Home Blog Page 1264

उद्या मोदीम्हणाले,’ कॉंग्रेस खूप चांगला पक्ष तर त्यास मी विरोध करेन …मिलिंद देवरांनी सांगितले का सोडली कॉंग्रेस,झाले भावूक

10 वर्षांत मुंबईत एकही अतिरेकी हल्ला नाही

मुंबई-मी काँग्रेस सोडेण असे कधी वाटले नव्हते, असे म्हणतानाच आजचा दिवस स्पेशल म्हणताना डोळ्यात पाणी आले असून ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. लोकांची सेवा हीच माझी विचारधारा असल्याचे सांगताना शिवसेना आणि माझे जुने नाते आहे माझ्या वडीलांना शिवसेनेने महपौर केले. तर बाळासाहेब ठाकरे हे माझ्या वडीलांना महाराष्ट्राचे जावई म्हणत होते असे सांगताना त्यांनी आपले शिवसेनेसोबत चांगले संबंध असल्याचे सांगितले आहे.

केंद्र,राज्यात मजबूत सरकारची गरज आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात भारत मजबूत आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मजबूत आहे, सुरक्षित आहे. लोकांना सहज भेटणारा एवढा मोठा मुख्यमंत्री मी कधीच पाहिला नाही. गेल्या 10 वर्षात मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. हे केवळ मोदी आणि शिंदे यांच्या धोरणांमुळे हे शक्य झाले,असे मत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे.

मिलिंद देवरा पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे हे खूप मेहनती व्यक्तिमत्व आहे. शिंदेंना महाराष्ट्राचा हितासाठी चांगले लोक हवे आहेत. मी काँग्रेसमध्ये खूप कठीण काळात राहिलो पण आता काँग्रेसमध्ये आता पहिल्या सारखी काँग्रेस राहिली नाही, तशी काँग्रेस असती तर आज मला आणि एकनाथ शिंदे यांना हा निर्णय घ्यावा लागला नसता, असे म्हणत काँग्रेस सोडण्यासाठी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र डागले आहे.

मिलिंद देवरा पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांचे हात बळकट करणार आहोत. गेल्या 10 वर्षांत मुंबईत एकही अतिरेकी हल्ला झाला नाही. त्यांचे काम खूप चांगले आहे.

माझे वडील मुरली देवरा हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले.

मिलिंद देवरा म्हणाले की, पक्षात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी उपस्थितांना संबोधित केले. आमचे शिवसेनेशी जुने नाते आहेत. माझे वडील मुरली देवरा हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले. माझे आईचे माहेरचे नाव फणसाळकर असल्याने बाळासाहेब मुरली भाईंना प्रेमाणे महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझे वडील आणि शिंदे यांच्यात एक समानता आहे. दोघेही सामान्य कुटुंबातून आले आहेत. दोघांनीही नगरसेवक म्हणून सुरुवात केली. मुरलीभाई केंद्रात मंत्री झाले. तुम्ही मेहनतीने मुख्यमंत्री झाला. माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी मला शिंदे यांनी पक्षात प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले. शिंदे साहेबांना मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. मी खासदार बनून चांगले काम करू शकतो, असे एकनाथ शिंदे यांचे मत आहे. त्यांनी विश्वास टाकला. त्याबद्दल आभार मानतो, असे मिलिंद देवरा म्हणाले.

मिलिंद देवरा म्हणाले की, माझ्यासोबत काही मराठी भाषिक, काही हिंदी भाषिकही आहेत. सकाळपासून अनेक लोकांचा फोन येत आहे. तुम्ही कुटुंबासोबतचे नाते का तोडले असे सांगितले जात आहे. मी पक्षाच्या आव्हानाच्या काळातही पक्षाशी निष्ठावंत राहिलो. पण दुखाची गोष्ट म्हणजे आजची काँग्रेस आणि 1968च्या काँग्रेसमध्ये खूप फरक आहे. मेरिट आणि योग्यतेला काँग्रेसने महत्त्व दिले असते तर मी इथे बसलो नसतो. एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यावा लागला. मलाही घ्यावा लागला. 30 वर्षापूर्वी मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना आर्थिक सुधारणा केली होती. त्यावेळी काँग्रेसने केवळ उद्योगपतींना शिव्या घातल्या. उद्योगपतींना देशद्रोही म्हटले.आज हीच पार्टी मोदींच्याविरोधात बोलत आहे. उद्या मोदींनी काँग्रेस चांगला पक्ष आहे असे म्हटले तर त्यालाही विरोध करतील. केवळ मोदी विरोध हाच या पक्षाचा अजेंडा राहिला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

देवरा यांच्या समवेत शिंदे गटात कोणाकोणाचा झाला प्रवेश

सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक रामवचन मुराई , माजी नगरसेवक हंसा मारु, माजी नगरसेवक अनिता यादव, माजी नगरसेविका रमेश यादव गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई कॉग्रेस सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष पुनम कनोजिया संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष दिलीप साकेरिया – मुंबई काँग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी राजाराम देशमुख, सचिव- मुंबई कॉग्रेस – विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई कॉग्रेस कमिटी कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष 85 वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश:मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण

मुंबई-काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद मुरली देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे.

गरवारे क्लब आणि मुंबई काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठका होत्या. या दोन्ही बैठकांकडे देवरा यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, विनंतीही केली होती. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. देवरा यांनी पक्षीय सीमोल्लंघन करावे, यासाठी एका वजनदार उद्यागपतीने त्यांची मनधरणी केल्याची माहिती आहे. होती. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर देवरा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्ष करण्यास विरोध करणाऱ्या ‘जी 23’ गटाचे सदस्य असलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद मुरली देवरा यांनी अखेरीला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. स्वतः मिलिंद देवरा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. कालपासून मिलिंद देवरा हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

दोनदा खासदार व नंतर दक्षिण मुंबईतून दोनदा पराभूत झालेले देवरा यंदाही याच जागेसाठी आग्रही आहेत. मात्र 10 वर्षांपासूनचे उद्धवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत ही जागा सोडणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. याच कारणावरून देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. देवरा यांचा ओढा भाजपकडे होता. पण महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे भाजपच्या सल्ल्यानुसारच देवरा यांनी शिंदेसेनेचा ‘पर्याय’ स्वीकारल्याचे सांगितले जाते.रविवारी सकाळी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, ”आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ते यांनी अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे”, असे ट्विट देवरा यांनी केले आहे.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्याअध्यक्षपदी गणेश काळे; सचिवपदी मनीषा गोसावी

खजिनदारपदी ॲड. देविदास टिळे, उपाध्यक्षपदी अनिल खेतमाळीस; त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध
पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी गणेश बबनराव काळे, उपाध्यक्षपदी अनिल ज्ञानदेव खेतमाळीस, सचिवपदी मनीषा गोसावी, खजिनदारपदी ॲड. देविदास टिळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२४ ते २०२७ या कालावधीकरिता कार्यकारिणी निवडण्यात आली.
या पदाधिकाऱ्यांसमवेत माजी विद्यार्थी जीभाऊ शेवाळे, निसार चौगुले, शंकर बारवे, जे. व्ही. इंगळे, पुष्पा आरोटे, संदीप इंगवले, संभाजी सातपुते यांची विश्वस्त म्हणून निवड झाली. स्वीकृत विश्वस्त म्हणून सुनील चोरे, मनोज गायकवाड, दिनकर वैद्य, अलकनंदा पाटील, ⁠सीए संतोष घारे, ⁠डॉ. अभय व्यवहारे यांची नेमणूक करण्यात आली.
कुंदन पठारे, श्रुती साने, सचिन मोकाशे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, नंदकुमार तळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, प्रभाकर पाटील व अन्य माजी विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले.मंडळाने आतापर्यंत कोरोना काळात अन्नदान, कोकणात पूरग्रस्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, आशीर्वाद वृक्ष योजना, दिवाळी फराळ वाटप, रक्तदान शिबिरे, समितीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक आर्थिक मदत, उद्योजकता विकास मार्गदर्शन, रक्षाबंधन, मुला-मुलींचे नियमित वार्षिक स्नेहसंमेलन (मेळावे) असे अनेक उपक्रम राबविले आहेत.
“मंडळाचे स्थापनेपासून प्रेरणास्तोत असलेल्या दिवंगत रमाकांत तांबोळी यांच्या अपेक्षेप्रमाणे, समितीच्या माजी विद्यार्थ्यांचे यथायोग्य संघटन करून त्यांना पुन्हा समितीच्या मुख्य कार्यप्रवाहात आणण्यासाठी व सर्व प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत अग्रेसर कार्य करण्याचा प्रयत्न आहे,” असे नवनियुक्त अध्यक्ष गणेश काळे यांनी सांगितले.

