पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषदेची नवीन कार्यकारिणी दि. ०१.०१.२०२४ रोजी स्थापित झाली. परिषद व नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. प्रमोद त्रिंबक रावत, उपाध्यक्षपदी अॅड. अशोक रामराव पलांडे यांची निवड झाली. तसेच संस्थेचे कार्यवाह पदी श्री. धनंजय अनंत कुलकर्णी यांची निवड सर्वानुमते झाली.
संस्थेच्या परिषद व नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रमोद त्रिंबक रावत हे पेशाने नामवंत व्यावसायिक असून गेली अनेक वर्षे पुण्यातील रावत फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचे संस्थापक म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच उपाध्यक्ष अॅड. अशोक रामराव पलांडे हे कायदेतज्ञ आहेत. श्री. धनंजय अनंत कुलकर्णी हे संस्थेचे आजीव सदस्य असून त्यांची दुसऱ्यांदा संस्थेच्या कार्यवाह पदी निवड झाली आहे.
याव्यतिरिक्त अॅड. श्रीमती राजश्री ठकार, डॉ. रवींद्र आचार्य, श्री. खेमराज रणपिसे, श्री. गणेश हिंगमिरे, डॉ. शरद आगरखेडकर, श्री. मकरंद पाटील, श्री. अनिल भोसले, डॉ. श्रीमती प्रीती अभ्यंकर, श्री. मिलिंद कांबळे, श्री. राजेंद्र जोग, सी. ए. विवेक मठकरी, श्री. अमित कुलकर्णी (सर्व पुणे), श्रीमती उषा मराठे, डॉ. सुषमा घुमरे (दोन्ही मुंबई), श्री. अनंत जोशी, श्री. अमित कुलकर्णी, सी. ए. सारंग कोल्हापुरे (सर्व सातारा) आणि डॉ. विश्राम लोमटे, श्री. रवींद्र ब्रम्हनाळकर (दोन्ही सांगली), अशी बिनविरोध निवड झालेल्या २१ सदस्यांची नावे आहेत. सर्व नवनिर्वाचित सदस्यांची मुदत डिसेंबर २०२८ पर्यंत असणार आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे च्या परिषद व नियामक मंडळाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद त्रिंबक रावत यांची निवड.
जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
पुणे, दि. १ : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ रविवारी (३१ डिसेंबर) जुन्नर नगरपरिषद येथून करण्यात आला. जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १३ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतीत ३१ डिसेंबर २०२३ पासून तळागळातील लाभार्थ्यांना चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे.
जुन्नर शहरात झालेल्या कार्यक्रमात सुमारे पाचशे लाभार्थ्यांनी सहभागी होत वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती घेतली. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), दिव्यांग बांधव कल्याण योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान इत्यादी नागरी भागातील योजनांची माहिती यावेळी नागरिक व लाभार्थी यांना देण्यात आली.
विकसित भारत संकल्प यात्रा नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात १४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद प्रशासनचे सह आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.
नितीन करीर हे मुख्य सचिव पदाची प्रतिष्ठा उन्नत राखतील-मुख्यमंत्री शिंदे
मुंबई- राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव श्री.नितिन करीर यांची आज मंत्रालयात भेट घेऊन त्यांना मुख्य सचिव पदाच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. नितीन करीर हे आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या बळावर मुख्य सचिव पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडून आपल्या पदाची प्रतिष्ठा उन्नत राखतील याची मला पूर्ण खात्री आहे.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे म्हटले आहे.
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची काल नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून काल सायंकाळीच मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.


नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. करीर यांनी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. डॉ. करीर एमबीबीएस आहेत. १९८८ मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेतनिवड झाली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिका आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही काम केले आहे.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी मुख्य सचिव डॉ. करीर यांचे अभिनंदन केले.

०००
नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी.!
‘एक्सपोसॅट’च्या यशासाठी इसरोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे केले कौतुक
मुंबई, दि.१: अवकाशातील वेधशाळेसह, दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छीत कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था – इसरोने आज नववर्षाच्या प्रारंभीच विक्रम केला आहे. इसरोच्या या ‘एक्सपोसॅट’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इसरोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
विशेष म्हणजे या मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयाचा आहे. यासाठीही मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातील या वैज्ञानिक उपक्रमशीलतेचे कौतुक करून यात सहभागी संशोधक विद्यार्थी, अध्यापक- तज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे.
‘नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इसरोने भारतीयांना एक वैज्ञानिक गिफ्ट दिली आहे. चंद्रयान – ३ मोहिम, आदित्य – एल १, गगनयान १ या लागोपाठ यशस्वी मोहिमांनी इसरोने भारतीयांची मान गौरवाने उंचावली आहे. या यशा पाठोपाठ आता अवकाश संशोधनाला मोठी गती मिळेल. ‘एक्सपोसॅट’च्या यशाने भारतीयांचा अवकाश संशोधनातील आत्मविश्वास उंचावला आहे. या यशामागे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैज्ञानिक आणि अवकाश संशोधनाला पाठबळ देण्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी इसरोच्या या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचे, संशोधक, अभियंते, तंत्रज्ञ तसेच तमाम विज्ञान जगताचे अभिनंदन केले आहे. इसरोच्या पुढील सर्वच मोहिमांना, प्रयोगांसाठी सुयश चिंतिले आहे.
नवीन मोटार वाहन कायदा मागे घ्या अन्यथा …सध्या पेट्रोल डिझेल वाहतूक धारकांचा संप तूर्तास मागे
तीन तारखेपर्यंत कायदा मागे घ्या अन्यथा …
संघटनेच्या मागण्या –
1) अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा.
2) देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
३) राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा.
4) सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा.
५) दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे.
पुणे-हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने विजय जाहीर केले असून, यात अपघात प्रसंगी पळून जाणाऱ्या ड्रायव्हरला दहा वर्षे शिक्षा व लाखो रुपये आर्थिक दंड फुटण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णय विरोधामध्ये,ट्रक टेम्पो बस व सर्व प्रकारचे ड्रायव्हर यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे. लोणी काळभोर येथे देखील हिंदुस्तान पेट्रोलियम इंडियन ऑइल पेट्रोलियम व सर्व प्रकारच्या डिझेल पेट्रोल वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर यांनी आज आंदोलन केले,परंतु डिझेल पेट्रोलही आजची अत्यावश्यक सेवा आहे ती बंद करू नका अशा प्रकारचे आव्हान प्रशासनाने केल्यामुळे तसेच कंपनीच्या वतीने देखील विनंती केल्यामुळे हे आंदोलन तीन तारखेपर्यंत स्थगित केले असल्याची माहिती बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिले ,
3 जानेवारी 2024 पासून दिल्ली येथे जंतर मंतरला आंदोलन सुरू होणार आहे या आंदोलनामध्ये पुढील निर्णय घेणार असल्याचेही बाबा कांबळे म्हणाले,यावेळी ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक आनंद तांबे, महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी एकनाथ ढोले, पाटील,सचिन तांबे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संघटक लखन लोंढे, प्रकाश यशवंते, नदीम शेख,आधी उपस्थित होते,
शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलरेल
नाट्य संमेलनातील भरगच्च कार्यक्रमांची पत्रकार परिषदेत घोषणा
पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी -चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. हे शतक महोत्सवी नाट्य संमेलन असल्याने वैशिष्टपूर्ण असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनात जवळपास ६४ कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, परिसंवाद, एकांकिका,प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची रेलचेल असणार आहे. श्री मोरया गोसावी संकुल, केशवनगर चिंचवड येथे या नाट्य संमेलनाचा मुख्य सभा मंडप असणार आहे. तर बालनाट्य नगरी, भोईर नगर येथे आहे शिवाय पिंपरी -चिंचवड शहरातील चार नाट्यगृहांमध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती नाट्य संमेलनाचे आयोजक, अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, धारिवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे संचालक प्रकाश धारिवाल, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेश साकला, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर, राजेंद्र शिंदे, सुनिल महाजन, सुहास जोशी,पिंपरी चिंचवड महापलिका, आयुक्त शेखर सिंह, कलारंग प्रतिष्ठान, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, नाट्य संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी प्रणव जोशी, आकाश थिटे, मनोज डाळीम्बकर , सदस्य उपस्थित होते.
बालनाट्य मंडप, भोईर नगर -५ जानेवारी २०२४ शुक्रवार (पूर्वसंध्या)
रंगमंच उद्घाटन कार्यक्रम – सायं. ५ ते ५.१५
हस्ते – मा. सुप्रियाताई सुळे, खासदार
विश्वस्त- मा. श्री. शशी प्रभू, मा. डॉ. रवि बापट, मा. श्री. मोहन जोशी, मा. श्री. अशोक हांडे, मा. डॉ. गिरीश गांधी.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कार्यकारी समिती : प्रशांत दामले, अध्यक्ष, भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष (उपक्रम), नरेश गडेकर, उपाध्यक्ष (प्रशासन)
अजित भुरे, प्रमुख कार्यवाह, सतीश लोटके, कोषाध्यक्ष, विजय चौघुले, संमेलन समिती प्रमुख, सुनील ढगे, सहकार्यवाह, दिलीप कोरके, सहकार्यवाह, समीर इंदुलकर, सहकार्यवाह
नाटक – दशावतार – आर एम डी इंटरनॅशनल (सी बी एस ई) – सायं. ५.३० ते ६.३०
विठ्ठल तो आला आला- ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय – सायं ६.१५ ते ७.३०
रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड- ५ जानेवारी २०२४
सायं. ५:३०-८:३० व्यावसायिक नाटक – अस्तित्व
मुख्य सभामंडप
नाट्य दिंडी- ६ जानेवारी (सकाळी ७ वा.) आरंभ : मोरया गोसावी मंदिर भैरवनाथ मंदिर गांधी पेठ चाफेकर चौक- भोई आळी – पॉवर हाऊस चौक – तानाजी नगर काकडे पार्क- मुख्य सभा मंडळ मोरया गोसावी क्रीडांगण.
उद्घाटन सोहळा, मुख्य सभामंडप (सकाळी ११ वा.)
प्रेमानंद गज्वी (अध्यक्ष, ९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन) यांच्या उपस्थितीत. यावेळी प्रमुख पाहुणे शरद पवार (स्वागताध्यक्ष), एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), अजित पवार (उपमुख्यमंत्री), डॉ. जब्बार पटेल (नियोजित अध्यक्ष, १०० वे अ.भा. मराठी नाटय संमेलन), उदय सामंत (मुख्य निमंत्रक, उद्योगमंत्री), सुधीर मुनगंटीवार (सांस्कृतिक मंत्री), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदी उपस्थित असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते नाना पाटेकर, डॉ. पी डी पाटील, प्रकाश धारीवाल आदी उपस्थित असतील.
शिवराज्याभिषेक(प्रभो शिवाजी राजा-१५० कलाकारांसह)- ३५० वर्षपूर्ती निमित्त (सायं. ४ ते ५:१५)
संगीत कार्यक्रम (रात्री ६. ३० ते ८. ३०)
बालनाट्य नगरी, भोईर नगर – ६ जानेवारी
उदघाटन कार्यक्रम – दुपारी ३ ते ४
हस्ते : अभिनेत्री निलम शिर्के सामंत,अभिनेत्री सविता मालपेकर, प्रकाश पारखे, सचिन भोसले, बाळासाहेब भोसले, सुलभा उबाळे, सचिन चिखले, कविता अल्हाट.
गजरा नाट्य छटांचा (सायं. ४ ते ४. ४५)
क्लाउन माईम ॲक्ट (सायं. ५ – ६)
व्यावसायिक बालनाट्य – बोक्या सातवंडे (सायं ६.३० ते ८.३०)
प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड -६ जानेवारी
उद्घाटन कार्यक्रम – गणेश वंदना (दु. २ ते २.१५)
हस्ते : खासदार श्रीरंग बारणे, शहराध्यक्ष,भाजपा पिं.चिं शंकर जगताप
नियमक मंडळ सदस्य – दिलीप कोरके, सुनील ढगे
प्रायोगिक नाटक – पुनरुत्थान (दु. २. ३० ते ४. ३०)
एका लग्नाची पुढची गोष्ट (सायं ५ ते ८ )
संगीत नाटक – कट्यार काळजात घुसली (रात्री ९ ते ११)
अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी -६ जानेवारी
रंगमंच उद्द्घाटन कार्यक्रम – (दु. ३.३० ते ३.४५)
हस्ते : खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे,
नियमक मंडळ सदस्य – अजित गव्हाणे, दादा साळुंखे, विशाल शिंगाडे
व्यावसायिक नाटक – ‘करून गेला गाव’ (सायं. ५ ते ८ )
व्यावसायिक नाटक – मर्डरवाले कुलकर्णी (रात्री. ९ ते १२)
ग. दि. माडगूळकर- मुख्य रंगमंच, निगडी -६ जानेवारी
रंगमंच उद्घाटन कार्यक्रम – गणेश वंदना (दु. २ ते २. ३०)
हस्ते : आमदार आण्णा बनसोडे, आमदार उमाताई खापरे
नियमक मंडळ सदस्य – नरेश गडेकर, संतोष लोटके
नाटक – जोडी तुझी माझी (दु. २. ३० ते ३:३०)
हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम (सायं. ४ ते ७ )
संगीत नाटक – संगीत सौभद्र (सायं ८ ते ११ )
ग. दि. माडगूळकर- निकट रंगमंच, निगडी -६ जानेवारी
रंगमंच उद्द्घाटन कार्यक्रम – गणेश वंदना (दु. ३:३० ते ३. ४५ )
हस्ते : आमदार आण्णा बनसोडे,
नियामक मंडळ सदस्य : मा. दीपक रेगे, मा. समीर हंपी, मा. सत्यजित धांडेकर
प्रायोगिक नाटक-दैवी एक रहस्य – (दु. ४ ते ७ )
एकांकिका: सिनेमा (सायं.७ ते ८ )
एकांकिका – चित्रंगदा – ( रात्री ८ ते ९)
एकांकिका: हॅलो इंस्पेक्टर (रात्री ९ ते १०)
एकांकिका: फेलसेफ (रात्री १०:०० ते ११)
निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव- ६ जानेवारी
रंगमंच उद्घाटन कार्यक्रम – (दु. ३. ३० ते ३. ४५)
हस्ते : आमदार अश्विनीताई जगताप, आमदार सुनील शेळके
नियामक मंडळ सदस्य – सुशांत शेलार, संजय देशपांडे
व्यावसायिक नाटक – तुझे आहे तुजपाशी (सायं ५ ते ८ )
व्यावसायिक नाटक – दादा एक गुडन्यूज आहे (रात्री ९. ते १२)
मुख्य सभा मंडप -७ जानेवारी २०२४, रविवार
गणेश वंदना (स. ९ ते ९. ३०)
परिसंवाद व कार्यक्रम (स. १० ते ११ . ३०)
प्रकट मुलाखत (सायं ३ ते ५)
नाट्य संमेलन हस्तातर सोहळा (सायं ५ ते ७)
प्रमुख अतिथी देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री), सन्माननीय उपस्थिती प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष – महाराष्ट्र साहित्य परिषद), कैलास कदम, शंकर जगताप, सचिन भोसले, धम्मराज साळवे, तुषार कामटे, सचिन चिखले, निलेश तरस, चेतन बेंद्रे, राजेंद्र मुथा, स्वप्नील कांबळे, चंद्रकांत लोढे, राजेंद्र जैन.
संगीत रजनी – अवधूत गुप्ते – रात्रौ ८ पासून पुढे
बालनाट्य नगरी, भोईर नगर-७ जानेवारी
माझी माय -( सकाळी ९:०० ते ९:४५)
ढब्बू ढोल रिमोट गोल (सकाळी १० ते १२)
पपेट शो – पपेटरी हाऊस मुंबई (दु. १२. १५ ते १२. ४५)
गोष्ट रंग (दु. २ ते २.४५ )
गोष्ट सिम्पल पिल्लाची – ग्रीपस थिएटर (सायं ३:३० ते ४:००)
बालगीते – ( सायं ५ ते ६)
प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड -७ जानेवारी
गणेश वंदना (सकाळी ९ ते ९. ३०)
व्यावसायिक नाटक – अमेरिकन अल्बम (दु. ११ ते २)
व्यावसायिक नाटक – खरं खरं सांग (सायं. ५ ते ८ )
प्रायोगिक नाटक-शहर कुंभकर्ण (रात्री ९ ते १२)
अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी -७ जानेवारी
गणेश वंदना (स. ९ ते ९.३०)
लावणी महोत्सव (दु. १०. ३० ते १२. ३०)
भारुड – डॉ भावार्थ देखणे ( दु.३ ते ४:३०)
विशाल शिंगाडे (सायं. ५ते ८)
लोकधारा (रात्री ९ ते १२)
ग. दि. माडगूळकर १, निगडी – ७ जानेवारी
काव्य-पहाट आणि कविता (सकाळी ६ ते ९)
गणेश वंदना (स. ९ ते ९. ३०)
प्रायोगिक नाटक – तेरवं (सकाळी १० ते १२)
प्रायोगिक नाटक – उच्छाद (दुपारी १ ते ३)
तपस्विनी नृत्य कार्यक्रम (दुपारी ३. १५ ते ३. ३०)
व्यावसायिक नाटक- घाशीराम कोतवाल (सायं. ५ ते ८)
प्रायोगिक नाटक – गुड बाय किस (रात्री ९ ते १२)
ग. दि. माडगूळकर- निकट सभामंडप, निगडी -७ जानेवारी
एकांकिका : सय – सरी (सकाळी ९ ते १०)
प्रायोगिक नाटक: क्लिक माईम अॅक्ट (सकाळी १० ते १२)
एकांकिका: परमेश्वर . कॉम (दुपारी १:०० ते २:००)
एकांकिका: अ डील (सायं. २ ते ३ )
एकांकिका: बीइंग अँड नथिंग (सायं.३ ते ४)
एकांकिका: मसनातलं सोनं (सायं. ४:०० ते ५)
एकांकिका: कूपन (रात्री ५ ते ६)
प्रायोगिक नाटक – तप्तपदी -( सायं ७ ते १०)
निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव- ७ जानेवारी
गणेश वंदना (सकाळी ९ ते ९. ३०)
जोडी तुझी माझी – मुलाखत कार्यक्रम (सकाळी १०. ३० ते १२. ३०)
व्यावसायिक नाटक – गेम ऑफ पॉवर (दुपारी १.३० ते ४.३०)
व्यावसायिक नाटक – चाणक्य (सायं. ५. ३० – ८. ३०)
प्रायोगिक नाटक – रा था (मध्य प्रदेश) (रात्री ९ ते १२)
मुख्य सभामंडपात दुसऱ्या दिवशी ७ जानेवारी २०२४ रोजी, दु ३: ३० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘नाटक आणि मी’ ही खास मुलाखात होणार असून ठाकरे यांच्याशी दीपक करंजीकर संवाद साधणार आहेत.
संमेलन हस्तांतरण सोहळा
रविवार, दिनांक ७ जानेवारी २०२४, सायं ५ वाजता
प्रमुख अतिथी – मा. श्री देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
नाट्यसंमेलनामधील सर्व सभागृह व प्रवेशद्वार यांना देण्यात आलेली नावे पुढीलप्रमाणे :
मुख्य सभामंडप,
उदघाटन व हस्तांतरण कार्यक्रम स्थळ, काकडेपार्क, चिंचवडगाव
पहिली कमान : क्रांतिवीर चापेकर बंधू प्रवेशद्वार
महन साधू मोरया गोसावी प्रवेशद्वार
‘सूर्यमाला सभामंडप’
आद्यनाटककार विष्णुदास भावे रंगमंच
बालनाट्यरंगभूमी, भोईरनगर
‘बालनाट्यरंगभूमी नंदनवन सभामंडप’
प्रेक्षक प्रवेशासाठी : कै. राजा गोसावी प्रवेशद्वार
कलाकार प्रवेशासाठी : कै. रत्नाकर मतकरी प्रवेशद्वार
कै. सुधाताई करमरकर रंगमंच
प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवडगाव
प्रवेशद्वार – कै. धोंडूतात्या चिंचवडे
कै. पद्माकर कुलकर्णी रंगमंच
नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, सांगवी
कै. रामचंद्र देखणे, प्रवेशद्वार
कै. पु. ल. देशपांडे रंगमंच
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी
कै. शाहीर योगेश विष्णुरकर प्रवेशद्वार
कै. शाहीर साबळे रंगमंच
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, मुख्य रंगमंच
प्रमुख प्रवेशद्वार : कै. अण्णासाहेब मगर प्रवेशद्वार
कै. विक्रम गोखले रंगमंच
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निकट रंगमंच
कै. दत्ता मिरजकर रंगमंच
कायदा निर्मिती प्रक्रिया हा ज्ञान समृद्ध करणारा अनुभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 1 :- महाविद्यालयात कायदा शिकताना केवळ कायद्याची भूमिका समजते. मात्र, कायदा कसा तयार होतो. त्यामागचे तत्व काय, त्यामागे काम करणारी यंत्रणा कोणती याच्या माहितीसोबतच प्रत्यक्ष कायदा तयार करण्याचा अनुभव कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विधी विधान आंतरवासिता उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. ज्ञान समृद्ध करणारी ही प्रक्रिया समजून घेणारा अविस्मरणीय अनुभव कायद्याचा अर्थ लावताना विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या आंतरवासिता विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेबाबत माहिती व्हावी व त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, त्यांच्या कार्यक्षेत्रातील करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग व्हावा यादृष्टीने विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेमध्ये दहा विद्यार्थ्यांकरिता सहा आठवड्यांचा आंतरवासिता उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आजपासून सुरु झालेल्या ‘विधी विधान इंटर्नशीप’च्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे केले. यावेळी निवड झालेल्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री श्री. फडणवीस मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील समिती कक्षात विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, विधी विधानचे सचिव सतीश वाघोले, विधी व परामर्शचे सचिव अमोघ कलौती, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, युवा पिढीचा थेट शासनाशी संबंध यावा, शासन – प्रशासन कसे चालते याची माहिती व्हावी आणि त्यांच्या नवनवीन संकल्पनांचा शासनालाही लाभ व्हावा या उद्देशाने मागील काळात सुरू केलेल्या सी. एम. फेलोचा लाभ शासनालाही झाला आहे. म्हणून विधी व न्याय विभागाचा मंत्री म्हणून विधी व न्याय विभागात अशा प्रकारची इंटर्नशीप सुरू करण्यासाठी प्रस्ताव येताच त्याला लगेच मान्यता दिली. हा स्तुत्य उपक्रम असून त्यासाठी त्यांनी विधी व न्याय विभागाचे अभिनंदन केले.
