध्द होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि मी थकणार नाही, असा संकल्पच त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, या विकसित भारत संकल्प यात्रेच्या 3 मुख्य गोष्टी आहेत. एक वेगवेगळ्या केंद्रातील योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचविणे, दोन ज्यांना योजना पोहोचल्या आहेत त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला आहे, हे तपासणे आणि  तिसरी गोष्ट म्हणजे सर्वांना बरोबर घेवून जनचळवळ  उभी करणे, या चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी, युवा, महिला यांचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्न करणे, हा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी काही दिवसांपूर्वी “माय भारत” अशी एक संकल्पना मांडली आहे. त्यामध्ये युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम सुरु आहे. भारत देश हा युवा देश आहे. 140 कोटी जनतेपैकी 65 टक्के जनता ही वय वर्ष 35 वर्षांखालची आहे. आणि युवा म्हटले की, नवीन उमेद, नवीन इच्छा, नवीन कार्यपध्दती. कोणतेही आव्हान स्विकारण्याची ताकद युवांमध्ये असते, म्हणूनच भारताचे भवितव्य खूपच चांगले आहे. भारताचा विकास होत आहे, आणखी विकास होणार आहे. आदिवासी भाग, झोपडपट्टी भाग, शहरी-ग्रामीण भाग, अशा सर्व ठिकाणी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यत पोहोचण्याचे काम सुरु आहे, असे सांगून डॉ. कराड यांनी नागरिकांना आवाहन केले की, आपण या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सामील व्हावे आणि आपण आपल्याबरोबर जनचळवळ उभी करुन भारताचा विकास कसा होईल, त्यासाठी प्रयत्न करावा.

यावेळी डॉ.कराड यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व विविध योजनांचे कार्ड वाटप करण्यात आले. तर आमदार किसन कथोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना अशा संकल्प यात्रेतील आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान श्री. मोदी यांचे आभार मानले व या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ निश्चित मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छायादेवी शिसोदिया म्हणाल्या, विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात भिवंडी तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत येथून झाली आहे. ज्या लाभार्थ्यांना आजपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांना तो लाभ मिळवून देणे, विविध शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करणे, असा उद्देश असून तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बचतगटांचे उत्पन्न 1 लाखापर्यंत नेण्याचा निश्चय केला आहे.

यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जात असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या 17 महत्त्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती असलेल्या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील ग्राम व तालुकास्तरावर व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जात आहे. तसेच नागरिकांकडून निवेदनही स्वीकारले जात आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमानिमित्त विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना झालेल्या लाभाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्ड व जलजीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती  देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी सर्वांना मा.पंतप्रधान श्री. मोदी यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश ऐकविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले. योजनांची माहिती प्रत्येक वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी केले. फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार व प्रसिद्धी करीत आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले.

जैन व शाकाहारी विद्यार्थ्यांना मांसाहारी बनविण्याचे महाराष्ट्र शासनाचे षडयंत्र -डॉ. कल्याण गंगवाल आक्रमक

शालेय पोषण आहारात अंडी नकोत

पुणे : महाराष्ट्र सरकारने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करत शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात उकडलेली अंडी, अंडा भुर्जी, अंडा बिर्याणी, केळी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा शासन निर्णय ५ डिसेंबर २०२३ पासून लागू केला जाणार आहे. शास्त्रीयदृष्ट्या मांसाहार आरोग्यास हानिकारक असून, शालेय पोषण आहारात अंडी दिली जाऊ नयेत,” अशी मागणी शाकाहार चळवळीचे पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.


शाळांमधून जेवणात अंडी देणे अयोग्य आहे. शाळेतील जैन, महानुभव पंथी, ब्राह्मण व अन्य शाकाहारी विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होईल. इतर विद्यार्थी अंड्यांचे पदार्थ खाताना त्यांनाही ते पदार्थ खाण्याची इच्छा होईल. वय लहान असल्याने त्यांना या गोष्टींचे ज्ञान नसते. त्यातून ही सवय जडली जाईल. एक प्रकारे या जैन व शाकाहारी मुलांना मांसाहारी बनविण्याचे महाराष्ट्र शासनाने षडयंत्र असून, ही अतिशय गंभीर बाब असल्याचा आरोपही डॉ. कल्याण गंगवाल यांनी केला.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “शासनाने निर्णयामध्ये असेही  सांगितले आहे की, अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी ही योजना चालू केली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांना मांसाहारी बनविणे कितपत योग्य आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. आपला धर्म वाचविण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र सामाजिक लढा देणे गरजेचे आहे.”


“अंडे मांसाहारी असून, अंड्यातून कुठलेही पोषक घटक मिळत नाहीत. अंड्यात ‘सी’ व्हिटॅमिन नाही. प्रोटिन्सही केवळ १३.५ टक्के इतकेच आहे. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात असते. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर अँटिबायोटिक्स, हार्मोन्सचा मोठा मारा होतो. शिवाय अंड्यांची उत्पत्ती अधिक व्हावी, याकरिता अनैसर्गिक प्रक्रिया केली जाते. अंडी शिळी की ताजी, याचीही आपल्याला माहिती नसते. त्यामुळे त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळते,” असेही डॉ. गंगवाल यांनी सांगितले.
अंड्याच्या सेवनामुळे सालमोनेला (टायफॉईडचा ताप), ऍलर्जी, सर्दी, दमा, त्वचारोग, फूड पॉइजनिंग, पचन प्रक्रियेत बिघाड आदी आजार बळावतात. अनेक घातक अंश शरीरात येत असल्याने ह्रदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. अंडी शाकाहारी नाहीत. अफलित अंड्यातील जिवंत स्त्रीबीजाला आपण मारतो. अशा हिंसक आहारामुळे मानसिक आरोग्यही बिघडते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण का खेळतोय, याचा विचार शाळा व पालकांनी करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यात मराठी पाट्यांचा कायदा न पाळणाऱ्यांना मनसेचा हिसका,पोलिसांचे मात्र ….

पुणेसर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर महाराष्ट्रात मराठी पाट्या असाव्यात अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील आणिटिळक रोड वरील नामांकित दुकानांच्या बोर्डवर मराठीत पाट्या नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यावेळी पोलिस बंदोबस्त असताना देखील कार्यकर्त्यांनी तोडफोड केली . दरम्यान पोलिसांनी सर्व प्रकारचे शूटिंग कॅमेऱ्यात केले आहे.मात्र कुठल्याही इंग्रजी पाट्या लावून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यापार्यावर गुन्हा दाखल केल्याचे वृत्त नाही . दुसरीकडे इंग्रजी पाट्या लावणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र आम्हाला महापालिकेने नोटीस दिली नाही , द्यायला हवी होती , आम्हाला मराठी पाट्यांचा कायदाच ठाऊक नाही , समजावून सांगायला हवे होते ,तोडफोड हि पद्धत योग्य नाही असा पवित्र घेत व्यापारी बाणा दाखविला आहे.

जंगली महाराज रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी दाखल झाले. हातात बांबूच्या काठ्या घेऊन त्यांनी लिव्हाईस दुकानाच्या काचेची तोडफोड केली. तसेच सदर दुकानाचा इंग्रजी अक्षरातील बोर्ड देखील फोडला. त्यानंतर इतर दुकानांकडेही मनसे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा वळवला.यावेळी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दुकानदारांना दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात याकरिता दोन महिन्यांचा वेळ दिला होता. त्यानंतर याबाबत आम्ही पुणे मनपाला देखील निवेदन देऊन ज्या दुकानदार पाट्या मराठीत पाट्या लावत नाही, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नाही .त्यामुळे आम्हाला आक्रमक होत सदरची कारवाई करावी लागत आहे .

कायदा राबविणारे राबवीत नाहीत पण त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करतातत्यांना घाबरत नाही

आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याने नवीन कोणत्याही गुन्हे दाखल होण्याची आम्हाला भीती वाटत नाही. महाराष्ट्रात पाटया या मराठीतच असाव्यात असा सुपरिण कोर्टाने निर्णय देऊनही तो राबवीत का नाही असा आमचा आग्रह असून प्रशासनाने कारवाई केली नाही त्यामुळे आम्हाला हे करावे लागते , आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करू.यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर म्हणाले ,पुण्यातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या असावेत या दृष्टीने पुणे मनपाला चार दिवसांपूर्वी आम्ही लेखी पत्र दिले होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने कोणतीही पावले उचलण्यात आले नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने मराठीत पाट्या असव्यात असा निर्णय दिल्यानंतर देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला पहिले पत्र द्यावे त्यानंतर पुढील आक्रमक आंदोलन करावे असे सुचित केले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी इंग्रजी भाषेत आम्हाला पाट्या दिसतील त्या ठिकाणी मनसे स्टाईलने आम्ही कारवाई करू. मराठी भाषेत दुकानदारांनी पाट्या लावण्यात कोणत्याही प्रकारचा आक्षेप असण्याचे कारण नाही.

आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण ; ‘नमो ११ सुत्री’ कार्यक्रमाचा शुभारंभ

रत्नागिरी, दि.३० : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे फीत कापून आणि कोनशिला अनावरण करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन ‘नमो ११ सुत्री’ कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डाॕ राजीव निवतकर, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अधिष्ठाता डाॕ. जयप्रकाश रामानंद, शिरगाव सरपंच फरिदा काझी, माजी आमदार विनय नातू, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दिलेला शब्द पूर्ण करणं, वचनपूर्ती करणं आणि वेळेत पूर्ण करणं याचं ज्वलंत उदाहरण आजचे लोकार्पण आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला होता आणि वर्षभरातच त्याचा शुभारंभ होत आहे. ४३० खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील ४०० ठिकाणी झाली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं, सर्वसामान्यांच्या मनातलं गतिमान सरकार आहे, हे याचं उदाहरण पाहतोय. आम्ही जनतेशी बांधील आहोत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे.
आरोग्य विभागावर फोकस केला आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची रक्कम ५ लाखांवर वाढविली आहे. योजना वाटणारं, योजना देणारं सरकार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून १ कोटी ८० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणात जेवढी विकास कामे आणता येतील तेवढी आणू. रत्नागिरी विमानतळाला ११८ कोटी मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी मधून १६० कोटी रुपये खर्च झाले आहेत. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु, मायबाप बळीराजाने चिंता करु नये. बळीराजाला वाऱ्यावर सोडणारं नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबध्द आहे. ‘नमो ११ सुत्री’ कार्यक्रम सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, अनेक वर्षांची मागणी या महाविद्यालयामुळे पूर्ण झाली आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी कष्ट केले. भविष्यात टप्प्या-टप्प्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा मानस आहे. बीएससी नर्सिंग महाविद्यालय देखील या महाविद्यालयात सुरु केले जाईल. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी भरतीचा शासन निर्णय काढूनच मी आज येथे आलो आहे. शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले, नवीन सरकार स्थापन झाले. गोव्यात असताना मुख्यमंत्री महोदयांनी कुठचं काम करायंच, असा प्रश्न विचारला. त्यावेळी अनेक वर्षांपासून मागणी असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी मी बोललो. सकाळी ७ वाजता मुख्यमंत्री महोदयांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना फोन लावून मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्यास सांगितले. त्यासाठी ५२२ कोटी रुपये मंजूरही केले. पुणे, मुंबईनंतर रत्नागिरीला परिपूर्ण एज्युकेशन हब बनविण्यासाठी मेडीकल कॉलेज देखील दिलं. उद्योजकांना १०० टक्के इनसेन्टीव्ह देण्याचा निर्णय देखील काल घेतला. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले मुख्यमंत्री असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी तर, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आभार प्रदर्शन केले.

दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ
वसंत घाणेकर, संजय पावसकर यांना घरकुल योजनेसाठी ६ लाख ८० हजार निधी वितरीत करण्यात आला. दिनेश शितप व मुक्ता शिरसाठ, सुरज अवसरे व सोनाली जाधव यांना दिव्यांग-दिव्यांग विवाह योजनेत ५ लाख निधी वितरीत करण्यात आला. अंकिता कोलगे, संदीप कांबळे, भारती भायजे, संतोष रहाटे यांना स्वयंचलित तीन चाकी सायकली वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील १४ विद्यार्थ्यांना व्हिल चेअर, सीपी चेअरचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील २ हजार ४४३ सीआरपींना मोबाईल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात ६ महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल वाटप करण्यात आले.
‘नमो शेततळी’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना प्रमाण पत्र वाटप करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

