Home Blog Page 1284

अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथ प्रदर्शनास अभुतपूर्व प्रतिसाद

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पुस्तक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनासाठी विजयस्तंभाच्या पाठीमागे ३०० पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” ग्रंथाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विस्डम बुक फेअर २०२४’ चे आयोजन करण्यात आले. या बुक फेअरचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, बार्टीचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख स्नेहल भोसले, वृषाली शिंदे, रवींद्र कदम, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.

बार्टीने अनुयायींना ८५ टक्के सवलतीच्या दरात ६ पुस्तक स्टाॅलवर द प्रॉब्लेम ऑफ रुपी, भारताचे संविधान, भिवा ते बोधिसत्व, जातीव्यवस्थेचे निर्मूलन, बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे खंड आदी पुस्तके उपलब्ध करून दिली होती. देशभरातून आलेल्या भीमसैनिकांनी व अनुयायांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच बार्टीच्या पुस्तक स्टाॅलवर रांगा लावून पुस्तकांची खरेदी केली.

द प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या शताब्दी वर्षानिमित्त बुक फेअरमध्ये साहित्यक, कवी, लेखक, विचारवंत, कलावंत यांच्यासाठी स्वतंत्र मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. यामध्ये देशभरातून आलेल्या अनेक कवी, लेखक, साहित्यिक विचारवंत यांनी या चर्चासत्रात ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाचे देशाच्या अर्थकारणात असलेल्या योगदानाविषयी माहिती दिली.

प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेम हनवते, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक डॉ. संभाजी बिरांजे, समतादुत प्रकल्प अधिकारी हृदयनाथ गोडबोले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

बार्टीने बुक फेअरचे आयोजन केल्याबद्दल पुस्तक स्टाॕलधारक तसेच पुस्तकप्रेमीनी बार्टीच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

PAP घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार,प्रताप पवार आणि कुटुंबाला -किरीट सोमय्यांनी केला आरोप

मुंबई : प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतला घोटाळा अर्थात PAP घोटाळ्यात किरीट सोमय्यांनी आज थेट शरद पवार आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. हा घोटाळा 20 हजार कोटींचा आहे. शाहीद बलवा आणि पवारांचे निकटवर्ती चोरडिया यांना लाभ मिळाला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. 1 हजार 903 सदनिका बांधल्या जात आहेत. त्यासाठी वेगवेगळी आरक्षणं हटवली जात आहेत असा आरोप त्यांनी केला.

सोमय्या म्हणाले, PAP घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे. PAP घोटाळ्यात पवार परिवार सामील आहे. मुंबई महापालिका ठाकरे सरकारच्या 2000 कोटींच्या PAP घोटाळ्यात आता शरद पवार आणि पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे. भांडूप येथील 1903 सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरचा पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. ला देण्यात आला. न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने यासाठी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीसोबत करार केला आहे. ही जागा प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीची आहे. त्याच्या सोबत या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहे.

एका सदनिकेच्या मागे 40 लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवारांना
1903 सदनिका महापालिका बाजारभावाने 58 लाखात एक सदनिका घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठी जमीन व बांधकामाचा खर्च म्हणून 15 ते17 लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये 40 लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे, असे सोमय्या म्हणाले.

प्रताप पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे शेअर कॅपिटल फक्त रुपये 1 लाख आहे. परंतु या कंपनीत 2021 मध्ये 19 मार्च 2021 रोजी सिरम इन्स्टिट्यूटने 435 कोटी रुपयाचे शेअर 6% व्याज या दराने वीस वर्षासाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत. या कंपनीने कोविड लस तयार केली होती. 1 लाखाचे शेअर कॅपिटल प्रताप पवार व त्यांच्या पत्नीचे 435 कोटीचे गुंतवणूक 6% दराने सिरम इन्स्टिट्यूट यांनी केली आहे.PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करावी
100 कोटीच्या गुंतवणूकीच्या समोर रुपये 1000 कोटीचा भांडूप PAP घोटाळ्याचा फायदा चोरडिया यांच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला झाला आहे. Neo Star Infra projects कंपनीही सहभागी झाली आहे. या PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र बोऱ्हाडे यांची निवड

