Home Blog Page 1287

विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणू नये: ‘बापाला विसरायचे नसते’ मदन बाफनांची जिव्हारी लागली टीका

पुणे-

उपकारासाठी दिले,त्याला दान म्हणू नये,शिकवूनी कमी झाले,त्याला ज्ञान म्हणू नये…. नजरेला दावी पाप,त्याला नेत्र म्हणू नये,विसरला आई-बाप त्याला पुत्र म्हणू नये….पाण्यामध्ये बुडविते,तिला नाव म्हणू नये,आदर्शाला तुडविते,त्याला गाव म्हणू नये..

पिंजरा या सिनेमातील गाण्याच्या या ओळींच्या खास शैलीत आता अजित पवार यांच्यावर ‘काकांच्या पाठीत सुर खुपसला .. अशा शब्दांपासून …बाप विसरला .. अशा शब्दात जिव्हारी टीका होऊ लागली आहे.ती अजितदादांच्या समर्थकांना झोंबू लागली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन बाफना यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अशाच तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. आता बापाला बाप म्हणण्याची संस्कृती उरली नाही. सर्वांनी संस्कार सोडलेत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या टीकेला अजित पवार गटानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. बाफना यांनी आमच्या नेत्यांवर बोलू नये, अन्यथा त्यांचा हिशेब काढला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सातत्याने दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये खटके उडत आहेत. शरद पवार यांचे सहकारी तथा माजी आमदार मदन बाफना यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना त्यांनी संस्कारांना तिलांजली दिल्याचा आरोप केला. शरद पवार आमचे नेते आहेत. आजकाल बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिली नाही. बापाला विसरायचे नसते. सर्वांनी संस्कार सोडलेत. अशा संस्कार सोडणाऱ्यांना मी बोलून दाखवणार, असे बाफना यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मदन बाफना यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मदन बाफना यांना मावळच्या जनतेने डोक्यावर घेतले. त्यांचा काळ वेगळा होता. आमचा काळ वेगळा आहे. त्यांच्या पिढीत व आमच्या पिढीत मोठा फरक आहे. बाफना यांनी वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद द्यावा. पण त्यांनी आमच्या नेत्यांचा विरोध केला, त्यांचा अवमान केला, तर त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे सुनील शेळके यांनी म्हटले आहे.


मदन बाफना यांनी 2 महिन्यांपूर्वी माझी प्रशंसा केली होती. त्यानंतर ते का बदलले हे कळत नाही. त्यांनी आम्हाला त्यांच्या अडचणी सांगाव्यात. आम्हाला आशीर्वाद द्यावा. पण पुन्हा त्यांनी आमच्या नेत्यांविषयी अपशब्द वापरले तर त्यांचा हिशेब केला जाईल, असेही सुनील शेळके यावेळी मदन बाफना यांच्यावर शरसंधान साधताना म्हणाले.

वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा – नाना पटोले

नवीन कायद्यामुळे ट्रॅक्टर, दुचाकी वाहन चालवणाऱ्यांनाही भिती.

जुलमी काळा कायदा मंजूर करण्यासाठीच विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन.

महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत

मुंबई, दि. १ जानेवारी २०२४
केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्विरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे, या संपाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, दुचाकी वाहन, टॅक्टर चालवण्यासही चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा मोदी सरकारने आणला आहे. या कायद्यामुळे स्वताचे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता पण नवीन कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर काळ्या कायद्याविरोधात जनतेत जीव्र नाराजी आहे. हा काळा कायदा मंजूर करून घेण्यासाठीच मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित केले. या काळ्या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा आहे.

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागा वाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा परभव करणे हेच काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्य आहे. भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन ही लढाई लढू ही काँग्रेसची भुमिका आहे असे स्पष्ट करत उलट महायुतीतच जागा वाटपावरून तीव्र मतभेद आहेत, त्यांच्यात भयानक तणाव आहे परंतु भाजपा शेवटी ईडी, सीबीआयचा वापर करुन त्यांना शांत करेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

भारतीय जनता पक्ष अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा राजकीय स्टंट करत आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, अयोध्येत प्रभूरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदु धर्माचे प्रमुख शंकराचार्य यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटले आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असून ते पाप ठरेल असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा स्टंट करत आहे का हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट करु नये अशीच बहुसंख्य हिंदुंची भावना आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप:त्सुनामीचा इशारा

जपानच्या इशिकावा प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.4 नोंदवण्यात आली. प्रशासनाने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.

जपानी मीडिया NHK नुसार, प्रशासनाचे म्हणणे आहे की 5 मीटर (16 फूट) उंच लाटा उसळू शकतात. किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.

जपानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, फुकुशिमा अणु प्रकल्पावर करडी नजर ठेवली जात आहे. खरेतर, मार्च 2011 मध्ये जपानमध्ये 9 तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी आली होती. त्यानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांनी फुकुशिमा अणु प्रकल्प उद्ध्वस्त केला होता.

पर्यावरणाची हानी होण्याच्या दृष्टीने ही मोठी घटना मानली जात होती. त्यानंतर समुद्रात 10 मीटर उंच लाटांनी अनेक शहरांमध्ये विध्वंस केला. यामध्ये सुमारे 16 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

जपान भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागात आहे. येथे भूकंप होतच राहतात, कारण ते दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनजवळ आहे. इशिकावा प्रीफेक्चर, जिथे भूकंप झाला, ते रिंग ऑफ फायरच्या अगदी जवळ आहे – समुद्राभोवती भूकंपाच्या फॉल्ट लाइनची घोड्याच्या नालच्या आकाराची मालिका आहे.

रिंग ऑफ फायर हे असे क्षेत्र आहे जेथे महासागरीय टेक्टोनिक प्लेट्स कॉन्टिनेंटल प्लेट्ससह अस्तित्वात आहेत. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतो. त्यांच्या प्रभावामुळेच त्सुनामी होतात आणि ज्वालामुखीही फुटतात.

जगातील 90% भूकंप या रिंग ऑफ फायरमध्ये होतात. हे क्षेत्र 40 हजार किलोमीटरमध्ये पसरले आहे. जगातील सर्व सक्रिय ज्वालामुखीपैकी 75% या प्रदेशात आहेत. 15 देश – जपान, रशिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, पेरू, इक्वेडोर, चिली, बोलिव्हिया हे रिंग ऑफ फायर अंतर्गत आहेत.

दरवर्षी जगात अनेक भूकंप होतात, पण त्यांची तीव्रता कमी असते. राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र दरवर्षी सुमारे 20,000 भूकंपांची नोंद करते. यापैकी 100 भूकंप असे आहेत की ज्यामुळे जास्त नुकसान होते. भूकंप काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकतो. इतिहासातील सर्वात जास्त काळ टिकणारा भूकंप 2004 मध्ये हिंदी महासागरात झाला होता. हा भूकंप 10 मिनिटे चालला.

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला:आता केवळ अंतिम शिक्कामोर्तब बाकी-खासदार सुप्रिया सुळे

पुणे-आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष अंग झटकून तयारीला लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे नमूद केले. तसेच विरोधी पक्ष आक्रमकपणे निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे संकेत दिले.प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका राहील. आम्ही सर्वांनी संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आलं पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीलाी सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. त्यावर अनौपचारिकपणे शिक्कामोर्तबही झाला आहे. केवळ त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे. ही घोषणा पुढील 8-10 दिवसांत होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सोमवारी याविषयी बोलताना सांगितले आहे.

महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे दिल्लीतील बैठकीत होते. दिल्लीत त्यावेळी वरिष्ठ नेते होते, लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला निश्चित झालेला असून अधिकृत शिक्कामोर्तब व्हायचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात आहे, राज्यावर अन्याय होत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्यं सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्या राज्याच्या पुढे गेली आहेत.महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. या सरकारला २०० आमदारांचं पाठबळ असलं तरी विकास त्या वेगात होताना दिसत नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. पाणी प्रश्न, अतिवृष्टी आणि दुष्काळ हे आव्हान राज्य आणि देशासमोर आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सायबर क्राइमचे विषय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारनं १५ दिवसांपूर्वी नवे कायदे मंजूर करुन घेतले त्यात फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलं आहे, असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी केला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे 3 मोठे पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गट आहे. पुढील काही दिवसांत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा यात समावेश होऊ शकतो. तूर्त या आघाडीला मविआत समाविष्ट करण्याच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे.

गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

चंद्रपूरदि. १ : लाखो गुरूदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

अमरावती येथील गुरूकुंज आश्रम जगाच्या कानाकोपऱ्यातील गुरूदेव भक्तांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची येथे समाधी आहे. राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्ती, जागृती, अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन, ग्रामविकास यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याद्वारे लिखित ग्रामगिता अनेकांना जीवन कसे जगावे यासाठी प्रेरणा देते.

ग्रामविकास विभागाने २८ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे.

ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

पुणे, दि.१:  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिगंळे, अतिरिक्त आयुक्त दिनेश ढोके, समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, उपायुक्त वृषाली शिंदे आदी उपस्थित होते.

प्रियांकांचे नाव PM पदासाठी घोषित करण्याची मागणी: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 291 जागा एकट्याने लढणार:9 राज्यांत 85 जागांवर तयारी

गत 2 लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेस कमी जागांवर उमेदवार उभे करणार-2014च्या निवडणुकीत 464 आणि 2019 मध्ये 421 उमेदवार उभे केले होते. 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार 224 जागांवर दुसऱ्या तर 2019च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते.2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 375 पेक्षा जास्त जागा लढवणार हे निश्चित आहे.

नवी दिल्ली- प्रियांका गांधी यांचे नाव PM पदासाठी घोषित करावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत जागा वाटप करण्यापूर्वी, काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीने शुक्रवार-शनिवारी (29-30 डिसेंबर) मॅरेथॉन विचारमंथन सत्र आयोजित केले होते. यामध्ये पक्षाने 10 राज्यांतील आपल्या प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, पक्ष 291 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस इंडिया आघाडीमधून आघाडीच्या 9 राज्यांमधून 85 जागांची मागणी केली आहे.

समितीच्या बैठकीत बिहार, बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळच्या नेत्यांना सांगण्यात आले की, लोकसभेचे चित्र लक्षात घेऊन भारत ब्लॉकमधील जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल.त्याचबरोबर आघाडीतील पक्षांशी समन्वयाचे काही मापदंड काँग्रेसने ठेवले आहेत. त्यानुसार गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या लोकसभेच्या जागांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 2014 पासून झालेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या आधारे पक्ष जागा मागणार आहे.

या राज्यांमध्ये एवढ्या जागा हव्यात कॉंग्रेसला

राज्यजागांवर दावा
बिहार9
दिल्ली5
पंजाब8
तामिळनाडू10
यूपी10
पश्चिम बंगाल5
जम्मू आणि काश्मीर3
महाराष्ट्र26
एकूण85

14 जानेवारीपूर्वी जागा वाटप
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इंडियातील उर्वरित नेत्यांशी चर्चेसाठी आपला प्रतिनिधी ठरवतील. राष्ट्रीय समिती आपला अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सादर करणार आहे.

खरगे यांनी 4 जानेवारीला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेत्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा समितीची बैठकही त्याच दिवशी होणार आहे. 14 जानेवारीपासून राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेपूर्वी जागांचे वाटप केले जाईल.

पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त:तात्पूरता कारभार विवेक फणसाळकरांकडे

0

मुंबई

राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे रविवारी सेवानिवृत्त झाले आहेत. आता राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यातडे सोपवण्यात आला आहे. फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाचा पदभार पुढील आदेश येई पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता राज्याच्या पोलिस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे.यातच गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलिस महासंचालक होतील, अशी चर्चा होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचेही बोलले जात होते.