कायदा तयार करताना विविध गोष्टींचा विचार करावा लागतो. तो इतर कायद्याला अधिक्षेप करणार नाही, त्यात कोणतीही अस्पष्टता राहणार नाही, त्याचे नियम स्वयंस्पष्ट व्हावेत, याकडे लक्ष ठेवावे लागते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश काय आहेत याची काळजी घेऊन नवीन कायदा तयार होतो. त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेणे, त्याचा भाग होणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. केवळ कायदा समजून घेणेच नाही तर विधी व न्याय विभागाचे काम कसे चालते, विविध मते-मतांतरांची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. एकूणच विधी व न्याय विभाग हा शासनाचे बॅक बोन आहे. आपल्या संविधानाने अतिशय उत्तम व्यवस्था उभी केली आहे. चेक ॲण्ड बॅलन्ससोबतच अधिकारांचे विकेंद्रीकरण देखील आहे. या व्यवस्थेत शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी शिकून घ्याव्यात.
६०० अर्जदारांमधून १० विद्यार्थ्यांची निवड यासाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना येथे प्रात्यक्षिक करायला मिळणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसून त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. अनेक अनुभवी अधिकाऱ्यांचे व्याख्यान येथे होणार आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त बाबी शिकाव्यात. त्याचबरोबर विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विनियोजन विधेयक हे अतिशय महत्वाचे विधेयक कसे तयार होते हे सुद्धा शिकता येईल.
या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसे सामावून घेता येईल याचाही विभागाने विचार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सुद्धा हा उपक्रम सुरु केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. सहभागी आंतरवासिता विद्यार्थ्यांमध्ये प्रियांका बोरा, प्रणिता गिरडेकर, सौरा पाटील, मिहीर मोंडकर, वैश्विक करे, भार्गवी मुंडे, सानिया सावंत, कृष्णा शेळके, आकाश प्याती, वेदांती जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यावेळी सचिव श्री. वाघोले यांनी हा उपक्रम सुरु करण्यामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन सहसचिव सुप्रिया धावरे यांनी, तर आभार सहसचिव मुग्धा सावंत यांनी मानले.
आनंद मेळाव्यात रमत बालचमूंनी दिला सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्यावतीने आयोजन : सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबत नववर्षाच्या स्वागताकरिता आणि वेंकीज उद्योग समूहाचे संचालक व्यंकटेश राव यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदमेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन
पुणे : गणपती बाप्पाच्या पायापासून ते त्याच्या फेट्यापर्यंत तयार केलेली अत्यंत सुबक शाडू मातीची मूर्ती… गणपतीचे पाय, त्याचे मोठे पोट, त्याची लांब सोंड, सुपासारखे कान, झुबकेदार फेटा, त्याचे रेखीव दागिने बघण्यात बालचमू रमून गेले. गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक मुलांनी पाहिले. त्याचबरोबर डान्स, गाण्याचे सादरीकरण, हातावर काढलेले रंगीबेरंगी टॅटू आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेत बालचमूंनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत केले.
निमित्त होते, अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्या वतीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबत नववर्षाचे स्वागत करीत आणि वेंकीज उद्योग समूहाचे संचालक व्यंकटेश राव यांच्या वाढदिवसानिमित्त बुरूड आळी येथील म्हसोबा मंदिर येथे आयोजित आनंदमेळावा व स्नेहभोजनाचे. आनंद मेळ्यात मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांनी मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, पुणे शहरचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, माजी नगरसेवक प्रविण चोरबेले, वसंत मोरे, उद्योजक पृथ्वीराज भिंताडे, सारिका निंबाळकर, तेजस्विनी थिटे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. वंचित विकास संस्थेतील चिमुकल्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तब्बल ४०० जणांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
रवींद्र गायकवाड म्हणाले, लहान मुलांचे कार्यक्रम असेल तर आम्ही तो चुकवत नाही. कारण मुलांना पोलिसांचे त्यांच्या युनिफाॅर्मचे आकर्षण असते. पोलिसांना बघून त्यांना प्रोत्साहन मिळते. पोलीस हे मुलांसमोर आदर्श असतात, असे ही त्यांनी सांगितले.
प्रवीणकुमार पाटील म्हणाले, गरजवंतांपर्यंत पोहोचून योग्य व्यक्तीची मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम ही संस्था करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जावून त्यांच्या समसया ओळखून तुम्ही योग मदत पोहचविता हे कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवृत्ती जाधव म्हणाले, ट्रस्टच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. परंतु दरवर्षी निराधार चिमुकल्यांसोबत आनंद मेळावा स्नेहभोजन करण्याचा उपक्रम राबवित सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. प्रत्येकाची आनंद साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. परंतु आपण आपल्यासोबत समाजातील गरजू आणि निराधार घटकांचा विचार करायला हवा. सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच चांगले संकल्प मनाशी ठेऊन आपण नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
औद्योगिक वीजग्राहकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’
नववर्षापासून महावितरणची ग्राहकसेवा थेट औद्योगिक ग्राहकांच्या दारी
मुंबई, दिनांक १ जानेवारी २०२४ : नवीन वर्षाचे स्वागत करताना राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांच्या दारी जाऊन तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’ सुरु करण्यात येत आहे. याद्वारे औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी, इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येणार आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व सेवा कायम ठेवून नवीन वर्षानिमित्त ही अतिरिक्त सेवा सुरु करण्यात येत आहे. ¨स्वागत सेल°शी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पुर्तता करण्यासह विनाविलंब सेवा देणार आहेत.
राज्यासह महावितरणच्या महसूलाचा औद्योगिक ग्राहक प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे या ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सद्यस्थितीत महावितरणकडून औद्योगिक वर्गवारीच्या दरवर्षी सुमारे १२०० नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. महावितरणच्या एकूण महसूलात औद्योगिक ग्राहकांचा तब्बल ४६ टक्के वाटा आहे. औद्योगिक ग्राहकांचे प्रमाण दरवर्षी सुमारे ३ टक्क्यांनी वाढत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी औद्योगिक ग्राहकांसाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र सेवा देणारी यंत्रणा तयार करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात ¨स्वागत सेल°ची स्थापना करण्यात येत आहे व तसे परिपत्रक महावितरणतर्फे जारी करण्यात आले आहे. येत्या तीन दिवसांत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ¨स्वागत सेल° कार्यान्वित होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात किंवा महावितरणच्या मंडलस्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारित ‘स्वागत सेल’ कार्यान्वित होईल. या सेलचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता तसेच व्यवस्थापक किंवा उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. नवीन वीजजोडणी, जादा वीजभार या मागणीसह वीजपुरवठा व बिलिंगच्या तक्रारी किंवा प्रश्न मांडण्यासाठी जिल्हानिहाय ¨स्वागत सेल° साठी एक समर्पित संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी राहणार आहे. त्याची माहिती औद्योगिक ग्राहक व संघटनांना विविध माध्यमातून कळविण्यात येणार आहे. यासह इतर माध्यमाद्वारे महावितरणकडे प्राप्त झालेली तक्रार किंवा मागणी ही ¨स्वागत सेल°कडे पाठविली जाईल व त्याद्वारे कार्यवाहीला विनाविलंब सुरवात होईल.
नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी ‘स्वागत सेल’कडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधित औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती दिल्या जाईल. दोन कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाइन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही महावितरणकडून ग्राहकांच्या दारी जाऊन केली जाईल. त्यानंतर लगेचच स्थळ पाहणीच्या तांत्रिक अहवालानुसार फर्म कोटेशन देण्यासह नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल. यासोबतच वीजसेवा किंवा बिलिंगच्या प्राप्त तक्रारींचे सेवेच्या कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत किंवा त्यापूर्वीच निराकरण करण्यात येणार आहे.
औद्योगिक ग्राहकांसाठी महाराष्ट्र शासनाने ‘मैत्री पोर्टल’ कार्यान्वित केले असून त्याद्वारे महावितरणला नवीन वीजजोडणीचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होतात. तसेच महावितरणच्या स्वतंत्र पोर्टलद्वारे औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराच्या मागणी अर्जासह कागदपत्रे अपलोड करणे, अंदाजपत्रकीय शुल्काचा भरणा करणे, टेस्ट रिपोर्ट, करारनामा अपलोड करणे, अर्जाची सद्यस्थिती जाणून घेणे तसेच टोल फ्री संपर्क क्रमांक, ‘ऊर्जा’ चॅट-बोट, एक क्वेरी फॉर्म आदी सेवा उपलब्ध आहे. यासोबतच आता ‘स्वागत सेल’मुळे प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांना मिळणारी ग्राहकसेवा नवीन वर्षापासून आणखी गतिमान होणार आहे.
महावितरणची नव्या वर्षाची भेट-नवीन वीजजोडणी तात्काळ उपलब्ध
नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेमध्ये पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च महावितरण करणार
मुंबई, दिनांक १ जानेवारी २०२४ : कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी असे सक्त निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे.
कृषिपंप वगळून नवीन वीजजोडण्या देण्यासाठी नवीन सेवा जोडणी (New Service Connection – NSC), नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (Non DDF Consumer Contribution & Refund – CC&RF) तसेच समर्पित वितरण सुविधा (Dedicated Distribution Facility – DDF) अशा तीन योजना अस्तित्वात आहेत. यामध्ये वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजना अतिशय महत्वाची आहे. या योजने अंतर्गत नवीन वीजजोडणी देणे किंवा वीज भार कमी अधिक करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची व यंत्रणेची कामे महावितरणकडून करण्यात येतील. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. तर केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल.
मात्र राज्यात काही ठिकाणी नवीन सेवा जोडणीच्या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची महावितरणने गंभीर दखल घेत नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेचा ग्राहकांना सर्वप्रथम पर्याय देण्यात यावा असे सक्त निर्देश देण्यात आले आहे. तसेच या पायाभूत वीजयंत्रणेची कामे करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. क्षेत्रीय कार्यालयांनी वीजखांब, वितरण रोहीत्र, स्विच गिअर्स, वीजवाहिन्यांसह आवश्यक साधनसामग्री आपापल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध ठेवावी तसेच ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत. या योजनेमध्ये वीज भार वाढवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची कामे सुद्धा अंतर्भूत करण्यात आली आहेत.
