Home Blog Page 103

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.६: जिल्हाधिकारी यांनी मत्स्यव्यवसाय वृद्धिंगत करण्याकरिता धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेतर्गत पुणे जिल्ह्यातील सन २०२५-२६ करिता प्राप्त परिपूर्ण प्रस्तावांस पुढील कार्यवाहीस्तव मंजुरी प्रदान केली आहे.

या बैठकीस सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पुणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्यव्यवसाय घटक वृद्धिंगत करण्याकरिता “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही सह-योजना राबविण्यास शासन निर्णय क्रमांक-मत्स्यवि-११२५/प्र. क्र.७१/पदुम १४ दिनांक ४/९/२०२५ अन्वये मान्यता प्राप्त आहे.त्यानुषंगाने पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ९९ गावांतील आदिवासी क्षेत्रातील इच्छुक लाभार्थींकडून प्रस्ताव मागणीस्तव जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानुषंगाने सदर प्राप्त प्रस्तावांची छाननी करून परिपूर्ण असलेले प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जिल्हास्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती पुढे मंजुरीस्तव मांडण्यात आले होते.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही सहयोजना राबविण्यात येत असून या योजनेमध्ये जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ९९ गावांचा धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेत समावेश आहे.

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकास करण्यासाठी मूळ पायाभूत सुविधा तसेच आर्थिक सबलीकरण होऊन सामाजिक प्रवाहात आणणे तसेच मत्स्य व्यवसाय वृद्धिंगत करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असून जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवा, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केली आहे.

बारामतीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार:शरद पवार , पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरही भाष्य

नवी दिल्ली-“काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारीकीची शपथ घेतली. यानंतर दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक, अशोक खरात प्रकरण, पार्थ पवार यांसह विविध मुद्द्यावर भाष्य केले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेबाबत बोलताना शरद पवार भावूक झाले. ते म्हणाले, “अजितदादांच्या जाण्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठे दुःख झाले आहे. ते लोकांसाठी अत्यंत सक्रिय होते आणि विकासकामांत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्याबद्दल मनात आदर आहे, हे मान्यच करावे लागेल. सध्या पवार कुटुंबात ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही बारामतीची ही पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आम्ही या निवडणुकीत कोणाचाही प्रचार करणार नाही.”

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या सभेत पक्षाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो होता. याबाबत शरद पवार यांना विचारले असता, त्यांच्या पक्षाच्या बॅनरवर एनडीएच्या नेत्यांचे फोटो असण्यात काही अडचण नाही. कारण ते एनडीएमध्ये आहेत. पण राष्ट्रवादीच्या बॅनरवर माझा फोटो वापरणे चुकीचे आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही शरद पवार यांनी पडदा टाकला. “विलीनीकरणाची चर्चा ही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये सुरू होती. मात्र, सध्या आमच्या पक्षात विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. अजितदादांसोबत या संदर्भात पाच- सहा बैठका झाल्या. बैठक झाल्यावर दोघांपैकी एक येऊन मला ब्रिफिंग करायचे. भविष्यात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते की नाही आज ते सांगता येत नाही. अजित पवारांचा दृष्टिकोण आणि आग्रह हा आमच्या लोकांना समाधान देणारा होता. ते गेल्यामुळे ते कंटिन्यू राहिलं नाही. त्यामुळे आता पक्षाचं काम करत राहावं अशीच भूमिका आहे.” असे ते म्हणाले.

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, “महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेसला माघार घेण्याबाबत सांगण्याची आम्हाला गरज वाटत नाही. राजकारणात पराभव झाला तरी लोक लोकांची कामे करण्यासाठीच मैदानात उतरत असतात.

बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यावरून राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. याबाबत शरद पवारांना विचारले असता, “राजकारणामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागले. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

तसेच, राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर बोलताना, शरद पवार म्हणाले, “आज राज्यात चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. एका बाजूला शाहू, फुले, आंबेडकर म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जातात हे चिंताजनक आहेत. कोणी किती फोन केले हे माझ्या वाचनात आलं, त्यात अनेकांची नावं आहेत. त्यात राजकीय पक्षात स्थान भुषवणारे लोक आहेत.”

राहुरी विधानसभा:तनपुरेंना समजावले पण शिवसेना शिंदे गटाचे रवी मोरे यांची बंडखोरी तर शरद पवार गटाच्या मोकाटेंनी उमेदवारी अर्ज भरला

भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही, आम्ही का विचार करावा?- रवी मोरे

अहिल्यानगर – बारामती विधानसभा मतदारसंघातून दिवंगत नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामती प्रमाणेच राहुरीतही बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र राहुरीत शिवसेना शिंदे गटाकडूनच भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही, आम्ही का विचार करावा? असा सवाल करत रवी मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शरद पवार गटाने दोन ‘एबी’ फॉर्म पाठवले होते , त्यात प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांच्या नावाचा समावेश आहे. प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेताच पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गोविंदराव मोकाटे रिंगणात उतरलेत आक्रमक पवित्र्यामुळे राहुरीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून तिथे आता प्रत्यक्ष लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता राजकीय ट्विस्ट आला असून, शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना विधानसभेत प्रभावीपणे मांडण्यासाठी खुद्द शेतकऱ्यांनीच आग्रह धरल्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे मोरे यांनी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट केले.

यावेळी महायुतीच्या युती धर्माबाबत विचारले असता मोरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुरी नगरपरिषद आणि स्थानिक कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला कधीही विश्वासात घेतले नाही, मग आम्ही तरी त्यांचा विचार का करावा, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बारामतीमध्ये महायुतीत एकवाक्यता दिसत असली तरी, राहुरीत मात्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानेच बंडखोरीचे निशाण फडकावल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राहुरीत CM देवेंद्र फडणवीसांच्या कॉलनंतर प्राजक्त तनपुरेंची निवडणुकीतून माघार

अहिल्यानगर- भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर महायुतीतर्फे त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची अचानक भेट घेतल्याने, राहुरीची ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला.

राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बंद दाराआड चर्चेदरम्यान रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राजक्त तनपुरे यांचे फोनवरून बोलणे करून दिल्याचे समजते. आगामी काळात प्राजक्त तनपुरे राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार 100 टक्के मदत करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे समजते. या नाट्यमय घडामोडींमुळे तनपुरे आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते .
या चर्चेच्या नंतर प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मला विनंती केली आहे. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचे म्हणतोय, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल, असे तनपुरे यांनी म्हटले आहे. प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया पाहता ते या निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या घरातील कोणी निवडणुकीला सामोरे जात असेल, तर ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस, मी आम्ही सगळ्यांनी विधानसभेत एकत्र काम केले आहे. ते गेल्यावेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, राहुरी मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, एमआयडीसी निर्माण होणे गरजेचे आहे. येथील धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातील समस्या कळकळीने मांडल्या. आम्ही यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवरुन बोलणे करुन दिले. आम्ही सर्वजण प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत आहोत. ते जे म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल. प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या या भागातील वलयाची आम्हाला कल्पना आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही उमेदवारी मागे घ्यायची की नाही, हा निर्णय त्यांच्यावर सोडला असल्याचे चव्हाण म्हणाले.

सुनेत्रा पवार दादांच्या आठवणीने भावुक:रडत म्हणाल्या- मी माझे दुःख तळघरात कोंडले, आज बारामतीच्या निर्जिव इमारती, पाने फुले रडतायत

पुणे-सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज अजित पवारांच्या आठवणीने चांगल्याच भावूक झाल्या. बारामती ही अजित पवारांची श्वास होती. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. त्यांचा येथील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतींना स्पर्श झाला. त्यामुळे आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीने रडत आहेत. पण मी स्वतः माझे दुःख तळघरात कोंडले आणि अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले, असे त्या आपले आतापर्यंत दाबून ठेवलेले अश्रू मोकळे करताना म्हणाल्या.

. सुनेत्रा पवार म्हणाल्या, अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावले. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. मी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटले नव्हते की, बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा आपल्यात नाहीत असे मला अजूनही वाटत नाही. मला ते मान्यही नाही. पण नियतीने हा काळ माझ्यावर व तुमच्यावर आणला आहे. दादांचे जाणे ही केवळ माझी व माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हाणी नाही, तर बारामती, महाराष्ट्र व देशाचीही हाणी झाली आहे.

दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक कार्यकर्ताच नव्हे तर प्रत्येक नागरीक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच त्यंचा विश्वास व आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीच्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जिव इमारती, ती न बोलणारी पाणे आणि फुले सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत, असे सुनेत्रा पवार रडत म्हणाल्या
मी माझे दुःख सुद्धा तळघरात कोंडले

सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दुःख सुद्धा तळघरात कोंडले. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे पाहूनच आला आहे. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षांत तुम्ही सर्वांनी अजित पवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत होते. त्यामुळेच दादांनी प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडित काढले.

सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असे ते म्हणायचे. त्यांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला मिळालेली संधी आहे. शरद पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. त्यावर दादांनी आपल्या कष्टाने रंग भरले, कोंदण भरले, या बारामतीला फुलवले, जगवले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होणार नाही याचे मी वचन देते. बारामती जगातील सर्वात विकसित व प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते, तर त्यांची जिद्द होती. एक ध्यास होता.

दादांना बारामती एक जागतिक दर्जाचे शहर बनवायचे होते. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेले. ते केवळ एक व्यक्ती नव्हते, तर तो एक विचार होता. एक व्यवस्था होते. लोककल्याणकारी, लोककल्याणाची एक तळमळ होते. जोपर्यंत जिवातजीव आहे, तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहील, हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य सर्वांना ठावूक आहे. त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मी केला आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सुनेत्रा पवार अजित पवारांची आठवण काढताना पुढे म्हणाल्या, अजितदादा शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हे ही वचन देते की, माझ्यासाठी पार्थ व जय हेच माझे कुटुंब नाही. संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहील. दादांच्या अचानक जाण्याने अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. पण काळजी करू नका. एकाही कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढेही तसाच सुरू राहील. लोकांची कामे होणे ही दादांना श्रद्धांजली आहे.

त्यांच्या जाण्याने बारामतीत अत्यंत अस्वस्थतेचे वातावरण होते. आजही तशाच भावना आहे. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला आदी सर्वजण हवालदिल झाले होते. पण आज मी ठामपणे सांगते की, बारामतीचा विकास हा पूर्वीसारखाच वेगाने सुरू राहील, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

बारामती पोटनिवडणूक:सुनेत्रा पवारांची उमेदवारी दाखल

राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो

पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काँग्रेसने याठिकाणी आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही आज आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार की काँग्रेस त्यात रंगत भरणार हे 23 एप्रिलला स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोनंतर खासदार शरद पवार यांचा फोटो होता. महायुतीच्या नेत्यांसोबत शरद पवार यांचा फोटो लावल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेचे पुन्हा एकदा पेव फुटले आहे.मेळाव्याच्या ठिकाणी शरद पवारांच्या फोटोची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या अनुपस्थितीचीही झाली. सुनेत्रा पवार यांच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात त्या अनुपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या रूपाली चाकणकर यांनी कार्यक्रमाला येणे का टाळले? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा व महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे रुपाली चाकणकर पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

निवडणूक झालीच तर निकाल एकतर्फी:एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला थेट इशारा

पुणे-बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महायुतीची भूमिका होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लढवावी लागत आहे. या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली होती. त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. विशेषतः अर्थ खात्याचे काम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने हाताळले. ‘लाडकी बहीण’ योजनेचा निर्णय घेताना देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे शिंदे यांनी नमूद केले. एक सक्षम प्रशासक आणि संघटक म्हणून अजित पवारांची ओळख होती, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कामाचाही उल्लेख केला. अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांनी सक्षमपणे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील कारभार पुढे नेण्यासाठी त्या आणि महायुतीतील नेते एकत्रितपणे काम करत आहेत, असे शिंदे म्हणाले. बारामतीतील विकासकामांची त्यांना चांगली जाण असून, स्थानिक जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.

पुढे बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, अनेक सामाजिक संघटनांनी देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु, आता निवडणूक झाल्यास त्याचा निकाल जनतेच्या मतांमधून स्पष्ट दिसेल, असे ते म्हणाले. विरोधकांनी परंपरा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

शेवटी शिंदे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा देताना म्हटले की, जर बारामतीत निवडणूक झालीच, तर अजित पवारांनी केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील. आणि त्या मतांमधून सुनेत्रा पवार यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉंग्रेसला कळायला पाहिजे,त्यांना नंतर काय त्रास होईल , हे त्यांना दिसेल-पार्थ पवारांकडून इशारा

0

पुणे-बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिवंगत नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथील निवडणूक बिनविरोध करून अजित पवारांना श्रद्धांजली देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. असे असतानाही कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केला. यावरून आता पार्थ पवारांनी थेट कॉंग्रेसला इशाराच दिला आहे.

पार्थ पवार म्हणाले, माझे कोणाशी बोलणे झाले नाही. कॉंग्रेसला कळायला पाहिजे, काय करायचे ते. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहीत नाही. सगळे मोठे लोक आहेत. सर्वांना माहीती आहे काय चालले आहे. त्यांनी विचार केला असेल तर करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवारांनी नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.

पुढे बोलताना पार्थ पवार म्हणाले, जे दादांसाठीचे प्रेम आहे लोकांच्या मनात, ते लोक विसरत नाहीत. अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचे आहे. मला वाटते की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसे सामोरे जावे लागते. आम्ही सामोरे जाऊ, आम्ही काही कोणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिले आहे ते बघू. फक्त मला वाईट वाटत आहे की कॉंग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू आहे.

दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे शिष्टाईचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा दिल्लीतून होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामतीत उमेदवार न देता महायुतीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार यांची ही मध्यस्थी निष्फळ ठरली आहे.

पुण्यात भाजपचे संघटन ५१% वर नेण्याचे उद्दिष्ट:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

पुणे-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी काळात भाजप पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात भाजपचे संघटन ५१ टक्क्यांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटनेच्या बळकटीवर भर देत, राज्यभरातही संघटना वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पक्षाचा विस्तार करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणावर जोडण्याचा संकल्पही त्यांनी मांडला.

बावनकुळे हे भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त पुणे शहरातील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे , स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले ,तसेच मंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले. ते लवकरच बारामतीला जाणार असून, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज स्वतः भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीत ७५ टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवण्याचा दावाही त्यांनी केला.

बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला बारामतीमध्ये निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले. अजित पवार यांचा दीर्घ राजकीय प्रवास काँग्रेससोबत राहिला आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय योगदानाचा विचार करून काँग्रेसने सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी शरद पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. अशोक खरात प्रकरणावर बोलताना, हा विषय संवेदनशील असून विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

कोणत्या ठेकेदाराने कशी लुटली महापालिका ..थेट सांगितले नगरसेवक सुहास टिंगरेंनी,म्हणाले,पूरस्थितीला अधिकारी-ठेकेदार जबाबदार

पुणे- ड्रेनेज ,पावसाळी गटारे सफाई च्या कामाने वर्षानुवर्षे महापालिकेत सावला गोंधळ घातला असून दरवर्षी यावर आरोप प्रत्यारोप होतात पण स्थिती मध्ये सुधारणा होत नाही असे १४ वर्षांपासूनचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुहास टिंगरे यांनी कोणत्या ठेकेदाराने कशी लुटली महापालिका ..थेट सांगत नगरसेवक सुहास टिंगरेंनी,पूरस्थितीला अधिकारी-ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

टिंगरे म्हणाले,’ दोन दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीला संपूर्ण पुणेकरांना सामोरे जावे लागले. या नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मात्र, या परिस्थितीस केवळ निसर्ग जबाबदार नसून पुणे महानगरपालिकेचे प्रशासन तसेच मागील काही वर्षांपासून पोसले गेलेले मोठे कॉन्ट्रॅक्टर्सही तितकेच जबाबदार आहेत, असे माझे ठाम मत आहे.
दोन वर्षांपूर्वीही अशाच अवकाळी पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी वडगाव शेरी मतदारसंघाचे तत्कालीन आमदार . सुनील टिंगरे यांनी पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह पाहणी दौरा करून सुमारे २२ ठिकाणे तातडीच्या कामांसाठी निश्चित केली होती.
यानुसार एनडीएमए अंतर्गत सुमारे १४७ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. संपूर्ण पुण्यातील सुमारे ६० ठिकाणांपैकी वडगाव शेरी मतदारसंघातील २२ ठिकाणांचा समावेश होता. ही कामे एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आली.
परंतु, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही या २२ कामांपैकी केवळ ४ कामे पूर्ण झाल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली, तर १० कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ २ कामे सुरू असल्याचे आढळून आले. या पाहणीवेळी महानगरपालिकेचे अधिकारी, प्रायमो कन्सल्टंट कंपनीचे अभियंते तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या सभागृहात संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी चुकीची माहिती देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या संदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला असता संबंधित अभियंते व प्रायमो कन्सल्टंट कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र, संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
यामुळे उर्वरित १८ अपूर्ण कामांमुळे वडगाव शेरी मतदारसंघातील धानोरी, लोहगाव, पोरवाल रोड, खेसे पार्क, कलवड, खराडी आदी भागातील नागरिकांच्या सुरक्षेशी थेट खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होते. भविष्यात पुन्हा अशी पूरस्थिती निर्माण होऊन कोणतीही जीवित अथवा आर्थिक हानी झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार का, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच, येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील निविदा प्रक्रियेमध्ये काही ठराविक ठेकेदारांना प्राधान्य दिले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणी साचणाऱ्या २२७ ठिकाणांची ओळख पटवून त्यापैकी १२० गंभीर ठिकाणांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या २२७ ठिकाणांपैकी काही ठिकाणांचा समावेश दोन वर्षांपूर्वीच एनडीएमए अंतर्गत काढलेल्या निविदेमध्ये असून त्या कामांना वर्क ऑर्डर देखील देण्यात आलेली आहे. तरीही आजपर्यंत त्या ठिकाणी कामे सुरू झालेली नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
महानगरपालिका संबंधित ठेकेदाराला वाचवण्यासाठी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जोपर्यंत संबंधित ठेकेदारांवर कठोर व ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा सातत्याने करण्यात येईल. तसेच, पुणे महानगरपालिकेमध्ये एक सक्षम विरोधी पक्ष सदस्य म्हणून जनतेच्या हितासाठी आवाज उठवत राहणार असल्याचे टिंग रे यांनी म्हटले आहे

नऱ्हे येथील “स्वर्ग एक्झीकेटीव्ह पॅराडाईज लॉज’वर छापा

वेश्याव्यवसायतुन ०४ मुलींची सुटका, ०३ पुरुष आरोपीस अटक

पुणे- नऱ्हे येथील “स्वर्ग एक्झीकेटीव्ह पॅराडाईज लॉज’वर छापा टाऊन पोलिसांनी वेश्याव्यवसायतुन ०४ मुलींची सुटका करून ०३ पुरुष आरोपीना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,’दिनांक ०४/०४/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून “स्वर्ग एक्झीकेटीव्ह पॅराडाईज लॉज”, दुसरा मजला रुम नं १०१, न-हे गाव झिल कॉलेज जवळ न-हे गाव पुणे येथे लॉजमध्ये महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असले बाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. या बाबत पोलीस निरीक्षक छगन कापसे, अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक याचे साहयाने सदर बातमीची खात्री करुन “स्वर्ग एक्झीकेटीव्ह पॅराडाईज लॉज” येथे अचानक छापा टाकुन आरोपी १) अभिषेक दिलीप गवळी वय २४ वर्षे रा. खेड शिवापुर २) रामु सांडु देवकर वय २४ वर्षे रा. सिंहगड पुणे ३) महेश गणेश नागने वय ३४ वर्षे रा. न-हे गाव पुणे यांनी वेश्याव्यवसायासाठी “स्वर्ग एक्झीकेटीव्ह पॅराडाईज लॉज”, मध्ये आणलेल्या ०४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी वरिल आरोपीं विरुध्द दि.०५/०४/२०२६ रोजी न-हे पोलीस स्टेशन पुणे येथे गु.रं.नं. ०५/२०२६ भा.न्या. सं १४३ (१) (३), ३ (५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, प्रमाणे गुन्हा नोंद करुन सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३ पुणे शहर शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमय रसाळ, किशोर भुजबळ, महिला पोलीस अंमलदार रेश्मा कंक व वैशाली इंगळे यांनी केली आहे.

मंत्रालयातील लाचखोर अधिकाऱ्याला अटक:ग्रामविकासचा निधी मंजूर करण्यासाठी 6 लाख रुपये मागितले; एसीबीची खारघरमध्ये कारवाई

मुंबई- मंत्रालयातील लाचखोरीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती, ती घटना ताजी असतानाच आता मंत्रालयातील एका बड्या माशावर ‘एसीबी’ने (लाचलूचपत प्रतिबंधक विभाग) मोठी कारवाई केली आहे. अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना ६ लाख ३७ हजार रुपयांची भरभक्कम लाच स्वीकारताना खारघर परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा प्रलंबित निधी मंजूर करून देण्यासाठी कक्ष अधिकारी विलास लाड यांनी लाचेची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम ६ लाख ३७ हजार ५०० रुपये इतकी मोठी होती. नवी मुंबईतील खारघर परिसरात लाचेची ही रक्कम स्वीकारण्यासाठी लाड आले असता, एसीबीने रचलेल्या सापळ्यात ते अलगद अडकले. एका सामान्य माणसाचा वर्षाचा पगारही नसेल, एवढी मोठी रक्कम हा अधिकारी एकाच कामासाठी लाच म्हणून घेत होता, हे विशेष.

मार्च महिन्यात एसीबीने मंत्रालयात केलेल्या कारवायांच्या धडाक्यानंतर, प्रशासकीय वर्तुळात अशी चर्चा होती की ही केवळ ‘मार्च एंडिंग’ची धावपळ आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विलास लाड यांच्यावर झालेली ही कारवाई पाहता, एसीबीने आपला मोर्चा आता कायमस्वरूपी मंत्रालयातील भ्रष्टाचाराकडे वळवल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयासारख्या उच्च सुरक्षा आणि जबाबदारीच्या ठिकाणी बसून खुलेआम चालणाऱ्या या व्यवहारांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मंत्रालयात बसून सर्वसामान्यांच्या फाईली अडवून पैसे उकळण्याचा प्रकार नवीन नसला, तरी एका दिवसात एका वर्षाच्या पगारापेक्षा मोठी रक्कम लाच म्हणून घेण्याचे धाडस पाहून अधिकारी वर्गही अवाक झाला आहे. लाड यांच्या अटकेमुळे मंत्रालयातील अर्थ, नियोजन आणि ग्रामविकास विभागातील इतर संशयास्पद व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खारघरमधील या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले असून, “प्रशासनातील पारदर्शकता केवळ कागदावरच आहे का?” असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. सध्या आरोपी विलास लाड यांची कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या संपत्तीचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

रेल्वेने अहमदाबाद आणि रतलाम विभागांसाठी 398.36 कोटी रुपये खर्चाच्या ऑप्टिकल फायबर केबल बॅकबोन प्रकल्पाला दिली मंजुरी

नवी दिल्‍ली-

भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वेवरील दळणवळण विषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एका महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामध्ये अहमदाबाद आणि रतलाम विभागांमध्ये 398.36 कोटी रुपये खर्चून 4×48 ऑप्टिकल फायबर केबल (OFC) बॅकबोन टाकण्याची  तरतूद आहे.

हा प्रकल्प “भारतीय रेल्वेच्या उर्वरित मार्गांवर लाँग टर्म इव्होल्यूशन (LTE) च्या कम्युनिकेशन बॅकबोनसह कवच प्रणालीची  तरतूद (समग्र योजना  2024–25)” या शीर्षकांतर्गत मंजूर करण्यात आला आहे, ज्यासाठी कृती कार्यक्रम 2024–25 (PH-33) अंतर्गत एकूण मंजूर खर्च 27,693 कोटी रुपये  आहे. पश्चिम रेल्वेसाठी 2,800 कोटी रुपये  खर्चासह एक विशिष्ट छोटा प्रकल्प  देखील मंजूर करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मंजूर कामाचा भाग म्हणून, पश्चिम रेल्वेवर 1929 रूट किलोमीटर (RKm) मार्गावर 2×48 फायबर ओएफसी केबल्स टाकण्यात येतील. यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:

  • अहमदाबाद विभागात 1456 रूट किलोमीटर
  • रतलाम विभागात 473 रूट किलोमीटर

दळणवळण प्रणालीच्या या महत्त्वपूर्ण विस्तारामुळे रेल्वेच्या दळणवळण प्रणालीची क्षमता, विश्वसनीयता आणि कार्यक्षमता वाढेल. यामुळे ‘कवच’च्या अंमलबजावणीसह आधुनिक सिग्नलिंग प्रणालीलाही मदत  मिळेल, ज्यामुळे संपूर्ण नेटवर्कवर निर्बाध डेटा प्रसारण शक्य होईल.

हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण, सुरक्षा वृद्धी आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. यामुळे परिचालन कार्यक्षमता सुधारेल आणि प्रवासी तसेच माल वाहतुकीसाठी उत्तम सेवा प्रदान केल्या जातील.

