Home Blog Page 1205

मिळालेली भूमिका आनंदाने स्वीकारणे हेच आनंदी जीवनाचे रहस्य – अनिल कातळे

अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

पिंपरी, पुणे – ”परमेश्वराने पृथ्वीतलावर पाठवताना प्रत्येकाची भूमिका ठरवलेली असते. त्याप्रमाणे आपली ज्या भूमिकेसाठी निवड केली, ती भूमिका आनंदाने स्वीकारणे हेच आनंदी जीवनाचे रहस्य असल्याचे मत पत्रकार अनिल कातळे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
ओतुर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ‘आनंदी जीवनाचे रहस्य’ या विषयावर कातळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मेळाव्याला सुरुवात झाली. या माजी विद्यार्थी मेळाव्यात सन १९९० मधील वाणिज्य शाखेचे मुंबई, नवी मुंबई, पालघर, पुणे, पिंपरी चिंचवड, जुन्नर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी बहुसंख्येने होते.
कातळे पुढे म्हणाले की, ”आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही – ना काही कमतरता असते. त्या कमतरतेमुळे खचून, डगमगून न जाता आपल्याला जीवनाचा खेळ खेळावाच लागतो. आयुष्याची खरी किंमत तेंव्हाच कळते, जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते. जी माणसे स्वतःच्या अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात आलेल्या परिस्थिती कडे संधी म्हणून सामोरे जातात ते कधीच दुःखी होत नाहीत. त्यामुळे आयुष्याची वाटचाल करताना येणा-या प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना करावा असेही कातळे यांनी सांगितले.
या स्नेहमेळाव्याचे अध्यक्ष ॲड. सलीम पटेल तसेच गबाजी गाडेकर, राजेंद्र कुंजीर, लक्ष्मण गटकळ, समाधान तांबे, शर्मिला खर्गे, आरती गटकळ, मंगेश डुंबरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भूतकाळातील आठवणींना उजाळा देत आपले अनुभव आणि विचारांचे आदान-प्रदान केले. आयुष्यात आलेले चढ, उतार, कडू, गोड आठवींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. सहभागी विद्यार्थ्यांचा फेटा बांधून तसेच पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
शायर सलीम पटेल यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. वंदना गावडे, मंगेश डुंबरे, शांता रोकडे, सतीश थोरात, मनीषा कासवा, आरती गटकळ, पांडुरंग शिंदे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. सुरवातीला हयात नसलेल्या सहका-यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक बाळासाहेब वाळूंज, सूत्रसंचालन उद्योजक उल्हास पानसरे यांनी आणि पत्रकार रोहित खर्गे यांनी आभार मानले.

एसबीपीआयएम आयोजित ‘युवोत्सव २०२४’ क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. १६ फेब्रुवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील एसबीपीआयएम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘युवोत्सव २०२४’ क्रीडा स्पर्धांचे गुरुवारी (दि.१५) विविध महाविद्यालयीन खेळाडूंच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात उद्घाटन झाले. या स्पर्धेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि सातारा येथील हॉलीबॉल २४ संघ, फुटबॉल ३० आणि क्रिकेट ३२ संघांनी सहभाग घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग प्रमुख मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे मनुष्यबळ अधिकारी विनोद बिडवाईक आणि व्यवस्थापक श्यामसुंदर मादेवार, एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर आदींसह स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयातील खेळाडू उपस्थित होते.
गुरुवारी झालेल्या हॉलीबॉल च्या उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये एमआयटी महाविद्यालयाने पी. एस. मॉडर्न महाविद्यालयाचा २५ विरुद्ध २० अशा गुणांनी पराभव केला.
क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रतिभा महाविद्यालयावर पुणे बिजनेस स्कूलच्या संघाने एक रन ने विजय मिळवला.
फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंदिरा इन्स्टिट्यूट एमबीए संघाने पीसीसीओईच्या संघावर दोन गोलच्या फरकाने विजय मिळवला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत डॉ. अमरीश कुमार कवीया आणि डॉ. काजल माहेश्वरी आणि विद्यार्थी प्रतिनिधी मयूर मराठे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी येथील शाळेत दोन दिवसीय प्रदर्शन

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन

पिंपरी, पुणे (दि १६ फेब्रुवारी २०२४) शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी येथील इंग्रजी व मराठी माध्यम शाळेत संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि.१७) सकाळी १० वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनास सर्वांना विनामूल्य प्रवेश असून या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध दालनास पालक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी भेट देऊन मनसोक्त खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांनी केले आहे.
याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणादायी पुस्तके, गोविज्ञान व आधारित वस्तू आणि त्यावरील पुस्तके तसेच विविध प्रकारची झाडे यांचे प्रदर्शन व विक्री दालने थाटण्यात आली आहेत. विद्यार्थी व प्रेक्षकांसाठी खाऊ गल्लीत विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजता या प्रदर्शनाचा समारोप होणारा आहे अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्यकारणीची रविवारी निगडी येथे बैठक

0

पिंपरी, पुणे (दि. १६ फेब्रुवारी २०२४) अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी निगडी येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आर. एस. कुमार यांच्या हस्ते होणार असून महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष मोहिनीताई पत्की बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
अशी माहिती पिंपरी चिंचवड अध्यक्ष सचिन कुलकर्णी व कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
निगडी, प्राधिकरण येथील विदर्भ सहयोग मंडळ येथे रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजता या बैठकीचे उद्घाटन होणार असून राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश निमंत्रक मधुसूदन मुळे, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, राष्ट्रीय सरचिटणीस विलास कौसडीकर, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन आदी निमंत्रक म्हणून सहभागी होणार आहेत.
मोहिनीताई पत्की व डॉ. गोविंदराव कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शन करणार असून सत्यजित कुलकर्णी हे आगामी ब्रह्म उद्योगाबद्दल स्टार्टअप कॉनक्लेव्ह वृत्त माहिती सादर करणार आहेत.
दुपारच्या सत्रात प्रदेश पदाधिकारी मनोगत व्यक्त करणार असून जिल्हा निहाय अहवाल सादर करण्यात येणार आहेत.

निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक,शिवराळ भाषेत आरडाओरडा,पोलीस यंत्रणेच्या अपयशामुळे राडा

गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांच्या गुहागरमधील सभेची जोरदार जाहिरातबाजी केली जात होती. सोशल मीडियावर या सभेचे टिझर प्रदर्शित केले जात होते. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीतरी होऊ शकते, अशी शक्यता होती. त्यादृष्टीने या भागात पोलीस कुमकही तैनात करण्यात आली होती. भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्यात जुने वैर आहे. त्यामुळे आज राडा होण्याची शक्यता असूनही पोलिसांनी चिपळूणमध्ये पुरेशी खबरदारी घेतली. पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरच निलेश राणे यांचे स्वागत करण्याची परवानगी भाजप कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळेच भास्कर जाधव गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्याचे पर्यवसन राड्यात झाले, असे सांगितले जात आहे. 

गुहागर-भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर नीलेश राणे यांचा ताफा आला. जाधवांच्या कार्यालयाबाहेर राणेंच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा जंगी सत्कार करण्यात येणार होता. मात्र याच वेळी जाधव आणि राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून कार्यकर्त्यांकडून दगडफेकही करण्यात आली.

नीलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला.

नीलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून नीलेश राणे यांनी गुहागमध्ये आज सभेचं आयोजन केलं होतं.

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, गुहागरमध्ये टीझर व्हायरल करून लोकांना उकसवण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्याला माफी नाही, हिशेब चुकता करणार, अशा आशयाचे बॅनरही लावण्यात आले होते. मात्र आम्ही कुणाच्याही झेंड्याला बॅनरला हात लावायचा नाही, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यामुळे आम्ही कुणाही त्यांच्या झेंड्याला हात लावला नाही. हीच आमच्या गुहागरची संस्कृती असल्याचेही जाधव म्हणाले.

जाधव पुढे म्हणाले की, ते जाणीवपूर्वक चिपळूणमधून आले. त्यांना समर्थकांच्या हातून सत्कार करायचा होता. त्यामुळे मी पोलिसांना आधीच अलर्ट केले होते. त्यांचा सत्कार माझ्या कार्यालयासमोर करण्यात आला. त्यांच्या स्वागतासाठी क्रेन लावली होती. ती जाणीवपूर्वक माझ्या ऑफिससमोर आणण्यात आली.

सर्वांनी शांततेने मागे फिरण्याची मी मागणी केली होती. त्याचवेळी सत्कार करण्यात आला आणि आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे समर्थक पुन्हा आमच्यापुढे नाचत गात आले. आमच्या समर्थकांना उकसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही बाजूकडून दगडफेक करण्यात आल्याचं जाधवांनी सांगितलं.

जाणीवपूर्वक हातवारे करून त्यांनीच दगडफेक केली. आमच्याकडुनही दगडफेक झाल्याचंही भास्कर जाधव म्हणाले. तुम्ही त्यांना मिरवणूक का काढू दिली, असा सवाल पोलिसांना जाधवांनी केला.

दगडफेक होताच निलेश राणे संतापून गाडीतून खाली उतरले

निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या परिसरात आला. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि मारामारी झाली. भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. यादरम्यान एक दगड निलेश राणे यांच्या गाडीवर पडला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने निलेश राणे संतापले.  त्यांनी गाडीतून खाली उतरून भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा राडा होण्याची चिन्हे दिसत होती. अखेर कार्यकर्त्यांनी समजूत घातल्यानंतर निलेश राणे गुहागरमध्ये सभेच्या दिशेने रवाना झाले. मात्र, आता सभा संपल्यानंतर निलेश राणे पुन्हा याठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे आज रात्री चिपळूणमध्ये पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे.