निवडणुकांसाठी रामाचा वापर होणे चुकीचे :डॉ.कुमार सप्तर्षी 

सत्याग्रह ही जगाला अनमोल देणगी: डॉ.कुमार सप्तर्षी

पुणे:’देशाची प्रगती नागरिकांची विवेक बुद्धी किती जागरूक आहे , किती बंधुभाव आहे, यावर अवलंबून असते. प्रत्यक्षात मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामाच्या नावाने वातावरण निर्मिती करून मती गुंग करण्याचे काम भाजप करीत आहे.निवडणुकांसाठी रामाचा वापर केला जात आहे,हे चुकीचे आहे’,असे प्रतिपादन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केले.या शिबिरात डॉ.सप्तर्षी बोलत होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १४ जानेवारी  २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी  ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर झाले .राज कुलकर्णी यांनी ‘गांधी,नेहरू समजून घेताना ‘,डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘सत्याग्रहशास्त्र ‘, राजू परुळेकर यांनी ‘भारतीय लोकशाहीवर आलेली संक्रांत आणि विरोधी पक्षांचे पानिपत’ या विषयावर मार्गदर्शन केले.’ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे नववे शिबीर होते.डॉ.उर्मिला सप्तर्षी,अन्वर राजन,महावीर जोंधळे,संदीप बर्वे,अप्पा अनारसे,सुदर्शन चखाले,नीलम पंडित,रोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.  
 डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ राजकारणात देव आणल्याने देवाचे देव पण धोक्यात येते. पक्षा बरोबर देवाच्या चरित्राची चर्चा होते.बिन शिखराच्या  मंदिराचे उद्घाटन करणे धर्म शास्त्रात बसत नसेल तर भाजप कडून झालेले हे हिंदू धर्माचे अवमूल्यन नाही का ? फक्त निवडणुकांसाठी रामाचा वापर केला जात आहे’, असेही ते म्हणाले.

सत्याग्रहशास्त्र उलगडून सांगताना डॉ.सप्तर्षी म्हणाले,’सत्याग्रह ही जगाला अनमोल देणगी आहे .मला या मार्गामुळे ६२ वेळा अटक झाली. पण सर्व आंदोलने यशस्वी झाली. एकदाही अपयश आले नाही.शारीरिक, सामूहिक बल कमी असले तरी अन्याया विरुद्ध लढा देतो याची प्रेरणा सत्याग्रहाने दिली.सत्याग्रह फक्त परकियांविरुद्ध करायचा हा भ्रम पसरवला जात होता. मात्र, स्वकीय चुकत असतील तर त्याविरुद्ध देखील सत्याग्रह करता येतो आणि केला पाहिजे’.
एडव्होकेट राज कुलकर्णी म्हणाले,’भारताची जडण घडण गांधी नेहरूंनी केली. आज त्यांच्या विचारांची गरज आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यानी गांधींना स्वच्छता मोहिमपुरते मर्यादित ठेवले आहे. भारतातील धर्म निरपेक्षता आणि लोकशाही हे अद्वैत आहे.भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, हे गांधी नेहरु पटेल यांचे कर्तृत्व आहे. गांधी नेहरूंचे नाव म्हणजे त्या काळातील सर्व नेतृत्वाच्या विचाराचा सार आहे.भारतीय उपखंडात दुसऱ्या कोणत्याही देशाला गांधी नेहरू यांच्या सारखे मोठे नेतृत्व लाभले नाही. तेथील लोकशाहीची बिकट अवस्था आपण समजू शकतो’.

चांगल्या समाज निर्माणासाठी बंधुतेची शिकवण मोलाची-कृष्णकुमार गोयल

पुणे : “आपल्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या समाजाप्रती कृतज्ञतेची भावना ठेवत चांगले काम करत राहायला हवे. त्या कामाची समाज दखल घेतो. चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी बंधुतेची शिकवण मोलाची आहे. बंधुतेच्या याच विचाराला जीवन समर्पित करत समाजाला एकसंध ठेवण्याचे कार्य बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले आहे. सध्याच्या अस्थिर वातावरणात बंधुतेचा विचार समाजाला योग्य दिशा देऊ शकेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रौप्य महोत्सवी (२५ वे) राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी गोयल बोलत होते.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गुरुनानक सेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा, संमेलनाध्यक्ष कवयित्री मधुश्री ओव्हाळ, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष कवी चंद्रकांत वानखेडे, डॉ. विजय ताम्हाणे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. शंकर आथरे आदी उपस्थित होते.
गेल्या चार दशकांपासून समर्पित भावनेने बंधुतेचा विचार पेरणाऱ्या बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना गोयल व मोखा यांच्या हस्ते सम्यक सत्यार्थी जीवनगौरव पुरस्काराने, तर रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींना बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “बंधुताचार्य प्रकाश रोकडे सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक असे काम करत आहेत. सम्यक सत्यार्थी जीवनगौरव पुरस्कार हा त्याचे संचित आहे. एखादा सकारात्मक विचार मनात आला, की तेवढ्याच तीव्रतेने तो साध्य करण्यासाठी प्रयत्न केले की यश नक्कीच मिळते. सामाजिक स्थिरतेसाठी बंधुतेची चळवळ कायम राहावी.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेच्या वाटेवर अनेकांना सोबत घेऊन प्रमाणिकपणे केलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. या प्रवासात अनेकांची साथ मिळाली. आईने बंधुतेचा संस्कार दिला. त्यामुळे तो अधिक व्यापकतेने मनात भिनला. पैशामागे धावण्यापेक्षा विचारांच्या मागे धावत राहिलो आणि जीवन समृद्ध करत गेलो. जीवनातील प्रत्येक संघर्षावर बंधुता हाच उपाय आहे.”
संतसिंग मोखा, डॉ. विजय ताम्हाणे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी विचार मांडले. प्रा. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता झिंजुर्के यांनी आभार मानले.

शिवाजीनगर गावठाणात मंदिरांची स्वच्छता-प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सहभाग

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजीनगर गावठाण येथील श्रीराम मंदिर आणि श्री रोकडोबा मंदिर परिसरात आज (रविवारी) सकाळी स्वच्छता अभियान राबवले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आवाहन केले आहे की, ५०० वर्षानंतर अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या हक्काच्या मंदिरात स्थानापन्न होणार आहेत, तरी सर्व भारतीयांनी १२ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत आपल्या परिसरातील मंदिरे स्वच्छ करावीत. त्या आवाहनानुसार छ शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शिवाजीनगर गावठाणातील श्रीराम मंदिर आणि श्री रोकडोबा मंदिर परिसरात स्वच्छता केली.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रशंसा केली आणि महाराष्ट्रात ही मोहीम कार्यकर्ते यशस्वी करतील, असा विश्वास व्यक्त केला.

भगतसिंग, राजगुरु, बटुकेश्वर दत्त यांच्या वंशजांच्या हस्ते ‘#व्हायरल_माणुसकी’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे, ता. १४ : शहीद भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू, बटुकेश्वर दत्त यांच्या वंशजांच्या हस्ते वैभव वाघ लिखित ‘#व्हायरल_माणुसकी’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. डिसेंबर महिन्यात परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंग यादव ह्यांच्या हस्ते पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले होते. प्रसंगी सरहद संस्थेचे संजय नहार उपस्थित होते.
वैभव वाघ म्हणाले, “पहिल्या आवृत्तीला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की, महिन्याच्या आत दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करावे लागले. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, आणि बटुकेश्वर दत्त यांच्या वंशजांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणे, ही अभिमानाची गोष्ट आहे. भगतसिंग यांचे पुतणे किरणजीतसिंग, राजगुरुंचे नातू सत्यशिल राजगुरु आणि बटुकेश्वर दत्त ह्यांच्या कन्या भारती दत्त यांचा आशीर्वाद मला मिळाला. यावेळी क्रांतीकारकांच्या या वंशजांकडून त्यांच्या आठवणी, त्यांचे मैत्रीचे किस्से ऐकू शकलो. त्यांच्याशी संवादाचे दोन तास भारावून टाकणारे, विचारप्रवृत्त करणारे होते.”
न्यू ईरा पब्लिकेशन हाऊसच्या माध्यमातून ही ‘निगेटिव्ह काळातील पॉझिटीव्ह गोष्ट’ महाराष्ट्रभर पोहचली असून, वाचकांना आवडली आहे. सकारात्मक चळवळीत काम करायला लावणारी ही गोष्ट आहे. वैभव वाघ यांचे ‘#व्हायरल_माणुसकी’ हे केवळ पुस्तक नव्हे, तर लोकचळवळ आहे, अशा शब्दात मान्यवरांनी गौरव केला.

विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे युवा साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्षपदी डॉ. आशुतोष जावडेकर; ‘मसाप’च्या सहकार्याने १५ ते १७ जानेवारीला आयोजन
पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने येत्या १५, १६ आणि १७ जानेवारी २०२४ रोजी तीन दिवसांच्या युवा साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिध्द लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी दिली.
तुषार रंजनकर म्हणाले, “संमेलनाचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता फर्ग्युसन रस्त्यावरील डॉ. अ. शं. आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात होणार आहे. यावेळी डॉ. आशुतोष जावडेकर यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, समितीचे विश्वस्त, कार्यकर्ते, सल्लागार, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.”
“१६ जानेवारीला होणाऱ्या कविसंमेलनात बंडा जोशी, अंजली कुलकर्णी, देवा झिंजाड, मृणालिनी कानिटकर-जोशी हे मान्यवर कवी सहभागी होतील. १७ जानेवारीला साधना साप्ताहिकाचे संपादक व लेखक विनोद शिरसाट यांचे ‘वाचन-का व कसे?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे सर्व कार्यक्रम आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहेत,” असे रंजनकर यांनी नमूद केले.

शंकर महाराज मठाजवळ हौसेसाठी वाहनचोरी करणा-या २ अल्पवयीन मुलांना पकडले -३ दुचाक्या हस्तगत

पुणे- केवळ दुचाकी चालवण्याच्या हौसेसाठी वाहन चोरी करणा-या २ विधीसंघर्षित बालकांंकडुन ३ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती येथे पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात पोलीसंनी सांगितले कि,’
दि.११/०१/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना सहकारनगर पोलीस स्टेशनचे हददीतील शंकर महाराज मठ भागात दर्शनासाठी येणा-या भावीकांच्या दुचाकी लावण्यासाठी पार्कीगची सोय करण्यात आली होती. त्या पार्कीगगधुन दुचाकी चोरी होवु नये यासाठी सदर भागात तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचला असता दोन मुले त्यांचेकडील हिरो होंडा स्प्लेंडर गाडी नं.MH-13-AS-9144 ही घेवुन सदर ठिकाणी आले व त्यांनी त्यांची गाडी महेंद्रा शोरुमचे इमारती समोर पार्क करुन ते बर्गर किंग समोरील पार्किंग जागेत आले व तेथे पार्क केलेल्या दुस-या दुचाकी वाहनांना त्यांचेकडील चावी लावुन हॅण्डल लॉक काढण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांचा पोलीस स्टाफला संशय आल्याने सर्वांनी एकमेकांना इशारा करुन दोन्ही गुलांना त्यांचेकडील गाडीसह ताब्यात घेवुन त्यांना गाडीबाबत व तीचे कागदपत्रांबाबत विचारता ते उडवा उडवीची उत्तरे देवुन लागल्याने त्यांना त्यांचे ताब्यातील गाडीसह सहकारनगर पोलीस स्टेशन येथे घेवुन आलो व त्यांचे पालकांना संपर्क करुन पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेतले.
त्यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्यांचेकडील गाडी चोरीची असल्याची कबुली देवुन मागील तीन चार दिवसापुर्वी आम्ही दोघांनी बर्गर किंग या दुकाना समोरून आणखी दोन दुचाकी आमचे कडील चावीने चोरी करुन इकडे तिकडे फिरवुन गौजमजा करुन त्या के.के. मार्केटचे पलीकडे असलेल्या लोअर इंदीरानगर बिबवेवाडी भागातील नाल्याजवळ पार्क करून ठेवल्या आहेत. असे सांगितल्याने त्यांचेकडुन एकुण १,१०,००० रूपये किंमतीच्या एकुण ०३ दुचाकी गाडया हस्तगत करण्यात आल्या असुन सहकारनगर पोलीस स्टेशन कडील १) गुन्हा रजि. नं. १०/२०२४ भादवी. कलम ३७९ २) गुन्हा रजि. नं.११/२०२४ भादवी. कलम ३७९ ३) गुन्हा रजि.नं.१२/२०२४ भादवी. कलम ३७९ असे एकुण तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतारे, बजरंग पवार, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, विशाल वाघ, सागर कुंभार, यांनी केली आहे.

नव्या व्यवस्था निर्माण करणारे ‘डिझाईन थिंकर’ उदयास यावेत: जी. के. कान्हेरे   

पुणे :’आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ कडून दरवर्षी दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार  ज्येष्ठ आर्किटेक्ट प्रा.जी.के.कान्हेरे, ज्येष्ठ स्ट्रक्चरल  इंजिनियर सतीश मराठे यांना आज शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
  दि. १३ जानेवारी रोजी पी वाय सी हिंदू जिमखाना टेरेस येथे सायंकाळी ६ वाजता आर.बी.सूर्यवंशी(सिनियर चीफ एक्झिक्युटिव्ह ,बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.) आणि जे.पी.श्रॉफ(अध्यक्ष,श्रॉफ ग्रुप)  यांच्या हस्ते या जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात  आले.  सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रत्येकी एक ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एक ज्येष्ठ इंजिनियर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो.या पुरस्कारांचे हे १७ वे वर्ष होते. ‘सॉलिटेयर ‘ ग्रुपच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
असोसिएशन तर्फे   प्रेसिडेंट पराग लकडे, उपाध्यक्ष राजीव राजे,चेअरमन महेश बांगड,सचिव संजय तासगांवकर यांनी सर्वांचे स्वागत केले.विश्वास कुलकर्णी,  दिवाकर निमकर, केशव देसाई  पुष्कर कानविंदे, शेखर गरुड आदि उपस्थित होते.  महेश बांगड यांनी सूत्र संचालन केले. राजीव राजे यांनी आभार मानले.
आर बी सूर्यवंशी म्हणाले,’ आपल्या क्षेत्रांतील ज्येष्ठांचा सन्मान करणे ही परंपरा उल्लेखनीय असून बांधकाम क्षेत्रातून सर्वांचे जीवनमान उंचावण्याच्या कार्याचा सन्मान आहे’.
सत्काराला उत्तर देताना जी. के. कान्हेरे म्हणाले,’ अभियांत्रिकी आणि आर्किटेक्ट कडे ओढा कमी होतो आहे. पारंपरिक संकल्पनांच्या जागी अभियंते आणि आर्किटेक्ट यांनी शहरे, समाज आणि इमारतींसाठी नव्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत.आर्टिफिशयल इंटेलिजन्स चे युग आले असले तरी नावीन्य पूर्ण कल्पना आणि विचार यांचे महत्व कायम राहील. व्यवसाय, उत्पादन आणि सेवा बदलत राहिल्या तरी हे महत्त्व बदलणार नाही. यापुढे आंतरशाखीय शिक्षणाला महत्त्व राहील. त्यातून ‘डिझाईन थिंकर’ उदयास यावेत’.
सतीश मराठे म्हणाले, ‘ शैक्षणीक आणि कारकिर्दीची प्रगतीकडे लक्ष देताना मुल्ये जपली पाहिजेत. चारित्र्य शिक्षण सर्व क्षेत्रात उपयोगी आहे. त्याकडेही लक्ष द्यायला हवे’.
जे. पी. श्रॉफ म्हणाले,’ आर्किटेक्ट आणि अभियंत्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून समाजोपयोगी नव निर्मिती करावी. देण्याची वृत्ती ठेवल्यास समाधान, यश मिळत राहते’.
*’आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’:५४ वर्षांची परंपरा* 
‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ ही ५४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि नीतिमान  सेवांना उत्तेजन देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊन नागरी,सामाजिक प्रश्नांवर कार्यरत राहण्यासाठी ही संस्था स्थापन झाली.सभासदांची वर्गणी आणि प्रायोजकत्वातून विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये चर्चासत्रे,प्रशिक्षण ,विविध पुरस्कारांचा समावेश आहे.  

  मणिपूरमधून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा , 6700 Kmचा प्रवास करून मुंबईत येण्यास सज्ज

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून म्हणजेच १४ जानेवारीपासून मणिपूरच्या थौबल येथून सुरू होणार आहे. काँग्रेस नेत्यांसोबत राहुल इंफाळला रवाना झाले आहेत. दिल्लीतील दाट धुक्यामुळे त्यांच्या विमानाला उशीर झाला.

दुपारी 12 वाजता मणिपूर येथून प्रवास सुरू होईल. आधी ते इम्फाळपासून सुरू होणार होते, परंतु नंतर पक्षाने स्थळ बदलून 34 किलोमीटर दूर असलेल्या थौबलमध्ये केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, राहुल गांधी सकाळी 11 वाजता इंफाळला येतील आणि सर्वप्रथम खोंगजोम युद्ध स्मारकाला भेट देतील. ते म्हणाले की, हे युद्धस्मारक केवळ मणिपूरसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय हा भारत न्याय यात्रेचा उद्देश आहे. या प्रवासादरम्यान राहुल तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांना भेटतील.

20 मार्च रोजी संपणाऱ्या या यात्रेत 15 राज्ये आणि 110 जिल्ह्यांतील 337 विधानसभा जागांचा समावेश असेल. या काळात राहुल गांधी बसने आणि पायी 6 हजार 713 किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत.

यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाईल आणि महाराष्ट्रात संपेल.

अटल सेतूवर वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.१३:  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ चे राष्ट्रार्पण केले. हा अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वाहनचालकांनी या सेतूवरून प्रवासाचा आनंद घेताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अशी या अटल सेतूची ओळख आहे. यामुळे, दाक्षिण भारतासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा यांचे अंतर कमी होणार आहे. हा सेतू एक देशातील एक प्रमुख अभियांत्रिकी आविष्कार ठरला आहे. या सेतूवरून प्रवास करणे हा आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे, हा क्षण अनुभवताना वाहन वेग मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा.

आपण सर्वांनी सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

संगणक साक्षरतेतून होणार रोजगार निर्मिती

  • प्रभाग दोन मध्ये डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम
  • यश फाउंडेशन आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्थेतर्फे युवकांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पुणे-

संगणक साक्षरतेतून रोजगार निर्मिती होऊन आर्थिक सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभाग दोन मध्ये युवकांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यश फाउंडेशन आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचा परिसरातील युवकांना फायदा होणार आहे.

प्रभाग दोन मधील नागपूर चाळ येथील यश फाउंडेशनच्या कालवश नटराज गंगावणे समाज मंदिर येथे या केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला होप फाउंडेशनचे नितीन पोळ, वेद कॉम्प्युटर ऍकॅडमीच्या सीमा बैस, एम्पॉवर चॅरिटेबल ट्रस्टचे विनय दवे, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ व मनोदय संस्थेचे पदाधिकारी तसेच त्या भागातील नागरिक, युवक उपस्थित होते.

तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात न अडकता स्वतःचे शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच कौशल्य विकसित करावे असे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने डॉ. विष्णू श्रीमंगले यांनी भूमिका मांडली.

पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी तरुण पिढी व्यसनी होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले. तरुणांना संगणक ज्ञान देवून सक्षम देखील केले जाते जे अनेक पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन केले.

शासकीय योजना राबविण्यासाठी डॉ. धेंडे यांचा पुढाकार

माजी उपमहापौर डाॅ. धेंडे यांच्या माध्यमातून प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून यश फाउंडेशन व महापालिका समाज विकास विभागाच्या माध्यमातुन मोफत संगणकीय प्रशिक्षनाला सुरुवात करण्यात आली आहे. या पूर्वी कोरोनानंतर २५० निराधार कुटुंब यांना रे (RAY) संस्थेच्या वतीने दरमहा १० किलो मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. तरुण मुलांना जिम, कराटेची सुविधा देण्यात आली. मनपा व शासनाच्या सर्व योजना (आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, शहरी गरिब कार्ड व ईतर ) सर्व आवश्यक कागदपत्र याची सुविधा देण्याचे काम देखील नागपूर चाळ येथील कालवश नटराज गंगावणे समाज मंदीर येथे चालु आहे.

यश फाउंडेशनच्या माध्यमातून युवक आणि नागरिक यांच्यासाठी जे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. युवकांच्या विकासाच्या मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने समुपदेशन, जाणीव जागृती बरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काम केले जात आहे. त्यात भर घालून एचपी साऊंड सोलुशन यांच्या मार्फत संगणक डेस्कटॉप उपलब्ध करून दिला आहे. यापुढील काळात तरुण पिढीला मोफत बेसिक आणि प्रगत संगणक ज्ञान उपलब्ध करून कौशल्य विकसित करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला जात आहे.

-डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका

अल्पवयीन मुलीशी फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून, तिला धमकावणा-या बिहारीस ठोकल्या बेडया

पुणे-येथील एका अल्पवयीन मुलीशी फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून, तिला धमकावणा-या बिहारीस पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमनकुमार पंकज तांटी वय. २० वर्षे धंदा. शिक्षण रा. वॉर्ड नं. ११, हरपुर जि. बेगुसुराई, राज्य बिहार असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’ फिर्यादी यांची मुलगी हिचे बरोबर ऑन लाईन फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून सन २०२३ मध्ये फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हिला जिवे ठार मारील अशी धमकी देवून, तिचे न्यूड फोटो व्हाट्सअॅप व्दारे त्याला पाठविण्यास भाग पाडून त्याचेशी रिलेशनशिप मध्ये नाही राहिली तर ते फोटो तिच्या नातेवाईकांना पाठविल अशी वेळोवेळी धमकी देवून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे न्यूड फोटो पाठवले असल्याने आरोपी याचे विरुध्द मार्केट यार्ड पोलीस ठाणे येथे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधि. सन २०१२ चे कलम ११,१२, भा.द.वि. कलम, ३५४.३५४ (ड), तसेच आय.टी. अॅक्ट ६६ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेवर गुन्हयातील आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता माहित नसताना फक्त ०४ मोबा. क्र. तक्रारीत नमुद असल्याने मोबाईल क्रमाक चे तांत्रिक विश्लेषण केल्यावर आरोपीचा बिहार मधील अपुर्ण पत्ता मिळून आला. परंतु त्या नंतर सतत मोबा. क्र. चे क्लिष्ट तांत्रीक विश्लेषण करून हरपुर, जि. बेगुसुराय, राज्य बिहार असे लोकेशन येत असल्याने तपासी अधिकारी स्वप्नाली शिंदे, पो.हवा. किशोर पोटे, पो.हवा. अमित जाधव, म.पो.हवा. धनश्री गोफणे असे तात्काळ बेगुसुराय बिहार येथे रवाना झाले. तेथे त्यांनी वेषांतर करून आरोपीची सर्व माहिती घेतली व त्यानंतर बिहार पोलीसांच्या मदतीने संवेदनशिल भागातून आरोपी अमनकुमार पंकज तांटी वय. २० वर्षे धंदा. शिक्षण रा. वॉर्ड नं. ११, हरपुर जि. बेगुसुराई, राज्य बिहार यास रिफायनरी ओ. पी. (बरौली थाना) यांचे मदतीने शिताफिने अटक करून गुन्हयात वापरलेला मोबाईल. फोन हस्तगत केला.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परि. ०५ श्री आर. राजा., सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहूराजे साळवे, मार्केट यार्ड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार किशोर पोटे, अमित जाधव, म.पो. अंम. धनश्री गोफणे यांचे पथकाने केली आहे.

महानगरपालिकांनी नाट्यगृहाबरोबर मल्टीप्लेक्स उभारावे- – मेघराज राजे भोसले

पुणे-गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या निर्मितीत मोठी भर पडत असून मराठी चित्रपटांना  चित्रपटगृह मिळण्यास अडचण येते हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांनी आपापल्या शहरात नाट्यगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्सही उभारावेत. तसेच नाट्यगृहांमध्ये स्क्रीन व प्रोजेक्टरची सोय करून दिवसा २ वेळा तेथे मराठी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी केली.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक तरुण – तरुणी उत्कृष्ट चित्रपट निर्मिती, अभिनय, दिग्दर्शन, पटकथा संवाद लेखन, सिनेमॅटोग्रॅफी याकडे वळत आहेत. जागतिक मराठी स्पर्धात्मक विभाग असणारे महाराष्ट्र शासनाचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यासपीठही आता उपलब्ध आहे. त्यासाठीच मराठी चित्रपटसृष्टीला अधिक बहर येण्यासाठी शासन अथवा महानगरपालिकांनी नाट्यगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्सही उभारावीत आणि नाट्यगृहांमध्ये स्क्रीन व प्रोजेक्टरची व्यवस्था करून दिवसातून २ वेळा मराठी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था केल्यास मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत ही अडचण कायमची दूर होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत असे नमूद करून मेघराज राजे भोसले म्हणाले की पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन देखील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी ५ लाख रुपयांचा ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार देत असते. तसेच अ. भा. मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखन आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्रॅफी  यांना प्रत्येकी २५, ००० रु. असे पुरस्कार दिले जातात. यामुळे सर्वोत्कृष्ट देण्याचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रयत्न होत आहे ही समाधानाची बाब आहे असे ते म्हणाले.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून चांगले मराठी चित्रपट निघाले तरी त्यांना थिएटर्स नाही मिळाली व प्रेक्षक नाही मिळाले तर उपयोग काय ? असा सवाल उपस्थित करून मेघराज राजे भोसले म्हणाले की त्यासाठीच शासन अथवा महानगर पालिकांनी मल्टीप्लेक्स उभारावेत व नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करावी. याशिवाय मराठी प्रेक्षकांनी देखील वर्षातून किमान काही मराठी चित्रपट थिएटर्समध्ये बघायचेच असे संकल्प केल्यास मराठी चित्रपटसृष्टीला आधार मिळेल असे ते शेवटी म्हणाले.