नितीन करीर मुख्य सचिवपदी….

0

मुंबई-पुणे महापालिकेचे माजी आयुक्त नितीन करीर यांना मुख्य सचिवपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. नितीन करीर हे 1988 च्या आयएएस बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. दुसरीकडे, विवेक फणसाळकर हे पोलिस महासंचालक पदासाठी इच्छूक होते. पुढील नियुक्ती होईलपर्यंत त्यांना पोलिस महासंचालक पदाचा पदभार सांभाळावा लागणार आहे. नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी निवड करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे पुढील तीन महिन्यांचा कालावधी असेल. नितीन करीर हे 31 मार्च 2024 रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांना संधी मिळू शकते.

सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे आज निवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पत्र व्यवहार केला होता. मात्र, केंद्राने त्या प्रस्तावाला मंजूर न केल्याने नितीन करीर यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागात काम केलेले आहे. ते सध्या वित्त विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.

‘सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’च्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल विशेष कुतूहल!

मुंबई : लंडन येथील ‘सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा’ या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा ‘प्रीमियर शो’ करण्याचा मान “मोऱ्या” या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ “मोऱ्या”चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल वाढू लागले होते. ‘एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ‘खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव’, ‘झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२’, ‘पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव’, ‘अयोध्या फिल्म फेस्टिव्हल’, ‘लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’, ‘बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ इत्यादी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय महोत्सवांत “मोऱ्या”ने ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविला आहे. आता नव्या वर्षात येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

कान्ससह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आमच्या पहिली निर्मिती असलेल्या ‘मोऱ्या’ या चित्रपटाने जाणकार रसिक समीक्षकांचे लक्ष वेधले होते. युके मधील प्रीमियर शो पाहून बराच वेळ स्तब्ध होतो. चित्रपटाची कथा, मांडणी, अभिनय व सादरीकरण पाहून त्यांना गहिवरून आले होते. ‘मोऱ्या’ हे पात्र मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते अशी प्रतिक्रिया तेथील अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखविली. हाच अनुभव युरोपसह, महाराष्ट्रातील काही खाजगी शोज्’च्या वेळी येत असल्याचे अभिनेते लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे सांगतात.

एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला सहज संयमी नैसर्गिक अभिनय रसिकांच्या मनात घर करीत आहे. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील ‘पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. मूळ पिंपळनेरच्या जितेंद्र बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य जगभर पोहचविल्याचे समाधान जितेंन्द्रसह सर्वांनाच असून या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा? येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी मोऱ्या प्रदर्शित होणार आहे.

लाॅन्स,पब्ज,हॉटेलांहून अधिक शाळांवर मिळकतकरासाठी करडी नजर

सावित्रीमाईंच्या जन्मदिनी पुण्यात रस्त्यावर भरवूनी शाळा,करणार महापलिकेच्या मिळकतकर विभागाचा निषेध

