Home Blog Page 1337

काँग्रेसचा सोमवारी ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा.

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार.

नागरिकांनी मोठ्या संख्येने हल्लाबोल मोर्चात सहभागी व्हावे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

नागपूर, दि. ९ डिसेंबर..
राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा सोमवारी दिनांक ११ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणार आहे, विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री तथा CWC सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, माजी मंत्री, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही. केवळ शेतकऱ्यांना भरपूर दिले आहे अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री देत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करुन आले पण अजून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. याआधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीकविम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. अपहरण, हत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे NCRB च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे पण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अहवाल कसा वाचायचा, याचे ज्ञान पाजळून मूळ मुद्याला बगल देत आहेत. राज्यात विविध खात्यातील २.५ लाख पदे रिक्त आहेत पण सरकार नोकर भरती करत नाही. लाखो विद्यार्थी नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण सरकार परिक्षाही घेत नाही. सरकारच्या वेळकाढूपणामुळे लाखो मुलांची वयोमर्यादा निघून जात आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, नोकर भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरु करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा सुव्यवस्था सुधारावी अशा विविध मागण्या घेऊन काँग्रेसचे हल्लाबोल मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांचा दाखला देत राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा फडणवीसांना टोला

पुणे :नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला फडणवीसांनी विरोध दर्शवला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्यानं उडी घेत साध्वी प्रज्ञासिंह यांचा दाखला देत थेट देवेंद्र फडणवीस यांना निशाणा बनवलं आहे.नवाब मलिक यांना टार्गेट करणाऱ्या फडणवीसांविरोधात राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका मांडली.

नवाब मलिक यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसले याचाच अर्थ असा की त्यांनी शरद पवारांची नव्हे तर अजित पवारांच्या बाजूनं जाणं स्विकारलं.पण यावरुन सभागृहात विरोधीपक्षानं भाजपला टार्गेट केल्यानंतर फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहित आणि ते ट्विटरवरुन सार्वजनिक करत मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवला आणि सत्तेपेक्षा आमच्यासाठी देशहित महत्वाचं असं म्हटलं. पण त्यांच्या या विधानामुळं त्यांना ट्रोल व्हावं लागलं आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करुन त्यांनी म्हटलं की, भाजपनं साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर आतंकवादाचे आरोप होऊनही त्यांना खासदारकीची उमेदवार दिली. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावर तर देशद्रोह आरोप झाले. पण गुन्हा सिद्ध झालेला नाही ते केवळ आरोप आहेत.आपलं राज्य कायद्यानुसार चालतं आणि चालणार. आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट असं करणं अशोभनीय आहे, अशा शब्दांत ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर सन २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणात आरोपी आहेत. त्यांच्यावर देशविघातक कृत्यांच्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले होते, यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावरील मोक्का देखील हटवण्यात आला. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांना भोपाळमधून भाजपनं लोकसभेसाठी उमेदवारीही दिली. यात त्या निवडून आल्या आणि खासदार बनल्या.

आळंदी यात्रेनिमित्त महावितरणची यंत्रणा सज्ज

वीजपुरवठा व सुरक्षेसाठी विविध कामे पूर्ण

पुणे, दि. ०९ डिसेंबर २०२३आळंदी यात्रा सोहळ्यामध्ये महावितरणकडून २४ तास वीजसेवा देण्यासाठी ३५ अभियंते व जनमित्रांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. तर अखंडित वीजपुरवठा व भाविकांच्या वीजसुरक्षेसाठी विविध उपाययोजनांसह १० ठिकाणी अतिरिक्त् वितरण रोहित्र बसविण्यात आले आहेत. मंगळवार (दि. ५) पासून महावितरणची ही यंत्रणा सज्ज झाली असून बुधवार (दि. १३)पर्यंत विशेष सेवा कायम राहणार आहे.

       आळंदी येथे कार्तिकी एकादशी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमिवर महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सुरळीत वीजपुरवठा व सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच श्री. पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) आळंदी येथे भेट देऊन वीजविषयक कामांची पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र येडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेश भगत, उपकार्यकारी अभियंता श्री. विजय गारगोटे आदींची उपस्थिती होती.

आळंदी यात्रेच्या सोहळ्यापूर्वी महावितरणकडून आळंदी शहर व मंदिर परिसरात विविध १० ठिकाणी २०० एमव्हीएचे अतिरिक्त वितरण रोहित्र बसविण्यात आले. इतर सरकारी यंत्रणेशी समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच दर्शनबारी, इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा रस्ता येथील ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ओव्हरहेड तारांऐवजी एरीयल बंच केबल लावण्यात आली आहे. परिसरातील फिडर पीलर्स सुरक्षित जागी स्थानातंरीत करण्यात आले आहे. यासह संपूर्ण वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीच्या कामांत विविध तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दरम्यान भासा आसखेड धरणातून चाकण एमआयडीसी जलकेंद्राद्वारे आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तात्काळ पर्यायी उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

आळंदी यात्रेसाठी २४ तास वीजपुरवठा व ग्राहकसेवा देण्यासाठी वरिष्ठ अभियंत्यांसह सहायक अभियंता संदीप पाटील, संदीप कुऱ्हाडे, अविनाश सावंत, मंगेश सोनवणे, नितीन माटे, विजय पाटील, सुरेश माने, मदन मुळुक यांची आणि २५ जनमित्रांची विविध ठिकाणी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी

मुंबई, दि 9:-  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबईच्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची  कौतुकाची थाप सफाई कर्मचा-यांना देत  त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि.3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, स्वच्छ्ता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे  परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते. स्वच्छता अभियान ही आता एक लोकसहभाग लाभलेली लोकप्रिय चळवळ झाली आहे. लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. धारावी सारख्या  झोपडपट्टीतील भागातही ही स्वच्छतेची कामे प्रभावीपणे होत आहेत. यामध्ये रस्ते,नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे.बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

इस्कॉन मंदिरात मुख्यमंत्र्यांचा भाविकांशी संवाद

इस्कॉन मंदीर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांची ग्रंथतुला करुन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले महाराष्ट्रात इस्कॉनचे 39 तर मुंबईमध्ये जवळपास चार सेंटर असून 897 मंदिराचे व्यवस्थापन तसेच सामाजिक उपक्रम इस्कॉनद्वारे राबवले जातात. शाळा व रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थी व रुग्णांना मदत करण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाय योजना,  समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवेची  प्रेरणादायी ऊर्जा देण्याचे काम इस्कॉन करीत आहे. मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27 हजार  विद्यार्थ्यांना तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23 हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याचं कामही केले जाते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशाला एका उंचीवर नेण्याचे काम केले. महासत्तेकडे नेण्याचं काम केले. ख-या अर्थाने देशाचा मान जगभरामध्ये वाढवला. म्हणूनच  या देशाची,राज्याची  आणि या जगाची सेवा करण्यात आपले योगदान अपेक्षित आहे.

स्वच्छतेसाठी मुंबई महापालिका कर्मचारी किंवा अधिकारी एवढ्यापुरती ही चळवळ आपण मर्यादित ठेवायची नाही. स्वच्छतेची चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशा प्रकारचे काम आपल्याला लक्ष देऊन करायचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रमाई नगरात लोटला जनसागर 

संपूर्ण स्वच्छता मोहीमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरमधील रमाई नगर येथे स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केल्यानंतर परिसरातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्ता क्र. 1 ची स्वच्छता करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याचे

 कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.  मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाही, तर  रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते,  गटार,  नाल्या सार्वजनिक शौचालये  स्वच्छ होत आहेत. झोपडपट्टी सुधार योजनेचा  देखील यात समावेश केला असल्याचे श्री शिंदे यावेळी म्हणाले.

शहाजी राजे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे कौतुक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत विलेपार्ले (पूर्व) येथील नेहरू मार्गाच्या स्वच्छतेची पाहणी करुन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन  शहाजी राजे विद्यालयातील  विद्यार्थ्याँशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल सोसायटीमध्ये आयोजित स्वच्छता जनजागृती रॅलीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूलाची पाहणी

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पाहणी केली.  या पूलाचा पहिला गर्डर नुकताच टाकण्यात आला आहे. या पुलाची पहिली मार्गिका सुरु करण्याच्या दृष्टीने ठरलेल्या वेळेत सगळी कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिले.

०००००

बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा ‘झिम्मा २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय !

चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस ‘झिम्मा २’बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर ‘झिम्मा २’ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण ‘झिम्मा’ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय ‘झिम्मा २’ सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही ‘झिम्मा २’ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत ‘झिम्मा २’ स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.”

झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक!

भ्रष्टाचारमुक्त भारताची ‘मोदी की गॅरंटी’- भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी

पुणे, 9 डिसेंबर- भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली दोनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे, तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा घणाघाती दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. माधव भांडारी यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

झारखंडमध्ये काँग्रेसच्या एका संसद सदस्याच्या घरात ही कोट्यवधींची रोकड सापडली, तर या हिशेबाने काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरी आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या गांधी कुटुंबाकडे किती संपत्ती असेल याचा हिशेब जनतेने करावा असेही ते म्हणाले. या हिशएबानुसार, गांधी परिवार हा जगातील सर्वात भ्रष्ट परिवार ठरेल, असा आरोपही त्यांनी केला. जेथे जेथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचा आहे, तेथे तेथे भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे, आणि जेथे भाजप आहे, तेथे स्वच्छ कारभाराची गॅरंटी आहे, असेही श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांना जेथे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण मिळते, ते केंद्रस्थान आता देशाला माहीत झाले आहेच, तर त्याचे नाव गांधी करप्शन सेंटर असे ठेवावे, असा उपरोधिक सल्लाही श्री. भांडारी यांनी दिला. या परिवाराकडूनच काँग्रेसींना भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण दिले जाते का, असा सवालही त्यांनी केला. या सेंट्रमधून प्रशिक्षण घेतलेल्यांच्या काळ्या कमाईचा नेमका किती हिस्सा गांधी परिवाराकडे जातो त्याचा हिशेब द्या, अशी मागणी करून ते म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याची गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारने आता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्याखेरीज स्वस्थ बसू नये. काँग्रेसच्या एका खासदाराकडे कपाटे ओसंडू वाहतील एवढा काळा पैसा असून ज्यांच्या कृपेने हे नेते बनले त्या गरीब जनतेचे डोळे या संपत्तीने दिपून गेले असतील.