कार्यवाहपदी संजय गुंजाळ, कोषाध्यक्षपदी कृष्णाजी कुलकर्णी, कुलसचिवपदी दिनेश मिसाळ यांची निवड
पुणे : शिक्षण व सामाजिक क्षेत्रात ११४ वर्षांहून अधिक काळ कार्यरत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र वि. बोऱ्हाडे यांची निवड झाली आहे. उपकार्याध्यक्षपदी एस. एम. जिर्गे, कार्यवाहपदी संजय नि. गुंजाळ, कोषाध्यक्षपदी कृष्णाजी मा. कुलकर्णी व कुलसचिवपदी दिनेश पि. मिसाळ यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या कौन्सिल व संचालक मंडळाच्या सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची २०२४ ते २०२८ या कालावधीकरिता निवड करण्यात आली. हे सर्व पदाधिकारी संस्थेचे देणगीदार, माजी विद्यार्थी, सेवक व विद्यमान संचालक आहेत.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी मावळते कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, संचालक मंडळातील रमेश कुलकर्णी, अमोल जोशी आदी उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना राजेंद्र बोऱ्हाडे म्हणाले, “११४ वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद वाटतो. ज्या संस्थेत शिकलो, त्याच संस्थेचा पदाधिकारी म्हणून काम करताना संस्थेची यशस्वी परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आहे. संस्थेच्या सहा शाखा असून, ६५ शैक्षणिक व सामाजिक विभाग आहेत. सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. यात आणखी भर घालून संस्थेचा विस्तार व नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

कामगार मंत्र्यांनी केला कंपनी मालक आणि कामगार संघटना यांच्यात समेट; कामगारांशी संपमागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा

मुंबई, दि. 2 :- वालचंदनगर येथील मे. वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये 42 दिवसांपासून सुरु असलेल्या कामगारांच्या संपाबाबत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज कंपनी मालक आणि कामगार संघटना प्रतिनिधी यांच्यात समेट घडवून आणत संप मिटविण्याबाबत कामगारांशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी कामगार मंत्र्यांनी कंपनीने कामगारांचे थकीत वेतन दोन महिन्यांत द्यावे, कामगार आणि कंपनीमध्ये झालेला करारनाम्याचे दोन महिन्यांत नूतनीकरण करावे, अशा सूचना दिल्या.

मंत्रालयातील समिती कक्षात याबाबत कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे, हर्षवर्धन पाटील, कामगार आयुक्त सतीश देशमुख, उपायुक्त दादासाहेब खताळ, अभय गीते, कंपनीचे व्यवस्थपकीय संचालक चिराग दोशी, महाव्यवस्थापक संजय गायकवाड, उपाध्यक्ष धीरज केसकर, कामगार संघटनांचे अध्यक्ष राहुल नावडेकर, कपिल गायकवाड, गणेश सानप, नीलेश गुळवे, सुनील माने, सराजी दबडे  उपस्थित होते.

कंपनीच्या आस्थापनेवर असलेल्या कामगारांचे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल २०२३ या तीन महिन्यांचे वेतन थकीत होते. वेतनवाढ, वैद्यकीय देयके अशी २०२१ पासूनची थकीत देणी, तसेच कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगारांचे वेतन आणि भत्त्यासंदर्भातील करार प्रलंबित होता. या मागण्यांसाठी कामगारांनी संप पुकारला होता. हा संप मिटवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या मागणीनुसार कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी यात समेट घडवून आणला.

