Home Blog Page 1093

राजकीय जाहिरातींच्या बल्क एसएमएसचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

खासगी एफ.एम. वाहिन्यांनीही जाहिरात प्रसारणापूर्वी प्रमाणीकरण झाल्याची खात्री करावी

पुणे, दि. १५ : निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हाईस मेसेजेस यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच रेडिओ आणि खासगी एफएम वाहिन्यांसाठीही या तरतुदी लागू असून जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबींचा खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, जिल्हा दळणवळण आराखड्याच्या समन्वय अधिकारी शमा पवार आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. निवडणूक प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रचाराचं संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे सर्व माध्यमातून होत असलेल्या निवडणूक प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वप्रमाणिकरण न करता बल्क एसएमएस पाठविले जात असल्याचे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जाहिरात प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणतीही पोस्ट नागरिकांनी समाजमाध्यमांवरुन करू नये. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीएमसी) जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून सर्वोपचार रुग्णालयासमोर, पुणे ४११००१ दूरध्वनी क्र. ०२०-२६१२१३०७, ई-मेल diopune@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अमेरिकेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


अमेरिका (जर्सी सिटी, NJ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेमध्ये आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जर्सी सिटी मधील सिटी हॉलमध्ये विशेष ध्वजारोहन करण्यात आले. या समारंभात अमेरिकेच्या राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीने सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या निळा ध्वजाचेही दिमाखात ध्वजारोहन करण्यात आले. त्यामुळे शहराच्या समानतेच्या तत्त्वांशी एकता दर्शवणारा एक आनंदाचा क्षण होता. कार्यक्रमाप्रसंगी कौन्सिलवुमन मीरा प्रिंझ-एरे आणि कौन्सिलमन जेम्स सोलोमन उपस्थित होते. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी हा ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडतो. ध्वजारोहनाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM) ही भारताबाहेरील आंबेडकरी जनतेची सर्वात जुनी संघटना, जर्सी सिटी हॉलच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कोथरूडमधील सट्टेबाजांची टोळी पकडली :आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा

पुणे-आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गजाआड केले आहे कोथरूड मधील . उजवी भुसारी काॅलनी परिससरातील एका इमारतीत सदरची कारवाई करण्यात आली. सट्टेबाजांकडून मोबाइल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुकेशकुमार शैलेंद्रकुमार साहू (वय २४), देवेंद्र कमलेशकुमार यादव (वय २१), जसवंत भूषणलाल साहू (वय २२), राहुलकुमार गणेश यादव, रोहितकुमार गणेश यादव (वय २६), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (वय २३), संदीप राजू मेश्राम (वय २१), अखिलेश रुपाराम ठाकूर (वय २४), मोहम्मद ममनून इस्माइल सौदागर (वय ३२), अमित कैलास शेंडगे (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्यां आरोपीची नावे आहेत. आरोपी साहू, यादव, सोनकर, ठाकूर, मेश्राम मूळचे छत्तीसगडचे आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार प्रवीण ढमाळ यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कोथरुडमधील उजवी भुसारी काॅलनी परिसरातील पटेल टेरेस इमारतीत आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. तेथून लॅपटाॅप आणि मोबाइल संच असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील पुढील तपास करत आहेत.

माझ्या विधानाचा विपर्यास,महिला सक्षमीकरण माझ्या राजकारणाचा प्रमुख भाग -शरद पवार

सातारा -बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विषयी मी जे वक्तव्य केले, ते अजित पवार यांच्या विषयी मला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केले होते. वास्तविक मी कायमच महिलांचा सन्मान केला आहे. देशामध्ये सर्वात आधी महिला आरक्षण लागू करण्याचा निर्णय मी घेतला होता. खासगी क्षेत्रातील महिलांसाठी आरक्षणाचा निर्णय देखील मी घेतला होता. मी केंद्रात संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलांमध्ये महिलांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी कायमच महिलांचा सन्मान केला असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. मात्र, या सर्व स्पष्टीकरणामागे सुनेंत्रा पवार यांच्या विषयी शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आहे. सुनेत्रा पवार या पवार घराण्यातील नसून बाहेरून आलेल्या उमेदवार असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यामुळे आता शरद पवार यांनी स्वतः याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.शरद पवार यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविषयी घरातील पवार व बाहेरचे पवार असे वाद्ग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. पण आता स्वतः पवारांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी आपण नेहमीच मोठे काम केल्याचेही ते म्हणालेत.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे तसेच सून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यातच अजित पवार विरुद्ध शरद पवार यांचा थेट लढा या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात आमचे नाणे खणखणीत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार हे कायम आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. येथील मतदार हे पुरोगामी विचारांचे असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे हे विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्रासह 25 राज्यांत यंदा चांगला पाऊस…

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सांगितले की, यावेळी जून ते सप्टेंबरपर्यंत मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहील. हवामान विभाग (IMD) सरासरीपेक्षा 104 ते 110 टक्के पाऊस चांगला मानतो. हे पिकांसाठी चांगले लक्षण आहे.

IMD ने म्हटले आहे की 2024 मध्ये 106% म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो. 4 महिन्यांच्या पावसाळी हंगामासाठी दीर्घ कालावधीची सरासरी (LPA) 868.6 मिलीमीटर म्हणजेच 86.86 सेंटीमीटर आहे. म्हणजे पावसाळ्यात इतका एकूण पाऊस पडला पाहिजे.

यापूर्वी 9 मार्च रोजी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मान्सूनचा अंदाज जाहीर केला होता. याचा अर्थ जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 96 ते 104 टक्के पाऊस पडू शकतो.

मॉन्सून साधारणपणे केरळमार्गे 1 जूनच्या सुमारास भारतात येतो. 4 महिन्यांच्या पावसानंतर म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटी तो राजस्थानमार्गे परततो.

25 राज्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षितः केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव.

4 राज्यांमध्ये सामान्य पाऊस अपेक्षित: छत्तीसगड, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख.

6 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षितः ओडिशा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.

हवामानाशी संबंधित दोन महत्त्वाच्या गोष्टी…

  1. हवामानाच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग सुरुवातीला (जून-जुलै) मंद असेल, परंतु त्याची भरपाई दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) होईल. आयएमडीने सांगितले की, मान्सूनबाबतचा पुढील दृष्टिकोन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
  2. शास्त्रज्ञांच्या मते, मुसळधार पाऊस असलेल्या दिवसांची संख्या कमी होत आहे, तर खूप मुसळधार पाऊस असलेल्या दिवसांची संख्या, म्हणजेच कमी कालावधीत खूप मुसळधार पाऊस असलेल्या दिवसांची संख्या वाढत आहे. वारंवार येणारे दुष्काळ आणि पूर हे याचे कारण आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात 48 मिमी कमी पाऊस झाला होता

गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 25 सप्टेंबरपासून मान्सूनचे प्रस्थान सुरू झाले आणि 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण पंजाब, हरियाणा, दिल्लीसह जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून मान्सून निघून गेला होता.

IMD नुसार 2023 मध्ये 820 मिमी पाऊस झाला होता. साधारणपणे 868.6 मिमी पाऊस पडतो म्हणजेच गेल्या वर्षी 48 मिमी कमी पाऊस झाला होता. याआधी सलग 4 वर्षे सामान्य किंवा जास्त पाऊस पडत होता.

आयएमडी आणि स्कायमेटचे मान्सूनचे अंदाज गेल्या 5 वर्षात कितपत अचूक होते?

स्कायमेटचा अंदाज 2019 ते 2023 या पाच वर्षांत एकदाच खरा ठरला. स्कायमेटने 2023 मध्ये 94% पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि त्या वर्षी तेवढाच पाऊस झाला होता. IMD चा अंदाज 2% ने कमी होता. 2021 मध्ये, IMD ने 98% पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि पाऊस जवळपास समान (99%) होता. तर 2019, 2020 आणि 2022 मध्ये, स्कायमेट आणि IMD या दोघांचा अंदाज वास्तविक पावसापेक्षा कमी-जास्त होता.

अर्थव्यवस्थेसाठी चांगला पाऊस आवश्यक आहे

देशातील एका वर्षातील एकूण पावसापैकी 70% पाऊस फक्त मान्सूनमध्ये पडतो. देशातील 70% ते 80% शेतकरी पिकांच्या सिंचनासाठी पावसावर अवलंबून असतात. म्हणजेच मान्सून चांगला असो वा वाईट याचा थेट परिणाम उत्पन्नावर होतो. जर मान्सून खराब असेल तर कमी पिके घेतली जातात, ज्यामुळे महागाई वाढू शकते.

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे 20% आहे. त्याच वेळी, कृषी क्षेत्र देशाच्या निम्म्या लोकसंख्येला रोजगार प्रदान करते. चांगला पाऊस म्हणजे सणासुदीच्या आधी शेती करणाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते.

एल निनो काय आहे

एल निनो हा हवामानाचा नमुना आहे. यामध्ये समुद्राचे तापमान 3 ते 4 अंशांनी वाढते. त्याचा प्रभाव 10 वर्षांत दोनदा येतो. त्याच्या प्रभावामुळे जास्त पाऊस असलेल्या भागात कमी पाऊस आणि कमी पाऊस असलेल्या भागात जास्त पाऊस होतो. एल निनोमुळे भारतात मान्सून अनेकदा कमकुवत असतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.

स्कायमेटचा अंदाज – या वर्षी सामान्य मान्सून: राजस्थान, मध्य प्रदेशसह 23 राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल.

हवामान संस्था स्कायमेटने मंगळवारी 9 एप्रिल रोजी सांगितले की यावेळी मान्सून सामान्य असेल. म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी किंवा सामान्य पाऊस पडेल. हवामान विभाग (IMD) 96 ते 104 टक्के पाऊस सरासरी किंवा सामान्य मानतो. हे पिकांसाठी चांगले लक्षण आहे.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर…

पुणे

पुणे-दि,१५ एप्रिल – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीतील सर्व चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख लोकांची तसेच काही विविध संघटनांचे प्रमुख कलाकारांची बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, राष्ट्रवादी सांस्कृतिक प्रदेश उपाध्यक्ष अभिनेत्री गार्गी फुले, मनसे चित्रपट आघाडीचे अभिनेते पिट्या परदेशी, भाजप चित्रपट आघाडीचे अजय नाईक,ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे योगेश सुपेकर ,नाट्य परिषदेचे अशोक जाधव,अनिल गुंजाळ, नृत्य परिषदेचे आशुतोष राठोड, सुप्रसिद्ध निवेदक संदीप पाटील, राष्ट्रवादी सांस्कृतिक चे अध्यक्ष विजय राम कदम, कार्याध्यक्ष राजीव पाटील, तमाशा परिषदेचे मोहित नारायणगावकर ,अभिनेत्री प्रतीक्षा जाधव, आयली घीया, माधवी मोरे, स्वाती हनमघर ,तेजस्विनी पायगुडे, गायिका रीमा रंजन, मनसे चित्रपट आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष चेतन धोत्रे, हे सर्वजण उपस्थित होते.

भाजपा सरकारकडून पोलीसांच्या मदतीने गडचिरोलीतील नैसर्गिक संपत्ती लुटण्याचे काम.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देऊन शेती साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून लुटले.

गडचिरोली मतदारसंघाचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ नाना पटोलेंची जाहीर सभा.

गडचिरोली, दि. १५ एप्रिल
काँग्रेस व इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी, दलित, भटके, विमुक्त जातीच्या लोकांसाठी न्याय पत्रात दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. वन हक्क कायद्याचे सर्व प्रलंबित दावे एका वर्षाच्या आत निकाली काढणे व नाकारलेल्या दाव्यांचे पुनरावलोकन ६ महिन्यांत केले जाणार आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा संकल्प काँग्रेसच्या न्यायपत्रात असून बहुजनांच्या कल्याणासाठी काँग्रेसने विचार करुन जाहिरनामा बनवला आहे. भाजपा आदिवासींना वनवासी म्हणून अपमानीत करून त्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवते परंतु आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीनच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.

गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ देसाईगंज तालुक्यातील सभेत ते बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले की, गडचिरोलीमध्ये नैसर्गिक संपदा मोठ्या प्रमाणात आहे पण ही नैसर्गिक संपदा भाजपा सरकार पोलिसांच्या मदतीने लुटत आहे, सुर्यागडमधील सोने लुटले जात आहे, वनसंपदा तोडून टाकत आहेत. लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात, नैसर्गिक संपत्तीची ही लूट थांबवायची आहे. काँग्रेसची सत्ता आली की ही लूट थांबवून गडचिरोलीला आर्थिक राजधानी बनवू.
नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देतात पण खताच्या किंमतीमध्ये हजार रुपयाने वाढ झाली आहे, ट्रॅक्टरला डिझेल लागते तेही महाग केले, बियाणे, औषधे याच्याही किमती वाढवल्या आणि शेती साहित्यावर १८ टक्के जीसटी लावून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. श्रीमंत व सामान्य शेतकरी दोघांनाही १८ टक्केच जीएसटी लावला जातो. मोदी सरकारच्या १० वर्षांच्या सरकारमध्ये महागाई चारपटीने वाढली, १५ लाख बँक खात्यात जमा करणार होते ते दिले नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले नाही, मग कशाला पुन्हा नरेंद्र मोदींना मतदान करायचे? असा प्रश्न विचारून भाजपा गरिबांना ५ किलो मोफत धान्य देऊन तुमचा हक्काचा रोजगार हिरावून घेत आहे व सर्वसामान्य जनतेला गुलाम बनवत आहे, असे पटोले म्हणाले.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यात सर्व जाती धर्मांचा विचार करुन त्यांना न्याय देणारे न्याय पत्र बनवले आहे. राहुल गांधी यांनी पदयात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढला. शेतकरी, कामगार, रोजंदारी करणारे, आदिवासी, ओबीसी दलित, महिला, तरुणांचे दुःख पाहिले व त्यातून या ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी या एका व्यक्तीच्या नाहीत तर पक्षाच्या आहेत व सत्तेवर येताच त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासनही नाना पटोले यांनी दिले.
या प्रचार सभेला अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ यांना भाजपचा AB Form मिळाला.

पुणे-भारतीय जनता पार्टी-महायुतीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पार्टीकडून AB Form सुपूर्द करण्यात आला. पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्री. मकरंद देशपांडे यांच्या हस्ते हा Form मोहोळ यांना देण्यात आला. यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी !

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरेटीचा दस्तावेजच आहे. हे संकल्प पत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्यासाठीचा जणू रोड मॅपच दिलेला आहे.

जनसंघ आणि त्यानंतर आमच्या पक्षाच्या प्रत्येक संकल्पपत्रात अयोध्येत श्री राम मंदीर बांधणे आणि काश्मिरमधील ३७० कलम हटवण्याबरोबरच समान नागरी देशात आणण्याचा संकल्प पक्षाने केला होता.

देशातील मतदारांनी पंतप्रधान मोदीजींवर विश्वास ठेवून केंद्रात बहुमताने सलग दोन वेळा सरकार निवडून दिले आणि देशवासीयांना अयोध्येत रामाचे दर्शन घेता येऊ लागले, तसे काश्मिरमध्ये मुक्तसंचार करता येऊ लागला आहे. पुढील पाच वर्षात समान नागरी कायद्यासह काही मोठी उदिष्ट ठेवली आहेत. ती सर्व पूर्ण होतील, या मोदीजींच्या गॅरेंटीवर देशवासीयांचा आणि पुणेकरांचा विश्वास आहे. देशवासीयांच्या विश्वासावरच हे मोदीजींच्या गॅरेंटीचे संकल्पपत्र देशवासियांसमोर मांडले आहे.

-मुरलीधर मोहोळ, उमेदवार, भाजपा-महायुती, पुणे लोकसभा

भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप-माधव भांडारी

पुणे-लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप असल्याचे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

भांडारी म्हणाले, ‘जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र आहे. या संकल्पपत्रात दहा वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला आहे. अशी भूमिका या आधी कोणत्याही राजकीय पक्षाने मांडली नाही. दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला.’

भांडारी पुढे म्हणाले, ‘२०४७ पर्यंत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा संकल्प करण्यात आला आहे. युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संकल्प पत्रात समावेश करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.’

समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू व्हावा ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत असेही भांडारी म्हणाले.

पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं -डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला.

खेड – नटसम्राट म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे चांगलेच भडकले त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रतिहल्ला करत पलटी सम्राट आणि खोके सम्राट असा उल्लेख केला. पलटी सम्राट आणि खोके सम्राट पेक्षा कधीही नटसम्राट चांगलं असं म्हणत अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिहल्ला केला आहे.

खेड तालुक्यातील सांडभोरवाडी – काळूस जिल्हा परिषद गटात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू होता. दरम्यान काळूस गावात बोलताना खासदार डॉ. कोल्हे यांनी वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील समाधीबाबत देखील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि पालकमंत्री अजित पवार यांना घेरलं. ते म्हणाले की एवढे वर्षे समाधी वढू बुद्रुक – तुळापूरला असताना काहीजण अनेकवर्षे खासदार होते, तुम्ही एवढे वर्षे पालकमंत्री होतात, मग मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो की, तुम्ही आजपर्यंत या समधीस्थळाला एकही रुपया का दिला नाही ?

कलाकार म्हणून जी कला सादर केली, त्यामाध्यमातून माझ्या राजाचा इतिहास १५७ देशांमध्ये पोहचवला. ज्याला तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवता ना, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला. सगळी प्रलोभने असताना दहा – दहा वेळा इकडे ये असे फोन असताना, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वाशी आणि विचारांशी प्रामाणिक राहिलो, भूमिका कोणी बदलली हे सर्वांनाच माहीत आहे. नटसम्राट आणि कार्यसम्राट असलेलं चांगलं पण पलटी सम्राट आणि खोके सम्राट यापेक्षा नटसम्राट कधीही चांगल. असा जाहीर सवाल उपस्थित करत अजित पवार यांच्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिहल्ला केला आहे.

पुढे ते बोलताना म्हणले की, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागायला येणाऱ्यांना आता प्रश्न विचारला पाहिजे की दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला कसं पंतप्रधान करायचं ? शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार घरी बसवण्याची हीच ती वेळ आहे. १० वर्षे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली अजूनही माती कलवायची नाही म्हणून आता हे सरकार उलथून टाकण्याची ही वेळ आली आहे. असे म्हणत भाजपच्या केंद्र सरकार देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले.

यावेळी अशोक खंडेभारड, बाबाजी काळे, अतुल देशमुख, हिरामण अण्णा सातकर, सुधीर मुंगसे, अमोल पवार, रामदास धनवटे, शिवाजीराव वर्पे, राजमाला बुट्टे, मनीषा सांडभोर, योगेश पठारे, विशाल झरेकर, वर्षा ताई सांडभोर, नीलिमा राक्षे, उषा बोराडे, अलका जोगदंड, सोमनाथ मुंगसे, राहुल गोरे, शामराव कड, गणेश पवळे, रोहिदास पवळे, दिगंबर लोणारी, विलास कुटे, रुरेश चव्हाण, मुचुकून जाधव, दत्ता पोटावडे, संजय कदम, दत्ता मोरे, राधताई अरगडे, नितीन दौंडकर, पवन जाचक यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच !जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला अधिक रंगात आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या ‘सोबतीचा करार’ या संगीत मैफलचेही आयोजन यावेळी करण्यात आले. यात स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर, पवनदीप राजन यांचाही सहभाग होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी ‘काय चुकले सांग ना?’ या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्याच्या काही ओळी गायल्या.

‘जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !” ट्रेलरवरूनच हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे, हे कळतेच. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु तीच चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न ट्रेलर पाहून मनात उद्भवतो. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ चे यतिन जाधव निर्मित ‘जुनं फर्निचर’ची कथा, पटकथा, संवाद महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ‘’ जुनं फर्निचर… या नावातच चित्रपट काय आहे, याचा संदर्भ लागतो. अनेक घरांमध्ये हल्ली असे चित्र दिसतेय. बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणूनच संबोधले जातेय आणि याबाबतचा किस्सा मी स्वतः पाहिला आहे. त्यातूनच मला हा विषय सुचला. मी या चित्रपटाबद्दल एकच सांगेन ‘जुनं फर्निचर’ला कमी समजू नका. त्यांच्यात जी ताकद आहे, ती आताच्या तकलादू फर्निचरमध्ये अजिबात नाही. ही ताकद फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही तितकीच खमकी आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नक्की पाहावा, त्यातून कदाचित मुलांचा दृष्टीकोन बदलेल.’’

मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार माझे नातेवाईक – खासदार बारणे

पिंपरी, 15 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत, असे उद्गार शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत काढले. देशाची सुरक्षितता व गतिमान विकास यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील बहुतांश नागरिकांची भावना आहे. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात मी केलेले काम आणि मतदारसंघात सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे आपण विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराबाबत माहिती देण्यासाठी महायुतीच्या वतीने कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, भाजपच्या शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, मावळ मतदार संघ समन्वयक सदाशिव खाडे, रासपचे कार्याध्यक्ष परमेश्वर बुरले, उपाध्यक्ष अजित चौगुले तसेच अमित गोरखे, सुजाता पलांडे, नामदेव ढाके, अनुप मोरे, राजू दुर्गे, नीलेश तरस, मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, नारायण बहिरवाडे, राजेश पिल्ले, संजय मंगोडेकर, कुणाल वाव्हळकर आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा खासदार बारणे यांनी यावेळी सादर केला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नात्यागोत्याचे राजकारण केले जात असल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता बारणे म्हणाले की, या मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक व हितचिंतक आहेत.

विरोधी उमेदवाराबद्दल पत्रकारांनी छेडल्या असता बारणे म्हणाले की, मला तर विरोधी उमेदवाराचे नाव देखील माहित नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला विरोधी उमेदवाराचे नाव समजेल.

उमेदवारी अर्ज 22 तारखेला भरणार

आपण 22 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असून त्यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बारणे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच विविध मंत्र्यांच्या मावळ मतदारसंघात सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीकडे स्टार प्रचारकांची मोठी यादी आहे. त्यापैकी निश्चित होतील त्या सभांची वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले.

महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, या एकाच भावनेने सर्वजण मेहनत घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मावळमधील सहाही आमदार महायुतीचे आहेत. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुतीच्या ताब्यात आहेत, यापूर्वी शिवसेना, भाजपा, आरपीआय युती होती. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही सामील झाल्याने ही महायुती झाली आहे. त्यात मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, याकडेही बारणे यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

राज्यात होणार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

युवकांच्या बेरोजगारीबद्दल पत्रकारांनी विचारले असता बारणे म्हणाले की, याबाबत भाजपच्या जाहीरनाम्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सव्वातीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत विविध उद्योगांशी नुकताच करार केला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.

पुणे- लोणावळा लोहमार्गाचे चौपदरीकरण, महामेट्रोचा मार्ग विस्तार, रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, नवी मुंबई येथे होत असलेले नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, विस्थापितांचे पुनर्वसन, पासपोर्ट सेवा केंद्र, पवना बंद जलवाहिनी योजना, क्रांतिवीर चापेकर बंधूवरील टपाल तिकीट तसेच स्मारकासाठी निधी, संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न, रेड झोन, पवना व इंद्रायणी सुधार योजना, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न, शास्ती कर माफी, नियोजित देहूरोड ते बालेवाडी उड्डाणपूल अशा विविध विषयांबाबत बारणे यांनी यावेळी माहिती दिली.

पार्थ पवार यांनाही प्रचारासाठी निमंत्रण – बारणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी गेल्या निवडणुकीत पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आपल्या प्रचाराला येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. पार्थ पवार यांना आपण स्वतः मावळमध्ये प्रचारासाठी निमंत्रित करणार आहोत. पार्थ यांच्या आई बारामतीतून निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांच्यावर सध्या मोठी जबाबदारी आहे, असे बारणे म्हणाले.

लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा

पुणे- मातंग समाजाच्या मागण्यांसाठी लढणा-या लहुजी शक्ति सेनेने सोमवारी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुती ला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महायुतीचे समन्वयक आ.प्रसाद लाड, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, लहुजी शक्ति सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, विष्णू कसबे, सचिन क्षीरसागर आदी उपस्थित होते. आ.शेलार यांनी लहुजी शक्ति सेनेच्या नेते आणि पदाधिका-यांचे मोदी परिवारात स्वागत करत पाठिंब्याबद्दल लहुजी शक्ति सेनेचे आभार मानले.
आ.शेलार म्हणाले की मोदींचा परिवार म्हणजे वंचितांचा, गरीबांचा परिवार आहे. या परिवारात सहभागी झालेल्या प्रत्येक घटकाच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अविरत झटत आहे. मातंग समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करणारी लहुजी शक्ति सेना आज महायुतीमध्ये सामील झाल्याने आमचे हात अधिक मजबूत झाले आहेत. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून समाज विकास करण्यासाठी भाजपा पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे ही आ.शेलार म्हणाले.
याप्रसंगी बोलताना लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे म्हणाले की उपेक्षित, वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते, असा विश्वास असल्यानेच आमच्या संघटनेने भाजपा ला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. याआधीही अण्णाभाऊ साठे स्मारकाचे रखडलेले काम सुरू करून स्मारकासाठी 300 कोटींपेक्षा अधिक निधी देणे, बंद झालेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळासाठी निधी देणे, अण्णाभाऊ साठे संशोधन, प्रशिक्षण संस्थेचे निर्माण आदी पुढाकार घेऊन भाजपाने मातंग समाजाप्रतीची त्यांची बांधिलकी दर्शवली असल्याचे ही ते म्हणाले. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची संघटना जीवाचे रान करेल असा शब्द यावेळी त्यांनी दिला.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

पुणे,दि.१६ : शिरुर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त २ हजार २७३ क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत अवसरी येथील तंत्रनिकेतनच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

दोन सत्रात पार पडलेल्या या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना श्री. शिंदे यांनी अधिकारी व कर्मचारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत माहिती दिली. कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक कामकाज अत्यंत जबाबदारीने पार पाडावे आणि कर्तव्य करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिकात सर्व संबधितांनी सहभागी व्हावे. मतदान प्रक्रिया निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यात येऊन मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडावे, असे आवाहन श्री.शिंदे यांनी केले.

प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी मतदान यंत्राबाबत उपस्थितींना माहिती दिली. प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळावीत. प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिकाच्या आधारे मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी, यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी चुका होणार नाहीत, अशी सूचना श्री.शिंदे यांनी केली. यावेळी सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे सादरीकरणाच्या माध्यमातून निरसन करण्यात आले.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना ‘लोकगौरव’ पुरस्कार

पुणे, दि. १५ एप्रिल २०२४: येथील लोकमान्य सोसायटीच्या वतीने महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना ‘लौकगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणच्या पुणे परिमंडलातील ग्राहकसेवा व वितरण यंत्रणेतील लोकाभिमुख सुधारणांसाठी प्रशासन विभागातून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.