पुणे, दि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे महत्व लक्षात घेवून विहित पद्धतीने कर्तव्य पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्यावतीने गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित प्रथम निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षण सत्रास भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार ज्योती देवरे, निवडणूक नायब तहसीलदार चित्रा ननावरे आदी उपस्थित होते.
मतदानाची कार्यपद्धती सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, सर्वसमावेशक आणि सर्वांना सोयीची होईल अशी निवडणूक घेण्यासाठी जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान हा त्यातील महत्वाचा भाग आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदानाच्यावेळी रांगेत उभे न राहता त्वरीत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया, माहिती पुस्तीका याचे अवलोकन करून कामकाज पहावे.
कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्राबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती द्यावी. हेतूपुरस्सर निवडणूक कामकाजाकडे दुलर्क्ष करणे, वेळ न पाळणे अशी बाब आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मतदान केंद्रवर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, रॅम्प अशा सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
श्री. भंडारे म्हणाले, निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा सोहळा आहे. या कामामध्ये न्युनगंड न बाळगता प्रत्येकाने मनापासून सहभागी व्हावे. सर्वांनी मतदान प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. ईव्हीएम यंत्र हाताळण्याचे प्रात्याक्षिक प्रत्येकाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी तीन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. तहसीलदार श्रीमती देवरे यांनी मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.