Home Blog Page 1283

बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 3 : इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात  काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट (NSDC) इंटरनॅशनल आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राईलमध्ये काम करण्याची संधी  मिळत आहे. शासनाकडून सर्वोतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधावा.

फ्रेमवर्क/ शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तीना इस्राईलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित  वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला 1.4 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा 16,000 रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल.

या पदासाठी साठी 25 ते 45 वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराने  किमान 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.

अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या संकेतस्थळावर भेट द्यावी आणि 8291662920 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून करण्यात आले आहे.

हस्तप्रत्यारोपणाची तब्बल सहा तास चाललेली अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली पूर्ण- सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना यश 

पुणेजानेवारी, 03, 2024सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी दिपावलीच्या शुभ दिवशी अतिशय दुर्मिळ व गुंतागुंतीची हस्तप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीतीने करून वैद्यकीय विश्वात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पुण्यातील हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिक व कॉस्मेटिक शल्यचिकित्सक व सल्लागार डॉ. सुमित सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कुशल वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमने हे विलक्षण यश मिळविले आहे.

रुग्ण श्री. रमेश (नाव बदलले आहे) यांचा पहाटे दिवे घाटातून दुचाकीवरुन प्रवास करीत असताना ट्रकने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. त्यांचा उजव्या बाजूचा हाताचा वरचा भाग कापला गेला. त्यांना हडपसर येथील सह्याद्रि रुग्णालयात तातडीने आणले गेले आणि डॉ. सुमित सक्सेना यांनी त्वरित त्यांच्यावर योग्य उपचार करणे चालू केले.

तब्बल सहा तासांच्या अवघड शस्त्रक्रियेमध्ये डॉ. सुमित सक्सेना आणि त्यांच्या टीमने तो तुटलेला अवयव जोडण्याचे आव्हानात्मक कार्य केले. या गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉ. सुमित सक्सेना म्हणाले, “अशा क्लिष्ट शस्त्रक्रियांमध्ये ‘वेळ’ ही महत्त्वाची बाब असते. शरीरातील  रक्तवाहिन्या, नसा, स्नायू, स्नायूबंध आणि हाडे यांच्यासह सर्व महत्त्वाच्या संरचना सहा तासांच्या आत ठीक केल्या. त्यातही मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होती.”

डॉ. सक्सेना यांनी या शस्त्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि क्लिष्टता स्पष्ट करत सांगितले की, “ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात विच्छेदन करावे लागणार असल्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होता. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अत्यंत सावध व बारीकसारीक तपशिलांबाबत जागरूक दृष्टीकोन आवश्यक असल्याने ही शस्त्रक्रिया विशेषतः अधिक कठीण होती. जेव्हा उच्च प्रमाणात विच्छेदन करावे लागते तेव्हा लौकर शरीर बरे होणे हे अवघड होते, शिवाय या रुग्णास रिपरफ्यूजन जखमेची (रिपरफ्यूजन इन्ज्युरी-आर आय हे एका अत्यंत गंभीर शारीरिक परिस्थितीचे वैद्यकीय नाव आहे) शक्यता असल्याने रुग्णाच्या जीवास धोका होता. शस्त्रक्रियेनंतर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक होते.”

डॉ. सक्सेना पुढे म्हणाले, “अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही अतिशय वेगळी असून फार कमी वेळ ती केली गेली आहे आणि त्याहूनही क्वचित वेळा त्या यशस्वी झाल्या आहेत. अशा प्रत्यारोपणानंतर रुग्णास वाचविणे फार अवघड असल्याने या प्रकारच्या शस्त्रक्रिया या खरोखरीच असाधारण आहेत.”

श्री. रमेश यांना यशस्वी शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेऊन ते पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तरीही अतिरिक्त फ्रॅक्चर्स असल्याने अजूनही ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतरदेखील रुग्ण १५ दिवसात जलद गतीने बरा होणे हे सह्याद्रि हॉस्पिटलमधील कुशल व तज्ज्ञ डॉक्टर्स व रुग्णालय पुरवीत असलेली सर्वसमावेशक सेवा यांचे प्रमाण आहे.

दिवाळीचा सण असूनही हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने डॉ. सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली आपल्या वैयक्तिक सणसमारंभांच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवेला प्राधान्य देऊन आपल्या कर्तव्याप्रती अतूट बांधिलकी व निष्ठा दाखविली आहे.  या गुंतागुंतीच्या व क्लिष्ट शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेमुळे श्री. रमेश यांच्या जीवावरील संभाव्य धोका तर टळलाच त्याशिवाय दिवाळीचे अंधारावर प्रकाशाचा विजय हे खरे तत्व या यशस्वी शस्त्रक्रियेने प्रत्यक्षात उतरविले.

या यशस्वी हस्तप्रत्यारोपण शस्त्रक्रियेने पुनर्रचनात्मक शल्य चिकित्सेच्या (रिकन्स्ट्रर्क्टिव्ह सर्जरी) क्षेत्रातील सीमा पार करून सह्याद्रि हॉस्पिटलचे वैद्यकीय तज्ज्ञतेचे एक प्रमुख केंद्र म्हणून स्थान अधोरेखित करते. 

या शस्त्रक्रियेच्या यशामध्ये योगदान देणारी आपली समर्पित टीम; डॉ. तापडिया (अस्थी रोगतज्ज्ञ), डॉ. रूपा अब्राहम (अॅनेस्थेटिस्ट), डॉ. इनायत (अस्थी रोगतज्ज्ञ), डॉ. मनीष (सहाय्यक), रुग्णपरिचारक धर्मेंद्र आणि रुग्णपरिचारिका प्रियंका आणि अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) कर्मचारी व सर्व वॉर्ड कर्मचारी, यांचे आभार मानले. सह्याद्रि हॉस्पिटलने आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण सहाय्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारतीय सैन्यदलासाठी महावितरणच्या बंडगार्डन विभागात ७२ जणांचे रक्तदान

पुणे, दि. ०३ जानेवारी २०२४महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत बंडगार्डन विभागामध्ये भारतीय सैन्यदलासाठी बुधवारी (दि. ३) सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

       येथील सशस्त्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने बंडगार्डन विभाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धवल सावंत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू पवार, सतीश उमरजे, हितेंद्र भिरूड, संजय मालपे, उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, उपव्यवस्थापक शिल्पा बारापत्रे आदींसह ७२ जणांनी रक्तदान केले. यात आठ महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हे विशेष. या शिबिरात कार्यकारी अभियंता अशोक जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, सुभेदार कुलदीप भदोरिया यां

महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर मेळावे

• लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार
• भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
• सुनील तटकरे, दादा भुसे, भुजबळ यांची उपस्थिती

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील 11 घटक पक्षांचे 14 जानेवारी रोजी राज्यभर जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्री. बावनकुळे बोलत होते.
शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर भुजबळ, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’ला 51 टक्के मतांसह 45 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास श्री.बावनकुळे यांनी व्यक्त केला.
श्री. बावनकुळे म्हणाले की, मकरसंक्रांतीच्या पर्वावर 14 जानेवारी रोजी राज्यातील 36 जिल्ह्यांत ‘महायुती’तील 11 पक्षांचे संयुक्त मेळावे होणार आहेत. जिल्हा मेळाव्यांना घटकपक्षांचे जिल्हा पातळीवरील प्रमुख नेते, पालकमंत्री तसेच घटकपक्षांनी नेमलेले संपर्क मंत्री उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर तालुका आणि बूथस्तरीय मेळावे घेण्याचा निर्णय ‘महायुती’ने घेतला आहे.
फेब्रुवारीमध्ये विभागीय स्तरावर मेळावे होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री,घटक पक्षांतील नेते या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर,शिवसंग्राम च्या ज्योतीताई मेटे,विनय कोरे,जयदीप कवाडे, सुलेखा
कुंभारे आदी उपस्थित राहणार आहेत.

• 51 टक्के मते मिळवण्याचा ‘महायुती’चा निर्धार
राज्यभरातील प्रवासात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट अनुभवण्यास मिळाली असून राज्यात ‘महायुती’चे 45 पेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील,असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले की, बूथस्तरापर्यंत रचना तयार करून 51 टक्के मते मिळवण्याचा ‘महायुती’चा निर्धार आहे. मोदी लाट दिसू लागल्यामुळे यापुढील काळात ‘महायुती’मध्ये आणखी मोठे पक्ष प्रवेश होतील.

• महायुती’चे सर्व नेते व कार्यकर्त्यांची एकजुट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यासह ‘महायुती’तील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील समन्वय वाढावा, यासाठी हे मेळावे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत साकारण्यासाठी ‘महायुती’चे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत.
शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी सांगितले की, केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ‘महायुती’च्या घटक पक्षांचे मेळावे होणार आहेत.गावपातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण होण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचे श्री.भुसे यांनी नमूद केले.

गुजरात लॉबीकडून महाराष्ट्राची लुटू सुरुच, ‘महानंद’ही गुजरातच्या दावणीला बांधला :- अतुल लोंढे.

मोदी-शहांसमोर शिंदे-फडणवीस-अजित पवार हे फक्त सह्याजीराव !

मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे

मुंबई, दि. ३ जानेवारी

केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

भाजपा सरकारचा समाचार घेताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्र लुटण्यासाठीच तोडफोडीचे राजकारण करुन भाजपाने सत्ता बळकावली आहे. महाविकास आघाडी सरकार गुजरात लॉबीच्या कुटील हेतूंच्या आड येत होते,गुजरात लॉबीसमोर होयबा करत नव्हते म्हणूनच सरकार पाडले व मागील दीड वर्षात महाराष्ट्राची अक्षरशः लुट सुरु आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना नाही म्हणण्याची हिम्मतच नाही. राजरोसपणे महाराष्ट्रावर दरोडा टाकून लुटले जात असताना हे तिघेजण फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. शिंदे, फडणवीस व अजित पवार हे मोदी शहांसमोर फक्त ‘सह्याजीराव’ आहेत, दिल्लीने दिलेल्या आदेशानुसार फाईलवर सही करणे एवढेच त्यांचे काम आहे. महाराष्ट्रात सहकार क्षेत्राने समृद्धी आणली, ग्रामीण भागात या सहकारने आर्थिक प्रगती केली पण याच सहकारावर आता मोदी-शहांची वक्रदृष्टी पडली आहे. महानंदचा कारभार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाला आहे. दुग्ध व्यवसायात महाराष्ट्रातील महानंद, गोकूळ, वारणा, चितळे या सारख्या असंख्य संस्थांचे मोठे जाळे आहे. ग्रामीण भागात दूग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे व सहकारच्या माध्यमातून मोठी क्रांती झालेली आहे पण गुजरातच्या ‘अमूल’साठी महानंदचा बळी दिला जात आहे. राज्यातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला पळवून नेले जात आहेत. शिंदे सरकार आता गुजरातला महानंद गेलाच नाही किंवा मोदीजी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार आहेत अशी तकलादू उत्तरे देऊन दिशाभूल करतील. मोदी-शहांनी आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनाच गुजरातला घेऊन जावे, असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच ‘निर्भय बनो’ जाहीर सभा

पुणे (दि.३ डिसेंबर २०२४) सध्या देशामध्ये जे राजकारण सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन आयुष्य धोक्यामध्ये आलेले आहे. संविधानाची तोडफोड करत संसदेमध्ये अनेक लोकविरोधी कायदे संमत केले जात आहेत. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याक समुदायांच्या अधिकारांचा संकोच, शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार इत्यादी मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये, म्हणून नको ते मुद्दे पुढे करून सर्वसामान्य लोकांना गुंतवून ठेवण्याचे षडयंत्र सुनियोजित पद्धतीने केले जात आहे. संसदेमध्ये मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या खासदारांना असंविधानिक पद्धतीने निलंबित केले जात आहे. ही परिस्थिती पाहता देशातील लोकशाही धोक्यात आहे असे वाटते या विषयावर जनजागृती करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन सरकारला प्रश्न विचारण्यासाठी शनिवारी (दि.६ जानेवारी) सायंकाळी सहा वाजता पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी व ॲड. असीम सरोदे यांच्या ‘निर्भय बनो’ अभियानांतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक व ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनी पत्रकार परिषदेतील दिली.
बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, मारुती भापकर तसेच ज्येष्ठ नेते प्रताप गुरव, प्रकाश जाधव, चेतन बेंद्रे, गणेश दराडे, नरेंद्र बनसोडे, डॉ. मनीषा गरुड, अनिल रोहम, धनाजी येळकर, सतीश काळे, प्रदीप पवार, प्रवीण कदम, रवी नांगरे, सागर चिंचवडे आदी उपस्थित होते.
ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले की, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर होत चालले आहे. कमी पटसंख्येच्या नावाखाली हजारो शाळा बंद करून, बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. देशातील काही ठराविक भांडवलदारांना आणि गुंतवणूकदारांचे हित साध्य व्हावे यासाठी शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात येत आहेत. शेतीचे कंपनीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले कायदे बदलून भांडवलदारांना उपयोगी पडतील असे कामगार कायदे करण्यात येत आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची वाट लावली जात आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारतीय लोकशाहीचा गौरव होतो तीच लोकशाही आता हुकुमशाहीच्या दिशेने प्रवास करत आहे. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य काढून घेतले गेले आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. कैलास कदम म्हणाले की, देशात आणि राज्यात सर्व समाज घटकात भीतीचे वातावरण आहे. जो कोणी सरकार विरोधात बोलेल त्यांना सीबीआय, आयटीची भीती दाखवून गप्प केले जात आहे. याचा निषेध म्हणून आणि सरकारचा भ्रष्टाचार आणि इंडियाचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी या निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले की, सरकारी यंत्रणांचा वापर करून देशातील विरोधी पक्ष संपवण्याची प्रक्रिया बिनदिक्कतपणे सुरू आहे. सरकारच्या जन विरोधी धोरणांविरुद्ध बोलणाऱ्यांना किंवा लिहिणाऱ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत व सामाजिक जाणीव असणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष यांनी शांत राहून चालणार नाही. निर्भय होऊन या व्यवस्थेच्या विरोधात संघटितपणे लढा उभारला पाहिजे. यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
चेतन बेंद्रे यांनी सांगितले की, लाखो शहिदांच्या बलीदानातून मिळालेले स्वातंत्र्य धोक्यामध्ये आलेले असतांना, आज जर आपण शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. यासाठीच प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ‘निर्भय बनो’ अभियानाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभर एक चळवळ उभी करण्यात आली आहे.
गणेश दराडे यांनी सांगितले की, या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकार घालविले पाहिजे. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच ‘निभर्य बनो’ जाहीर सभेचे शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सायं. ५.०० वा. आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ‘निर्भय बनो’ अभियानाचे संस्थापक नेते डॉ. विश्वंभर चौधरी आणि ॲड. असिम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रकाश जाधव यांनी सांगितले की, ही सभा यशस्वी होण्यासाठी व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे राजकीय व सामाजिक प्रबोधन होण्यासाठी पुरोगामी विचारांच्या मित्रांसह, समविचारी पक्ष, संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

पुणे : कोरेगाव पार्क येथे संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी पुणे शहरात खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसतीगृहासाठी १० ते १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या खाजगी इमारतीची आवश्यकता आहे. या इमारतींमध्ये किमान १५ ते २० खोल्या, १० शौचालये, १० स्नानगृहे, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सर्व पायाभूत सुविधा, तसेच इमारतीच्या भोवती संरक्षक भिंत असावी.

इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) किंवा ८४८४८९६६७२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू करण्याचा आप चा आग्रह अन्यथा आंदोलनाचा इशारा

पुणे-मागील वर्षी मोठा गाजावाजा व खर्च करून माँ खादिजा प्रसूतीगृह सुरू करण्यात आले. परंतु आज अखेर तिथे प्रसूतीगृहाच्या कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. सदरच्या जागी मोठी बिल्डिंग बांधली असून फर्निचर ही नव्याने दिले आहे. या परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक राहत असून त्यांना महिलांना घेऊन तपासणी व इतर सर्वच बाबींसाठी कोंढवा बुद्रुक येथे जावे लागते. त्यामुळे आम आदमी पार्टीने हे प्रसुतिगृह तातडीने सुरू करावे अशी मागणी महानगरपालिकेकडे केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा मुकुंद किर्दत आणि एम अली सय्यद यांनी दिला आहे.

या प्रसुतीगृहाच्या संकल्पना बाबत स्थानिक नगरसेविका परवीन शेख यांचे नावे चमकोगिरी करणारा मोठा बोर्ड लावलेला असून प्रत्यक्षात मात्र वरचा मजला पूर्णपणे बंद असून दरवाजांना कुलुपे लावलेली आहेत.

सदरच्या जागी चे प्रसूतीगृह तातडीने सुरू करावे व त्यासाठी योग्य त्या वैद्यकीय प्रशिक्षित स्टाफची नेमणूक करावी असे निवेदन आम आदमी पार्टी तर्फे आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांना दिले आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, एम अली सय्यद, सतिश यादव, संजय रणधीर, मिलींद सरोदे, मोईन मडकी, नितीन कांबळे, रौफ शेख आदी उपस्थीत होते.

हिट अँड रन प्रकरणी दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे,

आंदोलन मागे घेतले नाही शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवा :- बाबा कांबळे

सरकारने आमच्याशी चर्चा करावी आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नये

देशभरातील ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल

हिट अँड रन प्रकरणी 3 जानेवारी पासून दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनासाठी देशभरातील ऑटो बस ट्रक टेम्पो ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल झाले असून, देशभरातील प्रवासी व मालवाहतूक चालक-मालिकांचे आंदोलन सुरू राहणार असून कोणीही माघार घेतलेली नाही, सरकारने आमच्याशी चर्चा करावी देशातील 25 करोड चालक-मालकांचं आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत,
“हिट अँड रन प्रकरणी दहा वर्षे शिक्षा व सात लाख रुपये दंड तसेच राष्ट्रीय चालक आयोग, वेल्फर बोर्ड, ड्रायव्हर डे व इतरही प्रश्न महत्त्वाचे आहेत याच प्रश्नांवरती ड्रायव्हर आक्रमक झाले असून मूळ प्रश्नांवर चर्चा करावी,
मोठे उद्योगपती ट्रान्सपोर्ट मालकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले आहे असे जाहीर करणे ही देशातील 25 कोटी चालक-मालकांची दिशाभूल असून ज्यांनी आंदोलन सुरू केले नाही ज्यांच्या आंदोलनाशी काही संबंध नाही असे देशातील मोठे उद्योगपती भांडवलदार ट्रान्सपोर्टर्स यांना हाताशी धरून आंदोलन घडवण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अधिक उग्र होईल, अशा इशारा मालवाहतूक प्रवासी चालक-मालकांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला आहे,

दिल्ली येथे जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बाबा कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह दिल्ली येथे दाखल झाले असून आज दिवसभर आंदोलन सुरू राहणार आहे सायंकाळी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे,

पिंपरी चिंचवड पुणे मुंबई महाराष्ट्र मध्ये आज प्रत्येक आरटीओ वरती आंदोलन केलं जाणार असून, लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन सुरू ठेवावे असे आवाहन दिल्ली येथून बाबा कांबळे यांनी देशभरातील प्रवासी व मालवाहतूक चालक मालकांना केले आहे,

बाबा कांबळे म्हणाले अनेक वर्षापासून देशभरातील ट्रक ड्रायव्हर बस ड्रायव्हर मोठे जड वाहतूक चालक-मालकांवरती अन्य अत्याचार होत आहे रस्त्यावर त्यांना मारला जात आहे याप्रकरणी त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग असून यात भर म्हणून सरकारने केलेला हा काळा कायदा यामुळे त्यांच्यामध्ये संताप निर्माण झाला आहे ड्रायव्हर वर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी राष्ट्रीय चालक आयोग निर्माण व्हावा ही आमची जुनी मागणी असून या बरोबरीने देशभरातील 25 कोटी चालक-मालकांना सामाजिक सुरक्षा आरोग्य विमा म्हातारपणी पेन्शन मिळण्यासाठी वेफर बोर्ड निर्माण झाले पाहिजे ड्रायव्हर डे साजरा केला पाहिजे देशासाठी बलिदान देणाऱ्या ड्रायव्हर यांचे स्मारक झालं पाहिजे असे इतर विविध प्रश्न महत्त्वाचे असून या प्रश्नांवरती चर्चा झाल्याशिवाय व समाधान झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, दिल्ली जंतर मंतर येथील आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू राहील कोणीही गैरसमज करून आंदोलन मागे घेऊ नये हा लढा देशातील 25 कोटी चालक-मालकांचा असून चालक-मालकाने दिल्ली येथे जंतर-मंतर येथे यावे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपापल्या शहरातील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करावे कोणता हिंसाचार व रस्ता रोको करू नये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे असे आवाहन देखील बाबा कांबळे यांनी केले आहे,

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

सातारा दि. ३: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार सर्वश्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे आदी उपस्थित होते.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाचे लोकार्पण

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

या सभागृहाच्या नूतनीकरणाअंतर्गत स्थापत्य कामांसाठी आणि विद्युतीकरणासाठी प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी PM मोदी उपवास करणार:शरयू नदीत स्नानही करू शकतात, राम मंदिराचे 42 दरवाजे 100 किलो सोन्याने मढवणार

22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी व्रत (व्रत) पाळणार आहेत. एवढेच नाही तर शरयू नदीत स्नानही करू शकतात. कारण ते प्राण प्रतिष्ठेच्या वेळी मुख्य यजमान आहेत. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी उपवास केला होता. प्राण प्रतिष्ठेदरम्यान गर्भगृहात 500 लोक उपस्थित राहणार आहेत.यामध्ये पीएम मोदी, सीएम योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, संघ प्रमुख मोहन भागवत आणि विधीचे आचार्य यांचा समावेश असेल. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 1 मिनिट 24 सेकंदांचा आहे. हा 12:29 मिनिटे 8 सेकंदाचा मूळ मुहूर्त असेल, जो 12:30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत राहील.

अयोध्येतील भाजपचे जिल्हा प्रवक्ते रजनीश सिंह म्हणाले, “पंतप्रधानांनी भूमिपूजनाच्या वेळी उपवास केला होता. त्यामुळे ते 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठावेळीही नक्कीच उपवास करतील. हा आमचा विश्वास आहे.” पंतप्रधानांचा संकल्पित अक्षत अयोध्येला पोहोचल्यानंतर 16 जानेवारीपासून अभिषेक सोहळा सुरू होईल.

अयोध्येचे महंत मिथिलेश नंदानी शरण म्हणाले, “अभिषेक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या यजमानांनी पवित्र नदीत स्नान करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मोदी अयोध्येच्या पवित्र शरयू नदीतही स्नान करू शकतात, असे मानले जात आहे. “

काशी विश्वनाथाच्या जीर्णोद्धाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा स्नान केले होते.

42 दरवाजे सोन्याने मढवले जातील

राम मंदिराच्या 46 पैकी 42 दरवाजे 100 किलो सोन्याने मढवले जाणार आहेत. पायऱ्यांजवळ 4 दरवाजे असतील. यांवर सोन्याचा मुलामा चढवला जाणार नाही. गर्भगृहाचा मुख्य दरवाजा सुमारे 8 फूट उंच आणि 12 फूट रुंद आहे. हा सर्वात मोठा दरवाजा आहे. हे दरवाजे महाराष्ट्रातील सागवान लाकडापासून बनवले आहेत. हैदराबादच्या कारागिरांनी त्यावर कोरीव काम केले आहे.

कोरीव काम केल्यानंतर त्यावर तांब्याचा थर लावण्यात आला आहे. गाझियाबादच्या एका प्रसिद्ध ज्वेलर्सला दारावर सोन्याचा मुलामा देण्याचे काम देण्यात आले आहे. रामलल्लाचे सिंहासनही सोन्याचे बनवले जाणार आहे. हे कामही 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. मंदिराचे शिखरही सोन्याचे असेल. मात्र हे काम नंतर केले जाईल.

हा दरवाजा सुमारे 8 फूट रुंद आणि 12 फूट उंच बनवला असून त्यावर कमळाचे फूल कोरलेले आहे.

चरण पादुका 1 किलो सोने-7 किलो चांदीपासून बनवल्या

या पादुका एक किलो सोने आणि सात किलो चांदीपासून बनवल्या जातात.

भगवान श्रीरामाच्या मंदिरात अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या चरण पादुकाही ठेवल्या जातील. या चरण पादुका एक किलो सोने आणि सात किलो चांदीपासून बनवलेल्या आहेत. या हैदराबादचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी बनवल्या आहेत.

राममंदिर संकुलात आणखी 13 मंदिरे बांधली जातील

अयोध्येत 70 एकरवर बांधल्या जाणाऱ्या राम मंदिर संकुलात आणखी 13 मंदिरे बांधली जाणार आहेत. याशिवाय भगवान सूर्य, भगवान शिव, माता भगवती, गणपती, हनुमानजी आणि अन्नपूर्णा देवीची मंदिरे असतील. भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर या मंदिरांचे बांधकाम सुरू होईल. इतर 7 मंदिरे भिंतीबाहेर बांधली जाणार आहेत. त्यात वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, शबरी, निषाद राज आणि अहिल्या या ऋषींची मंदिरे असतील. या मंदिरांचे बांधकाम 2024 पर्यंत पूर्ण होईल.

अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसाठी सज्ज झाले आहे.

मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल

हा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे. येथून रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविक पायऱ्या चढून जातील.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल. उत्तर दिशेला बाहेर पडण्याचा दरवाजा आहे. हे मंदिर 70 एकरांपैकी 30 टक्के जागेवर बांधले जात आहे. उर्वरित जमिनीवर हिरवीगार झाडे लावली जातील. याठिकाणी पूर्वीपासून असलेली 600 हून अधिक झाडेही तोडण्यापासून वाचली आहेत. सीता कुप्याजवळील उद्यानातील वटवृक्ष अन्यत्र हलविण्यात आले आहे.

रामलल्लाच्या हातात धनुष्यबाण असेल

हे अयोध्येतील राम मंदिराचे गर्भगृह आहे. 22 जानेवारी रोजी रामलला येथे वास्तव्य करणार आहेत.

गर्भगृहात स्थापनेसाठी रामाच्या 3 मूर्ती तयार करण्यात आल्या. यातील एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. ही मूर्ती 51 इंच उंच आहे. रामलल्लाने धनुष्यबाण धरलेले दाखवले आहे. चंपत राय यांच्या मते ही मूर्ती राजपुत्र आणि विष्णूच्या अवतारासारखी दिसते. रामलला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत. कमळाच्या फुलासह त्याची उंची सुमारे 8 फूट असेल.

70 हजार कोटींचा बंदर आज पोपट झाला:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची DCM अजित पवारांवर टीका

चंद्रपूर-70 हजार कोटींचा मलिदा खाणारे आज सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसून पोपटासारखे बोलत असल्याची तिखटी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला केली. ते श्रीमंत देवाजी बाबू खोब्रागडे यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, 70 हजार कोटी खाल्ल्यानंतर बारामतीचा मीटू आता पोपट झाला आहे. खासदारांची स्थिती गुलामासारखी झाली आहे. ते काहीच बोलू शकत नाही. देवाजी बापू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजाभाऊ खोबरागडे यांच्या काळातही मतभेद होते. मतांतरे होती, पण विचार लोकशाहीचा होता. या सर्वांनी उपेक्षितांसाठी संघर्ष केला. पण आज मनुवादी विचारांचा देश उभा करण्याचे काम सुरू झाले आहे.

संविधान वाचवणे सर्वांची जबाबदारी

मी देव पाहिला नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात मला देव भेटला. मी त्यांच्या पुण्याईनेच इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही पुन्हा चूक केली तर तुम्ही नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी मत द्या यासाठी हे बोलत नाही. तर संविधान व लोकशाही वाचवण्याची ही आपली सामूहिक जबाबदारी आहे यासाठी हे बोलत आहे, असे विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.

कधी कधी जातही काढावी लागदते

कुणाची जात कधी काढू नये. पण कधीकधी काढावी लागते. सत्ता, संपत्ती काही मर्यादित लोकांच्या हातात गेली आहे. देशातील वातावरण दूषित झाले आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात लढविण्याचे काम सुरू आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मी बाळासाहेब आंबेडकरांना एकत्र येण्याची विनंती करतो. अन्यथा हे लोक बहुजनांचा सर्वात अगोदर बंदोबस्त करतील. या देशात गुजराती, मारवाडी व 3 टक्के लोकसंख्या असलेल्यांचीच सत्ता आहे. तुम्ही-आम्ही काही नाही. ते हो म्हणतील तर हो म्हणा, नाही म्हणतील तर नाही म्हणा, अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी खंतही वडेट्टीवार यांनी यावेळी बोलून दाखवली.

‘ लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ विषयावर होणार चर्चा

पुणे :

विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने दि.६ आणि ७ जानेवारी रोजी विचारवेध संमेलन – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी भवन, कोथरूड येथे हे संमेलन होणार आहे.’ लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ ही या संमेलनाची संकल्पना असून विविध आंदोलनातील कार्यकर्ते तसेच विचारवंत सहभागी होणार आहेत.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत संयोजन समितीच्या वतीने आनंद करंदीकर, सरिता आवाड, राजाभाऊ गायकवाड यांनी ही माहिती दिली.

यावर्षी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पुरेशा माहितीवर आधारित, विचारपूर्वक आणि निर्भय मतदान करता येणे ,हे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. लोकशाही रक्षणाच्या तातडीच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी हे विचारवेध संमेलन आयोजित करण्यात आले आहे. योगेंद्र यादव, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ.कुमार सप्तर्षी, निरंजन टकले, हरीष सदानी, सुनीती सु.र., अजित रानडे, संदीप बर्वे आणि अन्य मान्यवर दोन दिवस विविध सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

दोन दिवस विचार परामर्श,मुक्त संवाद,प्रश्नोत्तरे

शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता योगेंद्र यादव यांच्या ‘लोकतंत्र की रक्षा के सामने चुनौतीया’ भाषणाने संमेलनाचा प्रारंभ होईल. आनंद करंदीकर विचारवेध संमेलनामागची भूमिका स्पष्ट करतील. साडेअकरा वाजता ‘लोकशाही खच्चीकरणाचे जागतिक प्रयत्न’ या विषयावर अरविंद वैद्य यांचे व्याख्यान होईल. १२ वाजता सुनीती सु.र.यांचे ‘लोकशाही रक्षणासाठी लोकांचे धडे’ या विषयावर व्याख्यान होईल. पावणे दोन वाजता ‘माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही’ विषयावर अलका धुपकर संवाद साधतील. राही श्रुती गणेश या ‘शिक्षण संस्थांना फॅसिस्टांची मगरमिठी ‘ विषयावर माहिती देतील. साडे तीन वाजता ‘मुस्लिम मागासवर्गीय आणि लोकशाही रक्षण ‘या विषयावर तमन्ना इनामदार बोलणार आहेत. ४ वाजता Adv. प्रियदर्शी तेलंग हे ‘लोकशाहीसाठी दलित संघटन’ विषयावर व्याख्यान देतील. पावणे पाच वाजता वसुधा सरदार या ‘दारूममुक्तीसाठी चळवळ उभारणी’ या विषयावर तर प्रभात सिन्हा हे ‘माणदेशी चॅम्पियन्स’ विषयावर माहिती देतील. सव्वा सहा वाजता ‘हू किल्ड गांधी’ माहितीपट दाखविला जाईल आणि तुषार गांधी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

रविवार, ७ जानेवारी या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सव्वादहा वाजता समूहगीतांनी प्रारंभ होईल. साडेदहा वाजता ‘सद्भावना मिशन’ या विषयावर डॉ.राम पुनियानी मार्गदर्शन करतील. ‘लोकशाही रक्षण’ या विषयावर निरंजन टकले यांचे व्याख्यान होईल. १२ वाजता ‘स्त्रीवादाच्या संदर्भांत लैंगिक हक्क संरक्षण’ या विषयावर हरीश सदानी हे संवाद साधतील. पाऊण वाजता ‘संविधान प्रचार चळवळीचा अनुभव’ विषयाची माहिती संदीप बर्वे देतील. दुपारी सव्वा दोन वाजता ‘स्थानिक स्वराज्य संस्थातील महिला प्रतिनिधींचे सक्षमीकरण’ या विषयावर भीम रासकर माहिती देतील. पावणे तीन वाजता याच विषयवार नीती दिवाण हिंदीतून माहिती देतील. सायंकाळी ४ वाजता ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सामाजिक सलोखा’ या विषयावर अजित रानडे यांचे व्याख्यान होईल. सव्वा पाच वाजता ‘लोकशाही रक्षणाच्या लढ्याची दिशा’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी मार्गदर्शन करतील. सहा वाजता सरिता आवाड संमेलनाचा समारोप करतील.

नववर्ष आगमना दिवशी खुनी हल्ला -चार जण गजाआड

पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर यांची कारवाई.

पुणे- नवीन वर्ष लागताच पहाटे जुन्या वैमनस्यातून खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना पारवती पोलिसांनी गजाआड केले आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’
दि.०१/०१/२०२४ रोजी पर्वती पोलीसस्टेशन हद्दितील पानमळा वसाहत येथे पहाटे ०२/३० वा. इसम नामे किरण बाळू निमसे यांनी त्यांचेवर तत्कालीन वादातुन त्याचे ओळखीचे चार इसमांनी प्राणघातक हल्ला करुन त्याचे खुनाचा प्रयत्न केले बाबत पर्वती पो.स्टे येथे गुरनं.००२/२०२४ भा.दं.वि.कलम कलम ३०७,३२३,५०४,५०६, ३४ आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपोका ३७ (१) सह १३५, क्रि.लॉ.अमें कलम ७ प्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी पर्वती पोलीसांना आरोपी पकडणे बाबत सुचना दिल्या होत्या त्या प्रमाणे पर्वती पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी तपास पथकातील अंमलदारांची दोन पथके पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे यांचे करवी तयार करुन आरोपी पकडणे बाबत सुचना दिल्या त्यानुसार तपास पथकातील अंमलदार दत्तवाडी भागात पेट्रोलिंग करत असताना पो.अं. पुरुषोत्तम गुन्ला, अमित सुर्वे, कुंदन शिंदे यांना त्यांचे खास बातमिदार यांचे मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी नामे हे त्यांचे मित्रांना भेटण्यासाठी दत्तवाडीतील म्हात्रे पुला खाली येवुन थांबले आहेत. सदर बातमीचे अनुशंगाने पर्वती पोलीसांनी ताबडतोब सापळा रचुन म्हात्रेपुला खाली आरोपी नामे १) हर्षद ऊर्फ सोन्या शंकर खुळे वय २० वर्षे रा. दत्तवाडी पोलीस चौकी मागे दत्तवाडी पुणे.२) तुषार भरत कदम वय २३ वर्षे रा. हनुमान नगर, मनपा शाळे शेजारी दत्तवाडी पुणे. ३) आदित्य शंकर चव्हाण वय १८ वर्षे २ महिने रा. ९९९/१२९ जुना दत्तवाडी रोड स्वामी समर्थ मंदिरा जवळ दत्तवाडी पुणे व ४) पियुश श्रीकांत गायकवाड वय २३ वर्षे रा. हनुमान नगर मनपा शाळेजवळ दत्तवाडी पुणे यांना शिताफीने पकडले त्याचे कडे विश्वासात घेवुन चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा तत्कालीन वादातुन केल्याचे कबुली दिल्याने लागलीच त्यांना उपरोक्त गुन्हयात आज दि. ०२/०१/२०२४ रोजी १७/१० वा अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री.चंद्रकांत कामठे पर्वती पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
या आरोपी पैकी आरोपी नामे हर्षद ऊर्फ सोन्या शंकर खुळे हा दत्तवाडी, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील सराईत आरोपी असुन त्यांनी त्या दिवशी अजुन कोठे गुन्हे केले आहेत काय या बाबत पर्वती पोलीसांकडुन सखोल चौकशी सुरु आहे.
सदरील कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परि-३. श्री. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे, पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे, पो. हवा. कुंदन शिंदे, पो.ना. अमित सुर्वे, पो.अं. पुरुषोत्तम गुन्ला, दया तेलंगे पाटील, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, सद्दाम शेख, अमोल दबडे, व अमित चिव्हे यांनी केली आहे.

हडपसरच्या मोहीते आणि त्याच्या १५ जणांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई

पुणे-सुरज ऊर्फ चुस बाळु मोहीते (टोळी प्रमुख) व त्याचे १५ साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी येथे सांगितले आहे . पोलिसांनी असे म्हटले आहे कि,’
दिनांक १८/१२/२०२३ रोजी १ फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरात असताना परिसरात राहणारे अनिकेत पाटोळे, रवि पाटोळे, आदित्य पाटोळे, लखन मोहिते, सुरज ऊर्फ चुस मोहिते, तुषार ऊर्फ बाळु मोहिते, सचिन खंडाळे, ओमकार देढे, पंकज कांबळे, गौरव झाटे, हसनेल अली शेनागो हे तोंंडाला रुमाल बांधुन हातात धारदार शस्त्र घेवुन त्यांच्या घराच्या बाहेर आले व यापुर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन फिर्यादीला शिवीगाळ करुन तुला आता जिवंत सोडत नाही अशी धमकी देवुन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या इराद्याने त्याच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्राने वार करुन, दगड मारुन जखमी केले. तसेच सदर भागातील दुकानातील काऊंटरच्या काचा, बाहेर पार्क केलेली दुचाकी व चारचाकी वाहने, लोखंडी हत्याराने मारुन, तोडुन नुकसान केले. तसेच लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवत सदर भागात दहशत निर्माण केली म्हणुन त्यांच्याविरुध्द फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने हडपसर पो.स्टे.गु.र.नं.१९१५/२०२३, भादंवि कलम ३२४,४२७,१४३,१४४,१४५,१४८, १४९,५०४,५०६, कलम वाढ ३०७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे
कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ प्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे (१) सुरज ऊर्फ चुस बाळु
मोहीते, वय-२२ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) पाहिजे आरोपी (२) अनिकेत रविंद्र पाटोळे, वय- २३ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे ३) आदित्य रविंद्र पाटोळे, वय-२० वर्षे, वैदवाडी, हडपसर, पुणे ४) तुषार बाळु मोहिते, वय-१९ वर्षे, वैदवाडी, हडपसर, पुणे ५) नवनाथ ऊर्फ लखन बाळु मोहिते, वय-१९ वर्षे, वैदवाडी, हडपसर, पुणे ६) हासनेल अली शेनागो, वय १९ वर्षे, वैदवाडी, हडपसर, पुणे ७) गौरव विजय झाटे, वय-१९ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे ८) ओमकार मारुती देढे, वय १९ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे. ९) पंकज विठ्ठल कांबळे, वय-२० वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे १०) रविंद्र बाबुराव पाटोळे वय-४६ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे (टोळी सदस्य) (११) सचिन मारुती खंडाळे, वय-२५ वर्ष, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे (टोळी

सदस्य, पाहिजे आरोपी) अ.क्र.२ ते १० यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे, तसेच विधी संधर्षित ०५ बालक हे ताब्यात असुन अ.क्र.१ व ११ हे पाहिजे(wanted) आरोपी आहेत.
आरोपी सुरज ऊर्फ चुस बाळु मोहीते याने साथीदारासह दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व / दहशत रहावी म्हणुन व स्वतःच्या व इतरांसाठी गैरवाजवी अवैध मार्गाने आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्याकरीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्यांचे विरूध्द बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, दूखापत करणे असे गुन्हे दाखल असुन त्यांचे विरुध्द प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत

यातील आरोपी यांनी संघटित दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४)चा अंतर्भाव करणेची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम-२३(१) (अ) प्रमाणे पूर्वमान्यता मिळणे कामी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद शेळके यांनी पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ५ पुणे शहर, आर, राजा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणी छाननी हडपसर पो.स्टे.गु.र.नं.१९१५/२०२३, भादंवि कलम ३२४,४२७,१४३,१४४, १४५, १४८,१४९,५०४,५०६, कलम वाढ ३०७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे, आर्म अॅक्ट ४(२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ चा अंतर्भाव करणे बाबत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्वीनी राख, ह्या करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (मा. पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) श्री रामनाथ पोकळे मा. अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त साो. परीमंडळ-५ पुणे शहर आर, राजा, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, अश्विनी राख, त्यांचे मार्गर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वास डगळे, श्री. संदिप शिवले म. सहा. पोलीस निरीक्षक सारिका जगताप, पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, हनुमंत झगडे गिरीश एकोर्गे, बाबासाहेब शिंदे, यांनी केलेली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईन लक्ष देवुन, शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १०९ वी कारवाई आहे.