Home Blog Page 1281

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता

मुंबई-मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 11 कोटी 34 लाख 60 हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सध्या मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये लिपिक-टंकलेखकांची संख्या 1891 इतकी असून त्यांना याचा लाभ मिळेल.

मंत्रालयामध्ये नव्याने लिपिक-टंकलेखक पदावर रुजू झालेले कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था, जिकीरीचा प्रवास, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडे तत्वावर घरे उपलब्ध न होने या कारणांमुळे अल्पावधीत सेवा सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी टोल कारसाठी 250 रुपये

मुंबई-अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला असून सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा 50 टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कारसाठी 500 ऐवजी 250 रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकरिता परतीचा पास एकेरी पथकराच्या दिडपट, दैनिक पास एकेरी पथकराच्या अडीच पट आणि मासिक पास एकेरी पथकराच्या पन्नास पट अशी सवलत देण्यात आलेली आहे.

अटल सेतू उभारणीकरिता एकूण रु.21,200 कोटी इतका खर्च आला असून त्या पैकी रु.15,100 कोटी इतके कर्ज घेण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे पनवेल पासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे 15 कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान रु. 500 इतकी बचत होईल.

अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या 0 ते 4 किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक (Noise Barrier) व अतिसंवेदनशील अशा भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) व माहूल येथील तेल शुद्धीकरण केंद्र ( Oil Refinery ) या 4 ते 10 किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसविण्यात आलेले आहे.

अटल सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या पथकर दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान

मुंबई -दूध उत्पादकांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल. सहकारी दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट / 8.3 एसएनएफ या प्रती करिता किमान 29 रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑन लाईन जमा करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर डीबीटीद्धारे देण्यात येईल.

नोव्हेंबर मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघामार्फत दररोज 43.69 लाख लिटर दूध संकलीत करण्यात येते. 5 रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे 2 महिन्यासाठी 135 कोटी 44 लाख इतके अनुदान आवश्यक असेल. ही योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये राबविण्यात येईल.
राज्याच्या दूध दराच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे बैठक झाली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

मुंबई –१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) देण्यात येत आहे.

संबंधित राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून ६ महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील. जे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी या ६ महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील. अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील.

जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा. हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत द्यावे. तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (NPS) योजनेचे खाते तात्काळ बंद केले जातील.

जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे (GPF) खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यातील (NPS) त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल.

जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यातील (NPS) राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येईल.

सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आता २ वर्षाच्या आत अविश्वास आणता येणार नाही

मुंबई-सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आता अविश्वास प्रस्तावाचा कालावधी वाढविण्यात आला असून २ वर्षाच्या आत असा प्रस्ताव आणता येणार नाही अशी सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात अविश्वासाचा प्रस्ताव ६ महिन्याच्या आत सादर केला जाणार नाही अशी तरतूद आहे. पंरतु हा कालावधी खूप अत्यल्प असल्याने हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनिमय १९५९ मध्ये देखील अशाच पद्धतीने २ वर्षांनी अविश्वासाची तरतूद आहे.
—–०—–

रणबीर, रणवीर, आयुष्मान हे सर्वाधिक १०० कोटी हुन अधिक चे हिट सिनेमा दिलेले टॉप 3 युवा अभिनेते

चित्रपट उद्योगातील स्टारडमचा बेंचमार्क म्हणजे एखाद्या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर दिलेल्या १०० कोटी+ हिट्सची संख्या. तर, बॉलीवूडच्या तरुण पिढीतील टॉप बॉक्स ऑफिसवर कोण आहेत? त्यांच्या बॉक्स ऑफिस नंबरवर एक नजर टाकली तर आकडेवारीनुसार तीन नावं आहेत जी आजच्या पॅकच्या शीर्षस्थानी आहेत – रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि आयुष्मान खुराना!

रणबीर कपूरचे सात ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत ज्यांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ते आहेत:एनिमल (सर्वकालीन ब्लॉकबस्टर), तू झुटी मैं मकर, ब्रह्मास्त्र, संजू, ए दिल मुश्किल, ये जवानी है दिवानी आणि बर्फी.

रणवीर सिंग चे ही बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचे चित्रपट आहेत. ते आहेत: रॉकी और रानी की प्रेम कहानी, 83, गली बॉय, सिम्बा, पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि राम लीला.

आयुष्मानने यादरम्यान जगभरातील पाचशे कोटी हिट्स मिळवले आहेत! ते आहेत: बाला, ड्रीम गर्ल, बधाई हो, ड्रीम गर्ल 2 आणि अंधाधुन!

विशेष म्हणजे, रणबीर, रणवीर आणि आयुष्मान यांच्यात एकोणीस १०० कोटी+ हिट आहेत!

गांधीभवन येथे खादी प्रदर्शनास प्रारंभ 

पुणे :
महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघाच्या वतीने गांधीभवन मैदान ,कोथरूड येथे  खादी प्रदर्शन, विक्रीस ३ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. हे प्रदर्शन ७ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते  रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.प्रदर्शनात विविध प्रांतातील वेगवेगळ्या दर्जाच्या शुद्ध खादी वस्त्रे, तयार कपडे उपलब्ध करण्यात आली आहेत. नव-नवीन डिझाईन चे शर्ट, गांधी टी- शर्ट, कुर्ता, पायजामा, जॉकेट आहेत.लुंगी, टॉवेल, शर्टिंग व कोटिंग उपलब्ध आहे.साड्यांमध्ये खादी साडी, कोसा साडी प्रदर्शनात आहे.ड्रेस मटेरियल, लेडिज टॉप, रुमाल, बेडशीट, खेस चादरी, स्प्रे-दरी, उलन शॉल, कोसा शॉल व लेडीज बॅग यांचा समावेश या प्रदर्शनात आहे.सुती खादी वर २० टक्के सूट तर   कोसा कापड वर १५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. किशोर  फुलंबरकर  यांनी ही माहिती दिली.अधिक माहितीसाठी संपर्क ७८७५०८६४१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन,एड.संतोष म्हस्के,अरुणा तिवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण

मुंबई,दि. ४ : दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात २६ दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीनचाकी सायकल, वैद्यकीय उपकरणांचा संच (कम्युनिटी मेडिकल किट) अशा साहित्याचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीतील (सीएसआर) कामांचे लोकाभिमुख नियोजन व्हावे म्हणून मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यातील या क्षेत्रातील काम अधिक वेगवान पद्धतीने जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी हा कक्ष प्रयत्नशील आहे. त्या अंतर्गत आज या साधनांचे, उपकरणांचे वितरण करण्यात आले. आज वितरित करण्यात आलेल्या या साधनांसाठी इन्व्हेंशिया फार्मा, अंजता फार्मा, इम्युक्यूअर फार्मा आणि सँडोझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी सहकार्य केले आहे. यात दिव्यांगाना केवळ प्रवासासाठी नाही तर रोजगार निर्मितीचे साधन म्हणून पर्यावरणपूरक अशा बॅटरी संचलित तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग बांधवांना वापरता येतील, अशा कम्युनिटी मेडिकल किटच्या वितरणासही प्रारंभ करण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ यांना दिव्यांग बांधवांसाठी वापरता येतील, अशा किटस् चा समावेश आहे. यात मोजक्या पण महत्त्वाच्या निवडक उपकरणे, वस्तूंच्या संचाचा समावेश आहे. हे किट उत्सव मंडळांना आणि निवासी संकुलांकडे सुपूर्द करण्यात  येतील. ज्यामध्ये वॉकर, व्हिल चेअर, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी, ग्लुकोमीटर, टेंम्परेचर गन, पल्स ऑक्सीमीटर, रक्तदाब मोजण्याचे उपकरण, नेब्युलायझर अशा बारा वस्तूंचा समावेश आहे.

आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट महावितरणकडून केवळ बारा दिवसात पूर्ण

मुंबईदिनांक ४ जानेवारी  २०२४ : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिम जमातींच्या सर्वांगिण विकासासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) या योजनेत राज्यातील दुर्गम भागातील आदिम जमातींच्या २,३९५ घरांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट महावितरणने केवळ बारा दिवसात पूर्ण केले. महावितरणच्या पुढाकारामुळे प्रत्यक्षात आदीम जमातींची २,४५४ घरे नव वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत उजळण्यात यश मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान जनमन योजनेमध्ये समाजातील  विशेष दुर्बल आदिवासी घटकांना सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सुरू केलेल्या योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याची सूचना महावितरणला केली होती. केंद्र शासनाकडून घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्राने विद्युत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. आदीम जमातींसाठी राज्यात विविध विभागांमार्फत १५ नोव्हेंबर २०२३ पासून कार्यवाही सुरू झाली. महाराष्ट्रात विशेष दुर्बल आदिवासींपैकी सर्वेक्षणात विद्युत पुरवठा नसल्याचे आढळलेल्या २३९५ लाभार्थींना विद्युत पुरवठा करण्यात आला. या गतीमान कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

मा. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनेत आदिम जमातींना घर, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, गॅस कनेक्शन आदी ११ प्राधान्य क्षेत्रांची सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. कातकरी, कोलम, माडिया गोंड इत्यादी महाराष्ट्रातील आदिम जमातींच्या वस्त्यांमध्ये त्यानुसार काम करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला. मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे दि. २० डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महावितरणला वीज पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले.

महावितरणला उपलब्ध झालेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर, नांदेड, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदूर्ग, यवतमाळ जिल्ह्यात तसेच वसई परिसरात स्वातंत्र्यानंतर अजूनही वीज पुरवठा मिळाला नसलेली आदिम जमातीची २३९५ घरे आढळली. या घरांना वीज पुरवठा करतानाच योजनेच्या तरतुदीत बसणाऱ्या आणखी ७३ लाभार्थ्यांना रायगड जिल्ह्यात वीज पुरवठा करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगावच्या अशोक दगडू हिलम यांच्या घरी या योजनेत पहिल्यांदाच वीज आली. त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी घरी वीज कनेक्शन आले. त्यासाठी अर्ज केला नव्हता. सरकारने स्वतःहून कनेक्शन दिले. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी वीज आली. वस्तीमधील पंधरा कुटुंबे इतकी वर्षे अंधारात होती. संपूर्ण वस्तीला वीज मिळाली. “घरी वीज येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. महावितरणचे धन्यवाद,” अशोक हिलम सांगतात.

नांदेड जिल्ह्यातील माहूर गावच्या अशोक कवडू आडे यांच्याही वस्तीला गेल्या दोन दिवसात वीज मिळाली. ते म्हणाले की, किनवटच्या आदिवासी कार्यालयाचे अधिकारी स्वतः लाईनमनला घेऊन आले आणि त्यांनी वीज जोडून दिली. मजुरी करणाऱ्या अशोक आडे यांची घरी वीज आल्यानंतरची प्रतिक्रिया, चांगले वाटले अशी होती.

मोबाईल क्रमांक, ई-मेलची नोंदणी करा,महावितरणचे वीजबिल तात्काळ मिळवा

पश्चिम महाराष्ट्रात ८२ लाख मोबाईल क्रमांक, १५ लाख ई-मेलची नोंदणी

पुणे, दि०४ जानेवारी २०२४: मोबाईल क्रमांक व ई-मेलची केवळ नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून संबंधित वीजग्राहकांना तात्काळ दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत महावितरणकडे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीत ८२ लाख ४८ हजार ३४७ मोबाईल क्रमांकांची आणि १४ लाख ९५ हजार ५६२ ई-मेलची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच ग्राहकाला मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करून दोहोंद्वारे दरमहा वीजबिल मिळविण्याची सोय आहे.

महावितरणने बिलींगची प्रक्रिया सेंट्रलाईज पद्धतीने सुरु केली आहे. त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ मधील एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. त्यानंतर केवळ एक ते दोन दिवसांमध्ये वीजबिल तयार करण्यात येत आहेत. वीजबिल तयार झाल्यानंतर ते मोबाईल किंवा ई-मेलद्वारे तात्काळ मिळविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी केवळ मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची महावितरणकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

वीजबिलाच्या तारखेपासून सात कार्यालयीन दिवसांमध्ये तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास एक टक्का सवलत दिली जाते. त्याची तारीख वीजबिलामध्ये नमूद केली जाते. ‘एसएमएस’ किंवा ई-मेलद्वारे वीजबिल घेतल्यास ही सूट मिळवणे अधिक सोयीचे आहे. मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यास इतरही अनेक फायदे आहेत. यात पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, खंडित वीजपुरवठ्याची माहिती, रिडींग घेतल्याची तारीख व वीजवापराच्या युनिटची संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदी माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी करावी असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ८२ लाख ४८ हजार ३४७ मोबाईल क्रमांकाची तर १४ लाख ९५ हजार ५६२ ई-मेलची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ४१ लाख ५ हजार १५० मोबाईल तर १० लाख ८५ हजार ६३० ई-मेल, सातारा जिल्हा- १० लाख ११ हजार १९१ मोबाईल तर १ लाख १ हजार २७८ ई-मेल, सोलापूर जिल्हा- १० लाख ५१ हजार ८७४ मोबाईल तर ९२ हजार ३७६ ई-मेल, कोल्हापूर जिल्हा- ११ लाख ८८ हजार १५ मोबाईल तर १ लाख ३५ हजार ९५६ ई-मेल आणि सांगली जिल्ह्यात ८ लाख ९२ हजार ११७ मोबाईल तर ८० हजार ३२२ ई-मेलची नोंदणी करण्यात आली आहे.

अशी करा ई-मेल/मोबाईल क्रमांकाची नोंदणी- महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारे मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करण्याची सोय आहे. तसेच वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ९९३०३९९३०३ क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या टोल फ्री १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येते.

समताभूमीवर अपरिचीत साऊ समजून घेतली

पुणे- शिक्षण नाही, वैयक्तिक मत जोपासण्याचा तर प्रश्नच नाही अशा काळात सावित्रीबाईनी केलेलं कार्य तरुणाईने जाणून घेतलं ज्यात फक्त २३ वर्षांच्या असताना जीवनविषयक वास्तव परिस्थितीवर, समानतेच्या वागणुकीची अपेक्षा व्यक्त करणारा १८५४ साली प्रसिद्ध झालेला ‘काव्यफुले’ हा कवितासंग्रह, १ मे, १८४७ रोजी सावित्रीबाईंनी जोतिबांची आत्या सगुणाऊला मागासांच्या वस्तीत सुरु करून दिलेली शाळा, विधवांसाठीच बालहत्या प्रतिबंधक गृह,  बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांसाठीच वसतीगृह असा सावित्री बाईंच्या विविध पैलुंवरचा इतिहास सांगण्यात आला
निमित्त होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिव्यक्ती आयोजित भेट अपरिचित साऊची हेरिटेज वॉक उपक्रमाचे. हा उपक्रम बुधवार 3 जानेवारी 2024 रोजी संध्या. 7 वा. महात्मा फुले वाडा,गंजपेठ इथे करण्यात आला.    
समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र असलेले फुले दापंत्य ज्याने विविध सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना उर्जा, रसद पुरवली हि नवीन पिढिला पण समजावी याच उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबवतो असं उपक्रमाचे समन्वयक अलका जोशी यांनी सांगितले. तरुणाईचा सोबत उपस्थितांनीही या वाड्याच्या खाणाखुना पाहताना या अभिमानास्पद इतिहासाचे पोवाडे आपल्या कानात गुंजत राहतील असे सांगितले. साऊ पेटती मशाल, साऊ मुक्तीच पाउल हे गाण यासोबतच सावित्रीच्या ओव्या घेऊन या उपक्रमाचा समारोप केला

समाजवादी विचारवंत,कार्यकर्ते  राज्यस्तरीय परिषद पुण्यात ६ जानेवारी रोजी

पुणे :समाजवादी विचारवंत, कार्यकर्ते  यांची राज्यस्तरीय परिषद पुण्यात शनिवार,दि.६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.बॅ. नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय (दांडेकर पूल) येथे ही परिषद सकाळी  ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. डॉ.कुमार सप्तर्षी , सुभाष वारे, सुभाष लोमटे, अॅड. निशा शिवूरकर, आमदार अबू आझमी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.समाजवादी पार्टी(महाराष्ट्र ) यांनी संयोजन केले असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश  कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 
 देशाच्या संविधानानुसार आणि प्रास्ताविकेनुसार आपला देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प व निष्ठा व्यक्त करणारा आहे. तथापि अद्यापही आपल्या देशाची धोरणे एकूणच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, युवक, बेरोजगार, महिला, दलित, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक समाजघटक या सर्व बहुजनांच्या विरोधातच असल्याचे जाणवते. समाजवादी पुरोगामी विचारधारेने राजकारणाला कमी लेखण्यानेच अशी परिस्थिती उ‌द्भवली आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे.त्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 
राजकीय ,सामाजिक क्षेत्रात  कित्येक वर्षापासून कार्यरत ,लोकशाही, समाजवाद व धर्मनिरपेक्ष समतेचे स्वप्न पहात पुरोगामी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन असलेला समाज घडविण्याचा विचार मनाशी बाळगणारे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आपल्या उद्दिष्टांच्या जवळपास पोहोचलो आहोत का,त्या दिशेने आपली वाटचाल तरी सुरु आहे का, यावर विचारविनिमय करण्यासाठी राज्यातील समाजवादी विचारावर निष्ठा असणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे,असे प्रताप होगाडे यांनी सांगितले. 

समाजवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी  महत्वाच्या बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन  डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर ,परवेज सि‌द्दिकी ,मेराझ सि‌द्दिकी,अॅड. रेवण भोसले,राहल गायकवाड,श्रीमती साजिदा निहाल अहमद ,शिवाजी परुळेकर , राऊफ मोहम्मद शेख  ,डॉ. विलास सुरकर ,विठ्ठल सातव, दत्ता पाकिरे, श्रीमती साधना शिंदे ,अनिस अहमद,मनवेल तुस्कानो ,नाना मानकर यांनी केले आहे. 

एयर इंडियातर्फे पी बालाजी यांची समूह प्रमुख पदी – गर्व्हनन्स, रेग्युलेटरी, कम्प्लायन्स (जीआरसी) आणि कॉर्पोरेट अफेयर्स नियुक्ती

गुरुग्राम,4 जानेवारी २०२४ – एयर इंडियाने आज नव्याने तयार करण्यात आलेल्या समूह प्रमुख – गर्व्हनन्स, रेग्युलेटरी, कम्प्लायन्स (जीआरसी) आणि कॉर्पोरेट अफेयर्स पदावर पी. बालाजी यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

बालाजी एयर इंडियातील आपला पदभार ११ जानेवारी २०२४ पासून स्वीकारणार असून ते एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांना रिपोर्ट करतील. त्याशिवाय ते एयर इंडियामधील सरकारी कामकाज, कायदेशीर, नैतिक, शाश्वतता, कम्युनिकेशन्स इत्यादी कामकाजही हाताळणार आहेत.

बालाजी यांनी टाटा अडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस कंपनीपासून आपल्या करियरची सुरुवात केली. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नियामक धोरणे, अनुशासन, विक्री, उत्पादन व्यवस्थापन, विपणन, धोरणे, एम अँड ए आणि इतर कामकाज अशा विविध विभागांचा ३० वर्षांचा अनुभव त्यांना लाभला आहे. व्होडाफोन इंडिया लिमिटेडमध्ये ते नियामक आणि सार्वजनिक धोरण कामकाज विभागाचे नेत्त्व करत होते. तिथे १० वर्ष काम केल्यानंतर ते एयर इंडियामध्ये रूजू झाले.

बालाजी यांच्या नियुक्ती जाहीर करताना एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘बालाजी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. नियामक आणि धोरण क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव आणि ज्ञान त्यांना लाभले असून त्याचा एयर इंडियाच्या सध्या सुरू असलेल्या स्थित्यंतराच्या प्रवासात मोठा फायदा होईल. एयर इंडियामध्ये आम्ही उच्च नेतृत्वगट तयार करत असून कंपनीला जागतिक विमानसेवा क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्यासाठी आवश्यक स्त्रोतांमध्ये गुंतवणूक करत राहू.’

तब्बल ७०,४४५ देशी रोपांच्या विनामूल्य वाटप अभियानाला प्रारंभ 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त आयोजन ; महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती, पुणे चा पुढाकार 
पुणे : पर्यावरण पूरक देशी वृक्ष म्हणजेच तुळस, पिंपळ, वावर, कडुलिंब अशा रोपांचे विनामूल्य वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.  महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती, पुणे च्या वतीने तब्बल ७०,४४५ हून अधिक देशी वृक्षांच्या रोपांचे विनामूल्य वाटप अभियानाचा शुभारंभ महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथे झाला.
स्त्रियांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त हे अभियान राबविले जात आहे. अभियानाचे आयोजन प्रा. नरहरी पाटील, रघुनाथ ढोले, रवि चौधरी, प्रल्हाद गवळी, सारंग सराफ, सुशीला नेटके, बाळासाहेब अमराळे, सचिन विप्र, नंदा पंडीत, सुनीता काळे, विजय रजपूत, बाळासाहेब ढमाले, रुपेश चांदेकर, राजेंद्र भोसले, नीता पालवे यांनी केले आहे. 
सावित्रीबाईंच्या जयंतीचे हे १९३ वे वर्ष असून प्रत्येक वर्षीचे ३६५ दिवस याप्रमाणे एकूण ७०,४४५ दिवस पूर्ण होत असून, तेवढी रोपे नागरिकांना देण्यात येणार आहेत. यामध्ये बहावा, दिल का राजा, भेंडी ,सिताफळ, उंबर ,आंबट चिंच, वड ,पळस टिकोमा, शिसवी, जांभूळ ,करंजी ,मोगरा आधी वृक्षप्रजातीचा समावेश आहे. सदर वृक्षांची लागवड व देखभाल लोकसेवा शैक्षणिक संस्था समूहाने मौजे फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केलेली आहे.

तसेच या समितीत सर्व संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, सदस्य सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, जेष्ठ नागरीक संघ, पोलीस मित्र, महिला बचत गट, भजनी मंडळ यांचे कार्यकर्ते अभियानाकरिता काम करणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने अभियानात सहभागी व्हावे. तसेच मोफत रोपांकरिता ९८२२६५२६१९, ९७६३०८१११७  या क्रमांकावर साधावा,  असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

एयर इंडिया भुज ते मुंबई मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी सज्ज

गुरुग्राम, ४ जानेवारी २०२४ – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची जागतिक विमानसेवा कंपनी १ मार्च २०२४ पासून मुंबई ते भुज मार्गावर सेवा देण्यासाठी सज्ज आहे. एयर इंडियातर्फे स्थानिक नागरिकांतर्फे बऱ्याच काळापासून केली जात असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी या दोन शहरांदरम्यान सोयीस्कर व आरामदायी विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

A320 प्रकारचे सिंगल आयल विमान, AI 601 मुंबईतून 0705 वाजता निघेल आणि 0820 वाजता भुजमध्ये पोहोचेल. परतीचे विमान AI602 भुजमधून 0855 वाजता निघेल आणि मुंबईत 1010 वाजता पोहोचेल.

नवी सेवा इंग्लंड, उत्तर अमेरिका तसेच दुबई आणि सिंगापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीस्कर आंतरराष्ट्रीय कनेक्शन मिळवून देईल. त्याचबरोबर देशांतर्गत क्षेत्रातील २० ठिकाणी ते जोडलेले असेल.

या विमानसेवेचे आरक्षण सर्व माध्यमांतून सुरू झालेले असून त्यात एयर इंडियाचे अधिकृत संकेतस्थळ (www.airindia.com), मोबाइल अप आणि प्रवासी एजंट तसेच ऑनलाइन प्रवासी एजंट यांचा समावेश आहे.