000

ठाणे व कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा निर्णय

0

हजारो रहिवाश्यांना मिळणार लाभ
मुंबई, दि. ३० – ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे तालुक्यातील कल्याण शिळा निळजे (पलावा) ते नारीवली-बाळे-वाकळण-दहिसर हे मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग प्रमुख मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याच्या निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. हे मार्ग दर्जोन्नती करण्यात आल्यामुळे या परिसरातील रहिवाश्यांना अधिक दर्जेदार व सुस्थितीत स्वरुपाचे रस्ते उपलब्ध होणार आहेत.
कल्याण शिळ रोड तसेच निलजे-पलावा हे रोड सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहेत. परंतु पुरेश्या निधी अभावी तसेच काही कायदेशीर तंटयामुळे रस्त्याच्या बहुतांश भागांची देखभाल योग्य पध्दतीने होऊ शकत नव्हती व त्याचा फटका या परिसरताली वाहनचालक व नागरिकांना होत होता. लोढा परिसरातील कासा रिओ व कासा रिओ टाऊनशिप या परिसरात राहणा-या हजारो रहिवाश्यांना या खराब रस्त्यांचा नाहक त्रास सोसावा लागत होता. पुरेश्या निधी अभावी या रस्त्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्यामुळे हा रस्ता म्हणजे खड्ड्यांचा रस्ता म्हणून ओळखला जायचा. दुरावस्था झालेल्या या रस्त्याचा धोका हा वाहनचालक व पादचा-यांना मोठ्या प्रमाणात होत होता.
सदर रस्ता दर्जोन्नत व सुस्थितीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या परिसरातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंत्री चव्हाण यांनी या गंभीर विषयाची दखल घेत विभागाच्या अधिका-यांशी बैठक घेऊन ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देश्याने मंत्री चव्हाण यांनी रस्ते विशेष दुरुस्ती अर्थसंकल्पात १८.५ कोटीची तरतुद करण्याच नियोजन केले आहे.
मंत्री चव्हाण यांच्या या निर्णयामुळे कल्याण व ठाणे तालुक्यातील रस्ते लवकरकच अधिक दर्जेदार व सुस्थितीत होणार आहेत. यामुळे या परिसरातील वाहनचालक व रहिवासी यांना ख-या अर्थाने दिलासा मिळाला आहे. आता या रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिध्द झाला आहे.

महापालिकेची मुंबई – बंगळुरु महामार्गावरील बाणेर परिसरात धाडसी कारवाई

पुणे :पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway)बाणेर येथे अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर मॉल, शो-रुम इत्यादीवर बांधकाम विकास विभागाच्या (Construction Development Department) वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.

मागील काही दिवसांपासून मुंबई – बंगळुरु महामार्गावर मोठ्या प्रमाणात फर्निचरची अवैध दुकाने थाटण्यात आली होती. संबंधित मोठे शोरूम टाकण्यासाठी कुणाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच करही भरण्यात आला नव्हता. मनपाने वारंवार नोटीस बजावूनही ही अनधिकृत बाधकामे काढण्यात येत नव्हती. अखेर मनपाने गुरुवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात या दुकानांवर जेसीबी चालवून कायदेशीर कारवाई केली.

हे बांधकाम HEMRL (High Energy Materials Research Laboratory) या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवड्यात उर्वरित दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.यावेळी कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. हिंजवडी पोलीस स्टेशनचे (Hinjewadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.महापालिकेने  संबंधित दुकानांना 1 महिन्यापूर्वीच नोटीस देऊन जागा खाली करण्याची सूचना केली होती. पण दुकानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे मनपा प्रशासनाला नाईलाजाने ही कारवाई करावी लागली. ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintending Engineer Yuvraj Deshmukh),कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे (Executive Engineer Bipin Shinde) यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनिल कदम,शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडइ यांनी केली.

पुण्यात प्रभू श्रीरामाचे पहिले शिल्प शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून हांडेवाडीत उभारणार

पुणे -महापालिकेत गेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. तसेच भाजपच्या तत्कालीन नगरसेविका वर्षा तापकीर यांनी त्यांच्या प्रभागात श्रीरामाचे शिल्प उभारण्यासाठी प्रस्ताव मांडून तो स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून दिला होता. असे असताना पुण्यात प्रभू श्रीरामाचे पहिले शिल्प उभारण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून हांडेवाडी येथील श्रीराम चौकात हे शिल्प उभारले जाणार आहे. येत्या दोन डिसेंबरला या शिल्पाचा पायाभरणी कार्यक्रम होणार आहे

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. पालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक होते. त्यातील एक नगरसेविका वर्षा तापकीर यांनी धनकवडी-आंबेगाव पठार (प्रभाग क्र ३८) येथील आंबेगाव पठारमधील मोकळ्या जागेत असलेल्या क्रीडांगणामध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य शिल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. तापकीर यांचा हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आल्यानंतर काही सभासदांनी त्याला आक्षेप घेत क्रीडांगणामध्ये हे शिल्प उभारू नये, असा विरोधदेखील केला होता. मात्र, पालिकेत भाजपचे संख्याबळ असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मान्य करून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला होता. स्थायी समितीनंतर हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी पालिकेच्या मुख्य सभेत गेला. मात्र, त्यानंतर पालिकेच्या सभासदांची मुदत संपुष्टात येऊन पालिका आयुक्तांनी प्रशासक म्हणून कारभार सुरू केला. त्यानंतर या प्रस्तावावर प्रशासकांनी काही केले नाही असे वर्षा तापकीर यांनी सांगितले.

शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी २०१८ मध्ये महापालिकेकडे हांडेवाडी भागात प्रभू श्रीरामाचे शिल्प उभारण्याची मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला होता. या पूर्णाकृती शिल्पाचा संपूर्ण खर्च दशरथ बळीबा भानगिरे ट्रस्ट यांच्याकडून करण्यात येणार होता. हा प्रस्ताव मुख्य सभेने मान्य करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. नाना भानगिरे यांनी शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्याचा पाठपुरावा सुरु ठेवला आणि आता नगरविकास खाते तसेच पोलिस महासंचालक कार्यालयाने हे शिल्प बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हे शिल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे भानगिरे यांनी सांगितले.पुण्यात उभारण्यात येणारे श्रीरामाचे पूर्णाकृती शिल्प हे देशातील पहिले शिल्प असणार आहे, असा दावा भानगिरे यांनी केला आहे. २ डिसेंबरला याचा पायाभरणी समारंभ होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव-पाटील, भरत गोगावले हे उपस्थित राहणार आहेत.

कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले,दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध मंचरमध्ये गुन्हा दाखल

पुणे, दि. ३० नोव्हेंबर २०२३: महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत कमी वीजबिलाचे आमिष दाखवून ग्राहकाची आर्थिक फसवणूक वमहावितरणचे वीजमीटर परस्पर बदलल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील मार्केट यार्डजवळ ढोबीमळा येथे अंबिका चंदर चव्हाण यांच्यानावे महावितरणने वीजजोडणी दिली आहे. तथापि मीटर रीडिंगच्या पर्यवेक्षणात ग्राहक क्रमांक व महावितरणकडून लावण्यात आलेला मीटर क्रमांक जुळत नसल्याचे संगणकीय प्रणालीत दिसून आले. त्यानंतर मंचर शाखेचे सहायक अभियंता श्री. संजय बारहाते व सहकाऱ्यांनी वीजग्राहक चव्हाण यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली. यामध्ये महावितरणकडून लावण्यात आलेल्या वीजमीटरऐवजी दुसऱ्याच कंपनीचा वीजमीटर लावलेला आढळून आला. यासंदर्भात वीजवापरकर्ते चंदर धरम चव्हाण यांच्याकडे विचारणा करण्यात आली. यात ‘गणेश महादेव इंदोरे (रा. चांडोली, ता. आंबेगाव) व प्रवीण पाचपुते (जारकरवाडी, ता. आंबेगाव) या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी घरी येऊन महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगितले. वीजबिल दरमहा कमी येईल असे आमिष दाखवून वीजमीटर बदलण्यासाठी ७ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर जुना वीजमीटर घेऊन गेले व दुसरा मीटर बसविला’, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

तथापि गणेश इंदोरे व प्रवीण पाचपुते दोघेही तोतया कर्मचारी असल्याचे लगेचच स्पष्ट झाले. या दोघांनी कर्मचारी असल्याची बतावणी करून चव्हाण यांच्याकडील अधिकृत वीजमीटरची विल्हेवाट लावली व त्याठिकाणी दुसरे मीटर बसवले. महावितरणसह वीजग्राहकाची फसवणूक केल्याचे आढळून आले. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्यात महावितरणकडून तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी या दोघांविरुद्ध कलम १७०, ४२०, ४२७, १३६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तोतया कर्मचाऱ्यांपासून सावधान : मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार – मीटरमधील वीज वापर कमी दाखवणे, मीटरची गती संथ करण्यासाठी मीटरमध्ये फेरफार करणे, परस्पर वीजमीटर बदलणे किंवा वीजबिलाची रक्कम कमी करून देण्याचे आमिष दाखविणे आदींसाठी कोणत्याही व्यक्तीने वीजग्राहकांकडे आर्थिक मागणी केल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. याबाबत महावितरणच्या संबंधित कार्यालयामध्ये तात्काळ कळवावे किंवा तक्रार करावी असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे. 

२०४७ मधील भारतीय शिक्षणव्यवस्थेवर मंथन करावे -ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांचे मतः

२८वीं तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचा समारोप समारंभ योग गुरु मारूती पाडेकर यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार

पुणे,दि.३० नोव्हेंबर: ” दूरदुष्टीचा विचार करून वर्ष २०४७ मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्था कशी असेल. यावर सर्वांनी मंथन करावे. जागतिक स्तरावरील शिक्षण व्यवस्थेत टिकण्यासाठी आमची स्पर्धा परदेशातील विद्यापीठांशी असेल. त्यावेळी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाचे आहे.”असे मत केंद्र सरकारच्या एचआरडी विभागाचे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पद्मभूषण डॉ. दीपक धर, अभिजित पानसे, उद्योजक ईश्वरचंद्र परमार, डॉ. राजेंद्र शेंडे व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य डॉ. योंगेन्द्र मिश्रा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड व सल्लागार डॉ.संजय उपाध्ये हे उपस्थित होते.
या वेळी योग गुरु मारूती पाडेकर यांचा विशेष जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देतांना म्हणाले. कराड सरांच्या दिव्यदृष्टीने मला डब्ल्यूपीयूत स्थान मिळाले. प्रत्येक व्यक्तीपयर्र्त योग कसा पोहचेल यासाठी कार्य करावयाचे आहे.
डॉ. अभय जेरे म्हणाले,” पंतप्रधान यांनी सांगितल्यानुसार वर्ष २०४७ साली भारताला प्रगत राष्ट्र आणि आर्थिक व्यवस्थेत समृध्द करण्याच्या दृष्टिने कार्य करावे लागणार आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जवळपास ४ बिलियन डॉलर पर्यंत पोहचली आहे. ती जवळपास १० बिलियन डॉलर पर्यंत पोहचवायची आहे.”
“आज जगात गिग इकॉनॉमी हळू हळू सुरू झाली आहे. यामध्ये कर्मचारी दोन ते तीन ठिकाणी कार्य करू शकतो. आता माइक्रोसॉफ्ट बरोबर यूएसमध्ये ही पद्धत सुरू झाली आहे. तर भारतात ती पद्धत यायला वेळ लागणार नाही. गिग इकॉनॉमी मध्ये प्रोजेक्टवर कार्य करावे लागणार आहेत. तेव्हा स्वतःला मजबूत करावे लागेल. पुढील पिढीला खूप कष्ट करावे लागणार आहेत त्यामुळे त्या दृष्टीने शिक्षण असावे.”
पद्मभूषण डॉ. दीपक धर म्हणाले,” मानवाच्या कल्याणासाठी विज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. परंतू त्याच बरोबर अध्यात्माची गरज ही आहे. धर्म हे जीवनात वर्तवणुकीसाठी असतात आजच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाबरोबरच अध्यात्माचे शिक्षण देणे गरजेचे आहे. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ आणि गर्व करू नये समजा हे दोन्ही एकत्र आले तर विनाश होतो. त्यामुळे संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी आणि भगवान गौतम बुद्धांचे पंचशील यांचा समन्वय घडेल तेव्हाच मानवजातीचे कल्याण होईल. तसेच पुढील वर्षापासून डब्ल्यूपीयूच्या प्रत्येक वर्गातील प्रथम व द्वितिय येणार्‍या विद्यार्थ्यांना या व्याख्यानमालेत समाविष्ठ करून घेऊ.”
आचार्य डॉ. योगेन्द्र मिश्रा म्हणाले,” जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते. त्यामुळे जीवनात निरंकारी बनून सेवेला प्राथमिकता दयावी. परमात्मा बाहेर नाही तर अंर्तमनात असून त्याचा शोध घ्यावा. पवित्र अंतःकरण असेल तर अंर्तमनात शांती सापडेल. डॉ. विश्वनाथ कराड यांनी केलेल्या अफाट कार्याला पाहता त्यांच्या नावाने रिसर्च सेंटर सुरू करावे.”
ईश्वर परमार म्हणाले,” मानसिक ताण तनाव असेल तर व्यक्तीची प्रगती थांबते. त्यासाठी जीवनात अध्यात्म अत्यंत महत्वाचे असून आपल्या अंर्तःमनात त्याला बसवावे. जीवनाचे लक्ष्य काय आहे हे ठरवून कार्य केल्यास जीवण जगणे अवघड नाही तर अतिशय सोपे आहे. तसेच उत्तम आरोग्यसाठी रोज ८ तास गाढ झोपणे आणि अध्यात्म महत्वाचे आहे.”
राहुल विश्वनाथ कराड यांनी आपल्या संदेशात सांगितले की, ही व्याखानमाला सर्वसमावेशक आहे. जाती, धर्म, पंथ या पलिकडे जाऊन जीवन जगण्याची आदर्श शैली रुजवण्याचे काम यातून होत आहे. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले हे बीज आज वटवृक्षात परिवर्तन होतांना खूप आनंद वाटत आहे.”
त्यानंतर अभिजित पानसे यांनी विचार मांडले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा

0

नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नाव नोंदणी करा- विभागीय आयुक्त

पुणे, दि. २७: भारत निवडणूक आयोगाच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; तसेच नवीन युवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्याष्टीने मोहिमस्तरावर काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा बैठकीच्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ॲड. अशोक पवार, उपायुक्त महसूल रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात यावी. यासाठी विविध राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत मतदार संघनिहाय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करावे. या शिबारांची माहिती सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात यावी, असेही ते म्हणाले.

मतदान प्रकियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याकामी सर्व मतदान केंद्रांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतः भेटी देऊन पडताळणी करावी. मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची प्रक्रिया राबवावी. मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करुन ती अद्ययावत करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

राजकीय पक्षासोबत समन्वय साधून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत त्यांना सक्रीय
सहभागी करून घ्यावे अशा सूचना करून, राजकीय पक्षांनी आपल्यास्तरावर असलेल्या सूचना किंवा तक्रारी निवडणूक यंत्रणेला कळवाव्यात. या सुचना व तक्रारीची दखल घेऊन संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी. सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी याकामी स्वत: वैयक्तिक लक्ष देवून काम करावे, असेही ते म्हणाले.

मतदार नोंदणीकरीता अनिवासी भारतीय नागरिकांच्या बाबतीत संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून शिबीरे आयोजित करावीत. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संपर्क साधावा. महिला, शरीर विक्रय व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय, दिव्यांग, भटक्या विमुक्त जाती जमाती, आदी घटकांतील नागरिकांची मतदार नोंदणी करावी. मतदार यादीत समाजातील सर्व घटकांचा समावेश होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिल्या.

आमदार श्री. पवार म्हणाले, लोकसंख्या आणि मतदार यांचे प्रमाण लक्षात घेऊन मतदार नोंदणीचे काम करावे. ग्रामीण व शहरी भागातील दुबार, मयत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्याची कार्यवाही करावी. या प्रक्रियेत राजकीय पक्षाचा सहभाग वाढवावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

उपजिल्हाधिकारी श्रीमती तांबे म्हणाल्या, मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मतदार नोंदणी जनजागृतीकरीता स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करून नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आवाहन येत आहे. मतदार नोंदणीसाठी सहकारी गृहनिर्माण सोसायटीत मेळावे, महिला, कामगार, युवक, दिव्यांग, तृतीयपंथीय आदी घटकांकरीता मेळाव्याचे आयोजन करुन मतदार नोंदणी करण्यात येत आहे. आगामी काळातही मतदार नोंदणी जनजागृतीकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

उपजिल्हाधिकारी श्रीमती कळसकर म्हणाल्या, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक सोमवारी राजकीय पक्षांसोबत आणि दररोज सहायक निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येत आहे. अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात मतदार संघनिहाय मेळावे, शिबारांचे आयोजन करण्यात येत आहेत. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधून काम करण्यात येत आहे.

यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीच्या अनुषंगाने सूचना मांडल्या.
0000

३७व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १२ हजारहून अधिक धावपटू धावणार

पुणे : ३७वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी ‘ब्राह्म मुहूर्त रन’ म्हणून संपन्न होणार असून, त्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पुरुष महिलांच्या मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ सणस मैदानाजवळील कल्पना/विश्व चौक येथून समारंभपूर्वक होर्इल. या मॅरेथॉनमध्ये १२ हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला असून, केनिया, इथोपिया, टान्झानिया, मलेशिया यांसह विविध देशांतील नामवंत ७० आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच बॉम्बे सॅपर्स, एएसआय, सैन्य दल, रेल्वे, पोलीस यांतील नामवंत धावपटू व महिला विभागात राष्ट्रीय विजेती ज्योती गवते, साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व शीतल भंडारीदेखील सहभागी होणार आहेत. अशी माहिती अॅड. अभय छाजेड (विश्वस्त), रोहन मोरे (जॉइंट रेस डायरेक्टर), सुमंत वार्इकर (रेस डायरेक्टर)यांनी येथे दिली

ते म्हणाले,’‘पर्यावरणसंवधनासाठी पळा’ हे यंदाचे घोषवाक्य आहे. थायसन ग्रुपचे विशेष पथकांसह पर्यावरणसंवर्धन मोहिमेसाठी सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी ‘We create livable planet’ असे घोषवाक्य असून, तंदुरुस्तीसाठी एकत्र येऊन १००हून अधिक अभियंते यामध्ये सहभागी होणार आहेत. पुणे महानगरपालिकेतर्फे या स्पर्धेतील विजेत्या धावपटूंना दरवर्षीप्रमाणे यंदाही ३५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता ४२.१९५ कि.मी.ची पूर्ण मॅरेथॉन, पहाटे ४.०० वाजता अर्धमॅरेथॉन सकाळी ६.१५ वाजता १० कि.मी., ६.४५ वाजता ५ कि.मी., ७.१५ वाजता व्हीलचेअर व ७.२० वाजता ३ कि.मी.ची ‘फॅमिली रन’ होर्इल. यावेळीदेखील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या ६व्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे प्रत्येक गटातील पहिले ३ विजेते सहभागी होणार आहेत.पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील यंदाचे नाइट रनचे तिसरे वर्ष आहे. मागील वर्षी रात्री १२.०० वाजता लॅग ऑफ करण्यात आला होता. मात्र, मुख्य मार्ग सिहंगड रस्त्यावरील वाहतूक रात्री १२.०० वाजतादेखील कमी झाली नव्हती. त्यामुळेच यंदा पूर्ण मॅरेथॉनची वेळ पहाटे ३.३० वाजता करण्यात आली आहे. पुरुष व महिलांची पूर्ण स्पर्धा सणस मैदानाजवळील कल्पना/विश्व चौकापासून–सारसबाग–वीर सावरकर पुतळा– सिंहगड रस्ता–नांदेड सिटी– आतील सर्कला वळसा घालून त्याच मार्गे कल्पना/विश्व चौक येथे परत आणि पुन्हा त्याच मार्गाने जाऊन व येऊन ४२.१९५ कि.मी. अंतर पूर्ण केले जाणार आहे.अर्ध मॅरेथॉनमधील स्पर्धक वरील मार्गाप्रमाणे जाऊन-येऊन एकाच फेरीत स्पर्धा पूर्ण करतील. बाकी सर्व स्पर्धा कल्पना/विश्व चौकातून निघून १० कि.मी. संतोष हॉल येथून परत, 5 कि.मी. गणेशमळा चौक येथून परत व ३ कि.मी. व व्हीलचेअर दांडेकर पूलपर्यंत जाऊन परत अशा असणार आहेत. या सर्व मार्गावर संयोजकांतर्फे मोटारसायकल व सायकल पायलट असतील. सर्व गटांतील धावपटूंनी आपली शर्यत सुरू होण्यापूर्वी अर्धा तास प्रारंभ रेषेजवळ येणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या ४२.१९५ कि.मी.च्या मार्गावर प्रत्येक कि.मी.वर स्पंजिंग, फीडिंग व वैद्यकीय सुविधा प्रत्येक १ कि.मी.डॉक्टररांसह अॅम्ब्युलन्स असणार आहे. या संपूर्ण मार्गावर पुणे महानगरपालिकेतर्फे सर्वत्र पुरेसा प्रकाश असण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या स्पर्धेच्या मार्गावर ज्या विविध स्पर्धा वळण घेऊन मागे फिरतील, त्या टर्निंग पॉइंटवर पंच, टाइमकीपर्स तांत्रिक अधिकारी आदी असणार आहेत.या स्पर्धेसाठी २००हून अधिक डॉक्टर्स व २५०हून अधिक नर्सेस जबाबदारी सांभाळणार असून, डॉक्टर राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे वैद्यकीय पथक काम करणार आहे. नवले हॉस्पिटल, सिम्बायोसिस, बी.व्ही.जी. १०८ अॅम्ब्युलन्स, संचेती हॉस्पिटल आणि भारती हॉस्पिटल यांनी या वैद्यकीय पथकात संयोग दिला आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एक हजारहून अधिक कार्यकर्ते काम करीत असून, शहर पोलीस व ट्रॅफिक पोलीस यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. चंद्रशेखर आगाशे शारिरिक शिक्षण कॉलेज, सरहद संस्था आणि कॉलेज, सायक्लोहोलिक्स, आझम कॅम्पस, पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटना, अद्वेत क्रीडा सेल, कावेरी कॉलेज व अवामी महाज यांनी यामध्ये सहयोग दिला आहे.या ३७व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने आदल्या दिवशी शनिवार, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी११.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मॅरेथॉन भवन येथे क्रीडासाहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, क्रीडासाहित्य तयार करणाऱ्या ३८ कंपन्या यात सहभागी झाले आहेत. या दिवशी स्पर्धेत नोंदणी केलेल्या स्पर्धकांना टी–शर्ट, चेस्ट नंबर व गुडी बॅग देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता सणस मैदान येथे महाराष्ट्र विधनासभेतील काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी गॄह राज्यमंत्री रमेश बागवे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे,खा. वंदना चव्हाण, आ. दीप्ती चवधरी,आ. रवींद्र धंगेकर, व सिम्बायोसिस संस्थेच्या संचालिका विद्या येरवडेकर १७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या ६व्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजक संजय नहार व डॉ. शैलेश पगारिया आदी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित रहातील.