पुणे: हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन उभे करण्याच्या उद्देशाने १९ जूनपासून गोवा राज्यात या अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. २५ जूनपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ,बांगलादेश आणि श्रीलंका येथील १२५ हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामायिक कृती आराखाद्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्चित करणार आहेत,अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे शहर प्रमुख अधिवक्ता राजीव देशपांडे,सनातन संस्थेचे शंभू गवारे,विजय गावडे,प्रवीण नाईक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील घनवट म्हणाले की, हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत असला, तरी हिंदूंच्या मागील अनेक वर्षानपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन,कलम ३७० रहित करणे,गोवंश हत्या बंदी,राम मंदिराचे पुननिर्माण आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदु संघटनांनी आता पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे. मागील ४ राष्ट्रीय अधिवेशनात निश्चित झाल्यानुसार महाराष्ट्र राज्यातही गोवंशहत्या बंदी कायदा त्वरीत लागू करण्यात यावा, श्रीरामनवमीच्या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये पूजा करण्याची हिंदूना अनुमती मिळावी आदी राष्ट्र आणि धर्म विषयक महत्वाच्या विषयांवर प्रत्येक महिन्यात आंदोलने करण्यात आली.याच कार्याला अधिक गती देण्यात प्रयत्न या पाचव्या अधिवेशनाद्वारे होईल.असेही घनवट म्हणाले.