Home Blog Page 1285

महापालिकेची बेकायदा बांधकामांविरुद्ध जोरदार मोहीम, ..उपनगरे टार्गेट

पुणे- पुण्यात होणाऱ्या अनधिकृत बांधकामावर जोरदार हथोडा टाकणारी मोहीम महापालिकेने सुरु ठेवली असून वाहतूक समस्या ,प्रदूषण आणि बकालपणा वाढवून करोडोची तुंबडी भरणाऱ्या तथाकथित बिल्डर आणि त्यांना साथ देणाऱ्या ग्राहक वर्गाला पुन्हा एकदा इशारा देणारी कारवाई केली आहे.जुन्या शहरालगतच्या उपनगरात काही राजकीय नेते, कार्यकर्ते नामी बेनामी बिल्डर बनून अशी बेकायदा बांधकामे करत असून माहिती असून नागरिकांनी ती खरेदी करू नयेत ,अन्यथा त्यांना साथ देणारे त्यांच्या एवढेच दोषी ठरतात पण कारवाईत मात्र ग्राहकांचे जास्त नुकसान होते हे लक्षात घेऊनच खरेदी करावी असे आवाहन महापालिकेने पुन्हा एकदा केले आहे.

पुणे महानगरपालिका झोन क्र.२ मधील मौजे आंबेगाव बु. (जुनी हद्द)  स.नं.४३ व स.नं.२५ आणि व आंबेगाव स.नं.१० येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन एकूण सुमारे ४७६६४ चौ.फुट क्षेत्र मोकळे  करणेत आले..

आंबेगाव बु. (जुनी हद्द) स.नं. ४३ व स.नं. २५ येथे २५ महाराष्ट्र महापालिका कलम ४७८ (१), २६० (अे) (अे) (बी) व कलम  ५३ (१) (अे) अन्वये नोटीस देऊन विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.

सदरच्या कारवाईमध्ये आंबेगाव बु. (जुनी हद्द)  मधील रोहन ओदेल व इतर यांचे ३०० चौ. फुट, एस.एम.पवार व इतर  यांचे ९०० चौ. फुट, उदित सिंग व इतर यांचे ५०० चौ. फुट, तारू राजेंद्र गणपत  यांचे ६८४ चौ., विलास कोकरे व इतर  यांचे १५० चौ. विकास चव्हाणव इतर  यांचे ८० चौ. फुट  आणि आंबेगाव (बु.) स.नं.१० येथील  अथर्व डेव्ह. व इतर यांचे ४३५० चौ. फुट, साई गणेश डेव्ह. व इतर यांचे ४३०० चौ. फुट, श्रावणी डेव्ह. व इतर यांचे ४२०० चौ. फुट, आर एल चोरगे व इतर यांचे ४२५० चौ. फुट, श्री डेव्ह. व इतर यांचे ४२०० चौ. फुट, साईनाथ डेव्ह. व इतर यांचे ४३५० चौ. फुट, समर्थ डेव्ह. व इतर यांचे ४४५० चौ. फुट, गवळी व इतर यांचे ४५०० चौ. फुट, मौर्य डेव्ह. व इतर यांचे ८३०० चौ. फुट, गुरुदत्त डेव्ह. यांचे २१५० चौ. फुट, असे एकूण ४७६६४ चौ. फुट. क्षेत्र मोकळे  करणेत आले.

सदरची कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी,  ब्रेकर, गॅस कटर,जॉ क्रशर,ब्रेकर, इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.

हु.भाई कोतवाल यांना केंद्र सरकारने भारतरत्न द्यावा-रामदास सूर्यवंशी

पुणे- देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देत तत्पूर्वी समाजाच्या भल्यासाठी शिक्षण,कृषी,राजकारण,समाजकारण,सहकार,आरोग्य,विधी व न्याय आदी क्षेत्रात भरीव योगदान देणारे अन् इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे थोर स्वातंत्र्यसूर्य वीर भाई कोतवाल यांना त्यांच्या उज्वल कारकिर्दिसह देशाच्या स्वातत्र्यांच्यासाठी दिलेल्या अतुलनीय अष्टपैलू योगदानाबद्दल केंद्र शासनाने मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडे बारा बलुतेदार संघ व सकल नाभिक संघाच्यावतीने केली असल्याचे प्रतिपादन बारा बलुतेदार संघांचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी केले.यावेळी त्यांच्या ८० व्या बलिदान दिनानिमित्त राणा प्रताप उद्यानातील भाईंच्या पुतळ्यास माथेरान नगरपरिषदेचे नगरसेवक अवधूत एरफुले व पुणे मनपा कसबा क्षेत्रीय अधिकारी अमोल पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक अनिलकुमार मल्लेलवार हे होते.याप्रसंगी भाई कोतवाल यांचे वंशज श्रीकेश कोतवाल,ओंकार एरफुले,त्यांचे भाचे गणेश कु-हाडे,अशोक चटपल्ली,पालिका अधिकारी गांगुर्डे व घारे साहेब ,बारा बलुतेदार सचिव राजेंद्र पंडित,महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रसिद्धी प्रमुख दिनकर चौधरी,बारा बलुतेदार पिंपरी चिंचवड अध्यक्ष हेमंत श्रीखंडे,नाभिक महामंडळ शहर उपाध्यक्ष विनायक गायकवाड,उपाध्यक्ष रवींद्र मावडीकर,सिंहगड रोड नाभिक मंडळ अध्यक्ष अमोल थोरात,विनायक रणदिवे,लोहगाव संस्थेचे सतीश पांडे,दत्ता आढाव,शंकर सोनायलू,सुनील पैय्यावल,विनायक साबळे,बाळासाहेब भामरे,आनंद पय्यावल,निलेश चटपल्ली,लिलाताई साठेकर,सौ विजया मल्लेलवार,अशोक सोनायलू,पद्माकर सुरळे,रा.ओबीसी अध्यक्ष हनुमंत यादव,आदी अनेक पालिका कर्मचारी व मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी गणेश कु-राडे यांची वीर भाई कोतवाल स्मारक समितीच्या पुणे शहराच्या सन 2024-25 च्या वार्षिक अध्यक्षपदी निवड सर्वानुमते रामदास सूर्यवंशी यांनी जाहीर केली.
पुणे स्टेशन येथील शहीद वीर भाई कोतवाल चौकात प्रतिमेस व नामफलकास पुष्पहार प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी व स्मारक समिती अध्यक्ष गणेश कु-राडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक गायकवाड,प्रास्ताविक हेमंत श्रीखंडे तर आभार दिनकर चौधरी यांनी मानले.

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे मंचर आणि राजगुरूनगर येथे आयोजन

पुणे, दि. २ : केंद्र शासनाच्या महात्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने मंचर आणि राजगुरूनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रात ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून नगरपरिषद कार्यक्षेत्रात विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत असून प्रत्यक्ष लाभही देण्यात येत आहेत.

मंचर आणि राजगुरूनगर शहरात या संकल्प रथाच्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकसहभाग हे या संकल्प यात्रेच्या उद्दिष्टांपैकी एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. शहरातून या कार्यक्रमात सुमारे ५५० लाभार्थी सहभागी झाले. यावेळी लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांबाबत माहिती घेतली.

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), दिव्यांग बांधव कल्याण निधी योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान इत्यादी नागरी भागात शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती यावेळी नागरिक व लाभार्थी यांना देण्यात आली.

कार्यक्रमस्थळी भेट दिलेल्या अनेक लाभार्थ्यांनी दिव्यांग कल्याण निधी, आयुष्यमान भारत कार्ड व पीएम स्वनिधी या योजनांकरिता प्रत्यक्ष जागेवर नोंदणी केली. ३ जानेवारी रोजी विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत तळेगाव नगरपरिषद क्षेत्रातील मराठा क्रांती चौक आणि नथुभाई भेगडे शाळा मैदान येथे कार्यक्रम होणार आहेत.

नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोल्हापुरातील रुग्णालयात स्वच्छता कामात 5.2 कोटीचा भ्रष्टाचार

पुणे-वैद्यकीय शिक्षण विभागाने जुलै 2023 ते नाेव्हेंबर 2023 यादरम्यान तीन शासन निर्णय घेतले असून त्यावर एकाच अवर सचिवांची सही आहे. त्यानुसार राज्यभरातील शासकीय रुग्णालयात स्वच्छता कामाच्या नावाखाली हजाराे काेटी रुपयांचा अधिकृत पध्दतीने भ्रष्टाचार झालेला आहे.केवळ काेल्हापूर मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वाेपचार रुग्णालयात बाहय स्त्राेता मार्फत स्वच्छता सेवा पुरविण्याचे माध्यमातून 5.82 काेटीच्या स्वच्छता कामात 5.2 काेटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आराेप येथील आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

कुंभार म्हणाले, मंत्रालयातील अवर सचिव, सचिव व इतर अधिकाऱ्यांना किमान बेरीज, वजाबाकी येत असेल व चाैरस फूट आणि चाैरस मीटर मधील फरक कळत असेल असे गृहित धरुन सदर तक्रार अाम्ही करत आहे. ते जर कळत नसेल तर त्यांना त्या पदावर रहाण्याचा अधिकार नाही. बाहय तत्वांच्या नादाला लागून ते शासनाचे तिजाेरीवर दराेडा घालत असून त्यांच्यावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर फाैजदारी गुन्हे दाखल करण्याची आमची मागणी आहे. शासनाचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे तीन परिपत्रकात स्वचछता विषयक कामाचे बाहय सेवेचे दर हे एक रुपयांपासून तब्बल 72 रुपयांपर्यंत दिले असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविदयालयात स्वच्छता विषयक सेवा बाहय कामासाठी बांधकामाचा खुला परिसर व स्वच्छतागृह परिसर यासाठी अनुक्रमे 4 रुपये, 2 रुपये व एक रुगया प्रति स्क्वेअर मीटर प्रती महिना असा दर मंजूर करण्यात आला.

आता या निर्णयात गडबडी करण्यात आली असून काेल्हापूरात हाच दर अनुक्रमे 42 रुपये, 2.400 रुपये व 71.200 रुपये प्रती स्क्वेअर मीटर असा करण्यात आलेला आहे. हे दर सुरुवातीचे दराच्या 11 पट ते 71 पट इतके जास्त आहे. शासनाचे निर्णयात दरात इतकी तफावत कशासाठी ठेवण्यात आली, यास अंतिम मान्यता काेणी दिली? यामुळे 5.82 काेटी रुपयांचे कामात 5.2 काेटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.

काेल्हापूर येथील स्वच्छालय परिसर हा 28137 आणि 1038.980 असा 29 हजार 175 स्क्वेअर मीटर म्हणजे सात एकर इतका दाखवलेला आहे. एका जागेवर इतके माेठे स्वच्छालय हाेत असेल तर ताे जागतिक विक्रम ठरेल. स्वच्छतेचा दर जरी स्क्वेअर मीटर मध्ये लिहिलेला असला तरी प्रत्यक्षात गुणाकार करताना मात्र, स्क्वेअर फुटावर करण्यात आल्याने मान्य रकमेच्या दहापट जास्त खर्चाला प्रशासकीय मंजूरी दिली गेली आहे. संपूर्ण राज्यात हाच प्रकार सुरु असून माेठया प्रमाणात उघडपणे भ्रष्टाचार हाेऊ लागल्याचे यातून दिसून येते.

संपामुळे ST सेवा बंद होण्याची शक्यता:सर्व आगारांत मंगळवार पुरताच डिझेलसाठा

मुंबई

ट्रक चालकांनी केंद्राच्या ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदचा फटका हळूहळू सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवांना बसत आहे. विशेषतः या संपाचा फटका सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी सेवेलाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील बहुतांश आगारांत मंगळवार पुरताच डिझेलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत इंधन पुरवठा पूर्ववत न झाल्यास एसटीची सेवा पूर्णतः विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात दोषींना 10 वर्षांचा तुरुंगवास व 7 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीविरोदात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. राज्यात नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भासह सर्वच शहरांत आंदोलन सुरू आहे. त्याचा प्रभाव हळूहळू सर्वत्र जाणवू लागला आहे. या आंदोलनामु्ळे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. विशेषतः विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा मोठा फटका प्रवाशी सेवेला होणार आहे.

एसटीला दररोज 11 लाख लिटर लागते डिझेल

एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बहुसंख्य बसगाड्या डिझेलवर धावतात. या बससाठी दररोज सरासरी 11 लाख लिटर डिझेल लागते. त्यामुळे हा डिझेल पुरवठा पूर्ववत न झाल्यास एसटीची सेवा खोळंबण्याची शक्यता आहे. परिणामी, त्याचा फटका लाखो सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची भीती आहे.

संप आणखी पुढे सरकल्यास डिझेलचा तुटवडा

यासंबंधीच्या वृत्तानुसार, एसटीच्या 250 आगारांत बसमध्ये डिझेल भरण्याची सुविधा आहे. एसटी महामंडळ इंडियन ऑइल कार्पोरेशन (IOC) व भारत पेट्रोलियम (BPCL) या 2 कंपन्यांकडून एसटी महामंडळ डिझेल खरेदी करते. सर्व आगारांत मंगळवार दिवसभर पुरेल इतका डिझेल साठा उपलब्ध आहे. पण संप आणखी पुढे सरकल्यास डिझेलचा तुटवडा निर्माण होईल आणि एसटी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतील, अशी भीती एसटीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त-मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची टीका

मुंबई दिनांक २ जानेवारी २०२४

राम मंदिरासाठी ज्या कोठारी बंधूंनी स्वतःचे बलिदान दिले त्यांचा खून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने केला. रामभक्त, कारसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगले आहेत त्यांच्याशी हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे त्यांच्याही हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागले आहे, अशी खरमरीत टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

आ. ॲड. आशिष शेलार यांनी पक्षाच्या बैठकीबाबतीत माहिती देताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू आहे. तीन लोकसभांसाठी एक नेता या प्रमाणे देशभर प्रवासाचा कार्यक्रम ठरला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सर्वजण देशातील तीन ते चार लोकसभेचे एक क्लस्टर बनवून बैठका घेणार आहेत. त्या अगोदर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रत्येक लोकसभेच्या तीन विधानसभा यांच्या बैठका घेणार आहेत. त्याचा दौरा आता सुरू झाला आहे. जे विधानसभेतील प्रत्यक्ष निवडणुकीचे काम पाहणार आहेत या सुपर वॉरिअरची मुंबईतील बैठक घेतली जाणार आहे. संघटनेच्या तळागाळातील स्तरावर पोहोचणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

पत्रकारांनी शरद पवार गटाच्या बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले, शरद पवार यांनी पहिल्यांदा स्पष्ट करावे की,त्यांच्या पक्षात किती आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आहेत. हा पक्ष आहे का, तो गट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना तो गट आहे या सत्यावर आता यावं लागेल.

उबाठाच्या दिल्ली दौऱ्यबाबतीत विचारले असता अँड शेलार म्हणाले की, उध्दव ठाकरे आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या, बंगल्यावर या, अश्या पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चालले आहेत. त्यांना सरपटत दिल्लीला जाऊ दे, कुर्निसात घालून दे, महाराष्ट्र हे बघतो आहे. आज ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागा जिंकण्यासाठी मदत करण्याकरिता देशभर सरपटत आहे. आमच्याबरोबर ज्या वेळेला होते त्यावेळी ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता. स्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाकरिता, खुर्चीसाठी लोलुपता केवढी होते हे उद्धव ठाकरे यांनी आज दाखवले आहे अशीही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

९६ वर्षीय रामभक्त, कारसेवक शालिनी डबीर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून विशेष सन्मान

मुंबई
मुंबईहून १९९० साली कारसेवेकरिता गेलेल्या ९६ वर्षीय रामभक्त शालिनी रामकृष्ण डबीर यांच्या घरी जावून राष्ट्रीय सेवक संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा विशेष सन्मान केला. यावेळी श्रीमती डबीर यांना २२ जानेवारी होणाऱ्या रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या “अक्षता कलशा”बरोबरच प्रभू श्रीराम मंदिराचे सुबक मॉडेल भेट म्हणून दिलीप गोडांबे यांच्या हस्ते देण्यात आले.

श्रीमती डबीर या ३० ऑक्टोबर १९९० रोजी अयोध्येत पोहोचून बाबरी ढाच्यावर भगवा फडकवण्याच्या मुख्य साक्षीदार आहेत. कारसेवेमध्ये दिलीप गोडांबे यांनीही सहभाग घेतला होता. दादरच्या कारसेवक महिलांच्या जथ्याला अटक करून उत्तरप्रदेश पोलिसांनी एका शाळेच्या आवारात बंदिस्त केले होते. त्यापैकी काहींनी स्थानिकांच्या मदतीने पलायन करून अंदाजे ५० किलोमीटर पायपीट करत ३१ ऑक्टोबर १९९० रोजी कारसेवेमध्ये सहभाग घेतला. श्रीमती डबीर यांना यावेळी पोलिसांचा लाठीमार, अश्रुधूर एवढेच नाही तर आसपास होत असलेल्या गोळीबाराचा देखील अनुभव आला. मात्र, त्यावेळी कोणीही डगमगले नाही. यावेळी सत्कारादरम्यान गजानन पेंडसे, मनोज मिसाळ, संगिता पवार आणि छाया गोडांबे आदी उपस्थित होते.

ट्रक चालकांच्या संपाचा 10 राज्यांमध्ये जास्त प्रभाव; MP हायकोर्टाने राज्य सरकारला म्हटले- संप लवकर मिटवा

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला संप मिटवण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी दोन याचिकांवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने म्हटले, ‘संप तत्काळ मिटवा. सरकारने वाहतूक पूर्ववत करावी. यावर सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल म्हणाले, ‘या प्रकरणी आज सायंकाळपर्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे.’ नागरिक ग्राहक मंच आणि अखिलेश त्रिपाठी यांच्या वतीने या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

हिट अँड रन प्रकरणी कायद्यातील नवीन तरतुदींच्या निषेधार्थ देशभरातील ट्रकचालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावर उभी आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.

मध्यप्रदेश, राजस्थानसह 10 राज्यांमधून पेट्रोल आणि डिझेल पंप कोरडे पडल्याची माहिती आहे. येथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. फळे, भाजीपाला, दूध आणि कृषी मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी प्रशासन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वाहतूकदारांशी संपर्क साधत आहे.

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान म्हणाले, ‘वाहतूकदारांनी अद्याप संपाची घोषणा केलेली नाही. मंगळवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. सध्या वाहनचालकच वाहने सोडून खाली उतरत आहेत. इतरांनाही वाहन चालवू देत नाहीयेत.

जम्मू-काश्मीर : 1500 टँकर संपावर; 90% पंप रिकामे

जम्मू आणि काश्मीर पंप ओनर्स युनियनने सांगितले की, जम्मूमधील 90 टक्के पेट्रोल पंप रिकामे झाले आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आणि लडाखमध्ये इंधन वाहून नेणारे 1,500 टँकर संपावर असल्याने पुढील काही तासांत संपूर्ण साठा संपेल. ऑल J&K पेट्रोल टँकर ओनर्स असोसिएशनने म्हटले आहे की, संप सुरूच राहील आणि नवीन कायदे रद्द होईपर्यंत चालक कामावर परतणार नाहीत.

राजस्थान : अजमेरमध्ये पोलिसांची गाडी जाळली; अनेक मार्गांवर रोडवेज-खासगी बसेस थांबल्या

जयपूरसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये फळे, भाजीपाला, दूध आणि पेट्रोलचा तुटवडा सुरू झाला असून शहर बसची चाकेही ठप्प झाली आहेत. टॅक्सी चालकही संपात सहभागी झाले आहेत. अजमेरच्या भिनाय भागात संतप्त जमावाने सरकारी वाहन पेटवून दिले आणि एका खासगी हॉटेलची तोडफोड केली.

01 जानेवारी, : 900 बस धावल्या नाहीत, पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी

(1 जानेवारी) छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, यूपी आणि पंजाबमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, दुर्ग, सुरगुजा, जगदलपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये बसेस स्टँड सोडल्या नाहीत. तर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 900 बस धावल्या नाहीत. भोपाळमध्ये जेव्हा लोक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आले तेव्हा पंपांवर मोठी गर्दी झाली होती. बालाघाटातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागला.

31 डिसेंबर, : गुजरातमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज

गुजरातमध्ये ट्रक चालकांनी राजकोट-अहमदाबाद महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला, परिणामी वाहतूक कोंडी झाली. यावेळी गर्दीतील काही लोकांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यात काही लोक जखमी झाले. येथे काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

30 डिसेंबर, सरकारने हिट अँड रन कायद्याचा विचार करावा

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) हिट अँड रन कायदा अधिक कडक करण्यास विरोध केला आहे. संघटनेच्या आवाहनावरच चक्का जाम आणि संप सुरू झाला आहे. AIMTC ची पुढील बैठक 10 जानेवारीला होणार आहे. यामध्ये सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यांची बाजू सरकारसमोर कशी मांडायची, असा निर्णय घेण्यात येणार आहे.

सर्वसामान्य समाजातील मुलांना प्रशासनात येऊ नये म्हणून मनुवादी षडयंत्र-अतुल लोंढे

MPSC च्या मुख्य परिक्षेपर्यंत महत्वाच्या पदांची जाहिरात काढा अन्यथा रस्त्यावर उतरू

केवळ २०५ किरकोळ पदांची जाहिरात काढून MPSC कडून विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा.

MPSC च्या परीक्षा पद्धतीविरोधात आंदोलन केल्याचा बदला घेता का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिक्षेत पास करण्यासाठी पैशांची मागणी करणा-या बायनरी सॅाफ्टवेअर कंपनीवर तात्काळ कारवाई करा.

मुंबई, दि. २ जानेवारी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शिंदे-पवार-फडणवीस सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला आहे. MPSC ने नुकतीच केवळ २०५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधिक्षक, तहसीलदार सारख्या प्रशासनातील महत्वाची पदे नाहीत. MPSC साठी सर्वसामान्य गोरगरीब व ग्रामीण भागातील ३२ लाख विद्यार्थी तयारी करत आहेत, त्यांची घोर थट्टा आहे. मुख्य परिक्षेपर्यंत महत्वाच्या पदांची जाहिरात प्रसिद्ध करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा खणखणीत इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले की, शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ७५ हजार पदांचा लॉलीपॉप दाखवला आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मात्र थट्टा चालवली आहे. एमपीएससीची नवीन परिक्षा पद्धत दोन वर्षांनी लागू करावी यासाठी विद्यार्थ्यांनी मध्यंतरी मोठे आंदोलन केले होते, एमपीएससी व भाजपा सरकार या आंदोलनाचा बदला घेत आहे का? भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? एमपीएससीने सर्व पदांची एकच परीक्षा घेण्याची भूमिकाही घेतली होती, अशा कल्पना कोणाच्या ‘सुपीक’ डोक्यातून येतात? सरकारने आधी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची तयारी केली होती. जळगाव जिल्ह्यात तर तहसीलदार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात दिला होती. आता तर एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांना थेट सह सचिव पदांवर थेट नियुक्ती केली जात आहे. UPSC मधून नियुक्ती झाल्यानंतर १६ वर्षांच्या सेवेनंतर या पदावर वर्षी लागते पण आता काही मुलांसाठी थेट भरती केली जात आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांना प्रशासनात संधी डावलण्याचे हे षडयंत्र आहे.
राज्यात तब्बल २.५ लाख पदे रिक्त आहेत पण सरकार या पदांची भरती करत नाही. ७५ हजार पदांची भरती करण्याचे लॉलीपॉप दिला पण अद्याप भरती केली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रशासकीय सेवेसाठी पद भरती केली जाते त्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा भंग केला जात असून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली आहे. सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून मुलांना न्याय द्यावा असेही लोंढे म्हणाले.

पास होण्यासाठी विद्यापीठात पैशांचा बाजार !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परिक्षेत पास होण्यासाठी पैसे द्यावे लागतात. परीक्षा दिल्यानंतर निकालात विद्यार्थ्यांना १-२-४-८ असे मार्क्स मिळतात व फेरतपासणीसाठी पैसे भरल्यानंतर हेच मार्क्स ४५-५०-५५ असे पडतात, अशी माहिती विद्यार्थांनी आमच्याशी संपर्क साधून दिली आहे व यासंदर्भातील पुरावेही दिले आहेत. Binary software company ही खाजगी कंपनी या विद्यापीठाच्या परिक्षांच्या पेपर तपासणीचे काम करते, अशा भ्रष्ट कंपनीवर कारवाई करून या कंपनीला काळ्या यादीत टाकले पाहिजे. एका विद्यार्थ्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे विद्यार्थ्याच्या पालकांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. गंभीर बाब म्हणजे हे पालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास गेले असता ५० हजार रुपये आणून ते द्या व पैसे स्विकारताना कारवाई करु असा अजब सल्ला दिला गेला. गरीब पालक ५० हजार कुठून आणणार? असे प्रकार थांबले पाहिजेत. पास होण्यासाठी पैसे द्यावे लागणे हे अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राज्यपाल महोदयांनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

काँग्रेसही फुटेल राम मंदिर सोहळ्याच्या आधी किंवा नंतर; अंजली दमानिया यांचा मोठा दावा

मुंबई-पुढील 30 दिवसांत राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोट्स घडण्याची शक्यता आहे. हे आगामी निवडणुकांच्या अगोदर होईल. काँग्रेसही फुटेल. या घडामोडी राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी किंवा नंतर घडेल, असे त्या म्हणाल्या.

