- आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज राहा यांचे प्रतिपादन
पुणे- कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात सर्वांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यापैकी आर्थिक आव्हान हे मोठे असेल, त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सज्ज असले पाहिजे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच भविष्यातही आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणावर सर्वाधिक भर दिला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या आमदार निधीतून महापालिकेला वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे सर्व साहित्य आज प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, आ. मुक्ता टिळक, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर मधील एका लहानग्यांच्या व्हायरल व्हिडीओचा दाखला देत श्री.पाटील म्हणाले की, माझ्या सार्वजनिक जीवनात खासदार गिरीश बापट यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांचे नेहमी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना सक्षम करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. सध्या कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. त्यामुळे आता आगामी काळात सर्वांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यापैकी आर्थिक आव्हान हे मोठे असेल, त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सज्ज असले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला महामारीच्या संकटाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दृष्टीक्षेपात आल्या नाहीत. मात्र, कोरोनाच्या आव्हानामुळे आपल्याला या त्रुटी दिसून आल्या. त्यामुळे त्या दूर करण्यासोबतच, आगामी काळातील आव्हानांचा सामना करण्यच्या दृष्टीने त्या अधिकाधिक सक्षम केल्या पाहिजेत अशी सूचना ही त्यांनी यावेळी केली.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, गेल्या सव्वा वर्षांपासून आपण सातत्याने कोरोना महामारीचा एकजुटीने सामना करत आहोत. या काळात समाजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून काम करत होता. आता आगामी काळात सर्वांनी अतिशय सजग होऊन काम करण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आ. मुक्ता टिळक म्हणाल्या की, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आमदार निधीतून एक कोटीचे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र, भविष्यात याचा वापर करण्यापेक्षा निरोगी पुणे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले.