Home Blog Page 1204

45 कोटी जनधन खात्यांमध्ये 2.1 लाख कोटी रुपये जमा : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

0

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2024

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज फेडरल बँकेच्या 2024 च्या वार्षिक सरकारी आणि संस्थात्मक व्यवसाय संमेलनाचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, मंत्र्यांनी प्रारंभीच फेडरल बँकेच्या सर्वकालीन उच्च समभाग मूल्यांबद्दल अभिनंदन केले.

याआधीच्या काळात सत्तेवर असलेल्या सरकारची आठवण करून देताना  ठाकूर म्हणाले की, 2014 पूर्वीचे सरकार ‘धोरण लकवा’ साठी ओळखले जात होते. 2014 पासून, सर्व क्षेत्रां‍विषयीच्या उद्देशांमध्‍ये परिवर्तन झाले आहे्. ‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म’ याकडे लक्ष्‍य केंद्रीत केले गेले आहे. बँकिंग क्षेत्र आज कर्जाच्या विळख्‍यातून बाहेर पडले आहे आणि सर्वकालीन उच्च कामगिरीचे प्रदर्शन करीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ जाहीर केली, त्यावेळी सर्वत्र ज्याप्रकरे भावना, कल  व्यक्त होत असे, त्याची आठवण करून देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, अनेकांनी  ही योजना ‘नॉनस्टार्टर’ म्हणून नाकारली होती. परंतु  आज या योजनेंतर्गत 45 कोटी बँक खाती उघडली गेली. याचा  अभिमान सरकारला वाटतो. या जन-धन खात्यांमार्फत 2.1 लाख कोटी रुपयांचा जो निधी जमा झाला आहे, तो  बँकिंग परिसंस्थेचा भाग आहे.

समाजातील प्रत्येक घटकाविषयी उत्तरदायित्व आणि सरकारचा पारदर्शक कारभार, यांचे मिश्रण साधून सरकार कार्यरत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढता आले. तसेच सरकारी योजनांचा लाभ लोकांना मिळत असल्याचा हा पुरावा असल्याचेही ठाकूर यावेळी म्हणाले. ‘जेएएम’ त्रिवेणीच्या अंमलबजावणीमुळे सामाजिक क्षेत्रातील योजनांवर सरकारकडून जितका खर्च केला जातो, तो शंभर टक्के निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे सरकार अभिमानाने जाहीर करू शकते.

सरकार धाडसी निर्णय घेण्‍यासाठी पुढाकार घेत राहील आणि आगामी 5 वर्षांत भारताला अव्वल 3 अर्थव्यवस्थांपैकी एक आणि 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचा निर्धार पूर्ण करेल, अशी ग्वाही मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.   

 सनी लिओनी “पेट्टा रॅप” डान्स नंबरसाठी प्रभुदेवासोबत करणार काम 

 “पेट्टा रॅप” स्पेशल डान्स नंबरमध्ये ही जोडी दिसणार आहे. सनी लिओनी तिच्या फूट टॅपिंग चार्ट साठी प्रसिद्ध आहे आणि ती आणखी एका आकर्षक डान्स मधून प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. यावेळी ती आगामी डान्स नंबर “पेट्टा रॅप” मध्ये डान्स आयकॉन प्रभुदेवासोबत झळकणार आहे. 

नुकताच निर्माते आणि अभिनेत्रीने चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करून याची घोषणा केली आहे. सनीला या नव्या प्रोजेक्ट बद्दल बोलताना म्हणते “आम्ही हा फास्ट बीट नंबर थायलंडमध्ये शूट केला आहे. मी प्रभुदेवा सरांची खूप मोठी चाहती आहे. त्याच्या कामातील नाविन्यपूर्ण पद्धत आणि इलेक्ट्रिक डान्स मूव्ह्ससाठी ओळखले जातात आणि त्याच्याशी माझ्या स्टेप्स जुळवण्याचा मी प्रयत्न करत होते.” 
सनीने दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात प्रवेश केल्याने तिच्या कारकिर्दीतील हा क्षण खास आहे. दिग्गज डान्स आयकॉन सनीच्या जोडीला आणि ही जोडी यावेळी रोमांचक डान्स नंबरसह स्टेजवर काय घेऊन येणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

पुणे, दि. १७: मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व पात्र नाव युवांची १०० टक्के मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्राद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तसेच सर्व महाविद्यालयांना केले आहे.

मतदार यादी हा लोकशाहीचा पाया असून तो सशक्त करण्यासाठी तसेच त्याची गुणवत्ता राखत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक म्हणून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये १०० टक्के मतदार नोंदणी करुन सर्वकष मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेतील नवयुवकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांकडून आवश्यकतेप्रमाणे नवमतदार नोंदणीसाठी नमुना क्र. ६, नाव वागलणीसाठी नमुना क्र. ७ आणि मतदार यादीतील, मतदार कार्डवरील तपशील, नाव यात बदल, सुधारणा करण्यासाठी नमुना क्र. ८, ८-अ भरून घ्यावेत. आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढवत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आवाहनही सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सह मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी,  पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षणाधिकारी, ९५ बिग एफ एम रेडिओ चॅनलच्या कार्यक्रम प्रमुख यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.

देशाच्या विकासासाठी बौद्धिक संपदेचे संरक्षण गरजेचे-अनुजा बापट

‘एमएसएमई’ मंत्रालय व एआयसी पिनॅकल यांच्या वतीने राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रा
पुणे : “भारत हा प्रतिभावान व बुद्धीवानांचा देश आहे. भारतीयांमध्ये नवकल्पना व सर्जनशीलता उपजत आहे. मात्र, या बौद्धिक संपदेचे (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी-आयपी) अधिकार संरक्षित होत नाहीत. देशाच्या विकासासाठी बौद्धिक संपदेचे संरक्षण गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या ‘एमएसएमई’ मंत्रालयाकडून आयपी, पेटंट, कॉपीराईट नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे,” असे केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उप महासंचालक अनुजा बापट यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी – आयपी राईट्स) यात्रेच्या उद्घाटनावेळी अनुजा बापट बोलत होत्या. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (एमसीसीआयए) सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरमचे अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, ‘एमएसएमई’चे (तंत्र व प्रकल्प) संचालक विनम्र मिश्रा, निवृत्त वरिष्ठ पेटंट सहनियंत्रक डॉ. के. एस. कर्दम, एआयसी पिनॅकल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते.
या यात्रेमध्ये ‘वैश्विक दृष्टीकोनातून बौद्धिक संपदा’वर डॉ. नितीन तिवारी, ‘प्रोटेक्टिंग युअर ब्रँड’वर श्रीधर परुंडेकर, ‘इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस ऑन आयपीआर’वर के. एस. कर्दम, डॉ. सुधा कन्नन, डॉ. बी. पी. सोमह, वेदांत पुजारी, डॉ. मोहन दिवाण, परवेज कुड्रोली, ‘आयपीआरचा व्यवसाय वृद्धीवर होणारा परिणाम’वर अजित राऊळ, ‘व्यवसायवाढ आणि स्पर्धात्मकतेसाठीची बौद्धिक संपदा, खोट्या जाहिराती, उल्लंघनाच्या समस्या आणि आव्हाने’वर डॉ. नितीन तिवारी, श्रीधर परुंडेकर, शैलेंद्र भंडारे, ऍड. ऋतुजा मेहेंदळे फडके, तर ‘एआयसी-पिनॅकल आयपी फॅसिलिटेशन सेंटर व बौद्धिक संपदा नोंदीची प्रक्रिया’वर ऍड. पूनम नहार यांनी मार्गदर्शन केले. एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आयपी प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ व्यासायिक, विधिज्ञ, यशस्वी स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.
अनुजा बापट म्हणाल्या, “औद्योगिक व आर्थिक विकासात ‘एमएसएमई’चे योगदान मोठे आहे. इनोव्हेशन व संशोधनाची जोड मिळाल्याने हे छोटे उद्योग क्रांतिकारक कामगिरी करत आहेत. यांच्या इनोव्हेशन व संशोधनाचे अधिकार संरक्षित करण्यासाठी, तसेच आयपी, पेटंट, कॉपीराईट नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयामार्फत अनेक योजना आणल्या जात आहेत. जनजागृतीसाठी आयपी यात्रेचे आयोजन केले जात आहे.”
डॉ. सुधीर मेहता म्हणाले, “बुद्धिवंतांचे शहर असलेल्या पुण्यात मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन होत आहे. याचे संरक्षण करण्यासाठी या बौद्धिक संपदेची नोंद होणे गरजेचे आहे. बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती, सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन, कल्पना आणि इनोव्हेशनचे संरक्षण, प्रगत तंत्रज्ञान अंतर्भूत करून एमएसएमई सक्षम होण्यास यामुळे मदत होईल.”
विनम्र मिश्रा म्हणाले, “बौद्धिक संपदेची नोंदणी करण्याची मानसिकता वाढली आहे. स्टार्टअप्सना देखील एमएसएमईकडे आपले हक्क नोंदवता येणार आहेत. देशातील २० वेगवेगळ्या शहरांतून ही आयपी यात्रा आयोजित करून बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती केली जात आहे. आयपी नोंदणीसाठी ८० पेक्षा अधिक सुविधा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.”
डॉ. के. एस. कर्दम म्हणाले, “काही वर्षांपूर्वी पेटंटबद्दल भारतीयांमध्ये अनभिज्ञता होती. जपान, अमेरिका, चीन यांसारखे देश बौद्धिक संपदेच्या संरक्षित हक्कांच्या जोरावर विकसित झाले आहेत. आपल्याकडे अलीकडच्या याबाबत जागरूकता निर्माण होत असून, अनेक छोटे-मोठे व्यवसाय आयपी व पेटंट नोंद करत आहेत.”
 सुनील धाडीवाल यांनी स्वागत प्रास्ताविक केले. श्रद्धा सप्तर्षी यांनी सूत्रसंचालन केले.

