पुणे, : सातपुडा पर्वतरांगांमधील ‘निहाल’ या आदीवासी जमातीच्या विकासासाठी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सने पुढाकार घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील, ‘सोनबर्डी’ या दुर्गम गावात आरोग्य तसेच शैक्षणिक सुविधांसह विविध शासकीय योजना व प्रकल्प राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या विकासकार्यात या परिसरातील ‘रेड स्वस्तिक सोसायटी’देखील सहकार्य करणार आहे.
डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीतर्फे पुणे परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. “कंपन्यांची सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) या अंतर्गत मोठ्या कंपन्या शहरात सामाजिक कार्यक्रम राबवितात. मात्र, खेड्यांमधून किंवा दुर्गम आदिवासींकरिता असे कार्यक्रम तुलनेने कमी दिसतात. हेच ओळखून या भागाच्या सर्वांगिण विकासासाठी कंपनीने हा निर्णय घेतला” असे संस्थापक आणि अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.
या भागात विविध खात्यांच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाचपोर यांनी सांगितले. सेवाभावी संस्था आणि शासन यांच्यातील दुवा बनण्याचे काम कंपनी करेल असेही ते म्हणाले.
सोनबर्डी ग्रामस्थांसाठी तातडीने पुरविण्यात येणा-या सुविधांमध्ये आरोग्य कक्ष उभारण्यासाठी कंपनीतर्फे एक लाखांचा धनादेश रेड स्वस्तिक सोसायटीचे डॉ. अजित जाधव यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. याबाबत जाधव म्हणाले, “निहाल जमातीत आरोग्याच्या दृष्टीने साक्षरता निर्माण करणे गरजेचे आहे. रेड स्वस्तिक सोसायटी यासाठी गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. डीएसके डेव्हलपर्सच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमातून निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील.”
या वेळी प्रा. एस. डी. भगत, विजय पाटील, सचिन देशमुख, डॉ. हरीश काकड, डॉ. संदीप देशमुख, डॉ. नरेंद्र गुप्ता, गोपाळ पाटील, मदन गुजर उपस्थित होते.