यासोबतच नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (CC&RF) योजनेमध्ये अर्जदार ग्राहक स्वतःच्या खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे व देखरेखीखाली आवश्यक पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचे काम करतात. या खर्चाचा परतावा संबंधित वैयक्तिक अर्जदाराला किंवा ग्राहकांच्या गटाला मासिक वीजबिलांमध्ये समायोजित केला जातो.
नवीन वीजजोडणीच्या तिसऱ्या समर्पित वितरण सुविधा (DDF) योजनेमध्ये प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांनी किंवा अर्जदार ग्राहकांनी स्वतःच्या खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदारांद्वारे स्वतंत्र वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, उपकेंद्र, क्षमतावाढ आदी पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम केल्यास या वीजयंत्रणेची सुविधा संबंधित ग्राहकांसाठी समर्पित राहते. मात्र ही वीजयंत्रणा महावितरणकडे हस्तांतरित केली जाते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महावितरणकडे कायम राहते.
सद्यस्थितीत या तिन्ही योजनांद्वारे महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी महावितरण अधिकाऱ्यांकडून फक्त समर्पित वितरण सुविधा (DDF) योजनेचा पर्याय देण्यात येत असल्याचे निर्दशनास आले आहे. महावितरणाच्या धोरणानुसार यापुढे नवीन वीजजोडण्यांचे अर्ज तसेच भार वाढवणे/कमी करण्याचे अर्ज नवीन सेवा जोडणी (NSC) किंवा नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (CC&RF) योजनेमध्ये स्वीकारले जातील. या दोन्ही योजनांऐवजी समर्पित वितरण सुविधा (DDF) योजनेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांकडून तसा लेखी अर्ज घेऊनच त्यामध्ये कामे करण्याचे निर्देश महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहे.
१२ जानेवारीपासून थर्डआयआशियाई चित्रपट महोत्सवास प्रारंभ
महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा २० वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले चित्रपट सिटीलाइट सिनेमा, माहिम आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये दाखवले जातील.
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २० व्या आवृत्तीत, आशियाई स्पेक्ट्रम विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका येथील बारा चित्रपटांचा समावेश आहे आणि इराणमधील सात चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.
भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी, मराठी भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे. यात फॅमिली, डीप फ्रीझ, बिजया पोरे, या गोष्टीला नावच नाही, आत्मपॅम्पलेट, हाऊस ऑफ कार्डस, एपिसोड १३, सेयुज सनधन, आरोह एक प्रितिभी, मिनी, विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर, गोराई पाखरी या १२ चित्रपटांचा समावेश आहे.
मराठी स्पर्धा विभागात स्थळ (दिग्द. जयंत सोमाळकर), रघुवीर (दिग्द . निलेश कुंजीर), महाराष्ट्र शाहीर, (दिग्द. केदार शिंदे), स ला ते स ला ना ते (दिग्द. संतोष कोल्हे), जित्राब (दिग्द. तानाजी गाडगे), गिरकी (दिग्द. कविता दातीर, अमित सोनावणे), गाभ (दिग्द. अनुप जत्राटकर), टेरिटरी (दिग्द. सचिन श्रीराम), मदार (दिग्द. मंगेश बदार) या ९ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग असणार आहे. कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच मान्यवर ज्युरी सदस्यां बरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू होत असून www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवरूनही नोंदणी करता येईल.
अनुप जलोटा यांच्या भजनांनी जिंकली रसिकांची मने
पुणे : ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन… अच्युतम केशवम राम नारायणम… इतनी शक्ती हमें देना दाता… बोलो राम बोलो राम… जग में सुंदर है दो नाम… अशा भावभक्तीपर भजनांनी सरत्या वर्षाची सायंकाळ रसिकांना अनुभवायला मिळाली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने भारतीय संस्कृती आणि परंपरा, अभिजात संगीत, आरोग्य संपन्नता, परस्पर नातेसंबंध यांची ओळख युवा वर्गाला व्हावी, या हेतूने ‘सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात अनुप जलोटांच्या ‘भजनसंध्या’ कार्यक्रमातील बहारदार भजनांनीरसिकांची मने जिंकली. यावेळी अनुप जलोटा यांना गायन-संगीत कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्यदत्त सूर्यभारत राष्ट्रीय सन्मान २०२३’ प्रदान करण्यात आला.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया, लेखक किशनलाल शर्मा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, बावधन परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचे (एनआयपीएम) पदाधिकारी उपस्थित होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रशांत पितालिया यांनी केले.
प्रा. डाॅ. संजय बी. चोरडिया यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली. “जगभरात सुरु असलेल्या अशांततेच्या आणि नकारात्मक वातावरणामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पहायला मिळते. ती नकारात्मकता दुर करण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सकारात्मक वातावरण तयार होण्याची आज गरज आहे. अनुप जलोटाजींचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभते. त्यांच्याकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळते. आजही त्यांच्या सुमधुर भजनांनी वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
“या महोत्सवाची सुरुवात २५ डिसेंबर रोजी दिल्ली येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अटल मेमोरियल या ठिकाणी सुमनांजली वाहून करण्यात आली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया उपस्थित होते. संध्याकाळी महामानव पंडित मदन मोहन मालवीय यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञानभवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित कार्याच्या ११ खंडांच्या पहिल्या मालिकेचे प्रकाशन केले. महोत्सवात ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये दत्तजयंती सोहळा साजरा करण्यात आला. युवा कलाकारांचा सुरेल संध्या हा कार्यक्रम झाला. मुळशी तालुक्यातील सरपंचांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांगाना कॅलिपर्स वाटप, कॅन्सर तपासणी व जनजागृती, नेत्ररोग तपासणी, हृदयरोग, मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात आले. नरेंद्र नासिरकर यांचा ‘अटल नमो स्वरयात्रा’ हा विशेष कार्यक्रम झाला. जनसेवा फाऊंडेशनला भेट देत विद्यार्थ्यांनी रजई वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांना गेल्या दशकामध्ये बदललेला भारत व भारताची अर्थव्यवस्था, पर्यटन, विविध व्यवसाय इत्यादींवर झालेला परिणाम याबाबत चित्रकला, निबंध लेखन, पत्रलेखन सादर करण्याच्या प्रकल्पाचे आयोजन केले आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
सराईत मंगेश तांबे आणि टोळीवर मोक्का कारवाई
पुणे- शहरातील मुंढवा परिसरात दहशत पसरविणार्या सराईत मंगेश तांबे टोळीविरुद्ध पोलिसांकडून मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेली ही 107 वी कारवाई आहे. मंगेश बाळासाहेब तांबे, (वय 28 , रा.खराडकर पार्क,खराडी,पुणे), अक्षय कुंदन गागडे( वय 24 केशवनगर, मुंढवा, पुणे), कार्तिक भरत गुमाणे (वय -20 ,रा. केशवनगर,मुंढवा ,पुणे)अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत.
सराईत गुन्हेगार तांबे याने साथीदारासह संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन टोळीचे वर्चस्व ठेवले होते. तांबे याने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्याविरू्ध खडक, बंडगार्डन, मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, एपीआय राजु महानोर, पोलीस उपनिरीक्षक, सदाशिव गायकवाड, हेमंत झुरूंगे, दिपक कांबळे, रविंद्र देवढे, विजय माने यांनी केली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणार्या टोळ्यांना दणका दिला आहे. समाजात दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही 107 वी कारवाई आहे.
व्यसनमुक्त भारताकरिता ‘दारु सोडा, दूध प्या’ जनजागृतीने नववर्षाचे स्वागत
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल तर्फे अभियानाचे आयोजन
पुणे : व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे…शराब पीना छोड दो, अपना जीवन मोड दो…नशे से दोस्ती, जीवन से मुक्ती… हम सबका है यही सपना, नशामुक्त हो देश अपना… अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरीता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला. व्यसनमुक्त भारताकरिता दारु सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केले.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट्, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीय, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, राहुल यादव, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर, भुपेंद्र मोरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
संस्थेतील महिला शिक्षिका व विद्यार्थीनींनी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल न-हे येथे, इंद्रप्रस्थ क्रान्तीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला. उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष होते.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम आवश्यक आहे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाची युवापिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचापं. उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने समारोप
पुणे,दि. १ जानेवारी : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे तर्फे विश्वशांती गुरूकुल, राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधार्याच्या परिसरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सावाचा समारोप पं उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा.कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, प्रा.ज्योती कराड ढाकणे, प्रा.स्वाती कराड चाटे, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. सुनीता मंगेश कराड पं. वसंतराव गाडगीळ , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डॉ. मुकेश शर्मा, डॉ. संजय उपाध्ये व गिरीश दाते उपस्थित होते.
३१ डिसेंबर रोजी झालेल्या या सांस्कृतिक संध्येच्या समारोप प्रसंगी मध्यरात्री १२ वा. त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञ कुंडामध्ये काम, क्रोध,लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०२४ वर्ष अत्यंत सुखाने, सामाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
तसेच पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथील शौर्य विजयस्तंभाच्या प्रांगणात तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वशांती विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवता भवनाची स्थापना करण्याचा संकल्प घेण्यात आला. हा संकल्प माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि समविचारी आंबेडकरवादी बुध्दप्रेमी यांनी घेतला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्यातील अवगुणांची आहुती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन जगावे. भगवान गौतम बुद्धांचे पंचशील आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पसायदानाचा बोध घेऊन सर्वांनी विश्वशांतीसाठी कार्य करावे. भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असून याचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. आजच्या तरूण पिढीमध्ये स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत.”
“भारतीय संगीत हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपलं जीवन सूरमय व तालमय झाले पाहिजे. ज्ञान, कर्म आणि भक्तीच्या माध्यमातून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती मिळते. त्यामुळे प्रत्येकाने थोडेफार तरी संगीत शिकावे. युवकांनी पाश्चात्य संगीताबरोबरच भारतीय संगीत शिकणे गरजेचे आहे.”
प्रख्यात ध्रुपद संगीत गायक सुप्रिया माईत्रो, प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये, श्रीमती कल्याणी बोंद्रे आणि सुप्रसिद्ध गायक उपेंद्र भट यांनी आपली कला सादर केली.
या संगीत महोत्सवात विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी कथक नृत्य सादर केले.
निसर्गरम्य व सुंदर परिसरात झालेल्या संगीत महोत्सावात मारिया लिन ओब्रे, निसर्ग पाटील, पखवाज वादक पं. उध्दवबापू आपेगावकर व शास्त्रीय गायिका डॉ. श्रेयसी पावगी यांनी आपली कला सादर केली.
आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण व सूत्रसंचालन केेले.
प्रा.ज्योती कराड ढाकणे यांनी आभार प्रदर्शन केले.
