Home Blog Page 1106

निवडणूक प्रक्रियेचे महत्व जाणून विहित पद्धतीने कर्तव्य पूर्ण करा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे महत्व लक्षात घेवून विहित पद्धतीने कर्तव्य पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्यावतीने गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित प्रथम निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षण सत्रास भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार ज्योती देवरे, निवडणूक नायब तहसीलदार चित्रा ननावरे आदी उपस्थित होते.

मतदानाची कार्यपद्धती सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, सर्वसमावेशक आणि सर्वांना सोयीची होईल अशी निवडणूक घेण्यासाठी जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान हा त्यातील महत्वाचा भाग आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदानाच्यावेळी रांगेत उभे न राहता त्वरीत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया, माहिती पुस्तीका याचे अवलोकन करून कामकाज पहावे.

कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्राबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती द्यावी. हेतूपुरस्सर निवडणूक कामकाजाकडे दुलर्क्ष करणे, वेळ न पाळणे अशी बाब आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मतदान केंद्रवर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, रॅम्प अशा सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

श्री. भंडारे म्हणाले, निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा सोहळा आहे. या कामामध्ये न्युनगंड न बाळगता प्रत्येकाने मनापासून सहभागी व्हावे. सर्वांनी मतदान प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. ईव्हीएम यंत्र हाताळण्याचे प्रात्याक्षिक प्रत्येकाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी तीन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. तहसीलदार श्रीमती देवरे यांनी मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.

बेदम मारहाणीत महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू-एकाला अटक -फरार आरोपीला राजकीय आसरा ?

पुणे :किरकोळ कारणावरुन शेजारी राहणाऱ्या गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या पोटात असलेल्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार पेठेत घडली आहे. ही घटना 27 मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.फरार आरोपी पैकी एकाचे राजकीय संबंध असल्याने त्यांना आसरा मिळत असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी येथे केला आहे.

याबाबत राजू माधवराव चिद्रावार (वय 25, रा. दुसरा मजला, यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) यांनी गुरुवारी (दि.4 एप्रिल) समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी नवाज नासिर खान (वय 27, रा. चौथा मजला, यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) याला अटक केली आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या रफीया खान, नासिर खान आणि सलमान उर्फ टिपू शेख (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्यावर आयपीसी 316, 323, 504, 506, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवाज खान याने 27 मार्च रोजी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर लाथ मारली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्य़ादी, त्यांची पत्नी मिरा व पत्नीचा मानलेला भाऊ गणेश कांबळे हे गेले होते. त्यावेळी आरोपी नवाज खान, त्याची आई रफिया खान, नासीर खान यांनी फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मिरा चिद्रावार या गरोदर असल्याची माहिती आरोपींना माहित होती. तरी देखील आरोपींनी मिरा यांच्या पोटात लाथा मारून मारहाण केली. पोटावर लाथा मारल्याने अर्भकाचा मृत्यू होऊ शकतो हे माहित असताना देखील आरोपींनी जाणीवपूर्वक मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच नवाज खान याने फिर्यादी यांच्या ज्युपीटर गाडीवर दगड मारुन नुकसान केले. तर सलमान उर्फ टिपू शेख याने फिर्य़ादी यांना फोन करुन पोलिसांकडे तक्रार केली तर तुला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली.या सलमान चे काही राजकीय संबध असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना आसरा मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे .

दरम्यान, आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे मिरा यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले.उपचार सुरु असताना मिरा यांच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला.बाळाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर मिरा यांच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्य़कर्त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील ,सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग रुक्मिणी गलांडे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील , पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख,पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख करीत आहेत.

तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत मोठे निर्णय घेणार-PM मोदी

दहा वर्षात झालेली कारवाई हा केवळ ट्रेलर

पुष्कर (अजमेर)-आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत आणखी मोठे निर्णय घेणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. माझी पूर्ण तयारी झालेली आहे. दहा वर्षात झालेली कारवाई हा केवळ ट्रेलर आहे. खूप काही बाकी आहे. मोदींनी शनिवारी अजमेरमधील पुष्कर येथील फेअर ग्राउंडवर निवडणूक रॅलीला संबोधित केले.

मोदी म्हणाले- भाजप सरकार देशातील 80 कोटी गरजू लोकांना मोफत धान्य पुरवते. दहा वर्षांत गरिबांच्या खात्यात 30 लाख कोटींहून अधिक रक्कम थेट पाठवण्यात आली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात मध्यंतरी पैशांची लूट झाली.दिल्लीतून 1 रुपया पाठवला, तर तो 15 पैशांपर्यंत पोहोचतो, असं काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनी म्हटलं होतं. 30 लाख कोटी रुपये असते, तर काय झाले असते? आम्ही तपास केला तेव्हा आम्हाला आढळले की काँग्रेसने 10 कोटीहून अधिक बनावट लाभार्थी तयार केले आहेत, जे कधीही जन्माला आले नाहीत. त्यांच्या नावाने योजना सुरू झाल्या. तुमचा हक्काचा पैसा थेट काँग्रेसच्या मध्यस्थांकडे जात होता.

मोदी म्हणाले- काल (5 एप्रिल) काँग्रेसने खोट्याचा गठ्ठा सोडला आहे. काँग्रेसचा पर्दाफाश करणारा हा जाहीरनामा आहे. प्रत्येक पानावर भारताचे तुकडे करण्याचा वास दिसतोय. स्वातंत्र्याच्या वेळी मुस्लिम लीगमध्ये जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते.काँग्रेसच्या एका खासदाराकडे 300 कोटींची रोकड सापडल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. पैसे मोजून मशीन थकले होते. त्यामुळे अहंकारी युती मोदींवर चिडली आहे. जितका चिखल टाकाल तितकेच कमळ फुलणार हे काँग्रेसवाल्यांनी समजून घ्यावे. काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी रॅली काढत नाही, तर भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी करत आहे. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरूच राहणार आहे.

पंतप्रधान म्हणाले की, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला काँग्रेसने 6 वर्षांपासून हाकलून दिले. आमच्याकडे लोक ‘राम-राम’ म्हणत नमस्कार करतात. माझ्या मनात रामाबद्दल इतका राग मी ठेवू शकत नाही.

काँग्रेसच्या राजघराण्यातील प्रसिद्ध लोक या कार्यकर्त्याला शिवीगाळ करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गैरवर्तन करणे ते आपला हक्क मानतात. हा कार्यकर्ता असा आहे की, तो प्रत्येक शिवी पचवू शकतो. मी देशातील ग्रामीण गरिबांच्या पाठीशी खडकासारखा उभा असल्याने ते मोदींवर नाराज आहेत. या लोकांनी जनतेचा पैसा लुटणे हा आपला कुटुंबाचा हक्क मानला. मोदींनी दहा वर्षांत त्यावर कायमचा इलाज केला आहे. मोदींनी त्यांच्या लुटलेल्या दुकानांचे शटर बंद केले, त्यामुळे हे लोक नाराज आहेत.

स्त्रीशक्तीचा आनंद, सन्मान, सुरक्षितता आणि समृद्धी ही मोदींची हमी
2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे, असे मोदी म्हणाले. हे तेव्हाच होईल, जेव्हा देशाच्या निम्म्या लोकसंख्येचा सहभाग वाढेल. माता, बहिणी आणि मुलींच्या सुख, सन्मान, सुरक्षितता आणि समृद्धीची मोदींची हमी आहे.

सैन्यात राजस्थानची चमक लांब मिशा असलेल्या शूर सैनिकांमुळे नाही, तर त्यांच्या मातांमुळे आहे, असे मोदी म्हणाले. मुलगी सैन्यात भरती होऊ शकली नाही, मोदींनी तिच्यासाठी दरवाजे उघडले आहेत. प्रसूतीनंतर मुलींना 26 आठवड्यांची रजा दिली जाते. महिला आरक्षण विधेयकामुळे आपल्या माता-भगिनींसाठी संसदेतील जागांचे आरक्षण निश्चित झाले आहे.पंतप्रधान म्हणाले की, जो कधीही सायकल चालवू शकत नव्हता, तो आज गावात ड्रोन उडवत आहे. इस्रोचे मोठे प्रकल्प महिला हाताळत आहेत. जगात महिला वैमानिकांची सर्वाधिक टक्केवारी भारतात आहे.

पंतप्रधान म्हणाले- मला 3 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचे आहे
एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनवले आहे. मला भरभरून आशीर्वाद द्या, मला 3 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचे आहे.पहिल्यांदाच 11 कोटी महिलांच्या घरात नळाचे पाणी पोहोचले आहे. गरोदर महिलांच्या खात्यावर 15 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. मुद्रा योजनेंतर्गत हमीशिवाय कर्ज मिळविणाऱ्यांपैकी 70 टक्के माता-भगिनी आहेत.

मोदी म्हणाले- मी गरीब आईचा मुलगा

मी गरीब आईचा मुलगा असल्याचे मोदी म्हणाले. करोडो बहिणींकडे सिलिंडर नव्हते. त्यांना धुरात अन्न शिजवावे लागले. या काळात एका दिवसात 400 सिगारेट्स इतका धूर त्यांच्या फुफ्फुसात गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महिलांची बँक खाती नसल्याने त्यांना धान्याच्या डब्यात पैसे ठेवावे लागले. पंतप्रधान निवासाची घरे महिलांच्या नावावर होतील, असा निर्णय तुमच्या मुलाने घेतला.

जुन्नर परिसरातील आदिवासी भागात विद्यार्थ्यांकडून ग्रामस्थांना आवाहन

पुणे-दि. ६- जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी भागात मतदान विषयक जनजागृती उपक्रम राबवितांना ग्रामस्थांना सेल्फीच्या माध्यमातून मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. धावशी या डोंगरावर वसलेल्या दुर्गम भागातील गावातही विद्यार्थ्यांनी उत्साहाने मतदार जागृती उपक्रमात सहभाग घेतला.

मतदान जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी अनोखी कल्पना शोधून काढली. त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सेल्फीसाठी मतदानाचे महत्व असणारा संदेश लिहिलेली चौकट तयार केली. जनजागृती फेरीदरम्यान भेटणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी ही चौकट हातात घेवून छायाचित्र घेण्यास सांगितले आणि मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. गावातील तरुण, वृद्ध, महिला सर्वांनीच या उपक्रमाला प्रतिसाद देत मतदान करणार असल्याचे सांगितले.

स्वीप समन्वयक अनिता शिंदे आणि माध्यम कक्ष समन्वयक संजय जाधव, सहाय्यक समन्वयक बाळासाहेब भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मढ, कोपरे,मुथाळणे, बांगर वाडी, सितेवाडी, धावशी, साबरवाडी, वसईवाडी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मतदान हा आपला अधिकार असल्याचा संदेश देत आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात स्वीप समन्वयक ,गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला मतदानाचा संकल्प

खेड आळंदी विधानसभा मतदाररसंघांतर्गत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रीयेबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत शपथ घेतली. प्रथमच मतदान करता येणार असल्याने नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बँक व पोस्ट कार्यालयात मतदानाचे आवाहन

हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध बँका व पोस्ट कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. मतदान हा आपला अधिकार असून आपण लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवावा,अ से आवाहन करण्यात आले. बँक कर्मचारी आणि ग्राहकांनी उपक्रमात सहभाग घेतला. स्वीप समन्वयक अमरदीप मगदूम, पर्यवेक्षक तेजस्विनी गदादे, सहाय्यक संजीव परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.

पुणेकरांच्या सहभागातून तयार होणार तब्बल ‘वीस हजार किलोची मिसळ’ 

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजन ; अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर वापरणार
पुणे  : क्रांतीसूर्य  महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून  तब्बल वीस हजार किलोची मिसळ बनविण्यात येणार आहे. अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर २० हजार किलोची मिसळ बनविणार आहेत. 
दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक ११ आणि १४ एप्रिल रोजी अनुक्रमे गंज पेठेतील  महात्मा जोतीबा फुले वाडा आणि  पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना मिसळ वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे, अशी माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली. 
गुरुवार, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले वाडा येथे १० हजार किलो मिसळ आणि दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ पासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे १० हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल २० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. पुणेकरांनी महात्मा फुले वाड्यात दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात आपल्या सोयीने कधीही येऊन मोफत मिसळीच्या उपक्रमाचा आस्वाद घ्यावा. मिसळ हे निमित्त आहे, एकत्र येण्याचे आणि महापुरुषांना वंदन करण्याचे. तरी सर्वांनी या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे  करण्यात आले आहे.

* २० हजार किलो मिसळ करण्याकरिता लागणार भव्य कढई व हजारो किलो साहित्य
मिसळ तयार करण्याकरिता १५ बाय १५ फूट आकारातील भव्य कढाई वापरण्यात येणार आहे. कढईची उंची ६.५ फूट असून २५०० किलो वजन आहे. पोलाद, तांबे आणि भक्कम स्टिलचा वापर करुन ही कढई साकारण्यात आली असून झाकणही मोठे आहे. अयोध्येतील विश्वविक्रमानंतर थेट पुण्यातील या उपक्रमाकरिता ही कढई वापरण्यात येणार आहे. 
उपक्रमामध्ये २० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी २००० किलो, कांदा १६०० किलो, आलं ४०० किलो, लसूण ४०० किलो, तेल १४०० किलो, मिसळ मसाला २८० किलो, लाल मिरची पावडर ८० किलो, हळद पावडर ८० किलो, मीठ १०० किलो, खोबरा कीस २८० किलो, तमाल पत्र १४ किलो, फरसाण ५००० किलो, पाणी २०००० लिटर, कोथिंबीर २५०, लिंबू २००० नग जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात येणार आहे. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश १ लाख, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास १ लाख यांसह १००० किलो दही व स्लाईड ब्रेड ३ लाख नग असे साहित्य वापरण्यात येणार आहे.

स्वतःला देशापेक्षा महान समजून तानशाह बनण्याचा मोदींचा प्रयत्न- सोनिया गांधी

जयपूर-काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जयपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, देशापेक्षा कोणीही वरचे नाही, पण मोदी स्वत:ला महान समजतात. ते लोकशाही नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि संपूर्ण व्यवस्थेत भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, ही हुकूमशाही आहे. हा देश काही मोजक्या लोकांची जहागीर नाही. आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे. हा देश आपल्या मुलांचे अंगण आहे.

तत्पूर्वी, जयपूरच्या विद्याधर नगर स्टेडियममध्ये झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने पुन्हा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व भ्रष्टांना पक्षात घेत आहेत.

भाजप सरकार सत्तेवर येताच राजस्थानमध्ये चिरंजीवी योजना बंद करण्यात आली असून 25 लाखांचा विमा आता 5 लाख रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी जिथे जातात तिथे नवनवीन खोटे बोलतात. त्यांनी दिलेले हमीपत्र अद्याप पूर्ण झालेले नाही. ते फक्त गांधी घराण्याला शिव्या देण्याचे काम करतात.

देशात पेपरफुटीच्या घटना घडत आहेत, कोणालाच नोकरी मिळत नाही- प्रियांका

प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज बेरोजगारी शिखरावर आहे. तुम्ही 10 वर्षे मोदीजी आणि भाजप सरकार पाहिले आहे. त्यांनी बेरोजगारी दूर करण्यासाठी काय केले? अग्निवीर सारखी योजना आणली. सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या. देशातील प्रत्येक राज्यात पेपर फुटले असून नोकऱ्या उपलब्ध नाहीत. महागाईची परिस्थिती अशी आहे की निवडणुकीच्या दोन महिने आधी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. एक अनोखी गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षांत तुमचा संघर्ष टीव्ही किंवा मीडियावर दिसतो की वर्तमानपत्रात वाचायला मिळतो? भाजप सरकार सत्तेवर येताच राजस्थानमध्ये चिरंजीवी योजना बंद करण्यात आली. 25 लाखांचा विमा आता 5 लाख रुपयांचा झाला आहे. हे वाचायला मिळाले का? देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे, ऐकू येत नाही. मोठमोठे उद्योगपती मोठमोठ्या वाड्यांमध्ये राहतात, त्यांची लग्ने कशी चालतात हे आपण पाहत आहोत. त्यांची हजारो कोटींची कर्जे माफ झाली आहेत.

ते तुमच्या मुलांना उभे राहू देणार नाहीत – प्रियांका गांधी

वास्तव ओळखण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या. एवढंच ऐकायला मिळतंय की यावेळी ते 400 च्या पुढे जाणार आहेत. मोदी कुठे प्रवास करत आहेत? कधी विमानात, कधी समुद्रात पाण्याखाली… हेच दिसतं. जिथे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागला तिथे कोणीही तुमच्या मदतीला आले नाही. सर्व योजना बड्या उद्योगपतींसाठी आहेत. 5 किलो रेशन देणार पण रोजगार देणार नाही, तुमच्या मुलांना पायावर उभे राहू देणार नाही, असे ते म्हणतात.

हा देश काही मोजक्या लोकांची जहागीर नाही – सोनिया गांधी

​​​​​​​सोनिया गांधी म्हणाल्या की, आपल्या महान पूर्वजांनी आपल्या संघर्षाच्या बळावर देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य शोधला आणि सापडला. इतक्या वर्षांनी महान प्रकाश मध्यम झाला आहे. सर्वत्र अंधाराचा अन्याय वाढला आहे. याविरुद्ध लढून न्यायाचा प्रकाश मिळवू, असा आपला संकल्प असावा. गेल्या 10 वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या ताब्यात आहे ज्याने बेरोजगारी आणि आर्थिक संकटाला चालना देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मोदी सरकारने जे काही केले ते आपल्यासमोर आहे. त्यामुळे हा काळ निराशेचा आहे, पण निराशेसोबतच आशाही जन्माला येते हे जाणून घ्या. मला पूर्ण विश्वास आहे की आमचे काँग्रेसचे सहकारी आपल्या अंत:करणात न्यायाचा दिवा प्रज्वलित करतील आणि हजारो वादळांना तोंड देत पुढे जातील. हा देश काही मोजक्या लोकांचा नाही, सर्वांचा आहे. आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे.

मोदी जिथे जातात तिथे नवनवीन खोटे बोलतात – खरगे

खरगे म्हणाले की, खोटे बोलणाऱ्यांमध्ये आम्ही कधीच नसतो. जसे मोदी खोटे बोलतात. प्रत्येक ठिकाणी ते नवीन खोटे बोलतात. त्यांनी यापूर्वी आम्हाला किती हमीपत्र दिले आहेत? पहिल्या हमीपत्रात मी तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले. 10 वर्षांत 20 कोटी नोकऱ्या देणार होत्या, देशातील तरुणांना 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या आहेत का? मोदी पंतप्रधान आहेत, ते असे खोटे कसे बोलू शकतात, तुम्ही लोक खोटे बोलत आहात. मोदी खोटे आहेत, काँग्रेस नाही.

काम न करता श्रेय घेणे मोदींचे काम – खरगे

हा माणूस कुठेही म्हणतो मी हे केले, मी ते केले. मोदींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा समाचार घेत खरगे म्हणाले की, आजकाल रेल्वे मार्ग चर्चेत आहे. ही लाइन इंग्रजांच्या काळापासून नेहरूजींच्या काळापर्यंतची आहे. मोदी आता काय करत आहेत? त्या धर्तीवर एकावेळी एक ट्रेन सोडून मोदी ग्रीन सिग्नल देत आहेत. ही पायाभूत सुविधा आम्ही तयार केली असून त्याचे श्रेयही तुम्ही घेतले. स्टेशनवर जा आणि ग्रीन सिग्नल द्या. काम न करता श्रेय घेणे हे मोदींचे काम आहे.

यावेळी मोदींनी एक नवीन गाणे आणि नाटक आणले आहे – खरगे

राजस्थानमध्ये झालेल्या विकासकामांचा उल्लेख करताना खरगे म्हणाले – काँग्रेसने विमानतळ, आयआयटी आणि एम्स आणले आणि मोदीजी म्हणतात देशाचा विकास होत आहे. मी देशाच्या विकासासाठी काम करत आहे. यावेळी आम्ही एक नवीन गाणे आणि नाटक घेऊन आलो आहोत. मोदींची हमी… ते पक्ष आणि भाजपचे नाव घेत नाहीत. मोदी असतील तर शक्य आहे…मोदी असेल तर खात्री आहे. ते सगळीकडे म्हणत आहेत… माझी हमी, हा आमचा शब्द आहे, जो मोदींनी चोरला.

शिव्या देऊन किती दिवस वाचणार- खरगे

मोदी नेहमीच लोकांना गोंधळात टाकतात. तुम्ही देशासाठी काही केले नाही, तरीही काँग्रेसला म्हणतात की तुम्ही काही केले नाही, 70 वर्षांत काहीच केले नाही. आम्ही 55 वर्षांचा हिशोब देत आहोत. राजस्थान-जयपूरमध्ये किंवा त्याचा हिशेब देत आहे. तुम्ही काय केले याचा हिशेब देऊ नका. तुमच्यात बोलण्याची ताकद नाही. मुद्दा आला तर काँग्रेसला शिव्या देतात, काही पडलं तरी गांधी घराण्याला शिव्या देतात.

हॉस्पिटलमधून मूल चोरून 4-5 लाखांना विकायचे:वॉर्ड बॉयसह तस्कर टोळीच्या 7 जणांना सीबीआयची दिल्लीतून अटक

नवी दिल्ली

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभरात लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. तपास यंत्रणेने शुक्रवारी (5 एप्रिल) दिल्ली आणि हरियाणामधील 7 ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी दिल्लीतील केशवपुरम येथील घरातून तीन नवजात बालकांची सुटका करण्यात आली.

त्यांच्यामध्ये दोन मुले असून त्यापैकी एक दीड दिवसांचा, तर दुसरा 15 दिवसांचा आहे. एक मुलगी साधारण एक महिन्याची आहे. सीबीआयने हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयसह 7 जणांना अटक केली आहे. यामध्ये अनेक महिलांचा समावेश आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना एनसीआर भागातून पकडण्यात आले आहे. हे लोक हॉस्पिटलमधून नवजात बालके चोरायचे. मग त्यांची काळ्याबाजारातील मालासारखी खरेदी-विक्री झाली. मुलासाठी सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचा सौदा व्हायचा. एकट्या मार्च महिन्यात सुमारे 10 मुलांची विक्री झाली.

देशातील अनेक मोठी रुग्णालये तपास यंत्रणेच्या रडारवर
शोध मोहिमेदरम्यान 5.5 लाख रुपये रोख आणि अनेक कागदपत्रांसह आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. सीबीआय अनेक राज्यांमध्ये बाल तस्करी प्रकरणाचा तपास करत आहे. देशातील अनेक मोठी रुग्णालये बाल तस्करीच्या रॅकेटच्या कचाट्यात आली आहेत.

फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नका!एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांचे आवाहन

पुणे- -एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला असून, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना मोबाईल अँपद्वारे बिलाचे पैसे भरण्याची किंवा अपडेट करण्याची अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे अशा फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी केले आहे.

एमएनजीएलकडे फेक कॉल्ससंदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना फोन करुन ‘मोबाईल लिंक डाऊनलोड करुन पैसे भरा. अन्यथा तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल,’ असे सांगितले जात आहे. यातून एमएनजीलची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे एमएनजीएलच्या व्यवस्थापनाने सदर बाब अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच, एमएनजीएलनेही ग्राहकांना सूचित केले आहे.

त्यासोबतच, अशा फेक आणि फ्रॉड कॉल्स संदर्भात एमएनजीएलने १ एप्रिल २०२४ रोजी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार ही दाखल केली आहे. याशिवाय, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना याबाबत जागृत करण्यासाठी आपल्या ऑफिशियल ट्विटर आणि फेसबुक पेजवरुनही ग्राहकांना सूचित केले आहे. त्यासोबतच विविध वृत्तपत्रांमधून जाहीर नोटीस देऊन, रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातून आणि ग्राहकांना एसएमएस तसेच व्हॉट्सअँपद्वारे संदेश पाठवून जनजागृती करत येत आहे. तसेच, असे प्रकार कोणत्याही ग्राहकासोबत घडत असल्यास, त्यांनी सदर बाब तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती केली आहे.

यासंदर्भात एमएनजीएलजे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी सांगितले आहे की, “एमएनजीएलच्या सर्व ग्राहकांनी तोतयागिरी करुन एमएनजीएलच्या नावाने फसवे कॉल्स करणाऱ्या आणि गॅस बिल भरण्यासाठी काही अँप्स डाऊनलोड करण्यास किंवा लिंकद्वारे विचार करणाऱ्या फसव्या कॉल्सपासून सावध राहावे. एमएनजीएल केवळ देयकावर/बिलावर नमुद केलेल्या बिल प्रदान पद्धतीच्या माध्यमातून म्हणजेत http://www.mngl.in/pay-bill वरुन, भारत बिल पेमेंट सिस्टिम (बीबीपीएस), एनएसीएच, इसीएस, एक्सिस/आयसीआयसीआय बँकच्या शाखेमध्ये धनादेश आणि शिवाजीनगर किंवा चिंचवड येथील एमएनजीएल वॉक-इन सेंटर्समध्ये बिलाची रक्कम स्विकारली जाते. त्यामुळे अशा तोतयागिरीपासून ग्राहकांनी सावध राहावे.”

भाजपाच्या किरीट सोमय्यांनीच देवेंद्र फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा फाडला: नाना पटोले

सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचे कटकारस्थान देवेंद्र फडणवीसांचेच

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची थोर राजकीय परंपरा बिघवणारे ‘खलनायक’.

मुंबई, दि. ६ एप्रिल
भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात अत्यंत खालची पातळी गाठत खूनशी व कपटी राजकारण करुन विरोधकांना संपवण्याचे काम केले. महाराष्ट्रातील काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ब्लॅकमेल केले. भाजपच्या या खूनशी राजकारणावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला आणि आज अखेर सत्य समोर आले. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचणारा दुसरे कोणी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत हे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी यांनीच उघड करत फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा टराटरा फाडला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हटले की, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करावण्यास लावायचे. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेकांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताच त्यांना सन्मानाने संवैधानिक पदे दिली. या सर्व प्रकरणाचा सुत्रधार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या सांगण्यावरूनच आपण काम केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही कटकारस्थान करण्यास फडणवीस यांनीच आदेश दिले होते हे उघड केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली महाराष्ट्रात पद्धतशीरपणे एक रॅकेट चालवले गेले व हे रॅकेट चालवणारा खलनायक देवेंद्र फडणवीस आहेत हे आता लपून राहिलेले नाही.

महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा लाभलेली आहे, या परंपरेला देवेंद्र फडणवीस यांनी कळीमा फासला आहे. विरोधकांना शत्रू समजून त्यांना बदनाम करणे, त्यांची राजकीय कारकिर्द संपवणे, खोटे आरोप लावून नाहक त्रास देणे हे सर्वांमागे फडणवीस यांचाच प्रताप होता. सोमय्या यांनीच सर्व उघड केल्याने भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टचाराविरोधातील लढाई ही केवळ विरोधकांना संपवण्यासाठी होती हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही पण त्यांना ब्लॅकमेल करुन भाजपात सन्मानाने प्रवेश देणार हाच त्यांचा राजकीय अजेंडा आहे हे उघड झाले आह. आता जनताच भाजपाला घरी बसवून त्यांची जागा दाखवतील असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणूकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे -” एआय” चे गारुड!

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मानवी  कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून  सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांवर सध्या धुमाकूळ सुरू आहे. त्यातच भर म्हणून की काय फेसबुक, ट्विटर, यूट्यूब किंवा  व्हॉट्सअँप च्या माध्यमातून  कृत्रिम बुद्धिमत्तेचा(म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआयचा ) वापर मुक्तपणे होत आहे. त्याचे गारुड  आगामी लोकसभा निवडणुकांवर पडले आहे.  या घडामोडी सकारात्मक वाटल्या तरी तो “भस्मासुर” ठरू शकतो अशी स्थिती निर्माण होत आहे. या अनुषंगाने ‘ एआय’ च्या वापराचा मागोवा.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी माहिती तंत्रज्ञान व  समाज माध्यमांवर – सोशल मीडियावर – व्यापक लक्ष दिले असून  प्रचारासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा – ‘एआय’ चा मोठा वापर  करत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  भाषणे आठ  भारतीय भाषांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवली जात आहेत. 2024 मध्ये होत असलेली लोकसभेची निवडणूक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय ची निवडणूक ठरणार आहे असे दिसते.  गेली तीन-चार दशके प्रत्येक लोकसभेच्या  निवडणुकीत वापरले जाणारे तंत्रज्ञान, निवडणुका जिंकण्यासाठी वापरलेली धोरणे, युक्त्या यात सातत्याने बदल होत असून सर्व राजकीय पक्षांकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. निवडणुकांमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाचा आढावा घेतला तर 1990 च्या दशकामध्ये तत्कालीन लोकप्रिय असलेल्या  मोबाईलचा वापर करून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न झाला. . उमेदवाराच्या आवाजामध्ये  रेकॉर्डिंग करून त्याच्या माध्यमातून  मतदार व मोबाईल धारकाला  मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. होलोग्राम सारखे तंत्रज्ञान वापरून  काही निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. गेल्या दोन-तीन निवडणुकांवर लक्ष टाकले तर असे लक्षात येते की समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.  2014 मधील लोकसभा निवडणुका समाज माध्यमातून लढलेल्या निवडणुका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यावेळी फेसबुक हे समाज माध्यम खूप लोकप्रिय होते. भारतीय जनता पक्षाने त्या काळात डिजिटल प्रचारासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च केला होता. त्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष तरुण पिढीपर्यंत पोचल्याने त्याचा लाभ त्यांना झाला. “फेसबुक ” या समाजा माध्यमाला मिळणाऱ्या ‘लाईक्स’ वरून  नेत्यांची लोकप्रियता  ठरली जात होती.  जगभरातील विविध नेत्यांचे अधिकृत फेसबुक   अकौंट (खाते) बनवले जायचे व त्याला मिळणारे फॉलोअर्स किंवा लाईक्स यावरून त्यांच्या लोकप्रियतेचे मोजमाप  केले जात असे. एकेकाळी ट्विटर या समाज माध्यमाचा  जगभरात मोठा वापर केला जात होता. आज  त्याचे नाव ‘एक्स ‘ असे बदलले  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुमारे एक कोटी साठ लाख पाठीराखे जगभर होते. अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पाठोपाठ मोदी यांची लोकप्रियता  जास्त असल्याचे  सांगितले जात होते. 2019 च्या निवडणुकांमध्ये लोकप्रिय निवडणूक प्रचार सल्लागार शिवम शंकर सिंग यांनी “निवडणुका कशा जिंकाव्यात” याविषयीचे एक पुस्तक प्रकाशित केले होते. त्यात त्यांनी व्हॉट्सअप  समाज माध्यम  निवडणुकांच्या प्रसारासाठी किती परिणामकारकरित्या वापरता येईल हे स्पष्ट केलेले होते. केवळ पक्षांचेच कार्यकर्ते नाही तर तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना व्हॉटसअप च्या माध्यमातून प्रचार करणे सोपे जात होते.  भारतासह नायजेरिया व ब्राझील या देशांमध्येही समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता.  अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या समाज माध्यमाचा वापर अत्यंत परिणामकारक रित्या करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाने अलीकडे प्रसृत केलेल्या लक्षवेधी  जाहिराती त्याची साक्ष देतात.

अमेरिकेतही अध्यक्षीय निवडणुकांचे वारे  वहात आहेत. त्यांच्याकडे समाज माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यांच्याकडे रिपब्लिकन व डेमोक्रॅट असे दोन प्रमुख पक्ष आहेत. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन  यांच्या आवाजासदृश्य दूरध्वनी कॉल करून मतदानासाठी न जाण्याचे आवाहन रोबोकॉल  ” एआय”  तंत्रज्ञानाचा वापर करून केले जात होते. अमेरिकेत त्यावर बंदी घालण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले. स्लोव्हाकिया  देशातील निवडणुकीत काही नेते व पत्रकार यांच्यातील  संभाषण ‘एआय’ च्या माध्यमातून तयार करून ते फेसबुक वर प्रसारित करण्यात आले होते. हे संभाषण बनावट होते व त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला होता. गेल्या वर्षी अर्जेंटिना मधील निवडणुकांमध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मतदारांना संभ्रमित करण्यात आलेले होते. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केल्याची  एआय निर्मित प्रतिमा प्रसृत करण्यात आली होती.

भारतातही मध्यप्रदेश किंवा तेलंगण मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘डीप फेक” तंत्रज्ञान वापरून मतदारांना भुरळ घालणाऱ्या छोट्या व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आल्या होत्या. “कौन बनेगा करोडपती”सारख्या लोकप्रिय खेळांचे बनावट व्हिडिओ अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बनवून निवडणुकांचा प्रचार केला गेला. वेळा मतदारांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जाऊन प्रचार केला गेला. ‘ एआय’चा वापर करून  भारतातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात असल्याची उदाहरणे दररोज नव्याने उघडकीस येत आहेत. आत्ताच्या लोकसभा निवडणूकीत  ‘एआय’ चा गैरवापर होईल अशी शक्यता जाणवते.

या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घटना म्हणजे समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या जगातील मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओपन  एआय व मेटा या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘ एआय’ चा वापर करून मतदारांना फसवले जाणार नाही याची दक्षता  घेत असल्याचे जाहीर केले आहे.  ” मेटा” ही  अमेरिकन  बहुराष्ट्रीय कंपनी   मोठ्या प्रमाणावर या बाबत काम करीत आहे. चुकीच्या माहिती प्रसारणावर बंधने घालणे, निवडणुकांबाबतची माहिती  पारदर्शकता आणि जबाबदारीने  प्रसृत करत आहे. यासाठी त्यांनी जागतिक पातळीवर 40 हजार तंत्रज्ञान व्यक्तींना  नियुक्त केले असून 20  बिलियन डॉलर्स  रक्कम तंत्रज्ञान व मनुष्यबळ यासाठी गुंतवलेली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेडस् या समाज माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी(फॅक्ट चेक) त्यांनी  15  हजार “कंटेंट रिव्ह्यूवर” नेमले असून एकूण वीस प्रमुख भारतीय भाषांसह 70 भाषांमध्ये त्याची सतत तपासणी सुरू आहे.  भारतातील समाज माध्यमातील वापरकर्त्यांची प्रचंड संख्या लक्षात घेऊन मेटाने भारतासाठी ‘स्वतंत्र निवडणूक केंद्र’ उभारले असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, इंजीनियरिंग, संशोधन, ऑपरेशन्स कंटेंट पॉलिसी व कायदेशीर बाबींची पूर्तता करणारी यंत्रणा उभारलेली आहे.   ‘ मेटा’च्या विविध समाज माध्यमातून म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम व थ्रेड्स याच्यावर चुकीची  माहिती प्रस्तुत केली जात असेल किंवा ज्या माहितीमुळे मतदारांवर दबाव निर्माण होईल किंवा त्यामुळे त्वरित  दंगे धोपे सुरू होण्यास मदत होईल किंवा हल्ले एकमेकांवर हल्ले केले जातील अशा स्वरूपाची माहिती काढून टाकण्यास  प्रारंभ केला आहे. यासाठी त्यांनी 16 भारतीय भाषांमध्ये 11 भागीदारांशी सहकार्य करार केला असून स्वतंत्रपणे सत्यता तपासण्याची यंत्रणा कार्यरत केलेली आहे. विविध माध्यमांवर ब्रेकिंग न्यूज चा सुळसुळाट झालेला असताना त्यातून चुकीची माहिती प्रस्तुत नाही होऊ नये याची दक्षता ‘मेटा’तर्फे घेतली जात आहे. यासाठी त्यांनी  “स्वतंत्र मेटा कंटेंट लायब्ररी” निर्माण केली असून त्याचा वापर सर्व भागीदार संस्था करत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सध्या जनरेटिव्ह एआयचा दुरुपयोग केला जात असल्याचे लक्षात घेऊन याबाबत अत्यंत गंभीर उपाय योजना हाती घेतल्याचे मेटाने जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी काही समुदाय मानके आणि मार्गदर्शक तत्वे तयार केली असून त्याचे कोठेही उल्लंघन होते किंवा कसे याची दक्षता
घेण्यास  प्रारंभ केला आहे. त्याचप्रमाणे गुगल, ओपन एआय, मायक्रोसॉफ्ट, अडोब, मिडजर्नी किंवा शटर स्टॉक यांच्या माध्यमातून जनरेटिव्ह ए आयचा  वापरून निर्माण केलेल्या छायाचित्रांची छाननी करण्यास प्रारंभ केला आहे.

यासाठी मेटाने खास ग्राहक प्रशिक्षण योजना हाती घेतली असून चुकीची माहिती  प्रसृत केली जाऊ नये म्हणून विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मिसइन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्स ( एमसीए)  यांच्याबरोबर व्हॉट्सअप हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यावर विशेष करून डीप फेक,  संशयास्पद माहिती वर  बारीक लक्ष ठेवलेले आहे. त्यामुळे व्हॉटसअप सारख्या माध्यमातून प्रसृत होणाऱ्या माहिती व बंधने घातली आहेत. पूर्वी कोणताही एखादा संदेश पाच समूहांना पाठवता येत असे आता त्यावर निर्बंध घालून तो एका वेळी  एकाच समूहाला पाठवता येईल अशी व्यवस्था केली आहे. त्या दृष्टिकोनातून व्हॉट्सअप मधील संदेश व माहितीला जास्त खाजगी किंवा प्रायव्हसीला प्राधान्य देण्यात  आले आहे. ‘गुगल’ने ही त्यांच्या यूट्यूब सारख्या समाज प्रसारमाध्यमांवर योग्य ते निर्बंध लादण्यास प्रारंभ केला आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणुकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे गारुड असले तरी चार जूनला निवडणुकांचा निकाल काय लागतोय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.  सध्याच्या माहिती  तंत्रज्ञानाच्या युगात कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना त्यातून बाजूला राहू शकत नाही. मात्र  ‘ एआय’ तंत्रज्ञान वापराचा अतिरेक होऊन आगामी काळात तो “भस्मासुर” ठरणार नाही याची दक्षता  घेऊन सर्वमान्य नियमावली, निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे.

नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार व बँक संचालक आहेत)

विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम महत्त्वाचा-डॉ. शरद कुंटे

पुणे, ता. 6 ः दोन देशांतील संबंध दृढ करण्यासाठी विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञ डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.

फर्ग्युसनच्या जर्मन विभागाला 110 वर्षे पूर्ण होण्याच्या आणि महाविद्यालयाच्या भारत व जर्मनी यांच्यातील 35 व्या विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमात कुंटे बोलत होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. सविता केळकर, हेल्म्बुंडशूल शाळेच्या समन्वयिका आना हान, मॅक्सम्यूलर भवनच्या संचालिका मार्कुस बीचेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुंटे म्हणाले, अशा उपक्रमांतून दोन देशांतील संबंध सुधारण्यास मदत होते. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि उद्योग विषयक संबंध वाढीस लागतात. नवनवीन गोष्टींची माहिती होती. ज्यामुळे दोन्ही देशांच्या विकासाला चालना मिळते.

हान म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यांच्या करिअरला दिशा मिळण्यासाठी स्तुत्य उपक्रम आहे.

या उपक्रमातील अनुभवांवर आधारित दोन पुस्तकांचे या वेळी प्रकाशन करण्यात आले.

बारामती लोकसभा निवडणूकीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

पुणे, दि.६: बारामती लोकसभा संघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांना निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क साधण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय विधानभवन येथील पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीतील तळमजल्यावर सुरू करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांचा दूरध्वनी संपर्क क्रमांक ०२०-२९९९१५३८ आणि आचारसंहिता व नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९९२०६८ असा असून नागरिकांनी निवडणूक विषयक माहिती अथवा तक्रारीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माध्यम कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा संपर्क क्रमांक ०२०-२९९९२०६६ असा आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती द्विवेदी यांनी कळविले आहे.

सद््गुरु श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवारपासून 

 व्याख्याने, संगीतसभा, भजने आणि विविध धार्मिक कार्यक्रम
पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समितीच्या सहभागाने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. ९ ते मंगळवार, दि. 23 एप्रिल २०२४ दरम्यान जंगली महाराज मंदिरात उत्सव होणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम, भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत. 
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. तसेच, सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळ यांनी देखील उत्सवात सक्रिय सहभाग घेतला आहे. मंगळवार, दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता आढाव बंधू यांचे सनईवादन होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, भजन  आणि आरती होणार आहे. 
दिनांक ९ ते २२ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ पर्यंत श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथ अखंड पारायण आयोजित करण्यात आले आहे. 
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. डॉ.भावार्थ देखणे, आनंद पिंपळकर, डॉ.मेधा खासगीवाले, पांडुरंग बलकवडे, डॉ.संजय उपाध्ये, ह.भ.प.योगीराज महाराज पैठणकर, ह.भ.प.गुरुबाबा औसेकर, डॉ.चंद्रशेखर टिळक, शलाका गोटखिंडीकर, डॉ.अनघा भिडे, राहुल सोलापूरकर, डॉ.मालविका तांबे, दिपाली केळकर, ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
तसेच, दररोज रात्री ८ वाजता संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये पं.तुकाराम दैठणकर, विदूषी सानिया पाटणकर, सन्मिता धापटे/चैतन्य कुलकर्णी, अभिनेत्री गात, पं.संजय गरुड, विभावरी आपटे, पं.राहुल देशपांडे, कलापिनी कोमकली, पं.आनंद माडगूळकर, सावनी रवींद्र, गणेश भगत, शाहीर हेमंत राजे मावळे, पं.रामदास पळसुले आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत. सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जंगली महाराजांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर मंगळवार, दि.२३ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

कौशल्य आत्मसात करून स्पर्धेच्या युगात स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा-डॉ.पराग काळकर

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च   महाविद्यालय व कॅड सेंटर पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ‘जॉब पक्का फेअर २०२४’ या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन डॉ.पराग काळकर प्र.कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मोहम्मद उस्माणी डेप्युटी सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, बी.के. खुशवाह डीन ऑफ रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ  सिव्हील इंजिनिअरिंग पुणे , एम.डी. सेलव्हन व्यवस्थापकीय संचालक कॅड सेंटर पु.शिबू पितांबरम चीप ऑपरेटिंग ऑफिसर कॅड सेंटर पुणे, प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे, डॉ.विजय वढई इनोव्हेशन क्लब मेंबर यांचे उपस्थितीत झाले. या प्रसंगी बोलताना डॉ. पराग काळकर यांनी  विद्यार्थ्यांनी  उद्योगक्षेत्राची बदलती कुशल मनुष्यबळाची  गरज लक्षात घेऊन स्वतः मध्ये नवनवीन कौशल्य विकसित करावी. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ऑटोमेशन, आर्टिफिशयल इंटेलिजन्सचे युग आहे. भविष्यात याच तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी उपलब्ध होणार आहेत.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच हे नव तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या तरुणाईमध्ये सामाजिक प्रश्न सोडविण्याची क्षमता आहे.  स्वतःची व  समाजाची शास्वत प्रगती करण्यासाठी या  स्पर्धेच्या युगात डिग्री बरोबर स्वतःमध्ये नवकौशल्य विकसित करून   स्वतःचे वेगळेपण सिद्ध करावे असे आवाहन या प्रसंगी विद्यार्थ्यांना केले.  मोहम्मद उस्माणी यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे अनुभव सांगून मुलाखत  कशी द्यावी, स्वतः मधील चांगल्या गोष्टी ज्यास्त अधोरेखीत कराव्यात  या विषयी मार्गदर्शन केले. श्री. एम.डी. सेलव्हन यांनी कोरोना नंतरच्या काळात  फ्रेशर विद्यार्थ्यांना नोकरीच्या उपलब्ध करून देण्याचे कार्य कॅड सेंटरच्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे या संधीचा विद्यार्थ्यांनी जास्तीत ज्यास्तीत फायदा घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले. सदर जॉब फेअरमध्ये सिव्हील, मेकानिकल, आयटी, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर, डिझाईन इंजिनिअरिंग ,स्टक्चरल इंजिनीअरिंग,बँकिंग,फायनान्स, केपिओ,बिपिओ या सारख्या विविध क्षेत्रातील नामांकित ४५ बहुराष्ट्रीय कंपन्यानी विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी उपस्थिती दर्शविली. सबंध महाराष्ट्रातून या जॉब फेअर साठी ३६२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सदर कार्याक्रमासाठी डॉ.पराग काळकर, श्री. बी.के. खुशवाह, मोहम्मद उस्माणी, श्री. एम.डी. सेलव्हन, .शिबू पितांबरम, डॉ.सुनील ठाकरे, डॉ.विजय वढई,  सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थ्यी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयात  ‘जॉब पक्का फेअर २०२४’ चे आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संस्थेला युवा उद्योजक पुनीत बालन यांची भेट

  • संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन

पुणे : तब्बल शंभर वर्षांपेक्षा अधिक कालावधीहून शहर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कार्यरत असलेल्या ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ या संस्थेच्या कार्यालयास युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाला शुभेच्छा देऊन संस्थेच्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पोलीस आणि अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. याच कृतज्ञतेच्या भावनेतून ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ने पुनीत बालन यांना कार्यालयात निमंत्रित केले होते. त्यानुसार बालन यांनी सोमवार पेठ पोलीस लाईन येथील कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कामाची माहिती घेतली. यावेळी अध्यक्ष विठ्ठल घोरपडे यांनी त्यांचे स्वागत करत संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात जून १९२० रोजी झाली. या संस्थेत पुणे शहरसह, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस, सीआयडी. क्राईम, एसआरपीएफ, अॅन्टीकरप्शन, एस.आय.डी, वायरलेस आणि इतर विभागातील तब्बल १३ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी हे या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या चोख आणि काटेकोर कारभारामुळे २०२१ ला संस्थेला आय.एस.ओ हे मानांकनही मिळाले आहे. या संस्थेच्या संचालक मंडळाची गेल्या महिन्यात निवडणूक झाली. या नवनिर्वाचित संचालकाशीही पुनीत बालन यांनी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. तसेच कार्याचे कौतुक करत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ ही पोलिस बांधवांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तत्काळ मदतीला धावून जाणारी संस्था आहे. या संस्थेच्या आजवरच्या सर्व संचालक मंडळाने केलेल्या उत्तम कारभारामुळं संस्थेचीही भरभराट होत असून नवीन संचालक मंडळही असाच कारभार करुन संस्थेला अधिक उंचीवर नेईल, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा!’’

पुनीत बालन

अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप