मुंबई- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यांवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाला नायक आणि महान योद्धा मानले जाते. अशा देशासोबत भारत क्रिकेट खेळत असेल, तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने त्याचाही निषेध केला पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा धिक्कार करतो, असे फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी सांगायला पाहिजे पण ते तसे म्हणणार नाही ते ढोंगी आहेत.
संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाचे पुतळे आहेत आणि शालेय अभ्यासक्रमातही त्याचा समावेश आहे. मग त्याला नायक मानणाऱ्या देशासोबत भारत क्रिकेट खेळतोच कसा? फडणवीस आणि भाजपची राष्ट्रभक्तीची उर्मी उचंबळून वर आली पाहिजे. आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार नाही, असे ठामपणे त्यांनी जाहीर करावे. मात्र भाजप तसे करणार नाही, कारण त्यांची भूमिका ढोंगी आहे, अशी टीका त्यांनी केली.
भारत–पाकिस्तान सामन्यांवर हजारो कोटींची सट्टेबाजी होत असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला. मागील सामन्यातून सट्ट्याच्या माध्यमातून पाकिस्तानला तब्बल 25 हजार कोटी रुपये मिळाल्याचा दावा त्यांनी केला. हा पैसा पुलवामा आणि पहलगामसारख्या दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जातो, असेही ते म्हणाले. या व्यवहारातील काही हिस्सा सरकारमधील काही लोकांनाही मिळतो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
नागपूर-कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे असे वादग्रस्त विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते अतिशय निंदनीय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केले. मुघलांच्या जोखडातून सामान्य जनतेला मुक्त करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने सामान्य रयतेचे राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते. आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणे टिपू सुलतान. या दोघांची तुलना करून दोघांना सारखे सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणे मी या जन्मान बघितले नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केळकी त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच अशा पद्धतीने ते बोलत असतील आणि कॉंग्रेस पक्षाने जरा जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे.
मालेगाव- येथील समाजवादी पक्षाच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनात छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांऐवजी टिपू सुलतानचा फोटो लावला. याविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने आक्रमक आंदोलन केल्यावर तो फोटो हटवण्यात आला. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आहे, असे वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला.
सपकाळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणं मी आयुष्यात कधी बघितलं नाही. टिपूचा फोटो लावण्याचे समर्थन करत सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे. त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे.
मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो मोठ्या प्रमाणावर वैमानिकांची भरती करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 1,000 हून अधिक वैमानिक नियुक्त करेल. भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील कोणत्याही एअरलाइनने केलेल्या सर्वात मोठ्या भरती मोहिमांपैकी ही एक आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या कामकाजातील अडचणींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, जेव्हा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अवघ्या 7 दिवसांत 5,000 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली होती. ट्रेनीपासून कॅप्टनपर्यंतच्या पदांवर भरती होणार मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडिगोच्या या भरती प्रक्रियेत ट्रेनी फर्स्ट ऑफिसर, सीनियर फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टन या पदांचा समावेश आहे. कंपनी आपला विस्तार आणि नियामक गरजा पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. दरमहा 4 नवीन विमाने सामील होत आहेत इंडिगो दरमहा आपल्या ताफ्यात 4 नवीन विमाने समाविष्ट करेल. ती उडवण्यासाठी नवीन वैमानिकांची गरज आहे. कंपनी दरमहा 20 ते 25 फर्स्ट ऑफिसरना पदोन्नती देऊन कॅप्टन बनवत आहे. एका ट्रेनी ऑफिसरला तयार होण्यासाठी 6 महिने लागतात. कॅप्टन बनण्यासाठी 1,500 तास उड्डाणाचा अनुभव आवश्यक आहे. कंपनी हे निकष कठोर करत आहे.
डीजीसीएच्या नियमांचे पालन करणे हे आव्हान नियमांनुसार, प्रत्येक विमानासाठी वैमानिकांचे तीन संच (एक कॅप्टन आणि एक फर्स्ट ऑफिसर) असणे आवश्यक आहे. परंतु इंडिगोच्या विमानांचा वापर खूप जास्त होतो, त्यामुळे त्यांना मानकापेक्षा दुप्पट वैमानिकांची गरज भासते.
तपासणीत असे आढळून आले होते की कंपनीला 2,422 कॅप्टनची गरज होती, परंतु त्यावेळी तिच्याकडे केवळ 2,357 कॅप्टनच उपलब्ध होते. संकट लक्षात घेता, डीजीसीएने 10 फेब्रुवारीपर्यंत रात्रीच्या ड्युटीच्या नियमांमध्ये काही तात्पुरती सूट दिली होती.
डिसेंबरमध्ये संकट का निर्माण झाले होते? डिसेंबरमध्ये वैमानिकांच्या विश्रांतीचे नवीन नियम लागू झाले होते. यानुसार, रात्री १२ ते सकाळी ६ वाजेदरम्यान लँडिंगची संख्या मर्यादित करण्यात आली होती आणि साप्ताहिक विश्रांतीचा वेळ वाढवण्यात आला होता.
DGCA च्या तपासणीत असे समोर आले की, इंडिगोने नवीन नियमांनुसार पुरेशा भरती केल्या नव्हत्या आणि प्रशिक्षणाचा वेगही वाढवला नव्हता. यामुळे वैमानिकांवरील कामाचा ताण वाढला आणि मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द झाली.
सरहदतर्फे डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे, जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान
पुणे :
रस्त्यावरील अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असतानादेखील,देशभरात रस्त्यावर होणारे अपघात आणि रस्ते सुरक्षा या विषयांकडे गेल्या दोन दशकांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी केली.
सरहद पुणेच्या वतीने डॉ.माधवगोडबोले स्मृती व्याख्यान आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे टिळक स्मारक मंदिरयेथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘हरवलेले सुशासन’ या विषयावर पिल्लई बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर होते. या प्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त डॉ. योगेश म्हसे, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, डिजीपी कार्यालयातील प्रमुख लिपिक जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे होते.
पिल्लई म्हणाले, रस्ते सुरक्षा हा इतका गंभीर विषय असतानादेखील गेल्या तीस वर्षांत एकाही खासदाराने त्यावर संसदेत चर्चा केलेली नाही. कारण त्यांच्यादृष्टीने रस्ते सुरक्षा हा मते मिळवून देणारा विषय नाही. त्यामुळे त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. वस्तुतः दररोज नव्याने सहा हजार वाहने रस्त्यावर उतरत असतील, तर केवळ मोठे उड्डाणपूल बांधून किंवा मेट्रो तयार करून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी व्यापक विचारमंथन होऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने हा विषय राजकीय दृष्टीक्षेपात कसा येईल, हे पुण्यातील सुजाण व विचारवंत लोकांनी पाहायला हवे. हा विषय अतिशय गंभीर असल्याने तो राज्यकर्त्यांच्या प्राधान्यक्रमावर यायला हवा. या विषयाचे स्वरूप इतके गंभीर झाले आहे की प्रशासन तरी कुठे-कुठे पुरे पडणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
२०४७ सालातील विकसित भारतहेलक्ष्य निर्धारित केले असून त्यासाठी अनेक चांगले प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. परंतु ते राबवताना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणे गरजेचे आहे. त्यातील मर्यादित पारदर्शकता दूर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिल्लई यांनी केले.
इडीमध्ये काम करताना पूर्ण स्वातंत्र्य : विवेक वाडेकर
आयकर आयुक्त विवेक वाडेकर म्हणाले, आजच्या स्थित्यंतराच्या काळात प्रशासनाची भूमिका फार महत्त्वाची आहे. इडी हा विषय आपल्याकडे खूप चर्चिला जात असला, तरी २०२३ सालापर्यंत या विभागामध्ये मी प्रत्यक्ष काम केले आहे. मी कार्यरत असेपर्यंत तरी एकदाही कुठल्याही राजकीय नेत्याने कधीही फोन करून दबाव आणला नाही किंवा काही करण्यास प्रवृत्त केले नाही. आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते; फक्त चांगल्या गुणात्मक कामाची अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रउभारणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच जबाबदारीने काम करायला हवे. आपल्यातील शासक हरवत आहे, ही आजची खरी अडचण आहे.
खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता : योगेश म्हसे..
सत्काराला उत्तर देताना योगेश म्हसे म्हणाले की, प्रशासनातील मूल्यांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने झाला आहे, असे मी मानतो. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा पुरस्कार अधिक लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्णय दृढ करेल, असा विश्वास मला वाटतो.
जबाबदारी नागरिकांचीही : विशाल नरवडे..
विशाल नरवडे म्हणाले, सुशासनात जनता सर्वात महत्त्वाची आहे. हरवलेल्या सुशासनाला आपल्यालाच जिवंत करावे लागणार आहे. अधिकारी आणि प्रशासनाची जशी जबाबदारी आहे, तशीच जबाबदारी जागरूक नागरिकांचीही आहे.
मेहनत आणि सातत्य महत्त्वाचे : जहीरोद्दीन हुसेन शेख..
जहीरोद्दीन हुसेन शेख म्हणाले, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. मेहनत आणि सातत्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशा कामांना ईश्वराचाही आशीर्वाद लाभतो आणि ती यशस्वी होतात.
इव्हेंट नव्हे मुव्हमेंट : संजय नहार
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, डॉ.माधव गोडबोले हे नाव प्रशासनात अतिशय आदराने घेतले जात होते. त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनातील उत्तम व्यक्तींचा गौरव आणि हरवलेल्या सुशासनाविषयी विचारमंथन करण्याचा विचार आम्ही केला. हा केवळ इव्हेंट नसून ती एक मुव्हमेंट आहे. ही एक चांगुलपणाची चळवळ आहे. त्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळावी, अशी आमची इच्छा आहे.
नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक
नाशिक, दि. 14 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या.
नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी नाशिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर (नाशिक ग्रामीण), पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (नाशिक शहर), नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते, तर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे), महेश्वर रेड्डी (जळगाव), श्रवण दत्त (नंदुरबार), अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे (अहिल्यानगर) हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील. या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. महिलांसाठी मदत केंद्रे, हिरकणी कक्ष, स्वच्छता गृहांची सुविधा असावी. तसेच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुकास्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात. ज्या तालुक्यांमध्ये भरोसा सेल नसेल तेथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा. कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत नियमितपणे बैठका घ्याव्यात. पती- पत्नीत समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी. अमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घ्यावी. पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे.
रेल्वे प्रवासात महिलांशी निगडित काही अप्रिय घटना घडू नये. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे व पोलिस दलाने नियमितपणे संवाद साधावा. दक्षता समिती, नागरी हक्क संरक्षण समितीच्य बैठकांमध्ये महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा, शालेय बसची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियमितपणे तपासणी करावी. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांचा सखोल तपास करून दोष सिद्धीचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. कराळे यांनी सांगितले की, विभागातील पाचही जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिस दलाच्या माध्यमातून विविध उपाययोजन करण्यात येत आहेत. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी कारवाई करून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिस अधीक्षक श्री. धिवरे, श्री. दत्त, श्री. रेड्डी, श्री. मिरखेलकर, श्री. कलबुर्गी, श्री. चव्हाण यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने आयोजित ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन आज छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे संपन्न झाले.
या सोहळ्यालापुणे महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम,उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त बी.पी. पृथ्वीराज आणि महापालिकेतील अन्य वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रियजनांची सुरक्षा आणि भविष्यातील प्रगती: गुंतवणुकीचा सर्वात स्मार्ट मार्ग
हा नवीन फंड लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांच्या संतुलित मिश्रणासह इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी देतो. टाटा एआयएच्या युनिट-लिंक्ड पेन्शन योजनांद्वारे गुंतवणूक केल्यास, तुम्हाला संपत्ती निर्मिती आणि जीवन सुरक्षा या दोन्ही सुविधा मिळतात.
मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढता वेग पाहता, गुंतवणूकदार आता योग्य नियोजनासह दीर्घकाळासाठी पैसे साठवू इच्छित आहेत. आजच्या काळात शेअर बाजारातील सर्वसामान्यांचा सहभाग विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. लोक आता जुन्या पद्धतींऐवजी बाजाराशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास अधिक पसंती देत आहेत. अशा परिस्थितीत, भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी ‘इंडेक्स फंड’मधील गुंतवणूक हा सर्वात विश्वसनीय आणि पसंतीचा मार्ग बनला आहे.
बाजारातील बदलता कल लक्षात घेऊन, भारताची विश्वसनीय विमा कंपनी ‘टाटा एआयए’ने ‘व्हॅल्यू इन्वेस्टिंग’वर आधारित दोन नवीन फंड सादर केले आहेत. ही रणनीती अशा कंपन्या निवडण्यावर अवलंबून आहे, ज्यांच्यामध्ये भविष्यात मोठी वाढ साध्य करण्याची पूर्ण क्षमता आहे. हे फंड लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅपमधील अशा ५० निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्या येणाऱ्या काळात ‘मार्केट लीडर’ बनू शकतात. याद्वारे गुंतवणूकदारांना केवळ उत्तम परताव्याची संधीच मिळत नाही, तर जीवन विम्याचे सुरक्षा कवचही मिळते.
टाटा एआयए लाइफ एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स फंड:
हा फंड पारदर्शक पद्धतीने निवडलेल्या ५० सर्वोत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. मुलांचे शिक्षण, हक्काचे घर बांधणे किंवा भविष्यातील आर्थिक सुरक्षितता यांसारखी उद्दिष्टे पूर्ण करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा पर्याय अत्यंत चांगला आहे. या फंडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात पैशांच्या वाढीसोबतच तुम्हाला टाटा एआयएकडून जीवन विम्याचे संरक्षणही मिळते.
टाटा एआयए लाइफ एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स पेन्शन फंड:
हा विशेष फंड टाटा एआयएच्या पेन्शन प्लॅनसोबत उपलब्ध आहे, जो निवृत्तीनंतर चिंतामुक्त जीवन जगण्यास मदत करतो. यामध्ये तुम्हाला शेअर बाजारातील वाढीचा फायदा तर मिळतोच, सोबतीला जीवन विम्याचे संरक्षणही मिळते. याद्वारे तुम्ही निवृत्तीसाठी हळूहळू मोठा निधी जमा करू शकता आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचे भविष्यही सुरक्षित ठेवू शकता.
या नवीन फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी ९ ते १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. जे लोक या कालावधीत गुंतवणूक करतील, त्यांना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी केवळ ₹१० च्या सुरुवातीच्या किमतीत (NAV) युनिट्स दिली जातील.
फंडाची मुख्य माहिती:
गुंतवणुकीचे उद्दिष्ट: ‘एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स’शी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळात तुमच्या पैशात वाढ करणे. बेंचमार्क: या फंडाच्या कामगिरीची तुलना ‘BSE 500 Enhanced Value 50 Customised Index’ शी केली जाईल. गुंतवणूक कोठे केली जाईल: तुमच्या गुंतवणुकीचा ७०% ते १००% हिस्सा शेअर्समध्ये (Equities) लावला जाईल, तर उर्वरित ०% ते ३०% हिस्सा रोख (Cash) किंवा मनी मार्केट साधनांमध्ये ठेवला जाऊ शकतो.
फंडाच्या लाँच प्रसंगी टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सचे सीआयओ, श्री. हर्षद पाटील म्हणाले: “शेअर बाजारात त्यांनाच फायदा होतो जे संयम आणि शिस्तीने गुंतवणूक करतात. अनेक गुंतवणूकदारांसाठी योग्य स्टॉक निवडणे किंवा बाजाराची योग्य वेळ समजून घेणे कठीण असते. आमची ‘एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स’ (Enhanced Value Index) पद्धत हे काम सोपे करते. हा फंड ठोस आकडेवारी आणि नियमांवर आधारित आहे, ज्यामुळे गुंतवणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सरळ होते. दीर्घकालीन गुंतवणूक प्रत्येकासाठी सुलभ आणि सोपी बनवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
इंडेक्स-आधारित गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ का आहे?
आर्थिक विकासाची साथ: भारताच्या जीडीपी वाढीचा सकारात्मक दृष्टिकोन, लोकसंख्येचा फायदा आणि विस्तारणारा मध्यमवर्ग यामुळे कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्यासाठी सातत्याने संधी निर्माण होत आहेत. (स्रोत: IMF, RBI)1 जागतिक अस्थिरता: भौगोलिक-राजकीय तणाव आणि जागतिक भांडवलाच्या प्रवाहातील बदलांमुळे बाजारपेठेत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत ‘मूल्य-आधारित’ धोरणे अशा कंपन्या शोधण्यात मदत करतात, ज्यांचे मूल्य सध्या कमी आहे, पण ज्या या स्थितीचा फायदा घेऊ शकतात. पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगकडे वाढता कल: गेल्या पाच वर्षांत भारतातील पॅसिव्ह फंड्समध्ये २५% पेक्षा जास्त दराने (CAGR) वाढ झाली आहे (स्रोत: AMFI)2. यामुळे गुंतवणूकदार आता गुंतवणुकीतील पारदर्शकता आणि कमी खर्चाच्या पर्यायांना अधिक पसंती देत आहेत. सहज मिळणारे वैविध्य: ‘एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स’ विविध क्षेत्रांतील अनेक कंपन्यांवर लक्ष ठेवतो. यामुळे गुंतवणूक विखुरली जाऊन जोखीम कमी होण्यास मदत होते आणि त्याच वेळी बाजारातील वाढीचा फायदाही मिळतो.
‘एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स’ धोरण वेगळे का आहे?
एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या फंड्सच्या तुलनेत, ‘एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स’ धोरण संपूर्ण बाजारातील गुंतवणुकीची संधी देते आणि त्याच वेळी मूल्यांकनाच्या शिस्तीवर भर देते. भक्कम पाया असलेल्या आणि रास्त किमतीत उपलब्ध असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून, हे धोरण बाजारातील विविध चक्रांमध्ये वाढीची क्षमता आणि संभाव्य घसरणीपासून संरक्षण यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करते.
याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
वैविध्यपूर्ण गुंतवणूक: हा फंड ‘बीएसई एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स’चे अनुसरण करतो. यामध्ये लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप श्रेणीतील अशा ५० कंपन्यांचा समावेश होतो ज्या ‘बुक व्हॅल्यू टू प्राईस’, ‘अर्निग्स टू प्राईस’ आणि ‘सेल्स टू प्राईस’ या तीन मूलभूत निकषांवर आधारित आहेत. शिस्तबद्ध आणि नियमांवर आधारित गुंतवणूक: मूलभूत तत्त्वांवर आधारित ही शिस्तबद्ध पद्धत भावनेच्या भरात घेतलेले निर्णय आणि गुंतवणूक केव्हा करावी (मार्केट टाईमिंग) याचा अंदाज चुकण्यामुळे होणाऱ्या चुका कमी करण्यास मदत करते. दीर्घकालीन भांडवल वृद्धी: दीर्घ गुंतवणुकीच्या कालावधीत सातत्यपूर्ण वाढ मिळवून देणे हे या रणनीतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. कमी अस्थिरता: योग्य मूल्यांकनावर व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, हा फंड वाढीची क्षमता आणि जोखीम व्यवस्थापन यांचा उत्तम समतोल राखतो. जीवन विमा संरक्षण: टाटा एआयएच्या ‘युनिट-लिंक्ड’ विमा योजनांद्वारे (ULIP) गुंतवणुकीसोबतच उच्च मर्यादेचे जीवन विमा संरक्षण मिळते. निवृत्तीवर लक्ष केंद्रित: यातील पेन्शन फंडचा पर्याय विशेषतः दीर्घकालीन निवृत्ती नियोजनासाठी तयार करण्यात आला आहे.
पूर्ण आत्मविश्वासाने गुंतवणूक करा
टाटा एआयएचा ‘एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स फंड’ गुंतवणुकीचा एक सोपा आणि पारदर्शक मार्ग प्रदान करतो, जो भारतातील दीर्घकालीन आर्थिक वृद्धीच्या संधींचा लाभ घेतो. ज्यांना स्टॉक्सची निवड करणे किंवा बाजाराच्या वेळेचा अंदाज घेण्याच्या गुंतागुंतीत न पडता, पद्धतशीर आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी हा एक धोरणात्मक पर्याय आहे.
एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स फंडमधील गुंतवणूक:
ग्राहक या फंडमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि आर्थिक नियोजनाचा भाग बनू शकतात. हा फंड टाटा एआयएच्या खालील विमा योजनांसोबत उपलब्ध आहे:
टाटा एआयए परम रक्षा लाईफ ॲडव्हांटेज +, टाटा एआयए परम रक्षा लाईफ ग्रोथ +, टाटा एआयए परम रक्षा लाईफ प्रो +, टाटा एआयए परम रक्षा लाईफ मॅक्सिमा +, टाटा एआयए परम रक्षा लाईफ प्रो, टाटा एआयए परम रक्षा लाईफ प्रो ॲडव्हान्स, टाटा एआयए शुभ मुहूर्त, टाटा एआयए प्रीमियर एसआयपी, टाटा एआयए शुभ फॉर्च्यून, टाटा एआयए शुभ हेल्थ प्लस, टाटा एआयए स्मार्ट संपूर्ण रक्षा, टाटा एआयए स्मार्ट एसआयपी, टाटा एआयए स्मार्ट संपूर्ण रक्षा प्रो, टाटा एआयए स्मार्ट संपूर्ण रक्षा सुप्रीम, टाटा एआयए आय-सिस्टमॅटिक इन्शुरन्स प्लॅन, टाटा एआयए स्मार्ट फॉर्च्यून प्लस, टाटा एआयए परम रक्षा लाईफ, टाटा एआयए परम रक्षा प्लस २.०, टाटा एआयए स्मार्ट संपूर्ण रक्षा प्लस, टाटा एआयए हेल्थ प्रो, टाटा एआयए प्रो-फिट, टाटा एआयए फॉर्च्यून मॅक्सिमा, टाटा एआयए फॉर्च्यून प्रो, टाटा एआयए वेल्थ मॅक्सिमा, टाटा एआयए वेल्थ प्रो.
इक्विटी फंड्समध्ये दीर्घकाळात अधिक परतावा देण्याची क्षमता असते, ज्यामुळे पेन्शन पॉलिसीधारक त्यांच्या भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्यांचे नियोजन करू शकतात आणि आपली क्रयशक्ती वाढवू शकतात. हा फंड विशेषतः टाटा एआयएच्या ‘युनिट-लिंक्ड’ पेन्शन योजनांसोबत उपलब्ध आहे – टाटा एआयए स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन आणि टाटा एआयए प्रीमियर पेन्शन सिक्युअर. या योजना ग्राहकांना दीर्घकालीन वाढीच्या संधींसह अत्यंत स्मार्ट पद्धतीने एक भक्कम निवृत्ती निधी उभारण्यास मदत करतात.
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सकडे एकूण १,४५,२५६ कोटी रुपये (Assets Under Management) जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये २१% वाढ झाली आहे. नवीन पॉलिसींमधून मिळणारे उत्पन्न आणि गुंतवणुकीवरील उत्तम परतावा यामुळे कंपनीने ही कामगिरी केली आहे.
*टीप: या फंडमध्ये जोखीम जास्त असल्याने, गुंतवणूकदारांनी आपल्या क्षमतेनुसार विचार करूनच गुंतवणूक करावी. जुनी कामगिरी भविष्यातील फायद्याची खात्री देऊ शकत नाही.
धायरीत आयोजन : पंडित सत्यशील देशपांडे यांना ब्रह्मनाद पुरस्कार
पुणे : ब्रह्मनाद कला मंडळ व धारेश्र्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी (२५वा) ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे शुक्रवार, दि. २० ते रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत धायरी येथे आयोजन करण्यात आले आहे. गायन, वादन आणि नृत्याचा संगम साधणाऱ्या संगीत महोत्सवात युवा आणि प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
संगीत महोत्सवात दिल्या जाणाऱ्या ह. भ. प. मारुतीराव गरुड स्मृती ब्रह्मनाद पुरस्काराने ज्येष्ठ गायक, संगीततज्ज्ञ पंडित सत्यशील देशपांडे यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध गायक डॉ. पंडित संजय गरुड यांनी आज (दि. १४) पत्रकार परिदेत दिली. ब्रह्मनाद कला मंडळाच्या सचिव रागिणी गरुड, विश्वस्त सुभाष चाफळकर, सल्लागार आसावरी आंबेकर, धारेश्र्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे संचालक अनिकेत चव्हाण उपस्थित होते.
