पुणे, दि. १५ : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग व मुस्कान या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय भवनात आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेस सहायक आयुक्त विशाल लोंढे, विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे, सहायक लेखाधिकारी इंदल चव्हाण, फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन संस्थेच्या समन्वयक श्रीमती किर्ती दिनी, प्रशिक्षक श्रीमती शुभांगी घरबुडे, बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर, समाजकल्याणच्या वसतिगृहांचे गृहप्रमुख, गृहपाल आदी उपस्थित होते.
श्री. लोंढे यांनी वसतिगृहाचे गृहप्रमुख, मुख्याध्यापक, गृहपाल, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांबाबत व बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्याच्या अनुषंगाने कायद्याची माहिती घ्यावी असे आवाहन करुन संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
प्रास्ताविकात श्री. हरसुरे यांनी समाज कल्याण विभागाच्या पुणे कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या वसतिगृह, निवासी शाळांमध्ये ११ ते १४ एप्रिल या कालावधीम घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली. श्रीमती दिनी यांनी फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन संस्थेमार्फत चालणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली. श्रीमती घरबुडे यांनी बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्याच्या अनुषंगाने उपस्थित कर्मचाऱ्यांना माहिती दिली.