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना झापले,म्हणाले,’ जितेंद्र आव्हाड हे तुमच्याहून मोठे:​​​​​​​त्यांनी काय बोलावे याविषयी कुणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही

0

सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंत काय काम केले हे लोकांना सांगावे…

पुणे- जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचे घर फोडल्याच्या राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या टीकेला स्वतः शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड हे धनंजय मुंडे यांच्या पूर्वीपासून पक्षात काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी काय बोलावे हे कुणीही सांगण्याची गरज नाही. तसे कुणी मार्गदर्शन करण्याचीही गरज नाही, असे पवार यांनी मुंडे यांना फटकारत म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर पवारांचे घर फोडण्याचा आरोप केला होता. जितेंद्र आव्हाड यांनी खऱ्या अर्थाने पवारांचे घर फोडण्याचे आणि शरद व अजित पवारांमध्ये अंतर आणण्याचे काम केले. याचे पुरावे देण्यासाठी माझ्यासह अनेकजण पुढे येतील. आव्हाड हे जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांना बाजूला सारून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले होते.

धनंजय मुंडे यांच्या या आरोपांना स्वतः शरद पवार यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले. धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीत जेवढा कालखंड गेला, त्याच्या पूर्वीपासून जितेंद्र आव्हाड हे पक्षासाठी काम करत आहेत. आव्हाड यांनी राज्यच नव्हे तर देश पातळीवरही काम केले आहे. ते आमदार व मंत्रीही राहिलेत. त्यांचा अनुभव प्रदिर्घ आहे. त्यामुळे त्यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाड यांनी वेगळी भूमिका घेतली नाही. त्यामुळे आव्हाड यांनी काय बोलावे याविषयी अन्य लोकांनी मार्गदर्शन करण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना फटकारत म्हटले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आव्हान देण्याची शक्यता आहे. याविषयी शरद पवार यांना छेडले असता त्यांनी लोकशाहीत सर्वांनाच कुठूनही निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. लोकशाहीत निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कुणी अधिकार गाजवत असेल तर तक्रार करण्याची गरज नाही. आपली भूमिका लोकांपुढे मांडावी. आपण काय काम केले हे लोकांना सांगावे. आम्ही मागील 50 वर्षांत अनेक संस्था उभ्या केल्या. आम्ही ज्या काळात या संस्था स्थापन केल्या त्यावेळी आज आरोप करणाऱ्यांचे वय काय होते, याचे कॅल्क्युलेशन त्यांनी करावे. त्याचा विचार करावा. तुम्ही जरूर उभे राहा. तो तुमचा अधिकारच आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी यावेळी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. साधी सरळ गोष्ट आहे. संसदेत भाजपचे बहुमत आहे. त्यांनी विरोधी पक्षाशी चर्चा करावी. सरकारने धनगर, मुस्लिम व लिंगायतांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणला तर विरोधक निश्चितच त्यांना सहकार्य करतील. यात कोणताही संशय नाही. असे असताना कोर्टात वेगळी भूमिका मांडणे म्हणजे या घटकांना आरक्षण न देण्याचे धोरण आहे. त्यामुळेच या वर्गावर अन्याय करणारा निकाल आला आहे, असे शरद पवार म्हणाले.

निखील वागळेंंवर खुनी हल्ला झालेला नाही -पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुढारीच्या पत्रकाराला पोलिसांनी केलेय धक्काबुक्कीबाबत कारवाई झालेली आहे,हवे तर पुन्हा रिव्हिजन घेऊ

mymarathi.netपुणे- निखील वागळे यांनी पोलिसांच्या सूचना ऐकल्या नाहीत म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला पण तिथेही पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी होतेच त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली ,पण याचा अर्थ हल्लेखोरांना निखील वागळे यांचा खून करायचा होता किंवा त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला असे म्हणता येणार नाही असा स्पष्ट दावा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीनगर येथे आयोजित पाण्याच्या टाकीच्या कार्यक्रमात पुढारी च्या वार्ताहराला पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की संदर्भात योग्य कार्यवाही झालेली आहे हवे असल्यास आपण पुन्हा त्याबाबत पुनर्परीक्ष्ण करू असे ते म्हणाले.

ससून मधून पळालेल्या मार्शल लुईसला अखेर पकडला

पुणे-

गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी देणाऱ्या  तसेच ससुन हॉस्पिटल येथून पळून जाणाऱ्या मार्शल लुईस लीलाकर याला आज अटक करण्यात आली. त्याला येरवडा येथून त्याच्या मावशीच्या घरातून अटक करण्यात आली, ही कामगिरी सायबर पोलीस स्टेशनने केली. 

लुईस याला स्वाती मोहोळ यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 11 फेब्रुवारी रोजी तो उपचारादरम्यान ससुन हॉस्पिटल येथून पळून गेला. क्राईम ब्रँच तसेच सायबर पोलीस स्टेशन कडून शोध चालू होता. आरोपीच्या तपासासाठी नेरळ व कर्जत येथे तपास पथके रवाना करण्यात आली होती.आज तो मावशीला भेटायला आला असता तेथे अगोदरच तैनात असलेल्या सायबर पोलीस स्टेशनच्या स्टाफने त्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर नंबर 44 /2024 कलम 224 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सायबर पोलिसानी त्याला बंडगार्डन पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

पुण्यात तीन वाहनांचा अपघात,कारने घेतला पेट, तिघांचा आगीत होरपळून मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

पुणे-पुण्यात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे हा विचित्र अपघात झाला आहे. मृत्यू झालेले तिघे जण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याची माहिती आहे.

पुणे – नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये आधी जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर धडक होताच स्विफ्ट कारने पेट घेतला. या आगीत कारमधील तिघांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने कारचा चालक आणि टेम्पोचा चालक अपघातातून थोडक्यात बचावले.

अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कार‌ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अजून मिळाली नाही. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.दरम्यान, पहाटे झालेल्या या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मंचरमधील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर असलेली अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. त्यानंतर पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्विफ्ट कार तर संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.

भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत भांडवल 10,000 कोटी रुपयांवरुन वाढवून 21,000 कोटी रुपये

0

नवी दिल्‍ली, 17 फेब्रुवारी 2024

देशातील कृषी क्षेत्राला चालना देणे आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या हिताची खातरजमा करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, भारत सरकारने एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत भांडवल 10,000 कोटी रुपयांवरुन वाढवून 21,000 कोटी रुपये केले आहे. या धोरणात्मक पावलातून शेतकऱ्यांना पाठबळ पुरवण्याप्रती तसेच भारताची कृषीविषयक अर्थव्यवस्था मजबूत करण्याप्रती सरकारची खंबीर वचनबद्धता दर्शवते.

भारताच्या अन्न सुरक्षाविषयक रचनेचा आधारस्तंभ म्हणून एफसीआय किमान आधारभूत मूल्याने (एमएसपी) धान्याची खरेदी, अन्नधान्याच्या धोरणात्मक साठ्याची देखभाल, राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना धान्याचे वितरण तसेच बाजारपेठेत धान्यांच्या किंमतींचे स्थिरीकरण अशा कृषीसंबंधी विविध महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असते.

अधिकृत भांडवलात करण्यात आलेली वाढ म्हणजे ही कार्ये परिणामकारकरीत्या पार पाडण्याच्या दृष्टीने एफसीआयच्या परिचालनात्मक क्षमता वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. उपलब्ध निधी आणि निधीची गरज यांमधील तफावत भरून काढण्यासाठी एफसीआय रोख कर्ज, कमी मुदतीची कर्जे देण्याबरोबरच विविध मार्ग तसेच साधनांचा वापर करत असते. अधिकृत भांडवलातील वाढ तसेच आणखी निधीची भर घातल्यामुळे व्याजाचा भार कमी होईल, त्यातून आर्थिक खर्च कमी होऊन भारत सरकारच्या अनुदानावर सकारात्मक परिणाम होईल. या भांडवलवाढीमुळे एफसीआयला साठवण सुविधांचे आधुनिकीकरण, वाहतुकीचे जाळे सुधारणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानांचा स्वीकार करणे या गोष्टींची सुरुवात करता येईल. केवळ कापणी-पश्चात हानी कमी करण्यासाठीच नव्हे तर ग्राहकांना अन्नधान्याचे वितरण अधिक कार्यक्षमतेने होण्याची खातरजमा करण्यासाठी देखील या उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. 

खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी भारत सरकार एफसीआयला इक्विटी देत असते. एकात्मिक माहिती तंत्रज्ञान प्रणाली उभारणे, विद्यमान अंतर्गत व्यवस्था (एफएपी, एचआरएमएस) तसेच बाह्य यंत्रणा (राज्यांची खरेदी पोर्टल्स, सीडब्ल्यूसीज/ एसडब्ल्यूसीज) यांचा योग्य वापर करून घेण्यासाठी व्यापक उपक्रम हाती घेणार आहे. ई-कार्यालय उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे एफसीआय यापूर्वीच कागदाचा कमी वापर करणारी संस्था झाली आहे. एकात्मिक माहिती तंत्रज्ञान प्रणालीविषयक उपक्रम हा एफसीआय साठी मध्यवर्ती परिचालन विषयक सॉफ्टवेअर म्हणून काम करतो आणि त्यातून सामायिक डिजिटल व्यवस्थेच्या आधारासह माहितीचा एकल स्त्रोत उपलब्ध करून देतो आणि  सर्व कार्ये सुरळीत चालतील याची व्यवस्था करतो.  

कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून एफसीआय अत्यंत परिश्रमपूर्वक सिमेंटचे रस्ते तसेच छताची देखभाल, प्रकाश व्यवस्था, वेब्रिजचे अद्ययावतीकरण, अन्न सुरक्षेत सुधारणा इत्यादी कार्ये करत आहे. प्रयोगशाळेत आवश्यक असलेल्या उपकरणांची खरेदी आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रयोगशाळांसाठी सॉफ्टवेअर मंच विकसित करणे यातून गुणवत्तेच्या तपासणीची प्रक्रिया सुधारण्याचे उद्दिष्ट दिसून येते. “आउट टर्न गुणोत्तर,” “साठवण कालावधी” आणि “पोषणमूल्ये वाढवलेल्या तांदळासाठी कीटक व्यवस्थापन” यांच्या संदर्भातील अभ्यासांनी एफसीआयची कार्यक्षम आणि अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली उभारण्याप्रती वचनबद्धता दिसून येते. स्वयंचलित डिजिटल साधनांचा समावेश एफसीआयच्या उद्दिष्टांना अनुसरून असून पारदर्शक खरेदी यंत्रणेसाठी मानवी हस्तक्षेप काढून टाकणे तसेच कर्मचाऱ्यांसाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करुन, भाडेकरारावरील खर्चाची बचत आणि एफसीआयसाठी मालमत्ता निर्मिती करणे हे त्याचे उद्देश आहेत.

किमान हमी भावावर आधारित खरेदी आणि एफसीआयच्या परिचालनात्मक क्षमतांमध्ये गुंतवणूक या सरकारच्या दुहेरी वचनबद्धता असून त्यातून शेतकऱ्यांना सक्षम करणे, कृषी क्षेत्राला बळकटी देणे आणि देशासाठी अन्न सुरक्षेची सुनिश्चिती करणे यासाठीचे सहयोगात्मक प्रयत्न दिसून येतात. या उपाययोजनांनी मूळ धरले की भारताला शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषीक्षेत्रासाठी अधिक लवचिक आणि समृद्ध भविष्याची अपेक्षा ठेवता येईल.

अन्न सुरक्षेतील एफसीआयची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य करत केंद्र सरकार वेळोवेळी एफसीआय तसेच विहित केंद्रीय कोषातील राज्यांकडील अन्नधान्याच्या साठ्याची धोरणात्मक पातळी निश्चित करत असते. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या विपरीत परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने एफसीआय अत्यंत कसोशीने या नियमांचे पालन करून अन्नाशी संबंधित आव्हानांप्रती देशाची लवचिकता सुनिश्चित करते.

तोतया नव्हे खऱ्या पोलिसांनीच लुटले हवालाचे ४५ लाख: २ वर्षानंतर तीन पोलीस बडतर्फ …

पुणे-8 मार्च 2022 रोजी मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडी जवळ दिवे गावात एक कार अडवून सदर कारचालकास तीन जणांनी पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधीत गाडीतील हवालाचे ४५ लाख रुपये घेऊन सदर कर्मचारी पसार झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणाच्या चौकशीत पोलिस शिपाई गणेश मारुती कांबळे, दिलीप मारुती पिलाणे व गणेश बाळासाहेब शिंदे हे तिघे दोषी आढळल्याने त्यांच्यावर अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी पोलिस दलाच्या सेवेतून बडतर्फीची कारवाई केली आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश कांबळे, दिलीप पिलाणे व गणेश शिंदे या तीघांवर नारपोली पोलिस ​ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर तिघांना पोलिस पदावरुन निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरु असताना, त्यात संबधित तिघे हे दोषी आढळल्याने त्यांच्यावर बडतर्फ कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यात ते नेमणुकीस असताना, 8 मार्च २०२२ रोजी ते साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी दिलीप पिलाणे याच्या बहिणीचा घरी धार्मिक कार्यक्रम असल्याचे कारण सांगून पुण्यातून दिवे येथे ते बाबुभाई सोळंकी यांच्यासह गेले होते. प्रवासा दरम्यान बाबुबाई सोळंकी यांना त्यांचे भावाचा फोन आला होता.

त्याद्वारे गणेश कांबळे याला समजले कि , बाबुभाई सोळंकी यांच्याकडून हवालाचे पैसे हे औरंगाबादहून नाशिक मार्ग ठाणे येथे जाणार आहे.ड त्यानुसार, त्याने दिलीप पिलाणे व गणेश शिंदे यांच्यासोबत संगनमत करुन भिवंडी जवळील दिवे गावात रामलाल परमार याची हवालाचे पैसे घेऊन जाणारी गाडी अडवली. पोलिस असल्याचे सांगून गाडीची झडती घेण्याचे नावाखाली त्यांनी कारवाई करण्याची धमकी देत गाडीतील ४५ लाख रुपये घेऊन तेथून पसार झाले. त्यानंतर याबाबत नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

विभागीय चौकशीत गणेश शिंदे याने प्रशिक्षिण काळात साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही त्यामुळे साप्ताहिक सुट्टी घेतो असे खोटे कारण सांगून सुट्टीत घेत दीवे येथे जाऊन हा गुन्हा साथीदारांचे मदतीने केला. गणेश कांबळे याने तो आजारी नसताना देखील तो आजारी असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकांची दिशाभूल करुन सुट्टीचा पास मिळवला. तर दिलीप पिलाणे याने पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन भिवंडीला जात हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकारामुळे समजात पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याप्रकरणात आणखी काही वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी असल्याची पोलिस दलात चर्चा असून त्यांचेवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मनोहर जोशींचे घर जाळण्यासाठी माणसं पाठवले:रामदास कदमांचा कार्यक्रम करण्याचे कटकारस्थान रचले; शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

कोल्हापूर-शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री असताना व्यासपिठावरून खाली उतरवले, त्यांचे घर जाळण्यासाठी माणसं पाठवले तर रामदास कदम यांचा देखील कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी कटकारस्थान रचले असा व्यक्ती नेता कसा असू शकतो, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते कोल्हापूरात शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, अहो काही लोकांना आयत्या पीठावर देखील नीट रेगोट्या मारता आल्या नाहीत, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर व्यासपिठावरून खाली उतरणवण्यात कोणाचे कारस्थान आहे. मनोहर जोशी यांचे घर जाळण्यासाठी माणसं पाठवणामागे कोणी कट रचला होता. दुसरी बाब म्हणजे, रामदास भाई कदम यांना देखील मी सांगितले होते की, तुम्ही शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी षनमुखानंद सभागृहात येऊ नका, कारण तुमचा देखील मनोहर पंत करण्याचा प्लॅन करण्यात आलेला आहे. हे सर्व गज्याभाऊ यांना देखील माहित आहे. गजानन कीर्तिकर यांना देखील अनेकदा माघारी पाठवले गेले. सुडाचे राजकारण केले जात होते, असा कोणी नेता असतो का? असा सवाल शिंदे यांनी करत ठाकरेंवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, एखादा कार्यकर्ता बोलायला लागला, चांगले भाषण करायला लागला तर त्याचे भाषण कट केले जात होते. गुलाबराव पाटील, रामदासभाई असे अनेक नावं आहेत. चांगले नेतृत्व व वक्तृत्व करत असेल होते. पण त्यांना संपवण्याचे काम सुरू झाले होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन चार टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. कुठली निवडणूक जिंकलो तर मला ठाकरे म्हणाले की, तुमच्यासाखरे तीन चार एकनाथ शिंदे पाहिजे. पण त्यांना प्रामाणिकपणे सांगितले एकना शिंदे नको तर ताकदीचे ताकदीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात तयार केले पाहिजे, तेव्हाच पक्ष मोठा होईल.

ते म्हणाले की, शरद पवार म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हे मला ते सांगत होते तेव्हा रडवेला चेहरा होता. तेव्हा जाणवले यांना मोह झाला आहे. मी कधीच पदाला हापापलो नव्हतो, त्यांनी मला आधीच सांगितले असते तर मी तसा माहोल तयार केला असता. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत, एक चेहरे पे कई चेहरे लोग लगाते है लोग. माझा आवाज असा बंद करु नका तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत.

लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही निलम ताई सांगतील. मविआसोबत दिल्लीला गेले होते मोदींना भेटायला तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये मोदींना भेटायला गेले आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, जय श्रीराम म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात केली. लवकरच आपण सर्व अयोध्येला जायचं आहे. या महाअधिवेशनामुळे कोल्हापुरात भगवं वादळ आलं आहे. शिवसैनिकांचे शक्तीपीठ या अधिवेशनाच्या निमित्ताने अवतरलं आहे. अंबाबाईचे दर्शन घेवूनच बाळासाहेब सभेला सुरुवात करायचे आपणही तेच केले. बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेवुन जातोय म्हणून ही आज शिवसेना आहे. या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. एकनाथ शिंदे डरपोक नाही, हा निधड्या छातीचा चेला असल्याचे म्हणाले.

कृषी निर्यात 26.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली..

0

नवी दिल्ली-

अपेडा अर्थात कृषी तसेच प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने सक्रीय हस्तक्षेपामुळे देशातील कृषीमालाच्या निर्यातीने आर्थिक वर्ष 1987-88 मधील 0.6 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित वार्षिक निर्यातीपासून मोठी उसळी घेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 26.7 अब्ज डॉलर्सची उल्लेखनीय आकडेवारी गाठली आहे. निर्यातवाढीत गुणाकाराने होणारी ही वाढ 200 पेक्षा अधिक देशांमधील निर्यातविषयक विस्ताराने अधोरेखित झाली असून, त्यातून 12% चा स्तुत्य वार्षिक चक्रवाढ दर (सीएजीआर) गाठण्यात देशाला यश आले आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली असून देशाच्या या एकूण कृषीनिर्यातीमध्ये अपेडाचे  51% चे लक्षणीय योगदान आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये अपेडाच्या निर्यात विभागातील 23 प्रमुख कृषी उत्पादनांपैकी (पीसीज) 18 उत्पादनांनी सकारात्मक वाढ दर्शवली. उल्लेखनीय बाब अशी की, 15 मोठ्या पीसीज पैकी ज्या 13 उत्पादनांची निर्यात 100 दशलक्ष डॉलर्सहून अधिक होती त्यांनी 12 %च्या सरासरी वृद्धी दरासह सकारात्मक वाढ दर्शवली. ताज्या फळांच्या विभागाने 29% ची उल्लेखनीय वाढ नोंदवत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याशिवाय, प्रक्रियायुक्त भाज्यांच्या निर्यातीने या काळात 24%ची वाढ नोंदवली असून विविध प्रक्रियायुक्त वस्तू, बासमती तांदूळ आणि ताज्या भाज्यांच्या निर्यातीमध्ये देखील  गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. विशेष म्हणजे भारताने ताज्या फळांच्या निर्यातीची कक्षा महत्त्वपूर्ण पद्धतीने विस्तारली असून, गेल्या वर्षी 102 देशांमध्ये ताज्या फळांची निर्यात होत होती, त्या तुलनेत यावर्षी 111 देशांमध्ये ही निर्यात होते आहे.
अपेडाने दिनांक 13.02.2024 रोजी 38 वा स्थापना दिन साजरा केला.त्यानिमित्त कृषी निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या उल्लेखनीय प्रवासातून अपेडाने गाठलेले महत्त्वाचे टप्पे आणि अभूतपूर्व वाढीचे सादरीकरण करण्यात आले. कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसह वर्ष 1986 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने भारताच्या कृषी निर्यातीला नवी उंची  गाठण्यासाठी झेप घेण्यात निर्णायक शक्ती म्हणून स्वतःला सिध्द केले आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या काळात अनेक महत्त्वाच्या उत्पादनांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली, ही उत्पादने पुढीलप्रमाणे आहेत- केळी:63%,  कडधान्ये (वाळवलेली आणि साले काढलेली): 110%, ताजी अंडी: 160%, केसर तसेच दशहरी आंबा: अनुक्रमे 120% आणि 140%.


एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत बासमती तांदळाचे निर्यात मूल्य 19%नी वाढले आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 3.33 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 3.97 अब्ज डॉलर्सवर पोहोचले.त्यासोबतच, निर्यातीचे प्रमाण 11 %ची लक्षणीय वाढ नोंदवत गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 31.98 लाख टनांवरून यावर्षी 35.43 लाख टनांवर पोहोचले. देशातील बासमती तांदळाने जगातील प्रमुख बाजारपेठांमध्ये स्थान मिळवले असून इराण, इराक,सौदी अरेबिया, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात या पाच देशांमध्ये बासमती तांदळाची सर्वोच्च प्रमाणात निर्यात झाली आहे.ही सशक्त कामगिरी भारताच्या बासमती तांदळाची टिकाऊ लोकप्रियता आणि जागतिक मागणी अधोरेखित करते, तसेच भारताच्या निर्यातविषयक सूचीमध्ये प्रमुख कृषी उत्पादन म्हणून या तांदळाचे स्थान बळकट करते.

पुणे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवुन देण्याची धमकी देणाऱ्या हडपसरच्या इलेक्ट्रिशिअन ला १२ तासात पकडले

पुणे-पुणे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवुन देण्याची धमकी देणाऱ्या हडपसरच्या इलेक्ट्रिशिअन ला 12 तासातच पुणे पोलिसांनी पकडले. प्रविण पंडीत येशी वय ३५ वर्षे व्यवसाय इलेक्ट्रीशन रा. गंगोत्री कॉम्पलेक्स, महादेवनगर, मांजरी रोड, हडपसर असे या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. १६ फेब्रुवारी २४ रोजी दुपारी पावणेदोन वाजता पोलिसांना फोन करून त्याने ,आपण आज सायंकाळी ५ वाजता पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली होती.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’ दिनांक १६/०२/२०२४ रोजी १३/४४ वा. डायल ११२ नंबरवर अनोळखी इसमाने त्याचे मोबाईल नंबर वरुन फोन करुन सायंकाळी १७/०० वा. पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन सरकारी यंत्रणेला वेठीस धरले म्हणुन पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे शहर येथील महिला पोलीस अंमलदार कल्पना घरजाळे यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरुन बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५१/२०२४ भा.द.वि.कलम १८२ (ब). ५०६(२),५०५ (ब),५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक लोहार यांचेकडे देण्यात आला.
यातील आरोपीचे कॉलवरुन तात्काळ दखल घेऊन बंडगार्डन पोलीस स्टेशनकडुन बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया मुंबई व पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, यांचा समावेश असल्याने तेथील पोलिस आयुक्तालय यांना तात्काळ कळवुन बी.डी.डी. एस. पथकाकडून पुणे रेल्वे स्टेशन व शिवाजीनगर परीसराची तपासणी करण्यात आली परंतु संशयीत काही एक मिळुन आले नाही. तसेच यातील आरोपीचा शोध घेणेसाठी तात्काळ २ पथके तयार करुन त्यांनी यातील आरोपीचे मोबाईल नंबर वरुन सदर आरोपीचा हडपसर पोलीस स्टेशनचे स्टाफचे मदतीने शोध घेतला असता आरोपी प्रविण पंडीत येशी वय ३५ वर्षे व्यवसाय इलेक्ट्रीशन रा. गंगोत्री कॉम्पलेक्स, महादेवनगर, मांजरी रोड, हडपसर, पुणे याला दिनांक १७/०२/२०२४ रोजी ००/३० वा. अटक करण्यात आलेली आहे. त्याचेकडे प्रथमदर्शनी केलेले तपासामध्ये त्याने सदरचे केलेले कृत्य हे कौटुंबीक कलहातुन आलेल्या नैराश्यामधुन केल्याचे सांगीतले आहे. या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आणखी सखोल तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, प्रविणकुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे शहर संजय सुर्वे, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे व.पो.नि संदिपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पो. अंमलदार घडे, पुराणे व म.पो.अं. रोमण यांचे पथकाने केली.

खवले मांजराच्या तस्करीप्रकरणी ६ आरोपींना वनकोठडी

पुणे, दि. १६: जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे मंगळवारी (दि. १३) खवले मांजर (इंडियन पँगोलीन) या शेड्युल १ मधील वन्यप्राण्याची तस्करी केल्या प्रकरणात ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी ६ आरोपींना १७ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रोहीदास पंढरीनाथ कुळेकर वय ५५ वर्ष, कांताराम सखाराम वाजे वय ४९ वर्ष दोघे रा. भोमाळे (ता. खेड), सखाराम बबन मराडे वय ४३ वर्ष, रा. पाभे (ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे वय ३१ वर्ष, रा. तळेराण (ता. जुन्नर), जालिंदर कान्डु कशाळे वय ६५ वर्ष, रा. बडेश्वर (ता. मावळ), श्रीमती गीता नंदकुमार जगदाळे रा. चव्हाणवस्ती कुमठे (ता. कोरेगाव जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर वय ३२ वर्ष, रा. करंजाळे (ता. जुन्नर) असे एकूण ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी ६ आरोपीना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.

ही कार्यवाही पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली.

वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर १९२६ या क्रमांकावर संर्पक साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक श्री. पाटील यांनी केले आहे.

श्रमिक नगर येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन

पुणे, दि. १६ : भोसरी विधानसभा मतदार संघ आणि समाज कल्याण विभागाच्यावतीने श्रमिक नगर, तळवडे येथे तृतीयपंथी वर्गासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मोहिमेअंतर्गत १८ नवमतदारांकडून नमुना क्र.६ चे अर्ज भरून घेण्यात आले.

नायब तहसिलदार अर्पणा देशपांडे यांनी नमुना क्रमांक ६, ७, व ८ चे अर्ज भरणे आणि त्यासोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्राविषयी माहिती दिली. तसेच मुक्त व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तृतीयपंथी मतदारांना ईव्हीएम यंत्राबाबत माहिती व्हावी यासाठी मतदानयंत्र हाताळणीबाबत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.

मोहिमेअंतर्गत एकूण ७३ नागरिकांनी मतदान प्रात्याक्षिकात सहभाग घेतला. १८ नागरिकांचे नमुना क्रमांक ६ व २ मतदारांचे नमुना क्रमांक ८ चे अर्ज भरून घेण्यात आले.यावेळी दिलीप करदुरे, सिओना साळवे आदी उपस्थित होते.

अर्चना तांबे, स्वीप नोडल अधिकारी- मतदार जागृतीसाठी विविध स्तरावर जनजागृती मोहिम आयोजित करण्यात येत आहे. अधिकाधिक तृतीयपंथीयांनी मतदारांनी मतदान नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा तसेच ईव्हीएम हाताळण्याविषयी प्रात्याक्षिकात सहभाग घ्यावा.