Home Blog Page 1338

तळवडे एमआयडीसीत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून विचारपूस,पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुणे, दि. ८ : तळवडे एमआयडीसी येथील कारखान्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपुस केली.सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुजित दिव्हारे, डॉ. हरीश टाटीया आदी उपस्थित होते.

ससून रुग्णालयात शिल्पा राठोड (वय-३१), प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्ष), अपेक्षा तोरणे (वय २६ वर्ष), कविता राठोड (वय ४५ वर्ष), रेणुका ताथोड, (वय-२० -वर्ष), शरद सुतार (वय-४५ वर्ष), कोमल चौरे (वय-२५ वर्ष), सुमन (४० वर्ष), उषा पाडवे (४० वर्ष) आणि प्रियंका यादव (३२ वर्ष) असे १० रुग्ण दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.

दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे.त्यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे त्यात म्हटले आहे कि,’पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार सुरु असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी प्रार्थना करतो.या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्ण उपाययोजना केल्या जातील.

फडणवीस यांच्या पाठीशी भाजपा!

•देशहिताच्या मुद्द्यावर महायुतीत तडजोड नाही
• भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

नागपूर : आमदार नवाब मलिक यांच्यासंदर्भात जनतेला अपेक्षित भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून मांडली असून,मलिक यांच्यावर देशद्रोह्यांना समर्थन केल्याचा आरोप आहे त्या विरोधातील ती भूमिका आहे. त्याचा वैयक्तिक राजकारणाशी काहीही संबंध नाही. भाजपाचे संपूर्ण कॅडर फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे’, असे ठाम मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

श्री बावनकुळे म्हणाले, देशद्रोहासंदर्भात न्यायालयाने मलिक यांच्यासंदर्भातील घेतलेली भूमिका पाहता हे पत्र जाहीरपणे समोर आले. सध्या ते वैद्यकीय जामीनावर असले तरी ते पूर्णत: आरोपमुक्त झालेले नाहीत. त्यांना आरोपमुक्त केले तर त्यांना सत्तेत घेण्यास भाजपाचा विरोध असणार नाही. देशहिताच्या मुद्द्यावर महायुतीत तडजोड करणार नाही. अजित पवार प्रगल्भ नेते आहेत. ते फडणवीस आणि १४ कोटी जनतेच्या भावनांचा आदर करतील, अशी अपेक्षा आहे.’

• आमचे लक्ष्य ५१ टक्के जागा
शिंदे गटाने ठाण्यात काही जागावर दावा ठोकला आहे, याबाबत बावनकुळे म्हणाले,‘जो पक्ष यापूर्वी ज्या जागेवरून जिंकला आहे ती जागा त्यांचीच आहे. पण, त्याशिवाय कोण कुठून लढणार याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. भाजप आणि इतर सर्व सहकारी पक्ष मिळून तयार झालेल्या महायुतीचे लक्ष्य ५१ टक्के जागा जिंकण्याचे आहे. त्यामध्ये आमची गरज पडल्यास आम्ही सहयोगी पक्षांना मदत करू. जिथे आम्हाला सहयोगी पक्षांची मदत लागेल तिथे ते करतील. अद्याप कुठल्याही स्वरूपाचे जागावाटप झालेले नाही.’

• कांदा निर्यातबंदीवर लवकरच निर्णय
कांदा निर्यातबंदी संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. ते सकारात्मक आहेत. लवकरच या मुद्द्यावर तोडगा निघेल, असे सुतोवाचही बावनकुळे यांनी केले.

अग्निप्रतिबंधक यंत्रांची सुस्थिती पाहणी करण्यासाठी भरारी पथक- उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर,दि.8 : मुंबईसह राज्यातील शहरांतील इमारतीच्या अग्निप्रतिबंधक यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानपरिषदेत महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक जीव संरक्षण उपाययोजना अधिनियमानुसार, इमारतींचे मालक भोगवटादार गृहनिर्माण संस्थांनी इमारतीचे फायर ऑडिट परवाना अग्निशामक यंत्रणेमार्फत करून घेण्यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मुंबई अग्निशमन दलामार्फत उत्तुंग इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी या इमारतीस सशर्त देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता केल्याबाबत अग्निसुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाते. त्यानुसार त्याबाबतचा अहवाल ऑनलाईन पध्दतीमध्ये जतन करुन त्याबाबतचे अभिप्राय संबंधितांना पाठविले जात असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी मुंबई अग्निशमन दलामार्फत एकूण 6 हजार 975 अग्निस्वयंसेवकांना तसेच 2 हजार 50 अग्निरक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘आहार’ या संघटनेकरिता उपहारगृहातील 381 कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयातील व 5 मुख्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना अग्निसुरक्षेबाबत प्रशिक्षण व प्रात्याक्षिके दाखविण्यात आलेली आहेत. मुंबईतील 69 मॉल्सची तपासणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुंबईतील जनतेच्या जनजागृतीकरिता दिनांक 14 एप्रिल ते 20 एप्रिल असा अग्निसुरक्षा सप्ताह तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत वेगवेगळे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम राबविण्यात आला आहेत. मुंबईतील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्राच्या भेटीदरम्यान अग्निसुरक्षेबाबतची माहिती दिली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सदस्य सचिन अहीर, जयंत पाटील, प्रवीण दरेकर, अनिल परब यांनी चर्चेत सहभाग घेतला.

संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि.8 : राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अनिकेत तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांनी पकडल्याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याविषयी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ड्रग्जविषयी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. इतर राज्यातील यंत्रणेसोबत राज्यातील पोलीस समन्वयाने कार्यवाही करीत आहेत. राज्यात ड्रग्ज विरोधात कडक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सदस्यांनी केलेल्या सूचनांचाही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अहंकाराचा वारा न लागो अंगी: हभप दीपक महाराज खरात यांचे विचार

जागतिक सहिष्णुता सप्ताहातील द्वितिय पुष्प

पुणे, दि.८ डिसेंबर :” ईश्वर चरणी लीन होतांना अहंकार व मी पणाचा त्याग करावा. या दोन्ही गोष्टींमुळे प्रेम, माया, ममता आणि जिव्हाळा संपतो. भक्तीच्या वाटेवर चालतांना वारकर्‍यांनी अहंकाराचा वारा न लागो अंगी याचे अंगीकरण केल्यास ज्ञानेश्वर माऊलीचा आशीर्वाद लाभतो.”असे विचार संत गोरोबाकाका संस्थानचे वाड्ःमय प्रचारक ह.भ.प. दीपक महाराज खरात यांनी द्वितीय पुष्प गुंफतांना व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच सौ. उषा विश्वनाथ कराड, प्रा.स्वाती कराड चाटे, योगगुरू मारुती पाडेकर गुरूजी, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व विष्णू भिसे उपस्थित होते.
ह.भ.प. दीपक महाराज खरात म्हणाले,”अहंकार हा माणसाचा मोठा शूत्रू. प्रत्येक व्यक्तीमध्ये अहंकार असतो. कुणाला कर्तृत्वाचा, रुपाचा, ज्ञानाचा तर कुणाला पदाचा व सत्तेचा अहंकार असतो. अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. त्यामुळे भक्तीत लीन होतांना ईश्वरा ऐवजी स्वतःवर अधिक लक्ष केंद्रीत असते. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे वारकर्‍यांनी नम्रता अंगी बाणावी. सर्वांचा आदर सन्मान करावा तेव्हाच आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो.”
त्यानंतर भागवताचार्य बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगांवकर यांचे कीर्तन झाले. तसेच विश्वशांती संगीत कला अकादमी, येथील शिक्षक व विद्यार्थी यांचा विश्वशांती दर्शन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला.
यावेळी डॉ. विश्वनाथ कराड यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक यांचा विशेष सत्कार केला. या स्वयंसेवकांनी वारकर्‍यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

डबल डेकर नको, मिनी बस घ्या – सनी निम्हण यांची मागणी

पुणे, ता. ८ – पीएमपी साठी वातानुकूलित ई डबल डेकर बस खरेदी करण्याची योजना ही धोरणात्मक चूक ठरणार असून, त्या ऐवजी मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांना पूरक ठरणाऱ्या मिनी बसगाड्या खरेदी कराव्यात , अशी मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी आज केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , यांच्याकडे त्यांनी याबाबतचे निवेदन पाठविले आहे. पीएमपी प्रशासनाने या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी सूचना त्यांनी पीएमपीचे अध्यक्ष संजय कोलते यांना केली आहे.
निम्हण म्हणाले, पुण्यात तीन मार्गावर सुमारे 56 किलोमीटर अंतरावर मेट्रो रेल्वे सुरू होत असून, त्याचा विस्तार होणार आहे . पुण्यात दोन्ही महापालिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे जाळे विणले आहे. मेट्रोचे पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग यामधून डबल डेकर धावण्यासाठी लांब पल्ल्याचे मार्ग उपलब्ध होणार नाहीत. मेट्रोच्या पुलामुळे मुठा नदीवरील पुलावरून डबल डेकर बस जाऊ शकणार नाही. सोलापूर रस्ता, सिंहगड रस्ता , सातारा रस्ता, कर्वे रस्ता येथे उड्डाणपुणामुळे डबल डेकरला जाता येणार नाही. त्या मार्गावर मेट्रोचाही प्रस्ताव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा मधून ती धाऊ शकणार नाही. तशीच परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरात आहे.

निम्हण म्हणाले, डबल डेकर बस सेवा निरुपयोगी ठरते आहे असे लक्षात आल्याने तीन दशकांपूर्वी तत्कालीन पीएमटी प्रशासनाने डबल डेकर बस सेवा बंद केली. त्यानंतर शहरात उड्डाणपूलाचे जाळे झाल्याने या गाड्या आता धावू शकणार नाहीत . दुसरी बाब म्हणजे बीआरटी बस सेवा सुरू करताना दहा वातानुकूलित गाड्या घेतल्या होत्या . मात्र आर्थिक दृष्ट्या त्या चालविणे परवडत नसल्याने त्या बंद केल्या. शेवटी त्या भंगारात विकावे लागल्या. ३३ कोटी खर्च करुन सात आठ वर्षांपूर्वी तयार केलेला नगर रस्त्यावरील बी.आर.टी. मार्ग पुन्हा काढायचे काम म.न.पा ने हाथी घेतले आहे.
निम्हण पुढे म्हणाले, सुमारे 70 ते 80 कोटी रुपये खर्चून 20 डबल डेकर बस खरेदी करण्याऐवजी तेवढ्याच किमतीत सुमारे 100 मिनी बस गाड्या खरेदी करता येतील . मेट्रो स्थानकापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर गर्दीच्या भागात जाण्यासाठी प्रवाशांना त्या उपयुक्त ठरतील. त्यामुळे या प्रस्तावाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून पुणे शहरातील प्रवाशांना उपयुक्त ठरतील अशा गाड्या खरेदी कराव्यात, ही माझी मागणी आहे.

महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अधिक सक्षम करणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 8: महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 हा कायदा आणखी सक्षम करण्यात येईल. कायद्यात करावयाच्या सुधारणांसाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अभ्यास गट नियुक्त करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

पिरकोन (ता. उरण, जि. रायगड) येथे रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची केलेल्या फसवणुकीबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पिरकोन येथील प्रकरणात गुंतवणूकदारांचे 39 कोटी रुपये बुडाले आहेत. या प्रकरणात पोलीस कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने जामीन दिला. मात्र या जामिनाविरुद्ध अपील करून पुन्हा मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. आरोपीकडून 9 कोटी रुपये रोख, बँक खात्यातील दहा कोटी रुपये आणि दीड कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तीन महिन्यात सक्षम प्राधिकारी नियुक्त करून मालमत्तेची विक्री करण्यात येईल आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये रोख रक्कम, बँकेतील रक्कम तर तातडीने देता येईल.

आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून नागरिकांना अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक न करण्याबाबत प्रभावी जाणीव जागृती करून नागरिकांना सजग करण्यात येईल. अशाप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेंतर्गत विशेष अधिकारी नियुक्त करण्याबाबत तपासून कार्यवाही करण्यात येईल. सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेल्या योजनेतच नागरिकांनी पैसे गुंतवावे, असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केले.

अशा प्रकारच्या मोठ्या जाहिरातींबाबत आर्थिक गुन्हे शाखेला सांगून नियंत्रकांकडून नियमांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्यात येईल. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ठेवीदारांचे पैसे देण्याची तरतूद कायद्यात आहे. राज्यात पैसे दुप्पट करून देतो, अधिकचे व्याज देतो असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात येत आहे.  त्यामुळे राज्यात बरेच नागरिक अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात. मात्र काही कालावधीनंतर  योजनेत ठरल्यानुसार गुंतवणुकदारांना रक्कम देण्यात येत नसून आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येते. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवून अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात येईल,असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रशांत ठाकूर, रवींद्र वायकर, नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है। मोदींचं ट्विट चर्चेत

काँग्रेसच्या खासदारावर ‘इन्कम टॅक्स’ची धाड; सापडली 200 कोटींची कॅश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अर्थात ट्विटरवर टाकलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ओडिशा आणि झारखंड येथे प्राप्तीकर विभागाने छापेमारी करून जप्त केलेल्या रोख रकमेचा उल्लेख केला आहे. “देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणे ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या पै-पैचा हिशेब द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे”, अशी पोस्ट टाकून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. प्राप्तीकर विभागाने बुधवारी बौद्ध डिस्टिलरी प्रा. लि. कंपनीवर धाड टाकली, तेव्हापासून जप्त रोकड मोजण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २०० कोटींहून अधिकची रक्कम मोजली असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा २५० कोटींच्या आसपास आहे.प्राप्तीकर विभागाने काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्यातील १० ठिकाणांवर कारवाई केली. ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर २०० कोटींहून अधिकची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ओडिशामध्ये सर्वाधिक रोकड सापडली आहे. ६ डिसेंबरपासून सुरू असलेली कारवाई अद्यापही सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छापेमारी केली असता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना १५० हून अधिक बॅग्स आढळून आल्या आहेत. ज्यामध्ये रोख रक्कम भरलेली आहे. प्राप्तीकर विभागाने छापेमारीच्या ठिकाणी नोटा मोजणारी डझनाहून अधिक यंत्र आणले असून तेही आता कमी पडू लागले आहेत. त्यामुळे रोख रकमेची मोजणी संथगतीने सुरू आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने साहू यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, सदर कारवाईवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी विरोध केला. सूत्रांनी सांगितले की, प्राप्तीकर विभागाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर सदरची कारवाई केली. मद्य वितरक, विक्रेते आणि व्यावसायिक गटांकडून मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा व्यवहार होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती.

मोहिते रेसिंगने फ्रँचायझी संघाचे अधिग्रहण करत सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये केला प्रवेश

पुणे०८ डिसेंबर २०२३ : सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL), भारतातील मोटारस्पोर्ट्सचे संपूर्ण चित्राला नवा पुन्हा आकार देण्यास समर्पित असून आयएसआरएलने नवीन पॉवरहाऊसचे आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. टीम मोहिते रेसिंग ही अभिषेक मोहिते यांच्या उत्साही नेतृत्वात असलेली टीम आहे. यासह लीगने देशातील मोटरस्पोर्टचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. हा संघ कोल्हापुरात राहणार आहे.

मोहिते समूहाला अनेक दशकांचा समृद्ध वारसा आहे. बांधकाम उद्योगातील हा आघाडीचा समूह आहे. धरणे, इमारती, खाणकाम आणि भूकामाच्या बांधकामात विशेषतः असलेला हा समूह आता वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल्स, शिक्षण, जलविद्युत आणि ऊर्जा क्षेत्रातही आहे.

बांधकाम उद्योगाच्या पलीकडेही कंपनी अभिमानाने मोहितेची रेसिंग अॅकॅडमी चालवते. या अॅकॅडमीमध्ये  २००६ पासून भारतातील सर्वात मोठा गो-कार्टिंग ट्रॅक आहे. समाजातील सर्वांना सामावून घेणे, युवा विकास, बोर्डरूमच्या पलीकडे उत्कृष्टतेची संस्कृती वाढवण्याची कंपनीची कटीबद्धता यातून दिसून येते.

मोहिते समूह हा ऊर्जा शाश्वतता, क्रीडा आणि भविष्य-केंद्रित दृष्टी या कटिबद्धतेसह बांधकाम कौशल्य एकत्रित करणारी, गतिशील आणि बहुआयामी संस्था म्हणून उभी आहे.

टीम मोहिते रेसिंगचे अभिषेक मोहिते यांनी या नवीन भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला: “टीम मोहिते रेसिंगसह सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये सहभागी होणे ही माझ्यासाठी एक अतुलनीय गौष्ट असून एक खरा मैलाचा दगड आहे. माझ्यात रेसिंगसाठी जी पॅशन आहे, तशीच पॅशन या स्पर्धेतही दिसून येतेय. या रेसिंग स्पर्धेचा भाग होण्याचा आनंद आगळाच आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही या क्षेत्रातील प्रतिभांवत तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि भारतीय मोटरस्पोर्ट लँडस्केप विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

सुपरक्रॉस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आणि सहसंस्थापक वीर पटेल यांनी मोहिते रेसिंगच्या टीमचे हार्दिक स्वागत केले. अशा प्रतिभावान संघाचे आमच्या लीगमध्ये स्वागत करताना आम्हाला कमालीचा अभिमान वाटतो. त्यांचे मोटरस्पोर्ट्सचे ज्ञान आणि समर्पण भारतातील मोटरस्पोर्ट्स दृश्यात क्रांती घडवून आणण्याच्या आमच्या ध्येयाशी पूर्णपणे जुळते. देशभरातील चाहत्यांसाठी मोटरस्पोर्ट्समध्ये सर्वोत्तम मनोरंजन आणि गुणवत्ता प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे आणि एकत्रितपणे आम्ही हे प्रत्यक्षात आणू.

टीम मोहिते रेसिंगच्या समावेशासह, सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने क्षितिजावर अधिक रोमांचक घोषणांसह पाच संघांची घोषणा केली आहे. ही लीग भारतातील मोटारस्पोर्टचा दर्जा वाढवणार असून, चाहत्यांना आणि सहभागींना सारख्याच आनंददायक अनुभवांनी भरलेल्या हंगामाचे आश्वासन देत आहे.

रायडर नोंदणी, खेळाडू लिलाव आणि आयएसआरएलच्या पहिल्या सत्राच्या शेड्यूल याविषयी अधिक तपशीलांसाठी, कृपया येथे अधिकृत SXI वेबसाइटला भेट द्या https://indiansupercrossleague.com/

सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल: प्रियांक खर्गेच्या विरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन

नागपूर-विरोधकांच्या इंडी आघाडीत काँग्रेससह सामील असणारे उद्धव ठाकरे आणखी किती वेळा गप्प बसणार. त्यांना स्वातंत्र्यवीराचा वारंवार होणारा अपमान मान्य आहे का? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी केलेल्या सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात नागपूर येथे भाजपातर्फे झालेल्या आंदोलनावेळी श्री बावनकुळे माध्यमांशी संवाद साधत होते.

काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले की, भाजपा व महाराष्ट्रातील जनता सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही. प्रियांक खर्गे यांनी त्वरित आपले विधान मागे घ्यावे व जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. उद्धव ठाकरे हे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. मात्र हिंदुत्वाचा हा अपमान होत असताना त्यांनी आपली भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावी. अशावेळी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होत आहे असेही ते म्हणाले.