आगामी काळात भाजप काँग्रेस फोडेल. यामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार नाही. परिणामी आमच्यासारख्यांना विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल. लढावे लागेल. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेत असल्याचे पाहून दुःख होते. वेदना होतात. कधीकाळी हीच भाजप भ्रष्टाचाराविरोधात लढायची का? असा सवाल याविषयी आमच्या मनात उत्पन्न होत आहे, असे अंजली दमानिया मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, ज्या लोकांना राजकारणातून बाजूला फेकण्याची गरज आहे त्यांना देवेंद्र फडणवीस मोठे करत आहेत. मनोज जरांगे यांच्यामागे एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जातो. पण मला तसे वाटत नाही. यापूर्वी मी एकनाथ खडसे व अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याविरोधात लढा दिला. त्यावेळी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लढत असल्याचा आरोप झाला. याऊलट आज मी फडणवीस यांच्याविरोधात लढत असताना पुन्हा लोक तर्कवितर्क उपस्थित करतात, असे त्या म्हणाल्या.

मनोज जरांगेंनी फुले उधळून घेणे थांबवावे

अंजली दमानिया यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुकही केले. जो कुणी लढतो त्यांना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावेच लागते. पण एवढा मोठा लढा उभा केल्याबद्दल जरांगे यांचे कौतुक वाटते. मराठा आरक्षणासाठी एखादी व्यक्ती लढा देत असेल तर त्याचे कौतुक करायला हवे. एवढा मोठा लढा उभा करणे ही खाऊची गोष्ट नक्कीच नाही. पण जरांगे पाटलांवर ज्या प्रकारे पुष्पवृष्ट होते, 250 जेसीबी लावून फुले उधळली जातात हे जरांगेंनी स्वतःहून थांबवले पाहिजे. आपण आपल्या लढ्याला तत्वे ठेवली तर खरे कोण आणि खोटे कोण? हे लोकांनाही कळते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आधार नोंदणी शिबिरांचे आयोजन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

पुणे दि.२: प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत विविध लाभांसाठी लाभार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक असून त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांमध्ये आयुष्मान कार्ड नोंदणी, जनधन बँक खाते उघडणे यासाठीही नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.चव्हाण म्हणाले, स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी शासकीय जागेबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे त्वरीत पाठवावा. वीज नसलेल्या वस्त्यांवर वीज देण्याबाबत आठवड्यात नियोजन सादर करावे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय बैठकीत योजनेअंतर्गत ११ बाबींचा आढावा घ्यावा.

महिला बचत गटातील सदस्य आणि युवकांना कौशल्याचे प्रशिक्षण देण्याबाबत तयारी करावी. वैद्यकीय उपकेंद्र नसलेल्या गावातील आदिवासी बांधवांच्या वस्त्यांवर फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी श्रीमती आखाडे आणि श्रीमती कडू यांनीदेखील योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.

आंबेगाव तालुक्यात २६, भोर ३०, मावळ ९१, मुळशी २७, जुन्नर ८, खेड ३४ आणि वेल्हे तालुक्यात ११ गावे अशा एकूण २२६ गावात ही योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीला खेड, जुन्नर, आंबेगाव आणि भोरचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढून घ्या , अन्यथा …

पुणे, दि. २ : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील अनधिकृत अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये कि.मी. ८ ते कि.मी. २५२.३५० दरम्यान लगतच्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे.

त्यामुळे या लांबीदरम्यान केलेली अनधिकृत अतिक्रमणे, बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्यावतीने यांच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेतील ७ मराठी चित्रपटांची घोषणा

पुणे –

‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धेमधील ७ चित्रपटांची घोषणा आज महोत्सवाचे संचालक डॉ, जब्बार पटेल यांनी केली.

आज (२ जानेवारी २०२४) दुपारी २ वाजता महोत्सवाच्या  अधिकृत वेबसाईटवर या चित्रपटांची माहिती प्रदर्शित झाली आहे.  

या महोत्सवात मराठी चित्रपटांच्या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्यूरी करतात. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटास ५ लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम’ पुरस्कार दिला जातो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’, ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ आणि ‘सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारा’स प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात.

१८ ते २५ जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’ होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सवात दरवर्षी निवडले जाणारे मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या विविध भागातील युवकांनी तयार केलेले असतात आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतात, असा अनेक वर्षांचा अनुभव असून, याही वर्षी ही परंपरा कायम राहील, असा विश्वास डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केला. 

महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शुक्रवारी २३ डिसेंबरपासून या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० फक्त आहे.

स्पर्धेतील मराठी चित्रपट

१ वल्ली – दिग्दर्शक: मनोज शिंदे

२. स्थळ – दिग्दर्शक: जयंत दिगंबर सोमलकर

३. भेरा –  दिग्दर्शक: श्रीकांत प्रभाकर

४. श्यामची आई –  दिग्दर्शक: सुजय सुनील डहाके

५. नाळ भाग २ – दिग्दर्शक: सुधाकर रेड्डी यक्कंटी

६. छबिला – दिग्दर्शक: अनिल अमृत भालेराव

७. जिप्सी – दिग्दर्शक: शशि चंद्रकांत खंदारे

कायदा मागे घ्या, अन्यथा देशभर तीव्र चक्काजाम आंदोलन करू : बाबा कांबळे

लोणी येथील पेट्रोल, डिझेल वाहतूक धारकांचा संप स्थगित. तीन जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या विषयी निर्णय घेणार असल्याचेही ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.

सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये विविध ठिकाणी झालेल्या लाठी चार्ज चा जाहीर निषेध

पुणे (दि. २ जानेवारी २०२४) ‘हिट अँड रन २०२३” या नवीन कायद्यानुसार अपघात प्रसंगी पळून जाणाऱ्या चालकाला दहा वर्षे शिक्षा व लाखो रुपये दंड आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णया विरोधात ट्रक, टेम्पो, बस व सर्व प्रकारच्या
चालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
या मुळे देशातील सुमारे २५ कोटी चालकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. हा काळा कायदा रद्द करावा आणि चालकांच्या इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्या यासाठी बुधवारी ३ जानेवारी पासून दिल्ली मध्ये जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील ७५० पेक्षा जास्त संघटनाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो चालक दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती
ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक आनंद तांबे, महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी एकनाथ ढोले पाटील, सचिन तांबे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतच पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख,…… आदी उपस्थित होते.


मंगळवारी पुणे आणि पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास बाबा कांबळे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता पुष्पहार अर्पण करून प्रतिनिधी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
जे चालक दिल्लीमध्ये येऊ शकणार नाहीत त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर बुधवारी सकाळी दहा वाजता आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन द्यावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.
देशभरात एकूण 22 ते 25 कोटी चालक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच ऑटो रिक्षा चालकांचा समावेश आहे. या चालकांच्या अनेक वर्षांपासून विविध मागण्या आहेत. त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून या मागण्या मान्य करण्यासाठी आता देशभरातील चालकांच्या ७५० संघटना एकत्रितपणे जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत.

अनेक ठिकाणी चालकांनी काम बंद आंदोलन पुकारून सेवा स्थगित केली आहे. परंतु हे आंदोलन करत असताना कोणत्याही शासकीय, सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ देऊ नये. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या मागणीचे निवेदन द्यावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.

संघटनेच्या मागण्या १) अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा.
२) देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
३) राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा.
४) सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा.
५) दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे.
देशभरामध्ये ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो सह सर्व प्रकारचे २५ कोटी चालक, मालक आहेत. या घटकांना कोणती सामाजिक सुरक्षा नाही. त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी. यासाठी केंद्र सरकारने वेलफेअर बोर्ड आणि राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा.


ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा:फळे आणि भाजीपाला महाग, हिट अँड रन कायद्यातील बदलाला विरोध

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान म्हणाले, ‘वाहतूकदारांनी अद्याप संपाची घोषणा केलेली नाही. मंगळवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. सध्या वाहनचालकच वाहने सोडून खाली उतरत आहेत. इतरांनाही वाहन चालवू देत नाहीयेत.

हिट अँड रन प्रकरणी कायद्यातील नवीन तरतुदींच्या निषेधार्थ देशभरातील ट्रकचालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावर उभी आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.

मध्यप्रदेश, राजस्थानसह 10 राज्यांमधून पेट्रोल आणि डिझेल पंप कोरडे पडल्याची माहिती आहे. येथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. फळे, भाजीपाला, दूध आणि कृषी मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी प्रशासन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वाहतूकदारांशी संपर्क साधत आहे.