Home Blog Page 100

व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? कुठे चालला आहे समाज आपला :शर्मिला ठाकरेंचे सवाल

मुंबई-मनसे च्या शर्मिला राज ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. व्हायरल व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? आपला समाज कोणत्या दिशेला चाललाय? असा परखड सवाल त्यांनी या प्रकरणी केला आहे.

राज्यात सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर अनेक महिलांनी अशोक खरातने आपण बेशुद्धावस्थेत असताना आपले लैंगिक शोषण केल्याचा दावा केला आहे. पण शर्मिला ठाकरे यांनी हाच धागा पकडत कोणत्या व्हिडिओमध्ये महिला बेशुद्ध दिसतात? असा तिखट सवाल उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी महिलांना अशा भोंदूबाबांपासूर स्वतःला दूर ठेवण्याचेही आवाहन केले.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, महिलांनी सर्वप्रथम भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. आमचे 13 आमदार आले होते, तेव्हा आमच्याकडे भोंदूबाबांसाठी अनेकजण आले होते. हे भोंदूबाबा स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. पण आम्ही कुणाच्याही पाया पडत नाही. या लोकांनी आमच्यासोबत फोटो काढून लोकांना आम्ही त्यांचे भक्त आहोत असे सांगितले तर आम्ही तिथे येऊन त्यांच्या कानशिलात हाणणार. त्यामुळे आमच्याकडे कुणी येतच नाही.भोंदूबाबा फसवतात म्हणजे काय? तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले असतील. त्यात कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला. काय आहे हे? काय चाललंय हे? आपला समाज कोणत्या दिशेला चालला आहे?, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या मते, अशोक खरात हा पीडित व त्यांच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी या सगळ्या गोष्टींची भीती दाखवून पैसा उकळत होता. विशेषतः महिलांना त्यांच्या कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून व बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने महिलांचे शोषण केले. त्याचप्रकारे ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात हातचलाखी करून स्वत:कडे दैवीशक्ती असल्याचे सांगून तो समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचेही काम करत होता. पण आता पीडित महिला व त्यांचे कुटुंब मोठ्या धाडसाने समोर आलेत. त्यांच्याच मदतीने त्याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत.

पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करा -मेधा कुलकर्णी

लव्ह जिहाद पीडित महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान -पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करा -मेधा कुलकर्णी

पुणे-खासदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरलेल्या महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत समाजात जनजागृती करून पीडित महिलांना समुपदेशन, पुनर्वसन आणि आवश्यक मदत दिली जाईल.या अभियानासाठी लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या माध्यमातून पीडितांना त्वरित संपर्क साधता येईल.तसेच पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करावा अशीही मागणी यावेळी मेधा कुलकर्णी यांनी केली .

यावेळी त्यांनी सायली सुर्वे या महिलेच्या ‘घरवापसी’चे यश नमूद केले. सायलीचा पती आतिफ तासे याच्यावर 28 गुन्हे दाखल असून, त्याला तातडीने अटक करून सायलीला घटस्फोट मिळावा अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. सायलीवर मानसिक दडपण असून, तिच्या चार मुलांना आणि आई-वडिलांनाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

सायली सुर्वेला ‘घरवापसी’नंतरही पोलीस संरक्षण मिळाले नाही, यावर कुलकर्णी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक पोलिसांनी वेळीच संरक्षण दिले असते तर तिच्या सासरच्यांनी तिला बळजबरीने परत नेले नसते, असे त्या म्हणाल्या. सायलीच्या मानसिक स्थितीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

सायलीने सासू गुलशन तासे हिच्या विरोधात दबावाखाली दिलेला जबाब पोलिसांनी ग्राह्य धरू नये, असेही कुलकर्णी यांनी म्हटले. गुलशन तासेवर अनेक गुन्हे दाखल असून, तिच्या चार सुना हिंदू आहेत आणि काहींनी सासूविरोधात तक्रारीही केल्या आहेत. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र सरकारने बळजबरीने धर्म बदलण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जाणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!

रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत असून, येत्या ११ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्याचा प्रयोग रंगणार आहे.

अमेय विनोद खोपकर सादर करत असलेलं हे नाटक, एव्हीके पिक्चर्स आणि सीजी ग्रुप यांच्या निर्मितीतून साकारलं आहे. दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नेटक्या दिग्दर्शनातून आणि लेखक श्रीनिवास भणगे यांच्या खुसखुशीत लेखणीतून उभं राहिलेलं हे नाटक प्रेक्षकांना पोट धरून हसवतानाच जीवनातील नातेसंबंधांवरही भाष्य करतं. संगीतकार अजित परब यांच्या सुरांनी नाटकात अधिकच रंगत आणली असून स्वाती खोपकर, दिनेश खंडागळे आणि निनाद नं बत्तीन या नाटकाचे निर्माते आहेत. यात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांसारखी लोकप्रिय कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.

कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, ”रंगभूमी ही जिवंत माध्यम आहे. प्रेक्षकांचा श्वास, त्यांचं हसणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया यामुळे प्रत्येक प्रयोग नव्याने घडतो. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा सादर करताना आम्ही त्यात आजच्या काळाची झलक आणि अधिक परिपक्वता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक ”प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही, तर त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवेल.’

निर्माते अमेय विनोद खोपकर म्हणतात, ”चांगल्या आशयाला वेळेची मर्यादा नसते. हे नाटक आधी गाजलं कारण त्यात प्रामाणिकपणा होता आणि आजही तो तितकाच जिवंत आहे. नव्या पिढीसाठी आणि जुन्या रसिकांसाठी आम्ही हे नाटक नव्या उर्जेसह सादर करत आहोत. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा रंगभूमीचा आनंद घ्यावा, हीच आमची इच्छा.”

निर्माते दिनेश खंडागळे म्हणतात, ”अशा दर्जेदार नाटकाची निर्मिती करत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. चांगल्या आशयाच्या प्रकल्पातूनच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करावं, असं नेहमी वाटत होतं आणि ते या नाटकाच्या निमित्ताने साध्य झालं. या नाटकाची संपूर्ण टीम अतिशय उत्तम आहे. नाटकाला आधीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे, त्यामुळे अशा लोकप्रिय नाटकाचा भाग होता येत असल्याचा मला विशेष आनंद आहे.”

एकूणच, हास्य आणि भावनांचा समतोल साधणारं ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत नाट्यरसिकांना कुटुंबासोबत हलकंफुलकं आणि दर्जेदार मनोरंजन अनुभवायला मिळणार आहे.

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा रोखल्याने तणाव

आमदार गोपीचंद पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम; पोलिसांचा कडक बंदोबस्त


पुणे-पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ पोलिसांनी मधेच रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे. या मोर्चाअंतर्गत आयोजित केलेली बाईक रॅली खडी मशीन चौकापर्यंत जाणार होती आणि तिथे गोपीचंद पडळकर यांची सभा होणार होती. मात्र पोलिसांनी ही रॅली नियोजित स्थळापूर्वीच अडवल्याने गेल्या दीड तासांपासून आमदार पडळकर आणि संग्राम जगताप पुढे जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आज पहाटेपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शिवतीर्थ सासवड येथून निघालेली ही भव्य बाईक रॅली कोंढव्यातील खडीमशीन चौकापर्यंत जाणार होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक सहभागी झाले असून, मार्गावर तैनात असलेल्या मोठ्या पोलीस फौजफाट्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून कोंढव्यातील संबंधित संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच भिवरी ग्रामस्थांवर दाखल केलेले कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आक्रमक मागणी करण्यात येत आहे. या मागण्यांसह पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणातील अन्यायावरही या आंदोलनाद्वारे भूमिका मांडली जाणार आहे.

पुणे आरटीओकडून २०२५-२६ मध्ये महसूल १९२२.१२ कोटी रुपये वसूल,उद्दिष्टापेक्षा जास्त १०१.४२ टक्के कामगिरी

पुणे, दि. ८ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे मार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसूली, अंमलबजावणी व अनुषंगिक कामकाजाबाबत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या १८९५.१७ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत कार्यालयाने १९२२.१२ कोटी रुपये महसूल वसूल करत १०१.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

रस्ता सुरक्षा अंमलबजावणी अंतर्गत तपासणीत दोषी आढळलेल्या ६१ हजार ५०९ वाहनांवर ई-तपासणी कारवाई करण्यात आली असून, त्यातून २५.६८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तसेच १ लाख ८६ हजार ८२४ वाहन चालक अनुज्ञप्ती व ५ हजार ५८४ आंतरराष्ट्रीय वाहन परवाने जारी करण्यात आले आहेत.

थकीत मोटार वाहन करापोटी ३२.२३ कोटी रुपये व पर्यावरण करापोटी ९.८० कोटी रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे. ई-लिलावाद्वारे १९३ वाहनांच्या विक्रीतून १.०६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ११ लाख १८ हजार ८४४ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्या असून, ३ लाख ४५ हजार ५४३ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच ५६ हजार १७२ पसंती क्रमांक आरक्षित करून त्यातून ७३.७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्यात आलाअसल्याची माहिती प्रादेशिक परिहवन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.

पणजीत सीपीए वेस्ट झोन परिषदेसाठी आलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले स्वागत

पणजी,गोवा दि.८ : कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (सीपीए) इंडिया रिजन, झोन-VII (वेस्ट झोन) परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गोव्यामध्ये उपस्थित आहेत. या दोन दिवसीय परिषदेच्या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज पणजीत दाखल झाले. यावेळी डॉ गोऱ्हे यांनी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे स्वागत केले.

डॉ. गोऱ्हे यांनी ओम बिर्ला यांचे स्वागत करताना संसदीय सहकार्य व सर्वोत्तम पद्धतींच्या आदान-प्रदानावर भर दिला. या परिषदेत महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या विधानमंडळातील स्पीकर, उपसभापती, चेअरमनसह इतर प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ही झोन-VII ची पहिली परिषद आहे.

नांदेड सिटी येथील पब्लिक स्कुलचे ३७ लाख हडपले-संस्थेच्या कर्मचारी असलेल्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या आणि खा. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आदी मातब्बर संचालक असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या नांदेड सिटी येथील पब्लिक स्कुलमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. एडमिन विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर संस्थेची तब्बल ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांच्या फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र अनपट, अश्विनी तरटे उर्फ अश्विनी अनपट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शाळेच्या प्रिन्सिपॉल वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत घडला. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र अनपट हे नांदेड सिटी पब्लिक स्कुलच्या एडमिन विभागात काम करतात. तर, अश्विनी अनपट या त्यांच्या पत्नी आहेत.

यादोघांनी इंटरनेट बँकिंगचा वापर करून संस्थेच्या परवानगीशिवाय मोठी रक्कम स्वतःच्या खात्यांत वर्ग करून घेतली. प्राथमिक तपासात हा सर्व प्रकार उघड झाला आहे. तसेच, या व्यवहारांना झाकण्यासाठी संस्थेच्या अभिलेखात खोट्या नोंदी देखील नोंदवण्यात आल्या. या आर्थिक गैरव्यवहारातून आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत संस्थेचा विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करत आहेत.

विद्या प्रतिष्ठान ही प्रतिथयश शिक्षण संस्था असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर, उपाध्यक्ष एड. अशोक प्रभुणे असून युगेंद्र पवार हे खजिनदार आहेत. नीलिमा गुजर या सचिव आहेत, तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य होते. यासोबतच, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विठ्ठलदास मणियार, बाळासाहेब तावरे, डॉ. राजीव शाह, किरण गुजर, मंदार सिकची हे संचालक आहेत.

‘पीएमआरडीए’ची घरांची लॉटरी; १०२९ कुटुंबांचे ‘स्वप्न’ साकार!

  • पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेची सोडत संपन्न; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर!
  • लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक प्रक्रिया; यशस्वी लाभार्थ्यांचे महानगर आयुक्तांकडून अभिनंदन

आकुर्डी/पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेतील एकूण १०२९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवारी (दि. ८ एप्रिल) अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. मानवरहित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रक्रियेतून स्वतःच्या हक्काचे घर मिळाल्याचे जाहीर होताच आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उपस्थित अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि संपूर्ण सभागृहातील वातावरण भावूक झाले. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता आणि सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्या हस्ते ही बहुप्रतिक्षित सोडत काढण्यात आली. यावेळी यशस्वी लाभार्थ्यांना महानगर आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. अचूक व दर्जेदार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, ज्या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे, त्यांना कर्जप्रकरणे व इतर कार्यालयीन बाबींसाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने सर्वतोपरी सहाय्य करावे, असे ते म्हणाले. हक्काचे घर मिळूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही स्वप्न अपूर्ण राहू नये, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही संपूर्ण प्रक्रिया ‘ओव्हरसाईट कमिटी’च्या कडक निगराणीखाली पार पडली. यामध्ये सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी दीपक नलावडे, सेवानिवृत्त जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धनंजय कुलकर्णी आणि सेवानिवृत्त मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांनी प्रत्यक्ष कामकाज पाहिले, तर मुंबई ‘म्हाडा’च्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रक्रियेवर लक्ष ठेवले.

ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, त्यांच्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून एसएमएसद्वारे यूट्यूब लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहआयुक्त पूनम मेहता यांनी करून सोडत प्रक्रियेची माहिती दिली व तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. सूत्रसंचालन सहाय्यक लेखाधिकारी पूनम बोराटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपायुक्त हिम्मत खराडे यांनी मानले. या सोहळ्यास वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, अधीक्षक भूमिअभिलेख आशा जाधव, तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यासह ‘पीएमआरडीए’चे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोडतीमध्ये पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) अशा दोन्ही गटांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. पेठ क्र. १२ मधील ईडब्ल्यूएस गटामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ५२, अनुसूचित जाती १३, अनुसूचित जमाती ८, विमुक्त जाती ३, भटक्या जमाती २ आणि शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गातील ३ सदनिकांसाठी विजेते निश्चित झाले. याच पेठेत अल्प उत्पन्न गटामध्ये (LIG) सर्वसाधारण २१७, अनुसूचित जाती ३३, अनुसूचित जमाती २०, विमुक्त जाती १०, भटक्या जमाती २ आणि अपंग प्रवर्गातील १६ लाभार्थ्यांना घरे मिळाली. दुसरीकडे, पेठ क्र. ३०-३२ च्या ईडब्ल्यूएस गटामध्ये सर्वसाधारण २३७, अनुसूचित जाती ३७, अनुसूचित जमाती ७, विमुक्त जाती ३, भटक्या जमाती ५ आणि अपंग प्रवर्गातील ५ लाभार्थ्यांची निवड झाली. तर याच पेठेत एलआयजी गटामध्ये सर्वसाधारण १५१, अनुसूचित जाती २९, अनुसूचित जमाती ३, विमुक्त जाती ४ आणि अपंग प्रवर्गातील ११ लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. या यशस्वी लाभार्थ्यांची आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, या लाभार्थ्यांना ‘एसएमएस’देखील पाठवण्यात आले आहेत.

अमेरिका-इराणमधील युद्धविरामामुळे कच्चे तेल 15% स्वस्त:94.27 डॉलर प्रति बॅरलवर, 6 वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण

अमेरिका-इराण युद्धात 2 आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर ब्रेंट क्रूड ऑइल 15% स्वस्त झाले आहे. बुधवारी दर सुमारे 15 डॉलरने घसरून 94.27 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.

अहवालानुसार, ही सुमारे 6 वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. एक दिवसापूर्वी क्रूड ऑइलची किंमत 109.27 डॉलर प्रति बॅरल होती. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा दर 73 डॉलर प्रति बॅरल होता.

युद्धादरम्यान दर वाढून 120 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. तज्ञांनुसार, आता या शक्यता संपुष्टात आल्या आहेत.
अमेरिका-इराण यांच्यात 40 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाला 2 आठवड्यांचा विराम मिळाला आहे. पाकिस्तान-चीनच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देश युद्धविरामावर सहमत झाले.
करारानुसार अमेरिका, इस्रायल आणि इराण हल्ले थांबवतील. इराणी सैन्याच्या मदतीने होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित होईल.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, जर होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग मिळाला नाही तर ते इराणची संपूर्ण सभ्यता नष्ट करतील.
युद्धविरामामुळे जागतिक बाजारपेठा उसळल्या, डॉलर घसरला

युद्ध थांबल्याच्या बातम्यांमुळे जागतिक शेअर बाजारात तेजी आली आहे. अमेरिकेचा S&P 500 फ्युचर्स 2% आणि युरोपीय बाजार 5% पर्यंत वाढले. भारताचे सेन्सेक्स आणि निफ्टी देखील सुमारे 4% वाढले आहेत.

गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला आहे. आरबीआयच्या मते, बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 41 पैशांनी मजबूत होऊन 92.55 वर पोहोचला आहे. काल तो 92.96 वर बंद झाला होता.

युद्ध पुन्हा सुरू झाल्यास किमती पुन्हा वाढतील

विश्लेषकांचे म्हणणे आहे की सध्या जो दिलासा दिसत आहे, तो जास्त काळ टिकणार नाही. आयजीचे टोनी सिकामोर यांच्या मते, ही एक चांगली सुरुवात नक्कीच आहे, परंतु अजून अनेक गोष्टी स्पष्ट नाहीत.

तज्ञांचे मत आहे की जर दोन आठवड्यांत पूर्णपणे करार झाला नाही, तर किमती पुन्हा 100 डॉलरच्या वर जाऊ शकतात.

कच्चे तेल स्वस्त झाल्याने भारताला काय फायदे होतील?

कच्चे तेल भारतासाठी महत्त्वाचे आहे, कारण आपण सुमारे 85% तेल आयात करतो. तेलाच्या किमती घसरल्यास अर्थव्यवस्थेला अनेक आघाड्यांवर दिलासा मिळतो.

  1. पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत: कच्च्या तेलाचे दर स्वस्त झाल्याने IOC, BPCL, HPCL सारख्या कंपन्यांकडून तेलाच्या किमती वाढवण्याची शक्यता कमी होईल. यामुळे वाहतूक खर्च कमी होतो आणि सामान्य माणसाच्या बजेटवर परिणाम होतो.
  2. महागाईवर परिणाम: डिझेलचे दर न वाढल्याने वाहतूक खर्च वाढणार नाही. यामुळे फळे, भाज्या, धान्य आणि इतर रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर वाढणार नाहीत.
  3. CAD मध्ये सुधारणा: कच्चे तेल स्वस्त झाल्याने आयात बिल कमी होते. परकीय चलन साठा वाचतो आणि चालू खाते तूट (Current Account Deficit) म्हणजेच CAD कमी होते.
  4. रुपया मजबूत होईल: कच्च्या तेलाचे बिल कमी झाल्याने डॉलरची मागणी कमी होते. यामुळे रुपया मजबूत होतो आणि आयात स्वस्त होते.
  5. सबसिडीचा भार कमी: कच्चे तेल स्वस्त झाल्याने सरकारचा सबसिडी खर्च कमी होतो. उरलेले पैसे सरकार पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवू शकते.
  6. कॉर्पोरेट नफा: तेल स्वस्त झाल्याने खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. यामुळे शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होतो.

तज्ञांच्या मते, कच्चे तेल 10 डॉलरने स्वस्त झाल्यास चालू खातेतील तूट 9-10 अब्ज डॉलरने कमी होऊ शकते आणि महागाईत सुमारे 0.5% दिलासा मिळू शकतो.

युद्धानंतर इराणने होर्मुज मार्ग जवळजवळ बंद केला होता. जगातील सुमारे 20% तेल-वायू याच मार्गाने जातो. हा मार्ग बंद झाल्याने तेल, एलपीजी, ॲल्युमिनियम, खते आणि प्लास्टिक महाग झाले. ब्रिटन-युरोपमध्ये औषधे आणि आवश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा धोका वाढला, कारण शिपिंग खर्च अनेक पटींनी वाढला होता.

मार्चमध्ये कच्च्या तेलात 60% वाढ झाली होती. 1990 च्या आखाती युद्धानंतर एका महिन्यात झालेली ही सर्वात मोठी वाढ होती. फेब्रुवारीच्या अखेरीस 72.48 डॉलरवरून मार्चमध्ये ते 120 डॉलरच्या पुढे गेले होते.

यापूर्वी सप्टेंबर 1990 मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला केला तेव्हा तेलाच्या किमती एका महिन्यात 46% वाढल्या होत्या.

भारत कच्च्या तेलासाठी सर्वाधिक पश्चिम आशियावर अवलंबून आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या 10 महिन्यांत एकूण आयातीपैकी 51% हिस्सा याच प्रदेशातून होता. किमती वाढल्याने आयात बिल वेगाने वाढत होते.

युद्धविरामानंतरही इराणच्या तेल रिफायनरीवर हल्ला:इराणचा कुवैतवर हल्ला

अमेरिका-इराण युद्धविरामानंतर कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या खाली; किमतीत १५% घट
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर, कच्च्या तेलाच्या किमतीत १५ टक्क्यांची घट झाली आहे. बुधवारी, किमती सुमारे १५ डॉलरने घसरल्या आणि ९४.२७ डॉलर प्रति बॅरल या पातळीवर स्थिरावल्या.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या जवळपास सहा वर्षांतील ही एकाच दिवसात झालेली सर्वात मोठी घसरण आहे. अवघ्या एका दिवसापूर्वीच, कच्च्या तेलाचा दर १०९.२७ डॉलर प्रति बॅरल इतका होता. २८ फेब्रुवारी रोजी हा संघर्ष सुरू होण्यापूर्वी, कच्च्या तेलाचा व्यापार ७३ डॉलर प्रति बॅरल दराने होत होता.या संघर्षाच्या काळात, तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या आणि त्यांनी १२० डॉलर प्रति बॅरलचा उच्चांक गाठला होता. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि त्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, तज्ज्ञांच्या मते, तेलाच्या किमतीत झालेल्या या घसरणीमुळे, आता या सर्व चिंता दूर झाल्या आहेत.


इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच एक हल्ला झाला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आज इराणच्या ‘लव्हान’ बेटावरील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पाला (रिफायनरीला) लक्ष्य करण्यात आले. स्थानिक वेळेनुसार, सकाळी १०:०० च्या सुमारास हा हल्ला झाला आणि त्यानंतर रिफायनरीमध्ये आग भडकली.

दरम्यान, कुवेतनेही असा दावा केला आहे की, युद्धविराम लागू असूनही, इराणच्या बाजूने ड्रोन हल्ला करण्यात आला. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल सौद अब्दुलअजीज अल-ओतैबी यांच्या माहितीनुसार, आज पहाटेपासून आतापर्यंत २८ इराणी ड्रोनना रोखण्यात (पाडून टाकण्यात) आले आहे.

अल-ओतैबी यांच्या मते, यातील काही ड्रोननी देशाच्या दक्षिण भागात घुसखोरी केली आणि तेथील महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना लक्ष्य केले. या लक्ष्यांमध्ये प्रमुख तेल सुविधा, वीज निर्मिती केंद्रे आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प (desalination plants) यांचा समावेश होता; तसेच याच्याशी संबंधित पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, अमेरिका आणि इराण यांच्यात—सुमारे ४० दिवसांच्या खंडानंतर—दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू करण्याबाबत आज एक करार झाला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्या देशाच्या लष्करप्रमुखांनी केलेल्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, इराणने अमेरिकेला 10 मुद्द्यांचा आराखडा पाठवला आहे. ते म्हणाले की, यावर पुढे चर्चा केली जाऊ शकते.

तर, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दावा केला आहे की, अमेरिकेने त्यांचा 10 मुद्द्यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. परिषदेनुसार, हा करार इराणच्या अटींवर झाला आहे आणि याला देशाचा विजय म्हटले आहे.
युद्धविरामानंतर ब्रिटिश पंतप्रधान मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, त्यांनी या युद्धविरामाचे स्वागत केले आणि हा निर्णय जगाला दिलासा देणारा ठरेल, असे नमूद केले. या दौऱ्यात, स्टार्मर आखाती देशांच्या नेत्यांची भेट घेणार असून, युद्धविराम अधिक बळकट करण्याच्या आणि त्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्याच्या उपायांवर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, युकेमधील विरोधी पक्षनेते जेम्स क्लेव्हरली यांनी म्हटले आहे की, इराणला आपली भूमिका बदलण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, युके (ब्रिटन) आधीच ४० हून अधिक देशांच्या सहयोगाने मध्यपूर्वेत सुरक्षा व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या एका योजनेवर काम करत आहे; यामागील मुख्य उद्देश युद्धविरामानंतरही या क्षेत्रातील परिस्थिती स्थिर राहील, याची खात्री करणे हा आहे.
कतारकडून युद्धविरामाचे स्वागत; म्हटले- ‘अजूनही बरेच काम बाकी’
युद्धविरामाचे स्वागत करताना, कतारने याला तणाव निवळण्याच्या दिशेने टाकलेले एक प्राथमिक पाऊल असे संबोधले. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, या प्रदेशात शांतता नांदावी आणि संवादाचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी दोन्ही राष्ट्रांनी या कराराचे पूर्णपणे पालन करणे अत्यंत निकडीचे आहे.

कतारने विशेषत्वाने इराणला आवाहन केले की, त्यांनी सर्व प्रकारचे हल्ले तात्काळ थांबवावेत आणि इतर राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा. याव्यतिरिक्त, कतारने सागरी मार्गांचे संरक्षण करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ओघ अखंडित राखण्याच्या महत्त्वावर भर दिला.

युद्ध थांबले,इराण-अमेरिका 2 आठवड्यांसाठी युद्धविराम

इराण आणि अमेरिका 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 2 आठवड्यांसाठी हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर सांगितले,
इराणकडून ताबडतोब होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याच्या अटीवर बॉम्बफेक आणि हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यास मी सहमत आहे.
ट्रम्प म्हणाले, “मी हा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या विनंतीनंतर घेतला आहे. आम्हाला इराणकडून 10 मुद्द्यांचा प्रस्ताव मिळाला आहे. दोन्ही देशांमधील सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सहमती झाली आहे. पुढील दोन आठवडे कराराला अंतिम रूप देण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असतील.”

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सांगितले की, पुढील चर्चा 10 एप्रिलपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होईल. इराणने दोन आठवड्यांसाठी होर्मुझ उघडल्याची माहिती दिली आणि आपल्या नागरिकांना सांगितले की, या काळात राष्ट्रीय एकता टिकवून ठेवावी आणि विजयाचा उत्सव पूर्ण ताकदीने साजरा करत राहावे.
इराणच्या सर्वोच्च नेत्याने हल्ले थांबवण्याचे आदेश दिले
शस्त्रसंधी करारानंतर इराणने हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सुमारे दोन तासांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याने सर्व लष्करी तुकड्यांना गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी आयआरआयबीवर वाचून दाखवलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व लष्करी शाखांनी सर्वोच्च नेत्यांच्या निर्देशांचे पालन करावे आणि तात्काळ गोळीबार थांबवावा.

तथापि, या निवेदनात असेही म्हटले आहे की हा संघर्षाचा शेवट नसून एक तात्पुरता उपाय आहे. तरीही, सर्व लष्करी तुकड्यांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ट्रम्प यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे शस्त्रसंधीविषयक निवेदन शेअर केले
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचे एक निवेदन शेअर केले, ज्यामध्ये दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधी कराराला आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याच्या घोषणेची माहिती देण्यात आली आहे.

आपल्या निवेदनात, अराघची यांनी पाकिस्तान आणि तेथील नेतृत्वाचे आभार मानले आणि म्हटले की, या प्रदेशातील संघर्ष संपवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले की, जर इराणवरील हल्ले थांबले, तर त्यांचे सशस्त्र दलदेखील आपल्या बचावात्मक कारवाया थांबवतील.

अमेरिकेने इराणविरुद्धच्या सर्व आक्रमक लष्करी कारवाया थांबवल्या आहेत
अमेरिकेने इराणविरुद्धच्या सर्व आक्रमक लष्करी कारवाया स्थगित केल्या आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, आक्रमक कारवाया पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत, मात्र बचावात्मक कारवाया आणि सुरक्षा उपाय सुरूच राहतील.

इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे. तसेच इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. जो आता अमेरिकन बाजू वाटाघाटीसाठी पुढे करणार आहेत. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून 10 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरु होईल

डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पाकिस्तानचे आभार; शाहबाज शरीफ काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत म्हणाले की, अत्यंत विनम्रतेने, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ आणि ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीने युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शविली आहे. आणि हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या सुज्ञ निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील चर्चा करण्यासाठी, मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवार, 10 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबादला भेट देण्याचे निमंत्रण देतो, असं शाहबाज शरीफ पोस्ट करत म्हणाले.

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या डोक्यावरील बेकायदा केबल चे जाळे हटविण्याच्या मोहिमेला सुरुवात केली असताना काहीजण तिला अडथळा आणीत असल्याचा आरोप काही माध्यमांतून होऊ लागलेला आहे तर दुसरीकडे बेकायदा केबल मुळे निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना टिळक रस्त्यावर गेल्या वर्षी अपघात झाल्याच्या प्रकरणात आत्ता कुठे महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र ठेवले गेले आहे . हे दोषारोप पत्र टिळकरोड क्षेत्रीय अधिकाऱ्यां विरूध्द न्यायालयात दाखल झाले आहे.

हा अपघात टिळक रस्त्यावर अचानक तुटून पडलेल्या केबल मुळे झाला त्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले आणि त्यांच्या हाताची अनामिका त्यांना गमवावी लागली . त्याच वेळी त्यांनी महापालिकेच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता ,त्याबाबतचे दोषारोप पत्र आता न्यायालयात दाखल झाले आहे. महानगरपालिकेच्या कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित तत्कालीन पेठ निरीक्षक दोघा कर्मचाऱ्यांना ते त्या अपघातास कारणीभूत असल्याच्या आरोपामुळे आता फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी, दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास निवृत्त सहायक पोलिस आयुक्त अरविंद पाटील बुलेट मोटरसायकलने स्वारगेटच्या दिशेने निघाले असताना हिराबाग चौकातून पुढे जाताच अचानक उजव्या बाजूने गुलमोहरच्या फांदीवरून लोंबकळणारी धातूची पिळदार केबलची एक गुंडाळी हेलकावत रस्त्यावर आली आणि बुलेटच्या पुढील चाकात अडकली. त्यामुळे ते मोटर सायकल सह वर उचलले गेले व बुलेटच्या वजनामुळे ती फांदी तुटल्याने बुलेटसह जोरात रस्त्यावर आदळले. सदर अपघातात त्यांच्या उजव्या हाताची अनामिका केबलने कापली गेली व हातापायास मुका मार लागला. त्यांचेवर सातारा रस्त्यावरील राव नर्सिंग होम येथे उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे सदर अपघात जवळच असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या सिसिटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातातून श्री. पाटील केवळ नशिबाने वाचले असले तरी त्यांच्या उजव्या हाताचे बोट मात्र कायमचे अधू झाले आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेली धातूची पीळदार केबल इंटरनेटच्या केबलला ताण देण्यासाठी वापरली जाते. दुर्दैवाने हिराबाग चौकात झाडांवर अजूनही अनेक केबल्स लटकत असल्याचे दिसून येत आहे. ती केबल सुद्धा अपघात होण्यापूर्वी बरेच दिवसांपासून तेथे लटकत होती असे स्थानिक नगरिकांचे म्हणणे आहे. वास्तविक अशा धोकादायक रीतीने लटकणाऱ्या केबल्समुळे शहरात अनेक लहान मोठे अपघात नित्य घडत असून त्यास केवळ महानगरपालिकेचा निष्क्रियपणा व असंवेदनशीलता कारणीभूत असल्यामुळेच श्री. पाटील यांनी आग्रहपूर्वक पोलिसांकडे दखलपात्र गुन्हा नोंदविला होता.
अरविंद पाटील यांच्या तक्रारी प्रमाणे स्वारगेट पोलिस ठाण्यात गु. र. न. १०१/२०२५ हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम १२५(अ),२८५,३(५) अन्वये, बेकायदेशीर व धोकादायक रीतीने केबल झाडावर लावणारा अज्ञात व्यक्ति आणि ती अनधिकृत केबल हटविण्याची जबाबदारी असलेले महानगरपालिकेचे संबंधीत अधिकारी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आला होता. यथावकाश त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी नुकतेच सदर प्रकरणी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. दरम्यान या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरच आता संपूर्ण पुणे शहरातील अनधिकृत व धोकादायक रीत्या लटकणाऱ्या केबल्स हटविण्याकरिता पुणे महानगरपालिकेने जोरदार मोहीम उघडली असल्यामुळे लवकरच अशा ओंगळवाण्या व धोकादायक असलेल्या केबल्स पुण्यातून हद्दपार होतील असे दिलासादायक चित्र नक्कीच निर्माण झाले आहे.

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

पुणे (दि ०७): नागरिक लोकप्रतिनिधींना केवळ रस्ते, ड्रेनेजसारखी कामे करण्यासाठी निवडून देत नाहीत. समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना आळा घालणे ही देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. अमली पदार्थांमुळे तरुणाईत वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी समाजात व्यापक जनचळवळ उभारण्याचे काम येत्या काळामध्ये करत, पोलीस आणि नागरिक यांच्यातील सेतू म्हणून आम्ही कार्य करू, अशी ग्वाही सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राबवण्यात येणाऱ्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक २४ मधून करण्यात आली, यावेळी बिडकर बोलत होते. यावेळी नगरसेवक देवेंद्र वडके, कल्पना बहिरट, उज्वला यादव, निलेश आल्हाट, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, फरासखानाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे शहरामध्ये ड्रग्स तस्करी आणि सेवनाचे प्रकार वाढण्याच्या घटना पुढे आल्या आहेत. पोलिसांकडून अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम केले जाते. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून देखील सहकार्य मिळाल्यास अमली पदार्थाच्या तस्करीला रोखण्यात मदत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम शहरांमध्ये हाती घेण्यात आली आहे.

यावेळी गणेश बिडकर म्हणाले, “अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. वाढत्या ड्रग्सच्या वापराला आळा घालणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची आहे. ज्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळेल, तेथे कारवाईसाठी पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करू, कमी किमतीत अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे. या उपक्रमामुळे शहरात व्यसनमुक्तीसाठी जनजागृती वाढण्यास मदत होईल.

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी ०१,४७,५५०/- रुपयांचे हुक्का साहित्य व विदेशी दारु केली जप्त केली ‘
पोलिसांनी सांगितले कि,’ दि. ०५/०४/२०२६ रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी कोंबिंग ऑपरेशनच्या अनुषंगाने परिमंडळ ०७ हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांना अॅटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेल, विमाननगर, पुणे हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या हुक्का पार्लर चालु असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदरबाबत वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे सदर हॉटेलवर छापा कारवाई केली असता १) स्वप्निल शांताराम तांबे, वय ३२ वर्ष, रा. स्वस्तिक कोलो, उद्रे हॉस्पिटल जवळ, केसनंद फाटा, वाघोली, पुणे, २) अमेय मुकेश अजमीरे, वय २८ वर्ष, रा. पाम अटलांटिस, बावडी रोड, वाघोली, पुणे ३) नवरंग विठ्ठलराव कोल्हे, वय २८ वर्ष, रा.अटलांटिस रुफ टॉप लाउंज, रॉयल टॉवर, विमाननगर, पुणे, ४) अमितकुमार दयालजी गोयल, वय २६ वर्ष, रा. फॉरेस्ट एज, खराडी, पुणे, ५) कमरूल इस्लाम लष्कर, वय २६ वर्ष, रा. साईनाथ नगर, लेन नंबर १, खराडी, पुणे, ६) शिवमकुमार श्रीरामराज यादव, वय २३ वर्ष, रा. सदर, ७) माहरुफ अफताफउद्दीन आलम, वय १८ वर्ष, रा. सदर हे बेकायदेशीर रित्या खाद्यगृहामध्ये हुक्का बार चालवून, विनापरवाना दारूचा साठा करुन विक्री करत असताना मिळून आले. सदर आरोपीतांच्या ताब्यातुन हुक्का पॉट, विदेशी दारुच्या बाटल्या व इतर साहित्य, तसेच रोख रक्कम असा एकुण ०१,४७,५५०/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त करुन त्यांचेविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु र नं. २००/२०२६ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४(अ), २१ (अ) सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री. शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ श्री पंडीत रेजितवाड यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक नितीन नाईक पोलीस अंमलदार शेख, पांडुळे, देवकाते, चव्हाण, सोनवणे, कळसकर, बारटेवाड, तसेच महिला पोलीस अंमलदार माकडी यांनी केली आहे.

भागवत धर्माला अभिप्रेत असणाऱ्या भक्तीतत्त्वाचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचे जीवन

व्याख्याते अभय टिळक यांचे मत : पुणे प्रार्थना समाज चैत्रोत्सवात व्याख्यान

पुणे : प्रार्थना समाज आणि भगवद्गीता यांचा संबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. लोककल्याण आणि लोकशिक्षण या दोहोंची जडणघडण तत्कालीन समाजव्यवस्थेत व्हावी यासाठी संस्थात्मक बांधणी व्हावी, ही ठाम भूमिका न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्या हयातीत घेतली. भागवत धर्माला अभिप्रेत असणाऱ्या भक्तीतत्त्वाचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचे जीवन आहे. आपले जीवन नीतिमान आणि शुद्ध बनवायचे असेल, तर आपली विचारप्रक्रिया शुद्ध पाहिजे. नामचिंतन हे मन शुद्ध करण्याचे साधन आहे. ज्याचे मन शुद्ध झाले आहे, त्याने समाजाला उन्नत बनवण्यासाठी कार्यरत झाले पाहिजे, असे मत व्याख्याते अभय टिळक यांनी व्यक्त केले.

पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिर प्रवेशाला यंदा ११७ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या चैत्रोत्सवात व्याख्याते आणि अर्थविश्लेषक अभय टिळक यांचे व्याख्यान झाले. यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे सभासद उपस्थित होते.

अभय टिळक म्हणाले, धर्माचा हेतू काय, धर्माचे नेमके उद्दिष्ट काय? तर सुखप्राप्ती हा धर्माचा हेतू आहे. परंतु भागवत धर्म असे सांगतो की, सुखप्राप्तीवर लक्ष केंद्रित केल्यास धर्माचे रहस्य कोणालाही कळणार नाही. उत्तम नागरिक बनणे हा धर्माचा खरा हेतू आहे. विकास अधिक होणे आणि क्षमता वाढणे हाच नागरिकतेचा मुख्य उद्देश आहे. जीवन सुसंस्कृत आणि संतुलित करण्यासाठी नीती आणि नैतिकता या दोन घटकांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सत्यनिष्ठा, न्यायनिष्ठा आणि सर्वांच्या हिताचा विचार ही मूल्ये अंगीकारल्यास समाज अधिक सक्षम होईल.

ते पुढे म्हणाले, धर्म केवळ बाह्य शुद्धतेपुरता मर्यादित राहिला असून, त्यामागील नैतिक मूल्ये हरवली आहेत. पूर्वी धर्मात अशा बंधनांचा अतिरेक नव्हता, मात्र आज ते औपचारिकतेत रूपांतरित झाले आहेत.
ही स्थिती बदलण्यासाठी समाजाची पुनर्रचना, परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल, तसेच व्यक्ती आणि समाजाच्या एकत्रित विकासाची गरज आहे.