यावेळी कामगार मंत्री यांनी इंडस्ट्रीने कामगारांचे थकीत वेतन आणि इतर कायदेशीर देणी मिळून होणारी ७ कोटी ८५ लक्ष रुपयांची रक्कम तीन टप्प्यात द्यावी, असे सांगितले. ४० टक्के रक्कम कामगार रुजू होताच सात दिवसांत द्यावी. तसेच उर्वरीत ६० टक्के रक्कम दोन महिन्यांत ३० टक्के प्रमाणे देऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत १०० टक्के थकित रक्कम अदा करावी. शिवाय कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील करार हा एक महिन्यात संपुष्टात येईल, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. तसेच कामगारांनी सुद्धा ४ जानेवारीपासून संप मागे घेऊन तत्काळ कामावर रुजू व्हावे. कंपनीने कोणत्याही कामगारावर कारवाई करू नये, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी दिले.

कामगारांच्या विश्वासावर कंपनी उभी राहते. कामगारांनी सुद्धा संपावर जाण्यामुळे त्यांचे स्वत:चे नुकसान होते याचा विचार करावा. संपावर जाण्यापूर्वी व्यवस्थापनाशी चर्चा करावी आणि कंपनीने सुद्धा चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देऊन कामगारांच्या  मागण्या मान्य केल्यास कंपनी आणि कामगार दोघांचेही नुकसान टाळता येईल, असेही डॉ. खाडे म्हणाले.

पोलिस अधिकाऱ्याची मुलगी:अन मद्यधुंद होऊन सोसायटीत राडा…?

पुणे- वानवडी परिसरात एका उच्चभ्रु सोसायटीच्या परिसरात एका मद्यधुंद तरुणीने नववर्षाच्या सुरुवातीला धिंगाणा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी खबर मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पण त्यांनी सदर तरुणी एका बड्या पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्यामुळे कारवाईचा हात आखडता घेतला, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.वानवडी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय पतंगे म्हणाले, याप्रकरणी 22 वर्षीय तरुणी विराेधात वानवडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत साेसायटीतील एका गाडीची काच फुटली असून, त्याबाबत देखील तिच्यावर कारवाई करण्यात येऊन नाेटीस बजावण्यात आली आहे. तिचे वडील पाेलिस निरीक्षक असून मागील 3 वर्षांपासून ते मुलगी व पत्नीपासून विभक्त राहत आहेत. या प्रकरणी सदर तरुणीवर सार्वजनिक ठिकाणी गाेंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,’ वानवडी भागात ऑक्सफर्ड नावाची अलिशान साेसायटी आहे. साेसायटीच्या गेटवर सुरक्षारक्षक देखील तैनात असताे. 31 डिसेंबरच्या रात्री साेसायटीत राहणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीने मद्यप्राशन केले. तिने सुरक्षारक्षकाशी झटापट करत त्यााला धक्काबुक्की केली. त्यानंतर साेसायटीच्या गेटवर टेबल आणून टाकला. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तसेच सुरक्षारक्षकाच्या 2 खुर्च्या भिरकावून देत साेसायटीचे गेट जबरदस्तीने बंद केले.त्यानंतर साेसायटीमधील नागरिकांना बाहेर जाण्यास मज्जाव करत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे साेसायटीतील रहिवाशी एकत्र येऊन मद्यधुंद तरुणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तिने ऐकले नाही. त्यानंतर याबाबतची माहिती वानवडी पाेलिसांना देण्यात आल्यावर पाेलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यानंतरही तरुणीने आरडाओरडा करत धिंगाणा सुरुच ठेवला. त्यामुळे पोलिस तिला ताब्यात घेण्यास गेले. त्यावेळी तरुणीने पाेलिस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला. अखेर पाेलिसांनी आपला खाक्या दाखवत तिला ताळ्यावर आणले. यावेळी माेठ्या प्रमाणात साेसायटीतील व बाहेरील नागरिकांनी गर्दी केली होती.

खेड शिवापूर टोलनाक्याजवळ कंटेनर मधून गोव्याची एक कोटी रुपयांची दारू जप्त

पुणे-पुणे-सातारा महामार्गावर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री खेड शिवापूर टोलनाक्याजवळ पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. रंगाच्या डब्या मागे मद्यसाठा तस्करी उत्पादन शुल्क विभागाचे या कारवाईत उघडकीस आली असून संबधित कंटेनर मधून गोव्यातील एक कोटी रुपयांचे मद्य हस्तगत करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मद्यसाठा कंटेनर मधून पुणे शहर परिसरात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. कंटेनर ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर मद्य विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सदर पथकाने महामार्गावर संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू केली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ पथकाने संशयित ट्रक आल्यावर त्याची कसून तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये रंगाचा डब्या मागे मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. तसेच तपासणीत मद्याची निर्मिती गोव्यात करण्यात आल्याचे देखील स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने ट्रकमधील एक हजार मद्याची खोकी जप्त केली असून या कारवाईत ट्रक, तसेच मद्याच्या बाटल्या असा एक कोटी रुपयांचा मु्द्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याप्रकरणी ट्रकचालकासह साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, पुणे विभागाचे आयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे आणि पथकाने ही कारवाई केली.

पुण्यात ज्वेलर्सचे दुकान फोडून 3 कोटींच्या सोन्यासह 10 लाखांची रोकड लंपास

पुणे-अज्ञात इसमाने बनावट चावीचा वापर करुन रविवार पेठेतील एका सराफाच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश केला. त्यानंतर तब्बल 5 किलाे 323 ग्रॅम साेन्याचे दागिन्यांसह 10 लाख 93 हजारांची राेकड असा एकूण तब्बल 3 काेटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी फरासखाना पाेलिस ठाण्यात अज्ञात आराेपीविराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

याबाबत दुकानाचे मालक यांनी आराेपी विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत राज कास्टिंग नावाचे साेन्याचे दुकान आहे. 31 डिसेंबर राेजी रात्री दुकानाचे मालक दुकानाला कुलुप लावून राहते घरी गेले हाेते. त्यावेळी मध्यरात्री अज्ञात चाेरट्याने दुकानाचे कुलुपास बनावट चावी वापरुन दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुसरा व्यक्ती देखील त्याच्यामागे दुकानात शिरला. सदर दाेन्ही चाेरट्यांनी त्यांचे चेहरे हे कपड्याने झाकलेले हाेते. त्यामुळे त्यांची ओळख अद्याप पटू शकली नाही. मात्र, दुकानाच्या सीसीटीव्हीत सदर चाेरटे चाेरी करत असल्याचे कैद झाले आहे.

आराेपींनी दुकानातील 5 किलाे 323 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, 10 लाख 93 हजार रुपयांची राेकड असा एकूण 3 काेटी 32 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल लबाडीच्या उद्देशाने चाेरी करुन नेला. या प्रकरणी फरासखाना पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्या आधारे आराेपींची ओळख पटवून त्यांचा शाेध सुरु केला आहे. चाेरीच्या घटनेवरुन चाेरी करणाऱ्यात दुकानात सध्या काम करणाऱ्या किंवा पूर्वी काम करत असलेल्या माजी कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचा संशय आहे. तक्रारदार यांचे दुकानाची व तिजाेरीची बनावट चावी बनवून त्या चावीने दरवाजा उघडून दुकानात प्रवेश करुन दुकानातील लाेखंडी तिजाेरी बनावट चावीने उघडून चाेरी करण्यात अाल्याने त्याअनुषंगाने पाेलीस कर्मचाऱ्यांची चाैकशी करत असल्याची माहिती फरासखाना पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दादा चुडप्पा यांनी सांगितले अाहे.सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड ́ 9921090044 अधिक तपास करत आहेत .

भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम-माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

पुणे –1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त राज्यासह देशभरातून सुमारे 15 लाख पेक्षा अधिक भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी रोजी विजयस्तंभ परिसरामधे स्वच्छता रहावी व स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतला. या वेळी परिसरातील कचरा, पाण्याच्या बॉटल, कागद आदी उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या स्वच्छता उपक्रमात क्टेलिस्ट फाउंडेशनचे सुनिल माने व सहकारी, बीबीसीचे सहकारी, भीम युवा संघ, महिला संघटना, विजय कांबळे, संदिप चाबुकस्वार, भंते नागघोष सर्व भीम सहकारी यांनी पुणे मनपा आरोग्य विभाग, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला समुह, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पेरणे ग्राम पंचायत आदींच्या सोबत परिसर स्वच्छ करून घेतला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, भीमा कोरेगावला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्या आठवणींचे जतन भीम अनुयायी करत असतात. ही ऐतिहासिक आठवण स्मरणात रहावी, यासाठी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. एवढ्या प्रचंड संख्येनंतर या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी देखील आपलीच आहे, या सामाजिक भावनेतून परिसरात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. गेल्या 10 वर्षांपासून स्वच्छतेच्या उपक्रमासाठी पुढाकार घेत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. त्याला यश फाउंडेशन, क्रिस्टल संस्था, आयुष आंबेडकरी युवा संघ, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला संस्था, पेरणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी या सामाजिक संघटनांची देखील मोलाची साथ मिळत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

जादुटोणा,अघोरी कृत्य: 6 कोटी 23 लाखांवर रूपयांची फसवणूक प्रकरणी भामट्या जोडप्याला अटक-कस्टडी

पुणे-जादुटोणासारखे अघोरी कृत्य करून व्यावसायिकाला कोट्यावधींचा गंडा घालणार्‍या मुख्य आरोपीसह पत्नीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आतापर्यंत 6 कोटी 23 लाखांवर रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. चार महिन्याच्या कालावधीत संबंधित आरोपींनी तिघांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी आणि सीमा उर्फ रोहा अब्दुल हुसेन नईमआबादी (दोघेही रा. कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. व्यावसायिकाची फसवणूक करून जादूटोणाच्या नावाखाली आरोपींनी फसवणूक केली होती.

याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात 6 आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळात संबंधित आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबधाचे संरक्षण अधिनियम प्रमाणे 2 कोटी 76 लाख रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले. तसेच मुक्तार हुसेन मोहमंद यांची 1 कोटी 06 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चार महीन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात चार गुन्हे मिळून 6 कोटी 23 लाखांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी आरोपींचा माग समर्थ पोलिसांकडून काढण्यात येत होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर आणि पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून आरोपींचा शोध घेतला जात होता.

आरोपी मागील चार महिने घर बंद करून फरार झाले होते. आरोपींना शोधण्याचे पोलिसांना मोठे आव्हान होते. पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे आणि अंमलदार हेमंत पेरणे यांनी तांत्रिक विश्लेषण केले. गुन्हयातील मुख्य आरोपी अब्दुल आणि पत्नी सीमा उर्फ रोहा कॅम्प परिसरात सोसायटीत लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी इतर स्टापच्या मदतीने दोन्ही आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपींना समर्थ पोलिस ठाण्यात आणून अटक केली.ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज वंडगर, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, उपनिरीक्षक सौरभ थोरवे, उपनिरीक्षक ज्योती कुटे, हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले, संतोष डमाळे, निलम करपे, गणेश वायकर, प्रमोद जगताप, शरद घोरपडे, प्रफुल्ल साबळे, सीमा गायकवाड, स्वाती भालेराव यांनी केली .

सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त होणार ७०,४४५ रोपांचे विनामूल्य वाटप 

महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती, पुणे चा पुढाकार ; सावित्रीबाईंच्या १९३ व्या जयंतीनिमित्त आयोजन
पुणे : स्त्रियांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती, पुणे च्या वतीने ७०,४४५ हून अधिक देशी वृक्षांच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. बुधवार, दिनांक ३ जानेवारी रोजी महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी १० ते ५ यावेळेत हे अभियान राबविले जाईल.

सावित्रीबाईंच्या जयंतीचे हे १९३ वे वर्ष असून प्रत्येक वर्षीचे ३६५ दिवस याप्रमाणे एकूण ७०,४४५ दिवस पूर्ण होत असून, तेवढी रोपे नागरिकांना देण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यावरण पूरक देशी वृक्षांचा म्हणजेच तुळस, पिंपळ, वावर, कडुलिंब, बहावा, दिल का राजा, भेंडी ,सिताफळ, उंबर ,आंबट चिंच, वड ,पळस टिकोमा, शिसवी, जांभूळ ,करंजी ,मोगरा आधी वृक्षप्रजातीचा समावेश आहे. याची नावनोंदणी फुले वाडा येथे सुरू होणार आहे.

अभियानाचे आयोजन रघुनाथ ढोले, रवि चौधरी, प्रल्हाद गवळी, सारंग सराफ, बाळासाहेब अमराळे, नंदा पंडीत, एकनाथ ढोले, सुनीता काळे, श्रीधर चव्हाण, चेतन धोत्रे, सचिन विप्र, डॉ. गणेश परदेशी, सुशीला नेटके, बाळासाहेब भामरे, रमेश जाधव, गणेश पाटील, विजय रजपूत यांनी केले आहे. सदर वृक्षांची लागवड व देखभाल लोकसेवा शैक्षणिक संस्था समूहाने मौजे फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केलेली आहे.

तसेच या समितीत सर्व संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, सदस्य सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, जेष्ठ नागरीक संघ, पोलीस मित्र, महिला बचत गट, भजनी मंडळ यांचे कार्यकर्ते अभियानाकरिता काम करणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने रोपे घेण्याकरीता यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

एलपीजीसह पेट्रोलजन्य पदार्थांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई दि. 2 : राज्यातील वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी.चा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना केल्या आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार एल.पी.जी., पेट्रोल व डिझेलचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये होतो. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.

सन २०५० पर्यंतच्या वीजपुरवठ्यासाठी अतिउच्चदाबाचे १७ उपकेंद्र प्रस्तावित

महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची माहिती

पुणे, दि. ०२ जानेवारी २०२४पुणे परिमंडलामध्ये वाढती ग्राहकसंख्या व विजेची मागणी पाहता सन २०५० पर्यंत दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी २२० केव्हीचे १४ तर १३२ केव्हीचे ३ अशा १७ अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांची आवश्यकता असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेमध्ये ३७ नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.

पुणे परिमंडलामधील विविध कामांचा सोमवारी (दि. १) रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात आढावा घेताना मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त), ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, पुणे परिमंडलामध्ये सन २०२३ मध्ये विक्रमी २ लाख ६ हजार ४६८ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. याआधी नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग दरमहा १५ ते १६ हजार होता तो १९ ते २० हजारांवर गेला आहे. महसूलामध्ये १४.४ टक्के तर वीजबिल वसूलीमध्ये १४.८ टक्के वाढ झाली आहे. अचूक बिलिंगचे प्रमाण १.५४ टक्क्यांनी वाढून ते ९५.२३ टक्क्यांवर गेले आहे. वितरण व वाणिज्यिक हानी सध्या ७.६४ असून मागील वर्षांत ०.३६ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षांत तब्बल ३९७१ छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांची भर पडली असून सन २०२२ च्या तुलनेत ४४ टक्के वाढ झाली आहे. तर १८ ठिकाणी महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्याची माहिती त्यांनी दिली.

पुणे परिमंडलामध्ये नागरीकरण मोठ्या वेगाने होत आहे. जागेच्या उपलब्धतेचा प्रश्न मोठा असल्याने भविष्यातील विजेच्या स्थितीचा वेध घेऊन पायाभूत वीजयंत्रणेचे नियोजन करण्यात यावे अशी सूचना मुख्य अभियंता श्री. पवार यांनी केली. ते म्हणाले, पुणे परिमंडलातील २०५० पर्यंतच्या वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता अतिउच्चदाबाचे किमान १७ उपकेंद्रांची उभारणी आवश्यक आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहेयात २२० केव्हीच्या बालेवाडी, चऱ्होली, वाघोली, रिव्हरव्ह्यू मगरपट्टा, ताथवडे, मोशी, बावधन, म्हाळुंगे, रोहकल, गहुंजे, कडूस, कोलतेपाटील नेरे हिंजवडी, मांजरी, सेक्टर १२ प्राधीकरण तसेच १३२ केव्हीच्या खानापूर, कात्रज, भूगाव नॉलेज सिटी येथील अतिउच्चदाब उपकेंद्रांचा समावेश आहे अशी माहिती मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिली. यातील चऱ्होली व सफारी पार्क येथील अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच भोसरी सेन्चुरी एन्का अतिउच्चदाब उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याबाबत महापारेषणकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

तसेच राज्य शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेमध्ये पुणे परिमंडलासाठी ५५७० कोटी ८९ लाख रुपये खर्चा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये ३७ नवीन उपकेंद्र, नवीन २३ पॉवर ट्रॉन्सफॉर्मर तसेच इतर कामांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले. पुणे परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत व ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) तत्पर ग्राहक सेवा देण्यासाठी अधिक सजग व सज्ज राहावे असे निर्देश श्री. राजेंद्र पवार यांनी दिले. यावेळी सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिका अभियंता संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे-पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके चे प्रकाशन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त महा आयुक्त श्री रविन्द्र बिनवडे , डॉ. कुणाल खेमनार , शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे, सुनिल कदम , मुकुंद बर्वे, संजय पोळ, अजय मोरे हे उपस्थित होते

हजारो भक्तांच्या साक्षीने सामुहिक शंकरगीता पारायण सोहळा संपन्न 

तब्बल १२०० हून अधिक भक्तांचा सहभाग ;  मठाधिपती दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखालीमहाराष्ट्रातील पहिल्या सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळ्याचे पुण्यात आयोजन
पुणे : वंदुनी शंकर महाराज श्री शंकर, जन्म वृत्त कथन मनोहर, हा पहिला अध्याय सुंदर… अनंत कोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराज योगिराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय…च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शंकर महाराजांची महाआरती, महिमा, लिला, कथा, भजन आणि भक्तांना आलेली प्रचिती अशा विविधांगी अनुभूतीने एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा पुण्यात संपन्न झाला.
आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे श्री स्वामी भक्त मठाधिपती दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू शंकर बाबांच्या एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. एक दिवसीय शंकरगीता पारायण समिती, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार पुणे शहर, श्री शंकर महाराज भक्त परिवार पुणे शहर, श्री सद्गुरु चिले महाराज भक्त परिवार पुणे शहर यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे आयोजन  दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनकवडी येथील शंकर महाराज मठाचे माजी विश्वस्त कन्हैया ऊर्फ कमलेश दुबे, तेजस मर्चंट, अनिल हगवने, श्रीधर साळुंखे, विलास सोनवणे यांनी केले. उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्रातील हा पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा असून सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली. यावेळी शंकरगीता सारामृताचे प्रकाशन देखील करण्यात आले.
सोहळ्यात सकाळी इष्टदैवत पीठ पूजन झाल्यानंतर शंकर गीता पारायणाला सुरुवात झाली. सर्व महिला भक्तांच्यावतीने ५६ भोगाचा नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच यावेळी शेकडो नारळ वापरून पिंड तयार करण्यात आली. सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला शंकरबाबा महाराजांची प्रतिमा, उपरणे आणि तुळशीरोपाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विविध भजनी मंडळांची भजन सेवा सादर झाली.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १८ जानेवारीला

पुणे, दि.२ : जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. नागरिकांनी त्यांचे अर्ज बैठकीच्या दिवशी दाखल करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम यांनी केले आहे.