Home Blog Page 1336

दुर्ग रायगडाचा इतिहास उलगडला…

पुणे, ९ डिसेंबर-
हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगडावरील विविध घटना, प्रसंगांचा इतिहास कथन करतानाच गडाचे दरवाजे, गडावरील वाडे, बुरुज, बाजारपेठ, सदर, राजवाडा, राजसभा, नगारखाना, मनोरे या वास्तूंचे महत्त्व काय, त्यांची निर्मिती कशी झाली, त्यांचे वैशिष्ट्य काय, याचे दर्शन प्रभावीरीतीने घडवण्यात आले आणि रायगडाचा सारा इतिहासच श्रोत्यांसमोर उलगडला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत ‘असा होता रायगड’ या विषयावरील पहिले पुष्प डॉ. रमा लोहोकरे यांनी गुंफले. डॉ. लोहोकरे यांनी यावेळी दुर्ग रायगडाची करून दिलेली ओळख श्रोत्यांना भावली. अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी या व्याख्यानमालेचे आय़ोजन केले आहे. उद्घाटन कार्यक्रमात शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात इतिहासाचे अभ्यासक प्रसाद तारे यांनी ‘असा झाला राज्याभिषेक’ या विषयावर सादरीकरण केले. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू त्यांनी उलगडून दाखवले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांना माहिती होण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी जे काम केले त्याला तोड नाही. ते एक आदर्श स्वयंसेवक होते, असे अॅड. जैन यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आता युवक-युवतींना माहिती करून देणे आवश्यक आहे, असे डॉ. दबडघाव म्हणाले.

संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी प्रास्ताविक, विश्वस्त राजाभाऊ पानगावे यांनी संयोजन आणि नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्राचे खेळाडू सर्वोत्तम यशासाठी सज्ज

दिल्ली, विशेष प्रतिनिधी
केंद्र सरकारचा अनोखा उपक्रम असलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेला उद्या सुरुवात होत आहे. शक्य आणि इच्छा असूनही काही व्यक्ती नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागल्याने या सगळ्या अनुभवापासून दूर असतात. पण, खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालयाने असा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेचा पडदा उद्या उघडला जाणार आहे. देशभरातील पॅरा खेळाडू त्यानंतर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी मैदानात उतरतील. महाराष्ट्रातील खेळाडू देखील यात मागे नसून सर्वोत्तम यशासाठी उत्सुक व या स्पर्धा सुरु होण्याची वाट बघत आहेत.

महाराष्ट्राला तिरंदाजी आणि नेमबाजीमधून देखिल अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीचा फायदा मिळणार आहे. आशियाई स्पर्धेचा अनुभव असलेला आदिल महंमद नाझिर अन्सारी हा रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राचे आशास्थान असेल. याशिवाय कम्पाऊड प्रकारात पूनम दुसेजा आणि अभिषेक ताव रे यांच्याकडूनही महाराष्ट्राला पदकाच्या आशा आहेत.

पॉवरलिफ्टिंग मध्ये देविदास झिटे (४९ किलो) आणि दिनेश बगाडे (१०७ किलो) आपले कौशल्य पणाला लावतील. पदकांची संख्या वाढवणारा आणखी एक प्रकार म्हणजे नेमबाजी या स्पर्धा प्रकारातही महाराष्ट्राला चांगल्या यशाची खात्री आहे. यामध्ये पॅरा ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेला स्वरुप उन्हाळकर याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगल्या जात आहेत. राघव बारावकर, रेखा पडवळ आणि शंतनु हे देखिल आपला अनुभव पणाला लावणार आहेत

बॅडमिंटनमध्ये सोनेरी यशाची संधी
स्टार आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम, निलेश गायकवाड, आरती पाटिल आणि लता हे बॅडमिंटनमधील महाराष्ट्राचे प्रमख आशास्थान असेल. उद्या रविवारपासून पहिल्या सत्रातील खेलो इंडिया पॅरा गेम्सला बॅडमिंटन स्पर्धा प्रकराने सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत या प्रत्येकाने आपली ओळख करुन दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सोनेरी यश दूर नाही इतका या संघाबाबत विश्वास व्यक्त करण्यात येतो.

अनुभवी खेळाडूंमुळे मोठ्या यशाची हमी – कान्हेरे
महाराष्ट्र बॅडमिंटन संघामध्ये आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. सुकांत कदम, निलेश गायकवाड, आरती पाटील, कोमल आणि दिशा यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. सुकांत आणि निलेश गायकवाड यांच्याकडे पॅरालिंपिक स्पर्धेचाही अनुभव आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राला एकेरी आणि दुहेरी, मिश्र दुहेरीतकिताबाची सुवर्णसंधी आहे, असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रहास कान्हेरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र संघ –
सुकांत कदम, आरती पाटील, निलेश गायकवाड, लता, जितेश राठी, कोमल ओस्तवाल, विजय कुमार निकम, दिशा, तुलिका जाधव, मार्क धर्माई, अनिल कुमार

दिलीप गावित ठरणार आकर्षण
अॅथलेटिक्स स्पर्धा प्रकाराला सोमवारपासून सुरुवात होईल. महाराष्ट्राचे २० सदस्यांचे पथक असून, या संघात अर्थातच दिलीप गावितचे आकर्षण राहणार आहे. दिलीप हा पॅरिस पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला धावपटू आहे. अनुभवाच्या जोरावर तो सोनेरी यश मिळवेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या संघाची जबाबदारी मुख्य प्रशिक्षक सुरेश काकड आणि पूनम नवगिरे यांच्यावर आहे. अॅथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पदके मिळतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू अभिषेक जाधवने व्यक्त केला.

महाराष्ट्र गाजवणार वर्चस्व – काकड
महाराष्ट्राचे धावपटू निश्चितपणे यंदाच्या पहिल्या सत्रातील स्पर्धेदरम्यान आपले वर्चस्व गाजवतील. या सर्व खेळाडूंमध्ये सोनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठीची प्रचंड गुणवत्ता आणि क्षमता आहे. संघाची कामगिरी लक्षवेधी ठरेल. यामुळे पदार्पणात महाराष्ठ्राला मोठे यश मिळेल. अचूक प्रशिक्षण आणि पुरेसा सराव यामुळे या पहिल्या वहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाघिक पदके मिळवून देण्यासाठी अॅथलेटिक्स संघ सज्ज झाला आहे, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक सुरेश काकडे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र संघ –
अभिषेक जाधव, अक्षय सुतार, अमोल,आशा पाटील,भाग्यश्री जाधव, दिलीप गावित, गीता चव्हाण, कृष्णा सेठ,मीनाक्षी जाधव, नलिनी डवार, प्रणव देसाई, प्रसाद पाटील, प्रयाग पवळे, सचिन खिलारी, संदीप सरगर,संगमेश्वर बिराजदार, शुभम, सुनील अनपटे, उलबगड सिताराम.

मानवी जीवनात संस्काराला खूप महत्त्व – ह.भ.प. किसन महाराज चौधरी

शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेत कार्तिकी एकादशी निमित्त प्रवचन

पुणे (दि.९ डिसेंबर २०२३) मानवी जीवनात संस्काराला खूप महत्त्व आहे. संस्कार हे आई, वडील, गुरु, मित्र आणि संत महात्म्यांच्या सानिध्यातून तसेच वाचनातून होत असतात. दूध आणि पाणी एकत्र केले असतानाही दूध पितो त्यालाच ‘राजहंस’ पक्षी म्हणतात. कावळा आणि कोकिळेचा रंग काळा असतो. परंतु वसंत ऋतूमध्ये जो पक्षी गातो त्यालाच कोकिळा म्हणतात. शिक्षकांनी शिकवलेल्या प्रत्येक धड्यात, कवितेत प्रश्न उत्तरांपूर्तेच न पाहता त्यामध्ये मूल्य असतात या दृष्टिकोनातून पाहावे. मानवी जीवनात ही मूल्य च आपल्यावर संस्कार करीत असतात असे मार्गदर्शन ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेत आळंदी यात्रा आणि कार्तिक भागवत एकादशी निमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन केले होते. शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. वारकरी आणि भागवत संप्रदायाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी तसेच महाराष्ट्रातील संतांची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि याद्वारे त्यांच्यावर संस्कार घडावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ह.भ.प. दिगंबर महाराज ढोकले, शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी उपस्थित होते. वारकरी पोशाखातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात म्हटले आहे,
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे जडो। मैत्र जिवांचे।।’
दुष्टां मधील दुष्टपणा जावा आणि चांगले गुण आपल्यामध्ये यावेत अशी भावना ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानाद्वारे व्यक्त केली आहे. रावण दुष्ट नव्हता तर रावणातील प्रवृत्ती दुष्ट होती‌. हंस केवळ पाण्यातील दूध पितो. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करावे. त्यातून पुढील जीवनाचा प्रवास सुखकर होतो, असे किसन महाराज यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
शिक्षिका स्नेहल देशपांडे, रमा जोशी यांनी अभंग गायन केले. स्वागत सुनील सावंत, शिवाजी बांदल यांनी केले. प्रीती शेटे आणि दीपा सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.
शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, मुख्याध्यापक रविंद्र मुंगसे, मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट

पुणे, दि.९: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत जखमी रुग्णांची ससून रुग्णालयात भेट घेऊन संवाद साधला. ‘घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’ अशा शब्दात त्यांनी रुग्णांना धीर दिला. ससून रुग्णालयात या सर्व रुग्णांवर आवश्यक उपचाराची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी घडलेल्या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तलयाच्या सहायक पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. विनायक काळे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

घटनेबद्दल माहिती घेऊन श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेत बाधित कुटुंबाला प्रधानमंत्री कार्यालय तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक ती मदत करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

‘रेड झोन’ मधील नागरिकांबाबत केंद्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय होण्याच्याअनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यसॊबत चर्चा करण्यात येईल. बाधित झालेल्या कुटुंबियांसाठी सामाजिक सुरक्षेची योजना राबविण्यात यावी. आपत्तीजनक परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देता यावा या अनुषंगाने पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाने मोहिम हाती घ्यावी. अशा घटना टाळण्यासाठी महानगरपालिका, उद्योग विभागाने मोहिम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पदश्री सुलोचना चव्हाण यांची गाणी आजही अजरामर आहेत.

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज १० डिसेंबर 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन होते आज त्यांचा पहिला स्मृतीदिन आहे

फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. गेल्या वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. सुलोचना चव्हाण यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटात गायली. या लावणीचे संगीतकार वसंत देसाई होते, तर ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रीत झाली होती. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. सुलोचना यांनी स्वरबद्ध केलेल्या पहिल्या लावणीचे बोल “मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…” असे होते. आचार्य अत्रे यांनीच सुलोचना चव्हाण यांना “लावणीसम्राज्ञी” हा किताब दिला होता. आजही आपल्या सर्वांच्या मनांमध्ये सुलोचना बाई चव्हाण या अजरामर आहेत .

लेखिका – आरती चव्हाण

बोपोडी पोलीस चौकीचे आधुनिकीकरण केले जाईल-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बोपोडी पोलीस चौकीत आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिले.

बोपोडी पोलीस चौकीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे उदघाटन आमदार शिरोळे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. बोपोडीतील कायदा, सुव्यवस्था लक्षात घेऊन, या ठिकाणी पोलीस चौकी करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात सरकारकडे करण्यात आली होती, त्या मागणीला यश आले आहे. चौकीतील यंत्रणा लवकरच अत्याधुनिक केली जाईल असे, आमदार शिरोळे यांनी यावेळी सांगितले. तसेच ह्या अनुषंगाने चौकीला लवकरात लवकर आमदार निधी मधून संगणक पुरवले जातील असे आमदार शिरोळे यांनी सांगितले

या प्रसंगी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, पोलिस निरीक्षक सहाणे, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, प्रकाश ढोरे, सुनीता वाडेकर, आनंद छाजेड, कार्तिकी हिवरकर, सचिन वाडेकर, अनिल भिसे, अभिजित गायकवाड, मुकेश गवळी, धर्मेश शहा, संजय कांबळे, सुभाष पाडळे, रोहीत भिसे, गणेश स्वामी, सुप्रीम चोंधे, मयुरेश गायकवाड, अजित पवार, अनिल तीळवणकर, गणेश नायकरे, संकेत कांबळे, अभिषेक चव्हाण, अनिकेत भिसे, मनीषा कांबळे, शुभम आयने, सिद्धांत जगताप, अकबर शेख आदि उपस्थित होते.

देवगड समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाली; 4 मुलींचा समावेश

पुणे- येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. देवगड समुद्रात उतरले असताना 5 जण बुडाले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. यातील 4 जणांचे मृतदेह सापडले. यातील एकाला वाचवण्यात यश आले. अद्याप एकजण बेपत्ता आहे.

दरम्यान देवगड येथील समुद्र किनारा हा खोल नाही. हा पर्यटकांसाठी सुरक्षित किनारा म्हणून ओळख आहे. आतापर्यंत तारकर्ली, देवबाग, शिरोडा, वेळागर येथे अशा घटना घडल्या आहेत. देवगड समुद्रात अशी पहिलीच मोठी घटना आहे.

नेमकी घटना काय?

पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी देवगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. यातील 5 पर्यटक बुडाले असून चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. यात मृत्यू झालेल्यामध्ये 4 मुलींचा समावेश असून तर एक मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहचल्या नंतर आघोळ करण्याचा मोह पर्यटकांना आवरला नाही. त्यामूळे या गृपमधील काही जण समुद्रात आघोळीसाठी गेले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले आहेत. या घटनेची माहिती मिळण्यास पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलिस सहकारी , तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले आहेत. बेपत्ता मुलाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या घटनेतील सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. यात मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर अजूनही बेपत्ता असून पोलिस स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहेत.

देविका वेंकटसुब्रमणियन यांच्या  भरतनाट्यम ने जिंकली मने!

पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत देविका वेंकटसुब्रमणियन (मुंबई)यांच्या  एकल भरतनाट्यम नृत्य सादरीकरणाला  शनीवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. पारंपरिक भरतनाट्यम मार्गम आणि रामायणातील उर्मिला या विषयावर नव्या नृत्यरचना त्यांनी सादर केल्या . पुणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम शनीवार, ९ डिसेंबर    २०२३ रोजी सायंकाळी  साडे पाच   वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १९७ वा कार्यक्रम  होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.

महासागर नौकानयन मोहीम सुरु

पुणे-75 वैभवशाली वर्षांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, 06 डिसेंबर 23 रोजी पहाटे गोवा ते कोची आणि परत या महासागर नौकानयन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. नऊ कॅडेट्स आणि तीन अधिकार्‍यांचा चमू ओपनमध्ये समुद्रपर्यटन करण्याचे आव्हानात्मक आणि साहसी कार्य करत आहे. मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर 334 सागरी मैलांहून अधिक व्यापलेला महासागर. भारतीय नौदल सेलिंग व्हेसल्स म्हादेई, बुलबुल आणि नीलकांत या जहाजांवर चालक दल ही नौदल ओडिसी करणार आहे.

क्रूने कोची येथे नौकानयनाचे मूलभूत प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर गोव्यात प्रगत प्रशिक्षण घेतले. संपूर्ण क्रूला पाल उभारणे, नेव्हिगेशन, प्रथमोपचार आणि इतर आवश्यक कौशल्ये यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर कुशलतेने प्रशिक्षण दिले गेले आहे. गोवा ते कोची या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे आणि 10 डिसेंबर रोजी कोची येथे समाप्त होण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा 12 डिसेंबर रोजी कोची बंदरातून झेंडा दाखवून 16 डिसेंबर 23 रोजी गोवा येथे संपेल.

ओशन सेलिंग हा सर्वात जास्त मागणी असलेल्या खेळांपैकी एक आहे जो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक मानला जातो. कॅडेट्समध्ये साहसाची भावना निर्माण करणे, जोखीम घेण्याची क्षमता वाढवणे आणि लवचिकता, टीमवर्क आणि सतत शिकण्याची आवड विकसित करणे हे अकादमीचे उद्दिष्ट आहे.

16 जानेवारी 2024 रोजी, NDA देशाच्या सेवेत 75 गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. नौकानयन मोहिमेचे उद्दिष्ट सागरी क्षेत्रातील या भव्य प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी आहे.

‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ पुस्तकाचे  प्रकाशन 

पुणे :
डॉ.कर्नल अनिल आठल्ये(निवृत्त) लिखित ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवार,दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र,भारतीय विद्या भवन जवळ,सेनापती बापट रस्ता येथे झाले.भारतीय विद्या भवन आणि इंडस सोर्स बुक्स यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्षा लीना मेहेंदळे आणि ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी श्रीनिवासराव सोहोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे  लष्करी धोरण,नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्यावर हे पुस्तक आधारित आहे.

 भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे ,इंडस सोर्स बुक्स च्या संचालक सोनावी देसाई,जनरल कुलकर्णी, जनरल अशोक जोशी, अजित आपटे आदि मान्यवर उपस्थित होते.नंदकुमार काकिर्डे यांनी आभार मानले.
डॉ.कर्नल अनिल आठल्ये(निवृत्त)हे निवृत्त लष्करी अधिकारी असून संरक्षण मंत्रालयाच्या युद्ध अध्ययन विभागाचे माजी प्रमुख   आहेत.
 ‘युद्ध कौशल्यांच्या बाबतीत अलेक्झांडरला ‘ अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणतात ,तशीच महान कौशल्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याने हे पुस्तक लिहिले आहे’,असे डॉ.अनिल आठल्ये यांनी सांगितले. 
डॉ अनिल आठल्ये म्हणाले, ‘जगभरच्या युद्ध नीतीचा अभ्यास करताना असे जाणवले की छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती, गनिमी कावा जगभर माहिती नाही.ती माहिती करुन देण्याची गरज आहे. त्यामध्ये आपण कमी पडलो. शिवाजी महाराज दहा वर्ष आणखी जगले असते तर आपले नौदल जगात सर्वोत्कृष्ट ठरले असते. मराठा सैन्याची बहादुरी पुढे आली पाहिजे. स्वराज्य ही संकल्पना शिवाजी महाराज यांनी पुढें आणली. त्यापूर्वी स्वराज्य किंवा हिंदवी स्वराज्य हा उच्चार होत नव्हता.
डॉ श्रीनिवास सोहोनी म्हणाले,’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर माता जिजाऊ आणि पिता शहाजीराजे यांचा मोठा प्रभाव होता. राष्ट्रप्रेम, कर्तव्य यांची बीजे त्यांनी रुजवली’.

‘धर्मशास्त्रपासुन युद्धनितीपर्यंत अनेक शास्त्रे त्यांना अवगत होती. गडांच्या नावातून त्याचे सामर्थ्य लक्षात येते, राज्य व्यवहार कोषातून मराठी भाषेचा वापर वाढवणे, या गोष्टी अद्भुत आहेत’, असेही त्यांनी सांगितले .
लीना मेहेंदळे म्हणाल्या,’जगातील इतर राजांचा, देशांचा विचार केला तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे लहान भौगोलिक स्वराज्य वाटू शकते, पण इतिहासाला या स्वराज्याने महान तत्वे , धैर्य ,विचार दिले. पिढ्यान् पिढ्या ही मूल्ये पुढे चिरंतन झाली.पुस्तक रूपाने या गोष्टी येत आहेत, ही मोठी गोष्ट आहे.

नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा ‘नमो महारोजगार मेळावा’-  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.9 : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात होत असलेला आजचा नमो महारोजगार मेळावा जागतिक दर्जाचा आहे. हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांचे संयुक्त व्यासपीठ असून बेरोजगारी मुक्त नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा हा मेळावा असल्याचे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 9 व 10 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सकाळी 11 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दटके, प्रसाद लाड, अभिमन्यू पवार, विकास कुंभारे, आशिष जायस्वाल, मोहन मते, कृष्णा खोपडे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, टेक महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष निखील अलुरकर यावेळी उपस्थित होते.

या मेळाव्यासाठी 60 हजार तरूणांनी नोंदणी केली होती. 798 आस्थापना या ठिकाणी मुलाखतीसाठी आल्या आहेत. 48 हजार 541 उपलब्ध जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी विद्यापीठ परिसरात तीन मोठी दालने उभारण्यात आली आहे. उद्यापर्यंत हजारो उमेदवारांना विविध आस्थापनामध्ये नियुक्ती दिली जाण्याची शक्यता आहे.

या मेळाव्याला ऐतिहासिक आणि विक्रमी संबोधतांना उपमुख्यमंत्र्यांनी विविध आस्थापनांमध्ये त्यांचे वेगळेपण आपल्या भाषणात मांडले. केवळ मुलाखती घेऊन हा मेळावा संपणार नसून नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक सुशिक्षीत बेरोजगारांच्या नोकरीबाबत पाठपुरावा करणारी यंत्रणा आम्ही उभारली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ दोन दिवसांचा नाहीतर पुढेही अनेक दिवस चालणार आहे. मेळावा संपल्यानंतरही प्रत्येकाला संधी मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आयोजनाचे कौतुक करतांना त्यांनी कौशल्य विकास विभागाने बदलत्या तंत्रज्ज्ञानाला अनुसरून नव्या स्वरूपातील अभ्यासक्रम सुरू करावेत. रोजगार व प्रशिक्षण देण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

रोजगार निर्मिती, प्रशिक्षण व मागणीप्रमाणे मनुष्यबळाची उपलब्धता या संदर्भातील सर्व घटकांबाबत सर्वंकष धोरण ठरविण्यासाठी जागतिक बँकेसोबत रोजगार निर्मिती संदर्भात चर्चा सुरू आहे. इन्फोसिससारखा प्रकल्प 2 हजार रोजगार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात विक्रमी संख्येने रोजगार मिळतील. मात्र, आम्ही इथेच थांबलो नसून राज्य शासनामार्फत 1 लाख नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या आयोजनासाठी काम करणाऱ्या कौशल्य विकास विभागाच्या विविध अधिकाऱ्यांचे कौतुक करतांनाच स्थानिक स्तरावर पाठबळ उभे करणाऱ्या शिवाणी दाणी व त्यांच्या चमुचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. येणाऱ्या काळात मोठ्या प्रकल्पांमध्ये तरूणांना नोकऱ्यांची अधिक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मिहानसारख्या प्रकल्पात 2 लक्ष सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पायाभुत सुविधांच्या वृध्दीसोबतच नोकऱ्याची संधी देशभरात वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरी भागातील तरुणांप्रमाणे ग्रामीण भागही रोजगाराच्या प्रवाहात यावा, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतामध्ये युरियाच्या फवारणीसाठी ड्रोनचे तंत्रज्ञान वापरणे, बांबुपासून तयार होणाऱ्या व्हाईट कोळशाची निर्मिती आदी प्रयोग महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी रोजगाराचे माध्यम ठरणार आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही उद्योजकता निर्माण करण्यासाठी, तेथील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. गडकरी यांनी केले. तरुणांना रोजगार कसा मिळेल, यासाठी एका तज्ज्ञ समितीकडून अध्ययन करून घेत सविस्तर धोरण तयार करावे, अशी अपेक्षा श्री. गडकरी यांनी राज्य सरकारकडे व्यक्त केली.

कार्यक्रमाची भुमिका विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पक्तेतून हा मेळावा नागपूर येथे साकारत आहे. बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपला विभाग धडपड करीत आहे. त्यासाठी  जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांना राज्यस्तरीय या मेळाव्यामध्ये पाचारण करण्यात आले आहे. उद्या भरती प्रक्रियेचा विक्रम होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुरूवातीला या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी प्रास्ताविक व्यक्त केले. आभार प्रदर्शन विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी केले. हजारोच्या संख्येने तरूणांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. विद्यापीठाचा परिसर तरूणाईने भरून गेला होता. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांची उपलब्धता यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून उद्यापर्यंत बहुतेक आस्थापनांकडून नियुक्तीपत्र दिली जाणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता समारोह होणार आहे.

युवकांनी भेट देण्याचे आवाहन

9 व 10 दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्याला तरुणांनी भेट देण्याचे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. तिसऱ्या दालनात 68 स्टार्ट अप कंपन्या या ठिकाणी आपले अनुभव सांगण्यासाठी उपलब्ध आहेत. विविध विषयांवरचे मार्गदर्शन सध्या दिवसभर सुरु आहे. याशिवाय टाटा, रिलायन्स, हिंदुस्थान लिव्हर, महिंद्र ॲन्ड महिंद्र  यासारख्या मोठ्या आस्थापनाकडून मुलाखती घेतल्या जात आहेत. हे प्रत्यक्ष युवक-युवतींनी बघावे, असे आवाहनही त्यांनी केले.

न्या.शिंदे समितीच्या आढावा बैठकीत जात नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा

पुणे दि.९: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. ‘मराठा कुणबी, कुणबी मराठा’ या जात नोंदींचे सबळ पुरावे ठरणारी कागदपत्रे, पुरावे निश्चित करण्यासंदर्भात या कामकाजात सविस्तर चर्चा झाली.

समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त), विभागीय आयुक्त सौरभ राव, उपायुक्त वर्षा लड्डा, विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, महापालिका आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. विभागीय आयुक्त श्री. राव यांनी विभागात आतापर्यंत केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीची माहिती सादर केली. त्यानंतर विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. न्या.शिंदे यांनी विभागात झालेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात आंदोलन

मुंबई
‘मोहब्बत की दुकान में, लूट का सामान, राहुल गांधी जवाब दो, धीरज साहू हाय हाय, कांग्रेस का हाथ भ्रष्टाचार के साथ’ अश्या घोषणा देत मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरात २०० करोड सापडल्याच्या निषेधार्थ आज तीव्र निदर्शन करण्यात आली.

यावेळी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई म्हणाल्या,
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या १० ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत २०० कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. जप्त केलेल्या नोटांची संख्या एवढी जास्त होती की, त्या नोटा मोजण्यासाठी मागवलेली मशिनही बिघडली. या प्रकरणात साहूंविरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे तसेच त्यांना अटक देखील झाली पाहिजे. गरिबीचा नारा देणाऱ्या काँग्रेसने याबाबत थोडी तरी लाज बाळगावी. सरकारने भ्रष्ट काँग्रेसच्या नेत्यांवर छापे मारून त्यांची अवैध संपत्ती जप्त करावी असेही त्या म्हणाल्या.

यावेळी बिंदू त्रिवेदी, सरिता राजपुरे, शशिबाला टाकसाळ, ज्योती दुराफे, योजना टाकळे, समिता कांबळे, सरिता पाटील, जान्हवी राणे, नेहा ठाकूर आदी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

‘रुबी हॉल’ मधील रिसेप्शनिस्ट महिलेची आत्महत्या..पोलीस तपास सुरु

पुणे- रुबी हॉल या नामांकित रुग्णालयात रिसेप्शनिस्ट स्वरूपाचे काम करणाऱ्या ४२ वर्षीय मिताली आचार्य नामक महिलेने राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक भारती इंगोले(८२०८५६३८१४) याप्रकरणी अधिक तपास करत असून हॉस्पिटलमध्ये कामकाज समयी झालेल्या मानसिक छळवादातून या महिलेने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात पोलिसांनी असे सांगितले कि,’कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कमधील विद्युतनगर सोसायटीत राहणाऱ्या मिताली यांच्या ७८ वर्षीय सासूने यांसंदर्भात फिर्याद दिली आहे. रुबी हॉल मधील दोन महिला व एच. आर. विभाग प्रमुख यांच्याविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०२३ ते ३१/१०/२०२३ रोजीचे कालावधीत हॉस्पीटल, मध्ये यातील फिर्यादी यांची सुन मिताली आचार्य ही रुबी हॉस्पीटल मध्ये नोकरी करीत असताना, यातील हॉस्पीटल मधील दोन महिला यांनी आपसात संगनमत करून, किरकोळ कारणावरुन स्टाफ समोर तीस टोचुन बोलत असताना, सदरबाबत तीने व एच. आर. विभाग प्रमुख यांचेकडे तक्रार केली असता, त्यांनी तीस अपमानस्पद वागणुक देवुन, तीला राजीनामा देण्यास भाग पाडुन, त्यानंतर मिताली ही नोकरी साठी लेखी अर्ज घेवुन त्याचेकडे गेली असता विभागप्रमुख याने मी कोणाला पण नोकरी देईल, पण तुला नोकरी देणार नाही असे बोलुन, तीचा अर्ज तीचे अंगावर फेकुन तीस मानसिक त्रास दिल्याने त्यामुळे तीचेवर मानसिक दडपण आणून , त्यांचे त्रासाला कंटाळुन, मिताली हिस तीचे राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उत्तमनगरच्या २२ वर्षीय चेतन चव्हाण वर पोलिसांकडून MPDA ची कारवाई

पुणे-उत्तमनगर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या २२ वर्षीय तरुण अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी एम. पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
पुणे पोलीस आयुक्तालयातील उत्तमनगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार चेतन लक्ष्मण चव्हाण, वय-२२ वर्षे, रा. फ्लॅट नं ५०१, इंगळे कॉलनी, इंगळे कॉर्नर, शिवणे, ता. हवेली, जि. पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह बंडगार्डन व उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिस्तूल, तलवार, धारदार हत्यार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापत करणे, दुखापत, दंगा, बेकायदा पिस्तूल व हत्यारे बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त,रितेश कुमार,
यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षककिरण बालवडकर,चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ६६ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.