महोत्सवाविषयी माहिती देताना डॉ. पंडित संजय गरुड म्हणाले, ‘सोन्याची पायरी’ अशी ओळख असलेल्या धायरी उपनगरात शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार व्हावा, अशी अपेक्षा किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक व गुरू पंडित श्रीकांत देशपांडे यांची होती. त्यांच्या इच्छेनुसार ब्रह्मनाद संगीत महोत्सवाला सुरुवात केली. गेल्या २४ वर्षांपासून अव्याहतपणे महोत्सव सुरू आहे. महोत्सवाला दरवर्षी रसिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
यंदाचा महोत्सव सायंकाळी ५:३० ते रात्री १० या कालावधीत सिंहगड रोडवरील धायरीतील धारेश्र्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात येत आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
शुक्रवार, दि. २० : सहभागी कलाकार :
सरगम गरुड (कथक), मधुश्री नारायण (गायन), पंडित शैलेश भागवत (शहनाई वादन), पंडित राजेंद्र कंदलगावकर (गायन).
शनिवार, दि. २१ : सहभागी कलाकार : विराज जोशी (गायन), रोसी दत्ता (गायन), डॉ. बिपुलकुमार राय (संतूर वादन), पंडिता शुभदा पराडकर (गायन).
रविवार, दि. २२ : सहभागी कलाकार : आर्या नंदे (ओडिसी नृत्य), अनुपम जोशी (सरोद वादन), डॉ. पंडित संयज गरुड (गायन).
पुणे- कोरेगाव पार्क येथील इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीचा मालक भुपेश अशोक दिक्षीत वय ४२ वर्षे, याचेविरुध्द आर्थिक गुन्हे शाखा, पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरमहा ४ ते १० टक्के व्याजाने ठेवी घेऊन फसवणूक करणे असा त्याच्यावर आरोप आहे.
पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहरातील महिला फिर्यादी व इतर लोकांना इन्फिस्को शेअर मार्केट कंपनी मध्ये पैसे गुंतविल्यास सदरचे रक्कमेवर महिन्यास ४ टक्के, ७ टक्के, १० टक्के दराने नफा देण्याचे आमिष दाखवुन त्यांना कोट्यावधी रुपये गुंतवणुक करायला भाग पाडले व सुरुवातीला गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही महिने नफा देऊन नंतर मुळ रक्कम, तसेच परतावा न देता, नफा ही न देता अन्यायाने फिर्यादी यांची व इतर गुंतवणुकदारांचीही कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी सदर तक्रारीचे अनुषंगाने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु.र.नं-९६/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१६(२), ३१६ (५),३१८ (४), व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल् करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतर्फे सहा. पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख या करीत आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार गुप्ता, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे)पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विवेक मासाळ,सहा. पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, सौ शुभदा संखे (अतिरिक्त कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख (तपासी अधिकारी) या प्रकरणी तपास करीत आहेत.. या इन्फिस्को शेअर मार्केट कंपनी या भुपेश अशोक दिक्षीत यांचेकडुन परतावा देण्याचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक झाली असल्यास संबंधीत कागदपत्रे व पुराव्यांसह आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर या ठिकाणी तपासकामी हजर राहावे असे आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन आवाहन करण्यात येत आहे.
● 8 प्रमुख कर्जउत्पादनांमध्ये एकूण कर्जवाटपापैकी 83% हिस्सा केंद्रित असून, त्यात व्यावसायिक कर्जांचा सर्वाधिक 30% वाटा आहे.
● पोर्टफोलिओमधील वाढ ही किरकोळ (रिटेल) आणि लघुउद्योग क्षेत्रातील वाढत्या कर्जक्रियाकलापांचे द्योतक असून, मालमत्ता गुणवत्तेच्या निर्देशांकांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येते.
मुंबई – शहरी सहकारी बँका (UCBs) भारताच्या कर्ज परिसंस्थेत आपले स्थान अधिक मजबूत करत आहेत. स्थिर ताळेबंद वाढ, सुधारत असलेली मालमत्ता गुणवत्ता आणि किरकोळ तसेच लघुउद्योग क्षेत्रातील वाढती मागणी यामुळे हा प्रवाह बळकट होत आहे.
सप्टेंबर 2025 अखेर शहरी सहकारी बँकांची एकूण प्रलंबित कर्जरक्कम ₹3.4 लाख कोटींवर पोहोचली असून, मागील पाच वर्षांत त्यात 1.9 पट वाढ झाली आहे. ही माहिती ‘सहकार ट्रेंड्स’ या अहवालातून समोर आली आहे. हा अहवाल नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) आणि ट्रान्सयुनियन सिबिल या भारतातील अग्रगण्य माहिती व विश्लेषण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आला आहे.
जरी संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील एकूण कर्जवाटपात UCBs चा वाटा सुमारे 1.8% इतकाच मर्यादित असला, तरी उपलब्ध आकडेवारीनुसार ही व्यवस्था आकाराने विस्तारत असून बदलत्या कर्जदार प्रोफाइल, स्पर्धात्मक परिस्थिती आणि नियामक अपेक्षांशी जुळवून घेत पुढे जात आहे.
“शहरी सहकारी बँका (UCBs) ‘भारत’मध्ये अधिक व्यापक पद्धतीने विस्तार करत आहेत. मोठ्या शहरी केंद्रांपलीकडे जाऊन त्या अर्ध-शहरी आणि उदयोन्मुख भागांतील कुटुंबे व लघुउद्योगांना औपचारिक कर्जपुरवठा करत आहेत. स्थानिक समुदायांशी असलेले त्यांचे जवळचे नाते त्यांना स्थानिक संदर्भ आणि संबंध महत्त्वाचे ठरणाऱ्या कर्जदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास सक्षम करते. त्यामुळे अधिकाधिक ‘भारत’ औपचारिक कर्जप्रणालीत समाविष्ट होत आहे. किरकोळ आणि लघुउद्योग कर्जवाटपाचा विस्तार करत असताना, कर्जगुणवत्ता टिकवून ठेवत व्यापक प्रवेश देणे ही त्यांच्या भूमिकेची मध्यवर्ती बाब राहील,” असे भावेश जैन, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ट्रान्सयुनियन सिबिल यांनी सांगितले.
“UCBs चा वाढता कर्जविस्तार विशेषतः अर्ध-शहरी आणि उदयोन्मुख भागांमध्ये कर्जदारांचा मजबूत विश्वास दर्शवतो, जिथे औपचारिक कर्जप्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे. या बँका विस्तार करत असताना संस्थात्मक क्षमता बळकट करणे, कार्यकारी कार्यक्षमता सुधारणे आणि सशक्त प्रशासकीय चौकट उभारणे यावर लक्ष केंद्रित राहणे आवश्यक आहे. या संक्रमणकाळात UCBs ला सक्षमपणे पाठबळ देणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्यांची वाढ अर्थपूर्ण आर्थिक सहभाग आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यात रूपांतरित होईल,” असे प्रभात चतुर्वेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) यांनी नमूद केले.
यूसीबी कर्जवाटप आठ प्रमुख उत्पादनांमध्येच केंद्रित
व्यावसायिक कर्जे, गृहनिर्माण कर्जे, किरकोळ व्यवसाय कर्जे, मालमत्तेविरुद्ध कर्ज (लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी), सुवर्णकर्जे, वैयक्तिक कर्जे, वाहन कर्जे आणि बँक ठेवींविरुद्ध कर्जे या उत्पादनांचा यूसीबींच्या ताळेबंदावर प्रमुख दबदबा आहे. सप्टेंबर 2025 अखेर या सर्व उत्पादनांचा एकत्रित वाटा यूसीबींच्या एकूण प्रलंबित कर्जरकमेपैकी सुमारे 83% इतका होता. यावरून तारणाधारित किरकोळ कर्जवाटप आणि लघुउद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जांवर सातत्याने भर असल्याचे दिसून येते.
यूसीबींच्या गृहनिर्माण कर्जांचा सरासरी तिकीट आकार सुमारे ₹23 लाख इतका होता, तर गृहनिर्माण वित्त कंपन्यांसाठी तो ₹26 लाख होता. सुवर्णकर्जांच्या बाबतीत यूसीबींचा सरासरी तिकीट आकार ₹1.3 लाख इतका असून, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी तो ₹2.3 लाख आहे. याउलट, यूसीबींच्या व्यावसायिक कर्जांचा सरासरी तिकीट आकार सुमारे ₹50 लाख होता, जो सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ₹37 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच वैयक्तिक कर्जांचा सरासरी तिकीट आकार यूसीबींसाठी सुमारे ₹4.7 लाख असून, बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांसाठी तो ₹2 लाख इतका आहे.
तक्ता १ : यूसीबींमधील प्रमुख कर्जउत्पादनांच्या प्रलंबित शिल्लक रकमेची वाढ आणि हिस्सा (पाच वर्षांचा कल)
उत्पादन
बॅलेन्सेसमधील ५ वर्षांचा सीएजीआर (सप्टेंबर ‘25 वि. सप्टेंबर ‘20)
बॅलेन्सेसमधील वाटा %(सप्टेंबर ‘25)
व्यावसायिक कर्ज*
4%
30%
गृह कर्ज
19%
14%
किरकोळ व्यवसाय कर्ज
19%
12%
मालमत्ता तारण कर्ज
17%
10%
वैयक्तिक कर्ज
17%
6%
सोने तारण कर्ज
49%
5%
वाहन कर्ज
38%
4%
बँक ठेवींवरील कर्ज
20%
2%
*All Commercial fund-based loans (working capital -term loan) with entity with total exposure of 100 Cr is considered.
सुवर्णकर्जे : यूसीबींसाठी वाढीची मोठी संधी
यूसीबींच्या एकूण कर्जपोर्टफोलिओपैकी सुवर्णकर्जांचा वाटा सुमारे 5% आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत या विभागात तुलनेने अधिक ‘सब-प्राईम’ कर्जदारांना सेवा दिली जात असली, तरी कर्ज कामगिरी निर्देशांकात सुधारणा दिसून येत आहे. 90 दिवसांहून अधिक काळ थकित असलेल्या कर्जशिल्लकांच्या आधारे मोजली जाणारी थकबाकी पातळी अलीकडील कालावधीत सातत्याने घटताना दिसत आहे, जे क्रेडिट गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे सूचित करते.
व्यावसायिक कर्जांचा यूसीबींच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक वाटा
सप्टेंबर 2025 अखेर यूसीबींच्या एकूण प्रलंबित कर्जशिल्लकांमध्ये व्यावसायिक कर्जांचा सर्वाधिक वाटा आहे. सप्टेंबर 2020 ला 100 हा आधार निर्देशांक धरल्यास, चौकशी-स्तरावरील आकडेवारीनुसार सप्टेंबर 2025 पर्यंत यूसीबींसाठी व्यावसायिक कर्जांच्या मागणीत अधिक तीव्र वाढ झाल्याचे दिसते.
जून 2025 अखेरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत यूसीबींनी चौकशीपासून कर्जनिर्मितीपर्यंत (ओरिजिनेशन) रूपांतर दर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा जास्त नोंदवला. मात्र कर्जवितरणाचा वेग तुलनेने मंद राहिला. यूसीबींच्या 45% कर्जनिर्मितीचे वितरण 15 दिवसांत झाले, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी हा दर 61% होता.
यूसीबी ₹1 कोटींपेक्षा अधिक कर्जउपयोग असलेल्या घटकांना तुलनेने जास्त प्रमाणात सेवा देतात. तसेच त्यांच्या कर्जदारांमध्ये कमी-जोखीम गटाचा वाटा 49% असून, मध्यम-जोखीम गट 45% आणि उच्च-जोखीम गट 6% आहे.
आलेख १ : व्यावसायिक कर्ज मागणी निर्देशांक – यूसीबी विरुद्ध सार्वजनिक क्षेत्रातील बँका
महानगर आणि अर्ध–शहरी भागांत गृहनिर्माण कर्जांची वाढती मागणी
यूसीबींच्या एकूण प्रलंबित कर्जशिल्लकांमध्ये गृहनिर्माण कर्जांचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वाटा आहे. गेल्या पाच वर्षांत यूसीबींनी गृहनिर्माण कर्जवाटपात 2 पट वाढ नोंदवली असून, या विभागात तरुण ग्राहक, महिला आणि ‘नवीन-टू-क्रेडिट’ (पहिल्यांदाच औपचारिक कर्ज घेणारे) कर्जदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले आहेत.
शहरी आणि अर्ध-शहरी भागांत या वाढीचा वेग अधिक असल्याचे दिसून येते, ज्यामुळे या भागांतील औपचारिक कर्जप्रवेश मजबूत होत असल्याचे संकेत मिळतात. गृहनिर्माण कर्जांच्या क्रेडिट कामगिरीतही सुधारणा झाली आहे. 90 दिवसांहून अधिक काळ थकित (90+ डीपीडी) असलेल्या कर्जशिल्लकांचा दर सप्टेंबर 2024 मधील 3.2% वरून सप्टेंबर 2025 मध्ये 2.8% पर्यंत घसरला आहे.
वैयक्तिक कर्जदारांची प्रोफाइल यूसीबींसाठी अधिक सक्षम
अलिकडील कालावधीत यूसीबींमध्ये वैयक्तिक कर्जांची मागणी मजबूत झाली आहे. ऑगस्ट 2025 अखेरच्या तीन महिन्यांत वैयक्तिक कर्ज चौकशीपासून कर्जनिर्मितीपर्यंतचा रूपांतरण दर यूसीबींसाठी 39% इतका होता, तर बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांसाठी तो 22% होता. मात्र, या कर्जांपैकी केवळ 42% कर्जांचे वितरण पाच दिवसांत झाले, तर बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांसाठी हा दर 68% होता. तसेच वैयक्तिक कर्जांच्या थकबाकी पातळीतही यूसीबींसाठी सातत्याने सुधारणा झाली आहे. 90 दिवसांहून अधिक थकित (90+ डीपीडी) कर्जांचे प्रमाण सप्टेंबर 2020 मधील सुमारे 4.5% वरून सप्टेंबर 2025 पर्यंत सुमारे 2.1% पर्यंत घसरले आहे. अलीकडील कालावधीत ही कामगिरी स्थिर राहिल्याचेही दिसून येते.
यूसीबींसाठी कर्जविस्ताराच्या नव्या संधी
उपलब्ध आकडेवारीनुसार पोर्टफोलिओ अधिक सखोल करण्याची संधी अद्याप शिल्लक आहे. मार्च 2025 अखेर यूसीबींकडे सुमारे 30 लाख सक्रिय किरकोळ कर्जदार होते. त्यापैकी सुमारे 1.7 लाख, म्हणजेच सुमारे 6%, कर्जदारांकडे व्यावसायिक कर्जाची नोंदही होती. एप्रिल ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अशा सुमारे 3,000 कर्जदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून नवीन व्यावसायिक कर्जे घेतली. या कर्जांची एकूण मंजूर रक्कम सुमारे ₹724 कोटी होती, त्यापैकी सुमारे ₹442 कोटी कमी आणि मध्यम-जोखीम गटातील कर्जदारांना वितरित करण्यात आले.
आलेख २ : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून व्यावसायिक कर्जे घेतलेले किरकोळ कर्जदार
एकंदरीत, यूसीबींची सातत्यपूर्ण वाढ हा असा क्षेत्र दर्शवते की जे आपले ताळेबंद अधिक सक्षम करत असताना कार्यपद्धती आणि जोखीम व्यवस्थापन चौकटींचे आधुनिकीकरण वेगाने करत आहे. सुधारत असलेली मालमत्ता गुणवत्ता, शिस्तबद्ध कर्जविस्तार आणि तंत्रज्ञानाधारित प्रक्रियांचा वाढता स्वीकार यामुळे यूसीबी आपल्या मूलभूत ग्राहकवर्गाला अधिक कार्यक्षम आणि लवचिक पद्धतीने सेवा देण्यासाठी अधिक सक्षम होत आहेत.
“समुदायाशी घट्ट जोडलेली आपली पारंपरिक ताकद आणि डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया तसेच नियामक अनुरूपता यांचा समतोल साधत यूसीबी पुढे जात असताना, सर्वसमावेशक आर्थिक वाढीस चालना देणे आणि भारतातील शहरी व अर्ध-शहरी भागांमध्ये औपचारिक कर्जप्रवेश अधिक सखोल करणे यामध्ये त्यांची भूमिका अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे,” असे भावेश जैन यांनी नमूद केले.
