पुणे :- राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्यसाधून क्रेडाई – महाराष्ट्रातर्फे महिला उद्योजिकांसाठी महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक शहरातील महिलांसाठी स्वतंत्र समिती असणार आहे. क्रेडाई महाराष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या कार्यकरणी सभेत ३९ शहरांच्या संघटनांमध्ये उद्योजक महिला समितीची स्थापना करण्यात आली. या सभेत क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत सरोदे, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया,महेश जाधवानी, खैरनार पाटील,राजीव पाटील,पंकज शहा आदी उपस्थित होते.
पुण्यात महिलांची स्वतंत्र समिती असून दर्शना परमार-जैन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे यशस्वीपणे काम सुरु आहे. अनेक उपक्रम, चर्चासत्र आदीच्या माध्यमातून त्यांची वैचारिक देवाणघेवाण होण्यास मदत होत असून त्याचा फायदा त्यांना व्यवसायात होत आहे. पुण्याप्रमाणे इतर ३९ शहरातील शहराध्यक्षांनी ही पुढाकार घेऊन त्यांच्या शहरातही महिलांची स्वतंत्र समिती स्थापना करावी, असे आवाहन कटारिया यांनी यावेळी केले. यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उर्वरित ३९ जिल्ह्यात महिला समितीची स्थापना करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पातळीवर महिला समितीच्या संयोजक या पदी दर्शना परमार-जैन नियुक्ती करण्यात आली. सध्या नाशिक, औरंगाबाद व सातारा शहरांमध्येही महिला समितीची स्थापना झाली असून क्रेडाई- पुणे मेट्रोच्या महिला समितीमध्ये ४० महिला उद्योजिका सभासद आहेत. बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक अशा विविध विषयांवरील अभ्यास सत्र ,चर्चासत्र आयोजित करणे तसेच नाविण्यपूर्ण इमारतींना भेटी देऊन सदरची कार्यपद्धती,
रचना यांची अंमलबजावणी आपल्या व्यवसायात कशी करता येईल याचा उहापोह करणे व पर्यायाने बांधकाम क्षेत्रात महिलांना सक्षम बनविणे हे ध्येय असल्याचे क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितले.