पुणे :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दर महिन्याला शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक प्रकाशित करण्यात येते. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब याअंकामध्ये पहायला मिळते. दर्जेदार मजकूर, आकर्षक मांडणी व सप्तरंगी अंक प्रकाशित होत असल्यामुळे या मासिकाचा खप सुमारे चार लाखांवर गेला आहे. अंकातील सर्व मजकूर वाचनीय व वैशिष्टयपूर्ण असतो. या मासिकाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यत लोकराज्य मासिक पोहोचावे, यासाठी सप्टेंबर महिन्यात लोकराज्य वाचक अभियान आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात 1 सप्टेंबर रोजी एरंडवणे येथील यशवंतराव मोहिते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित लोकराज्य वाचक अभियानाद्वारे होत आहे. या उपक्रमाअंतर्गत लोकराज्य वाचक मेळावे आयोजित करणे, लोकराज्य शाळा करणे, प्रश्नमंजुषा तसेच विविध ठिकाणी लोकराज्याचे स्टॉल लावणे आदि कायक्रम घेण्यात येणार आहेत.
लोकराज्य मासिकामध्ये प्रसिध्द झालेली माहिती अधिकृत स्वरुपातील असल्यामुळे, स्पर्धा परिक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. कुटुंबातील सर्वच सदस्यांना उपयोगी पडणारी माहिती या अंकामध्ये असते. या मासिकामध्ये प्रसिध्द झालेले लेख व अन्य मजकूराचा वापर अन्य ठिकाणी करता येतो, हे सुध्दा या अंकाचे वैशिष्टय आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य वाचक अभियानाचा लाभ घेऊन मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.