प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रियांक खर्गे यांचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला.

नागपूर सोबतच मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयासमोर, दादर स्थानका बाहेर, बोरीवली येथील सावरकर उद्यान, ठाणे ,पुणे , सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर , नाशिक, धुळे, अशा अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत खर्गे यांचा तीव्र निषेध केला. काही ठिकाणी प्रियांक खर्गे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याकरीता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. ८: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली असून या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ ते २७ डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्रे स्वीकारले जाणार नाही. याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज १५ डिसेंबरअखेरपर्यंत भरण्याची कार्यवाही करावी, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. ८ :- केंद्र सरकारच्या ‘हर घर, नल से जल’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत सुरू असलेली कामे अभियानस्तरावर पूर्ण करावीत. यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांतील त्रुटी दूर करून सादर कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील जल जीवन मिशनमधील योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसंदर्भातील आढावा घेतला. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सर्वश्री किरण लहामटे, देवेंद्र भुयार, राजू कारेमोरे, इंद्रनील नाईक, मनोहर चंद्रिकापुरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, घरगुती नळ जोडणी करून प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे. या योजनेचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दुरुस्त करून प्रस्ताव सादर करावेत. तसेच त्रुटी ठेवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावित करावी. वित्त, नियोजन आणि पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे आढावा घ्यावा, अशाही सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जय शाह यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा सन्मान

स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने भारतीय क्रिकेटवरील परिवर्तनात्मक प्रभाव अधोरेखित केला

पुणे-अतुलनीय नेतृत्व आणि भारतीय खेळांवरील परिवर्तनात्मक प्रभाव यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे सचिव जय शाह यांना सीआयआय स्पोर्ट्स बिझनेस अवॉर्ड्स २०२३ मध्ये प्रतिष्ठित स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. टाटा स्टीलचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सीआयआय नॅशनल कमिटी व स्पोर्ट्सचे चेयरमन श्री. चाणक्य चौधरी यांनी भारतीय क्रिकेटला अभूतपूर्व उंची गाठून देण्यात श्री जय शाह यांनी निभावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत हा पुरस्कार प्रस्तुत केला. खेळाची उंची वाढवण्याबरोबरीनेच क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवा आकार ज्यामुळे दिला गेला अशा क्रांतिकारी कामगिरीसाठी हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.

श्री जय शाह यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, नुकतीच पार पडलेली आयसीसी मेन्स वर्ल्ड कप स्पर्धा ही आजवरची सर्वाधिक प्रेक्षक लाभलेली विश्व कप स्पर्धा ठरली आहे. यातून श्री शाह यांची धोरणात्मक कौशल्ये आणि संघटनात्मक पराक्रम दिसून येतो. या स्पर्धेला मिळालेल्या उत्तुंग यशाने जगभरातील क्रिकेट रसिकांची मने जिंकली, इतकेच नव्हे तर, जागतिक क्रिकेटिंग पॉवरहाऊस म्हणून भारताचे स्थान देखील मजबूत केले.

श्री शाह यांच्या नेतृत्वाखाली घडून आलेली सर्वात उल्लेखनीय प्रगती म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये वेतन समानता. अनेक अडथळ्यांवर मात करत, ही समानता मिळवून देत, श्री शाह यांनी हे सुनिश्चित केले की पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मोबदला मिळेल. यामुळे भारतीय खेळांच्या क्षेत्रात एक आदर्श बदल झाला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा निष्पक्षतेप्रती बांधिलकी दर्शवतो, इतकेच नव्हे तर सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देऊन, महिला खेळाडूंच्या अफाट प्रतिभा आणि समर्पणाचा सन्मान करतो.

श्री जय शाह यांचा आणखी एक प्रशंसनीय उपक्रम म्हणजे महिला प्रीमियर लीगच्या स्थापनेचे नेतृत्व होय. या क्रांतिकारी स्पर्धेने देशातील सर्वोच्च महिला क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ प्रदान केले आहे. हा उपक्रम केवळ क्रीडा क्षेत्रातील लिंगभेद दूर करत नाही तर क्रिकेटच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टता वाढवण्याची भारताची वचनबद्धता दृढ करतो.

शिवाय, आयसीसी ऑलिम्पिक वर्किंग ग्रुपचे प्रेरणास्थान म्हणून श्री जय शाह यांच्या प्रभावशाली भूमिकेने क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जागतिक स्तरावर या खेळाचा विस्तार करण्याप्रती त्यांची बांधिलकी यामधून दिसून येते. या धोरणात्मक सहभागामुळे  क्रिकेटच्या वृध्दीप्रती श्री शाह यांची वचनबद्धता दर्शवली जात आहे, तसेच जागतिक स्तरावर या खेळाच्या भविष्याला आकार देणारी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून स्थान त्यांना लाभले आहे. 

स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर हा श्री जय शाह यांना प्रदान करण्यात आलेला सन्मान त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, गतिमान दृष्टीकोन आणि भारतीय क्रिकेटला अभूतपूर्व उंचीवर नेण्याप्रती  अटल वचनबद्धता दर्शवतो. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने क्रिकेट विश्वात परिवर्तन घडवून आणण्याबरोबरीनेच जागतिक स्तरावर क्रीडा प्रशासनातील उत्कृष्टतेचा मानदंडही स्थापित केला आहे.

पर्वतीच्या जंगलात ‘त्या’महिलेचा खून झाल्याचे तब्बल सव्वातीन वर्षांनी उघड

पुणे- हातावर सुरेखा नाव गोंदलेले आणि केवळ परकर पोलक्यावर पर्वतीच्या जंगलात आढळून आलेल्या ३० ते ४० वयोगटातील त्या महिलेच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविण्याचे ठरवले असून या महिलेचा मृत्यू अकस्मात नसून मर्डर असल्याचे निष्पन्न झाले आहे. तब्बल सव्वा तीन वर्षानंतर हा खून निष्पन्न झाल्याने तपास करण्यासाठी पोलिसांनी खास यंत्रणा राबविण्याचे ठरविले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे 9823015100 याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. गेल्या १७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी या महिलेचा मृतदेह पर्वती च्या जंगलात पाण्याच्या पडक्या टाकीजवळ आढळून आला होता . तिच्या डोक्यात आणि छातीत कठीण वस्तूने प्रहार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे ,काही कागदपत्रांच्या तपासावरून हा खून उघड झाला आहे, मात्र या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

याबाबत पर्वती पोलिसस्टेशनचे पोलिसनिरीक्षक (गुन्हे) विजय खाेमणे यांनी अज्ञात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती टेकडीच्या जंगलात पोलिसांना 17/8/2020 राेजी पाण्याचे टाकीजवळ अनाेळखी महिलेचा मृतदेह मिळून आलेला हाेता. काेणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन तिच्या डाेक्यात व छातीत कठीण वस्तुने आघात करुन तिला गंभीर जखमी करुन तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आले आहे.

सदर महिलेच्या हातावर ‘सुरेखा’ या नावाने गाेंदवण्यात आलेले आहे. मात्र, तिचा खून नेमका काेणी केला, काेणत्या कारणास्तव केला, तिची खरी ओळख काय आहे याबाबत अद्याप काेणताही खुलासा झालेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अक्समात मयत गुन्हयात सीआरपीसी कलम 174 प्रमाणे चाैकशीत खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे उद्या नागपुरात उद्घाटन

नागपूर, दि.8: राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे उद्या शनिवार (दि.09) रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र’हे ब्रीद समोर ठेवून आयोजित नमो महारोजगार मेळाव्याला सकाळी 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. विदर्भातील बेरोजगारांसाठी महत्त्वाचा असणारा हा महारोजगार मेळावा ‍दि. 9 व 10 डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. जास्तीत जास्त बेरोजगारांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी केले आहे.