हडपसर मध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम

पुणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती सामन्याचा उदघाट्न समारंभ शुक्रवारी थाटामाटात संपन्न झाला. प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन, अप्पर पोलीस अधिक्षक ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, हिंदकेसरी अभिजीत कटके, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, चार दिवसीय पार पडत असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे, लोकाश्रय असणाऱ्या कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी तसेच मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी रांगड्या मातीतील हे सामने आयोजित करण्यात आल्याचे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले, तब्बल 600 मल्ल या स्पर्धेत सहभागी झाली आहेत
शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे संकल्पनेतून, आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही स्पर्धा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, जे. एस. पी. एम. कॉलेज शेजारी, हांडेवाडी,हडपसर पुणे येथे अत्यंत चुरशीची अशी स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडत आहे.
विशेष म्हणजे वियजी मल्लांसाठी ठेवण्यात आलेली, बक्षीसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम ५ लक्ष रुपये , चांदीची गदा व बुलेट मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकास ३ लक्ष व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकास २ लक्ष व सन्मान चिन्ह व चतुर्थ क्रमांकास १ लक्ष व सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत. तसेच विविध वजनीगटातील स्पर्धकांना 35 लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत

दरम्यान,या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे,यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर,बाळासाहेब ढवळे, उद्योगपती बाळासाहेब भानगिरे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, हरियाणाचे राजू पैलवान, अंकुश मामा घुले ,राजेंद्र जरांडे, मोहन हगवणे, राजेंद्र घुले, नानासाहेब पठारे,मकरंद केदारी,राजेंद्र भानगिरे,निलेश माझीरे,श्रीकांत पुजारी,लक्ष्मण आरडे, अभिजीत बोराटे, सुदर्शना त्रिगुणाईत,श्रद्धा शिंदे, सचिन थोरात, नितीन लगस व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते
या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे.

पुण्यात 50 व्या फिरोदिया करंडकचे भव्य उद्घाटन

कलात्मक तेजाचे अर्धशतक साजरे करणारा सांस्कृतिक विलक्षण कार्यक्रम

पुणे-आंतर-महाविद्यालयीन प्रतिभा, स्पर्धा आणि सांस्कृतिक वारसा दाखवण्यात उत्कृष्टतेची 50 वर्षे साजरी करत, फिरोदिया करंडक त्याच्या सुवर्ण मैलाचा दगड गाठण्यासाठी तयारी करत आहे. पुण्यातील सातारा रोड येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात १४ फेब्रुवारी रोजी भव्य उद्घाटन समारंभ आणि सुवर्णमहोत्सवी “एक तासाचा चित्रपट रंगमंचावर” स्पर्धेने उत्सवाची सुरुवात होईल.उद्घाटन स्पर्धा, नाटक, संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला, शॅडो प्ले, ॲनिमेशन, पपेट शो आणि बरेच काही, एकाच मंचावर विविध कलांचे नाविन्यपूर्ण शोकेस म्हणून उभी आहे, जी पुण्यातील सुमारे 30 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणते. स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणेच तीन टप्पे असतील, प्राथमिक फेरी 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आणि अंतिम फेरी 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे.उद्घाटन समारंभाला पद्मश्री डॉ. अरुण फिरोदिया, कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष, डॉ. जयश्री फिरोदिया, डायरेक्टर, कायनेटिक ग्रुप, श्री. फिरोदिया करंडक स्पर्धेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी आणि प्रतिष्ठित परीक्षकांसह फिरोदिया करंडकचे मुख्य संयोजक अजिंक्य कुलकर्णी, यंदाचे प्रायोजक श्री पुनीत बालन आणि एचसीएल फाऊंडेशनचे प्रतिनिधी. उल्लेखनीय म्हणजे, फिरोदिया चषक स्पर्धेच्या पहिल्या दशकात निर्णायक भूमिका बजावणारे कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.

“आम्ही फिरोदिया करंडकची 50 वर्षे साजरी करत असताना, आम्ही केवळ वर्धापन दिनच साजरा करत नाही; आम्ही सर्जनशीलता, तरुणपणा आणि सांस्कृतिक विविधतेची चिरस्थायी भावना साजरी करत आहोत. फिरोदिया करंडक हे प्रतिभेचे पालनपोषण करणारे आणि सांस्कृतिक वारशाचे मशाल वाहक आहेत, आणि हे माइलस्टोन एडिशन आम्ही पाच दशकांहून अधिक काळ उभारलेल्या वारशाचा पुरावा असल्याचे वचन देते.”

– पद्मश्री डॉ.अरुण फिरोदिया, अध्यक्ष, कायनेटिक ग्रुप“

फिरोदिया करंडकचा ५० वा वर्धापन दिन साजरा करताना आम्हाला आनंद होत आहे. दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील तरुण कलात्मक प्रतिभा पुढे आणणे आणि त्यांना त्यांच्याअनोख्या आणि नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणणारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. कलाकारांच्या तरुण पिढीला प्रेरणा देणे आणि त्यांना सक्षम करणे आणि निर्मात्यांना बदलणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला याची सोय केल्याचा अभिमान आहे.”

– डॉ.श्रीमती जयश्री फिरोदिया, संचालिका, कायनेटिक ग्रुप

 "फिरोदिया करंडकची ५० वर्षे साजरी करताना, आम्ही केवळ एक मैलाचा दगड नाही, तर सर्जनशीलता, युवा सशक्तीकरण आणि सांस्कृतिक विविधता वाढवण्याच्या वारशाचा गौरव करतो. हे केवळ आमचा समृद्ध कलात्मक वारसा साजरे करत नाही तर तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आमची चिरस्थायी बांधिलकी देखील अधोरेखित करते. प्रतिभा चमकतील. पाच दशकांहून अधिक काळ, आम्ही जीवनाला आकार देण्यासाठी आणि एकात्मता वाढवण्यात कलेच्या परिवर्तनीय सामर्थ्याचे साक्षीदार आहोत. आम्ही या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरुवात करत असताना, आम्ही सर्जनशीलतेचे पालनपोषण करणे, समुदायाला चालना देणे आणि सांस्कृतिक भूदृश्ये समृद्ध करण्यासाठी आमच्या समर्पणाचे नूतनीकरण करतो." 
- श्री. सूर्यकांत कुलकर्णी, अध्यक्ष, फिरोदिया करंडक

सेलिब्रेशन वाढवण्यासाठी, स्पर्धेचा 50 वर्षांचा इतिहास, प्रगती, विशेष क्षण आणि संस्मरणीय फोटो यांचे सर्वसमावेशक दर्शन देणारे एक विशेष प्रदर्शन काळजीपूर्वक आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 14 ते 18 फेब्रुवारी आणि अंतिम फेरीदरम्यान पाहुण्यांचे स्वागत करेल. याव्यतिरिक्त, फिरोदिया करंडकवरील एक विशेष माहितीपट 2 मार्च रोजी रिलीज होणार आहे, सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या स्मरणार्थ स्मरणिकेच्या शुभारंभाच्या अनुषंगाने. 3 मार्च रोजी, प्रतिष्ठित कलाकारांच्या नियोजित चर्चासत्रांची तपशीलवार माहिती दिली जाईल आणि नजीकच्या भविष्यात मीडियाशी सामायिक केली जाईल.शिवाय, 2 आणि 3 मार्च रोजी  माजी विद्यार्थ्यांचा एक भव्य मेळावा नियोजित आहे, ज्यामध्ये फिरोदिया करंडकच्या माजी सहभागींनी आकर्षक कामगिरी केली आहे. हा कार्यक्रम, मुख्यत: उत्सवाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी समर्पित, 4 ते 5 विविध परफॉर्मन्स दाखवेल, आणि उत्सवाला महत्त्वाचा अतिरिक्त स्तर जोडेल.सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू करताना, फिरोदिया करंडक एक अविस्मरणीय उत्सवासाठी मंच तयार करते, त्याच्या ब्रँडची प्रतिष्ठा आणि एक प्रमुख सांस्कृतिक संस्था म्हणून स्थान वाढवते. हा कार्यक्रम संस्थेच्या समृद्ध वारशाला आणि कलात्मक उत्कृष्टतेच्या अतूट बांधिलकीला मान अर्पण करेल, प्रतिभा, संस्कृती आणि कलात्मक वारसा यांना अविस्मरणीय मान देईल.

नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर

द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे.

संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह, या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संजय पांडे या भव्य चित्रपटाचे निर्माते आहेत. यानिमित्ताने संजय पांडे म्हणाले की, ‘’ पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पॅंथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पॅंथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हान ही आहे.
पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सर्व देश विदेशातील चाहत्यांसाठी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही पर्वणी असेल.’’

लेखक आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी चित्रपटाचे महत्त्व व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “काही गोष्टी ह्या सांगायलाच पाहिजे कारण त्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. ढसाळ यांचे जीवन ही अशीच एक कथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांच्या कट्टर दलित पँथर चळवळ आणि त्यांच्या बंडखोर कवितेतून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत.’’

