Home Blog Page 1339

थायलंड, बँकॉकला कमी पैशात नेतो सांगून Tour कंपनीकडून १३ लाखांची फसवणूक

पुणे : थायलंड आणि बँककॉकला जाण्याचं स्वप्न आता सगळ्या युवकांचे झाले आहे. कमी पैशात परदेश फिरण्यासाठी थायलंड आणि बँकॉक हे सामान्य नागरिकांनासाठी सोयीस्कर पडतं. सोयीस्कर पडणाऱ्या या टूर प्रोग्रॅममध्ये लोकांच्या आर्थिक फसवणूकचे प्रकार सध्या वाढत आहे. हे वाढत असताना आता नामांकित विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत.एका नामांकित विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह इतरांना बँकॉक, थायलंड इथे परदेशात पर्यटनासाठी घेऊन जातो असे सांगून टुर कंपनीच्या चालकाने तब्बल १३ लाख ३६ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी एसडी हॉलीडेज कंपनीचे दर्शन ध्रुव यांचेवर डेक्कन पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या प्रकरणी स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ झोनल अधिकारी कपिल कमल बजाज (वय-४१, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार १४/११/२०२२ ते आतापर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कपिल बजाज यांना आरोपी दर्शन ध्रुव यांनी त्यांचे एस डी हॉलीडेज मार्फत एजंट लोकांकरिता डिसेंबर २०२२ मध्ये बँकॉक, थायलंड येथे टुरकरिता प्रवाशांची विमानांची तिकिटे व व्हिसा या सर्व गोष्टीची पूर्तता करुन देण्याचे आश्वासन दिले.या करिता तक्रारदार यांचेकडून आरोपीने आगाऊ रक्कम म्हणून आठ लाख ७५ हजार रुपये रक्कम घेतली. तसेच त्याचे एजंटचे नातेवाईकांकडून तक्रारदार यांचेशी परस्पर संर्पक करुन टुरला घेऊन जातो असे सांगून त्यांचेकडून देखील चार लाख ६१ हजार रुपये घेण्यात आले. मात्र, त्याबदल्यात कोणतेही तिकिट न देता तसेच कंपनीचे व एजंटची व त्यांचे नातेवाईक, मित्रांची तब्बल १३ लाख ३६ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. सदर रकमेचा अपहार केला गेला असून बनावट आरटीजीएस स्लीप तसेच धनादेश बनवून रक्कम दिल्याचे भासवले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एस रोरमले पुढील तपास करत आहे

माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. ०८ डिसेंबर २०२३ : वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल आणि माहितीचे विश्लेषण करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत मदत केल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय पुरस्कार गुरुवारी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या कामात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांना सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने विविध पावले उचलली आहेत. तसेच वीज ग्राहकांकडून होणारा विजेचा वापर, त्यांच्याकडून मिळणारी बिले, वीज पुरवठ्यातील समस्या अशा विविध बाबतीत निर्माण होणारी माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करणे आणि निर्णय प्रक्रियेत मदत करणे असेही काम माहिती तंत्रज्ञान विभागाकडून केले जाते. या दोन्ही कामांबद्दल विभागाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

महावितरणने वीज ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेणे, वीज पुरवठ्याविषयी तक्रार करणे, वीज बिल भरणे अशा विविध कामांसाठी वेबसाईटवर आणि ॲपवर सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांना घरबसल्या या सेवा मिळविता येतात. महावितरणचा ट्रान्सफॉर्मर जळाला किंवा नादुरुस्त होऊन वीज पुरवठा खंडित झाला तर त्याचीही तक्रार ॲपवरून करता येते. ईज ऑफ लिव्हिंगसाठी महावितरणने उपलब्ध केलेल्या ऑनलाईन सेवांचा ग्राहकांनी वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी केले.

महावितरणचे सिस्टीम ॲनालिस्ट दिनेश लडकत आणि प्रोग्रॅमर हसीब खान यांनी पुरस्कार स्वीकारला. गव्हनर्न्स नाऊ हे सार्वजनिक धोरण आणि सुशासन यासंदर्भातील प्रतिष्ठित प्रकाशन आहे. त्यांनी सार्वजनिक उपक्रमांतील माहिती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. हे पुरस्कारांचे आठवे वर्ष आहे. देशभरातील विविध सार्वजनिक कंपन्यांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी

  •   कांदानिर्यात, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढणार
  • दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
  • अवकाळी पाऊस, मराठा आरक्षणासह सर्व मुद्यांवर  सभागृहात चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न –  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा

नागपूर, दि. ८ : अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदानिर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण यासारख्या सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. कांदानिर्यात आणि इथेनॉलनिर्मिती प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल. दुधउत्पादकप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन  शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असेही  उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत विरोधी पक्षांकडून मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर सदस्यांना आश्वासित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात येईल. ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊसउत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या शनिवारी किंवा रविवारी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. गरज पडल्यास पुढील आठवड्याच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जावून केंद्रीय मंत्री श्री. शाह आणि श्री. गोयल यांची भेट घेऊन यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना वेळेअभावी बैठक घेणे शक्य नसल्यास, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह येत्या मंगळवारी बैठक घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सभागृहाला दिला.

‘सन मराठी’ची ‘तुझी माझी जमली जोडी’ नवी मालिका ११ डिसेंबरपासून 

मैत्री ही अशी निरागस गोष्ट आहे ना की ती एकदा झाली की ती कशाचा भेदभाव करत नाही. एखाद्या सोबत केलेली मैत्री जर कायमस्वरूपी टिकवली तर त्या व्यक्तीने खूप काही कमावले असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. ‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ ही वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या विषयात हात घालते, नात्यांचे महत्त्व कथेच्या माध्यमातून पटवून देते आणि आता मैत्री हा विषय घेऊन या वाहिनीची ‘तुझी माझी जमली जोडी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

एक ही शब्द न बोलता डोळ्यातील भाव ओळखणारी मैत्री जर तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती असाल. नशिबात मैत्रीची साथ असेल सारं काही शक्य असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री ही उलगडत जाते, फुलत जाते आणि नकळतपणे खूप काही शिकवून जाते. अशाच मैत्रीची सुंदर गोष्ट सन मराठी वाहिनीवर उलगडणार आहे.

‘मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते’ हे वाक्य पटवून देण्यासाठी ११ डिसेंबरपासून  ‘तुझी माझी जमली जोडी’ ही नवीन मालिका ‘सन मराठी’ वर येत आहे. दोन अनोळखी व्यक्ती, त्यांच्यात झालेली मैत्री, मैत्रीच्या नात्यामुळे त्या दोघांमध्ये झालेले विचारांचे आदान प्रदान आणि मैत्रीमुळेच फुलणारं त्यांचं प्रेम अशी या मालिकेची गोड गोष्ट आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी ही नवीन जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही नवीन जोडी, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी खात्री वाटते. नुकतेच या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे आणि मालिकेचे प्रोमो पाहून प्रेक्षकांनी त्यांची या मालिकेप्रती आतुरता देखील दाखवली आहे.

खलनायिका किंवा खलनायक यांच्याशिवाय दोन व्यक्तींचं प्रेम किंवा मालिकेची कथा पुढे कशी सरकणार ना… कथेमध्ये ट्विस्ट तर हवाच. तर ‘तुझी माझी जमली जोडी’ मध्ये अभिनेत्री स्नेहलता वसईकर खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.  स्नेहलता वसईकर साकारणार असलेल्या भूमिकेचं नाव ‘भैरवी’ आहे जी संचित चौधरीची आत्या दाखवली आहे. श्रीमंत घराण्याला शोभेल असं दिमाखदार, सुंदर व्यक्तिमत्त्व , शिष्टाचाराने वागेल असा स्वभाव, आणि अर्थात श्रीमंतीचा गर्व असणारं असं हे ‘भैरवी’चं पात्र आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत स्नेहलता वसईकर यांना पाहणं रंजक ठरणार आहे.

‘तुझी माझी जमली जोडी’ येत्या ११ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता फक्त सन मराठी वाहिनी वर प्रसारित होईल.

राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 8:  राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून त्यात हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव असणार आहे. राज्याच्या हवाई वाहतुकीसाठी ही एक नवी सुरुवात असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

भारतातील हेलिकॉप्टरच्या देखभाल, दुरुस्ती व तपासणीसाठी (एमआरओ) एअरबस हेलिकॉप्टर्स आणि इंडामेर यांच्यात झालेल्या करारानुसार मिहान येथील एमआरओ केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

जगात हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा, पर्यटन, कायदा व सुव्यवस्था या बाबींसाठी होत आहे. राज्याच्या नवीन वाहतूक धोरणात एमआरओ, विमानतळांच्या धर्तीवर हेलिपॅडची निर्मिती या बाबींचा अंतर्भाव राहील. देशात हवाई वाहतूक क्षेत्राची लक्षणीय वाढ होत असून याचा राज्याला लाभ होण्याची गरज यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.

खासदार प्रफुल्ल पटेल, एअरबस हेलिकॉप्टरच्या ग्राहक सहाय्य सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप, इंडामेर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय पटेल, एअरबस भारत व दक्षिण आशियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलार्ड आणि एअरबस भारत व दक्षिण आशियाच्या हेलिकॉप्टर विभागाचे प्रमुख सनी गुगलानी आदी यावेळी उपस्थित होते.

दुग्धविकास मंत्र्यांकडूनच राज्यातील दूध उत्पादकांची बदनामी-ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप

  • ⁠सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे
  • ⁠उपमुख्यमंत्र्यांकडून बैठक लावण्याचे आश्वासन

नागपूर : दुधाचे भाव 25 रुपयांपर्यंत खाली आली आहे, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात, परिणामी महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते आणि परराज्यातल्या खाजगी दूध संस्थांची चंगळ होते असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. दरम्यान या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

दुधाच्या प्रश्नावर असलेल्या स्थगन प्रस्तावावर सभागृहात चर्चा नाकारल्यानंतर सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दुधाच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले.

थोरात म्हणाले, ‘दूध दराच्या संदर्भात राज्यभर आंदोलने सुरू आहे. 24 ते 25 रुपये दराने शेतकऱ्यांना दूध विकावे लागते, दुधाच्या पाठीमागची मेहनत मोठी आहे त्यामुळे पंचवीस रुपयाने दूध विकणे शेतकऱ्याला परवडू शकत नाही. त्याला 34 ते 35 रुपयांचा भाव मिळाला पाहिजे. सरकारने फक्त दुधाचे भाव जाहीर करण्याची नौटंकी केली अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. दुधाच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ग्रामीण भागात शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात, अनेक बेरोजगार तरुण या माध्यमातून आपले भविष्य घडवतात अशावेळी या व्यवसायाची काळजी घेणे तो सांभाळणे ही सरकारची जबाबदारी आहे.

थोरात पुढे म्हणाले, यापूर्वी देखील ज्या ज्या वेळी हा व्यवसाय अडचणीत आला तेव्हा तेव्हा सरकार दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा सरकारने दूध घेतले, दूध संस्थांना पावडर बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. आजही कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये दुधाला पाच रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. सरकारने सुद्धा दुधाच्या व्यवसायाकडे सहानुभूतीने बघावे आणि दूध उत्पादकांना किंवा दूध संस्थांना पावडर बनविण्यासाठी अनुदान द्यावे,‘ अशी आग्रही मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

