कॉंग्रेसच कॉंग्रेसला कशी संपविते याचे उदाहरण असल्याचा दावा …
मुंबई (विशेष प्रतिनिधी )- राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या खात्यात पुरोगामी विचाराला तडा देत, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य निवड करताना चक्क उजव्यांना “हात” दिल्याने सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे.या मंडळावर निवड करताना ६० टक्के प्रमाणात आर एस एस आणि भाजपा प्रेमींची निवड केल्याने आता याबाबत साऱ्यांच्या नजर अमित देशमुख यांच्याकडे वळल्या असून , याबाबत कॉंग्रेस चे श्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते आहे.
विधानसभा निवडणुकीत १०५ आमदार येवून सुध्दा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने भाजपला सत्तेपासून दूर करून महाराष्ट्रात पुरोगामी विचाराचे महा विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. अर्थातच त्यानंतर सर्व महामंडळ आणि समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.त्यामुळे आता या तिन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या विविध महामंडळ आणि समित्यांवर आपली वर्णी लागण्यासाठी मंत्री आणि पुढाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहेत.
नुकतीच सांस्कृतिक कार्य खात्यांतर्गत येणाऱ्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने सदस्यांची यादी जाहीर केली.या यादीकडे कटाक्षाने नजर मारली तर चक्क पुरोगामी विचाराला तडा देत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी उजव्या विचाराच्या लोकांना आपले दोन “हात” पुढे करून या मंडळावर झुकते माप दिले आहे.यामुळे काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.या मंडळावर नियुक्त केलेल्या एका सदस्याचा म्हणजे अभिनेता प्रवीण तरडे यांचा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे.ज्यात तरडे यांनी याच वर्षात ओगस्ट मध्ये रिलीज झालेल्या या व्हिडीओ तून आपण आर एस एस चेच असल्याचे निक्षून सांगून त्याबाबत आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले आहे.सध्या सोशल माध्यमावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळांवर ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दलित साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांची अध्यक्ष पदी निवड व्हावी म्हणून अनेकांनी आग्रह धरला होता.सांस्कृतिक कार्य मंत्री यांना ही याबाबत काही मान्यवरांनी फेब्रुवारी – मार्च महिन्याच्या दरम्यान भेटून मागणी केली होती.पण ना.देशमुख यांच्या चुकीच्या सल्लागारांनी श्री.गज्वी यांच्या नावाला विरोध करून दलित साहित्यिकांपेक्षा पुणेकर कसे अध्यक्ष पदासाठी श्रेष्ठ आहेत.हे पटवून देण्याचे काम केले.त्यामुळे अमित देशमुख यांनी त्यांच्या नावावर फुली मारली.
यामुळे आता सांस्कृतिक कार्य मंत्री चांगलेच अडचणीत सापडले असून त्यांच्या पक्षातील त्यांचे विरोधक या संधीचा फायदा घेत हा संपूर्ण “प्रताप” काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत.असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.याबाबत प्रत्येक मुद्यांवर प्रतिक्रिया देणारे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांना याबाबत आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता,ते सुध्दा यावर काहीच बोलायला तयार नाहीत.
सांस्कृतिक खात्यातील एखाद्या समितीवर जर एका सदस्याने एक टर्म पूर्ण केले तर त्याला पुन्हा लगेच दुसऱ्या टर्म मध्ये त्या समितीवर घेता येत नाही. असे स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सन २०१० सांस्कृतिक धोरणात नियमावली केलेली आहे.पण सध्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर एक – दोन सदस्य असे आहेत की,ते मागील टर्ममध्ये या मंडळावर होते.आणि आताच्या जाहीर केलेल्या यादीत त्यांचे पुन्हा नाव आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता,या मंडळाच्या अधिकऱ्यांनी मंत्री महोदयांना अंधारात ठेवले असून त्यांना अडचणीत आणल्याचे सांस्कृतीक कार्य.खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे