पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रामध्ये सत्तेवर आले त्याला रविवारी (ता. ३०) सात वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर नगरसेवक महेश वाबळे यांनी पद्मावती, सहकारनगर भागातील गरीब व गरजू नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि योजनांचा शुभारंभ केला असून या अंतर्गत शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थ्यांना मोफत कार्ड काढून देणे तसेच महिला सक्षमीकरणासाठी विधवा पेंशन योजनाचा फार्म भरून देणे यासह विविध सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते या योजनांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी रवी अनासपुरे, पर्वती भा ज पा मतदारसंघाचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर ,नगरसेवक दिपक पोटे,राजेश येनपुरे,मा.नगरसेवक दत्ता खाडे, धनंजय जाधव,कैलास मोरे ,भानुदास ढोबळे,प्रंशात खवळे, करन देवेंद्र शाम लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुळीक म्हणाले सरकारच्या सात वर्षा च्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. सुमारे एक लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक, बॅंकिंग सुधारणा, सार्वजनिक उद्योगातील छोट्या बॅंकांचे मोठ्या बॅंकांत विलीनीकरण, मेक इन इंडिया, उद्योग निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देशांतर्गत उत्पादनावर भर आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी कृषीत क्षेत्रात आमूलाग्र बदलांचा आग्रह यासह अनेक मोठे निर्णय घेतले असून शासकीय योजना थेट गरीबांच्या बँक खात्यात जमा होत आहेत.
नगरसेवक महेश वाबळे म्हणाले मोदी सरकारच्या कार्यकाळात लोककल्याणाच्या विविध योजना डीबीटी – ‘आधार’चा आधार घेत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करणे शक्य झाले. प्रभागातील सर्व नागरिकांचे आरोग्य नेहमी सुदृढ राहावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणार्या आवश्यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात ५० टक्के सूट मिळते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचे सभासदत्व घ्यावे लागते. योजनेचे सभासद झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेद्वारे एक कार्ड उपलब्ध करुन दिले जाते. या कार्डावर लाभार्थ्याला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये स्वस्त दरात उपचार मिळतात. महापालिकेच्या दवाखान्यातून आवश्यक औषधेदेखील मोफत उपलब्ध होतात. या साठी लागणारे कार्ड मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.