- भारती विद्यापीठ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.
- एक पिस्तूल, चार काडतूसे जप्त.
पुणे – कात्रज भागातील शनिनगर परिसरामध्ये हातात पालगन घेऊन दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांना बघून पळून जात असताना त्याला पाठलाग करुन पकडण्यात आले. संबंधीत गुन्हेगार तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आला होता असे पोलिसांनी सांगितले.
कृष्णा बबन लोखंडे(19,रा.शनिनगर, साई मंदिरासमोर, आंबेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भारती विद्यापीठ पोलिसांचे गस्ती पथक कात्रज परिसरात गस्त घालत होते.
यावेळी पोलिस कर्मचारी सर्फराज देशमुख व गणेश शेंडे यांना एक खबर मिळाली की, एक व्यक्ती हातात पालगन घेऊन शनिनगर येथे दहशत माजवत आहे. खबर मिळताच गस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना कृष्णा हा हातात पालगन घेऊन दुकानदारांवर भाईगिरी करताना आढळला. तो दुकानदारांना दहशतीने दुकाने बंद करण्यास सांगत होता.
पोलिसांना बघताच तो पळून जाऊ लागला. मात्र गस्ती पथकाने त्याला पाठलाग करुन शिताफीने पकडले. त्याच्या हातातील पालगन काढून घेतल्यावर त्यांची अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीत पॅंन्टच्या खिशात खोवलेले एक पिस्तूल, चार काडतूसे सापडली. त्याला पोलिस ठाण्यात आणून त्याचे रेकॉर्ड तपासले असता, त्याला पुणे शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आल्याचे समजले.
त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणी तडीपारीचा भंग आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस हवालदार संतोष भापकर, पोलिस अंमलदार सोमनाथ सुतार, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.