भ्रष्टाचाराचे भांडे फुटू लागल्यामुळेच सारे भ्रष्ट नेते इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आले असून एकएक प्रकरण बाहेर पडू लागल्यामुळे आता ईडी, सीबीआय, आयटीसारख्या संस्थांच्या नावाने सामूहिक रडगाणे सुरू झाले आहे. झारखंडमधील सत्तारूढ पक्षाच्या एका खासदाराचा हा घोटाळा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या डोळ्यादेखत उघडकीस आल्याने आता त्यांना क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या सत्तेला खडे बोल सुनावले. इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या सर्वांचा इतिहास भ्रष्टाचाराचाच आहे. बेंगलुरूमध्ये काँग्रेसच्या एका निकटवर्तीच्याच घरी ४२ कोटींचे घबाड सापडले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील पार्थ चटर्जी यांच्या घरात ५० कोटींची रोकड व कोट्यवधींचे सोने सापडले होते, तर अरविंद केजरीवाल यांचा इमानदार साथीदार सत्येंद्र जैन याच्याकडेही सोन्याची नाणी व कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्यावर केजरीवाल यांनी मौन धारण करून भ्रष्टाचार लपविण्याची धडपड चालविली आहे, असे ते म्हणाले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर असताना उघडकीस आलेल्या महादेव ऑनलाईन जुगारातील हप्तेखओरी प्रकरणात खुद्द मुख्यमंत्र्यांचेच हात बरबटले होते, म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवून मोदींच्या गॅरंटीवर गाढ विश्वास व्यक्त केला, असे श्री. … म्हणाले. काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांच्याठगबंधन सरकारने मनरेगामध्ये साडोपाचशे कोटी, कोळसा खाणींच्या व्यवहारात दीड हजार कोटी, अवैध खाण उत्खननातून दीड हजार कोटी, ग्रामीण विकास निधीतून दीड हजार कोटी, जमीन घोटाळ्यातून तीन हजार कोटींच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदी की गॅरंटी ही केवळ निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या मोदी सरकारच्या गॅरंटीने कांग्रेसच्या भ्रष्ट कारभाराच्या मुळावर घाव घालण्यास सुरवात केली असून इंडिया आघाडीतील एकामागोमाग एक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या काळ्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर द्यावाच लागणार आहे असा विश्वासही श्री. भांडारी यांनी व्यक्त केला.

‘क्रेडाई अमरावती ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

अमरावतीदि. 9 :  क्रेडाई अमरावतीमार्फत जिल्ह्यात ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ चे आयोजन करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्सपोला आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी प्रलंबित असलेली कामे नागपूर अधिवेशन कालावधीत मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.

सायन्स स्कोर मैदान येथे ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ ला सुरुवात झाली असून ते दि. 11 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.  आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष निलेश ठाकरे, उपाध्यक्ष कपिल आडे, सचिव रवींद्र गोरटे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्यात अनेक प्रकल्प सुरु असून गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन स्वस्त व चांगल्या दर्जाच्या सुविधायुक्त घरे  ग्राहकांना  उपलब्ध करुन द्यावीत. बांधकाम व्यावसायिकांसाठी शासनामार्फत अनेक योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.  जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेवून अधिवेशन संपण्यापूर्वी ते मार्गी लावू. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली ‘गटार योजना’ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देवू. तसेच जिल्ह्यातील डिपीआर संदर्भातील समस्या, घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेवून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वस्त केले.

अमरावतीचा विस्तार वेगाने होत असल्याने या ठिकाणी मुलभूत सुविधेसोबतच विमान सेवा असणे आवश्यक आहे. बेलोरा विमानतळ सुरु होण्यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावून नाईट लँडींग व इतर सुविधा तयार करुन विमानसेवा लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही ते यावेळी म्हणाले. रेरा संदर्भातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेवून त्यावर मार्ग काढण्यात येईल.  जिल्ह्यातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेवून अधिवेशन कालावधीत बैठक घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही  श्री. पवार यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये लावण्यात आलेल्या स्टॉल्सला श्री. पवार यांनी भेटी देऊन  ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी जाणून घेतले. ग्राहकांच्या स्वप्नातील घर तयार करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

आमदार प्रविण पोटे पाटील व आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्यातील गटार योजना, डिपीआर, बेलोरा विमानतळ, घर व इमारतीवरील कर अशा विविध समस्याबाबत माहिती देऊन त्या मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना केली.

ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पोचा शुभारंभ दि. 8 डिसेंबर रोजी झाला. हा एक्सपो 11 डिसेंबरपर्यंत चालणार असून सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या एक्सपामध्ये 60 पेक्षा अधिक स्टॅाल्स ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये प्लॉटपासून ते बांधकाम साहित्य, बंगला, रो-हाऊस, फ्लॅट, दुकाने व गृह कर्ज देणाऱ्या बँक यांचा समावेश आहे. या एक्सपोच्या माध्यमातून बांधकाम संदर्भातील नवीन तंत्रज्ञान व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उडचलो बनली ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅव्हल बुकिंगवर कॅश ऑन डिलिव्हरी सेवा ऑफर करणारी पहिली ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी

पुणे०९ डिसेंबर २०२३ : उडचलो ही राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार विजेती आणि आघाडीची ऑनलाइन ट्रॅव्हल फर्म असून, या फर्मने पुण्यातील ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानस्नेही नसलेल्या ग्राहकांसाठी प्रवास बुकिंगसाठी ‘कॅश-ऑन-डिलिव्हरी’ (COD) सेवा सुरू केली आहे. पुण्यातील ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी (OTA) क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास नियोजन आणि पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, त्यांना प्रवास बुक करण्याचा अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. अलीकडेच उडचलोने (udChalo) आपली सेवा गैर-संरक्षण कर्मचार्‍यांसाठीही सुरू केली आहे.

उडचलोची वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे केलेल्या सर्व प्रवास बुकिंगसाठी COD सेवा उपलब्ध असेल. ही सेवा फ्लाइट्स आणि व्हेकेशन्ससाठीही असेल. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक आता चेकआऊटवर COD पर्याय निवडू शकतात आणि त्यांच्या दारात तिकीट वितरण केल्यावर त्यांच्या बुकिंगसाठी रोख रक्कम देऊ शकतात. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक परिचित, सुरक्षित आणि आरामदायी पेमेंट पद्धत उपलब्ध करून ऑनलाइन पेमेंट किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज राहात नाही. शिवाय, ही सेवा लष्कराच्या दिग्गजांकडून पाहिलीजी केली जाईल. यासाठी देशभरातील माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळ निवृत्त झालेल्या लष्करी जवानांसाठी पुन्हा रोजगार निर्माण करण्यास मदत होईल.

उडचलोचे सीईओ श्री रवि कुमार म्हणाले की“विशेषतः   पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅश-ऑन-डिलिव्हरी सेवा देणारे पहिले OTA प्लॅटफॉर्म असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ऑनलाइन प्रवास बुकिंग आणि पेमेंटच्या बाबतीत ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याची आम्हाला जाणीव आहे. फसवणूकीला लष्करातील दिग्गज बळी पडल्याच्या वारंवार घटना घडलेल्या आहेत. या उपक्रमाचा उद्देश प्रवेशयोग्यता, सुरक्षितता आणि सुविधा वाढवणे आहे. त्यांना सहजतेने त्यांच्या सहली बुक करण्यास सक्षम करणे आणि विश्वास निर्माण करणे ही या उपक्रमामागील भावना आहे.”

अपवादात्मक सेवा आणि सोयीसाठी उडचलोची वचनबद्धता त्याच्या सर्व ग्राहकांसाठी आहे आणि ही नाविन्यपूर्ण सेवा त्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. या उपक्रमांतर्गत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत बुकिंग करता येईल. या उपक्रमाची क्षमता ओळखून आणि ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून, उडचलोने लवकरच COD सेवा भारताच्या इतर भागांमध्ये विस्तारित करण्याची योजना आखली आहे. यामुळे देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास सुलभ आणि आनंददायी होईल.

नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळणार:बाळासाहेब थारोत यांचा दावा

पुणे-राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल आणि तो महाविकास आघाडीचाच असेल, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. येत्या नवीन वर्षात राज्यात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. त्यात राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान बाळासाहेब थारेात पुढे बोलताना म्हणाले की, भाजपची राजकारण करण्याची एक पद्धत आहे. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करतात. विरोधकांवर कारवाया होतात, पण भाजपमध्ये गेल्यावर कारवाया होत नाहीत. नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून तसे कळवले होते. त्यावरही थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांच्यासंदर्भात पत्र लिहिण्याची गरज काय होती? दोघेही नेते एकत्र असतात. सभागृहातही एकाच ठिकाणी बसतात. बैठकांमध्येही एकत्र असतात, मग पत्र लिहिण्याची गरज काय असा सवाल थारोतांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर बाबींवर मी बोलणे योग्य होणार नाही. मात्र, जो वेळ लागतोय तो योग्य नाही. इतका वेळ का लागतोय याबाबत गावातील एखाद्या मुलालाही विचारले तरी तो कारण सांगेल, असा टोला त्यांनी लगावला.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मात्र, अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. त्या तिघांमध्ये आपांपसात वाद सुरू आहे. त्यांचे जनतेकडे लक्ष नाही. राज्यात अनेक पदे रिक्त आहेत. नोकरभरती होत नाही. भरती करायला गेले तर घोटाळे होतात. पेपरफुटी होते. सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती राज्यात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

लोकायतद्वारे मतदार नाव नोंदणी बाबत जनजागृती

पुणे (प्रतिनिधी): पर्वती, शिवाजीनगर मधील विविध वस्त्यांमध्ये लोकायत संघटनेद्वारे मतदार नाव नोंदणी बाबत जनजागृती करण्यात आली. हातावर पोट असलेल्या कष्टकरी घटक ज्यात रिक्षाचालक, पथारी, टेम्पोचालक, घरकाम करणाऱ्या महिला यांना आपलं नाव मतदार यादीत कस शोधायचं? जर मतदार यादीत नाव नसेल तर काय करावं लागत याबाबत माहिती देण्यात आली.
उपक्रमाचे समन्वयक ऋषिकेश येवलेकर यांनी सांगितले की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे.  या दरम्यान जाणवलं की  वस्ती पातळीवर नागरिकांच्या नाव नोंदणी दरम्यान पत्ता बदलणे, जन्म तारीख बदलणे, नावाची स्पेलिंग चुकलेली असणे अशा अडचणी  आहेत पण ते कसे बदलावे याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नव्हती त्यामुळे निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाईन ॲप द्वारे जनजागृती करण्यात आली. जवळपास प्रत्येकाच्या घरात एखादा तरी स्मार्ट फोन असतो घरबसल्या मोबाईल वरच मतदार नाव नोंदणी सहजपणे होऊ शकते तसेच लोकशाहीत प्रत्येकाला मतदान देण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येकाला आहे त्याचा वापर सर्वानी केला पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाईन ॲप कस वापरावं याबाबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्यात आले होते त्यामुळे नागरिकांनी अँपद्वारे अडचणी सोडावं सोप गेलं जवळपास ३५० पेक्षा अधिक नागरिकांना याचा लाभ झाला

‘मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील स्थित्यंतरे ‘विषयावरील व्याख्यानास प्रतिसाद

आयएमए च्या वार्षिक परिषदेत आयोजन

पुणे :

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ३३ व्या वार्षिक अधिवेशनात ‘मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील स्थित्यंतरे ‘ या विषयावर ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.डॉ.नीतू मांडके यांच्या स्मरणार्थ असलेले हे व्याख्यान शनिवार,दि.९ डिसेंबर,दुपारी १२ वाजता टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात झाले. डॉ केळकर यांच्या वैद्यकीय सेवेला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू वरयानी, डॉ. अलका मांडके यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.श्रीकांत केळकर हे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजी’चे संस्थापक अध्यक्ष आहेत . त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ संजय पाटील, डॉ अलका मांडके, डॉ राजू वरयानी, सौ.अरुणा केळकर, डॉ चारुता मांडके, डॉ जयंत नवरांगे, डॉ गीतांजली शर्मा उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत केळकर म्हणाले, ‘भारतातील शल्य चिकित्सा सुश्रुत यांच्यापासून सुरू झाली.युरोप मधून मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुरुवात झाली. पुर्वी शस्त्रक्रिया झाल्यावर 2 दिवस रुग्णाला बेडवरून हलू दिले जायचे नाही. बेड पॅन दिले जात असे. दोन्ही डोळे बांधले जात असत.

नंतर क्रायो सर्जरी, सुचर टेक्निक आले.१९४९ साली कृत्रिम भिंग विकसित झाले.१९६० साली फॅको इमुल्सिफिकेशन चे तंत्र आले. आता कॅप्सुलेझर आले आहे.फेको,लेसर, लेन्स अशा प्रक्रिया आता उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना चांगली दृष्टी लाभते, वेळेत कामावर रुजू होता येते. याचे श्रेय संशोधकांना, तंत्रज्ञानाला आणि मानवी प्रयत्नांना जाते.

मनोज जोशी यांच्या चाणक्य नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद

नाट्यरसिकांकडून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार

पुणे-भारताच्या वैभवशाली इतिहासातील आचार्य चाणक्य हे अतिशय विद्वान आणि कुशल रणनितीकार होते. त्यांचा जीवन प्रवास नव्या पिढीला व्हावा; या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मनोज जोशी यांच्या ‘चाणाक्य’ नाटकाचे दोन प्रयोग ८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनोज जोशी यांच्या दमदार अभियानाने भारावून गेलेल्या अनेक नाट्य रसिकांनी नाटकाचे भरभरून कौतुक केले. तसेच, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.

पुणेकरांचे नाटकप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे दर्जेदार नाटकांना पुणेकर नेहमीच डोक्‍यावर घेऊन, उत्स्फूर्तपणे दाद देत असतात. अशा नाटकांची मेजवानी पुणेकरांना मिळावी; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. यापूर्वी कोथरुड मतदारसंघातील बाणेरमधील नागरिकांसाठी प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. त्याला बाणेरकरांनीही उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता.

पुणेकरांना आचार्य चाणक्य यांचे तत्वज्ञान समजावे यासाठी ८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांच्या ‘चाणक्य’ या नाटकाचा सायंकाळी ६ आणि रात्री ९ अशा दोन मोफत प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केला आहे. पुणेकरांनी ही या नाट्य प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिनेते मनोज जोशी यांच्या दमदार अभिनयाने प्रभावित झालेल्या अनेक नाट्य रसिकांनी नाटकाला उत्स्फूर्तपणे दाद दिली. तसेच, नामदार पाटील यांनी आयोजित केलेल्या प्रयोगाबद्दल आभारही मानले‌.

‘स्वयंसेवी संस्था या दबाव गट झाले पाहिजे ‘- डॉ. कल्याणी मांडके

पुणे :

नॉन रेसिडेंट इंडियन्स पॅरेण्टस् ऑर्गनायझेशन(नृपो) संस्थेच्या वतीने सदस्यांचा स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात पार पडला. ‘नृपोजगत्’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि मृदुला मोघे यांचा ‘एका पेक्षा एक-एकपात्री बहुरूपी’ मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य हाॅटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे ‘यश रिजन्सी ‘सभागृह,शिवाजीनगर येथे सकाळी साडेनऊ वाजता संपन्न झाला.डॉ. कल्याणी मांडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

नवीन सभासदांचे स्वागत व परिचय करून देण्यात आला.दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.नृपो चे अध्यक्ष बी.बी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. दोनशेहून अधिक सभासद या कार्यक्रमाला उपस्थित होते.’नृपोजगत ‘ दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. कल्याणी मांडके आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.नृपो चे अध्यक्ष बी.बी. कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. कल्याणी मांडके आणि मृदुला मोघे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. कल्याणी मांडके म्हणाल्या, ‘ नृपो ‘ संस्थेने आयोजित स्नेहमेळाव्यात आपल्या सर्वांशी बोलण्याची संधी मला मिळाली. सामाजिक बांधिलकीतून मी आपल्याला सांगते की,आपण समाजाच काहीतरी देणं लागतो. सामाजिक बांधिलकीची आपल्याला जाणीव असली पाहिजे. हक्क माहित आहेत पण कर्तव्य माहित नाही, ही खूप दरी आहे. वैचारिकदृष्टया सर्व सामाजिक ,स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या पाहिजेत. १ लाख ८७ हजार स्वयंसेवी संस्थाची नोंदणी आहे. स्वयंसेवी संस्था या दबाव गट झाले पाहिजे. ‘ नृपो ‘ च्या सदस्य या कार्यात आपले योगदान देऊ शकतात. तुमचा वेळ तुमचं ज्ञान त्यांना द्या.तुंम्हाला एखादे आनंदाच झाड मिळेल’.

डॉ. सुरेश मांडके, सुरेश नाईक, नृपो दिवाळी अंकाच्या संपादक प्रा. वैदेही कुलकर्णी, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.विद्याधर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र माहूलकर यांनी आभार मानले.यानंतर मृदुला मोघे यांचा ‘एका पेक्षा एक-एकपात्री बहुरूपी’ मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

ISIS प्रकरणी NIA ची पुण्यासह महाराष्ट्र – कर्नाटकात  ​​​​​​​ 40 हून अधिक ठिकाणी धाडसत्रे, 13 जणांना अटक केल्याचा वृत्तसंस्थेचा दावा

पुणे-नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीने (NIA) शनिवारी सकाळी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत एकूण 44 ठिकाणी छापेमारी केली. त्यात जवळपास 13 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. अटक करण्यात आलेले संशयित ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.

तपास संस्थेने महाराष्ट्रात 43 आणि कर्नाटकात एका ठिकाणी शोधमोहीम राबवली. संस्थेने ठाणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक 31 ठिकाणी, पुण्यात दोन, ठाणे शहरात 9, भाईंदरमध्ये एक आणि कर्नाटकातील एका ठिकाणी छापे टाकले.

तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने ISIS शी संबंधित नेटवर्क शोधून काढले आहे, जे भारतात ISIS ची विचारधारा पसरवण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये परदेशात बसलेल्या इसिसच्या हस्तकांची मदत घेतली जात होती.

भारतात दहशतवादी कारवाया करणे हा त्यांचा उद्देश होता. हे लोक भारतातील ISIS विचारसरणीने प्रभावित तरुणांना आपल्या संघटनेत सामील करायचे. त्यांना आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते.

ISIS मॉड्यूल प्रकरणात पुण्यातून 7 आरोपींना पकडण्यात आले

एनआयएने यापूर्वी ISIS मॉड्यूल प्रकरणी पुण्यातही कारवाई केली होती. येथून सात जणांना अटक करण्यात आली. 6 नोव्हेंबर रोजी या 7 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. सातही आरोपी उच्चशिक्षित असल्याचे 12 नोव्हेंबर रोजी उघड झाले.

हे लोक नामांकित कंपन्यांमध्ये काम करायचे आणि इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवण्यासाठी कोडवर्डमध्ये बोलायचे. एनआयएने कोर्टात 4 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

याशिवाय आरोपींनी वॉशिंग मशिन टायमर, थर्मामीटर, स्पीकर वायर, 12 वॉटचा बल्ब, 9 वॅटची बॅटरी, फिल्टर पेपर, माचिस आणि बेकिंग सोडा यासारख्या सहज उपलब्ध वस्तूंचा आयईडी बनवण्यासाठी वापर करत होते.

आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि कर्नाटकात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी रेकी केली होती. त्यासाठी फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठीही त्यांनी ड्रोनचा वापर केला होता, तो ड्रोनही एजन्सीने जप्त केला आहे.

पुणे ISIS मॉड्यूल प्रकरण काय आहे?
या वर्षी 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी शाहनवाज आणि मध्य प्रदेशातील दोन लोकांना – मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद साकी यांना पुण्यातील दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली होती. पोलिस त्याला त्याच्या लपून बसलेल्या ठिकाणी चौकशीसाठी घेऊन जात असताना शाहनवाजने पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पलायन केले.

मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद साकी यांच्या चौकशीदरम्यान हे दोघेही सुफा दहशतवादी टोळीचे सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एप्रिल 2022 मध्ये राजस्थानमध्ये एका कारमध्ये स्फोटके सापडल्याप्रकरणी तेथील पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला पुणे ISIS मॉड्यूल केस असे नाव दिले. या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन दहशतवाद्यांना मोस्ट वाँटेड यादीत ठेवले होते. पुण्याचा तल्हा लियाकत खान आणि दिल्लीचा रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फैयाज शेख अशी त्यांची नावे आहेत.

या प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि फायनान्सर हा आयटी इंजिनीअर

एनआयएने सांगितले की, इम्रान, युनूस आणि शाहनवाज यांचे पुण्यातील एका आयटी फर्ममध्ये काम करणाऱ्या अभियंता जुल्फिकार अली बोरदवाला यांच्याशी संबंध आहेत. इसिसशी संबंधित एका प्रकरणात जुल्फिकारला 3 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तो मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात बंद आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्याने दिव्य मराठी नेटवर्कला सांगितले की, झुल्फिकार हा या प्रकरणाचा मास्टरमाईंड आणि फायनान्सर आहे. त्याने इम्रान, युनूस आणि शाहनवाज यांना प्रशिक्षण देऊन पैसे पाठवले. इम्रानला पैसे पोहोचवणाऱ्या कादिर दस्तगीर पठाणलाही पोलिसांनी अटक केली आहे.

डॉक्टर अदनान गरीब तरुणांना ISIS मध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करत

चौघांच्या चौकशीदरम्यान एनआयएला डॉ.अदनानचे नाव मिळाले. एनआयएने त्याच्या फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा ISIS शी संबंधित कागदपत्रे सापडली. एनआयएने अदनानचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केले. केंद्रीय तपास संस्थेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, अदनानकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून त्याचे इसिसशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यात गरीब तरुणांना दहशतवादी संघटनांशी जोडल्याचा तपशीलही आहे.

याशिवाय 4 आरोपींकडून ज्यू कम्युनिटी सेंटरची छायाचित्रे जप्त करण्यात आली आहेत. यामुळे केवळ भारतच नाही तर इस्रायलमधील लोकही इसिसचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुंबई पोलिसांनी कुलाब्यातील चाबड हाऊसची सुरक्षा वाढवली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान चाबड हाऊसवरही हल्ला झाला होता.

अदनानसह पाच आरोपींची चौकशी केल्यानंतर एनआयए अकिफ अतिक नाचनपर्यंत पोहोचली. तो आयईडी चाचणी करण्यात तज्ञ आहे. त्यानेच इम्रान आणि मोहम्मद युनूस यांना लपवले होते. मुंबईतील बोरिवली, ठाणे आणि भिवंडी येथे छापे टाकून अकिफला अटक करण्यात आली.

दहशतवाद्यांना ड्रोनद्वारे हवाई स्फोट घडवायचा होता…

महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पकडलेल्या दहशतवाद्यांकडून 500 जीबी मेमरी असलेला पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. त्यांचा डिलिट केलेला डेटा रिकव्हर करत आहे. चौकशीत त्याला हल्ल्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले. पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी घेण्यात आली. ते जंगलात तंबूत राहत होते. ते ड्रोनच्या माध्यमातून हवाई स्फोटाचे तंत्र शिकत होते.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक मोहम्मद इम्रान हा ग्राफिक्स डिझायनर आहे. एनआयएने त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीस ठेवले होते. राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. इम्रान आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात चोरी, बनावट कागदपत्रे, भारतीय शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर सर्वांविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींकडून जप्त केलेल्या वस्तू आणि त्यांचे प्रशिक्षण हे सूचित करते की ते लवकरच मोठा हल्ला करण्याची योजना आखत होते.

कोंडव्याच्या फ्लॅटमध्ये आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण

न्यायालयात दिलेल्या रिमांड अर्जात एनआयएने म्हटले आहे की, आरोपींनी इसिसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता. ते देशात इसिसचे महाराष्ट्र मॉड्यूल तयार करत होते. एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अकिफ अतिक नाचनने आयईडी बनवण्यासाठी वापरलेली सामग्री खरेदी केली होती. तो अनेक दिवस इम्रान आणि युनूसच्या कोंडवा फ्लॅटमध्ये राहून त्यांना प्रशिक्षण देत असे. त्याने 2022 मध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. यामध्ये आयईडीचा डेमोही बनवून दाखवण्यात आला.

अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींव्यतिरिक्त या प्रशिक्षणात आणखी काही लोक सहभागी झाले होते का. त्यांचा शोध सुरू आहे. हे सर्वजण इसिसच्या सूचनेनुसार काम करत होते.

नाचनच्या घरातून जप्त झालेल्या कागदपत्रांमध्ये सापडले प्रशिक्षणाचे पुरावे

एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अकिफ अतिक नाचनचे घर पडगा, ठाण्यात आहे. घरातून अनेक मोबाईल फोन, काही हार्डडिस्क आणि हस्तलिखित कागदपत्रे सापडली आहेत. सर्वांची चौकशी केली जात आहे. यामध्ये आयईडी प्रशिक्षणाची काही कागदपत्रेही आहेत.

ISIS भारतात आपले अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे या आरोपींच्या अटकेवरून स्पष्ट झाले आहे. सर्व आरोपी कोंडवा भागातील आहेत. 5 लाख लोकसंख्या असलेला कोंडवा 2008 पूर्वी बंदी घातलेल्या सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचा बालेकिल्ला होता. येथे 300 हून अधिक दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती.

2010 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना कोंडवा येथून अटक करण्यात आली होती. बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेवर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. 2014 मध्ये एनआयएने एका व्यक्तीला अटक केली होती. 2022 मध्ये, NIA ने ISIS मॉड्यूलशी संबंधित असलेल्या 5 लोकांना अटक केली.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान नदीकाठच्या अतिक्रमणांवर अखेरीस हाथोडा..

पुणे- वर्षानुवर्षे गर्भश्रीमंतांच्या,आणि काही राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांची आणि खानपानाची व्यवस्था बनलेल्या म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान नदीकाठच्या हरित पट्ट्यातील बेकायदा बांधकामे,मातीचे भराव आणि अतिक्रमणे यावर आज अखेरीस महापालिकेने बुलडोझर चालवून ती हटवून टाकली.यापूर्वी कित्येक वर्षात अनेकदा महापालिकेच्या बांधकाम विभागाने यावर अनेकदा कारवाई केली पण राजकीय वरदहस्त लाभल्याने प्रत्येकवेळी येथील अतिक्रमणांना आश्रय मिळत गेला.मात्र येथील सुजन सहकारी सोसायटीने २०१५ साली राष्ट्रीय हरित अधिकरण – National Green Tribunal कडे याबाबत याचिका दाखल केली होती.त्यावर NGT न्यायालयाने 10 ऑक्टोबर 23 रोजी नदी पात्रातील निळ्या व लाल पूररेषा मध्ये बांधकाम अतिक्रमण या वर कारवाई करून १० डिसेंबर या तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.म्हात्रे पुल ते राजाराम पूल दरम्यानच्या नदीकाठच्या हरित पट्ट्या मधील डीपी रस्त्यावर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.यावेळी विविध मंगल कार्यालय,लान्स, हॉटेल इ. वर कारवाई करण्यात आली.एकूण १५ मिळकतीवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये सृष्टी गार्डन,कृष्णसुंदर लॉन्स,नारायणी लॉन्स,श्री वनारसे,मजेन्टा लॉन्स, केशवबाग,पंडित फार्म,या मिळकतदार व व्यावसायीक यांचा सह बहुतांश मिळकत धारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून घेतली.या कारवाईत सुमारे दीड लाख चौरस फुट विनापरवाना बांधकाम काढण्यात आले.एका मिळकत धारकाने निळ्या व लाल पूर रेषे मध्ये केलेला भराव सात जेसीबी लावून काढून घेण्यात आला. यावेळी सहा डंपर चे मदतीने सुमारे ६000 घन फुट भराव काढून वाघोली प्लांट येथे पाठविण्यात आला.या कारवाईत ७ जेसीबी,४ गॅस कटर, 3 ब्रेकर वापरण्यात आले. ५० कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला.हि कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख,कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनिल कदम,उप अभियंता श्रीकांत गायकवाड,कनिष्ठ अभियंता मनोज कुमार मते,शाखा अभियंता राहुल रसाळे,शाखा अभियंता भावना जड़कर,समीर गडइ,ईश्वर ढमाले,सागर शिंदे कनिष्ट अभियंता यांनी पूर्ण केली.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने सातत्याने केले होते आवाहन

बेकायदा बांधकामे असलेली मंगल कार्यालये, लोन्स,हॉटेल या ठिकाणी लग्न समारंभ अगर अन्य कार्यक्रमांचे आयोजन करू नका असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम विभागाने काही वर्षापासून सातत्याने केली होती.तरीही कारवाई काही होत नाही अशा समजुतीने अनेकजण येथे समारंभांचे आयोजन करतात आणि अशावेळी कारवाई झाली कि अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो असाच प्रकार गेल्या कारवाईच्या वेळी देखील घडला होता आणि आज देखील घडल्याचे दिसून आले आहे.

येथून पुढे काय होणार ?

राष्ट्रीय हरित अधिकरण – National Green Tribunal ने येथे अतिक्रमणे होऊ नये म्हणून विशेष आदेश दिल्याने आता यापुढील काळात पुन्हा यथे अतिक्रमणे होणार काय ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय .महापालिकेच्या प्रशासकीय काळात अशी बांधकामे होणार नाहीत असाही दावा केला जातो आहे. तर वारंवार कारवाया केल्या तर येथील व्यावसायिकांचे देखील अतोनात नुकसान होणारच आहे . या सर्व पार्श्वभूमीवर येथे पुन्हा अतिक्रमणे होणार काय ? हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.