पुणे- मध्यमवर्गीय विद्यार्थी पालक यांना फी सवलत तर मिळवून देणारच….या निर्धाराने विविध पालक आणि विद्यार्थी संघटनासह विविध स्तरावर काम करणाऱ्या संघटना एकत्र येत असून येत्या मंगळवार पासून त्यांच्या एकत्रित आंदोलनाला प्रारंभ होऊ शकेल अशी स्थिती आहे .
याबाबत सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी ‘माय मराठी’ ला सांगितले कि,‘कोरोनामुळे सामान्य मध्यमवर्गीय माणसाचे कंबरडे मोडलेले असताना सामान्य मध्यमवर्गीय पालकांनी जर फी सवलतीची विनंती शाळांना केली तर त्यात चुकीचे काय? ऑनलाईन शाळा सुरु असल्यामुळे गॅदरिंग, क्रिडा, सांस्कृतिक उपक्रम, शाळेत दिला जाणारा खाऊ असे अनेक खर्च जर झालेच नाहीत तर फी मध्ये घेतले जाणारे त्याचे पैसे सर्वसामान्य मध्यमवर्गीय पालकांनी भरायचे तरी कसे आणि का? फी न भरल्यामुळे मुलांचे रिझल्टस अडविणे, मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या लिंक न पाठविणे हे प्रकार तर अनेक शाळांकडून तर चालूच आहेत. आता ह्या सगळ्याबाबत आपली समस्या सांगण्यासाठी जेंव्हा पालक दबकत दबकत शाळेत जातात तेंव्हा त्यांना काय वागणुक दिली जाते हा तर एक वेगळाच विषय. संघटनांनी या बाबत संस्थांशी बोलायचा प्रयत्न केला तर एकीकडे तोंडावर गोड बोलायचे आणि पाठीमागून पोलीस आयुक्तांकडे खोट्या तक्रारी करुन फी सवलतीचा मुळ विषय दुसरीकडे वळवायचा. आता पोलीस कर्मचारीच खासगीत चालू असलेल्या कामाचे कौतुक करतात ही गोष्ट वेगळी कारण त्यांच्या मुलांच्या फी पण त्यांना भराव्या लागतच आहेत की त्यामुळे फी सवलत मिळालीच पाहिजे हे त्यांचे पण म्हणणे आहेच.आपणास कल्पना आहे का की जर हा फी सवलतीचा विषय नाही झाला तर पुणे शहरात हा हजारो कोटींचा गैरव्यवहार ठरणार आहे. आणि म्हणूनच पालक आणि विविध संघटना यांनी आज एकत्रितपणे फी सवलतीची मागणी ही आता आंदोलनात परावर्तित करण्याचा निर्णय घेतला. येत्या मंगळवार पासून हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. आज पुण्यात विविध संघटना, विद्यार्थी संघटना, पालक यांची एकत्रित बैठक झाली आणि आंदोलनाची पुढची वाटचाल ठरविण्यात आली.सामान्य मध्यमवर्गीय पालकांची विनाकारण होणारी लूट थांबविण्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी चालेल पण कोरोना काळातील ऑनलाईन शाळेच्या फी मध्ये सवलत तर मिळवणारच… कारण आज ना उद्या कोरोना जाईल पण काळ सोकावला नाही पाहिजे…