Home Blog Page 1092

शिवसेना पुणे जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

0

पुणे दि.१६: आज शिवसेना भवन पुणे येथे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, यामध्ये त्यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्या त्या स्थानिक भागातील परिस्थिती समजून घेतली. जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी याकरिता सर्वांनी सोशल मीडियावर स्वतःचे खाते सुरू केले पाहिजे, यामध्ये खास करून ट्विटर, इंस्टा यांसारख्या समाजमाध्यमाचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. लवकरच महायुतीच्या सर्व महिलांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. कोणीही नाराज न होता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी एकजुटीने सर्व महायुतींच्या ऊमेदवारांचा प्रचार करायचा असे यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

शिवसेना पुणे महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बाळासाहेब भवन पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी जिल्हा प्रमुख शैलाताई पाचपुते, कांताताई पांढरे आणि संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे यांनी मनोगत मांडले. याप्रसंगी शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, शिवसेना महिला आघाडीच्या पुणे शहर
महिला सह संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शहर प्रमुख पूजा रावेतकर, शिरूर महिला संपर्क प्रमुख
सारिका पवार,जि. प्रमुख मनिषा परांडे ,
मावळ महिला संपर्क प्रमुख
शैला पाचपुते, पिंपरी चिंचवड महिला शहर प्रमुख सरिता साने ,
बारामती लोकसभा महिला संपर्क प्रमुख
गितांजली ढोणे,
भोर वेल्हा मुळशी महिला जिल्हा प्रमुख
कांता पांढरे , लातुर महिला संपर्क प्रमुख रंजना कुलकर्णी ,
शिवसेना महिला पदाधिकारी
कांचन दोडे, अक्षता धुमाळ, मोहिनी कदम, सुरेखा कदम पाटील, उषाताई शेळके, प्रतिभा करडे , शिवकामगार सेना सुधिर कुरूमकर, शिवसेना पदाधिकारी संजय डोंगरे यांसह अन्य शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग समोरील ‘महालक्ष्मी’ देवीचे घेतले दर्शन

शिवसेना महिला आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘महालक्ष्मी’ देवीचे दर्शन घेतले. येथे त्यांनी चैत्री नवरात्रीतील अष्टमीनिमीत्त विधिवत पूजा केली आणि आगामी निवडणुकीत महायुतीला यश मिळू देत तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचे सरकार येऊ देत असे साकडे देवीला घातले. तसेच राज्यातील शेतकरी, नागरिक यांना शक्ती, उत्तम आरोग्य, सौख्य आणि यश द्यावं, अशी देवी चरणी प्रार्थना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का?

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर साधला निशाणा

करंदी : दहा महिन्यांनी पुन्हा एकदा पक्ष फुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरल. चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवत का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का? असे थेट सवाल करत डॉ. कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला.

खासदार डॉ. कोल्हे आज आंबेगाव शिरुर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत. त्यावेळी करंदी गावात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अशोक पवार, देवदत्त निकम, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर, शंकर जांभुळकर, बाळासाहेब नरके, पांडुरंग थोरात, सनी थिटे, दामुशेठ घोडे, पुजा वळसे पाटील, अशोक भुजबळ, सुजित शेलार, स्मिता ढोकले करंदी बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात डॉ. कोल्हे यांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा, नागपूरकर मुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले अस म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. तर बारामतीकर उपमुख्यमंत्री सात आठ वेळा शिरूर मतदारसंघात आले. भाजपचे मंत्री, शिंदे सेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले. एवढे सगळे मंत्री येऊन गेले, आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री ही येतील. पण माझ्या सर्वसामान मतदाराला कळतय. एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याचा पोराला घेरायला येत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेची नाही. तर सर्वसामान्य जनतेची ताकद आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

कांद्यावरची निर्यातबंदी उठावी यासाठी निलंबन पत्करले, तिकीट मिळावं म्हणून बेडुक उडी  मारली नाही – डॉ. अमोल कोल्हे

कांद्यावरची निर्यातबंदी उठावी यासाठी निलंबन पत्करले, तिकीट मिळावं म्हणून बेडुक उडी  मारली नाही, असं जाहीर वक्तव्य करत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला.

मी पाच वर्षात काय केलं हे विचारता अडीच वर्षे कोरोनामध्ये गेली हे सोयीस्कर विसरल जात. अस सांगत गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत २० वर्षे आणि ५ वर्षे अशी तुलना करणाऱ्यांना चपराक लगावली.दोन एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये पीएम किसान निधी दिला जातो, अर्थात दिवसाला १७ रुपये देऊन शेतकऱ्यांचा अपमान केला जातोय. एकीकडे दोन एकर कांदा उत्पादन करण्याऱ्या शेतकऱ्याचं ७ लाख २० हजार रुपयांचं नुकसान होत आहे. त्यावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी दोन एकरचा हिशोब सांगितला. दोन एकर शेतात २४ टन कांदा उत्पादित केला जातो. एका किलोमागे ३० रुपयांचे नुकसान या केंद्र सरकारने केले अर्थात २४ टनाचे ७ लाख २० हजार रुपयांचे नुकसान होत आहे.त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि मी संसदेत भांडलो सरकारला कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही निलंबन होणे पत्करले पण तिकिटासाठी बेडूकउडी मारली नाही, असा टोला ही कोल्हे यांनी लगावला. आढळरावांनी आपल्या वीस वर्षाच्या कामाचाही लेखाजोखा मांडावा, अस आवाहनही केलं.

८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या गृह मतदान प्रक्रियेत निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती

नागपूर : आयुष्याच्या शेवटच्या पर्वात असणाऱ्या ज्येष्ठ वयोवृद्धांच्या मनातील भावविश्वाचे अनेक कंगोरे या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून समोर आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जे 85 वर्षांपेक्षा अधिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मताचा अधिकार बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे जे वयोवृद्ध अंथरुणाला खिळून आहेत अशांनाही लोकशाहीच्या या कर्तव्यतत्परतेत सहभागी  होता आले, याचे अधिक समाधान असल्याच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया मिळत आहेत.

ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांच्या मातोश्रींचे वय 98 वर्ष आहे. सरस्वती चिंतामणराव मारपकवार या आपल्या मुलासमवेत अंबाझरी परिसरात वास्तव्यास आहेत. गृह मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्याचे समजताच आईलाही मतदानाचा हा आनंद घेता यावा यादृष्टीने आम्ही गृह मतदानाचा फॅार्म भरला. यावर निवडणूक विभागाने निर्णय  घेऊन आज तिच्या गृह मतदानासाठी विशेष पथक पाठवून मतदान करून घेतल्याबद्दल वेगळा आनंद झाल्याची प्रतिक्रिया विक्रम मारपकवार यांनी दिली.

वार्धक्य, आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी निर्माण होतात. इच्छा असुनही त्यांना मतदानाच्या हक्कांपासून वंचित राहावे लागते. हे टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून  85 वर्षापुढील ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाच्या माध्यमातून घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक घेत आहेत.

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मतदानाचा लाभ मिळावा व त्यांनाही मतदान करता यादृष्टीने दिनांक 14 ते 17 एप्रिल या नागपूर लोकसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 1 हजार 204 गृह मतदार तर रामटेक लोकसभा मतदारसंघात  85 वर्षांवरील 889 गृहमतदार आहेत.

दि. 14 एप्रिलपासून नागपूर पूर्व मतदारसंघातून सुरुवात झाली असून ही प्रक्रिया 17 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

जिल्हा निवडणूक अधिका-यांची गृहमतदानस्थळी भेट

जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा.विपीन इटनकर यांनी आज नागपूर लोकसभा मतदारसंघातर्गत होत असलेल्या विविध गृह मतदान स्थळांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदानाची गोपनीयता पाळून भारत निवडणूक आयोगाच्या गृहमतदानाच्या विविध दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना संबंधित मतदान अधिकारी व कर्मचा-यांना केल्या. यावेळी नागपूर शहरचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.

 ” ह्युमन’ ते ‘मिर्झापूर ” या टॉप ५ आकर्षक आणि वेधक वेब-सिरीज

” ह्युमन’ ते ‘मिर्झापूर ” या टॉप ५ आकर्षक आणि वेधक वेब-सिरीज ज्या आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

 अश्या अनेक वेब-सिरीज आहेत ज्यांनी आजवर प्रेक्षकांना मोहित केलं आणि कायम चर्चेत राहिल्या. 
 दिल्ली क्राईम शेफाली शाह स्टारर क्राईम ड्रामा वास्तविक जीवनातील सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरच्या घटनां वर आधारित असलेला ड्रामा आहे. 2012 साली दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेला योग्यरित्या अधोरेखित केल्याबद्दल समीक्षकांची प्रशंसा मिळाली. शेफालीने मालिकेतील तिच्या अभिनयासाठी अनेक प्रशंसा मिळवली, जी OTT प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून उदयास आली. 

 मिर्झापूर ओटीटी वर मिर्झापूर ची चर्चा ही कमालीची आहे. या मालिकेत सत्तेच्या राजकारणाचा खेळ अशा पद्धतीने अधोरेखित करण्यात आला आहे जो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. पुरस्कार-विजेत्या कामगिरीपासून ते आकर्षक कथेपर्यंत, मिर्झापूरने भारतातील एक उत्तम मालिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. 

 ह्युमन एक्स चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांची वैद्यकीय थ्रिलर मालिका ‘ह्यूमन’ ही क्लिनिकल ह्युमन ड्रग ट्रायल्सच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी चर्चेत आली होती. मालिकेला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि तिच्या उत्कृष्ट कथा सांगण्याने आणि आकर्षक कथनाने दर्शकांना प्रभावित केलं. 


 असुर ओनी सेन दिग्दर्शित, ‘असुर’ हा एक मनोवैज्ञानिक गुन्हेगारी थ्रिलर आहे जो फॉरेन्सिक तज्ञांच्या टीमभोवती फिरतो आणि स्वत:ला असुर कालीचा पुनर्जन्म म्हणणाऱ्या सिरीयल किलरला पकडण्याच्या त्यांच्या शोधात आहे. 
 पाताळ लोक ‘पाताळ लोक’ ने नीरज काबी, जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या अभिनय पराक्रमावर प्रकाश टाकला, ज्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याची प्रतिभा निर्माण झाली. या मालिकेने खोलवर परिणाम केला कारण तिने मारेकऱ्याच्या मानसिकतेचा शोध लावला आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची वेगळी बाजू दाखवली.

१८ वीरनारीना इ-बाईक भेट-हुतात्मा सैनिकांच्या पत्नींचा सन्मान 

पुणे :ध्रुव आय टी कंपनी, फोर  पोल्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी  यांच्या संयुक्त विद्यमाने  आणि शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फौंडेशन च्या सहकार्याने एकूण १८  हुतात्मा सैनिकांच्या पत्नींना (वीरनारीना ) ‘कायनेटिक झुलू इ -बाईक’ भेट देऊन त्यांच्या कुटुंबाच्या योगदानाचा  सन्मान करण्यात आला. 
 सेनापती बापट रस्त्यावरील ‘इंद्रप्रस्थ’ येथे झालेल्या एका कार्यक्रमात  नुकतीच ही भेट देऊन सन्मान करण्यात आला. ध्रुव कंपनीचे सहसंस्थापक आणि सी.डी.ओ. मिलिंद बोराटे,फोर पोल्स  इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे अंकुश मल्होत्रा,सौरभ खन्ना यांचे  सहकार्य या उपक्रमाला लाभले.हा अभिनव उपक्रम  वीरनारीपर्यंत पोहोचण्याचे  काम  शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फौंडेशनच्या अध्यक्ष गीता गोडबोले यांनी  केले.सुवर्णा गोडबोले, वैशाली गोळे, सुवर्णा पाटील, प्रतिभा खटके, हर्षदा खैरनार, सोनाली फराटे, अरुणा तारके, विद्या सानप, नीलम शिळीमकर, रेखा खैरनार, उमा गोसावी, दीपाली मोरे, शीतल जगदाळे, मीनाक्षी भिसे, सुस्मिता पालेकर, सुमन पाटील, भारती पिलावरे आणि सुनंदा ठिगळे या वीरनारीना इ -बाईक भेट मिळाली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन  मानसी चौधरी यांनी केले.ध्रुव कंपनीचे  रतनदीप यांनी आभार मानले.
ध्रुव कंपनीच्या  मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष   रतनदीप म्हणाले,’मी  शॉर्ट सर्व्हिसमधून पाच वर्ष सैन्यामध्ये सेवा केलेली आहे. त्यामुळे एका जवानाचे  योगदान किती मोठे  आहे याची   जाणीव आहे. आपण या निमित्ताने हुतात्मा सैनिकांच्या  कुटुंबियांसाठी चांगले काम करू शकलो याचाच खूप आनंद आहे’ 

यूथ आयकॉन आयुष्मान खुरानाची संसदेला भेट!


बॉलीवूड स्टार आणि यूथ आयकॉन आयुष्मान खुराना याने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नवीन संसदेला भेट दिली. आयुष्मानने संसदेचा मार्गदर्शित दौरा केला आणि आपल्या देशाच्या चमकत्या लोकशाहीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेल्या वास्तुशिल्पाचा चमत्कार पाहिला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते म्हणतात, “संसदेला भेट देणे सन्मानाची गोष्ट आहे. या देशाचा अभिमानी नागरिक या नात्याने हा क्षण मी कधीही विसरणार नाही. नवीन संसदेला भेट देण्याचा अनुभव मला अत्यंत समृद्ध करणारा वाटला. संसद ही आपल्या देशातील लोकांची प्रतिनिधी आहे, त्यामुळे संसदेत फिरणे आणि त्याबद्दल खूप काही शिकणे हा माझ्यासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण होता.”

नवीन संसद भारताच्या विविध भागांतील शिल्पांसह भारताच्या वारशाचे सर्वात अनोखे घटक एकत्रित करते, उत्तर प्रदेशमध्ये बनवलेले गालिचे, कोलकाता येथून आलेले 36 किलोचे फौकॉल्ट पेंडुलम, संसदेला एक्स्प्लोर करणे म्हणजे आयुष्मानसाठी सांस्कृतिक वर्गात जाण्यासारखे होते.

आयुष्मान म्हणतो, “हे डोळ्यांसाठी एक रम्य दृश्य आहे कारण ते आपल्या देशाचा अप्रतिम वारसा, आपला सांस्कृतिक इतिहास आणि भारताची चमकदार कारागिरी देखील दर्शवते. हे देशभरातील कलेने भरलेले आहे कारण मला वाटते की सुमारे 400 कारगिरांची कला येथे दाखवण्यात आली आहे ! संसदेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची ही मोठी संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे.”

२९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

गडचिरोली दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता १२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रावरील ७२ निवडणूक पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या ३-एम.आय.- १७ आणि ४-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

डचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे .

प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपतो. सुख दुःखाच्या प्रसंगी याच नात्याची सोबत आपल्याला मिळत असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके यांनी सांभाळली आहे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या अपूर्व यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके ३४ वर्षानंतर ‘लेक असावी तर अशी’  या चित्रपटाच्या निमित्ताने नात्यातील प्रेमाचे पदर उलगडून दाखविण्यास सज्ज झाले आहेत. 

या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच कलाकार,  तंत्रज्ञ  यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.‘लेक असावी तर अशी’ चित्रपटात नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्येकर, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडची या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत. सोबत गार्गी दातार हा नवा चेहरा झळकणार आहे. 

‘चित्रपटातील कुटुंबाच्या प्रेमाच्या नात्यांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल’, असा विश्वास दिग्दर्शक विजय कोंडके यांनी याप्रसंगी व्यक्त केला. ‘विजय कोंडके यांचा चित्रपट’ आणि ‘उत्तम टीम’यामुळे चित्रपट करायला लगेच होकार दिला, असं सांगताना हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास अभिनेत्री नयना आपटे, सविता मालपेकर आणि अभिनेते कमलेश सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. मध्यवर्ती भूमिका देतानाच विजय सरांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी  मोलाचा होता, असं अभिनेत्री गार्गी  दातार  हिने सांगितलं. 

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद विजय कोंडके यांची आहे. छायांकन के अनिकेत  तर संकलन सुबोध नारकर यांचे आहे. विजय कोंडके आणि मंगेश  कांगणे यांच्या गीतांना संगीतकार  मनोहर गोलांबरे यांनी संगीत दिले आहे. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, मंदार आपटे, देवश्री मनोहर, स्वरा बनसोडे यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन  सुजीत कुमार  तर कलादिग्दर्शन  सतीश बिडकर यांचे आहे. कार्यकारी निर्माते सिद्धेश्वर नंदागवळे आहेत. 

‘लेक असावी तर अशी’ चित्रपट २६ एप्रिलला राज्यभरात प्रदर्शित होत आहे.  

पर्यायी व्यवस्थेतून सुमारे ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

पुणे, दि१६ एप्रिल २०२४: महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट २२० केव्ही व हिंजवडी २२० केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या २० वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजता बंद पडला होता. मात्र युद्धपातळीवर पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करून दुपारी १२.०५ ते ३.३६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी तालुक्यातील परिसरातील ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, कोकणातील रोहा येथून महापारेषणच्या कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र कांदळगाव २२० केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास तुटली. त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. तर या उपकेंद्रांवर अवलंबून असलेले महावितरणच्या सुमारे २० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. यात ७० मेगावॅट विजेची पारषेण तूट निर्माण झाली. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे, कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड, माले, माण, मारूंजी, कासारसाई, नेरे, दत्तवाडी, हिंजवडीचा काही भागासह ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

सध्या तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढल्याने ७० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करणे आव्हानात्मक होते. मात्र महापारेषण व महावितरणने संयुक्तपणे युद्धपातळीवर प्रयत्न करून खंडित झालेल्या भागात दुपारी १२.०५ मिनिटांनी पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात सुरवात केली. दुपारी ३.३६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ४५ गावांतील ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला. यात आज दुपारी ३.२५ वाजता तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण झाले. त्यानंतर महापारेषणची कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली व त्याद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा देखील पूर्ववत झाला.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मेळावा

पुणे :  पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना विक्रमी मतांची आघाडी देण्यासाठी शिवाजीनगर विधान सभा मतदारसंघात महाविकास आघाडीने व इंडिया आघाडीने  कंबर कसली आहे. मतदार संघात, जेष्ठ नेते शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आदित्य ठाकरे, उपनेत्या सुषमा अंधारे, नसीम खान यांची जाहीर सभा तसेच रॅली आयोजित करण्यात येणार आहे. राम रामनवमी निमित्त कार्यक्रम व फेरी काढण्यात येणार आहे. शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकाच्या घरी जाऊन धंगेकर यांना मतदान करून लोकशाही जिवंत ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे यासह कोपरा सभा घेऊन   जनसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या उमेदवार धंगेकर यांना आपले मत द्या असे, आवाहन करण्यात येणार आहे, अशा सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

         पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या शिवाजी नगर विधान सभा मतदार संघात प्रचारासाठी   महाविकास आघाडी व इंडिया आघाडी च्या वतीने काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, काँग्रेसचे मनीष आनंद, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, सोशल मीडिया अध्यक्ष गुलाम हुसेन, बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेश वाघ, करुणा घाडगे, प्रवीण डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदय महाले, संजय कुरकुटे, प्रशांत मोरे,आनंद मंजलकर, नारायण पाटोळे, राहुल वंजारी, नाना वाळके, संदीप मोरे, भारत पवार, संजय मोरे, फैयाज शेख, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, संजय मोरे, संदीप मोरे,  यांच्यासह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   सोशल मीडियावर रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करावा, तसेच त्यांना घराघरांत पोहचविण्यासाठी मतदान जागृती करण्यात येणार आहे. पदयात्रा, रॅली,  कोपरा सभा, मेळावे घेऊन धंगेकर यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून धंगेकर यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यात येणार आहे. मोदी सरकार विषयी जनतेत प्रचंड असंतोष आहे, ते मतदानातून जनता दाखवून देणार अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

सुमारे ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. १६ एप्रिल २०२४: महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट २२० केव्ही व हिंजवडी २२० केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या २० वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजता बंद पडला. परिणामी भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी तालुक्यातील परिसरातील ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. दुपारी चार वाजेपर्यंत दुरुस्ती काम पूर्ण होईल व त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती महापारेषणकडून देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, कोकणातील रोहा येथून महापारेषणच्या कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र कांदळगाव २२० केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास तुटली. त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. तर या उपकेंद्रांवर अवलंबून असलेले महावितरणच्या सुमारे २० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे, कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड, माले, माण, मारूंजी, कासारसाई, नेरे, दत्तवाडी, हिंजवडीचा काही भागासह ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

महापारेषणची अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने ७० मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली आहे. मात्र तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत आहे. त्यात ७० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण होईल व साधारणतः ५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने मुळशी तालुक्यातील ४५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. 

पुण्याला मे महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा ? जलसंपदाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे.

पुणे: प्रत्येक वर्षी बहुधा 15 जुलै पर्यंत पाणीसाठा असणार्‍या पुण्याच्या धरण साखळीत यंदा मे अखेर पर्यंत पुरेल एवढा साठा असल्याचे दावे जलसंपदा विभागाकडून काही माध्यम प्रतिनिधीं कडे केले गेल्याने पुण्याला भीषण पाणीटंचाई ला सामोरे जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. वरुण राजाने मेहेरबानी केली तरच यातून पुणेकरांना दिलासा मिळू शकेल असे दिसते आहे. दरम्यान आता यावर जलसंपदा विभागाने अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ १०.२२ टीएमसी इतका अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन, दौंड शहरासाठी आणि शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास, पुणे शहराला जेमतेम ४५ दिवस पुरले एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा येत्या मे व जून या दोन महिन्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधील पाण्याद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या केवळ १०.२२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेला या चार धरणांमध्ये मिळून एकूण १२.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील एकूण पाणीसाठा हा यंदा २.६२ टीएमसीने कमी झाला आहे.

खडकवासला प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी शहराला पिण्यासाठी सुमारे तीन टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणारा हा पाणीसाठा शहराला आणखी केवळ दीड महिना पुरेल इतकाच आहे. जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी १.७० टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते. त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत आहे. यानुसार सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा फार फार तर मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरू शकणार असल्याचे जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

खडकवासला प्रकल्पातील पाण्याची स्थिती (टीएमसीमध्ये)

  • या प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा — २९.१५ टीएमसी
  • सध्या उपलब्ध असलेला साठा — १०.२२
  • गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा — २.६२ टीएमसीने कमी
  • शहराला मंजूर पाणी कोटा (वार्षिक) — १४.६१ टीएमसी
  • प्रत्यक्षात वापरले जाणारे पाणी (वार्षिक) — २०.४९ टीएमसी

जलसंपदा विभागाने केलेले पाणी वाटप नियोजन (वार्षिक)

  • पुणे शहराला पिण्यासाठी पाणी — १४.६१ टीएमसी
  • बाष्पीभवन व वहनव्ययाने कमी होणारे पाणी — २.७२ टीएमसी
  • दौंड शहर व ग्रामीण भागासाठी लागणारे पाणी — ०.८५ टीएमसी
  • सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी — ८.५४ टीएमसी

खडकवासला प्रकल्पांतील धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा (कंसात टक्केवारी)

  • टेमघर — ०. २९ टीएमसी (७.८६ टक्के)
  • वरसगाव — ५.१६ (४०.२७ टक्के)
  • पानशेत — ३.६८ (३४.५३ टक्के)
  • खडकवासला — १.०८ टीएमसी (५४.९४ टक्के)
  • एकूण — १०.२२ टीएमसी (३५.०४ टक्के)

रसिकांची उत्सुकता वाढविलेली कलर्स मराठीवर आणखी एक मालिका… ‘सुख कळले’!!!!!

कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वा.

कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका आपल्या रसिकांच्या भेटीला आणतेय.

या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमाला भरत जाधव, सरिता जाधव, आदेश बांदेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांच्यासोबत मजेदार खेळही खेळण्यात आले.

आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘ सुख कळले!’

सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात नि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे, हे सांगणारी , त्यांच्या निखळ , निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले!’ २२ एप्रिलपासून कलर्स मराठीवर दाखल होतेय. याचे सगळे गोड प्रोमो रसिकांच्या भेटीला आले नि रसिकांनी मालिका पडद्यावर येण्याआधीच मालिकेला आपले करायला सुरूवात केलीय. माधव- मिथिलाच्या भूमिकेत रसिकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या कमाल जोडीचं प्रेक्षक खूप कौतुक करतायत. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं हेही सुखच असणार आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळतेय. मराठी मनोरंजनाच्या इतिहासांत पडद्यावर येण्याआधी रसिकांची लाडकी होणारी “इंद्रायणी” मालिकेनंतर ही दुसरी मालिका आहे, याचा कलर्स मराठीला नितांत अभिमान आहे.

आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असणे म्हणजे सुख नाही. तर कधीकधी दुसऱ्यांच्या सुखातही आपले सुख असू शकते. कधी दुसऱ्याला खुश ठेवण्यातही सुख असते. तर कधी त्यागातही सुख असते. माधव आणि मिथिलाचे सुख कशात आहे? हे सांगणारी कथा म्हणजे ‘सुख कळले’. हीच निःस्वार्थी, निर्मळ प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे २२ एप्रिलपासून आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. यापूर्वीच या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलेयत. त्यामुळे आता प्रतीक्षा लागली आहे ती माधव आणि मिथिलाच्या भेटीची. या मालिकेतील माधव -मिथिला म्हणजेच सागर देशमुख आणि स्पृहा जोशीने याआधीच प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या नवीन जोडीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असून केवळ प्रोमोवरही प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांचा , त्यांच्या प्रेमाचा धुंवाधार वर्षाव होतोय.

स्पृहा व सागरच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत अर्नवी खडसे, सुनील गोडबोले, स्वप्निल परजणे, अनिरुद्ध जोशी, स्वाती देवल, आरती वडगबाळकर, शशांक दर्णे, स्वराध्य देवल आणि स्वाती बोवलेकरसह अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक घराला नि घरातल्या प्रत्येकाला आपली वाटणाऱ्या या मालिकेची कथा कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड आणि नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्राचे आजचे आघाडीचे लेखक – दिग्दर्शक केदार शिंदे यांची असून त्या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली आहे. तर सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर या मालिकेचे खंदे निर्माते आहेत.

बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याच्या अनुषंगाने कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १५ : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग व मुस्कान या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय भवनात आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेस सहायक आयुक्त विशाल लोंढे, विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे, सहायक लेखाधिकारी इंदल चव्हाण, फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन संस्थेच्या समन्वयक श्रीमती किर्ती दिनी, प्रशिक्षक श्रीमती शुभांगी घरबुडे, बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर, समाजकल्याणच्या वसतिगृहांचे गृहप्रमुख, गृहपाल आदी उपस्थित होते.

श्री. लोंढे यांनी वसतिगृहाचे गृहप्रमुख, मुख्याध्यापक, गृहपाल, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांबाबत व बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्याच्या अनुषंगाने कायद्याची माहिती घ्यावी असे आवाहन करुन संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

प्रास्ताविकात श्री. हरसुरे यांनी समाज कल्याण विभागाच्या पुणे कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या वसतिगृह, निवासी शाळांमध्ये ११ ते १४ एप्रिल या कालावधीम घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली. श्रीमती दिनी यांनी फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन संस्थेमार्फत चालणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली. श्रीमती घरबुडे यांनी बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्याच्या अनुषंगाने उपस्थित कर्मचाऱ्यांना माहिती दिली.

मनुष्यबळाच्या माहितीचे ई.आर-१ त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईनरित्या भरण्याचे आवाहन

पुणे, दि. १५ : सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचारी तथा मनुष्यबळाच्या सांख्यिकी माहितीचे (पुरुष / स्त्री एकूण) ई.आर-१ त्रैमासिक विवरणपत्र https//:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने ३० एप्रिलपर्यंत भरावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.

या सेवायोजनक्षेत्र माहितीचा उपयोग हा योजनाबद्ध आर्थिक विकासात वेगवेगळे प्रकल्प तयार करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी होत असतो. ही माहिती राज्यातील सांख्यिकी विभाग व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाकडे दर तिमाहीस पाठविली जाते.

प्रत्येक तिमाहीनंतर https//:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-१ ऑनलाईन सादर करण्यासाठी यापूर्वीच प्रत्येक आस्थापनांना युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्याचा त्यांनी वापर करावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे दूरध्वनी क्रमाक (०२०-२६१३३६०६) वर संपर्क साधावा, असे आवाहनही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.