मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आणि विश्वासातले अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. खास भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली गेली आहे.. याआधी मुंबई पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त अशी पदं होती. परंतु खास भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली गेल्याने राजकीय वर्तुळासह पोलीस खात्यात देखील उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे . फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट दिल्यानंतर भारती यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती अधिक राजकीय चर्चा उसळवीत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर होते. मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देवेन भारती यांची वाहतूक विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती केली गेली. तेव्हापासून देवेन भारती फारसे प्रकाशझोतात नव्हते.
येत्या काही महिन्यांत मुंबई महानगरपालिका निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या घटना असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी हे पद महत्त्वाचे ठरणार आहे.यापूर्वी भारती यांनी मुंबई शहराचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) भूषवलं आहे.
- देवेन भारती १९९४ सालच्या बॅचचे IPS अधिकारी
- फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वात शक्तीशाली IPS म्हणून ओळख
- फडणवीस यांच्या अतिशय विश्वासातले, मर्जीतले अधिकारी म्हणून भारती यांचा परिचय
- भारती यांनी महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्व केले होते
- त्यापूर्वी ते अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) होते.
- २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरातील अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासातही त्याचा सहभाग होता.
- महाविकास आघाडीच्या काळात भारतींची वाहतूक विभागात बदली
- आता सत्तांतरानंतर फडणवीसांकडून विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती
- मुंबई महापालिका निवडणुकीअगोदर त्याच पदावर देवेन भारती यांची नियुक्ती