 निवडणुका व पोटनिवडणुका 2026: ईसीआयनेट प्लॅटफॉर्मद्वारे उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या

4 राज्यांतील पोटनिवडणुकांसाठी एकूण 1,955 उमेदवार रिंगणात

नवी दिल्‍ली-

  1. निवडणूक आयोगाने 15 मार्च 2026 रोजी आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तसेच गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड आणि त्रिपुरा येथील 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
  2. 9 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुका तसेच 4 राज्यांतील पोटनिवडणुकांसाठी एकूण 1,955 उमेदवार रिंगणात आहेत.
  3. पश्चिम बंगाल (पहिला व दुसरा टप्पा) आणि तामिळनाडू येथील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) साठी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल असून पश्चिम बंगाल (दुसरा टप्पा) साठी 13 एप्रिल आहे.
  4. नागरिकांना ईसीआयनेटमधील “Know Your Candidates ” केवायसी मॉड्युलद्वारे उमेदवारांविषयीची माहिती, गुन्हेगारी प्रकरणे, मालमत्ता व दायित्वे, शैक्षणिक पात्रता तसेच अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वर मिळू शकते.
  5. वापरकर्ते ईसीआयनेटमधील “Conduct of Elections” या टॅबखालील केवायसी मॉड्युल वापरू शकतात. तसेच उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्राची (फॉर्म 26) संपूर्ण प्रत डाउनलोड करता येते.
  6. ईसीआयनेट हे जगातील सर्वात मोठे निवडणूक सेवा प्लॅटफॉर्म असून, भारताच्या निवडणूक आयोगाच्या 40 पेक्षा अधिक अ‍ॅप्स व पोर्टल्स एकत्रित करून सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देते.
  7. ईसीआयनेटद्वारे मतदारांना मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्ज स्थिती तपासणी, निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क, बीएलओशी संवादासाठी कॉल बुकिंग, ई-ईपिक डाउनलोड, मतदान प्रवृत्ती आणि तक्रार निवारण यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
  8. याशिवाय, नियमभंगाची तक्रार नोंदवण्यासाठी सी विजिल आणि दिव्यांग मतदारांसाठी सुलभ सेवा सुनिश्चित करण्यासाठी सक्षम यांसारखी साधनेही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी पुण्यातील एफटीआयआय, एनएफडीसी-एनएफएआय आणि दूरदर्शन केंद्र येथे भेट दिली

पुणे-

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी-एनएफएआय) आणि दूरदर्शन केंद्र या संस्थांना भेट दिली. 1 एप्रिल 2026 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर  या संस्थांना त्यांनी प्रथमच भेट दिली.

या भेटीदरम्यान कुमार यांनी एफटीआयआयच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि परिसराची व्यापक पाहणी केली. एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक  प्रकाश मगदूम यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी एफटीआयआयमधील नवीन थिएटर संकुल, कॅमेरा स्टोअर, ग्रंथालय, शैक्षणिक विभाग आणि स्टुडिओ यांसारख्या प्रमुख सुविधांना भेट दिली. वरिष्ठ प्राध्यापकांनी त्यांना संस्थेची अत्याधुनिक उपकरणे आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांविषयी माहिती दिली.

या प्रसंगी चंचल कुमार यांनी विविध व्यासपीठांवर भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे सादर करण्यात चित्रपट आणि डिजिटल मीडिया शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. देशाच्या अर्थव्यवस्थेत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे वाढते महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि एफटीआयआयसारख्या संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी व्यापक भूमिका बजावावी असे आवाहन केले.

अशा संस्थांनी युवा प्रतिभेला केवळ दर्जेदार चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रम निर्मितीसाठीच नव्हे, तर चित्रपट आणि माध्यम उद्योगातील उद्योजकतेसाठीही प्रोत्साहन दिले पाहिजे असे त्यांनी पुढे नमूद केले.

या भेटीला विशेष महत्त्व आहे, कारण एफटीआयआय, पुणेने अलीकडेच विद्यापीठ म्हणून नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे, ज्याचा उद्देश शैक्षणिक संधींचा विस्तार करणे आणि विकसित होत असलेल्या माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील सहभाग अधिक वाढवणे हा आहे.

सचिवांनी पुण्यातील एनएफडीसी-एनएफएआयच्या संकुलांनाही भेट दिली. त्यांनी प्रोजेक्शन रूम, थिएटर, व्हॉल्ट आणि ग्रंथालयाची पाहणी केली, तसेच दुसऱ्या टप्प्यातील सुविधेलाही भेट दिली, ज्याठिकाणी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत डिजिटायझेशनचे काम सध्या सुरू आहे.

दूरदर्शन केंद्र, पुणे येथे त्यांनी केंद्राच्या कामकाजाचा आणि कार्यक्रम निर्मिती सुविधांचा आढावा घेतला, तसेच आशय निर्मिती आणि प्रसारासंदर्भात अधिकाऱ्यांशी संवाद साधला.