Home Blog Page 1279

नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे-उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे, दि.५: सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघताना सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरविला जावा, अशी अपेक्षाही श्री.सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

गणेश कला क्रीडा संकुल येथे आयोजित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. नाटकाच्या घंटेचे पूजन करून आणि संमेलनाध्यक्षांच्या हस्ते घंटा वाजवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, गंगाराम गवाणकर, नाट्यपरिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, अशोक हांडे, मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, अनेक देणगीदारदेखील नाट्य चवळवळीला प्रोत्साहन देत आहेत. शासनाकडून मिळणारा निधी नाट्य चवळवळ पुढे नेण्यासाठी पडद्यामागील कलावंतांच्या मदतीसाठी वापरला जावा असा प्रयत्न आहे. स्व. विक्रम गोखले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी रत्नागिरीचे नाट्य संमेलन होण्यासाठी, वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रमाचे काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हिंदी आणि मराठी रंगभूमीत मोठी तफावत दिसून येते. मराठी माणसाने हिंदीतही पुढे जावे यासाठी त्याच्यामागे पाठबळ उभारण्याची गरज आहे. नाट्य निर्मात्यांनी आणि कलाकारांनी नाट्य संमलेनाचे तीन दिवस आपल्या मातृसंस्थेसाठी आहे हे लक्षात घ्यावे आणि प्रेक्षकांच्या इच्छेचाही विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. गज्वी म्हणाले, कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो. जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशांत दामले यावेळी म्हणाले, शासनाने मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असताना कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करावा. नाट्यकलेसाठी सराव फार गरजेचा असून त्याकडे कलाकारांनी विशेष लक्ष देणे आणि नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे या तीन गोष्टी नाट्यसृष्टीसाठी महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने नाट्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त् केला.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अभिनेते प्रशांत दामले , ज्येष्ठ कलावंत सरुप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी प्रियांका बर्वे, राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी ‘नाट्यधारा’ हा नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर केला.
0000

पुणे वेलनेस सेंटर, मेडिकल हब होईल : श्रीपाद नाईक

पुण्यासाठी भव्य विमानतळ होणार ःपर्यटन मंत्री श्रीपाद नाईक
पुणे टर्मिनलचे लवकरच उद््घाटन

पुणे:

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा चांगल्या केल्या जात आहेत. भारत पुढे जाऊन मेडिकल हब होईल. सर्व सोयी उपलब्ध होतील,पुण्यालाही भव्य विमानतळ उभारला जाईल.आहे त्या धावपट्टीचा विस्तार केला जाईल. त्या दृष्टीने सरकारचा रोडमॅप तयार आहे. पुण्यातील टर्मीनल चे उद्घाटन लोकसभा निवडणूकीआधी होईल ‘, अशी माहितीकेंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

‘आयुष्मान भारत ‘ योजने च्या माध्यमातून ५ लाखाच्याआतील वैद्यकीय सुविधा आहेत, त्याहीपुढे जाऊन रुग्णांना मदत मिळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले.

रूबी हॉल क्लिनिक च्या वतीने हॉटेल रित्झ कार्लटन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. रुबी हॉल क्लिनिक चे प्रमुख डॉ .परवेझ ग्रँट, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, बेहराम खोडाईजी उपस्थित होते.

श्रीपाद नाईक म्हणाले,’ रूबी हॉल क्लिनिक चे नाव ऐकून होतो. हे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे. केंद्र, राज्य सरकार पाठीशी राहील. विमानतळाचा विस्तार आणि विकास करून हे टुरिझम पुढे नेले जाईल. भारत पुढे जाऊन मेडिकल हब होईल. सर्व सोयी उपलब्ध होतील, जगातील स्वस्त उपचार येथे होतील. वेलनेस सेंटर होईल. जगाला सुखी करण्याचा प्रयत्न होईल. आयुषच्या माध्यमातून पारंपारिक उपचार पुढे येत आहेत. प्रसार माध्यमातून सकारात्मकता पुढे येत आहे. वैद्यकीय सेवेतून श्रीमंत होणे हा उद्देश नसतो, सेवा हाच उद्देश असतो. रुबी हॉलचे प्रयत्न देखील त्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कमी खर्चात चांगली सेवा देता यावी, देशाचे नाव त्यातून मोठे होईल. या साठी या क्षेत्रातील सर्व संस्थांनी आपला वाटा उचलावा.

डॉ.परवेझ ग्रँट म्हणाले,’ मेडिकल टुरिझम पुण्यात पुढे जाण्यासाठी विमानतळासारख्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असणे आवश्यक आहेत. एप्रिलपर्यंत रुबी हॉलमध्ये देशात प्रथमच अत्याधुनिक यंत्रणा आणली जात आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणे विस्तार होण्याची क्षमता मेडिकल टुरिझम मध्ये आहे. सरकारने पुढाकार घ्यावा.

बेहराम खोदाईजी यांनी स्वागत केले. डॉ सायमन ग्रँट आदि उपस्थित होते.

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या पूर्व संध्येला बाल नाटय नगरी गजबजली

पुणे (दि. ५ जानेवारी २०२४) शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शनिवारी पिंपरी चिंचवड शहरात सुरू होणार आहे. नाट्य संमेलनाच्या पूर्व संध्येला बाल नाटयनगरी लहान मुलांच्या आगमनाने गजबजून गेली होती.
शंभराव्या नाट्य संमेलनाच्या पूर्व संध्येला भोईर नगर येथील मैदानावर बालनाट्य रंगभूमी नगरी येथे कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक, नाटय परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजेंद्र जैन, कलापिनी संस्थेचे डॉ. अनंत परांजपे, बाल रंगभूमीच्या दीपाली शेळके, ज्येष्ठ कवी माधुरी ओक, रुपाली पाथरे, मयुरी आपटे जेजुरीकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, कला क्षेत्राने मला खूप आधार दिला, माझ्या जगण्याला नवी दिशा दिली आहे. सुरु होत असलेले १०० वे नाटय संमेलन ही माझ्या २७ वर्षापासून सुरू असलेल्या वाटचालीची फलनिष्पत्ती आहे असे मला वाटते. नाटय संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल नाटय नगरी साकारण्यात आली आहे. शहरातील पालकांनी आपल्या मुलांना पुढील दोन दिवस इथे घेऊन यावे कारण नाटक हे संस्कार घडवणारे माध्यम आहे.
पूर्व संध्येला आर. एम. डी. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘दशावतार’ हे बालनाट्य सादर करत उपस्थित बालकांची मने जिंकली. ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल तो आला आला’ ही नाटिका करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात उद्या नाट्य संमेलना निमित्त नाट्य प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असलेल्या सर्व नाट्यगृहातील रंगमंचाचे पुजन भाऊसाहेब भोईर आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे अभिनेते भरत जाधव यांच्या ‘अस्तित्व’ तर नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, सांगवी येथे ‘आडलय का?’ या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग रंगला.

कुख्यात गुंड शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्या एका आरोपीचे नाव निष्पन्न 

पुणे-कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या ३ आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार केला.शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्याची माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेला साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी हल्ला केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोहोळ याच्यावरचा हल्ला त्याच्याच साथीदाराने केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

शरद मोहोळला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड आणि ससून हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान मोहोळ याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. 

आज दुपारी 1.30 च्या सुमारास कोथरूडमधील सुतारदरा येथे तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी मोहोळ याच्यावर गोळीबार केला. दरम्यान हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. मोहोळवर खून, दरोड्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.शरद मोहोळ हा पुण्याचा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो जामिनावर होता. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार देखील करण्यात आले होते

संदीप मोहोळची हत्या शरद मोहोळचा गुन्हेगारी विश्वातील प्रवेशाचा टर्निंग पॉईंट

शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील एका गावातील होता. अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला. त्याचे आई – वडील शेतकरी होते. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ आधी काम करत होता. मात्र पुण्यात संदीप मोहोळची हत्या झाली त्यांनतर शरद मोहोळ याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. या गोष्टीला १७ वर्ष झाली. वर्ष होतं २००६ त्यावेळी मारणे गँगच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती. सुधीर रसाळ याच्या हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्धाला सुरुवात झाली होती. या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळची हत्या केली.

संदीप मोहोळची हत्या शरद मोहोळचा गुन्हेगारी विश्वातील प्रवेशाचा टर्निंग पॉईंट ठरला. संदीपची हत्या झाल्यानंतर पुण्यात गँगवॉर मोठ्या प्रमाणात वाढले. संदीप मोहळची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळने सुत्र हाती घेतली. त्याने २०१० मध्ये संदीपच्या हत्येचा बदला घेतला. शरदने संदीप मोहोळ हत्येतील सूत्रधार किशोर मारणे याची हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शरद मोहोळ जामीनावर बाहेर आला होता. 

त्यानंतर शरद मोहोळ याच्या हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल झाले. लवासा प्रकरणातील दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण शरद मोहोळने केल्याचे वृत्त होते.पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. मात्र तो गुन्हा करायचा तुरुंगात जायचा आणि बाहेर यायचा.

२०१२ मध्ये कारागृहात असताना संशयित दहशतवादी महम्मद कातिल महम्मद जाफर सिद्दीकी ऊर्फ सज्जन ऊर्फ साजन ऊर्फ शहजादा सलीम याचा अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने ८ जून २०१२ ला गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (३४, रा. माऊलीनगर, सुतारदरा कोथरूड ता. मुळशी) आणि आलोक शिवाजीराव भालेराव (वय २८, रा. मु.पो. मुठा, ता. मुळशी जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्कता करण्यात आली होती.यानंतर शरद मोहोळ यांची प्रतिमा राष्ट्रभक्त अशी काही संघटनांनी तयार केली. कारण त्याने तुरुंगात एका दहशतवाद्याला मारले होते. त्यामुळे शरद मोहोळ अनेक सामाजीक आणि राजकीय व्यासपीठावर ते दिसू लागले.मात्र त्याचा गुन्हेगारी विश्वातील वावर कमी झाला नव्हता त्यामुळे आज त्याती हत्या झाल्याची शक्यता आहे. ही हत्या जर टोळीसंघर्षातून झाली असेल तर हा टोळीसंघर्ष कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यावेळी पुण्यातील अनेक टोळ्या विविध व्यावसायिकांकडून आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करत असत. पौड, पिरंगूट आणि मुळशीच्या भागातून आखाड्यातली मुलं या गँगमध्ये भरती केली जात.असेही सांगण्यात येते.

कोणीही माझे नाव टाकतो सांगत अजित पवारांनी नाकारले पुण्यातील नाट्यसंमेलन

पुणे- सांगली नंतर आज पुण्यात शंभराव्या नाटय संमेलनाचे आयाेजन करण्यात आले असून स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडामंदिर याठिकाणी नाटय संमेलनाचे उदघाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार हाेते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण या उद्घाटनास जाणार नसल्याचे सांगत, शरद पवार यांच्यासाेबतचे व्यासपीठ टाळले आहे. पवार म्हणाले, नाटय संमेलनाचे उदघाटन असले तरी त्याबाबत आपणास काही माहिती नाही. कोणीही कार्यक्रमात माझी नावे टाकतात असे सांगत त्यांनी विषय मिटविण्याचा प्रयत्न केला.

पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठक घेतली हाेती त्यात आराेग्य विभागाने काेविड बाबतची माहिती दिली. आम्ही दरराेज काेविड संर्दभात आढावा घेत असून काेराेना रुग्ण वाढू नये याकरिता जी खबरदारी घेतली पाहिजे ती राज्यसरकार घेईल. त्याबाबतच्या सूचना सर्व रुग्णालयांना दिला आहे. नागरिकांनी देखील त्यास सहकार्य केले पाहिजे. कारण मागीलवेळी काेराेना आजार आला हाेता त्यावेळी प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून काम केल्याने मात करण्यात आली. आता जाे काेराेना येताे आहे त्याची तीव्रता इतकी नाही. परंतु काळजी घेणे आवश्यक आहे.

पाण्याचे नियाेजनाबाबत ते म्हणाले, रब्बीचा हंगाम संपल्यावर पुन्हा कालवा समिती बैठक घेऊन पाण्याचे नियाेजन करण्यात येईल. नेमके किती बाष्पीभवन झाले आहे व किती पाणी शेतीस गेले आहे. जुलै २०२४ पर्यंत किती पाणी पुणेकरांना लागेल या सर्वाचे नियाेजन करुन पुढील दिशा ठरविण्यात येईल.

राज्य मागसवर्ग आयाेगावर दबाव नाही

पवार म्हणाले, राज्य मागास वर्गीय आयाेग स्वतंत्र असून ते त्यांचे कामाचे नियाेजन करतात. सरकारचा त्यात काेणताही हस्तक्षेप नाही. मराठा आरक्षण संर्दभात सात दिवसात सर्व्हेक्षण करण्यास सांगण्यात आले याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. आयाेगास सर्व्हेक्षण कामास जे मनुष्यबळ हवे आहे ती राज्यसरकार यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी , मनपा आयुक्त यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव व आेबीसी विभागाचे सचिव याबाबत दैनंदिन आढावा घेत आहे. वेगवेगळया कंपन्याचे टेंडर सर्व्हेक्षणासाठी मागविण्यात आले हाेते. तीन एजन्सीने ते भरलेले हाेते, त्यातील एक-दाेघे म्हणाले, कमी कालावधीत सर्व्हेक्षण आम्ही करु शकणार नाही. पुण्यातील गाेखले इन्स्टिटयूटने मात्र, अल्पावधीत सर्व्हेक्षण करुन देऊ असे सांगितल्याने त्यांना टेंडर देण्यात आले आहे. सर्वसामान्यांचा पैसा कशाप्रकारे याेग्यरितीने खर्च करावयाचा याचे ज्ञान आम्हाला अनेक वर्ष आहे. मागासवर्गीय आयाेगाचे सदस्यांवर काेणत्याही प्रकारचा दबाव नाही.

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.५: वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्त्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा; त्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनिल तटकरे, आमदार सुनील कांबळे, रवींद्र धंगेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य रुग्णांवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले की, रुग्ण सेवेसाठी चांगले डॉक्टर उपलब्ध व्हावे यासाठी डॉक्टरांचे मानधन वाढविणे गरजेचे आहे. कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जोखीम स्वीकारून रुग्णसेवा केल्यामुळे त्यांचे तसेच वैद्यकीय सुविधांचे महत्त्व समजून आले. या काळात ससून रुग्णालयाच्या उभारणी सुरु असलेल्या नव्या इमारतीचा उपयोगही कोरोना बाधितांवर उपचारासाठी करण्यात आल्याने इतर पायाभूत सुविधा करता आल्या नव्हत्या.

ससून रुग्णालयाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता रुग्णालय इमारतीच्या विस्तारासाठी आवश्यक जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ससून रुग्णालयात काळानुसार आवश्यक बदल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयातील उत्तम सुविधांचा अभ्यास करून एका महिन्यात आवश्यक बाबींसाठी प्रस्ताव सादर करावा. सामान्य रुग्णांसाठी ससून रुग्णालय महत्त्वाचा आधार असल्याने येथे अत्याधुनिक सुविधांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

रुग्णालयाच्या नव्या गरजा लक्षात घेता ११ मजल्याची सर्व सुविधांनी युक्त नवी इमारत उभारण्यात आली आहे. विशेषोपचारासाठी सर्वसामान्य गरीब माणसाला अत्याधुनिक सुविधांच्या आधारे आरोग्य उत्तम सुविधा मिळावी असा शासनाचा प्रयत्न आहे. गोरगरीब रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी या सुविधांचा उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना क्रीडांगणासाठी अतिरिक्त सुविधा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, प्लेग, स्वाईन फ्ल्यू, कोविड सारख्या संकटाच्या काळात ससून रुग्णालयाने उत्तमरीतीने रुग्णसेवा केली. रुग्णालयाच्या नव्या इमारतीवर १८३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. अद्ययावत उपचार सुविधा असलेली नवी इमारत रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही येथे दर्जेदार सुविधांची निर्मिती होत आहे. इंटरव्हेंशन रेडीओलॉजी विभागासाठी टाटा ट्रस्टतर्फे २ कोटी, महिलांच्या स्वतंत्र क्ष-किरण तपासणी केंद्रासाठी फजलानी ट्रस्टतर्फे २ कोटी ५० लाख आणि मध्यवर्ती चिकित्सालयीन प्रयोगशाळेसाठी पंजाब नॅशनल बँक व पहल फाऊंडेशनमार्फत ५ कोटी ३५ लाख रुपये सीएसआरमधून देण्यात आले आहेत.

यापुढील काळात रुग्णालयात किडनी आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात येतील, असेही श्री.मुश्रीफ म्हणाले. रुग्णालयात १४० मृतदेह शव शीतगृहात जतन करण्याची आणि ३० वर्षाचे अभिलेख जतन करण्याची सुविधा शवचिकित्सा केंद्राच्या नव्या इमारतीत आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, तृतीयपंथीयांसाठी केलेल्या नव्या स्वतंत्र वॉर्डमुळे तृतीयपंथीयांना सन्मान मिळेल. राज्य महिला आयोगाने या वॉर्डसाठी पुढाकार घेतला. समाज नेहमी तृतीयपंथीयांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ.काळे यांनी प्रास्ताविकात बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय येथील विविध विकासकामांविषयी माहिती दिली. नव्या इमारतीमुळे ५७० खाटा उपलब्ध झाल्याने रुग्णालयात एकूण १ हजार ९०० खाटांची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधी चांदनी गोरे यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते ससून सर्वोपचार रुग्णालयाची नूतन इमारत, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेले शवागार, कर्करोगाच्या निदानासाठी वापरण्यात येणारे पेटस्कॅन आणि नूतनीकरण केलेल्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या विविध सुविधांचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.

विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या चित्रफीतीच्या माध्यमातून शुभेच्छा

विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे भारताबाहेर असल्याने त्यांनी कार्यक्रमासाठी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्य. १६७ वर्षाची परंपरा असलेल्या ससून रुग्णालयाचे काम रुग्णांना आधार देणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे आहे. आज उद्घाटन होत असलेल्या विविध अकरा सुविधांसाठी विविध संस्थांनी शासनासोबत सहकार्य केले आहे.

श्रीमंत दगडूशेट हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून होत असलेल्या अन्नदान सेवेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना लाभ होत आहे. मोठा स्त्रीरोग चिकित्सा विभाग रुग्णालयात उभा रहावा, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली. पालकमंत्री अजित पवार यांनी सातत्याने ससूनच्या प्रश्नांकडे लक्ष दिले आहे. रुग्णांच्या समस्या दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

‘मोऱ्या’मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉरकडून दुय्यम वागणूक, बोर्डाचं आडमुठे धरणामुळे चित्रपटाचे तीनवेळा प्रदर्शन रद्द

येत्या आठवड्यात १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता सिनेमा!

मुंबई, : आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळविणारा आणि सफाई कामगाराच्या जीवनावर बेतलेला ‘मोऱ्या’ हा मराठी चित्रपट येत्या आठवड्यात १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता; या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षण समितीने काही बदल सुचविले होते ते करून निर्मात्यांनी दिले असता, ते पाहून प्रमाणपत्र देण्यास अधिकारी टाळंमटाळ करीत असून दररोज नवनवे नियम दाखवून निर्मात्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या आडमुठ्या धोरणाला आमचा चित्रपट बळी पडत असल्याचा आरोप ‘मोऱ्या’ या मराठी चित्रपटाचे निर्माते तृप्ती कुलकर्णी, तृप्ती कुलकर्णी, सहनिर्माते पूनम नागपूरकर, राहुल रोकडे आणि लेखक-दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी केला आहे. तसेच, सेन्सॉर बोर्डाकडून मराठी नव्या सिनेनिर्मात्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे म्हणणेही त्यांनी मांडले आहे.

आपली बाजू मांडण्यासाठी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद मुंबई येथील प्रेस क्लब येथे घेतली होती. जितेंद्र बर्डे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिकाही साकारली आहे. गेले काही महिने सातत्याने पाठपुरावा करूनही सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्यात दिरंगाई केल्याचे ते म्हणाले. ‘मोऱ्या’ हा चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात कसा सापडला आहे तो घटनाक्रम त्यांनी यावेळी सांगितला.

‘हा चित्रपट सप्टेंबर २०२२ मध्ये सेन्सॉर बोर्डाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. ऑक्टोबरमध्ये सिनेमा दाखवल्यावर सेन्सॉर समितीने त्यात मोठे बदल करण्यास सांगितले. बदल आम्हास मान्य नसल्यामुळे आम्ही ‘सेकंड रिव्हायझिंग कमिटी’कडे धाव घेतली, ३० डिसेंबर २०२२ या तारखेला ‘मोऱ्या’चे पुन्हा स्क्रीनिंग झाले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी महेश पाटील उपस्थित होते. त्यांनी सुचवलेले बदल हे आमच्यासाठी खर्चिक होते. ते तातडीने करणे अशक्य होते. कालांतराने पैशांची व्यवस्था झाल्यानंतर काम पूर्ण करून आम्ही चित्रपट पुन्हा सेन्सॉरकडे पाठवला. परंतु, तेव्हा पाटील याची बदली होऊन त्याजागी क्षेत्रीय अधिकारी श्री सय्यद रबीहाश्मी आले होते. दोन-तीन दिवस बोर्डाच्या कार्यालयात जाऊनही त्यांची भेट झाली नाही. आम्ही ई-मेलद्वारे संपर्क करून सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. मात्र नव्या अधिकाऱ्यांनी आमची बाजू समजून न घेता सर्व प्रक्रिया पुन्हा करायला सांगितली. परिणामी चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे’, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे चित्रपट निर्मितीचे कोणतेही प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने याबाबत निर्माते अज्ञानी असतात.त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी अधिकारी वर्ग मराठी सिनेनिर्मात्यांना सेन्सॉरच्या कार्यालयात अत्यंत अपमानास्पद, दुय्यम वागणूक मिळत आहे. याविरोधात निर्मात्यांनी एकत्र येणे आवश्यक असून, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.

भटके-विमुक्तांची नावे आता मतदारयादीत

• मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
• भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश
• शिधापत्रिकांसाठी १५ जानेवारी ते १४ मार्चपर्यंत विशेष मोहीम
• राज्य सरकारची अधिसूचना

मुंबई -राज्यात सतत भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिकांची मतदार यादीत नोंद करण्यात येणार आहे. यासोबतच शिधापत्रके तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. याबाबतची एक अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. राज्यातील भटके विमुक्तांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारचे दोन मोठे उपक्रम हातील घेतले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.

भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढावी तसेच लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्व घटकातील मतदारांचा समावेश व्हावा यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मागणी केली होती. त्यात त्यांनी भटके विमुक्त प्रवर्गात मतदार नोंदणी तसेच मतदान कार्य वाटपासाठी विशेष मोहिम राबविण्याची विनंती केली होती. याची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत भटक्या विमुक्त जातीमधील सुटलेल्या नावाची नोंदणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्यवाही सुरू राहणार आहे.

राज्यातील भटके विमुक्त जमातीच्या उत्थानासाठी अनेक योजना असल्या तरी देखील त्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मूळ दस्तएवज नसल्याने सरकारी योजनांचा विशेषत: अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यांना लाभ मिळावा यासाठी श्री बावनकुळे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने अधिसूचना काढून १५ जानेवारी ते १४ मार्च २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

• महायुती सरकारचे आभार – बावनकुळे

या दोन्ही निर्णयामुळे भटके विमुक्तांना लोकशाहीच्या बळकटीकरणात सहभागी होता येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या अन्न व सुरक्षा योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळविणे शक्य होईल. या दोन्ही निर्णयासाठी श्री बावनकुळे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे आभार व्यक्त केले.

आज पत्रकारिता जगणारे पत्रकार पाहिजेत-खासदार श्रीनिवास पाटील यांचे मत

 आम्ही पुणेकर व परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
पुणे : कारवीची फुले साठ वर्षांनी फुलतात. त्यातील मध काढला जातो. परंतु दरवर्षी न फुललेली कारवी फुलली समजून त्यातील मधात भेसळ होते, तशी आज पत्रकारीतेत भेसळ होत आहे. पण आयुष्यभर पत्रकारितेसाठी जगणारे लोक देखील पाहिले. भविष्यात देखील असेच पत्रकारिता जगणारे लोक झाले पाहिजेत, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनाननिमित्त पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त परिवर्तन ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन गांजवे चौकातील पत्रकार भवन येथे करण्यात आले. यावेळी पत्रकार कर्म तपस्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, परिवर्तन ट्रस्टचे डाॅ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते. 
यावेळी रामभाऊ जोशी, पं वसंत गाडगीळ, श्याम अग्रवाल, जयराम देसाई, डॉ. किरण ठाकूर अनंत बागाईतकर, मोरेश्वर जोशी, हेमंत जोगदेव, एकनाथ बागुल, अशोक डोंगरे, दिनकर देसाई, प्रतिभा चंद्रन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, आरोग्य किट प्रदान करण्यात आले. 
श्रीपाल सबनीस म्हणाले,  टिळक, आगरकर, आंबेडकर, महात्मा गांधी यांची पत्रकारीता ही इतिहास जमा झाली आहे. आज सत्यनिष्ठ पत्रकारिता राहिली नाही. आज पत्रकारिता विकली गेली आहे. सत्य बाहेर न येता भांडवलशाहीला उपयुक्त असणारे सत्य समोर येते. सत्याची मांडणी अशा प्रकारे झुकलेली असेल तर लोकशाहीचा आत्मा मारण्याचे पाप आपल्या सर्वांवर देखील येते. ही पत्रकारिता शुद्ध ठेवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांची आठवण ठेवली पाहिजे. समाज सुधारण्याच्या दृष्टीने शुद्ध भूमिका बजाविण्याची आवश्यकता आहे. शुद्ध पत्रकारिता टिकवण्यासाठी पत्रकारांनी सौदेबाजी रोखली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शैलेश गुजर म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. केवळ पत्रकारितेसाठी आपले संपूर्ण आयुष्य घालविणारे आणि त्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी जेष्ठ पत्रकारांना सन्मानित करण्याचा उपक्रम राबविला.

पुरस्काराला उत्तर देत पंडित वसंत गाडगीळ म्हणाले, पत्रकारिता ही अती प्राचीन असून रामायण महाभारतापासून दिसते. त्या वेळचे पत्रकार म्हणजे ऋषीतुल्य नारदमुनी हे होते. पत्रकारिता ही व्यवसायासाठी नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत जगायची असते. जो शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकारिता जगतो तोच खरा पत्रकार आहे, असेही त्यांनी सांगितले. रामदास मारणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेश गुजर यांनी प्रास्ताविक केले आणि समीर देसाई यांनी आभार मानले. 

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू:दुचाकीवर आलेल्या दोघांनी केला हल्ला; लग्नाच्या वाढदिवशीच झाला अंत

पुणे:- कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज दुपारी पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतरदरा या भागात तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यात तो गंभीर जखमी झाला.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित परिसरात धाव घेतली. व घटनेचा तपास सुरू केला आहे. टोळी युद्धातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज दुपारीच तीन अज्ञात व्यक्तींनी रेकी करून भरदिवसा शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. मोहोळ याला कोथरूड येथील सह्याद्री रुग्णालयात दुपारी १.३० ते २ चा सुमारास दाखल करण्यात आले तो गंभीर जखमी होता त्याच दरम्यान त्याचा वर उपचार सुरू असतानाच आज दुपारी ४.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी कळवले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, शरद माेहाेळ यास हल्लेखाेरांच्या हल्लयात एक गाेळी शरीरावर लागली होती. त्यास उपचारासाठी सहयाद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना त्याचा प्राणज्योत मालवली. काेथरुड पोलिस ठाण्याचे वरिेष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी माहिती दिली. तर मोहोळ याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे चारशे ते पाचशे जणांचा जमाव जमला आहे.

शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हल्लेखाेर यांनी शरद माेहाेळ यास काेथरुड परिसरातील सुतारदरा मध्ये पाठलाग करत गाठले. त्यानंतर थेट हल्लेखाेरांन साेबत आणलेल्या पिस्तुलमधून गाेळी माेहाेळ याच्या दिशेने झाडली.

शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला जामीन मंजूर केला होता.

यामध्ये माेहाेळ जखमी हाेऊन खाली काेसळला त्यानंतर हल्लेखाेर घटनास्थळावरुन घाईगडबडीत पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच, काेथरुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आराेपींचा शाेध सुरु केला आहे. त्याचसाेबत गुन्हे शाखेचे पोलिस देखील काेथरुड मध्ये दाखल हाेऊन त्यांनी हल्लेखाेरांचा माग काढणे सुरु केले. पूर्ववैमनस्यातून सदरचा गाेळीबार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या शरद माेहाेळ याने माेठया प्रमाणात सामाजिक कार्यक्रम सुरु केल्याने त्याचे राजकीय पुर्नवसनची चर्चा सुरु झाली हाेती.

दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेला कातिल सिद्दीकी याचा पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाेरीच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात शरद माेहाेळ याचा साथीदारासह सहभाग हाेता. याप्रकरणात त्यास अटक देखील करण्यात आली हाेती व दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल झाले. परंतु पुरेशा पुराव्याअभावी त्याची प्रकरणातून निर्दाेष सुटका झाली हाेती.

पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजप प्रवेश
काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना त्याने राजकारणात उतरवण्याचं ठरवलं. एका मंत्र्याच्या उपस्थितीत स्वाती मोहोळ यांनी भाजपात प्रवेश केला. मोहोळ यांनी राजकारणात एन्ट्री केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर मोहोळ गॅंगला राजकारणातून सपोर्ट मिळतोयं, असंही दबक्या आवाजात बोललं जात होतं.

समाजकारणातून राजकारणातील एन्ट्रीची महत्वाकांक्षा 

गुंडगिरीचा धंदा असूनही शरद मोहोळला राजकारणाचे वेध लागले होते. त्यानी आपली प्रतिमा निर्मिती करण्यासाठी सामाजिक कार्यक्रम सुद्धा राबवण्यास सुरुवात केली होती. मात्र, राजकारणातील प्रवेश होण्यापूर्वीच आता त्याचा दिवसाढवळ्या गेम झाला आहे. शरद मोहोळवर हल्ला कुणी केला? हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला का? याची अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

शरद मोहोळ हा किमान 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकला होता. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी 2010 मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

किशोर मारणे हा गणेश मारणेचा जवळचा सहकारी होता, ज्याला पौड रोडवर 4 ऑक्टोबर 2006 रोजी गुंड संदीप मोहोळच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी होता. गणेशला अटक झाल्यानंतर किशोरने टोळी चालवण्यास सुरुवात केली, पण किशोरला शरद मोहोळने संपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, शरद मोहोळच्या पत्नी स्वातीने भाजप प्रवेश केला आहे. शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हे जोडपे दिसले होते. 

‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’:उरला सुरला गटच पवारांचा पक्ष संपवण्यासाठी पुरेसा, मंत्री छगन भुजबळ यांचा आव्हाड यांना टोला

पुणे-

‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण आपण ऐकली आहे. शरद पवार यांचा उरलेला पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भुजबळ यांनी ही टीका केली आहे.

उरला सुरलेला गट पक्ष संपवण्यासाठी पुरेसा
छगन भुजबळ म्हणाले की, ”‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण मी ऐकली आहे. शरद पवार यांचा उरलेला पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही. त्यांचा जो काही उरला सुरलेला गट आहे तोच त्याचा पक्ष संपवण्यासाठी पुरेसा आहे”, असे भुजबळ म्हणाले.

शिंदे गटाला जेवढ्या जागा, तेवढ्याच आम्हाला मिळाव्यात
यावेळी भुजबळ यांनी जागावाटपाबाबत विधान केले आहे. ते म्हणाले, ”शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात. यावर सविस्तर चर्चा होईल. त्यांचेही 40च्या आसपास आमदार आहेत. आमचेही 40च्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे त्यांना जे काही मिळेल, जेवढी मंत्रीपदे मिळतील तेवढीच आम्हालाही मिळावीत. त्यांना जेवढ्या खासदारकीच्या जागा मिळतील, तेवढ्या आम्हालाही मिळाव्यात. यात काही चूक आहे असं मला वाटत नाही”, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे.

मनोज जरांगे यांनाही टोला
तसेच भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ”सातत्याने कुणबी प्रमाणपत्र-दाखले चुकीची पद्धतीने सापडत आहेत. लिंगायत आणि इतर समाजाचे पण पाठवत आहेत. कुणाकुणाला दाखले देणार? हळू हळू मागण्या वाढत चालल्या आहेत. संपूर्ण मराठा यांना ओबीसी आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे. नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत”, असा टोला भुजबळांनी मनोज जरांगे यांना लगावला.

महाराष्ट्रात जातीय जनगणना करा
तसेच ”15 दिवसात सर्वेक्षण होऊ शकत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय जनगणना करा. कायमचा प्रश्न संपवा. 54 टक्के ओबीसी आहेत त्यात 27 टक्के आम्हाला मिळाले आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. पण ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर छापेमारी, 6 ठिकाणी तपास सुरु

पुणे- आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती आहे.शुक्रवारी सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक येथे पोहोचले असून या कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या पथकाने एकूण 6 ठिकाणी छापेमारी सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केल्याची माहिती आहे.

दरम्यान यापूर्वी बारामती अ‍ॅग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस दिली होती. 72 तासांत प्लँट बंद करण्याची सूचना नोटिसमध्ये दिली होती. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी स्थगिती मिळवली होती. रोहित पवार हे बारामती अ‍ॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. आता अमलबजावणी संचालयानलायने मनी लॉन्ड्रींग प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. यामुळे बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या संबंधित लोकांच्या घरी छापेमारी सुरु करण्यात आली आहे.

6 ठिकाणी छापेमारी

मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या काही ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ज्यात मुंबईसह इतर सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान ईडीच्या एका पथकाडून रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. आधी प्रदुषण महामंडळ आणि साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोवर कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. तिथे त्यांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रनेकडून छापा टाकण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. 2001 ते 2011 या काळात 23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेने तारण न घेता कर्जे दिली होती. ही कर्जे एनपीए (अनुत्पादक) मध्ये गेली. त्यानंतर ते कारखाने नेत्यांनी विकत घेतले. त्यासाठी पुन्हा शिखर बँकेनेच कर्जे दिली. यामध्ये बँकेला एकूण 2 हजार 61 कोटी रुपयांचा फटका बसला होता. अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. याच बँकेकडून बारामती ॲग्रोने बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. खरं तर 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी अजित पवारांना अटक केली होती. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्यात इतर 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.परंतु मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता.

पुस्तक महोत्सवातील युवकांचा सहभाग आशादायी

डॉ. राजा दीक्षित यांचे प्रतिपादन, कृतज्ञता व्यक्त करण्याचा रंगला सोहळा.

पुणे : पुण्यात झालेल्या विश्वविक्रमी पुस्तक महोत्सवातील युवकांचा उत्साही आणि उल्लेखनीय सहभाग सर्वांत आशादायी होता. त्यामुळे सर्वांच्याच मनातील आशावाद बळकट झाला, असे गौरवोदगार अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. राजा दीक्षित यांनी काढले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. पुण्यात गाजलेल्या आणि विश्वविक्रमी ठरलेल्या पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे आणि आनंद काटीकर यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. भारत सासणे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. राजा दीक्षित होते. व्यासपीठावर साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघांचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर, संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, पुस्तक महोत्सवाची चळवळ फोफावत जावी. पुस्तक ही जीवनावश्यक वस्तु ठरावी यासाठी शासन स्तरावर पुढाकार घेतला जावा.
डॉ. भारत सासणे म्हणाले, इंग्रजी भाषेच्या आक्रमणाची चिंता असताना भव्य पुस्तक महोत्सव आनंद देणारी बाब होती. अशा महोत्सवांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्रा बाहेरील लोकांनाही मराठी पुस्तक महोत्सवाशी जोडणे गरजेचे आहे. पुस्तक महोत्सवाच्या रूपाने समाजाला मोठे योगदान दिले आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, पुस्तक महोत्सव म्हणजे पुणे पॅटर्न अशी पुण्याची नवी ओळख आता निर्माण होईल इतके प्रेरक वातावरण पुस्तक महोत्सवाने निर्माण केले. पुस्तक महोत्सवातील विक्रमी उलाढाल लक्षात घेता कोण नेमकं काय वाचतं हे जाणून घेण्यासाठी वाचन संस्कृतीचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
प्रा. आनंद काटीकर म्हणाले, तरुण मुलं पुस्तक महोत्सवाकडे वळली याचा अधिक आनंद आहे. पुढील वर्षी अधिक चांगला महोत्सव करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
राजीव बर्वे यांनी स्वागत केले. पराग लोणकर यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. येत्या मे महिन्यात मुलांसाठी असाच काही वाचनकेंद्रित उपक्रम घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. सुनिताराजे पवार यांनी मानपत्राचे वाचन केले. अमृता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

चौकट
पुण्याला बनवणार वर्ल्ड बुक कॅपिटल!
सत्काराला उत्तर देताना पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे म्हणाले, पुस्तक महोत्सवाला मिळालेले यश हे उत्कृष्ट लोकसहभागाचे आहे. 11 कोटींपेक्षा अधिक उलाढाल ही मोठी बाब आहे. पुस्तक महोत्सव हा इव्हेन्ट न राहता ती मूव्हमेंट व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुस्तक महोत्सवाला चळवळीचे स्वरूप यावे म्हणून पुणे हे वर्ल्ड बुक कॅपिटल व्हावे असा आपला प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १ ऑक्टोबर, २०२३ व ०७ ऑक्टोबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१,मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण ७८ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वजित श्यामराव पाटील (बैठक क्रमांक NM003080) हे अराखीव वर्गवारीतून व सोलापूर जिल्ह्यातील सोनलकर विनायक भागवत (बैठक क्रमांक NM001050) हे मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला अराखीव वर्गवारीतून सांगली जिल्ह्यातील चव्हाण शैलजा नरेंद्र (बैठक क्रमांक NM001135) राज्यात प्रथम आल्या आहेत.परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्रमांक ६.४.४ पहावे असे आयोगाने कळविले आहे.