मुंबई, दि. १४ फेब्रुवारी.. वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन लाइनवरील मुलुंड मधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली आहे. मुलुंडच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरु असून स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात सुरु असून तो आता लोकांच्या जिवावर उठला आहे हे मुलुंडच्या घटनेने पुन्हा दाखवून दिले आहे. मेट्रोची कामं लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? कामाचा दर्जा आणि सुरक्षेकडे सरकार बघणार आहे की नाही? हा प्रश्न असून फक्त कंत्राटदारावर कारवाई करुन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये. जसे श्रेय घेता तशी जबाबदारीही घेण्यास भाजपा महायुती सरकारने शिकले पाहिजे. असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
कोस्टल रोड, मुंबई ट्रांस हार्बर लिंक रोड, समृद्धी महामार्ग या मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे बांधकाम किती तकलादू आहेत हे एका वर्षातच या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लाखो कोटी रुपये खर्च करून जर हे प्रकल्प जनतेसाठी जीवघेणे ठरत असतील तर असा विकास काय कामाचा? मुलुंडमध्ये मेट्रो कामाचे स्लॅब कोसळण्याच्या घटनेची सरकारने गांभिर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मुंबई-मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3 जण जखमी झाल्याची घटना मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर घडली आहे. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. काँग्रेस व ठाकरे गटाने या प्रकरणी सरकारवर सडकून टीका करत सरकार व एमएमआरडीए प्रशासनाला मुंबईकरांच्या जीवाचे काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर मेट्रो पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा शनिवारी दुपाीर 12.20 च्या सुमारास अचानक रस्त्याने जाणाऱ्या ऑटो व एका कारवर पडला. त्यात ऑटो व कारमधून प्रवास करणारे 3-4 जण जखमी झाले. या जखमींना तत्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. गंभीर गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुलाचे काम सुरू असतानाही बॅरिकेट्स लावण्यात आले नव्हते किंवा इतर योग्य ती उपाययोजनाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी व संबंधित विभागाचे कर्माचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन वाहतूक वळवली. रस्त्यावर पडलेला ढिगारा हटवला. सध्या हा अपघात नेमका कशामु्ळे झाला? याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणी बांधकामाविषयी सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का? याचीही चौकशी केली जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (एलबीएस रोड) रोडवर गत अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकरणी दररोज भलेमोठे गर्डर व स्लॅब वर-खाली चढवण्याचे काम सुरू असते. त्यातच आज ही दुर्घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिकेने या दुर्घटनेची माहिती देताना म्हटले आहे की, आज दुपारी 12.20 वा. मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भोग कोसळला. बांधकाम सुरू असताना सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळून रिक्षावर पडला. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत. ऑटोरिक्षातील 3-4 जण जखमी झाल्याची शक्यता आहे.
महिला स्वबळावर उभ्या राहिल्या तर कुटुंबाचे सक्षमीकरण –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर
महिलांमुळे संपूर्ण कुटुंबाला ओळख मिळते – योगिता भोसले
पुणे : स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली, तर ती केवळ स्वतःचा विकासच नाही. तर संपूर्ण कुटुंबाचे सक्षमीकरण करते. उद्योग व्यवसायात महिला आल्यास स्वयंरोजगारातून त्या स्वतःची ओळख निर्माण करतात. स्वयंरोजगार स्वतः पुरता मर्यादित न ठेवता, त्यातून पुढचे पाऊल टाकत महिलांनी उद्योजकतेकडे वळायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले.
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे राज्यातील १२५ महिलांना मोफत शिलाई मशिन वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमाला पुणे महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले, जागतिक वित्त क्षेत्रातील अग्रणी मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ञ सीए देवेंद्र मिश्रा, निरंजन सेवाभावी संस्थेचे सचिव सीए दुर्गेश चांडक, कार्याध्यक्ष अजय झंवर, भारत वेदपाठक, अहिल्यानगरचे संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा आदी उपस्थित होते.
सीए देवेंद्र मिश्रा म्हणाले, पूर्वी महिला साक्षरतेची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असे. आता आपण महिला सक्षमीकरणाची चर्चा करीत असतो. त्याकरिता महिलांमध्ये विविध प्रकारची कौशल्ये असणे आवश्यक आहे. या कौशल्याच्या आधारे महिलांचे सशक्तीकरण होउ शकते. महिला स्वतःच्या कुटुंबासोबत, गाव, देश देखील उभा करू शकते. निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरणाचे उत्तम कार्य होत असून यापुढे आम्ही देखील त्यांच्यासोबत कायम असू.
योगिता भोसले म्हणाल्या, जेव्हा कोणत्याही महिलेला वेगळी ओळख मिळते, तेव्हा ती केवळ महिलेपुरती रहात नाही, तर ती ओळख संपूर्ण कुटुंबाला मिळते. त्यामुळे महिला कर्तृत्ववान झाल्या तर त्या स्वतः खूप मोठ्या होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात सीए दुर्गेश चांडक म्हणाले, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगार व स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १२५ महिलांना शिलाई मशीन मोटार सह देण्यात आले. यामध्ये पुण्यासह बीड आणि अहिल्यानगर येथील महिलांचा समावेश आहे. महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने संस्था प्रयत्नशील असून शैक्षणिक क्षेत्रात देखील २५ हजार हुन अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. भूषण मानधने यांनी सूत्रसंचालन केले. अजय झंवर यांनी आभार मानले.
वेश्याव्यवसायातुन ०१ अल्पवयीन मुलीची सुटका, ०१ महिला आरोपी व ०२ पुरुष आरोपीस अटक
पुणे- धनकवडी येथील “श्री साई लॉजिंग”वर छापा मारून पोलिसांनी वेश्याव्यवसायातुन ०१ अल्पवयीन मुलीची सुटका केली आणि ०१ महिला आरोपी व ०२ पुरुष आरोपीना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ दि.१३/०२/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महिला एजंट व पुरुष एजंट हे अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असलेबाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. सदर बाबत पोलीस निरीक्षक छगन कापसे अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक याचे सहयाने सदर बातमीची खात्री करुन “श्री साई लॉजिंग” येथे अचानक छापा टाकुन एक महिला आरोपी शिरसाठी वय ३५ वर्षे, रा. कामीनी हॉटेल जवळ विजय नगर, चिंचवड गाव पुणे.तसेच अनिल मदन जेधे वय ३५ वर्षे रा. पेपर मिल समोर, साने चौक, चिंचवड पुणे आणि ३) जिवन प्रमादे इंगोले वय ३३ वर्षे, श्री साई लेंजिंग स.नं. ३०, नित्यानंतद सोसायटी, बालाजी नगर बस स्टॉप शेजारी, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे यांना अटक केली त्यांनी वेश्याव्यवसायासाठी “श्री साई लॉजिंग “मध्ये आणलेल्या ०१ पिडीत मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी आरोपीं विरुध्द दि. १३/०२/२०२६ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. ४६/२०२६, भा.न्या.सं १४३, ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, तसेच बालकांचे लैगींक गुन्हयापासुन संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ४,१७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३, शंकर खटके, पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस अंमलदार इम्रान नदाफ, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, भुजबळ, म. पोलीस अंमलदार रेश्मा कंक, इंगळे गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.