पुणे – मोटर वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहिर लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगम ब्रीज, पुणे येथे दिनांक 30 मे 2018 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला आहे. ही वाहने परिवहन कार्यालय, संगमब्रीज, पुणे, पीएमपीएल डेपो कात्रज, शिंदेवाडी, स्वारगेट डेपो, भोर विभागीय कार्यशाळा येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहीर लिलावात एकुण 227 वाहने उपलब्ध आहेत. यात टॅक्सी, ट्रक, बस व स्क्रॅप रिक्षा या वाहनांचा समावेश आहे.
लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या सूचना फलकावर माहितीसाठी लावणयात आली आहे. इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी नमूद केलेल्या स्थळी करता येईल.
जाहीर लिलावत सहभागी होण्यासाठी दिनांक 25, 28, 29 मे 2018 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरटीओ पुणे या नावे 25 हजार रुपये अनामत रक्कमेचा डीमांड ड्राफ्टसह नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी कार्यालयाशी संपर्क करावा. लिलावाच्या अटी व नियम सोमवार दिनांक 25 मे 2018 पासून कार्यालयीन कामकाजा दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथील नोटीस बोर्डवर सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. वाहनांची विक्री ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर करण्यात येईल, अशी माहिती कराधान अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.