Home Blog Page 99

कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

पुणे : कर्करोगावर अधिक परिणामकारक आणि कमी दुष्परिणाम असलेले उपचार विकसित करण्याच्या दिशेने बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘संयुग ७’ या नव्या फायटो-औषध आधारित संयुगाने कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात आशादायी परिणाम दर्शवले आहेत.

जनुकशास्त्र आणि अचूक उपचारपद्धती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ, येल विद्यापीठ (अमेरिका) येथील प्राध्यापक डॉ. श्रीकांत माने यांनी या संयुगाच्या कार्यक्षमतेबाबत माहिती दिली. ते यशदा, पुणे येथे आयोजित कर्करोग विषयक विशेष शास्त्रीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, बीव्हीजी लाइफ सायन्सेसच्या संचालिका डॉ. जयश्री द्रविड यांच्यासह प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विनय थोरात, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर आणि विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे विभागप्रमुख उपस्थित होते. डॉ. प्रतापराव गोळे हे खास साताऱ्यावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. एकूण २५० डॉक्टरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

डॉ. माने यांनी सांगितले की, ‘संयुग ७’ कर्करोग पेशींची वाढ रोखते, त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि त्यांचा शरीरातील इतर भागांमध्ये प्रसार (मेटास्टेसिस) होण्यास प्रतिबंध करते. तसेच, हे संयुग शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देत कर्करोगविरोधी लढा अधिक प्रभावी बनवते. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे संयुग कर्करोग पेशींवर प्रभावीपणे परिणाम करते, तर सामान्य पेशींवर त्याचा अत्यल्प किंवा नगण्य परिणाम आढळतो.

या संशोधनातून ‘संयुग ७’ कर्करोगाच्या वाढीशी संबंधित विविध जैविक प्रक्रियांवर प्रभाव टाकत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षित, लक्ष्यित आणि अधिक प्रभावी उपचार विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

यावेळी हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, बीव्हीजी लाइफ सायन्सेस गेल्या दशकभरापासून फायटो-औषध संशोधन क्षेत्रात कार्यरत असून सातत्यपूर्ण प्रयत्नांतून कर्करोगासह इतर अनेक आजारांवर प्रभावी औषधे विकसित करण्यात यश मिळाले आहे. या संशोधनामुळे देशातील कर्करोग रुग्णांना नवी आशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीव्हीजी वेलनेस ओपीडीच्या सल्लागार डॉ. अर्चना शिंदे यांनी केले. संशोधन व विकास उपक्रमांची माहिती विल्यम रणनवरे यांनी दिली, तर डॉ. जयश्री द्रविड यांनी काही महत्त्वपूर्ण केस स्टडीज सादर केल्या.

उपस्थित सर्व डॉक्टरांनी यकृत, हृदय, मधुमेह आणि पार्किन्सन यांसारख्या विविध आजारांवरील बीव्हीजीच्या संशोधनाधारित औषधांचे कौतुक केले. तथापि, कार्यक्रमाचा मुख्य भर कर्करोग उपचारावर होता.

हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची निदर्शने

पुणे, दि. ८ एप्रिल २०२६ — भारतीय जनता पक्षाचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष तथा देशातील वरिष्ठ दलित नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी केलेल्या अत्यंत अपमानजनक व असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज स्वारगेट चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत “संविधान बचाव”, “दलितांचा अपमान सहन करणार नाही” अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रतीकात्मक “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेळी परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि आंदोलनात सहभागी झालेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
युवक काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेले वक्तव्य हे केवळ एका व्यक्तीवर केलेला अपमान नसून संपूर्ण दलित समाजाच्या स्वाभिमानावर झालेला थेट आघात आहे. भाजप व RSS च्या मनुवादी आणि प्रतिगामी विचारसरणीचे हे जिवंत उदाहरण असून अशा वक्तव्यांमुळे समाजात द्वेष आणि विषमता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तसेच, अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना बेकायदेशीररीत्या राज्याबाहेर नेऊन अटक करण्याचा प्रयत्न हा लोकशाही मूल्यांवर गंभीर आघात असून, विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार असल्याचेही युवक काँग्रेसने नमूद केले.

युवक काँग्रेसने इशारा दिला आहे की, दलित समाजाचा अपमान आणि लोकशाहीविरोधी कृत्ये सहन केली जाणार नाहीत. अशा घटनांविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

देशातील सर्वात जेष्ठ दलित नेत्याच्या बद्दल भाजपा मुख्यमंत्री हेमंता बिस्वसरमा यांनी केलेली टिप्पणी ही भाजपा संस्कृती दाखवते, मुख्य भ्रष्टाचाराच्या विषयाला बगल देत दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे असा सवाल यावेळी पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा सौरभ अमराळे यांनी केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. प्रथमेश अबनावे, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा सौरभ अमराळे, प्रदेश महासचिव महेश म्हेत्रे, प्रदेश महासचिव दिलीपसिंह देशमुख,भूषण रानभरे, प्रदेश सचिव निखिल मलके,विश्वजित जाधव, प्रदिप मेहकरे, अविनाश साळुंखे, अर्थव सोनार, पुणे शहर युवक काँग्रेस अभिजित चव्हाण उपाध्यक्ष सद्दाम शेख, कुणाल काळे, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पुष्कर आबनावे, शिवाजीनगर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रांत धोत्रे, रेहान बाबुर्डे, हर्षद हांडे, यश कोलते पाटील, सागर धावडे, विशाल कामेकर, पुणे जिल्हा युवक काँग्रेस सचिव भूषण पाटोदकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या उत्तम महिला प्रशासक- शरद पवार

पुणे दि ८ एप्रिल: संधी मिळाली तर कोठल्याही क्षेत्रात जाऊन सोने करण्याची महिलांची क्षमता आहे. त्या कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही. याचा अनुभव मी वेळोवेळी घेतला आहे. म्हणूनच राज्य कारभार असो कि प्रशासन, साहित्य, कला , संस्कृती आणि लष्करातही महिलांची कामगिरी हि देशाला अभिमान वाटावी अशीच आहे. असे उदगार देशाचे माजी कृषी मंत्री तसेच राज्यसभा खासदार शरद पवार यांनी ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे अनावरण करताना काढले. या प्रसंगी संयोजन समितीतील डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, कविता वानखेडे, निर्मला नलावडे, डॉ. संगीता शिंदे, मनीषा वाडेकर, सुजाता गोळे, गीता खोत, पल्लवी पासलकर, सोनाली निवंगुणे, निलेश भिंगारे, हर्षवर्धन पासलकर, प्रीतम पानसरे, अवेस शेख आणि सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार तसेच लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते

https://sahityasammelan.sarhad.in/ या संकेतस्थळाचे अनावरण करून हे साहित्य रसिकांसाठी खुले करण्यात आले. या संकेत स्थळावर दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती उपलब्ध असणार आहे.

आज देशात छत्रपती घराण्याचा मोठा सन्मान आहे. त्याच घराण्याच्या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने होणारे हे शासकीय तसेच प्रशासकीय महिलांचे साहित्य संमेलन पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या उत्तम महिला प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या नावाने होणाऱ्या या संमेलनात त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभार सांभाळण्याची हातोटी याची आठवण या निमित्ताने केली जाईल. हि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे.

आता महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षणाचे बिल येणार आहे. या संधीची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून केली आणि महिलांना संपत्तीत मिळणारा वाटा असो कि प्रशासकीय किंवा राजकीय नेतृत्व असो महिला कुठेही मागे नाही हे आता सिद्ध झाले आहे. हे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे याचा मला अभिमान वाटतो. या धोरणानंतर महिला सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे नेतृत्व करताना दिसतात. म्हणूनच या शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातून होणारे विचारमंथन समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. या संमेलनाला माझ्या अंत करणपूर्वक शुभेच्छा.

MPSC राज्य सेवा 2024 चा अंतिम निकाल जाहीर: विजय लामकाने राज्यात प्रथम, तर आरती जाधव महिलांमध्ये पहिली

मुंबई–महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा बहुप्रतीक्षित अंतिम निकाल बुधवारी (८ एप्रिल २०२६) अधिकृतरीत्या जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात सोलापूर जिल्ह्याने राज्यात आपली निर्विवाद मोहोर उमटवली आहे. सोलापूरच्या विजय नागनाथ लामकाने याने सर्वसाधारण आणि मागासवर्गीय गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, महिला वर्गातून सोलापूरचीच आरती परमेश्वर जाधव हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

विजय लामकाने याने राज्य सेवा मुख्य परीक्षेत ६२४ गुण मिळवत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. त्याला उपजिल्हाधिकारी हे प्रतिष्ठेचे पद मिळाले आहे. दुसरीकडे, आरती जाधव हिने ६०१ गुणांसह महिलांच्या गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता, त्यानंतर आज मुलाखतीअंती आयोगाने अंतिम निकालाची अधिकृत घोषणा केली.

एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालानुसार एकूण २० विविध संवर्गांतील ४६१ पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. आयोगाने निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गातील शिफारसपात्र शेवटच्या उमेदवाराचा ‘कट-ऑफ’ (सीमांकन गुण) देखील जाहीर केला आहे.
समांतर आरक्षणासह विविध मुद्द्यांवर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग, अनाथ आणि खेळाडूंसाठीच्या आरक्षित पदांवरील शिफारशी सक्षम प्राधिकरणाच्या तपासणीनंतरच अंतिम मानल्या जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

‘लव्ह जिहाद’ नंतर आता ‘कॉर्पोरेट जिहाद’:IT कंपन्यांत उच्चशिक्षित मुलींवर नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार, गोपीचंद पडळकर यांचा दावा

पुणे-आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींवर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सध्या ‘लव्ह जिहाद’ सारखाच ‘कॉर्पोरेट जिहाद’ समोर आला आहे. त्यात आयटी कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत आहे. त्यामुळे मुलींनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे ते म्हणालेत.

गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी उपरोक्त खबळजनक आरोप केला. ते म्हणाले, नाशिक हे आयटी हब नसले तरी तिथे काही आयटी कंपन्या आहेत. पुणे हे मोठे आयटी हब आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही गैरप्रकार घडत असल्यास संबंधित कंपनी अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाशिक येथील एका कंपनीत एका तरुणाचा धर्मांतराचा प्रकारही समोर आला आहे.

नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मुलींना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा दावाही पडळकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, सदर कंपनीत १३० कर्मचारी काम करतात. लैंगिक अत्याचारामुळे अनेक मुलींनी नोकऱ्या सोडल्या. पण त्यातील नऊ पीडित मुलींनी धाडस दाखवून पुढे येत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने भोंदू अशोक खरात प्रकरण बाहेर आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी आणखी एक प्रकरण शोधून काढले आहे. सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) नेमली आहे. कॉर्पोरेट कंपनीच्या संदर्भात टीम लीडर्सना टास्क ठरवून दिला जात असे. ते मुलींची मुलाखत घेऊन नोकरीसाठी शिफारस करत आणि त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकत. नोकरी कोणी लावली हे सांगणे, सुट्टी देण्यासाठी दबाव टाकणे, तसेच विविध रिसॉर्टमध्ये सुट्टीच्या दिवशी फिरावयास घेऊन जाणे असे प्रकार घडत होते.

इमॅजिका येथे कंपनीतील मुलींना फिरण्यास घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर तिघांनी नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

करिअरची भीती दाखवून मॅनेजरकडून तरुणींचे लैंगिक शोषण:नाशिकच्या आयटी कंपनीतील 5 अधिकाऱ्यांना अटक

नाशिक-कॉर्पोरेट जगताची मान शरमेने खाली घालायला लावणारा एक संतापजनक प्रकार येथे उघडकीस आला आहे. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत कामाला असलेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणींचे लैंगिक आणि मानसिक शोषण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी ६ आरोपींविरुद्ध कारवाई करत ५ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा किळसवाणा प्रकार केला. करिअरमध्ये अडथळे आणण्याची किंवा नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवून या तरुणींना जाळ्यात ओढले जात होते. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम पायदळी तुडवत या तरुणींचा विनयभंग आणि मानसिक छळ करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, नाशिक पोलिस आयुक्तांनी तातडीने संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या शोषणाचे बळी ठरलेल्या मुलींची संख्या २० ते २५ च्या घरात असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एकूण ६ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यात ५ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी ५ पुरुषांना अटक केली असून, एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.नाशिक पोलिसांनी पीडित तरुणींना धीर देत आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या छळाला ज्या मुली बळी पडल्या असतील त्यांनी संकोच न बाळगता तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तक्रारदार तरुणींची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा निरीक्षकपदी सुनील माने

पुणे ता. ८ : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा निरीक्षक पदावर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत आज पत्र सुनील माने यांना मुंबई येथे दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर, तालुका व जिल्हयातील ग्रामीण प्रभाग व बूथ पातळीवर पक्षाचा आढावा घेणे, जिल्ह्यातील सर्व फ्रंटल व विभागाच्या संघटनेच्या पदावरील नियुकत्यांचा आढावा घेणे, संघटनात्मक मजबूती, कार्यकर्ता सक्रियता व बुथ समित्या कार्यान्वयित आहेत का याचा सातत्याने आढावा घेणे, पक्षशिस्त व संघटनेमध्ये एकसंघता ठेवण्यासाठी कार्यरत राहणे. कोणतीही गटबाजी, अनुशासन भंग, पक्षविरोधी वक्तव्य किंवा कृती आढळल्यास त्यावर तत्काळ हस्तक्षेप करून प्रदेश कार्यालयास अहवाल सादर करणे, स्थानिक प्रश्न, जनभावना व राजकीय परिस्थितीचा निष्पक्ष अहवाल सादर करणे, प्रदेश कार्यालयाकडून देण्यात येणारे विविध कार्यक्रम, आंदोलने याचा आढावा घेऊन त्याबाबत प्रदेश कार्यालयास कळवणे, निवडणूक पूर्वतयारी, संभाव्य उमेदवारांचे मूल्यमापन, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संघटनात्मक रणनिती सुचवणे, मासिक प्रगती अहवाल नियमितपणे प्रदेश कार्यालयास सादर करणे, जिल्हा संघटना वरिष्ठ नेतृत्व यांच्यात समन्वय साधने आदि जबाबदऱ्या निरीक्षक म्हणून सुनील माने यांना सांभाळाव्या लागणार आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ

पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

पुणे, दि. ८: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त पुणे विभागातील पुणे, सातारा,सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.

प्रादेशिक कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्ताहाचा शुभारंभ झाला. यावेळी सहायक संचालक (वित्त व लेखा) अनिल गिते , सहायक आयुक्त विशाल लोंढे, माधुरी वाघमोडे, ज्ञानेश्वर जावळे, समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सप्ताहाची माहिती देण्यासोबतच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.

या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक समता, महापुरुषांचे विचार आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. या सप्ताहाच्या नियोजनाबाबत पुणे व‍िभागातील जिल्हा स्तरावर शहरी व ग्रामिण भागात सहाय्यक आयुक्त समाज कल्‍याण पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, व कोल्‍हापूर या कार्यालयाने आपापल्या कार्यक्षेत्रात जय्यत तयारी केली असून, या सात दिवसांत खालीलप्रमाणे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक ९ एप्रिल रोजी युवा संवाद कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालये व शासकीय वसतिगृहांमध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती आणि आंबेडकरी विचार या विषयांवर व्याख्याने व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १० एप्रिल रोजी योजना प्रबोधन कार्यक्रमाअंतर्गत समता दूतांमार्फत पथनाट्ये व लघुनाटिका सादर करून शासकीय योजनांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच ‘मार्जिन मनी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विविध गौरवपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी संविधान जागर व महिला मेळाव्याअंतर्गत संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांवर व्याख्याने आयोजित केली असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष महिला मेळावा घेण्यात येणार आहे.

दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक मेळावा, रक्तदान शिबीर आणि स्वच्छता अभियानाद्वारे सामाजिक सेवेचे व्रत जोपासले जाईल. तसेच कोल्‍हापूर औद्योगिक संस्‍था मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजि‍त केली जाईल

दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी केली जाणार असून व्याख्याने आणि चर्चासत्रांनंतर या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप होणार आहे.

व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? कुठे चालला आहे समाज आपला :शर्मिला ठाकरेंचे सवाल

मुंबई-मनसे च्या शर्मिला राज ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. व्हायरल व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? आपला समाज कोणत्या दिशेला चाललाय? असा परखड सवाल त्यांनी या प्रकरणी केला आहे.

राज्यात सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर अनेक महिलांनी अशोक खरातने आपण बेशुद्धावस्थेत असताना आपले लैंगिक शोषण केल्याचा दावा केला आहे. पण शर्मिला ठाकरे यांनी हाच धागा पकडत कोणत्या व्हिडिओमध्ये महिला बेशुद्ध दिसतात? असा तिखट सवाल उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी महिलांना अशा भोंदूबाबांपासूर स्वतःला दूर ठेवण्याचेही आवाहन केले.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, महिलांनी सर्वप्रथम भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. आमचे 13 आमदार आले होते, तेव्हा आमच्याकडे भोंदूबाबांसाठी अनेकजण आले होते. हे भोंदूबाबा स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. पण आम्ही कुणाच्याही पाया पडत नाही. या लोकांनी आमच्यासोबत फोटो काढून लोकांना आम्ही त्यांचे भक्त आहोत असे सांगितले तर आम्ही तिथे येऊन त्यांच्या कानशिलात हाणणार. त्यामुळे आमच्याकडे कुणी येतच नाही.भोंदूबाबा फसवतात म्हणजे काय? तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले असतील. त्यात कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला. काय आहे हे? काय चाललंय हे? आपला समाज कोणत्या दिशेला चालला आहे?, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या मते, अशोक खरात हा पीडित व त्यांच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी या सगळ्या गोष्टींची भीती दाखवून पैसा उकळत होता. विशेषतः महिलांना त्यांच्या कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून व बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने महिलांचे शोषण केले. त्याचप्रकारे ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात हातचलाखी करून स्वत:कडे दैवीशक्ती असल्याचे सांगून तो समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचेही काम करत होता. पण आता पीडित महिला व त्यांचे कुटुंब मोठ्या धाडसाने समोर आलेत. त्यांच्याच मदतीने त्याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत.

पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करा -मेधा कुलकर्णी

लव्ह जिहाद पीडित महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान -पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करा -मेधा कुलकर्णी

पुणे-खासदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरलेल्या महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत समाजात जनजागृती करून पीडित महिलांना समुपदेशन, पुनर्वसन आणि आवश्यक मदत दिली जाईल.या अभियानासाठी लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या माध्यमातून पीडितांना त्वरित संपर्क साधता येईल.तसेच पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करावा अशीही मागणी यावेळी मेधा कुलकर्णी यांनी केली .

यावेळी त्यांनी सायली सुर्वे या महिलेच्या ‘घरवापसी’चे यश नमूद केले. सायलीचा पती आतिफ तासे याच्यावर 28 गुन्हे दाखल असून, त्याला तातडीने अटक करून सायलीला घटस्फोट मिळावा अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. सायलीवर मानसिक दडपण असून, तिच्या चार मुलांना आणि आई-वडिलांनाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

सायली सुर्वेला ‘घरवापसी’नंतरही पोलीस संरक्षण मिळाले नाही, यावर कुलकर्णी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक पोलिसांनी वेळीच संरक्षण दिले असते तर तिच्या सासरच्यांनी तिला बळजबरीने परत नेले नसते, असे त्या म्हणाल्या. सायलीच्या मानसिक स्थितीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

सायलीने सासू गुलशन तासे हिच्या विरोधात दबावाखाली दिलेला जबाब पोलिसांनी ग्राह्य धरू नये, असेही कुलकर्णी यांनी म्हटले. गुलशन तासेवर अनेक गुन्हे दाखल असून, तिच्या चार सुना हिंदू आहेत आणि काहींनी सासूविरोधात तक्रारीही केल्या आहेत. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र सरकारने बळजबरीने धर्म बदलण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जाणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!

रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत असून, येत्या ११ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्याचा प्रयोग रंगणार आहे.

अमेय विनोद खोपकर सादर करत असलेलं हे नाटक, एव्हीके पिक्चर्स आणि सीजी ग्रुप यांच्या निर्मितीतून साकारलं आहे. दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नेटक्या दिग्दर्शनातून आणि लेखक श्रीनिवास भणगे यांच्या खुसखुशीत लेखणीतून उभं राहिलेलं हे नाटक प्रेक्षकांना पोट धरून हसवतानाच जीवनातील नातेसंबंधांवरही भाष्य करतं. संगीतकार अजित परब यांच्या सुरांनी नाटकात अधिकच रंगत आणली असून स्वाती खोपकर, दिनेश खंडागळे आणि निनाद नं बत्तीन या नाटकाचे निर्माते आहेत. यात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांसारखी लोकप्रिय कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.

कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, ”रंगभूमी ही जिवंत माध्यम आहे. प्रेक्षकांचा श्वास, त्यांचं हसणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया यामुळे प्रत्येक प्रयोग नव्याने घडतो. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा सादर करताना आम्ही त्यात आजच्या काळाची झलक आणि अधिक परिपक्वता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक ”प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही, तर त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवेल.’

निर्माते अमेय विनोद खोपकर म्हणतात, ”चांगल्या आशयाला वेळेची मर्यादा नसते. हे नाटक आधी गाजलं कारण त्यात प्रामाणिकपणा होता आणि आजही तो तितकाच जिवंत आहे. नव्या पिढीसाठी आणि जुन्या रसिकांसाठी आम्ही हे नाटक नव्या उर्जेसह सादर करत आहोत. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा रंगभूमीचा आनंद घ्यावा, हीच आमची इच्छा.”

निर्माते दिनेश खंडागळे म्हणतात, ”अशा दर्जेदार नाटकाची निर्मिती करत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. चांगल्या आशयाच्या प्रकल्पातूनच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करावं, असं नेहमी वाटत होतं आणि ते या नाटकाच्या निमित्ताने साध्य झालं. या नाटकाची संपूर्ण टीम अतिशय उत्तम आहे. नाटकाला आधीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे, त्यामुळे अशा लोकप्रिय नाटकाचा भाग होता येत असल्याचा मला विशेष आनंद आहे.”

एकूणच, हास्य आणि भावनांचा समतोल साधणारं ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत नाट्यरसिकांना कुटुंबासोबत हलकंफुलकं आणि दर्जेदार मनोरंजन अनुभवायला मिळणार आहे.

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा रोखल्याने तणाव

आमदार गोपीचंद पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम; पोलिसांचा कडक बंदोबस्त


पुणे-पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ पोलिसांनी मधेच रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे. या मोर्चाअंतर्गत आयोजित केलेली बाईक रॅली खडी मशीन चौकापर्यंत जाणार होती आणि तिथे गोपीचंद पडळकर यांची सभा होणार होती. मात्र पोलिसांनी ही रॅली नियोजित स्थळापूर्वीच अडवल्याने गेल्या दीड तासांपासून आमदार पडळकर आणि संग्राम जगताप पुढे जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आज पहाटेपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शिवतीर्थ सासवड येथून निघालेली ही भव्य बाईक रॅली कोंढव्यातील खडीमशीन चौकापर्यंत जाणार होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक सहभागी झाले असून, मार्गावर तैनात असलेल्या मोठ्या पोलीस फौजफाट्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून कोंढव्यातील संबंधित संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच भिवरी ग्रामस्थांवर दाखल केलेले कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आक्रमक मागणी करण्यात येत आहे. या मागण्यांसह पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणातील अन्यायावरही या आंदोलनाद्वारे भूमिका मांडली जाणार आहे.

पुणे आरटीओकडून २०२५-२६ मध्ये महसूल १९२२.१२ कोटी रुपये वसूल,उद्दिष्टापेक्षा जास्त १०१.४२ टक्के कामगिरी

पुणे, दि. ८ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे मार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसूली, अंमलबजावणी व अनुषंगिक कामकाजाबाबत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या १८९५.१७ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत कार्यालयाने १९२२.१२ कोटी रुपये महसूल वसूल करत १०१.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

रस्ता सुरक्षा अंमलबजावणी अंतर्गत तपासणीत दोषी आढळलेल्या ६१ हजार ५०९ वाहनांवर ई-तपासणी कारवाई करण्यात आली असून, त्यातून २५.६८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तसेच १ लाख ८६ हजार ८२४ वाहन चालक अनुज्ञप्ती व ५ हजार ५८४ आंतरराष्ट्रीय वाहन परवाने जारी करण्यात आले आहेत.

थकीत मोटार वाहन करापोटी ३२.२३ कोटी रुपये व पर्यावरण करापोटी ९.८० कोटी रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे. ई-लिलावाद्वारे १९३ वाहनांच्या विक्रीतून १.०६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ११ लाख १८ हजार ८४४ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्या असून, ३ लाख ४५ हजार ५४३ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच ५६ हजार १७२ पसंती क्रमांक आरक्षित करून त्यातून ७३.७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्यात आलाअसल्याची माहिती प्रादेशिक परिहवन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.

पणजीत सीपीए वेस्ट झोन परिषदेसाठी आलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले स्वागत

पणजी,गोवा दि.८ : कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (सीपीए) इंडिया रिजन, झोन-VII (वेस्ट झोन) परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गोव्यामध्ये उपस्थित आहेत. या दोन दिवसीय परिषदेच्या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज पणजीत दाखल झाले. यावेळी डॉ गोऱ्हे यांनी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे स्वागत केले.

डॉ. गोऱ्हे यांनी ओम बिर्ला यांचे स्वागत करताना संसदीय सहकार्य व सर्वोत्तम पद्धतींच्या आदान-प्रदानावर भर दिला. या परिषदेत महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या विधानमंडळातील स्पीकर, उपसभापती, चेअरमनसह इतर प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ही झोन-VII ची पहिली परिषद आहे.

नांदेड सिटी येथील पब्लिक स्कुलचे ३७ लाख हडपले-संस्थेच्या कर्मचारी असलेल्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या आणि खा. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आदी मातब्बर संचालक असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या नांदेड सिटी येथील पब्लिक स्कुलमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. एडमिन विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर संस्थेची तब्बल ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांच्या फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र अनपट, अश्विनी तरटे उर्फ अश्विनी अनपट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शाळेच्या प्रिन्सिपॉल वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत घडला. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र अनपट हे नांदेड सिटी पब्लिक स्कुलच्या एडमिन विभागात काम करतात. तर, अश्विनी अनपट या त्यांच्या पत्नी आहेत.

यादोघांनी इंटरनेट बँकिंगचा वापर करून संस्थेच्या परवानगीशिवाय मोठी रक्कम स्वतःच्या खात्यांत वर्ग करून घेतली. प्राथमिक तपासात हा सर्व प्रकार उघड झाला आहे. तसेच, या व्यवहारांना झाकण्यासाठी संस्थेच्या अभिलेखात खोट्या नोंदी देखील नोंदवण्यात आल्या. या आर्थिक गैरव्यवहारातून आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत संस्थेचा विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करत आहेत.

विद्या प्रतिष्ठान ही प्रतिथयश शिक्षण संस्था असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर, उपाध्यक्ष एड. अशोक प्रभुणे असून युगेंद्र पवार हे खजिनदार आहेत. नीलिमा गुजर या सचिव आहेत, तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य होते. यासोबतच, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विठ्ठलदास मणियार, बाळासाहेब तावरे, डॉ. राजीव शाह, किरण गुजर, मंदार सिकची हे संचालक आहेत.