दुग्धविकास मंत्री या सगळ्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढायला तयार नाही उलट ते महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ असल्याची टिमकी वाजवत फिरतात. यावरून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ते किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दूध दरासाठी स्पर्धा करावी लागते तर दुसरीकडे मंत्र्यांकडून दूध भेसळीचा आरोप करून बदनामीची मोहीम सुरू आहे. त्यामुळे राज्यातील दूध संस्थांकडून जे उपपदार्थ तयार केले जातात त्यांना देखील विक्रीसाठी संघर्ष करावा लागतो. दुग्धविकास मंत्र्यांना जर भेसळीचे प्रकार आढळून आले तर त्यांनी त्यावर कारवाई करावी मात्र नाहक सरसकट महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संस्थांना बदनाम करू नये असेही थोरात यांनी मंत्री महोदयांना सुनावले.

परराज्यातील दूध संस्थांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक
परराज्यातील दूध संस्था महाराष्ट्रातल्या सहकारी दूध संस्थांना मोडीत काढण्याचे काम करत आहेत. जेव्हा शेतकऱ्यांना भावाची गरज असते तेव्हा या संस्था, शेतकऱ्यांना कमी भाव देतात, ज्या काळात दुधाचे दर स्थिर असतात त्या काळात या परराज्यातील संस्थांकडून अकारण स्पर्धा तयार करून सहकारी संस्था उध्वस्त केल्या जातात. आणि जेव्हा मक्तेदारी तयार होते तेव्हा शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम या परराज्यातील संस्था करतात असाही आरोप आमदार थोरात यांनी केला.

इक्बाल मिर्चीचा पार्टनर प्रफुल्ल पटेल व भ्रष्टाचारी अजित पवार फडणवीसांना कसे चालतात ? – नाना पटोले

देवेंद्र फडणवीसांचे देशप्रेम नकली; नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही.

नागपूर, दि. ८ डिसेंबर
माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवाल करुन फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, नवाब मलिकांना दाऊदशी संबंधीत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपण किती देशप्रेमी आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, त्यासंदर्भात त्यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून ते पत्र ट्वीटही केले पण दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा पार्टनर खासदार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांना कसे चालतात ? ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे घरही जप्त केलेले आहे मग प्रफुल्ल पटेलांबद्दल फडणवीस यांची भूमिका काय? ते फडणवीसांनी जाहीर करावे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमशी संबंधित एक व्यक्ती देशद्रोही तर मग दुसरा व्यक्ती देशप्रेमी आहे का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर चार दिवसातच हे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अजित पवार फडणविसांना कसे चालतात? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी नौटंकी चालत नाही. जनताच अशा नकली देशभक्तांना धडा शिकवेल, असेही नाना पटोले म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग:सहा जणांचा होरपळून मृत्यू; तळवडेमधील घटना

पुणे -पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. फटाका गोदामाला ही आग लागल्याची माहिती सूत्रांकडून माहिती मिळत आहे. गोदामात आणखी काही कामगार फसल्याचे सांगण्यात येत आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.​​​​​​

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत सहा महिलांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी कामगारांचा शोध सुरू आहे. जखमींमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. कारखाना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलिस ठाण्यांतर्गत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून सहा जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या मेणबत्त्या आणि फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती.

फुलझडी मेणबत्तीचा कारखाना – पालिका आयुक्त

या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदेंचा पाय खोलात?:शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्याच्या प्रस्तावावर 23 MLAच्या सह्या, ठाकरे गटाचा मोठा डाव

कोणकोणत्या आमदारांच्या आहेत सह्या? सूत्रांच्या माहितीनुसार, या शीटवर मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे वकील उलटतपासणीत या प्रकरणी विविध प्रश्न विचारून शिंदे गटाच्या नेत्यांची अडचण करतील असा अंदाज आहे. विशेष म्हणजे आमदार दिलीप लांडे यांनी आपल्या उलटतपासणीत या शीटवरील सही आपलीच असल्याचे मान्य केले आहे. पण त्यांनी वर लिहिण्यात आलेला पक्षादेश क्रमांक आपली सही घेतल्यानंतर टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई-शिवसेनेच्या सत्तासंघर्षाप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाने एक मोठा पत्ता उघड केला. त्यांनी 21 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या एका बैठकीची अटेंडंट शिट सादर केली. या शिटवर तब्बल 23 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे याच बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला या 23 आमदारांनी अनुमोदन दिल्यामुळे शिंदे यांचा पाय खोलात गेल्याची चर्चा रंगली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची शुक्रवारी 2 टप्प्यांत सुनावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी घेतली. त्यात ठाकरे गटाने 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची अटेंडंट शिट सादर केली. 21 जून 2022 च्या बैठकीला पक्षादेशानुसार किती आमदार उपस्थित होते? असा प्रश्न सुनावणीत वारंवार येत होता. त्यानुसार ठाकरे गटाने ही अटेंडंट शिट सादर केली. ही शीट ठाकरे गटाने आपल्या प्रतिज्ञापत्रात सादर केली होती.

या अटेंडंटशिटनुसार सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करून 21 जूनच्या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. तद्नुसार या बैठकीला शिवसेनेचे 23 आमदार हजर राहिले होते. या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली होती. आता या शीटवरील सह्या संबंधित आमदारांच्याच आहेत का? याची खातरजमा केली जाणार आहे.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी काल शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी घेतली. त्यांनी लांडे यांना प्रतिज्ञापत्रातील काही परिच्छेदांवर प्रश्न विचारले. तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर 2005 मध्ये बाळासाहेब जिवंत असताना तुम्ही पक्ष का सोडला, असा थेट सवाल कामत यांनी लांडे यांना केला. त्यावर दिलीप लांडे यांनी आपल्यापुढे दिलेली साक्ष ही आताच्या वस्तुस्थितीवर दिल्याचे नमूद केले.

दिलीप लांडे म्हणाले की, मी साक्षीमध्ये पूर्वीची वस्तुस्थिती मांडली नाही. त्यामुळे आता जी वस्तुस्थिती आहे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी व बाळासाहेबांनी जी शिकवण दिली आहे ती शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 8 :  महाराष्ट्र विधानपरिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधानपरिषद सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राजेंद्र गवई यांच्यासह विधानपरिषद सदस्य, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, परिषद सभागृहामध्ये विचार मांडण्याची मुभा असते. जनतेला न्याय देणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात येतो. महाराष्ट्र सर्व क्षेत्रासोबतच  संसदीय कार्यप्रणालीमध्येही अग्रेसर आहे. ऐतिहासिक वास्तूमध्ये होत असलेला आजचा हा शतक महोत्सवी कार्यक्रमही ऐतिहासिकच ठरणार आहे. राज्याची संसदीय परंपरा ही वैभवशाली असून जगाने गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे संसदीय परंपरा समृद्ध करणारे असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करुया. विदर्भातील जनतेला या अधिवेशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करूया. सर्वांनीच हे अधिवेशन गांभीर्याने घ्यावे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही आमची भावना आहे. विदर्भाला जोडणारे माध्यम हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धता असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राज्याला महर्षी कर्वे, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची ही परंपरा जपण्याचे काम विधान परिषदेच्या माध्यमातून होत आहे. विधान परिषदेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

विधानपरिषदेचे महत्व सांगताना विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार म्हणाले की, परिषदेमुळे शिक्षक, पदवीधर, लेखक, कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडूंना प्रतिनिधित्व मिळाले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमास शुभेच्छा देताना या अधिवेशनाचे सर्वांनाच कुतुहल असल्याचे सांगितले.

चर्चासत्रामध्ये नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसेच विधानपरिषद सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व सदस्यांना मुख्यमंत्री श्री शिंदे व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू -इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

नागपूर, दि. 8 : राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण 977 खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी 225 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण 2 लाख 23 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकविण्यासाठी 282 पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य विकास ठाकरे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत मंत्री श्री. सावे म्हणाले की, सर्व आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात येतील. येत्या जानेवारी पर्यंत राज्यात 52 वसतिगृहे सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरात भाडे अधिक असल्याने ते वाढवून मिळण्यास शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ती मान्य झाल्यानंतर या शहरांमध्ये देखील उर्वरित शाळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 600 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता 50 वरून 75 इतकी वाढविण्यात आली असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.

राजधानीत संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

नवी दिल्ली, दि. 8 :  : संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी  करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार व डॉ. प्रतिमा गेडाम उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थ‍ितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी खासदार श्री. तडस यांनी संत जगनाडे महाराजांबद्दल आपले विचार मांडले. ते म्हणाले की, संत जगनाडे महाराज हे एक महान संत होते. त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देतात .

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक(माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी  संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार प्रशासकीय स्तरावर प्रदान

नागपूर, दि. 8 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर करण्यात आले. राज्य शासनाकडील अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान केल्यामुळे अपील निकाली काढण्यातील विलंब टाळला जाणार आहे. त्यामुळे अपिलकर्त्यांचा वेळ देखील वाचणार आहे.

विधेयक मांडताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, चिटफंड अधिनियम, 1982 च्या माध्यमातून शासनामार्फत सर्व चिटफंडांचे नियमन केले जाते. या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडले आहे. सध्या वित्त मंत्र्यांकडे अपिलाचे अधिकार आहेत. वित्तमंत्र्यांकडील कामाच्या व्यापामुळे त्यांना अपिलांचे कामकाज चालविण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अपिलाचे अधिकार राज्य कर उपायुक्त दर्जाचा अधिकारी असलेल्या सहनिबंधक या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, चिटफंड चालवताना काही वेळा वाद निर्माण होतात. त्यावेळी चिटफंड चालवणाऱ्या कंपन्या कलम 69 नुसार राज्य कर विभागातील चिटस् सहनिबंधकांकडे दाद मागतात. चिटस् सहनिबंधकांच्या निर्णयाने जर समाधान झाले नाही तर कलम 70 नुसार त्यांच्या निर्णयाविरुद्ध दोन महिन्यांच्या मुदतीत वित्त मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. या सुधारणेमुळे हे अधिकार खालच्या स्तरावर म्हणजेच सहनिबंधकांकडे राहणार असून त्यामुळे अपील निकाली काढण्याची प्रक्रिया वेगाने पार पडण्यास मदत होणार आहे.

ऑनलाईन गेमिंग संदर्भात करचोरी करण्याच्या गेमचालकांच्या वृत्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या विधेयकामुळे पायबंद बसणार

नागपूर, दि. 8 :- जीएसटी कायद्यातील ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची (अश्वशर्यती) व्याख्या तसेच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेले जीएसटी सुधारणा विधेयक आज मंजूर करण्यात आले.

जीएसटी सुधारणा विधेयक सभागृहात मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटी लागू झाल्यानंतर कराच्यासंदर्भातील निर्णय जीएसटी कौन्सिलकडून घेतला जातो. त्यानुसार राज्यांना अधिनियमात सुधारणा करावी लागते. ऑनलाईन गेमिंग आणि घोड्यांच्या शर्यती (अश्वशर्यती) याबाबतीत आणि इतर काही छोट्या कलमांमध्ये अधिक व्यापकता आणण्याची गरज होती.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अलीकडेच 18 ऑगस्ट, 2023 ला केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017 मध्ये उपसमितीच्या शिफारशीनुसार दुरुस्त्या केल्या. आता केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा यात समानता आणण्याची गरज होती.  त्यामुळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात आपण सुधारणा करीत आहोत. ही सुधारणा तातडीने करण्याची गरज होती.  पण त्यावेळी अधिवेशन सुरु नव्हते.  त्यामुळे सरकारने अध्यादेश काढला. (दि.26 सप्टेंबर, 2023 – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा अध्यादेश, 2023). आता या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी आपण हे विधेयक आणलेले आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या जीएसटी सुधारणा विधेयकाची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाइन गेमींगच्या संदर्भात पळवाटा शोधून कमी कर भरण्याची वृत्ती या गेमचालकांची होती. त्याला पायबंद घालण्यासाठी  ऑनलाइन गेम ‘कौशल्याचे गेम’ (गेम ऑफ स्किल) असल्यामुळे आकारलेल्या शुल्कावर 18 टक्केच कर ते भरत होते. हे सर्व गेम 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्याची आवश्यकता होती. त्यामुळे यासंदर्भात नियुक्त अभ्यास समितीने हे खेळ “गेम ऑफ स्किल” नसून “गेम ऑफ चान्स” आहेत, असा निष्कर्ष काढला.

यासंदर्भातील उपसमितीने एकूण टर्नओव्हरच्या रकमेवर 28 टक्के कर आकारण्याची शिफारस जीएसटी कौन्सिलला केली होती.  कौन्सिलनेही ही शिफारस मान्य केली, त्यानंतर  मागच्या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याप्रमाणे कायदा दुरुस्ती मंजूर केली. आज आपल्या राज्याच्या कायद्यात बदल करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे.

सरकारने ७ लाख कोटींचे कर्ज जनतेवर लादले पण शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का ? – नाना पटोले.

सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार नसेल तर चर्चेत रस नाही.

दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने.

नागपूर, दि. ८ डिसेंबर
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटाला तोंड देत असताना राज्य सरकारची भूमिका मात्र वेळकाढूपणाची दिसत आहे. शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची परिस्थिती आली आहे. सरकार फक्त भरपूर दिले भरपूर दिले अशा घोषणा करते पण शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. सरकार सभागृहात चर्चा करण्यास तयार आहे तर मग चर्चा का घेत नाही. सभागृहात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा होणार नसेल तर आम्हाला चर्चेत रस नाही. राज्यावर ७ लाख कोटी रुपयांचे कर्ज लादले ते कर्ज शेतकऱ्यांकडूनच वसूल करणार मग शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधानसभेतील चर्चेत शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले म्हणाले की, शेतकऱी प्रश्नांवर सभागृहात आजच चर्चा करा केली पाहिजे. आम्ही शेतकरी, जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी येथे आलो आहोत, गोंधळ घालायला आलो नाही, आम्हालाही गोंधळ घालून कामकाज बंद पाडता आले असते पण आम्हाला चर्चा करायची आहे. कापूस, धान, संत्रा, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, दूध उत्पादक शेतकरी कोणीच समाधानी नाही, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यावर आजच चर्चा करा. सरकार चर्चा करण्यास तयार आहे, आम्ही तयार आहोत तर मग वेळ कशाला? सरकारने पावसाळी अधिवेशनात ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजुर केल्या आता पुन्हा ५६ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या आहेत. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना कोट्यवधींचा निधी दिला जातो आणि विरोधी पक्षांच्या आमदारांकडे दुर्लक्ष केले जाते. विरोधी पक्षाचे आमदार या राज्यातील नाहीत का? आम्ही बाहेरच्या राज्यातून आलो आहोत का? असे प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केले.

ऑनलाईन घोटाळे करणाऱ्यांना चाप लावा.
ऑनलाईन फ्रॉड करून लोकांना फसवणाऱ्यांचे पेव फुटले आहे अशा ऍपच्या माध्यमातून लोकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत आहे. पोलिसानेच अशा एका ऍपमध्ये पैसे गुंतवले होते हे उघड झाले आहे. पोलीसाला माहिती नव्हते असे नाही पण पोलीस प्रशासनातील लोकही यात फसले गेले आहेत. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत त्याला आळा घालणारी व्यवस्था असली पाहिजे, अशा प्रवृत्तींवर सरकारचा धाक असला पाहिजे, असा प्रश्न आज नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांनी सभागृहाच्या पायऱ्यावर आंदोलन करून शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी आणि शेतमालाला योग्य भाव द्यावा या मागण्यांसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली.