Home Blog Page 101

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता मालेगाव येथील इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला शिवाजी महाराज आदरणीय आहेत, पण त्याचसोबत टिपू सुलतान यांचे कार्यही विसरता येणार नाही. इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का? असा सवाल आसिफ शेख यांनी उपस्थित केला आहे.

आसिफ शेख म्हणाले, टिपू सुलतान फक्त वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना विरोध केला जात आहे. मग भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळला जातोय? इंग्रजांविरोधात देशासाठी लढताना बलिदान देणाऱ्या टिपू सुलतान यांचा जर फोटो लावला तर त्यामध्ये गैर काय आहे? असाही सवाल शेख यांनी केला आहे.

पुढे बोलताना आसिफ शेख म्हणाले, टिपू सुलतान देशद्रोही होते का? त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. इंग्रजांविरुद्ध देशातून पहिला आवाज हा टिपू सुलतान यांनीच उठवला. त्यांच्या कार्याची दखल भारतीय संविधानाने घेतली आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना एवढे वाईट का वाटते आहे? त्यांना तिरस्काराचे राजकारण करायचे आहे, दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत.

शहरातील शांतता कायम राहावी यासाठी आम्ही तो फोटो मागे घेतला, परंतु भाजप त्यावर एवढा गोंधळ का करतेय? जो पाकिस्तान भारतावर हल्ला करतोय, भारतात दहशतवाद पसरवतोय त्यांच्याशी आपण क्रिकेट का खेळतोय? यांना फक्त कोट्यवधी रुपये कमवायचे आहेत म्हणून हे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतात. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे बंद करावे, अशी मागणी आसिफ शेख यांनी केली.

पुढे बोलताना आसिफ शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श आहेत. पण 2014 नंतर देशात जातीयवादी आणि धार्मिक राजकारण सुरू झाले. त्या माध्यमातून विशिष्ठ एका धर्माला निशाणा केला जात आहे. भाजपला भारतीय संविधान बदलायचा आहे, पण ते तसे करू शकत नाहीत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना करून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. सपकाळ यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचे घाटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

धीरज घाटे यांनी शनिवारी सायंकाळी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली. पुण्यात पतित पावन संघटनेने रविवारी सकाळी काँग्रेस भवनसमोर आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

या प्रकरणी बोलताना धीरज घाटे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदूविरोधी टिपू सुलतान याच्याशी तुलना करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पुणे शहर भाजपा या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहे.

यावेळी नगरसेवक राघवेंद्र बापू मानकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दृष्यंत मोहोळ, नगरसेविका स्मिताताई वस्ते, महेश वाबळे, अमर आवळे, नगरसेविका सई थोपटे, माजी सरचिटणीस गणेश घोष, विशाल पवार आणि योगेश जावीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतर निर्णयाचा पुनर्विचार व्हावा – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी ‘कलाकार कट्टा’ गुडलक चौक येथे भेट देत, सध्यस्थितीतील वस्तुस्थिती, वाहतुकीचे नियोजन, जागेची पाहणी करून कलाकार कट्टा स्थलांतरास विरोध दर्शवत कलाकारांना पाठींबा दिला. हा कट्टा गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून कार्यरत आहे. हा कट्टा केवळ एक भौतिक जागा नसून, तो कलाकार, कवी, लेखक, चित्रकार, संगीतकार, नाट्यकर्मी, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी मुक्त संवादाचे व्यासपीठ आहे.
भाजप माजी नगरसेविकांच्या संकल्पनेतून गुडलक चौकातील कलाकार कट्टा साकारण्यात आला आहे. मात्र, या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या कारणावरून भाजपच्याच नगरसेवकांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना कलाकार कट्टा स्थलांतरीत करण्यासंबधी लेखी पत्र दिले आहे. त्या अनुषंगाने नगरसेवक श्री. हर्षवर्धन मानकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून, स्थलांतरामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या अडचणी, कलाकारांवरील परिणाम, आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम याबाबत उपस्थित कलाकारांशी चर्चा केली. सदरप्रसंगी बोलताना नगरसेवक हर्षवर्धन मानकर म्हणाले,”कलाकार कट्टा हे पुण्यातील सांस्कृतिक वारसा आहे. याचे स्थलांतर म्हणजे कलाकारांच्या आणि कला रसिकांच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो. नगरपालिकेने स्थानिक नागरिकांचा आणि कलाकारांचा सल्ला घेतल्याशिवाय अशी पावले उचलू नये. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना स्थलांतर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी पत्र व्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात टिपू सुलतान यांच्या विटंबनेची तक्रार- फडणवीस व भाजपा आणि PPS वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे-पुण्यात टिपू सुलतान यांच्या विटंबनेविरोधात स्वाती विलास गायकवाड (रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फौजदारी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुणे येथील भाजपा व पतित पावन संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांच्या विरोधात जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे, दंगल घडविणे व महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांना भारतीय संविधानाने शपथ घालून दिली आहे की कायदा व सुव्यवस्था ते अबाधित ठेवतील; परंतु त्यांनी जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सरपणे दंगली घडवण्याच्या हेतूने प्रथम स्वातंत्र्यसैनिक मा. टिपू सुलतान यांना “नराधम” असे संबोधून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केलेल्या काळात टिपू सुलतान यांनी हजारो-लाखो हिंदूंची हत्या केल्याची खोटी दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
त्याचा आधार घेऊन पुणेभाजपा व पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे बेकायदेशीररीत्या जमाव जमवून दंगल घडवून मनुष्यहानी व वित्तहानी केली व टिपू सुलतान यांच्या चित्राची विटंबना करून त्यांच्या चित्रावर काळे फासले तसेच सार्वजनिक रस्त्यावर आक्षेपार्ह वक्तव्ये केली.
जातीय मानसिकतेतून समाजकंटकांनी, जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने, दंगल घडविण्याच्या उद्देशाने आणि मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या गुन्हेगारी हेतूने सदरील महापुरुष टिपू सुलतान यांच्या बॅनरला काळे फासून विटंबना केली तसेच बॅनर फाडून छिन्नविछिन्न केला. टिपू सुलतान यांचा फोटो भारतीय संविधानात आहे असे असताना चुकीचा इतिहास सांगून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सरकारमार्फत केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर कृत्यामुळे माझ्या धार्मिक भावना, सामाजिक भावना आणि संवैधानिक निष्ठा गंभीरपणे दुखावल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हजरत टिपू सुलतान हे महान स्वातंत्र्यसैनिक, दलित स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षक आणि जातीय ‘स्तनकर’ संपवून समानतेचा लढा देणारे समाजसुधारक असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यांच्या विटंबनेमुळे जातीय व धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे SC/ST अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील (POA Act) कलमे लागू होतात, असे तक्रारीत नमूद आहे.
सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, नागरी हक्क संरक्षण कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या वेळी अ‍ॅड. तोसिफ शेख, आय. टी. शेख, अ‍ॅड. क्रांती सहाणे, अ‍ॅड. सुरज जाधव, अमान पठाण, जाकीर नदाफ, अ‍ॅड. आदिल दातारांगे व इतर नागरिक उपस्थित होते.

महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडी 

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्केश्वराची पूजा
पुणे : बारा ज्योतिर्लिंगची चित्रे… बदाम, मनुके, द्राक्षे यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांनी सजलेली चक्क्याची शंकराची पिंडी आणि रेखीव असा उमा शंकराचा चक्क्याचा मुखवटा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात साकारण्यात आला. बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात तयार केलेली १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडी व लीना भागवत तसेच लता व प्रमोद भगवान यांनी जागेवर तयार केलेला हा मुखवटा पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नाली पंडित, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, कुणाल टिळक, यांसह नितीन पंडित यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.

मंदिरातील पुरुषोत्तम वैद्य गुरुजी यांचा मार्गदर्शनाखाली सेवेकरी उमेश धर्माधिकारी, प्रताप बिडवे, अशोक दोरुगडे, शोभा गादेकर, नंदकुमार चिप्पा, वैभव निलाखे, वासंती घडशी आदींनी चक्क्याची शंकराची  पिंडी आणि आरास दोन तासात साकारली. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन ही चक्केश्वराची पूजा साकारण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंडी साकारण्यात आली. भगवान शंकराच्या मुखवट्याची प्रतिकृती हे विशेष आकर्षण होते. तसेच बारा ज्योतिर्लिंगची चित्रे देखील मंदिरात लावण्यात आल्याने भक्तांना एकाच ठिकाणी दर्शन मिळाले. या चक्क्याचे श्रीखंड करून मंदिरातील भक्तांना आणि सामाजिक संस्थांमध्ये देण्यात येईल.

सन २०२२ मध्ये महाशिवरात्रीला उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री दत्त मंदिरात ही पिंड साकारण्यासाठी स्वतः सहभाग घेतला होता याची विशेष आठवण अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितली. 

महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सह विविध पदांची भरती!

पुणे- महापालिकेतील विविध संवर्गातील एकाकी पदांची सरळसेवा भरती केली जाणार आहे. प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, अशा एकूण १३ पदाची भरती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला आहे. नुकतीच या प्रस्तावाला स्थायी समितिने मान्यता दिली आहे. आता १८ तारखेच्या मुख्य सभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे.

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेतील विविध संवर्गातील ही आहेत  एकाकी पदे आणि त्यांची केली जाणार आहे भरती

१) त्वचारोग तज्ञ (वर्ग-१) – एस २३

२) एड्स नोडल ऑफिसर (वर्ग-१) – एस २३

३) न्यूरोसर्जन (वर्ग-१) – एस २३

४) युरोसर्जन (वर्ग-१) – एस २३

५) रक्तसंक्रमण अधिकारी (वर्ग-१) – एस २३

६) अॅनेस्थेटीस्ट (अॅनेस्थेटिक रजिस्ट्रार) (वर्ग-२)  – एस २०

७) जीवशास्त्रवेत्ता (वर्ग-२) – एस १५

८) उप मुख्य अग्निशमन अधिकारी (वर्ग-१)  – एस १७

९) विभागीय अग्निशमन अधिकारी (वर्ग-२) – एस १७

१०) सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी (वर्ग-२) – एस १६

११) राजशिष्टाचार अधिकारी (प्रोटोकॉल ऑफीसर) (उप नगरसचिव (वर्ग-२) – एस १५

१२) सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी (वर्ग-३) – एस १४

१३) मत्सालय पर्यवेक्षक /अॅक्वेरियम असिस्टंट (वर्ग-३) – एस ८

परीक्षेचे स्वरूप :-

अ) कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करावी लागेल. प्रत्येक प्रश्नास एकूण (१०० प्रश्न) जास्तीत जास्त २ गुण ठेवण्यात येतील.
ब) ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा गट – ब (अराजपत्रित), गट – क व गट – ड मधील अन्य सर्व पदांकरीता उमेदवारांची निवड करताना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून २०० गुणांची परीक्षा घेण्यात यावी. अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवतेनुसार शिफारस करण्यात येईल.
इ) ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अहर्ता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.

ऑनलाईन परीक्षा :

पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागाचे पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

१) उपरोक्त २०० गुणांच्या ऑनलाईन पध्दतीने होणा-या परीक्षेसाठी एकत्रितपणे २ तासांचा कालावधी अनुज्ञेय राहील.
२) ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरुप, भाषा, सामान्यज्ञान, बुध्दिमत्ता चाचणी, तांत्रिक ज्ञान यांचेशी संबंधित राहील. उपरोक्त वर्ग-१ ते वर्ग-३ पदाकरीता २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

शासन निर्णयातील नमूद तरतुदीनुसार प्रवेश शुल्क – – खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु १०००/-, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु ९००/-

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील टप्पा क्र. ३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य, (वर्ग-३) मधील १६९ पदे, मे. IBPS संस्थेमार्फत भरती प्रक्रिया चालू आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील  वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त पदे प्राधन्यक्रम निश्चित करून IBPS संस्थेमार्फत मागील तीन टप्प्यातील भरती प्रक्रिया पाहता पुढील टप्प्यातील भरती प्रक्रिया IBPS संस्थेस देणे उचित ठरेल. असे प्रस्तावात म्हटले आहे.

नगरसचिव विभागात रुजू होण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ; आदेश देऊनही कर्मचारी हजर होईनात

पुणे-महापालिका निवडणूक झाल्यानंतर आता महापालिका सभागृह अस्तित्वात आले आहे. महापौर आणि नगरसेवक यांची आता महापालिका भवनात लगबग सुरू झाली आहे. हे सर्व व्यवस्थापन करण्यासाठी नगरसचिव विभागाची कसरत असणार आहे. त्यासाठी विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार विभागाला 38 कर्मचारी देण्यात आले. मात्र हे कर्मचारी नगरसचिव विभागाकडे रुजू होण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आता सामान्य प्रशासन विभागाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिका सभागृह आणि महापौर कार्यालय यांचे सर्व नियोजन हे नगरसचिव विभाग करतो. प्रशासक असताना विभागातील कर्मचारी इतर ठिकाणी बदलण्यात आले होते. सभागृह अस्तित्वात येण्या अगोदर हे कर्मचारी माघारी बोलवण्यात आले होते. शिवाय नुकतीच नगरसचिव अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानुसार ३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या नगरसचिव विभागाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी १७ कर्मचारी अजूनही विभागात रुजू झाले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस नगरसचिव विभागाने केली आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने कारवाई करण्याचा इशारा रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

या कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई आणि बिगारी यांची संख्या जास्त आहे. विभागाकडे आता जास्त काम असणार आहे, त्यामुळे हे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत, अशी चर्चा केली जात आहे.

तुरळक दगडफेक आणि ८ किरकोळ जखमी,पण पोलिसांनी दोन्ही बाजूंना आपसात भिडू दिलेले नाही -सहपोलीस आयुक्त

पुणे- सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, भाजपने कॉंग्रेस भवनावर केलेल्या आंदोलनात तुरळक दगडफेक झाली ,८ किरकोळ जखमी झाले ,पण पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आपसात भिडू दिलेले नाही.

काँग्रेसभवनात लाठ्या काठ्या ,कार्यकर्ते कोणी का जमा केले- भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे

पुणे-काँग्रेस भवनात लाठ्या काठ्या जमवून कार्यकर्ते जमा करून भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला गेल्याचा भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचा आरोप

टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणे ही जिहादी मानसिकता:टिपू शिवरायांच्या पायाशीही येऊ शकत नाही, नीतेश राणेंचा सपकाळांवर हल्लाबोल

सपकाळांचा नवा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही

मुंबई-

टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही जिहादी मानसिकता दर्शवते. टिपूने लाखो हिंदूंना धर्मांतर केले, मंदिरे नष्ट केली आणि केवळ इस्लाम प्रसारावर लक्ष केंद्रित केले. तो आमच्या शिवरायांच्या पायाशीही येऊ शकत नाही, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानबाबतच्या वादग्रस्त विधानावर टीका केली आहे.

नीतेश राणेंनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काढून फक्त टिपूचे लावले तर बघू, महाराष्ट्रातील मावळे त्यांना कसे परवानगी देतात. हर हर महादेव! असे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आहे, असे वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे.

फडणवीस म्हणाले की, टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांच्या तुलनेबद्दल सपकाळांनी माफी मागितली पाहिजे. काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचंदेखील संशोधन केलं पाहिजे. सपकाळ लिहू पाहत असलेला इतिहास महाराष्ट्र, भारत खपवून घेणार नाही.
मंत्री नीतेश राणेंनी पोस्ट करत म्हटलंय की, टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात.. ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिर तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळ पास पण येऊ शकत नाही ! काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काडून टिप्या चे लाऊन दाखवावे मग बघु शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ! हर हर महादेव ! असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह धीरज घाटे आणि भाजपच्या दंगेखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा -सपकाळ

देवेंद्र फडणविसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत; याचा प्रत्यय आज पुण्यात आला: हर्षवर्धन सपकाळ

नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या पोस्टर्स, बॅनर्सवर टिपू सुलतानचा फोटो देवेंद्र फडणवीसांना कसा चालतो? धर्मांध आमआयएमशी युती चालते का?

छत्रपती शिवाजी महाराजांचाबद्दल सावरकर व कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याबदद्ल भाजपा त्यांचे पुतळे कधी जाळणार?

मुंबई, दि. १५ फेब्रुवारी २०२६

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, आन, बान, शान आहेत, त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे. भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही. एपस्टिन फाईल्समध्ये भाजपाच्या नेत्यांची नावे आली आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार कराराचा मुद्दा आहे आणि राज्यातही ज्वलंत मुद्दे आहेत, या मुळ मुद्यांना बगल देण्यासाठी भाजपाकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून “ध” चा “मा” करून राज्यात दंगली घडवायच्या आहेत, याचा प्रत्यय आज पुण्यात आला, असे सणसणीत प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले आहे.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर वर्धा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे, समाजात द्वेष पसरवला जात आहे, या पार्श्वभूमीवर सर्व महामानवांचे फोटो कार्यालयात सोबत लावावेत का ? आणि विशेष छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचे फोटो आजूबाजूला असावेत का या मागणीकडे आपण कसे बघता ?” असा प्रश्न पत्रकारांनी मला विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मी वक्तव्य केले होते – पण “ध” चा “मा” करण्याची देवेंद्र फडणवीसांची जुनी खोड जागी झाली आणि त्यांनी माझ्या विधानातून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याची संधी शोधली. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली, त्यांना गजनी म्हटले, त्यावेळी ते म्हणाले होते, कोण हर्षवर्धन सपकाळ, मी त्यांना ओळखत नाही. पण काल मात्र त्यांना माझ्या नावाने तावातावात बोलत गरळ ओकली. प्रत्येक बाबतीत जात व धर्म आणणे हा भाजपाचा जुना फंडा आहे. भाजपा माझ्या वक्तव्याला हिंदू मुस्लीम रंग देऊन खतपाणी घालत आहे. पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपच्या या गुंडगिरीचा आम्हा तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगेखोर भाजप गुंडाना चिथावणी देणा-या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगेखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे असे सपकाळ म्हणाले.
सपकाळ पुढे म्हणाले की, मला माफी मागायला लावण्याची भाषा माफीवीरांचा पक्ष करत आहे. परंतु टिपू सुलतानच्या मुद्द्यावर बोलताना भाजपा व देवेंद्र फडणवीस हे विसरत आहेत की, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या बॅनर्स व पोस्टर्सवर टिपू सुलतानचे फोटो होते. भाजपाने राज्यात अमरावती चंद्रपूरसह 21 ठिकाणी धर्मांध एमआयएमशी युती केली आहे, हे भाजपाला चालते, मग आताच काय झालं. भाजपा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा आणणार व 17 तारखेला माझे पुतळे जाळणार आहे, अशी माहिती मिळत आहे. मग सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याला ‘काततीय योग’ (कावळा बसायला आणि फांदी तुटायला….) असे म्हटले आहे. सावरकरांनी महाराजांबद्दल जे विकृत लिखाण केले आहे तसेच भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, त्याबद्दल भाजपा सावरकर व कोश्यारी यांचे पुतळे जाळणार का? असा माझा प्रश्न आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पुण्यात भाजपच्या कॉंग्रेसभवन वरील हल्लाबोल आंदोलनासमयी दगडफेक: कार्यकर्त्यांसह पोलिस अन् पत्रकारही जखमी

पुणे-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी स्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. भाजपने या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठवील आहे. या प्रकरणी पुण्यात त्यांच्याविरोधात एक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या विधानाविरोधात येथील काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यांनी जवळपास दीड तास आंदोलन केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचेही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अचानक दगडफेक झाली. त्यात एक महिला व पुरुष कार्यकर्ता जखमी झाला. त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत होता. हे चित्र पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे एकच धावपळ उडाली. या राड्यात घटनास्थळी उभ्या असणाऱ्या काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. तसेच महिला पोलिसाही जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला.

दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने काँग्रेस भवनावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. या बंदोबस्तातच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. पण पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना अभय दिले. या घटनेत काही कारच्या काचाही फुटल्या आहेत. तसेच काँग्रेसची एक महिला कार्यकर्ती व कार्यकर्ताही जखमी झाला आहे. यावेळी काही पोलिसांनाही दगड लागलेत, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर केलेल्या दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत पत्रकार देखील जखमी झालेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.


महापौरांच्या उपस्थितीत दगडफेक – प्रशांत जगताप

काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी भाजपच्या आंदोलनाचा निषेध केला. ते म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी 6 महिन्यांत दुसऱ्यांदा काँग्रेस भवनावर हल्ला केला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आज आमचा एक कार्यकर्ता व कार्यकर्ती जखमी झाली. महापौरांपुढे ही दगडफेक केली जात होती. त्या उघड्या डोळ्याने तमाशा पाहत होत्या. त्यांच्या समोर ही दगडफेक केली जात होती. त्यांच्या समोर या कार्यालयाच्या आवारातील गाड्या फोडण्यात येत होत्या. त्याला महापौरांनी मूक संमती दिली. त्यामुळे महापौर मंजुषा नागपुरे व भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणी कुणाच्या तरी मृत्यूला जबाबदार होण्याकरिता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे.

आम्ही या प्रकरणी फरासखाणा पोलिस स्टेशनपुढे आम्ही आंदोलनाला बसणार आहोत. या प्रकरणी जे पोलिस दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि ज्यांनी हे आंदोलन केले आणि पुणेकरांना वेठीस धरले त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा किंवा जखमी होण्याकरिताचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी फक्त तमाशा पाहिला. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी दोन तास रस्ता रोखून धरल्यानंतरही त्यांनी भाजपच्या लोकांवर कारवाई केली नाही. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असा आमचा आरोप आहे, असे प्रशांत जगताप म्हणाले.

फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणा शिकवू नये अशा शब्दात टिपू सुलतान विषयी भाजपने उठविलेल्या गदारोळावर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच फडणवीसांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या भागनडीत पडू नये असा टोलाही हाणला आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते.
ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. संविधानाच्या मूळ प्रतिवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे, असे ते म्हणालेत.

टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालत होता:भाजपचे पूर्वी टिपूवर प्रेम होते, आता तो त्यांच्यासाठी वाईट झाला – काँग्रेसचा दावा

मुंबई-काँग्रेसने टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या मुद्यावरून भाजपने केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. या प्रकरणी काँग्रेसने भाजपचे टिपू सुलतानवरील प्रेम दर्शवणारे विविध दाखले दिले आहेत. भाजपचे पूर्वी टिपू सुलतानवर प्रेम होते, पण आता ध्रुवीकरणाच्या अजेंड्यामुळे आज तो त्यांच्यासाठी वाईट झाला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावरून भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असून, सपकाळ यांच्या माफीची मागणी केली आहे. पण काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपची ही टीका जोरकसपणे फेटाळून लावत भाजपचेच टिपू सुलतानवर प्रेम असल्याचा दावा केला आहे.

शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान

सचिन सावंत म्हणतात, टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण खालील पुराव्यानिशी दिलेल्या उदाहरणांवरून उघड होईल.
2012 – अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव “शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान” ठेवण्याचा ठराव भाजपानेच मांडला. सूचक: माजी महापौर व सध्याचे भाजपाचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख व माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल.
2013 – मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला “शहीद टिपू सुलतान मार्ग” नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपाचे नगरसेवक दुथडी भरून उपस्थित तर होते पण सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नाव वर दिसेल बरं!
2001 – अंधेरी (प) येथे “शेरे म्हैसूर टिपू सुलतान” मार्ग नामकरण. भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजपा नगरसेवकांच्या मांदियाळीत ठराव एकमताने मंजूर.
भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले.
2017 – कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाकरिता गौरवोद्गार काढले होते.

भाजपाला आधी प्रेम होते पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता आज टिपू सुलतान वाईट झाला या दुटप्पीपणाला काय म्हणावे? आणि हो टिपू सुलतान आपल्या हातात भगवान श्रीरामांचे नाव लिहिलेली अ़गठी घालत होते बरं, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.