शिक्षण संस्था, शाळा कॉलेज यांना जप्तीच्या नोटीसा काढल्याने आंदोलन

पुणे- बड्या उद्योजकांना सवलतीचे रेड कार्पेट टाकणाऱ्या महापालिकेने मिळकत कारच्या वसुलीसाठी शाळांना टार्गेट केल्याच्या निषेधार्थ येत्या ३ जानेवारी या सावित्री माई फुलेंच्या जन्म दिनी रस्त्यावर शाळा भरवून महापालिकेचा निषेध करण्याचे आंदोलन करण्यात येनार असल्याचे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे कि,’महानगरपालिकेने कर आकरणी व कर वसुलीचे काम सुरू केले आहे. पुण्यातील अनेक शिक्षण संस्था तसेच शाळया व महाविद्यालयांना महापालिकेने कर थकलेत म्हणून जप्तीच्या नोटीसा दिल्या आहेत. संस्थाकडे कर थकले असतील परंतु म.न.पा. अधिकाऱ्यांनी अनेक शाळांना केवळ नोटीसा दिल्या नाहीत तर त्यांची कार्यालय सिल केली आहेत.
म.न.पा. कडून सरळ सरळ भेदभाव केला जात आहे. अनेक मंगल कार्यालय आहेत ज्यांना जाणिव पुर्वक कमी कर आकारणी केली आहे. पुण्यातील बऱ्याच मोठया व्यवसायिक व उद्योजकांना सवलत दिली गेली आहे.
ज्या पुण्यात महात्मा फुले, चिपळूणकर, बाबूराव जगताप यांनी समाजासाठी विद्या दानाचे कामे केले त्या विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शाळा जप्त करण्यासाठी व कार्यालय सिल केली जातात हे दुदैव आहे. अनेक संस्था या सेवाभावी पध्दतीने काम करातात त्यांना शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे पगार घ्यायला पैसे नसतात ही वस्तुस्थिती आहे. व्यवसायिक दृष्टीकोन ठेवणारे व सेवा करणाऱ्या संस्थाना मात्र म.न.पा. ने फरक करावा.महापालिका शिक्षण संस्थांना कर आकारताना पण भेदभाव करत आहे. या सर्व बाबीचा निषेध म्हणुन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महात्मा फुले गंज पेठ येथे दि. ०३ जानेवारी २०२४ बुधावा २ रोजी रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मावळत्या वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले आभार

पुणे दि.३१-विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येणारे नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा देत असताना जनतेने दिलेल्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मावळते वर्ष २०२३ मध्ये विधान परिषदेचे शताब्दी महोत्सव वर्ष असल्यामुळे अनेक कार्यक्रम झाले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सर्व आमदार तसेच विधान परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी आभार मानले.

पत्रकार, अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि जनतेने दिलेल्या प्रेमाविषयीदेखील डॉ. गोऱ्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अनेक वर्षांपासून प्रलंबित महिलांच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न २०२३ मध्ये सुटला, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या राजकीय इच्छाशक्तीबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

येणाऱ्या नवीन वर्षात निवडणुका होणार असून सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.

येणारे वर्ष महाराष्ट्र आणि देशासाठी प्रगतीचे आणि भरभराटीचे जावो. तसेच नागरिकांना सुख, समृद्धी आणि आनंदाचे जावो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

पीएमटी बसमध्ये चोऱ्या ,सराईत चोराला केले गजाआड

पोलीसांमार्फत महिला व वृध्द नागरीक यांना आवाहन करण्यात येते की, सार्वजनीक बसमधुन प्रवास करताना सतर्कता बाळगुन काहीही संशयास्पद प्रकार आढळुन आल्यास पोलीस कंट्रोल रुम नंबर ११२ अथवा महिला हेल्पलाईन नंबर १०९१ यावर तात्काळ मदतीसाठी संपर्क साधावा.

पुणे- पीएमटी बसमध्ये प्रवास करणा-या वृध्द नागरीकांना व महिलांना हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणा-या सराईत चोरास सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या या गुन्हेगाराचे नावचांदबाबु अलीहुसेन शेख वय ३० वर्षे रा.स.नं.४२, बेचाळीस चौक अलीभाई लेडीज टेलर मागे, कोंढवा खुर्द पुणे. मुळ रा.गाव गौरव काला पोष्ट महमदपुर ता. कैरनलगड जि. गोंडा राज्य उत्तर प्रदेश असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी सांगितले कि,’
दि.२८/१२/२०२३ रोजी पुणे सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉप ते बालाजीनगर असा पीएमटी बसमध्ये बसुन एक महिला प्रवास करीत असताना आहिल्यादेवी चौकात त्यांचे हातातील २ तोळे वजनाची ४०,०००/- रुपये कि.ची सोन्याची बांगडी लोखंडी कटरच्या सहाय्याने जबरदस्तीने तोडुन चोरी करुन पळुन जाणारा पीएमटी बसमध्ये चो-या करणारा मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेला व सध्या कोंढवा भागात राहणारा सराईत गुन्हेगार चांदबाबु अलीहुसेन शेख वय ३० यास गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार सुशांत फरांदे व महेश मंडलीक यांनी पाठलाग करुन छत्रपती मंगलकार्यासमोर पकडुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणले. संबधित दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) . संदीप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक राहुल खंडाळे व तपास पथकाचे स्टाफने सुरु केला. तेव्हा चांदबाबु शेख याचे अंगझडतीमध्ये त्याने फिर्यादी यांची जबरदस्तीने चोरलेली ४०,०००/-रुपये कि.ची सोन्याची बांगडी व एक १००/- रुपये किमतीचे लोखंडी कटर जप्त केले . त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेवुन त्याचेकडे अधिक तपास करता त्याने दोन ते अडीच महिन्यापुर्वी एका महिलेची पीएमटी बसमध्ये बालाजीनगर येथे पर्स चोरुन त्यामधील २५,०००/- रुपये किमतीचे अर्ध्या तोळयाचे कानातील टॉप्स व २०००/-रुपये चोरल्याची माहिती दिली. त्यावरुन तपास करता सदर बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२६८/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असुन त्याचे कोंढवा येथील राहते घरातुन २५,०००/-रुपये किमतीचे अर्ध्या तोळ्याचे कानातील टॉप्स जप्त केले आहेत. सहकारनगर पोलीस स्टेशनकडील १) सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२६८/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे व २) सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३५६/२०२३ भादवी कलम ३९२ प्रमाणे हे दोन गुन्हे उघडकीस आणुन ६५,०००/-रुपये किमतीचे सोन्याचे दागीने जप्त केले आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे प्रवीणकुमार पाटील ,पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार सुशांत फरांदे, महेश मंडलिक, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, अमोल पवार, निलेश शिवतरे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ यांनी केली आहे.

वय वर्षे अवघे १९ असलेल्या दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलिसांची एम.पी.डी.ए कारवाई

पुणे- हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अजय युसुफ मौजण, वय-१९ वर्षे, रा. पाचुंदकर वस्ती, देवाची वाडी, रांजणगाव गणपती, रांजणगाव, ता. शिरूर जि.पुणे या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ पुणे पोलीस आयुक्तालयातील हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे अजय युसुफ मौजण, वय-१९ वर्षे, रा. पाचुंदकर वस्ती, देवाची वाडी, रांजणगावगणपती, रांजणगाव, ता. शिरूर जि.पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह रांजणगाव एमआयडीसी व हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकु, लोखंडी कोयता यासारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापतीसह जबरी चोरी, जबरी चोरी, चोरी, घराविषयी आगळीक, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचे विरूध्द ०४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, . रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमुद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे व चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे आधिपत्याखाली पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
पोलीस आयुक्त यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए.
कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ७७ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा
घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी-ग्रामीण भागात यात्रेला ४ लाख नागरिकांची भेट

पुणे, दि. ३१ : विकसित भारत संकल्प यात्रेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून ८२६ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात ४ लाख ७ हजार ६१९ नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभदेखील देण्यात आला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून ‘हर घर जल’ च्या ४०९ जोडण्या, ३४ ओडीएफ शौचालय, ३९० मृदा आरोग्य कार्ड, ४६८ उज्वला गॅस, ३ हजार ७३२ सुरक्षा विमा योजना, ३ हजार २३ नागरिकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात आला.

आरोग्य शिबिराअंतर्गत ८५ हजार ९०७ नागरिकांची तपासणी, ३५ हजार ६११ क्षय रोग तपासणी, २८ हजार ३४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २६ हजार ६२४ खेळाडू, ५३ हजार ६०६ विद्यार्थी, २६ हजार ७३६ स्थानिक कलाकार आणि ९९ हजार १४४ महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.

विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ३ हजार ८८० ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यात्रेद्वारे ५१२ शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला. २६० लाभार्थ्यांना शौचालय प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी १ लाख ९७ हजार ७८५ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला.

विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने केले आहे.