पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत औद्योगिक प्रवेश संस्थामधील शैक्षणिक वर्ष 2016-17 वर्षाची प्रवेश प्रक्रिया या वर्षी काही कारणास्तव उशीरा सुरु करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असला तरी ती विहीत मुदतीत पूर्ण करण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक सी. ए. निनाळे यांनी केले आहे.
यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असला तरी ती विहीत मुदतीत पुर्ण करुन प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्र वेळेवर सुरु करण्यात येईल तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दि. 15 जून 2016 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्जस्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे इत्यादी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थात दररोज करण्यात येत आहे. माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेशपक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले जाईल; तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थात उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची तसेच प्रवेशप्रक्रियाबाबतची अद्यावत माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या www.dvet.gov.in या संकेत स्थळावर तसेच प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय आणि सर्व शासकीय व खासगी औद्यागिक प्रशिक्षण संस्थात उपलब्ध आहे, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.