Home Blog Page 1280

‘सीएमपी’ प्रणालीमुळे शिक्षकांचे वेतन आता विनाविलंब होणार

मुंबई, दि. ४ : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी, २०२४ पासूनचे वेतन आता नियमित वेळेत होणार आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट) प्रणालीमार्फत तसेच ज्या जिल्ह्यांत ई-कुबेर कार्यरत आहे, त्या जिल्ह्यांत ई-कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका/ नगरपालिका यांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकास विविध कारणांमुळे विलंब होत असे. ही बाब लक्षात घेता, वेतनाचे प्रदान सीएमपी प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी प्रणाली व ई- कुबेर प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात येत आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि संबंधित कोषागार अधिकारी याचे तंतोतंत पालन करतील. याबाबतचा शासन निर्णय 4 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी

प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा-अजित पवार

पुणे, दि.५:  प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी प्रसंगी दिले.

यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, ‘सीईओपी’चे उपकुलगुरु सुधीर आगाशे, प्रा. भालचंद्र बिराजदार, निबंधक दयाराम सोनवणे आदी उपस्थित होते.

‘नोंदणी भवन’ येथील विकास कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली.

‘नोंदणी भवन’ची कामे करतांना प्रामुख्याने वीज, वाहनतळ, सोलरपॅनल, जिन्यामधील अंतर, पायऱ्या, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. भवनच्या दर्शनी भागात विभागाचे मोठ्या आकाराचे बोधचिन्ह लावावे. भिंतीच्या कामासाठी मजबूत विटेचा वापर करावा. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपून कामे करावीत. इमारतीसाठी टिकाऊ दगडाचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा. माजी विद्यार्थ्यांच्या कल्पना, सूचनांचा विचार करा,अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे.विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री. पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी इमारत परिसरातील विविध इमारत आणि प्रयोगशाळेची पाहणी करुन संबंधित विभाग प्रमुखाकडून येथील कामांबाबत माहिती घेतली.

ससून रुग्णालया समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल उभारा

पुणे-ससून रुग्णालया समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल उभारा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर , सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात या तिन्ही नेत्यांनी म्हटले आहे कि,’आज आपल्या हस्ते ससून रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचा शुभारंभ अनावरण होत आहे.पुणे महानगर आणि जिल्ह्याची लोकसंख्या ही एक दीड कोटी पर्यंत झाली आहे.
पुण्यामध्ये शासकीय अथवा खाजगी कॅन्सर उपचाराचे हॉस्पिटल नाही.पुणे शहरातील व जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या गरजू रुग्णांना उपचारासाठी मुंबईला टाटा कॅन्सर सेंटर येथे जावे लागते.आज ज्या ससून रुग्णालयाच्या आवारातील इमारतीचे आपण उद्घाटन करणार आहात त्या इमारती समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना शेजारील सर्व्हे नंबर ४६ वरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडावर अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल उभारणे शक्य होईल आणि या दोन्ही वास्तूंना जोडणारा पूल मुंबईच्या हिंदुजा या हॉस्पिटलच्या धरतीवर करणे सहज शक्य आहे.आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात याशिवाय राज्याचे अर्थमंत्री देखील आहात त्यामुळे या विषयाचा गांभीर्याने विचार करावा अशी विनंती आहे.

मला अजून 8 महिने असेपर्यंत फिरावे लागणार:निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठं विधान, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

मुंबई-महाराष्ट्रासह देशात यंदा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. मी अजून 8 महिने आहे. तोपर्यंत फिरावे लागणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.

गुरुवारी पालघर जिल्ह्यांतील सरपंच व विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी शिंदे म्हणाले, मी अजून 8 महिने आहे. म्हणून आपल्याला फिरावे लागणार आहे. शिवसेना पक्षात नव्याने दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांचे एकनाथ शिंदेंनी स्वागतही केले.

यावेळी शिंदे म्हणाले, ”आज दोन प्रवेश झाले आहेत वरळी आणि पालघर मधून अनेक जणांनी प्रवेश केला आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला तो मी पूर्ण करेल. आम्ही राज्यात केलेल्या विकासामुळे विश्वासाने तुम्ही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरचा विकास केला जाणार असून जिल्ह्यातील सगळ्यांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी काम करतोय असे आश्वासन शिंदेंनी दिले. तसेच मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे. यासाठी आपण वर्सोवा ते विरार आणि विरार ते पालघरपर्यंत रस्ता करणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ”सगळ्यांना रोजगार आणि हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी काम करत आहे. अडीच वर्षांत जर काम थांबले होते ते दीड वर्षात पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रात उद्योग नंबर एकवर करणार आहे. मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सर्वात लोकप्रिय आहे. 2 कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे”, असे शिंदे म्हणाले.

”यावेळी आम्ही बंड केले त्यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या मुलाचा वाढदिवस होता. पण त्यांनी त्यावेळी ते म्हणाले आधी लग्न कोंढाण्याचे आणि नंतर बाकीचे सगळे… असा प्रसंग मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितला.

कळस येथील दवाखान्यात प्रसूती गृह सुरु करावे – “आप” ची मागणी

कळस येथील कै. गेनबा तुकाराम म्हस्के शासकीय रुग्णालय याचे बांधकाम पूर्ण होऊन अनेक वर्ष झाले. इमारत ही ३ मजली असून फक्त खालील भागात ओ पी डी सुरू असते. वरील दोन्ही मजले हे वापरवीण पडून आहेत.
लोकांच्या पैशातून मोठे हॉस्पिटल बांधून फक्त पडून आहे. याभागाची वाढती लोकसंख्या पाहता गरजू नागरिकांकरिता पूर्णवेळ रुग्णालय नाही. अनेक गरीब महिलांना प्रसूती साठी बाहेर खाजगी रुग्णालयात जावे लागते.

यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडी चे शहराध्यक्ष अमित म्हस्के यांनी पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग व क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे वारंवार मागणी केली असता, आज सकाळी पाहणीकरिता कळस येरवडा क्षेत्रीय कार्यालय चे अतिरिक्त आयुक्त विजय नायकल व तुळशीराम नागटिळक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी शशिकांत साटोटे, बबन पालकर व अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.

भाजप आमदाराची ‘दादा’समोर ‘भाई’गिरी:सुनील कांबळेंची पोलिस हवालदाराला मारहाण; NCP पदाधिकाऱ्याच्या कानशिलातही लगावली-पहा व्हिडीओ ..

भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या सातव यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे.

तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात पाटीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे संतप्त

पुण्याच्या ससून रुग्णालयात आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलिस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली आहे. ससून रुग्णालयाती एका कार्यक्रमात सुनील कांबळे यांनी थेट पोलिसावरच हात उचलला आहे. त्याआधी सुनील कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यालाही मारहाण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, उद्घाटनाच्या पाटीवर आमदार सुनील कांबळे यांचे नाव न टाकल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्याही कानशिलात लगावली आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच हा प्रकार घडला आहे.

नेमके काय घडले?

अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी कानशीलात लगावली आहे. पुण्यातील ससुन रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. ससून रुग्णालयात तृतीय पंथीयाच्या स्वतंत्र वॉर्डचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याचे म्हणत आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सातव यांच्या कानशीलात लगावली. यानंतर सातव यांनी आपण या घटनेची माहिती अजित पवारांना देऊ अस म्हटले आहे. तर उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरताना कांबळे यांनी त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी शिवाजी सरक यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे. दरम्यान, आमदार कांबळे यांच्या या कृत्यानंतर आता पोलिस काय कारवाई करणार? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सुनील कांबळे आहेत कोण?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडून आले होते. आमदार होण्यापूर्वी कांबळे 1992 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक होते. कांबळे यांनी पश्चिम बंगालच्या 2021 च्या निवडणुकीत बालूरघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचार आणि बूथ स्तरावर संपर्क साधण्याचे भाजपच्या बाजूने काम केले. कांबळे हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळातील अनुसूचित जाती विधी समितीचे सदस्य आहेत. भाजपचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

यापूर्वी वादामुळे चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यास सुनील कांबळे यांनी मारहाण केली. यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कार्यक्रम संपल्यावर एकाच्या कानशिलात त्यांनी लागवल्याची गंभीर दाखल अजित पवार यांनी घेतल्याची माहिती आहे. तर यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या एक वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना शिवीगाळ केल्याची तथाकथित ऑडियो क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यांनी महिला अधिकाऱ्यास घाणेरडया भाषेत शिवीगाळ केली होती.

महिला संमेलनांचे रविवारी २ ठिकाणी आयोजनडॉ. वीणा देव, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि. ४ – राष्ट्र निर्माण कार्यात महिलांचाही मोलाचा सहभाग आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन महिलांची परिस्थिती, महिलांचा देशकार्यातील सहभाग या बाबत विचार करावा, त्यांचे वैचारिक आदान प्रदान व्हावे आणि विविध विषयावर वैचारिक मंथन व्हावे या उद्देशाने कर्मयोगिनी व संवर्धिनी नावाने महिला संमेलनांचे आयोजन पुण्यात दोन ठिकाणी करण्यात आले आहे.

गाथा कर्तृत्वाची गाथा स्त्री सामर्थ्याची,
महिलांनी मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या सर्वच जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःला सक्षमपणे सिद्ध केले आहे. नोकरी व्यवसाय आणि कुटुंब यांची सांगड घालताना महिलांची भूमिका नेहमीच मोलाची ठरली आहे. या महिलांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील शक्तींना चालना मिळावी आणि त्यांच्यात वैचारिक आदान प्रदान व्हावे हेच या संमेलनाचे मूळ उद्दिष्ट आहे. या संमेलनात महिलांचे विविध प्रश्न, समस्या व त्यावर उपाय योजना यावर मंथन होईल. तसेच महिलांचा राष्ट्र निर्माण कार्यातील सहभाग कसा असावा याचा ही आढावा घेतला जाईल. तसेच तज्ज्ञ, अनुभवी वक्त्यांच्या मार्गदर्शनाने महिलांच्या कार्यास या संमेलनातून प्रेरणा मिळेल. ‘स्व’ पासून ते ‘राष्ट्र’ उन्नतीच्या परिघापर्यंत केंद्रस्थानी असलेल्या महिलांच्या कार्यास हे संमेलन दिशादर्शक ठरणार आहे.
अशी माहिती संमेलनाच्या संयोजिका सुजाता कृष्णकांत सातव व सारिका वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अखिल भारतीय अधिकारी डॉ. अंजली देशपांडे व पश्चिम महाराष्ट्र प्रांत संमेलन सहसंयोजिका अॅड. अपर्णा नागेश पाटील उपस्थित होत्या.

जनसेवा न्यास , हडपसर आयोजित “कर्मयोगिनी” हे वडगावशेरी – हडपसर आणि येरवडा भागातील महिलांसाठीचे हे महिला संमेलन महालक्ष्मी लॉन्स, पुणे – नगर रोड, येथे होणार आहे तर दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र आयोजित सिंहगड – पर्वती आणि कात्रज परिसरातील महिलांचे ‘संवर्धिनी’ संमेलन ७ जानेवारी २०२४ याच दिवशी गणेश कला क्रीडा मंच,स्वारगेट येथे होणार आहे. ही दोन ही संमेलने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यन्त संपन्न होतील.

स्वदेश, स्वसंस्कृती आणि स्वत्व जपत प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी येत्या रविवारी दि. ७ जानेवारी २०२४ रोजी कर्मयोगिनी महिला संमेलनाचे आयोजन सकाळी १० ते सायं. ५ यावेळेत महालक्ष्मी लॉन्स येथे केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुण्या तर स्काईडाइवर, खेळाडू पद्मश्री शितल महाजन उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

भारतीय महिला विषयक चिंतन या विषयावर अखिल भारतीय महिला समन्वय सहसंयोजिका भाग्यश्री साठे यांचे व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या सत्रात गटचर्चा होणार असून भारताच्या विकासात महिलांचे योगदान या विषयावर मोटिवेशनल स्पीकर श्वेता शालिनी यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने संमेलनाचा समारोप होणार आहे.वडगाव शेरी हडपसर आणि येरवडा भागातील महिलांसाठी हे संमेलन महालक्ष्मी लॉन येथे होणार आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे सिंहगड पार्वती आणि कात्रज परिसरातील महिलांचे संमेलन रविवारी ७ जानेवारीला होणार आहे. उद्घाटनास आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू श्रीमती तेजस्विनी सावंत, लेखिका, समीक्षक डॉ. श्रीमती वीणा देव सहभागी होणार आहेत. डिक्की संस्थेच्या संचालक, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सीमा कांबळे यांचे भारतीय महिला विषयक चिंतन या विषयावर व्याख्यान होणार आहे. महिलांची सद्यस्थिती, समस्या व निराकरण या विषयावर यावेळी चर्चा सत्रातून मंथन होईल. समारोप सत्रात अभिनेत्री, राष्ट्रीय महिला आयोग सदस्य श्रीमती खुशबू सुंदर, तसेच अभिनेत्री शर्वरी जमेनीस पाहुणे म्हणून उपस्थित असतील. यावेळी महिला समन्वय राष्ट्रीय सहसंयोजिका श्रीमती भाग्यश्री साठ्ये भारताच्या विकासात महिलांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करतील.

सदाशिव खाडे यांची अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या नियामक मंडळावर नियुक्ती

पुणे (दि. ४ जानेवारी २०२४) भाजपाचे सदाशिव खाडे यांची पुणे, लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ नियामक मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव अजित काटकर यांनी ३ जानेवारी रोजी तसे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव आणि सदाशिव खाडे यांना दिले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठाच्या नियामक मंडळावर राज्य शासनाने नामनिर्देशित सदस्य म्हणून सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली आहे.
सदाशिव खाडे हे पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. खाडे यांनी यापूर्वी राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात १४ हजार घरांचे नियोजन करून ६हजार घरांचे वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र केंद्राचे काम, प्रशस्त रस्ते, मोठी उद्याने असे प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात विकसित झाले आहेत. तसेच प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ, पिंपरी चिंचवड वृक्ष प्राधिकरण समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ समिती वर त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. सध्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे ते संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य पदी कार्यरत आहेत. राजकारण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. यामध्ये गजलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, ब्रह्मचैतन्य फाउंडेशन, साकोसा मित्र मंडळ तसेच भटके,विमुक्त परिषदेत देखील ते काम पाहत आहेत. खाडे यांच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवड भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मार्केटयार्ड:2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग: दोघांना अटक

पुणे –

मार्केटयार्ड येथून जाणाऱ्या 14 व 15 वर्षाच्या दाेन मुलींना ‘तुम्ही दाेघी खुप छान दिसता, सेक्सी हाॅट दिसता, तुम्ही आम्हाला आवडता’ असे म्हणत मुलींच्या शरीराला हात लावून त्यांचे मनास लज्जा निर्माण करुन विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींना मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे.

मानव संदिप अडागळे (वय-20) व आकाश साेनवणे (26, दाेघे रा.मार्केटयार्ड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीची नावे आहे. याबाबत मुलींच्या 30 वर्षीय आईने आराेपी विराेधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची 14 वर्षाची पिडित मुलगी व तिची 15 वर्षाची मैत्रिण असे मार्केटयार्ड याठिकाणावरुन चालत जात हाेत्या. त्यावेळी आराेपी मानव अडागळे व आकाश साेनवणे यांनी सदर दाेन्ही मुलींना, ‘तुम्ही दाेघी खूप छान दिसता, सेक्सी हाॅट दिसता, तुम्ही आम्हाला आवडता’ असे म्हणून आराेपीने आकाश साेनवणे याने एका मुलीच्या खांद्याला व छातीला हात लावून तीचे मनास लज्जा उत्पन्न केली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस पाटील करत आहे.

राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी

मुंबई-राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी मिळाली असून आता अधिकृतपणे फोन टॅप होतील, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप प्रकरण त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यांची आज झालेली नियुक्तीने पुन्हा चर्चांना उधाण आहे. त्यावर खडसे यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे.

एकनाथ खडसे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना बढती होईल हे माहिती होते. त्यांनी माझा फोन टॅप केला होता. आपल्या सरकारमध्ये आपले ऐकणारे अधिकारीही हवे आहेत. आता पोस्टिंग मिळाली. पूर्वी अनधिकृतपणे आता अधिकृतपणे टॅप होतील, अशी टीका खडसे यांनी केली.

एकनाथ खडसे यांनी म्हटले की, रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांना राखी बांधली. एका प्रकारे ही रक्षाबंधनाची भेट असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधकांनी आता सावध राहायला हवं असेही खडसे यांनी म्हटले. राज्याला पहिल्या पोलीस महासंचालक मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महिला सुरक्षेवर लक्ष दिलं पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे खडसे यांनी म्हटले. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, राज्यात महिला सुरक्षित नाहीत. आता रश्मी शुक्ला यांनी महिला सुरक्षेवर लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या सेवा ज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. शुक्ला यांना मुंबई पोलिस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती.

अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.

रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती.

मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले, भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली.

पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल
काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी आयपीएस पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाची सूत्रे येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

मोदींच्या अर्थव्यवस्थेबाबत फसव्या घोषणा:राज्य सरकारकडून मराठा समाजाला खोटी आश्वासने- शरद पवारांचा हल्लाबोल

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेबाबत फसव्या घोषणा करत आहेत. गॅंरंटी-गॅरंटी म्हणजे मोदींची आहे तरी काय? 400 जागांवर भाजपचा विजय होईल, असे सांगितले जाते. पण देशातील परिस्थिती वेगळी आहे. विशेषतः महाराष्ट्रातील राज्यकर्ते मराठा समाजाला खोटी आश्वासन देत आहेत, त्यांची फसवणूक करत आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला.

ते शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

अर्थव्यवस्थेबाबत खोटी आश्वासनं

शरद पवार म्हणाले की, मोदींनी आश्वासन दिले, या देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींच्या पुढे नेऊ. पण परिस्थिती वेगळी आहे. या देशाचा शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले. शेतींवर माणसांची संख्या वाढली. 70 ते 80 टक्के लोक शेतीवर होते. पण आता लोकसंख्या वाढली आहे. दुसरीकडे विकासासाठी शेतीची जमीन काढून घेणे. त्यावेळी जमीनेचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था चिंताग्रस्त झाली आहे. शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना आखल्या पाहिजे, अशी मागणी केली जाते. पण त्यासाठी केंद्रसरकार पुढाकार घेत नाही. त्यांचे दुर्लक्ष होत आहे.

निर्यातीवर निर्बंध लादली जाताहेत

महाराष्ट्र साखर निर्मितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर निर्यात झाली पाहिजे, पण निर्यात करायला सरकार निर्बंध वाढला आहे. अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संख्या दुपटीने वाढली आहे. ही बाब चिंताग्रस्त बनली आहे. दिवसेंदिवस देशात बेरोजगारीचा प्रश्न वाढतोय. महागाईचा प्रश्न मोठा झालेला आहे. गॅंस देशातली तरुण पिढी अस्वस्थ झाली आहे, असे शरद पवार म्हणाले.

मराठा समाजाची फसवणूक होतेय

मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करताना अन्य ओबीसीच्या घटकातील लोकांवर अन्याय नको, अशी मागणी आहे. दरम्यान, ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन दिलं. माझी जरांगेंशी भेट झाली. राज्यसरकारने लिखीत स्वरुपामध्ये मंजूर केली. पण ती सरकार आता पूर्ण करत नाही. त्यामुळे तरुण मुलांना आपली फसवणूक झाली असे वाटायला लागली आहे.

त्याचे कारण म्हणजे, एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, मराठा आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहो असे म्हणतात. तर दुसरीकडे भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात एक वर्ष अजून मराठा समाजाला वाट पाहावी लागेल, असे म्हणतात. म्हणजेच सरळसरळ फसवणूक केली. तसेच 8 ते 9 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आश्वासन दिले होते. ते आरक्षणाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेली नाही.

पाच कलमी कार्यक्रम, देशाची
आरएसएसची विचारधारा अंगीकारली जात आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रम हातात घेतले आहे. सर्व क्षेत्रात खाजगीकरण, नफेखोरी, न्यायव्यवस्था, निवडणूक आय़ोग, ईडी, सीबीआय स्वायत्त संस्था ताब्यात ठेवणे. मनूवादी विचार, आक्रमक राष्ट्रवाद पाच कलमी कार्यक्रम आखला जातोय.

राष्ट्रपतींना सन्मान किती?
मणिपूरची घटना शर्मेने मान खालावी लागते. देशाचे राष्ट्रपती बघिणी आहे. त्या महिला भगीनींचा सन्मान किती वेळा करतात. त्याचे उदाहरण म्हणजे नवीन व जुन्या पार्लमेंट उद्घाटन सोहळ्यातील घटना, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातील.

आंबेडकरांचा विषय मांडणार

सत्तेचा गैरवापर केला जातोय. मोदींना सत्तेपासून हटवणे, ही भूमिका प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांना इंडियात घेण्यासाठी येणा्ऱ्या बैठकीत मुद्दा मांडणार आहे. मोदींना हटविण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी देखील एकत्र काम करणे गरजेचे आहे, असे आव्हान शरद पवार यांनी केले.

भाजप 400 जागी कशी जिंकणार?

भाजपच्या हातात सत्ता आहे. शिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्या वतीने सुरू आहे. सातत्यानं सांगितलं जातं 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आणि इतर राज्यात भाजप नाही, अथवा बळकट नाही. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. तरी देखील 450 जागा जिंकणार हे कोणत्या आधारावर सांगत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई-महाविकास आघाडीमधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1988 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या रश्मी शुक्ला यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी 3 अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.

शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले. नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणाची शुक्ला यांच्यावर आरोप होते.

रश्मी शुक्ला यांनी यापूर्वी पुण्याचे पोलिस आयुक्त, डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), म्हणून काम पाहिले आहे. पण राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदाचा त्यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त ठरला होता.

फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत

काय आहे प्रकरण?

रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप होता. त्यानंतर तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात, तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविणार

मुंबई-राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

कोविडच्या काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती.  या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे.  2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असून योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या 16 टक्के प्रमाणे व्हॅटचा परतावा देखील देण्यात येईल. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरु करण्यात आली आहे.  ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे या योजनेस 5 वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून सुरु होणार – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

अमरावती, दि. 4 : रिध्दपूर येथे येत्या जूनपासून सुरु होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज रिध्दपूर येथे दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी आज रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा, गोविंद्रप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रम शाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना श्री. पाटील म्हणाले की, येत्या जून 2024 पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येईल. त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विद्यापीठ स्थापनेच्यादृष्टीने अभ्यासक्रम, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पुर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे. विद्यार्थी निवडीचे निकष, अभ्यासक्रम आदींबाबत लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना दिले. येथील म्हाइंभट सभागृह, ज्ञानकेंद्र, भक्तनिवारा आदींची पाहणीही श्री. पाटील यांनी यावेळी केली.

मराठी भाषा विद्यापीठ सुरु व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमुल्य आहे. त्यांच्या अमुल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिध्दपूर ठरली आहे. यामुळे रिध्दपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. ‘लीळाचरित्रा’सारखा आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील, याचाही विचार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी श्री गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरातील आद्य मराठी गद्य ग्रंथ लिळाचरित्राचे निर्मिती स्थान, वाजेश्वरी येथील दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंदप्रभू यांचे दर्शन घेतले. तसेच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली. येथील हस्तलिखित पोथ्या सातशे वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील सहाशे वर्षापूर्वींच्या संत महात्म्यांच्या वापरातील कापडी भांडी, गाठी यांचीही पाहणी करुन येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

अनधिकृत बांधकामे करणारांवर गुन्हे दाखल करा -पोलिसांना महापालिकेचे पत्र

पुणे : महानगरपालिकेकडून महाराष्ट्र महापालिका कायद्यांतर्गत आंबेगाव बु. येथील अनधिकृत 11 बांधकामांना नोटीस बजावण्यात आली होती. हे बांधकाम बंद न ठेवल्यामुळे तसेच स्वत:हुन काढुन न घेतल्यामुळे 28 डिसेंबर रोजी 11 अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन पाडण्यात आले. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकसक, मालक, विकसनकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र पुणे मनपाने भारती विद्यापीठ पोलिसांना दिले आहे.

संबंधितांवर एम.आर.टी.पी अॅक्ट (MRTP Act) नुसार कारवाई करावी. याबाबत संबंधिताविरुद्ध बांधकाम विकास विभाग,
झोन दोनचे कनिष्ठ अभियंता उमेश गोडगे गुन्हा दाखल करणार असूनसंबंधितांवर गुन्हा (FIR) दाखल करावा, असे पुणे मनपाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आंबेगाव बु. स.नं. 10 येथील अथर्व डेव्हलपर्स चे 4350 चौ. फुट, साई गणेश डेव्हलपर्स चे 4300 चौ. फुट, श्रावणी डेव्हलपर्स
चे 4200 चौ. फुट, आर एल चोरगे व इतर यांचे 4250 चौ. फुट, श्री डेव्हलपर्स चे 4200 चौ. फुट, साईनाथ डेव्हलपर्स चे 4350
चौ. फुट, समर्थ डेव्हलपर्स चे 4450 चौ. फुट, गवळी व इतर यांचे 4500 चौ. फु. मौर्य डेव्हलपर्स चे 8300 चौ. फुट,
गुरुदत्त डेव्हलपर्स (एमएन कोंढरे) 2150 चौ. फुट यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पुणे मनपाने भारती विद्यापीठ
पोलिसांना दिले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांनी दिली.