नागपूर, दि. 8: राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून त्यात हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव असणार आहे. राज्याच्या हवाई वाहतुकीसाठी ही एक नवी सुरुवात असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
भारतातील हेलिकॉप्टरच्या देखभाल, दुरुस्ती व तपासणीसाठी (एमआरओ) एअरबस हेलिकॉप्टर्स आणि इंडामेर यांच्यात झालेल्या करारानुसार मिहान येथील एमआरओ केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.
जगात हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा, पर्यटन, कायदा व सुव्यवस्था या बाबींसाठी होत आहे. राज्याच्या नवीन वाहतूक धोरणात एमआरओ, विमानतळांच्या धर्तीवर हेलिपॅडची निर्मिती या बाबींचा अंतर्भाव राहील. देशात हवाई वाहतूक क्षेत्राची लक्षणीय वाढ होत असून याचा राज्याला लाभ होण्याची गरज यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.
खासदार प्रफुल्ल पटेल, एअरबस हेलिकॉप्टरच्या ग्राहक सहाय्य सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप, इंडामेर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय पटेल, एअरबस भारत व दक्षिण आशियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलार्ड आणि एअरबस भारत व दक्षिण आशियाच्या हेलिकॉप्टर विभागाचे प्रमुख सनी गुगलानी आदी यावेळी उपस्थित होते.