मुंबई-काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद मुरली देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे.
गरवारे क्लब आणि मुंबई काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी काँग्रेस पदाधिकार्यांच्या बैठका होत्या. या दोन्ही बैठकांकडे देवरा यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, विनंतीही केली होती. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. देवरा यांनी पक्षीय सीमोल्लंघन करावे, यासाठी एका वजनदार उद्यागपतीने त्यांची मनधरणी केल्याची माहिती आहे. होती. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर देवरा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्ष करण्यास विरोध करणाऱ्या ‘जी 23’ गटाचे सदस्य असलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद मुरली देवरा यांनी अखेरीला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. स्वतः मिलिंद देवरा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. कालपासून मिलिंद देवरा हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
दोनदा खासदार व नंतर दक्षिण मुंबईतून दोनदा पराभूत झालेले देवरा यंदाही याच जागेसाठी आग्रही आहेत. मात्र 10 वर्षांपासूनचे उद्धवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत ही जागा सोडणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. याच कारणावरून देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. देवरा यांचा ओढा भाजपकडे होता. पण महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे भाजपच्या सल्ल्यानुसारच देवरा यांनी शिंदेसेनेचा ‘पर्याय’ स्वीकारल्याचे सांगितले जाते.रविवारी सकाळी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, ”आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ते यांनी अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे”, असे ट्विट देवरा यांनी केले आहे.