पुणे: छोट्यांच्या मुखावरील स्मित लाघवी असतं याची सर्वांनाच कल्पना आहे. फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या सीएसआर विभाग निर्मित आणि राहूल पणशीकर दिग्दर्शित ‘मुस्कान’ या लघुपटातून पदपथावर राहून कुटुंबियांसमवेत भीक मागणाऱ्या अकरा वर्षीय मुस्कान या मुलीची जीवनकहाणी आपल्यासमोर उलगडत आहेत. हा लघुपट मुस्कान आणि तिला अपरिचित परंतु प्रगतीपथावर नेणारा मार्ग दाखविणाऱ्या नेहा या समाजभान असणाऱ्या मुलीची कथा. हा लघुपट नुकताच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात निमंत्रितांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. उपस्थितांमधील चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी लघुपटाचे कौतुक केले.
राहूल्स ग्राफिक्स फोटोग्राफी स्टुडिओचे राहूल पणशीकर यांनी याप्रसंगी सांगितले की भारतात भीक मागणे हे प्रमाणाबाहेर वाढले आहे. समाजविघातक व्यक्तींनी गरिबांना भीक मागायला भाग पाडून, त्यांचे शोषण करत हा एक मोठा फोफावणारा उद्योग बनवून स्वतः चैनीत आयुष्य घालवताहेत. भारतीयांना शरमेची गोष्ट ही आहे की देशात चार लाख भिकारी आहेत आणि प्रत्येकाने ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण ‘मी एकटा/ एकटी काय करू शकणार असा विचार करत असाल?’ तर त्याचे उत्तर आहे ‘होय, करू शकतो.’
ते पुढे म्हणाले की, फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. आणि राहूल्स ग्राफिक्स यांनी या पदपथवासी भिकाऱ्यांना मदत करून त्यांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगता येईल यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.
फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री निरंजन किर्लोस्कर यांनी सांगितले की, कंपनीला सामाजिक कार्याविषयी केवळ आस्थाच वाटते असे नसून, एक औद्योगिक संस्था म्हणून कंपनीची ती जबाबदारीच आहे असे आम्ही मानतो. त्यासाठीच सीएसआर विभाग स्थापून त्यात निष्ठावंत व्यक्तींची नेमणूक केली आहे, ज्यामुळे समाजहिताची कामे करता येतील. ते पुढे म्हणाले की, राहूल्स ग्राफिक्स आणि फ्लीटगार्डच्या पुढाकाराने तयार झालेल्या ‘मुस्कान’मुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पदपथावर राहणाऱ्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊन ते त्यांना सन्मानाने जगण्यास सहाय्य करतील.