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘’ आज १५ फेब्रुवारी नामदेवचा जन्मदिवस..दहा वर्षे झाली नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत झाल्याला. नामदेवच समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथर ची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्याची बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’आहे. एका महान लोकनायकाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या वरुणाजींच्या या महत्वाकांक्षेला माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण कष्टांना व तळमळीला कडक सॅल्युट! ‘’

हिट अँड रन व ईतर मागण्यासाठी देशभरातील ड्रायव्हर देखील दिल्लीत धडकणार : बाबा कांबळे

  • 26 फेब्रुवारी रोजी जंतर-मंतरवर करणार आंदोलन

पुणे-चालक मालकांसाठी राष्ट्रिय आयोगाची स्थापना करणे. वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे. ड्रायव्हर दिवस घोषित कारा हिट अँड रन कायदा मागे घ्यावा या मागण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी देशभरातील चालक-मालक दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन छेडणार असल्याची माहिती ऑटो, टॅक्सी, टेम्पो, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. 26 फेब्रुवारी रोजी या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बाबा कांबळे यांनी ही माहिती दिली. या वेळी, मासाहेब कॅब संघटनेचे अध्यक्ष वर्षाताई शिंदे,पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे साहेब,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष महंमद भाई शेख कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील उपाध्यक्ष अर्शद अन्सारी विल्सन मस्के मोहसीन शेख गोविंद रेड्डी माँसाहेब कॅप संस्था संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश काटकर नाथाभाऊ फुंदे अर्जुन फुंदे ज्ञानेश्वर बोडके सदाशिव गुडघे अभिषेक कदम अविनाश पाटील अनिकेत तिहिले दत्तात्रेय डफळ विश्वजीत शिंदे सागर सावंत काँग्रेस कमिटी रिक्षा युनियन अध्यक्ष दिलीप लोळगे समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे उपाध्यक्ष संजय चव्हाण
उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, चालकांच्या विविध रखडलेल्या मागण्यांवर जनजागृती करण्यासाठी नुकतेच देशव्यापी ड्रायव्हर जोडो अभियान राबवण्यात आले. अभियानाला देशभरातील चालक-मालकांनी मोठा प्रतिसाद दिला. पंजाब, ओडीसा,कर्नाटक,तेलगणा अंद्रा प्रदेश, या राज्यांसह इतर अनेक राज्यांमध्ये चालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सभेच्या ठिकाणी लाखो लोकांची गर्दी जमत आहे. दिल्ली येथील जंतर मंतर वर जोरदार आंदोलनाची तयारी सुरू केली असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

सध्या आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. त्याच धर्तीवर देशभरातील चालक मालक देखील दिल्लीत धडकणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारने चालक मालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करावी. मार्ग काढावा. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.


26 रोजी देशव्यापी आंदोलन असल्या मुळे व देशांतील सर्व संघटना सहभागी होत असल्यामुळे,
20 फेब्रुवारी रोजी काही बोगस संघटनांनी रिक्षा कॅब बंद जाहिर केले आहे. या बंद मध्ये आम्ही सहभागी होणार नाही पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बहुसंख्य कॅब व रिक्षा सुरू राहतील, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली. ज्या संघटनेने बंद पुकारला ती संघटना बोगस असून त्यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांनी आतापर्यंत गुंडगिरी प्रवृत्ती करून रिक्षा चालकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले असल्याने त्यांचा पूर्व इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा अशी मागणी केली असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे-चंद्रशेखर बावनकुळे

  • • कॉंग्रेसने ओबीसी समाजाला न्याय दिला नाही

नागपूर-राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल. मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असे, असे सांगून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला ,”ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही!

ते कोराडी (नागपूर) येथे माध्यमांशी बोलत होते.मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची भूमिका आहे, असे सांगून ते म्हणाले, श्री देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले होते. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानंतर सरकारने पूर्ण अभ्यास करूनच कायद्याचा मसूदा तयार होईल. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी काढल्या असतील त्या पूर्ण केल्या जातील. मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण हे टिकणार असेल. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण होणार असल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे व सरकारच्या भूमिकेचे स्वागत करावे, असेही ते म्हणाले.

• आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा नाही
कोणत्याही समाजाचे आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे. त्याचा राजकीय फायदा होईलच असे नाही. विविध समाजाच्या मागण्या सरकारला पूर्ण कराव्या लागतात. त्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने बघू नये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, त्यामध्ये कोणताही दुसरा हेतु नाही.

• बारामतीतून ६०% मतांनी उमेदवार निवडून येणार
बारामती या अजित पवारांच्या गृह जिल्ह्यात आहे. ते तेथील नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. बारामतीच्या जागेवर महायुतीमध्ये एकमत होईल. अजित पवार बारामती लोकसभेतून जो उमेदवार देतील तो ६० टक्के मते घेऊम विजयी होणार. जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे.

• नाना पटोले यांना बोलण्याचा अधिकार नाही!
ओबीसी आरक्षणाबाबत टीका करण्यापेक्षा त्यांनी त्यांचे नेते राहुल गांधी यांना समजावून सांगावे. राहुल गांधी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान करीत आहेत. कॉंग्रेसने ६५ वर्षांत कधीच ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांना राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र त्यावर ते काहीच बोलले नाहीत, त्यामुळे त्यांना ओबीसींविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नाही.

महत्वाचे मुद्दे
• माधव भंडारी आमचे नेते असून प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्यांना योग्य वेळी संधी मिळेलच
• भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी राज्यातून ७१३ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी जाणार
• राष्ट्रीय अधिवेशनातून मिळणाऱ्या शिदोरीच्या आधारे मोदीजींच्या मागे महाराष्ट्र उभा राहवा यासाठी प्रयत्न करू
• लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या जागांना ५१ टक्के मतासाठी यश कसे मिळेल यासाठी रणनीती आखू

नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले ? -मल्लिकार्जून खरगे

निवडणुकीच्या तोंडावर भाजपा कोणत्याही थराला जाईल, एकजुटीने लढा व विजय मिळवा: रमेश चेन्नीथल्ला.

निवडणुकीत बुथ लेवलपर्यंत एकदिलाने काम करा काँग्रेसला विजयापासून कोणी रोखू शकणार नाही: नाना पटोले

लोणावळ्याच्या शिबिरात भाजपा सरकारचा निषेधाचे ठराव एकमताने मंजूर.

लोणावळा, दि. १६ फेब्रुवारी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी, मी पणा जास्त असतो. आपण ‘आम्ही भारताचो लोक’ असे म्हणतो परंतु मोदी मात्र मी, मी असेच करतात. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. २०१४ मध्ये मोदींनी काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख रुपये प्रत्येकाला देण्याची, दरवर्षी २ कोटी नोकरी देण्याची, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, या गॅरंटी दिल्या होत्या या मोदी गॅरंटीचे काय झाले? असा सवाल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.
लोणावळ्यात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ऑनलाईन केले. यावेळी ते बोलत होते. खरगे पुढे म्हणाले की, काँग्रेसप्रणित युपीए सरकारने २००४ ते २०१४ याकाळात अन्न सुरक्षा कायदा आणला, रोजगार हमीचा मनरेगा कायदा केला, सर्व शिक्षा अभियान आणले, माहिती अधिकार कायदा आणला. मोदी सरकारने दहा वर्षात काहीही दिलेले नाही. नरेंद्र मोदी, भाजपा, आरएसएसने देशाला स्वातंत्र दिलेले नाही. काँग्रेस पक्ष, महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार पटेल, लोकमान्य टिळक या महान नेत्यांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिले. स्वातंत्र्य चळवळीत भाजपाचे काहीच योगदान नाही. काँग्रेस पक्षाचा जन्म मुंबईत झाला आहे, आज या पक्षाला १३९ वर्ष झाली आहेत. काँग्रेस पक्ष खोटे बोलणारा पक्ष नाही. लोकांच्या हितासाठी व स्वातंत्र्यासाठी या पक्षाचा जन्म झाला आहे. समाजात फुट पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष नाही. एकता व सामाजिक सौहार्द जपणारा पक्ष आहे. मुंबईकडे देशाचे लक्ष लागलेले असते, मुंबई व पुणे शहराने सामाजिक सौहार्दाचे काम केले आहे. आपली लढाई मोदी व भाजपाविरोधात आहे तशीच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थाविरोधातही लढाई करावी लागत आहे. निवडणुकीसाठी घराघरात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवा. या निवडणुकीत सर्वांनी हिरीरीने भाग घेत एकजूट होऊन निवडणुका लढा द्या व काँग्रेसला विजयी करा.
प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकुल आहे. सर्व राज्याचा दौरा करून आढावा घेतल्यानंतर आता शिबीर घेतले जात आहे. महाविकास आघाडी राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवत आहेत. आजचे राज्यातील वातावरण पाहता मविआ सर्वात जास्त जागा जिंकेल. केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा कोणत्याही थराला जाईल परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढून विजय मिळवावा, असे आवाहन रमेश चेन्नीथल्ला यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची परिस्थिती आपल्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा लागणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व मविआला चांगले वातावरण आहे परंतु त्यासाठी लोकांच्या घरापर्यंत जावे लागणार आहे. मतदार याद्या अद्ययावत कराव्या लागणार आहेत. बुथ लेवल पर्यंत काम करा, बीएलए चे काम निवडणुकीत सर्वात महत्वाचे आहे, त्यांच्या नियुक्त्या करा. भारतीय जनता पक्षाच्या तोडफोडीच्या व जाती धर्मात भांडणे लावणाऱ्या प्रवृत्तीला लोक कंटाळले आहेत. सर्वांनी एकजुटीने काम केले तर काँग्रेसला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही.
लोणावळ्याच्या शिबिरात ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले. ते ठराव खालील प्रमाणे..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला ठराव.
भाजपाने ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करुन पक्ष फोडण्याचे काम केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून पाडले. विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोडून विरोधी पक्षच गिळंकृत करण्यात आले. या गैरकृत्यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाला काळीमा फासत त्यांना मदत केली. आज तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. हा फक्त खाती गोठवण्यापुरता मर्यादीत नाही हा लोकशाही आणि संविधानाचा गळा दाबण्याचा प्रकार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत आहे. माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने हा ठराव एकमताने मंजूर केला.

दुसरा ठराव.-
केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमशाही वृत्तीने काम करत आहे. मोदी सरकार आपल्या धोरणांमधून देशातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, अल्पसंख्यांक, शेतकरी, तरूण, महिला या सर्व समाजघटकांवर अन्याय करत आहे. देशातील हजारो शेतकरी दोन वर्षापूर्वी काळे कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी वर्षभर आंदोलन करत होते. या आंदोलनात जवळपास एक हजाराहून अधिक शेतक-यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारने हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते पण ते पाळले नाही त्यामुळे दोन वर्षानंतर पुन्हा लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.
सरकार त्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांच्या मार्गात खिळे ठोकत असून रस्ते बंद करून शेतक-यांवर अश्रू धुरांची नळकांडी फोडत आहे. पेलेट गन्सचा वापर करत आहे. यात शेकडो आंदोलक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. आपले नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्याबरोबर हमी भावाचा कायदा करू असे सांगितले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी असून शेतक-यांचा आवाज दडपणा-या केंद्रातील मोदी सरकारचा धिक्कार करत आहे. हा ठराव आमदार संग्राम थोपटे यांनी मांडला तर विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. सुरेश वरपुडकर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एकमताने हा ठराव मंजूर केला.
या शिबीराला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, गोवा, दीव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, अमित देशमुख, सुनिल केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, AICC सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केले.

 ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या टायटल ट्रॅक पोस्टरने वेधलं लक्ष 

 -अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडिया वर व्हायरल- 
 खिलाडी अक्षय कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी रिअल ॲक्शन फिल्म ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडिया वर व्हायरल होतंय या पोस्टर च्या चर्चा सर्वत्र होताना दिसतात. 
या ॲक्शन जोडीने सोशल मीडिया वर हे खास पोस्टर शेयर केलं आहे. “बडे का स्वॅग , छोटे का स्टाइल 3 दिवस बाकी ! #BadeMiyanChote Miyan Title Track out on 19 February 2024 #बडेमियाँछोटे मियाँOnEid2024”  
https://www.instagram.com/p/C3ZR9VfLmXP/?igsh=OXp2aHY4NTc0b2pr

 हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अक्षय कुमारच्या सिग्नेचर स्टाइलसह आणि टायगर श्रॉफने त्याचा ‘टायगर इफेक्ट’ यातून दाखवला आहे. ईदच्या दिवशी ॲक्शन-पॅक परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

 पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

जुन्नरसह आंबेगाव येथील हिरडा पीक नुकसानभरपाईसंदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवावा-मंत्री दिलीप वळसे पाटील

0

मदतीचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळासमोर ठेवणार – मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. १६ : जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पाठवावा, असे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. हा प्रस्ताव प्राप्त होताच तो मंत्रिमंडळासमोर ठेऊन मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मंत्रालयात आज मंत्री श्री. वळसे पाटील यांनी, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने बैठक झाली. मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जगताप उपस्थित होते. तर कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपवन संरक्षक प्रवीण सिंग आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, जुन्नर आणि आंबेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने येथील शेतकऱ्यांच्या हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी त्यांचे पंचनामेही करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळालेली नाही. ही मदत त्यांना मिळावी, यादृष्टीने त्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावेळ हिरडा पिकाचा बाजारभाव लक्षात घेऊन कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करावा.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांनी, विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येईल आणि त्यास मान्यता घेऊन या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत केली जाईल, असे स्पष्ट केले. येत्या सोमवारपर्यंत याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाला सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील बाधित गावांची संख्या ८१ असून शेतकऱ्यांची संख्या ४१८९ इतकी आहे. केंद्राच्या आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मध्ये याबाबत मदत करण्यास अडचण येत असल्यास विशेष बाब म्हणून ती करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे, दि.१६: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास निवडणुका मुक्त वातावरणात पार पडतील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तर दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांतर्गत आणि विविध विभागातही माहितीचे आदानप्रदान नियमितपणे करावे. मागील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जमा केलेली शस्त्रे, दाखल झालेले निवडणूक विषयक गुन्हे, गुन्हे दाखल झालेले व्यक्ती आदींची माहिती तयार ठेवावी आणि या माहितीचे विश्लेषण करून अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कार्यवाही करावी. गंभीर गुन्हे घडलेल्या भागात पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे भेटी द्याव्यात, आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.

अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्रात नागरिकांना शांततेत आणि निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय आतापासूनच योजावे. कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील सर्व अहवाल त्वरीत सादर करावे. निवडणुकीत कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यादृष्टीने यंत्रणेची सज्जता असावी, त्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे, असेही ते म्हणाले.

राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न
लोकसभा निवडणूकविषयक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी तहसीलदार शीतल मुळे, राहुल सारंग आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकूण २१ पैकी १२ विधानसभा मतदारसंघातील १२१ मतदान केंद्रांवर १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार असल्याने सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापनेबाबत कार्यवाही सुरू आहे. मतदार यादी शुद्धीकरण आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी राज्याच्या सरासरी टक्केवारीपेक्षा कमी असल्याने राजकीय पक्षांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रमात सहकार्य करावे आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक लवकर करावी, असे आवाहन श्री.सारंग यांनी केले.

श्रीमती मुळे यांनी निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी वास्तवाचे भान राखावे-कौस्तुभ दिवेगावकर

‘स्पर्धा परीक्षा वास्तव आणि तरुणांची मानसिकता’वर परिसंवाद
पुस्तकविश्व प्रकाशन, उचित माध्यम, एमपीएससी स्टुडंट्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे, ता. १६ : “स्पर्धा परीक्षांमधील यश म्हणजेच आयुष्याचे अंतिम ध्येय नाही. त्यापलीकडेही एक जग असून, एक चांगला माणूस म्हणून प्रत्येकजण सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यासाठी केवळ प्रशासकीय अधिकारीच झाले पाहिजे असे नाही. केवळ एका परीक्षेसाठी आयुष्य पणाला न लावता विद्यार्थ्यांनी वास्तवाचे भान राखावे,” असा सल्ला बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला.
पुस्तकविश्व प्रकाशन, उचित माध्यम आयोजित एमपीएससी स्टुडंट्स फोरम- वास्तव कट्टा यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर जाधवर लिखित रुद्र इंटरप्राईजेस प्रकाशित, ‘आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिवेगावकर यांच्या हस्ते झाले. जेष्ठ संपादक अरुण खोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्पर्धा परीक्षा वास्तव आणि तरुणांची मानसिकता’ या विषयावरील परिसंवादात उद्योजक रणजीतसिंह पाटील, डीडी सह्याद्री व आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक इंद्रजीत बागल, पत्रकार हलीमा कुरेशी यांनी विचार मांडले. पुस्तकविश्व प्रकाशनचे नवनाथ जगताप, उचित माध्यमचे प्रमुख जीवराज चोले, वास्तव कट्टाचे महेश बडे, किरण निंभोरे उपस्थित होते.
कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, “प्रशासकीय अधिकारी म्हणजे केवळ सत्कार, ग्लॅमर हा समज दूर झाला पाहिजे. हे पद एक जबाबदारी, समाज बदलण्याची ताकद आहे. या समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्यक्ष अधिकारीच झाले पाहिजे असे नाही. एक चांगला माणूस म्हणूनही आपण त्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. स्पर्धा परीक्षा देताना आपण अंतिम ध्येय गाठू शकलो नाही, तरी इतर पर्याय समोर ठेवून त्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.”

अरुण खोरे म्हणाले, “अधिकाऱ्यांनी केवळ सर्वसामान्य माणसाच्या फाईल वाचू नये, तर त्या फायलींमध्ये माणसाचा चेहरा त्या अधिकाऱ्यांना दिसला पाहिजे. तेव्हाच तो अधिकारी  माणसांचे प्रश्न सोडवू शकतो हे यशवंतराव चव्हाण यांचे विचार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात अमलात आणले, तर सकारात्मक बदल घडू शकेल. देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी ज्याप्रमाणे चांगल्या अधिकारी, चांगले पत्रकार व चांगल्या नागरिकांची गरज आहे.”
इंद्रजीत बागल म्हणाले, “स्पर्धा परीक्षा देताना निश्चित ध्येय विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, जरी त्यामध्ये यश मिळाले नाही तरी ठराविक कालावधीनंतर इतर पर्याय पर्यायांचा विचार केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा देण्यापूर्वी स्वतःचे क्षमता लक्षात घेऊन ध्येय निश्चित करत चिकाटीने मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते.”
रणजीत सिंग पाटील म्हणाले, “अधिकारी होण्यासाठी जसा संघर्ष करावा लागतो, तसाच कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षा अंतिम ध्येय न समजता इतर क्षेत्रांचाही विचार केला पाहिजे.” 
ज्ञानेश्वर जाधवर म्हणाले, “भवतालचे वातावरण, अनुभव टिपणारी व वास्तवाचे भान सांगणारी ही कादंबरी आहे. तरुणांनी स्पर्धा परीक्षांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधली पाहिजे.”
हलीमा कुरेशी म्हणाल्या, “अधिकारी बनून समाजाच्या सेवेत जसे योगदान देऊ शकतो, तसेच पत्रकारितेच्या व अन्य क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचे काम करता येते.”
नवनाथ जगताप म्हणाले, “यशोगाथा सर्वांनाच आवडते. परंतु हे यश जर मिळाले नाही, तर इतर पर्याय कोणते असावे याचा विचार स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, हे सांगणारी ही कादंबरी आहे.”
पुस्तक निर्मितीसाठी सहकार्य केल्याबद्दल प्रशांत बागल सचिन म्हसे, अभिजीत सोनवणे, वैभव साळुंखे, चंद्रकांत अडसूळ, गणेश पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.