पुणे: प्रत्येक वर्षी बहुधा 15 जुलै पर्यंत पाणीसाठा असणार्या पुण्याच्या धरण साखळीत यंदा मे अखेर पर्यंत पुरेल एवढा साठा असल्याचे दावे जलसंपदा विभागाकडून काही माध्यम प्रतिनिधीं कडे केले गेल्याने पुण्याला भीषण पाणीटंचाई ला सामोरे जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. वरुण राजाने मेहेरबानी केली तरच यातून पुणेकरांना दिलासा मिळू शकेल असे दिसते आहे. दरम्यान आता यावर जलसंपदा विभागाने अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ १०.२२ टीएमसी इतका अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन, दौंड शहरासाठी आणि शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास, पुणे शहराला जेमतेम ४५ दिवस पुरले एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा येत्या मे व जून या दोन महिन्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधील पाण्याद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या केवळ १०.२२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेला या चार धरणांमध्ये मिळून एकूण १२.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील एकूण पाणीसाठा हा यंदा २.६२ टीएमसीने कमी झाला आहे.
खडकवासला प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी शहराला पिण्यासाठी सुमारे तीन टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणारा हा पाणीसाठा शहराला आणखी केवळ दीड महिना पुरेल इतकाच आहे. जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी १.७० टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते. त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत आहे. यानुसार सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा फार फार तर मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरू शकणार असल्याचे जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
खडकवासला प्रकल्पातील पाण्याची स्थिती (टीएमसीमध्ये)
- या प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा — २९.१५ टीएमसी
- सध्या उपलब्ध असलेला साठा — १०.२२
- गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा — २.६२ टीएमसीने कमी
- शहराला मंजूर पाणी कोटा (वार्षिक) — १४.६१ टीएमसी
- प्रत्यक्षात वापरले जाणारे पाणी (वार्षिक) — २०.४९ टीएमसी
जलसंपदा विभागाने केलेले पाणी वाटप नियोजन (वार्षिक)
- पुणे शहराला पिण्यासाठी पाणी — १४.६१ टीएमसी
- बाष्पीभवन व वहनव्ययाने कमी होणारे पाणी — २.७२ टीएमसी
- दौंड शहर व ग्रामीण भागासाठी लागणारे पाणी — ०.८५ टीएमसी
- सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी — ८.५४ टीएमसी
खडकवासला प्रकल्पांतील धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा (कंसात टक्केवारी)
- टेमघर — ०. २९ टीएमसी (७.८६ टक्के)
- वरसगाव — ५.१६ (४०.२७ टक्के)
- पानशेत — ३.६८ (३४.५३ टक्के)
- खडकवासला — १.०८ टीएमसी (५४.९४ टक्के)
- एकूण — १०.२२ टीएमसी (३५.०४ टक्के)